अभिनेत्री

© धनश्री दाबके
बरीच वर्ष बंद असलेलं शेजारचं घर मालकाने भाड्याने दिलं आणि सावंत कुटुंबीय नवे शेजारी म्हणून कांचनच्या आयुष्यात आले. नवरा, बायको व कॉलेजला जाणारी एक तरूण लेक असे तिघांचेच सुटसुटीत कुटुंब.
सावंताच्या सामानाचा टेंपो आला आणि कांचन चहा घेऊन त्यांच्याशी ओळख करून घ्यायला गेली.
सावंत बाई आणि त्यांची लेक दोघीही भरपूर बोलक्या होत्या.
मिस्टर सांवतही तसे बोलायला ठीकठाक होते. कुठल्याशा छोट्या कंपनीत कामाला होते.

सावंत बाई म्हणजे संध्याताई मात्र सरकारी नोकरीत चांगल्या पोस्टवर होत्या. अगदी चुणचुणीत आणि स्मार्ट असलेली त्यांची लेक मोहिनी फॅशन डीझाईनचा कोर्स करत होती.
संध्याताईंना पाहिल्यापासून कांचनला सारखं यांना कुठेतरी पाहिलय असं वाटत होतं, पण कुठे ते लक्षात येत नव्हतं.
तिने त्यांना तसं सांगितल्यावर संध्याताई हसून म्हणाल्या, “अगं मला पहिल्यांदा भेटणारे बरेच जण मला हेच म्हणतात की तुम्हाला कुठेतरी पाहिलंय म्हणून पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी माझ्या भावाला पाहिलेलं असतं. अगं प्रसिद्ध अभिनेता संजय शिंदे म्हणजे सध्याच्या गाजणाऱ्या सिरिअलमधले दादा हा माझा खरा दादा आहे. आमची चेहरेपट्टी आणि लकबी सारख्या आहेत ना आणि त्यात तुम्ही सध्या दादाला रोज टीव्हीवर बघताय ना त्यामुळे होतं असं.”

संध्याताईंनी हे सांगितल्यावर कांचनला जाणवलं खरंच की. ह्या संजय शिंदेंसारख्या दिसतात अगदी.
संध्याताईच पुढे म्हणाल्या, ” पण एक दिसण्यातले साम्य सोडले तर बाकी काहीच सेम नाही हा आमच्यात. तो इतका मोठा कलाकार आणि माझ्यात कलेचा क सुद्धा नाही. तो असामान्य आणि मी अगदी सामान्य.”
संध्याताई हे सगळं जरी हसत आणि सहज म्हणाल्या असल्या तरी स्वतःला अगदी सामान्य म्हणतांना त्यांच्या स्वरात खेदाची एक छटा मात्र जाणवली कांचनला.

थोड्याच दिवसांत संध्याताई आणि मोहिनी कांचनच्या छान मैत्रीणी झाल्या. कांचनकडेच काम करणारी लता सावतांकडेही काम करायला लागली.
संध्याताई ऑफिसला जात असल्याने तशा फार भेटायच्या नाहीत पण मोहिनी मात्र दिसायची कांचनला येता जाता.
मिस्टर सावंताच्या येण्या जाणाच्या वेळा खूप अनिश्चित असायच्या.
कधी कधी दोन तीन दिवस बाहेरगावी असायचे तर कधी कधी चार चार दिवस घरीच असायचे.
घरी असले की लताला भेटायचे.

एकंदरीत त्यांचं नोकरीचं काही धड नाही आणि संध्याताईच एक हाती सगळं सांभाळत आहेत हे कांचनला लताच्या बोलण्यातून समजले होते.
एकदा संध्याताई आणि मोहिनी चार दिवसांसाठी गावी गेल्या असतांना रात्रीच्या वेळी घाबरे घुबरे झालेले सावंत कांचनकडे आले. माझ्या भावाला हार्ट ॲटॅक आलाय. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि मला तातडीने पैशांची गरज आहे असं सांगायला लागले.
थोडी कॅश माझ्याकडे आहे आणि आत्ता ATM मधून मी वीस हजार आणलेत. पण बाकीचे उभे करणं मात्र कठीण आहे. संध्याही इथे नाही तेव्हा तुम्ही थोडी मदत करू शकाल का असं त्यांनी विचारलं.

शेजारी आहेत आणि आत्ताच्या क्षणाला त्यांना मदतीची गरज आहे या विचाराने कांचनच्या नवऱ्याने सावतांना चाळीस हजार रूपये दिले. ते घेऊन दहा दहा वेळा थॅंक्यू म्हणून सावंत गेले.
नंतर दोन दिवस त्यांची काहीच खबरबात समजली नाही.
तिसऱ्या दिवशी लताकडून कांचनला संध्याताई आणि मोहिनी घरी आलेल्या कळलं. मग कांचन सावतांचे भाऊ आता कसे आहेत ते विचारायला गेली.
“आता कसे आहेत मोहिनीचे काका? परवा तिच्या बाबांनी मला सांगितलं सगळं. पण नंतर काहीच समजले नाही म्हणून विचारायला आले” असं कांचनने म्हणताच संध्याताई आधी थोड्या गोंधळल्या.

ही मोहिनीच्या काकांबद्दल का चौकशी करते आहे कोण जाणे आणि ह्याने सगळं म्हणजे नेमकं काय सांगितलंय हीला? एक क्षण संध्याताईंना काही समजेचना, पण पुढच्याच क्षणाला काय झालं असेल हे लक्षात आलं आणि डोक्यात तिडीक गेली.
पण तरीही मनातला राग चेहऱ्यावर जराही न येऊ देता त्यांनी “हो हो ते आता आऊट ऑफ डेंजर आहेत.. काही कळजीचं कारण नाही. आम्ही तिकडूनच येतोय” असं सांगून वेळ मारून नेली.
“बरं झालं काकांवरचं संकट टळलं ते. आता पटकन बरे होतील ते. पण तरी अजूनही काही मदत लागली तर मला नक्की सांगा” म्हणून कांचन घरी आली.

अजूनही काही मदत म्हणजे कांचन नक्की काय म्हणत होती ते संध्याताईंना बरोब्बर कळलं.
याचा अर्थ आपल्या नवऱ्याने इथेही शेजाऱ्यांकडून पैसे मागायला सुरवात केली तर. कधी सुधारणार हा माणूस कोण जाणे. आधी संजय शिंदेंचा मेव्हणा म्हणून लोकांनी ह्याला तो मागेल तेवढे पैसे दिले. ते सगळे फेडता नाकी नऊ आले माझ्या. दादानेही खूप मदत केली तेव्हा. पण त्याने तरी किती वेळा सांभाळून घ्यायचं याला.
मोहिनीचा विचार करून मी याच्या चुका पोटात घेत गेले. याने पैसे घ्यायचे. व्यसनात उडवायचे. आणि मी ते फेडायचे. कंटाळा आलाय अगदी.

आता इथे नव्या शहरात आल्यावर तरी जरा देणेकऱ्यांपासून सुटका होईल असं वाटलं होतं. पण नाही इथेही तेच केलं ह्याने. म्हणजे याचा गेल्या वेळचा पश्चात्तापही खोटाच निघाला म्हणायचा.
माझ्या मंगळसूत्राची शपथ घेतली होती त्याने.
संध्याताईंचे डोळे वाहायला लागले.
थोड्यावेळाने मन जरासं शांत झाल्यावर त्यांनी सावंतांना फोन लावला जो उचलला गेला नाही. मग तर त्यांची खात्रीच झाली.

मग संध्याताईंनी आधी कांचनकडे जाऊन तिचे आभार मानले आणि बोलता बोलता सावतांनी किती पैसे घेतलेत ते काढून घेतले. तिचा अकाऊंट नंबर घेतला आणि आधी तिचे पैसे परत केले.
मग काही महिन्यांत लिव्ह लायसन्सचे ॲग्रीमेंट संपल्यावर संध्याताईंनी परत ऑफिसमधे गळ घालून स्वतःची बदली करून घेतली आणि त्या मोहिनी बरोबर त्या दुसऱ्या शहरात निघून गेल्या.
तेव्हा जरी कांचनला काही समजले नव्हते तरी नंतर मात्र घरमालकांकडून तिला सत्य परिस्थिती समजली. त्यांनाही ॲग्रीमेंट renew करायचे नव्हतेच कारण सावंतांनी कधीच वेळेवर घरभाडे दिले नव्हते.

इतरही काही लोकांकडून सावंतांच्या या खोटे बोलून पैशाची अफरातफर करण्याच्या सवयीबद्दल कांचनने ऐकले आणि तिला धक्काच बसला.
शेवटी काय? दारूड्या नवऱ्याबरोबरचा संसार रेटण्यासाठी धुणीभांडी करणारी लता आणि या सरकारी नोकरीत वरच्या पदावर काम करणाऱ्या सुशिक्षित संध्याताई या दोघीही सारख्याच.
आपल्या संसारासाठी, मुलाबाळांसाठी दिवसरात्र झटणारी, नवरा चांगलं वाईट कसाही वागला तरी नेटाने मुलांना जपणारी स्त्री म्हणजे खरंतर प्रत्येक नवऱ्यासाठी आयुष्यभर सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीसारखीच असते.

ज्याला तिची खरी किंमत कळते, जो तिला समजून घेतो, साथ देतो त्या पुरुषाचे आयुष्य सुखासमाधानाने बहरते. आणि जो तिची कदर न करता फक्त तिचा फायदा उठवत राहातो त्याच्यासारखा करंटा तोच.
पुढे सावंत कुटुंबीयांचे काय झाले हे कांचनला कधीच समजले नाही.
पण मी अगदी सामान्य आहे असं म्हणणाऱ्या संध्याताई त्यांच्या भावा इतक्याच किंवा कदाचित त्याच्यापेक्षाही थोड्या सरसच अभिनेत्री आहेत हे मात्र कांचनने मनोमन मान्य करून टाकले.
********
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!