© सौ. प्रतिभा परांजपे
वैशाली बराच वेळ वाळूत खेळणाऱ्या मुलाकडे पहात होती. छोट्या छोट्या हाताने तो वाळूचे घर बांधत होता. वैशाली खाली बसली व त्याला मदत करू लागली. दोघं मिळून किल्ला बांधू लागले पण तो सारखा ढासळत होता.
तेवढ्यात “बंटी— पुरे आता, चला घरी जाऊ अंधार पडायला लागला” आवाज ऐकताच छोटा उठला व हात झटकून पळाला.बराच वेळ मग वैशाली ते उरलेलं घर सावरायचा प्रयत्न करत होती.
हात वाळूशी खेळत होते पण– मनांत वेगळेच विचार चालू होते..
आज ती कॅन्सर केअर डे च्या कार्यक्रमाला गेली होती.
गेली दोन वर्ष ती जात होती पण आज थोड्याच वेळात तिला त्या वातावरणाचा उबग आला म्हणून मन रमवायला तिने तिच्या आवडत्या चौपाटीचा समुद्रकिनारा गाठला.
इथे माणसांचा अथांग समुद्र पसरला होता. किती नवी जुनी जोडपी, तरुण तरुणी ,लहान मुले, नारळ, भेळ विकणारे यांच्या समिश्र आवाजाने गजबजलेली चौपाटी. पण इतक्या गर्दीतही तिच्या मनाचा एकटेपणा कमी होत नव्हता.
याच ठिकाणी सोहमने व तिने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या, एकत्र नारळ पाणी प्यायले होते .
लग्नाची तारीख ठरली होती ,त्याचे सेलिब्रेशन म्हणून आले होते.
त्यांच्या प्रेमाच्या भरतीला व नंतर च्या ओहोटीला हा रत्नाकर साक्षी होता.
“घर वाळूचे असो वा मातीचे त्याला ओलावा हवा त्याशिवाय नाही टिकत”–आवाज ऐकून वैशालीने मान वर करून पाहिलं.
एक 30-35 च्या वयाची स्मार्ट व्यक्ती समोर उभी होती.
त्यांनी पुढे जाऊन एका बाटलीमध्ये पाणी आणून त्या वाळूवर शिंपडले .
“पहा बरं आता जमते की नाही”??
वैशाली गोंधळलेल्या स्थितीत त्यांच्याकडे पाहतच राहिली.
ते खाली बसले. दोन्ही हातांनी वाळू एकत्र करून घर बांधायला लागले.
त्यांचा तो नीटनेटकेपणा वैशाली आश्चर्याने पहातच राहिली.
थोड्याच प्रयत्नाने त्यांनी सुंदर किल्ला बनवून टाकला. त्यावर शंखशिंपले लावले होते.
” अरे वा किती छान” तुम्ही आर्किटेक आहात कां??
” तुम्ही कसे काय”– ते पुढे बोलणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजला
फोनवर बोलता बोलता ते दूर निघून गेले.
बराच अंधार पडला असे पाहून वैशाली ही मग तिथून निघून घरी आली.
लग्नाची तारीख ४ मे ठरली होती. त्या आधीचा व्हॅलेंटाईन डे किती मस्त साजरा केला होता सोहम आणि तिने या समुद्रकिनाऱ्यावर
” या टेडी सारखी आहेस तू वैशू, भोळी आणि गोड , तिचे गाल दोन्ही हाताने कुस्करत ,तिला गिफ्ट म्हणून टेडी बियर देत सोहम तिला म्हणाला तेव्हा लाजून ती त्याच्या कुशीत शिरली होती.
आता फक्त त्या आठवणीच आहेत .
बरेच दिवस तो टेडी तिच्या बेडरूम मध्ये होता त्याला पाहून तिला सोहम आठवायचा, त्या सगळ्या चा तिला त्रास होऊ लागला.
एक दिवस तिने मन पक्कं करून तो टेडी खिडकीतून फेकून दिला..
तिच्या नकळत तिच्या शरीरात शिरलेला तो कॅन्सर, त्याने तिचे सगळे विश्वकोलमडून टाकले.
सुरुवातीला तिला भूक लागत नसे खाण्याची इच्छा कमी कमी होत , थकवा जाणवत असे अंगात ताप असे.
मग ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टर कडे वाऱ्या सुरू झाल्या.
निदान झालं ते पोटाच्या कॅन्सरचं.
सगळ्यांना आश्चर्यच वाटल इतक्या लहान वयात.?
या सर्वांत लग्नाची तारीख पुढे ढकलली गेली. दवाखान्याचे चक्कर, पथ्य पाणी या सर्वांत वैशाली भरडून निघाली.
चेहऱ्यावरचे सौंदर्य कोमेजून गेले.
एक दिवस तिला कळले की सोहमला अमेरिकन कंपनीचा जॉब ऑफर आली आणि तो निघूनही गेला. तिला न भेटता, न सांगता.
काय समजायचे ते समजले तिला . पण तरीही मनाला आशा वाटायची, हळूहळू ती पण मावळली.
ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होती. शरीरही रिस्पॉन्स देऊ लागले कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला म्हणून क्युअर ही झाला
एक वर्ष असंच गेल. मग ती जॉब वर पर्यंत जॉईन झाली. सोहमकडून काहीच रिस्पॉन्स नाही
आईला आशा होती ती अधुन मधून म्हणायची तू बोल, फोन करून विचार .
आईच्या समाधाना साठी तिने सोहम ला बरेचदा काॅल केला पण नाॅट आन्सरिंग येत राहिल..
मग तिनेही त्याचा विचार मनातून काढून टाकला.
आई सोहमच्या आई बाबांना भेटून आली. त्या नंतर मग तिने सोहमचा विषय वैशाली जवळ काढला नाही.
वैशालीने कसेबसे हे दुःख पचवले पण आईला नाही जमले ती आजारी पडली नी त्यातच गेली.
एक भक्कम आधार गेला.
हे सगळ आठवून वैशालीला अश्रू अनावर झाले.
आज ऑफिस मधल्या सुनयना मॅडमने घर बांधून झाल्याने पार्टीचे निमंत्रण दिलं होतं.
नव्या घरात प्रवेश, घर इतक छान व्यवस्थित बांधलेले, हाॅलची भव्यता , किचनचा नीटनेटकेपणा सर्व खूपच आवडलं .
बॉसने विचारले, “कोण आर्किटेक्ट आहे?”
“कोणी मिस्टर वरूण आहे, हे बघा आलेच ते.. या ,या मिस्टर वरूण , आपलीच आठवण काढत होतो.”
“अरे बापरे — मी काही स्पेशल नाही हो” हसत हसत मिस्टर वरूण बोलले.
तो आवाज कानांवर येतात वैशालीने वळून पाहिलं !
घरी परतताना वैशालीला यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. पण कुठे? ते काही आठवेना..
******
“पुढच्या आठवड्यात डॉक्टर देसाईकडे जनरल चेकअप साठी जायचं आहे लक्षात आहे नां?” वहिनीने आठवण करून दिली.
“हो वहिनी मी नोट करून ठेवल आहे “.
वहिनी व दादा दोघे किती काळजी घेतात म्हणून तर सोहम सोडून गेल्यावर ही वैशाली तग धरून होती नाहीतर केव्हाच—.
डॉक्टर देसाईंकडे बरीच गर्दी होती.
वैशाली बाहेर वेटिंग मध्ये बसली
आतून आवाज येत होता, डॉक्टर म्हणाले “–आता काळजीच काहीच कारण नाही! तुम्ही पूर्ण बरे आहात, तेव्हा साथीदार शोधा.”
” बरा आहे हो मी एकटा मजेत डॉक्टर “
हा आवाज कुठेतरी ऐकला?? नाही नाही ,मला आता भ्रम होतात की काय? डॉक्टरांना विचारायला लागेल.
तेवढ्यात वहिनीचा फोन आला. वैशालीने जरा बाजूला जाऊन रिसीव्ह केला.
परत आली तो पर्यंत ते निघून गेले होते.
वैशाली डाॅ च्या केबीन मधे गेली.
रविवारची सुट्टी दादा वहिनी लग्नाला गेलेले, वैशालीला घरी कंटाळा आला म्हणून बाहेर पडली.
बाजारात फिरता फिरता दुकानात मिस्टर वरूण भेटले.
‘तुम्ही?’
” तुम्हाला कुठेतरी पाहायल असं का वाटतं ?”
“नाही आठवत.?? म्हणजे सुनयनाना कडे पाहिलं त्या आधी?”
“वाळूचा किल्ला “!आठवतंय?
“अरे हो हो मी तोच विचार करत होते कुठे बरं–?”
“घरी जायची घाई नसल्यास बोलायला वेळ आहे तुम्हाला? जवळच काॅफी शाॅपआहे.”
‘चला.’
दोन कप कॉफीची आर्डर देत वरूण नी विचारले, “आज रविवार तुम्ही एकट्याच? रविवारी लोक फॅमिली सोबत असतात.”
“मी एकटीच असते.”
“मी तुम्हाला डॉक्टर देसाई कडे पाहिलं होतं” वरुण ने काफी पीत विचारले, “काही विशेष?”
” नाही जनरल चेकअप.”
“कशाचं?”
“मला पोटाचा कॅन्सर झाला होता. आता बरी आहे. पण तरी वर्षातून एकदा जाते.”
“ओ ,सॉरी!”
“इट्स ओके “–म्हणत वैशालीने कॉफी संपवली
“थँक्स, कॉफीछान होती . येऊ मी ?”
रात्री झोपताना वैशालीला डॉक्टर देसाईंच्या कॅबिनमधले संवाद आठवला .
डॉक्टर म्हणत होते तुम्ही बरे आहात तो आवाज म्हणजे कोण ?मग ती बराच वेळ विचार करत राहिली.
“वैशाली काल काका विचारत होते. तू काल आली नाही लग्नाला .काय केले दिवसभर?”
” बाहेर गेले होते फिरायला तिथे एक मित्र भेटले त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला गेले होते.
दोन दिवस कामाचा व्याप जरा जास्तच होता उद्या शनिवार जरा निवांतपणा.
दादा वहिनी दोघांबरोबर वैशाली गप्पा मारत बसली होती.
“वैशू डॉक्टर देसाई भेटले होते लग्नात ते तुझ्याबद्दल बोलत होते .”
“काही विशेष ?” वहिनींने आश्चर्याने विचारले.
” स्थळ सांगत होते वैशू साठी.”
‘दादा काय बोलतोय? त्यांना माहित आहे ना सर्व मग?”
‘हो –म्हणूनच म्हणाले एक स्थळ आहे प्रधान म्हणून त्यांना हे सर्व माहित आहे त्याना तुझा फोटो पाठवला आहे तेही यातूनच गेले आहेत.”
‘पण दादा’!
“अगं. भेट, बोल, नाही पटलं तर सोडून द्यायचे” वहिनी समजूतिच्या शब्दात बोलली.
वैशूचा नाईलाज झाला , ठरल्याप्रमाणे ती चौपाटीवर पोचली तेव्हा सूर्य मावळतिला आला होता. पक्षी थव्याथव्याने परतत होते.
वैशाली वाळूत बसून वाट पाहत होती. मनात विचाराचे वादळ माजले होते, कोण असेल ?
बराच वेळ गेला, कोणी आलेच नाही.
चला घरी जावे असा विचार करून वैशाली उठली, वळून पाहिले तर समोर वरूण उभे
“तुम्ही इथे?” तिने आश्चर्याने विचारले.
“तुम्ही कोणाची वाट पाहत होतात?”
“नाही म्हणजे हो– पण ते येतील असे वाटत नाही.”
“थोडे थांबा कदाचित,”
“नाही– मलाच नको वाटतं.”
“एक विचारू? तुम्हाला लग्न का नको वाटतं काही विशेष कारण?”
“लग्न ठरलं होतं माझं पण ह्या कॅन्सरने सर्वच संपल.”
“परत सुरुवात होऊ शकते जर तुमची हो असेल तर ! म्हणजे मीच तो तुम्हाला भेटायला येणारा प्रधान.”
“काय?”
वैशालीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे नि आनंदाचे आलेले मिश्रित भाव निरखत वरुण म्हणाले” करशील माझ्याशी लग्न”?
“माझ्याशीच का? सिंपथी म्हणून?” दुखावलेल्या स्वरात वैशाली ने विचारले.
” नाही –समदुखी समज, मी सुद्धा कॅन्सरच्या विळख्यातून सुटलेला तुझ्यासारखाच आहे, तरीअजूनही मनात धास्ती असते, तू समजून घेशील हा विश्वास वाटतो म्हणून”.
वैशालीने वरूणकडे पाहिले बोलता बोलता त्यांनी हाताने वाळूचे सुंदर घर बांधले होते .
वैशालीने शंख शिंपले गोळा करून त्यावर सजावट केली आणि वरुणकडे पहात ‘आपले घरकुल’ असं त्यावर रेखाटलं.
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
तुमची सदर कथा वाचली, खूप हृदयस्पर्शी वाटली.मी तुमच्या कथेचे, तुमच्या नवा सकट कथा कथन केले तर…तुमची परवानगी आहे का? माझा नो.9969495874 असा आहे….कृपया कळवावे
नाही मॅम..आम्ही पब्लिश केलेल्या कुठल्याही कथेचे कुठल्याही प्रकारच्या कथकथनाची परवानगी आम्ही देत नाही.तुम्ही विचारलत त्यासाठी आभारी आहोत.