सिमरन आणि तिचा राज

© धनश्री दाबके
“हा चल.. झाला माझा ऑफिसचा कॉल.. आता बोल.. काय म्हणत होतीस मगाशी? कुठे जाऊया आपण ट्रीपला?”
“आई आपण नाही.. मला जायचंय.. सोलो ट्रीप म्हणाले मी.. पिंक सिटी म्हणजे जयपूर फिरायचंय मला. एकटीने. थोडं independent व्हायचंय..माझे माझे प्लॅन्स आखायचेत, decisions घ्यायचेत.. confidence बूस्ट करायचाय.” सिमरन बोलत होती आणि शुभांगीच्या चेहऱ्यावर ४४० व्होल्टचा शॉक बसल्यासारखे भाव होते.
“आता हे काय बाई नविनच? हे सोलो बिलो कशाला? आणि एकटीने काय मजा येणारे?”

“आई तोच तर पॉईंट आहे. सतत मजेसाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून कशाला राहायचं आपण? मी एकटी नाही का आनंदात राहू शकत?”
“तुला पटतंय का रे हे?” शुभांगीने तिथेच मोबाईलमधे डोकं खुपसून बसलेल्या शेखरला विचारलं.
“काय?” शेखरने गोंधळून विचारलं..
म्हणजे याने काही ऐकलच नाहीये.. शुभांगीचे आश्चर्य आता तितक्याच कमालीच्या रागात बदलले..
“इथे प्रलय आला ना तरी तू फोनमधेच बघत बस.. तुमच्या दोघांशीही काही बोलण्यातच अर्थ नाही..” वैतागून शुभांगी आत निघून गेली आणि ‘अगं तसं नाही’.. म्हणत शेखर तिच्या मागे गेला..

‘झालं या दोघांचं नेहमीचं सुरू. काय वैताग आहे यार.. जाऊ दे बाबा पटवतील आईला.. असा विचार करून सिमरन परत फोनवर पिंक सिटीतली हॉटेल्स शोधायला लागली.
“अगं जाऊ दे ना तिला जायचंय तर.” शेखरचा समजवायचा सूर शुभांगीच्या अजूनच डोक्यात गेला..
“वाटलंच मला.. तू तिच्याच बाजूने बोलणार… ती सांगणार आणि तुला लगेच ते पटणार.. कुठून असली खुळं येतात रे डोक्यात तुमच्या? बाप लेक दोघंही फिल्मी नुसते!”

“अरे ! आता ह्यात काय फिल्मीपणा केला आम्ही? ही आजची पीढी आही शुभू.. त्यांचे विचार वेगळे आहेत. आणि मी तिला स्पष्ट सांगितलंय की आई हो म्हणाली तरच जायचं नाहीतर नाही..”
शेखरने इतक्या प्रेमाने शुभू म्हंटल्यावर शुभांगीचा राग थोडा खाली आला. पण तरी हा या दोघांचा आधीच ठरलेला प्लॅन आहे आणि तू हो म्हणालीस तरच वगैरे आपलं उगीचच आहे हे तिला कळलंच.
“हे बघ. मला हे अजिबात मान्य नाही. तेव्हा हा विषय बंद. उगीच लाडात येऊन मला घोळात घेऊ नकोस.. मी हो म्हणणार नाहीये आणि सिमरन कुठेही जाणार नाहीये” शुभांगी ठामपणे म्हणाली आणि शेखरने तो विषय सोडून दिला. पण तेवढ्यापुरताच..

मग दोन तीन दिवस शांततेत गेले आणि सिमरनची परत सोलो ट्रीपची भुणभुण सुरू झालीच. आता ती अगदी हट्टालाच पेटली. फक्त तीन चार दिवसांचा तर प्रश्न आहे.. मी जातांना विमानाने आणि येतांना ट्रेनने येणार म्हणजे खरंतर फक्त दोन रात्री तिथे राहाणार वगैरे. शेखरनेही मध्यस्ती केली आणि शेवटी सतत आमच्या टचमधे राहायचं, फोन सायलंटवर ठेवायचा नाही, लोकेशन ऑन ठेवायचं, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप आणि इतर कुठेही फोटोज आणि स्टेटस अजिबात अपडेट करायचे नाहीत या सगळ्या अटी मान्य केल्यावरच शुभांगीने एकदाची परवानगी दिली.
शेखरने लगेच ‘जा सिमरन जा.. जीले अपनी जिंदगी’ अगदी अमरीश पुरी स्टाईलने म्हणून घेतलं.
ते ऐकून शुभांगीला हसूच यायला लागलं आपल्या या Ddlj बघून मुलीचं नाव सिमरन ठेवलेल्या फिल्मी नवऱ्याचं.
मग ‘जा सिमरन जा.. राज शिवायच..जीले अपनी सोलो जिंदगी’ म्हणून तिनेही दुजोरा दिला.
पण तिला कुठे माहीत होतं की या सोलो ट्रीपमधे पुढे काय काय घडणार आहे ते !
*********

“अरे.. उठ आता.. आणि तो खिडकीवरचा पडदा उघड आधी.. जरा हवा, उजेड, सूर्यप्रकाश यांना एंट्री दे रूममधे”
“आई.. अगं सूर्याबरोबर वेळ जमत नाही ग आपली.. you know..अमेरिकन क्लायंट.. रात्र रात्रभर काम आणि दिवसभर झोप. तेव्हा प्लीज मला झोपू दे.. माझी रात्र आहे आत्ता” राज पांघरूण ओढत म्हणाला.
“हो, i know.. अमेरिकन क्लायंट.. पण तरीही.. आता उठ.. जेवायची वेळ झाली.. काय हे रूटीन रे तुम्हा मुलांचं !.. रात्रभर जागायचं आणि दिवसभर नुसतं लोळायचं…कुठे जाणं नाही की येणं नाही. कसलं रे हे आयुष्य?.. कोण मुलगी जुळवून घेईल हे असलं रूटीन? मी तर म्हणते तू जरा चार दिवस सुट्टी घे.. आणि मस्त कुठेतरी फिरून ये.. घरात बसून नुसता घरकोंबडा झाला आहेस..” रेखाला राज लगेच उठायला हवाच होता.

“झालं का सुरू तुझं? रोज तेच सांगून तुला कंटाळा येत नाही का? तू येशील माझ्याबरोबर कुठेतरी फिरायला? कारण माझे सगळे मित्र बिझी आहेत. कोणाला वेळ नाहीये आत्ता.. किती वेळा तुला सांगितलं तरी रोज काय ग तेच तेच.. जातोच आता मी कुठेतरी निघून..”
“मित्र बिझी असणारच रे ! सगळ्यांनी दोनाचे चार जे केलेत.. पण तू.. तेही ऐकत नाहीस.. मलाही मुली शोधू देत नाहीस आणि स्वतःही कोणाला भेटत नाहीस.. मी आले असते रे.. पण माझ्या शाळेत परीक्षा आहेत सध्या. बरं चल जेवूया आता.. मी नुकतीच शाळेतून आलेय मला भूक लागलीये.” रेखा स्वैयपाकघरात निघून गेली.

राजही मग नाईलाजाने उठून तोंड धुवून तिच्याबरोबर जेवायला बसला.
“मी तुझ्या भल्यासाठीच सांगते हे सगळं तुला राजा.. फक्त काम एके काम करून नाही चालत. त्यात थोडा चेंजही हवाच.. मी काय म्हणते, आमच्या मुख्याध्यापकांच्या मुलाचं लग्न आहे पुढच्या आठवड्यात..मुलगी राजस्थानी आहे ना त्यामुळे लग्न जयपूरला आहे.. मला तर काही जमणार नाही.. पण तू जाऊन येतोस का माझा रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून? तुलाही चार दिवस चेंज मिळेल.. शिवाय तिथे कोणी एखादी मुलगी आवडली तर तेही..”
“वाटलच होतं मला.. मला चेंज बिंज हे नुसतं सांगायला.. खरंतर लग्नात कोणी आवडली तर.. हेच खरं मोटीव्हेशन आहे..” राज अजूनच चिडला.
त्यावर रेखा तेव्हा जरी गप्प बसली तरी नंतर तिने राजचा पिच्छा काही पुरवून त्याला जयपूरला जायला तयार केलंच.
***********

भल्या पहाटे फ्लाईटचा प्रवास करून सिमरन सकाळी सकाळी जयपूरला पोचली. आईबाबांना वेळोवेळी अपडेट्स देत प्लॅननुसार दिवसभर जयपूर फिरली आणि संध्याकाळी लवकरच हॉटेलवर पोचली.
आधीच आज झोप कमी मिळाली होती, त्यात दिवसभर खूप दमणूकही झाली होती.
त्यामुळे रूमवर गेल्यावर फ्रेश होऊन बेडवर पडल्या पडल्या सिमरनला जी गाढ झोप लागली ते अचानक मध्यरात्रीच जाग आली. जाग आल्यावर जोरदार भूकेची जाणीव झाली.
अरे आज आपण आल्याआल्या जे झोपलो ते डायरेक्ट आत्ता उठलो.. म्हणजे रात्री काही जेवलोच नाही..

आता या वेळेला कोण काय देणार आपल्याला? तरी आई सांगत होती की काहीतरी खायला करून देते पण आपणच हट्टाने नको म्हंटलं. आता काय करावं? हॉटेलचं किचन तर आता बंद असेल पण तरी पाहावं खाली काही मिळतंय का ते म्हणून सिमरन खाली रिसेप्शन एरीयात आली तर तिथे एक हॅंडसम मुलगा लॅपटॉप घेऊन बसला होता.
काम करता करता काहीतरी खातही होता.
“हाय… मी सिमरन.. just wanted to check की तुम्हाला हे ऑमलेट कुठून मिळालं.. i mean आत्ता या वेळेला?” सिमरनने विचारलं.

“हाय.. i am Raj.. actually हे ऑमलेट मिळालं नाहीये, मी ते मिळवलंय. इथल्या वेटरला पटवून.. you know..i work for an American client.. so रात्रभर जागा असतो मी.. त्यामुळे भूक लागली होती खूप.. वेटर म्हणाला रूम सर्व्हीस नाही देणार आत्ता म्हणून इथे बसून खातोय..”
“मलाही मिळेल का एक ऑमलेट किंवा काहीही? जाम भूक लागलीये”
राजने मग त्याच्या मिठ्ठास बोलण्याने वेटरला पटवून सिमरन करताही एक ऑमलेट मागवले.

ते खाता खाता दोघांची ओळख झाली.
“ओह.. म्हणजे तू हट्टाने इथे आलीयेस.. सोलो ट्रीपवर..”
“आणि तू जबरदस्तीने इथे आला आहेस.. लग्नात एखादी मुलगी पटवायला..” असं म्हणून दोघंही हसायला लागले.
थोड्यावेळ गप्पा मारून दोघं आपापल्या दिशेला गेले.
*********

दोन दिवस मनासारखे जयपूर फिरून झाल्यावर तिसऱ्या दिवशी सिमरन ट्रेन पकडायला स्टेशनवर आली. तिची रिक्षा बराच वेळ ट्रॅफिकमधे अडकल्याने स्टेशनवर पोचायला तिला तसा उशीरच झाला होता.
ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मवर आलेलीच होती.
धावतच सिमरन प्लॅटफॉर्मकडे निघाली.
जिने उतरून तिथे पोचेपर्यंत ट्रेन हळूहळू सुरूही झाली.
मग मात्र सिमरन जोरजोरात धावायला लागली.

धावता धावता तिला विंडो सीटमधे बसलेला राज दिसला आणि राज म्हणून तिने जोरात हाक मारली. राजने पटकन दारामधे येऊन तिला हात दिला आणि आत खेचले..
हुश्श करून सिमरन राजच्या बाजूलाच बसली.
“मग काय मिळाली की नाही कोणी लग्नात?” थोडा वेळ गेल्यानंतर सिमरनने विचारलं..
“नाही मिळाली.. कारण मी लग्नाला गेलोच नाही.”

” का? तू लग्नासाठीच आला होतास ना?”
“हो ..आलो तर लग्नासाठीच होतो.. पण you know.. अमेरिकन क्लायंट.. काल दिवसा झोपलो आणि मला जागच आली नाही..फोनही सायलंटवर होता..त्यामुळे आईने कॉल्स केले तरी कळलेच नाहीत..”
“मग आता? आईला काय सांगणार? and what about that lucky girl जी तुला लग्नात भेटली असती?”
“आईला? आईला सांगेन की की भेटलीये एक गर्ल जिच्यामुळे मी लकी आहे असं मला वाटायला लागलंय. म्हणजे त्या गर्लला चालणार असेल तर.. ती माझ्या अमेरिकन रूटीनशी जुळवून घेणार असेल तर..”

“भेटली? कुठे?” सिमरनने अस्वस्थपणे विचारलं.
“ही इथेच..ट्रेनमधे चढतांना..” राज मिश्किलपणे हसून सिमरनच्या डोळ्यांत बघत म्हणाला आणि सिमरननेही लाजत डोळ्यांनीच होकार दिला..
सोलो ट्रीपवर गेलेली सिमरन येतांना तिच्या राजला बरोबर घेऊनच परतली..
********
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!