तुलना

© धनश्री दाबके
“चल बाई नमिते, हात चालव पटपट. साडे दहा होत आले. आई येतीलच आत्ता आणि आल्या आल्या त्यांच्या खास स्टाईलने आढावा घेतील.. अजून भाजी शिजलीच नाही का? आणि डाळ वाटायचीच आहे का? कोंशिबीरीचा काय सीन आहे? वगैरे वगैरे.. त्यांनी येऊन तुझ्या टाईम मॅनेजमेंटचे धिंडवडे काढण्याआधीच कंबर कस बाई.” नमिता स्वतःशीच बोलत होती.
“नमिते, अगं साडे दहा नाही साडे नऊच वाजलेत आत्ता. आईला यायला वेळ आहे अजून.” नमिताची धावपळ पाहून संदीप हसून म्हणाला.
“अरे मुद्दामच घड्याळ तासभर पुढे करून ठेवलंय मी. म्हणजे तरी माझ्याच्याने कामं होतील पटपट.. नाहीतर काही खरं नाही माझं.” नमिताने पुऱ्यांसाठी कणिक भिजवायला घेतली.

“ए, आई इतकीही काही बोलत नाही हा तुला नमिता, तू जरा जास्तच टेंशन घेतेस..” संदीपने आईची बाजू घेतलीच.
“हो, तू तसंच म्हणणार रे ! कारण त्या अगदी शांतपणे आणि चांगल्या शब्दांत बोलतात ना.. पण मला माहितीये ना.. मनातून त्या वाटच पाहात असतात की कधी चान्स मिळतोय आणि त्या अनघाचे गोडवे गायला मिळतायत. मला काही कळत नाही असं वाटतं का तुला?”
सासूबाईंनी केलेलं अनघाचं कौतूक आठवताच नमिताचे हात जोरजोरात चालायला लागले आणि पुऱ्यांसाठी अगदी जशी हवी तशी परफेक्ट घट्ट कणिक मळली गेली.

‘जाऊ दे हिला आत्ता काही सांगून उपयोग नाही.. उगीच रंगाचा बेरंग व्हायचा’ या विचाराने संदीप पुढे काही न बोलताच पूजेच्या तयारीला लागला.
नमिताही भराभरा तिच्या पुढच्या कामाला लागली. मसाले भातासाठी तांदूळ धुवून ठेवले. काल रात्री अगदी आठवणीने भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ उपसून ती मिक्सरवर वाटून ठेवली. भराभर काकडी चोचवून कोशिंबीरीची तयारी केली. अगदी सराईतपणे नमिता स्वैपाक उरकत होती पण मनात मात्र सासूबाईंनी गायलेल्या अनघाच्या गोडव्यांचीच ट्यून वाजत होती.

काय तर म्हणे अनघा कशी फोकस्ड आहे..तिचं कसं सगळं वेळेवर उरकतं.. शाळेतली नोकरी, घरातलं सगळं सांभाळूनही कशी ट्यूशन्स घेते वगैरे वगैरे.. अरे न घ्यायला काय झालंय.. घरात इन मिन तीन माणसं.. कोणाचं जाणं नाही की येणं नाही.. कोणाशी कामाव्यतिरिक्त काही बोलणं सुध्दा नाही साधं.. इथे एकाच कॉम्प्लेक्समधे राहूनही आपल्याला तरी बोलावलंय का घरी कधी… नुसती स्वतःच्या बिझी असण्याची कौतुकं… तीही आपणच तिला बोलावून ऐकून घ्यायची..
अनघा काही असा माझ्यासारखा चारी ठाव स्वैपाक करत नाही. शिवाय मधल्या वेळेच्या खाण्यासाठी चिवडे आणि लाडू करत बसत नाही. सरळ विकत आणते सगळं.. पार्थ सांगतो ना.. पण ते ह्यांना दिसत नाही.. दिसते ती फक्त तिची टाईम मॅनेजमेंट.. कशाला उगीच तीची आणि माझी तुलना करायची??

नमिताच्या रागाच पारा हळूहळू वर जातच होता.. इतक्यात तिचा फोन वाजला.
मितालीने, जी आज सवाष्ण म्हणून नमिताकडे जेवायला येणार होती तिने, साडे बारा, पाऊण पर्यंत पोहचते असं सांगायला फोन केला होता.
मितालाच्या फोनमुळे नमिता परत वास्तवात आली आणि पुढच्या कामांना लागली. तोपर्यंत संदीपचीही पूजा आटोपली. तो आवरून ऑफिसला निघून गेला आणि जातांना नमिताला, “अगं नको एवढं टेन्शन घेऊस.. तुम्ही चौघचं तर आहात ना जेवायला.. होईल सगळं वेळेवर.. तू फक्त कोणाचा फोन आला तरी उचलू नकोस..” असं गमतीने सांगूनही गेला.
हो खरंच फोन आला कोणाचा की फारच वेळ जातो असं म्हणून नमिता देवापुढे रांगोळी काढायला बसली.

पुढल्या पाच सात मिनिटात नमिताच्या बोटांमधल्या जादूने संस्कारभारतीची एक छोटीशीच पण अतिशय सुरेख रांगोळी रेखाटली गेली.
संदीपने मनोभावे केलेली देवाची पूजा आता अजूनच खुलून दिसायला लागली. तुमच्या अनघाला येते का अशी रांगोळी आई?? .. असं मनात म्हणत नमिता स्वतःवरच खुश झाली.
नमिता होतीच तशी. सगळ्या कलांमधे एक्सपर्ट.. स्वैपाक खूप छान करायची.. नवे नवे पदार्थ करून बघायची..रांगोळ्या तर एकसे एक काढायची.. गाणं सुद्धा अगदी सुरेल म्हणायची..सगळ्यांशी हसून खेळून राहायची..तिला मैत्रीणीही भरपूर होत्या.

केव्हाही इतरांच्या मदतीला तयार असलेल्या नमिताला सतत कोणाचा ना कोणाचा फोन यायचा. मुळातच बोलकी असल्याने नमिताही फोनवर भरपूर बोलत राहायची, इतकं की तिची घरातल्या कामांची लय कायम बिघडायची आणि घरकाम उरकायचंच नाही… त्यावरूनच सासूबाई तिला अनघाचं म्हणजे तिच्याच बिल्डींगमधल्या मैत्रीणीचं उदाहरण देत राहायच्या.. ती बघ कशी वेळेत सगळं उरकते..
थोड्याच वेळात आई बाबा आले. संदीपने साग्रसंगीत केलेली देवपूजा आणि नमिताने देवासमोर काढलेली सुरेख रांगोळी बघून त्यांना खूप बरं वाटलं.

किती मनोभावे करतात हे दोघं आपल्या घरचे सगळे कुळाचार.. दोघांचही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे..
“नेहमीप्रमाणेच अगदी सुरेख रांगोळी काढलीस ग नमिता..” आई म्हणाल्या आणि नमिताच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
“आज सगळा स्वैपाकही अगदी वेळेत तयार आहे हा आई” असं म्हणत नमिताने सासूबाईंना सगळे पदार्थ दाखवले.
“वा ! छानच” म्हणून त्यांनी तिच्या खांद्यावर थोपटलं. आज सासूबाईंनी दिलेल्या शाबासकीमुळे नमिताची कळी खुलली आणि पुढचा सगळा कार्यक्रम अगदी छान पार पडला.

नमिताने मीतालीची मनोभावे ओटी भरली. तिला एक सुरेख ड्रेसचे कापड भेट म्हणून दिले. अगदी आग्रहाने आणि आनंदाने तिला जेवू घातले. मीतालीलाही नमिताने काढलेली रांगोळी खूप आवडली.
मिताली नमिताच्या सासूबाईंच्या मैत्रीणीचीच सून होती. त्यामुळे मिताली तिच्या सासूबाईंकडून नमिताच्या छान छान रांगोळ्यांबद्दल आणि गाण्याबद्दलही ऐकून होती.
“नमिता किती कला आहेत ग तुझ्या अंगात.. तुझ्या आणि माझ्याही सासूबाई तुझ्या रांगोळ्यांचं आणि गाण्याचं इतकं कौतूक करतात ना.. माझ्या तर सासूबाई मला नेहमी तुझं उदाहरण देतात.. जरा शिक नमिताकडून काहीतरी असं सांगत असतात मला. खरंच तू ग्रेट आहेस ग ! ..

आणि हे मी अगदी मनापासून म्हणतेय बरं.. . ही आजची रांगोळी सुद्धा किती सुरेख काढलीयेस तू.. मला शिकवशील अशी रांगोळी काढायला? माझ्या अजूनही एक दोन मैत्रीणी आहेत ज्यांना संस्कारभारतीची रांगोळी शिकायची आहे.. तू क्लासच घेशील का आमचा?” मितालीने असं विचारवल्यावर नमिता चक्रावलीच.
आधी तर आई बाहेर तिचं इतकं कौतूक करतात म्हणून आणि दुसरं मिताली तिच्या सासूबाईंनी तिला दिलेलं उदाहरण फक्त तुलना न समजता किती पॉझिटिव्हली घेतेय म्हणून..

“क्लास का? अगं मी कधी असा क्लासब्लिस घेतला नाहीये ग.. मी आपली माझ्यापुरती काढते रांगोळ्या..मला शिकवायला जमेल की नाही कोण जाणे आणि घरकामातून वेळ मिळेल की नाही तेही बघावं लागेल” नमिता म्हणाली..
“अगं जमेल की ! न जमायला काय झालंय? तू विचार कर आणि सांग.. मीही माझ्या मैत्रीणींना विचारून त्या काय म्हणतायत ते कळवते तुला.” असं म्हणून मिताली घरी गेली.
ती गेल्यावर सासूबाई म्हणाल्या,” अगं नमिता न जमायला काय झालंय तुला? सकाळची कामं जरा पटपट आवर म्हणजे वेळ मिळेल.. आणि जर दुपारी घ्यायचा असला क्लास तर रोहनच्या क्लासच्या वेळा आम्ही दोघं सांभाळू.. इथेच दोन बिल्डींग सोडून तर आहोत आम्ही.

मी रोहन लहान असतांनाही तुला म्हंटल होतं की मी सांभाळते त्याल तू गाणं शिक.. क्लासला जा… पण तुझं डोकं घरातल्या कामांतून वर निघतंच नाही. मला माहिती आहे, मी अनघाचं उदाहरण दिलं की तुला आवडत नाही. मी तुलना करतेय असं तुला वाटतं.. पण प्रत्येकच तुलनेचा हेतू वाईट नसतो ग.. आपल्या मुलाबाळांनी पुढे जात राहावं हीच त्यामागची इच्छा असते आई वडलांची.. तेव्हा जरा टाईम मॅनेजमेंट शिकून घे आणि स्वतःमधल्या कलागुणांना वाव दे.. आम्ही दोघं आहोतच तुझ्या पाठीशी.. “
“हो नमिता, ही म्हणतेय ते बरोबर आहे… एकदा का तू बिझी आहेस हे कळलं की तुझ्या मैत्रीणीही तुला उठसुठ फोन करून गप्पा झोडत बसणार नाहीत.. तुझाही वेळ सत्कारणी लागेल.. तेव्हा आता कच खाऊ नको.

समोरून तुला विद्यार्थी मिळतायत तर पुढे जा.. कोण जाणो उद्या तुझ्या क्लासेसचं नाव होईल आणि बॅचेस भरभरून बायका येतील. आता आज बघ ठरवलंस तर केलंसच की सगळं वेळेवर ! तेही अगदी साग्रसंगीत आणि चविष्ट… ” सासरे म्हणाले आणि नमिता आईबाबाच्या या प्रेमळ सपोर्टने भारावून गेली. खरंच आपणंच यांच्या हेतूबद्दल शंका घेत राहिलो.. तू चेंगट आहेस.. जरा पटपट आवर.. स्वतःची आवरशक्ती वाढव असं आई पण तर म्हणायची.

“हो आई बाबा… मी नक्की हा क्लासचा प्रयत्न करून बघते.. आजच संदीपशी बोलते आणि आईकडून माझ्या रांगोळीच्या जुन्या वह्याही आणते.. आणि हो .. आई मला खरंच अनघाचं उदाहरण देण्यामागचा तुमचा हेतू पॉझिटिव्हली नाही घेता आला.. पण आता असं होणार नाही.. परत कधीच..” विचार करून नमिता म्हणाली आणि मनोमन पुढच्या तयारीलाही लागली.
*******
खरोखरीच घरातल्या वडीलधाऱ्यांनी केलेली, मग ते आईवडील असोत की सासूसासरे, प्रत्येकच तुलना वाईट असते असं नाही.. तुम्हाला काय वाटतं?
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!