रेशीमगाठी

© सौ. प्रभा निपाणे
ऋषी एका सुखवस्तू आणि सुशिक्षित घरचा मुलगा. आई शिक्षिका त्यामुळे मुलांना आईचा धाक असा नाही. परंतु आदरयुक्त भीती होती. ऋषी आणि त्याची बहीण ऋतुजा दोघेही हुशार आणि गुणी मुले.
ऋषीने इंजिनिअरिंग केले, खरतर त्याने चांगल्या कॉलेज मधून एम टेक करावे आणि स्पर्धा परीक्षा देऊन class one ऑफिसर व्हावे ही त्याच्या वडिलांची इच्छा होती.
पण ऋषिला नामांकित कॉलेज मधून MBA करायचे होते.

ऋषी आईला म्हणाला , “आई मला government जॉब मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. त्यात त्या बदल्या. मग कुटुंब सोडून एकटे राहायला जाणे . मला हे अजिबात आवडत नाही. आई तू नोकरीवर होतीस म्हणून आपण बाबांच्या मागे बदलीच्या ठिकाणी गेलो नाही. नाहीतर जावेच लागले असते.
दर तीन वर्षांनी नवीन शाळा, नवीन मित्र खूप कठीण होते हे सगळे.
बाबांना मात्र खूप त्रास झाला , हे तितकेच खरे.
कित्तेक वेळा कधी आम्हाला बर नसायचं, कधी तुला. पण बाबांना जावच लागायच. जायला त्यांचा पाय निघायचा नाही. तू म्हणायची जा तुम्ही, इकडची चिंता करू नका.

मग बाबा पोहचले की, सारखा फोन असायचा. घरात फोन उचलायला कोणी असेल तर बर. जर आपण कुठे अचानक बाहेर गेलो तर सारखे चिंतेत असायचे. तेव्हा काही मोबाईल नव्हते.
मग बाबांचे सुरू असायचे, काय झाले असेल ? कुणीच कसे फोन उचलत नाही ?
ऋषीला काल बरे नव्हते , जास्त झाले असेल का ? आणि या सर्व विचारात कधी कधी जेवायचे सुध्दा नाही.
बाबांनी आणि तू जे भोगले ते माझ्याही बायकोने भोगावे असे मला अजिबात वाटत नाही.
आई माझी बायको पण नोकरी करणारी असेल. एकाच ठिकाणी राहू ही शक्यता government जॉब मध्ये कमीच, उलट नाहीच.

मग बाबा आणि तुझ्यासारखे एकमेकांना सोडून, नाहीतर बायकोला जॉब सोडून ही तडजोड करावी लागेल.
माझा निर्णय झाला. मला MBA करायचे ते सुध्दा नामांकित कॉलेज मधून आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करायचा. जेणे करून दोघे एकाच ठिकाणी राहू.”
बाबा पुन्हा एकदा ऋषिवर चिडले, “अरे काय ते MBA चे खुळ डोक्यात घेऊन बसलाय. एमटेक करायचे सोडून.”
“बाबा मी तुमच्या समाधानासाठी एमटेक करेन सुध्दा. पण त्यात मी माझे करिअर कितपत करू शकेन नाही सांगू शकत.
बाबा माझ्या मनाच्या विरुद्ध शिक्षण घेऊन मी पुढे काहीच करू शकणार नाही हो ! किमान शिक्षण तरी असे लादू नका. बाबा ! काय शिकल्यावर आपण कोणत्या पदावर जाऊ शकतो किमान इतके नक्कीच कळते आम्हाला.”

मग आईने मध्यस्ती केली,”अहो !जर त्याची इच्छाच नाही एमटेक करायची तर मग काय उपयोग?
उद्या चांगले मार्क नाही मिळाले किंवा नापास झाला तर तुमच्या डोक्यावर खेटर . तुम्हीच म्हणाले होते..! आता मला नाही जमले…! झालो नापास..! माझा काय दोष? नकोच ते !”
“ठीक आहे सुलू” असे म्हणून बाबांनी त्यांचा निर्णय बदलला.
आता त्यांचा सूर खालच्या पट्टीतला होता, “ऋषी ! तुला MBA करायचे, नक्की कर.”

“Thank you बाबा ! बाबा, मागच्या वर्षी कॉलेज आणि MBA ची परीक्षा दोन्ही केले. परंतु मला पाहिजे तसे मार्क मिळाले नाही. त्यामुळे मी या वर्षी एक वर्ष अभ्यास करून परीक्षा द्यायचा विचार करतो.”
“हे बघ ऋषी तुला वाटते न की ड्रॉप घेऊन चांगले मार्क मिळतील तर नक्की घे. हो पण अभ्यास कर ह ! नाहीतर मागच्या वर्षी केला होता म्हणून मग टंगळमंगळ !”
“नाही बाबा असे काही होणार नाही.”
“ठीक आहे ! तुला योग्य वाटेल ते कर.”

“बाबा thank you ! समजून घेतल्या बद्दल !”
“ऋषी अरे पण क्लास लावला तर नक्कीच चांगले मार्क पडतील.”
“नाही बाबा ! घरूनच करतो.”
“Ok!”
ऋषी ने खूप अभ्यास केला. वेलिंगकर कॉलेज मधून MBA करत होता. विप्रोमध्ये कॅम्पस प्लेसमेंट झाली. बस आता एक महिना बाकी होता.
बघता बघता एक महिना सरला,ऋषी ला एकट्याला बँगलोरला पाठवायचे सर्वानाच जड जात होते.

घरात नुसती आई आणि धाकट्या बहिणीची रडारड चालली होती.
बाबा सुध्दा अस्वस्थ होते. पण दाखवत नव्हते.
ऋषी बंगलोरला गेला.
रोज फोन मेसेज चालू होते. अधून मधून येऊन जाऊन होता.
सर्व काही छान चालले असताना एक विपरीत घडले.
त्याच्याच ऑफिस मधील दोन मुलं जरा आगाऊ होती. एका मित्राने तसे त्याला सांगितले होते. जरा यांच्या पासून लांब राहा. तो सुध्दा तेव्हढ्याच तेव्हढे संबंध ठेऊन होता.

एक दिवस अचानक हे दोन मित्र ऋषीला मार्केट मध्ये भेटले. रात्रीचे दहा वाजले होते. त्यांनी ऋषी ला जबरदस्तीने हॉटेल मध्ये जेवायला नेले. त्याने नकार देण्याचा खूप प्रयत्न केला पण निष्फ़ळ ठरला. शेवटी गेला त्यांच्या सोबत.
आधी त्यांनी खूप शिगार फुंकल्या. ऋषी यापासून कोसो दूर होता. त्यामुळे त्याने नकार दिला.
मग त्यांचा मोर्चा वळला जेवणाकडे. आधी ड्रिंक ची ऑर्डर दिली. ऋषी जागेवर चुळबुळ करत होता.
परंतु त्या दोघांनी त्याला अजूनही बच्चा आहेस ? आईचा बाबू !भित्रा ! बरच काय काय बोलले.

“अरे एक पेग घे फक्त ! बघ कसे मस्त वाटते ! स्वर्ग खाली आल्यासारखे ! तुला असे फिल होणार, ‘आज मै ऊपर आसमा नीचे, आज मै आगे जमाना हैं पीछे’ चल घे यार! चिल्ल!
एकाने जबदस्तीने चियर्स करून त्याचा तोंडाला ग्लास लावला.
ऋषी एका दमात घटाघटा प्यायला.
पुन्हा एक, पुन्हा एक करत तो चार पेग प्यायला. आता ऋषीने चालवत सुध्दा नव्हते.
गाडी स्टार्ट करून तिघे चालले होते.

समोरून एक मुलगी येताना दिसली. ऋषीला त्यांनी त्या मुलीला पकडायला सांगितले. खूप काय काय बोलत होते ?
त्यांचे बोलणे आणि नशा, ऋषीने त्या मुलीला पकडले. दोघांनी त्याला मदत केली.
ऋषीला म्हणाले, दाखवच आज तू तुझी मर्दानगी.
तिच्या तोंडाला रुमाल बांधला. हात बांधले. कुणाची तरी चाहूल लागली. ते दोघे पळून गेले. ऋषी तिच्या जवळ जाऊन तिच्या अंगाशी खेळायचा प्रयत्न करत होता.
संधी पाहून तिने एक जोरात लाथ मारली. ऋषी एका दगडावर आपटला. थोडा मार लागला त्याला. पण त्या माराने तो शुद्धीवर आला. नशा पार उतरून गेली.

ती मुलगी थरथर कापत उठून उभे रहायचा प्रयत्न करत होती. झटापटीत तिलाही थोडे लागले होते. ऋषी उठून उभा राहिला. डोक्यातून रक्त वाहत होते. रुमाल काढून डोक्यावर धरला.
ती मुलगी अजूनही थर थर कापत होती. तोंड आणि हात बांधले असल्यामुळे. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आता चक्कर येऊन ती पडणार. ऋषी डोक्यावर धरलेला रुमाल फेकून धावत त्या मुली जवळ गेला. तिला अलगद आपल्या दोन्ही हाताने सावरले.
ती भानावर आली.
“कोण आपण ?”
“मी ! मी ! ऋषी!”
“ती मुलं कुठे गेली ?”
“ती पळाली !”

“तिघे होती ना ती ? अंधारात मला स्पष्ट दिसत नव्हते.”
“हो ! तिघे होतो ! दोघे पळून गेली! मी तिसरा !”
“काय?”
“हो ?”
तश्याही अवस्थेत ती तिथून पळ काढायचा प्रयत्न करू लागली.
आता ऋषी मात्र शांत होता.
तिचा पुन्हा पळताना झोक गेला.
ऋषीने पुन्हा तिला सावरले. त्याच्या स्पर्शात तिला आता सहानुभुती वाटली.
एकदा तिच्या मनात आले, दोघे पळून गेले. हा तिसरा असे तोच म्हणाला.नेमके काय असावे याचा मनात?

तेवढ्यात तो म्हणाला, “घाबरु नका. मी तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि हो सॉरी ! अनाहुतपणे केलेल्या चुकी बद्दल तुम्ही माफ करावे अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. पण माझ्या समाधानासाठी सॉरी.”
ऋषी तिच्या जवळ गेला. तिचे हात सोडले, तोंडावर बांधलेला रुमाल काढला.
नाक तोंड बंद त्यामुळे ती जोरजोरात श्वास घेत होती .
ऋषीने तिचा हात धरला, “या ! थोडावेळ या दगडावर बसा. माझ्या डीक्कीत पाणी आहे ते प्या ! बर वाटेल.”
तो पाणी आणायला गेला. रस्त्याच्या कडेला गाडी उभी होती.

नशीब गाडीची किल्ली गाडीलाच लावली होती. किल्ली काढली, डिक्कीतून पाण्याची बॉटल काढली.
तिला घोटभर पाणी दिले. थोडे शांत झाल्यावर तिला विचारले , “नाव काय तुमचे ?”
“शलाका “
“शलाका चला मी तुम्हाला घरी सोडतो.”
“नको जाईन मी !”
“नाही ! मी तुम्हाला एकटे सोडणार नाही . चला गाडीवर बसा.”
“नाही, मी जाईन एकटी !”
“हे बघा शलाका ,जवळ जवळ साडेबारा वाजले असतील. ही वेळ एकट्या मुलीने घरी जायची नाही.
माझ्या गाडीवर बसा ! मी तुम्हाला घरी सोडतो.”

“ठीक आहे. येते मी तुमच्या बरोबर. Excuse मी! नाव काय तुमचे ?”
“ऋषी ! ऋषी सदानंद दराडे.”
‘रात्री घालतात दरोडे.’ मनात पुटपुटली !
“काही बोललात तुम्ही??”
“नाही! चला मिस्टर ऋषी. येते मी तुमच्या सोबत.”
दोघे गाडी पर्यंत येत होते.
ती म्हणाली, “मिस्टर ऋषी मी स्वतःचे रक्षण करू शकते. कराटे प्रशिक्षण घेतलेली मुलगी आहे मी. तुमच्या मनात काही वाईट विचार असतील तर ताबडतोब काढून टाका. तुम्ही माझे हात बांधले, तरी सुद्धा मी पायाने तुमचा प्रतिकार करू शकले असते.”

“Good ! I am proud of you ! मुलींना सेल्फ प्रोटेक्शन करता आलेच पाहिजे. माझ्या बहिणीला सुध्दा आम्ही कराटे प्रशिक्षण दिले आहे.”
“ओह ! तुम्हाला बहिण आहे तर !”
“हो ! बहिण , आई, बाबा आणि मी असे आमचे चौकोनी कुटुंब. माझी बहिण २२ वर्षाची आहे. इंजिनीअरिंग करते. आम्ही तिला सेल्फ डिफेन्स शिकवले. तिला मागे असाच मुलांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला. दोघांना आडवे पाडले तिने. पेपरात फोटो पण छापून आला होता. काय बिशाद कोणी तिच्याशी गैरवर्तन करावे.”
“Good !”
गाडी जवळ पोहचले. आता तिला खात्री पटली तो एका चांगल्या घरातील मुलगा आहे जर त्याचा इरादा वाईट असता तर त्याने इतकी सहानुभूती दाखवली नसती.

ती आता गाडीवर गप्प बसून होती. ऋषी गाडी चालवत होता.
ऋषी म्हणाला, “शलाका तुम्ही इतक्या रात्री अश्या सूनसान रस्त्याने का चालल्या होत्या?”
“त्याचे काय झाले, मैत्रिणीच्या घराच्या थोडे पुढे गेले की एक गल्ली आहे. त्या तिथून छोटे छोटे चार रस्ते जातात. मी दुसऱ्याच रस्त्याने गेले. विचार आला मनात जावे मागे . मग वाटले एखादा रिक्षा नक्की मिळेल पुढे . याच नादात चालत गेले. पुढे तर भयाण शांतता होती. मग झपझप पावले टाकत चालायला लागले. पुढे तुम्ही तिघे दिसले. नंतर जे घडले ते तुम्हाला ठाऊक आहेच .”
“अच्छा म्हणजे रस्ता चुकला म्हणून बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले.”
“हो ना ! त्यात आईबाबांना वाटेल पोरगी येईल, आणि मैत्रिणीच्या घरी वाटेल गेली ही घरी.”
बोलता बोलता घर आले.

आईबाबा बाहेर अंगणात चक्कर मारत होते. अजून पोरगी घरी आली नाही. मैत्रिणीकडून थोड्या वेळात निघते बोलली. मैत्रिणीच्या घरचा फोन बिझी लागतो. रिसिव्हर बरोबर ठेवलेला दिसत नाही. हीचा मोबाईल स्विच ऑफ येत होता.
काय करावे ?
हळूच तिचे बाबा बोलले, “चल आपण जाऊ या ! मी गाडी काढतो. असे कधीच झाले नाही, की शलाका न सांगता कुठे थांबली.”
तेव्हढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला
शलाकाचे आईबाबा धावत गेट जवळ गेले. सुरक्षा रक्षक गेट उघडत होता. आपल्या मुलीला पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला.

शलाकाने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली . त्यांनी ऋषीचे मनोमन आभार मानले. तो रूमवर आला.
त्याला आता स्वतःचीच खूप लाज वाटत होती. शी ! इतक्या खालच्या पातळीवर कसे काय उतरलो आपण?
तिने लाथ मारली नसती तर मी दगडावर आपटलो नसतो, दगडावर आपटलो नसतो तर भानावर आलो नसतो.
किती विपरीत घडले असते माझ्या हातून ? कोणत्या तोंडाने आईबाबांना हे कारनामे सांगितले असते ? माझीच मला लाज वाटली असती! आणि ती मुलगी, बिचारी आयुष्यातून उठली असती. पण बर झालं, खूप धाडसी होती ती. त्यात कराटे चॅम्पियन. खरच आजकाल मुलींना हे सगळ शिकवायला हवेच. विचारात झोप कधी लागली कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता. ऑफिस ला सुट्टी होती. आरामात उठून एक कप कॉफी केली.
शलाकाचे विचार डोक्यातून जात नव्हते. Fb ओपन केले. विचार केला शलाकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी. स्वतःशीच बोलला, किती मूर्ख आपण. निदान मोबाईल नंबर तरी घ्यायला पाहिजे होता. शलाका ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली . तिने लगेच accept केली
मेसेंजरवर तो पुन्हा सॉरी बोलला.
ऋषी तुम्ही सारखे सॉरी म्हणू नका. उलट मीच तुम्हाला धन्यवाद देते. तुम्ही होता म्हणून माझे रक्षण केले. दुसऱ्या मुलांनी फक्त भक्षण करायचा विचार केला असता .
एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. कधी मेसेज कधी फोन असे दिवस जात होते. कधी भेटी चालू होत्या.

बघता बघता तिचे शिक्षण झाले, नोकरी लागली. वर संशोधन करायला वेगवेगळ्या ठिकाणी नाव नोंदवले. इकडे ऋषीच्या घरी सुध्दा त्याच्या लग्नाचे वारे वाहत होते. त्याने आजच चार साईट वर नाव नोंदवले.
मराठी शादी .com उघडले तर तो आश्चर्याने पाहतच राहिला.
शलाका गणेश गोखले.
मनातच म्हणाला, ‘आज पर्यंत पत्नी म्हणून कधीच शलाकाचा विचार केला नाही. अर्थात लग्न हा विषय सुध्दा डोक्यात नव्हता . पण आज तिचा बायोडेटा आणि फोटो पाहून, बायको म्हणून फक्त शलाका डोळ्यासमोर येते.
मी तिला रिक्वेस्ट पाठवली तर ती स्वीकार करेल?
नाही नकोच, मैत्री आहे ते खूप. तिचा काही गैरसमज होता कामा नये. आधीच माझ्यामुळे खूप मनस्ताप झाला बिचारीला. अजून नको.’

दोनच दिवसात शलाका ने रिक्वेस्ट पाठवली. ऋषीला खूप आनंद झाला.
लगेच फोन केला, “शलाका मी काय समजू ?”
“कशाबद्दल बोलतोय ऋषी ?”
“अग तुझी रिक्वेस्ट आली, त्याबद्दल.”
“मी पाठवली, पण तु अजुन स्वीकार कुठे केला.”
“म्हणजे ?”
“ऋषी, मला आयुष्याचा जोडीदार म्हणून तू चालणार आहे !”

“काय ?”
“हो ! पण तुझी इच्छा असेल तरच !”
“शलाका खर सांगू? मी लग्नाबद्दल इतका विचार केलाच नव्हता. पण दोनच दिवसापूर्वी नाव नोंदवले आणि समोर तुझा बायोडेटा आणि फोटो दिसला. पहिल्यांदा माझ्या मनात तोच विचार आला परंतु तू काय विचार करशील म्हणून मी रिक्वेस्ट पाठवली नाही.
शलाका माझी अर्धांगिनी म्हणून तू माझ्या आयुष्यात आली तर मी स्वताला खूप भाग्यवान समजेन . आणि !आणि!”
“आणि काय ऋषी ?”
“काही नाही !”
“ऋषी बोल ना ! काय झाले? तुझ्या आणि ने मला खूप अस्वस्थ केले. बोल ऋषी ! प्लिज!”

“फोन वर नाही ! भेटून बोलू!”
“कधी भेटूया ?”
“आजच ! सीसीडी ला! बरोबर पाच वाजता!”
“OK! बाय !”
“बाय! भेटू मग पाच ला!”
छान फिकट गुलाबी रंगाचा सलवार कमीज तिने घातला होता. त्यावर मॅचींग कानातले, एका हातात घड्याळ, दुसऱ्या हातात नाजूकसे ब्रेसलेट , गळ्यात गुलाबी खड्याचा नाजूक हार, तशीच मॅचीग अंगठी.
एखाद्या परी सारखी दिसत होती ती. जणू ऋषिला विचारत होती, बोल ! करशील माझ्याशी लग्न ? होशिल माझ्या आयुष्याचा जोडीदार? करशील माझी ही इच्छा पूर्ण?”

लहानपणी आईने गोष्टीत सांगितलेली परी, आज त्याला प्रत्यक्ष भेटत आहे असे त्याला वाटत होते. त्याचा डोळ्याची पापणी हलत नव्हती. शलाका ने पुढे होऊन त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवला! ऋषी भानावर आला.
“शलाका खूप सुंदर दिसते .”
“Thank you .”
“शलाका, माझा विश्र्वासच बसत नाही.”
“कशावर?”
“माझ्या डोळ्यांवर ! तू इथे अशी माझ्या समोर उभी आहेस. मी देहभान विसरून फक्त तुला पाहतो आहे! शलाका ! खूप नशीबवान समजेन मी स्वतःला. जर तू आयुष्याचा जोडीदार म्हणून माझी निवड केली तर !”

“ऋषी ! अरे मी तर तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले होते. शिक्षण पूर्ण व्हायचे होते , स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. म्हणून मी तुला कधीच जाणवू दिले नाही. घरात जेव्हा लग्नाबद्दल विचारले तेव्हा सर्व प्रथम तुझा चेहरा दिसला. परंतु तुला विचारायचे धाडस झाले नाही. कारण माझे one way love होते. तिथे फक्त मीच होते. तू सुध्दा तुझ्या मनाचा कधी थांग लागू दिला नाही.”
“इतके रामायण घडल्यावर मी कोणत्या तोंडाने तुला मागणी घालणार होतो.”
“ऋषी अरे त्याच एका कारणाने तू माझ्या ह्रुदयात जागा केलीस. जी मी तुझ्याशिवाय कोणाला देण्याचा विचारही करू शकत नाही.”
“काय म्हणालीस?”

हो ऋषी ! असे म्हणतात लग्नाच्या रेशीमगाठी स्वर्गात बांधल्या जातात. अगदी खरे आहे.”
“शलाका आपल्या रेशीमगाठी त्या रात्रीच्या सूनसान जागेत बांधल्या गेल्या होत्या.”
“शु!!! ऋषी, ती आपल्या भेटीची देवाने नियोजित केलेली जागा होती. “
“कोणाची रेशीमगाठ कुठे, कधी, केव्हा बांधायची हे त्याचे सुनियोजित असते. आपण निमित्त मात्र.”
“खरय ऋषी !”
“लव्ह यू शलाका!”
“ऋषी ! लव्ह यू टू….” असे म्हणत शलाका त्याच्या मिठीत शिरली…..
समा‌प्त
*********
© सौ. प्रभा निपाणे
सदर कथा लेखिका सौ. प्रभा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!