वाघिण

© परवीन कौसर
“अगं अजून ती लहान आहे. लग्नाचे वय झाले नाही ग तिचे. एक दोन वर्षे जाऊ दे मग बघू न.‌ का इतकी घाई करतेस तिच्या पाठवणीची? जरा शिकू दे पोर . राहू दे अजून थोडे दिवस आपल्या जवळ. लग्न तर करायचे आहेच ग पण करु की दोन वर्षांनी.”
” काही गरज नाही इतकी वर्षे थांबायची. लोक शेण घालतील तोंडात. वयात आलेल्या भाचीला घरात ठेवून आपल्या मुलीचे लग्न करून दिले लवकर म्हणून.ते काही नाही आधी लक्ष्मीच्या लग्नाचे उरकून देऊ मग बघू शैलजाला स्थळ.” मामीने ठसक्यात म्हटले.मामा शांतच बसला.

लक्ष्मी रमेशची भाची. 
लक्ष्मी असेल वर्ष दिड वर्षाची तेव्हा त्यादिवशी एका नातेवाईकांचे लग्न करून लक्ष्मीचे आईवडील आपल्या गाडीवरून येत होते.  लक्ष्मी आपल्या आईच्या कुशीत बसलेली होती. तोच समोरून एक मोठा ट्रक सुसाट वेगाने आला आणि त्याने लक्ष्मीच्या वडिलांच्या गाडीला जोरात धडक दिली.
यामध्ये लक्ष्मीच्या वडिलांचा गाडीवरून ताबा सुटला ते जोरात फेकले गेले त्याचबरोबर तिची आईदेखील दुसरीकडे फेकली गेली. ते दोघही जागीच गतप्राण झाले. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी ! अगदी तसेच झाले. लक्ष्मी एका बाजूला गवताच्या पेंढ्या होत्या तिथे जाऊन पडली. तिला काहीही इजा झाली नाही. 

तिला तिची आजी आपल्या जवळ घेऊन आली. आजी आजोबांच्या मायेच्या ओलाव्यात तिला तिच्या आईबाबांची काही कमी भासली नाही. तिचा मामा पण तिला आपल्या हातावरील फोडाप्रमाणे जपायचा. कालांतराने आजी आजोबांचा मृत्यू झाला. आजीची जागा मामीने घेतली.
पण फक्त तिने जागाच घेतली. माया ममता हे तिच्या स्वभावात नव्हतेच. होते ते फक्त कडवट बोलणे, टोचून बोलणे किंवा वेळप्रसंगी शिव्या शाप देणे इतकेच.
मामा तसा शांत संयमी होता. त्याला लक्ष्मीवर होणारे अत्याचार कळत होते पण त्याचा नाईलाज होता.

शैलजा मामाची मुलगी. लक्ष्मी शैलजा दोघींमध्ये एक दोन वर्षाचाच फरक होता. शैलजा दिसायला ठिकठाक. अभ्यासात लक्ष कमी पण टाईमपास करण्यात हुशार. या उलट लक्ष्मी. सर्व गुण संपन्न. अभ्यास, स्वयंपाक करण्यात उत्तम. दिसायला खुप सुंदर. तिच्या देखणेपणा मुळे मामीचा जळफळाट व्हायचा. तिच्या समोर आपली शैलजा तिला जरा डावीच वाटायची. 
लक्ष्मी वयात आली तेव्हा तिचे रुप आणखीन खुलले. आता मात्र हिला कुठेतरी स्थळ बघून लग्न करून द्यायचे असा निर्णय मामीने घेतला. तिच्या सुंदरतेमुळे तिला चांगली स्थळे येणार हे तिला माहीत होते म्हणून तिने आपल्या भावाला, ‘तिकडे गावातच बघ एखाद्या कोणीतरी जो हिला बघून काही खर्च करायला न लावता तो हिला लग्न करून घेऊन जाईल’ असे सांगितले. 

मामीच्या भावाने अगदी तसेच केले. गावातील पाटलाचा मुलगा जो मतीमंद होता त्याचे स्थळ लक्ष्मीसाठी सुचवले. मामीने पटकन होकार दिला.
कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठेवला. पाटलांनी आपल्या पत्नीलाच आणले. मुलगा कामानिमित्त येऊ शकला नाही. आमची जी पसंत तिच त्याची असे सांगत, ‘मुलगी पसंत पडली आम्हाला पुढच्या आठवड्यात मुहूर्त पाहून लगेच लग्न करायचे. लग्नाचा सारा खर्च आम्ही करतो तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्या.’ असे म्हणत ते निघून गेले.
“तुझ्या आईबाबांच्या पुण्याईने तुला असले घर मिळाले हो. तू खूप नशीबवान आहेस लक्ष्मी. तू राज्य करशील तिथे…!” असे मामीने अगदी कुत्सितपणे म्हटले.

मामाच्या डोळ्यात पाणी आले. लक्ष्मी तर लहान बाळासारखी मामाला बिलगून रडू लागली.
हळद लागली. आज मेहंदी पण झाली. मेहंदीच्या रंगलेल्या हातांनी हळदीच्या अंगात लक्ष्मी अधिकच खुलून दिसत होती. लग्नाची घटका जवळ आली तशी लक्ष्मीच्या ह्रदयाचे ठोके जलद गतीने वाढत होते. काहीशी लाजत काहीशी घाबरत ती लग्नमंडपात उभी राहिली. 
” नवऱ्या मुलाला बोलवा…!” भटजी म्हणाले.
” आज माझे लग्न…! मी आज नवरा बनलो…! खऱ्याखुऱ्या घोडीवर बसणार मी. चल मेरे घोडे टुकटुक…! टुकटुक….!” असा आवाज आला. 
आवाजाच्या दिशेने लक्ष्मीने बघितले तर एक तरुण मुलगा नवऱदेवासारखे कपडे घालून डोक्यावर जरीचा फेटा घातलेला येत होता. तो एकच वाक्य सारखे बडबडत होता आणि लहान मुलासारखे उड्या मारत होता.

त्याच्या आजूबाजूला दोन पुरुष होते जे त्याचे दोन्ही हात धरून,” हो हो धाकले मालक . तुमचेच लगीन हाय. हळूहळू पडाल नाही तर. चला मी धरलाय न हात तुमचा.” असे म्हणत त्याला लक्ष्मीजवळ घेऊन आले. हे बघून लक्ष्मी एखदम भोवळ येऊन धाडकन जमिनीवर पडली.
“आल्या का शुध्दीवर सूनबाई…! जरा गर्दी कमी करा..!  अरे शाम्या ये शाम्या तो ज्युस आण. दे वहिनी साहेबांना..!”  एक कणखर आणि कडक आवाजात कोणीतरी म्हटले. या आवाजाकडे लक्ष्मीने आपले डोळे हळूहळू उघडण्याचा प्रयत्न केला तर तिला आपण कुठे आहोत हेच कळले नाही. तिने पटकन आपले डोळे बंद केले आणि पुन्हा तिच्या कानात कुजबुज ऐकू आली.
” बाय बाय काय सुंदर आहेत वहिनी साहेब. नशीब केलं हो धाकल्या धन्यानी.” एका महिलेचा आवाज. हे ऐकून लक्ष्मी ताडकन उठली. उठून बघते तर  तिने स्वतःला एका मोठ्या घरात घर कुठे वाडाच होता तो प्रशस्त इथे आपण आहोत हे दिसले. तिच्या आजूबाजूला काही लोक उभारले होते.

” मी…! हे घर…! कुठे…!” 
” अगं हो हो…! इतकी अवघडून जाऊ नकोस. तू म्हणजे हे घर तुझेच आहे. तू या घरची एकुलती एक सून आहेस. हे बघ  तिथे बाहेर व्हरांड्यात खेळतो आहे न तो तुझा नवरा म्हणजे आमचे चिरंजीव सुरज पाटील. इथे तुझ्या बाजूला बसली आहे न ती तुझी नणंद सुतेजा. या दोघी इथे उभ्या आहेत त्या आपल्या घरात काम करणारी शांताकाकू,शीलाताई. ” असे म्हणत पाटलीणीने सर्वाची ओळख करून दिली.
तोच समोरून एक रुबाबदार तरुण पांढरा कुर्ता पायजमा घातलेले कोल्हापुरी चप्पलांचा करकर आवाज करत आला. तो येताच पाटिलीनीने आपल्या डोक्यावर पदर सावरत हळूच उठून उभारली.
” हु…! मग…! आल्या का शुध्दीवर…!” असे म्हणत त्याने लक्ष्मीवर एक कटाक्ष टाकला.

” हो हो..! बसा तुम्ही इथे  सयाजीराव. बरं का लक्ष्मी हे तुझे भाऊजी आहेत. सुतेजाचे पतीदेव.” पाटलीन अगदी अदबीने म्हणाली. 
लक्ष्मीला काहीच कळेना की हे मी जे बघतेय ते स्वप्न आहे की खरे आहे.
रात्री सगळ्यांची जेवणं झाल्यावर पाटिलीणीने लक्ष्मीला आपल्या खोलीत झोपायला नेले. ती खूपचं गोंधळून गेली होती. 
” हे बघ लक्ष्मी आता तू या घरची सून आहेस. आमच्या नंतर तूच या घराचे घरपण राखून ठेवणार आहेस. सासरे तुझे कडक शिस्तीचे आहेत पण मनाने खूप चांगले आहेत हो. सुरजला तू पाहिले आहेस तर त्याच्याबाबतीत सांगायची गरज नाही. आम्हाला आमच्या नंतर आमच्या मुलाचे संगोपन करणारी काळजी घेणारी संसारीं मुलगी हवी होती. तू तशीच आहेस. आता आमची काळजी मिटली बघं.

आणि हो आपल्या वाड्याच्या बाजूला जो दुसरा वाडा आहे तिथे यांचे भाऊ रहातात. त्यांनी तुझ्या आजेसासऱ्यांची खोटी सही करून जमीन बळकावली होती. त्यांचे तिजोरीत असलेले पैसे चोरले. नाचणारीच्या नादात सगळे वाईट व्यसन जडले. हे बघून आजोबांनी त्यांना घराबाहेर काढले. आजोबांनी मरेपर्यंत त्यांचे तोंड पाहिले नाही. आता ही आपली जमीन आपली शेती जी आहे ती तुझ्या सासऱ्यांनी स्वकष्टाने कमावलेली आहे. आता सयाजीराव करतात मदत पण ते शेवटी आपले जावई . त्यांना सगळी कामे सांगावी बरे नाही. आता यापुढे तू लक्ष द्यायचे बघं. हे घे ही तिजोरीची चावी.” असे म्हणत चाव्यांचा मोठा जुडगा लक्ष्मीच्या हातात देत पाटलीनीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

आजी गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तिला मायेचा स्पर्श जाणवला होता. या स्पर्शाने तिने आपल्यावर आलेल्या या प्रसंगाला हसत हसत तोंड द्यायचे असे मनोमनी ठरवले. आता हेच इथेच आपले आयुष्य असे म्हणत ती आपल्या सासूच्या पाया पडली तोच त्यांनी तिला उचलून गळाभेट घेतली.
लक्ष्मी आता एकेक करून सगळी कामे बघू लागली. कधी कधी शेतावर जाऊन तिथे पण लक्ष देऊ लागली. शिकलेली असलेमुळे पैशाचे व्यवहार अगदी व्यवस्थित करु लागली.
लक्ष्मीने आपल्या चांगल्या वागणुकीमुळे सर्वांची मने जिंकली. स्वयंपाक करण्यात तर ती सुगरणच . आजीची शिकवण मने जिंकण्यासाठी मार्ग पोटातून जातो हे तिला पटले होते. सुरजला एका लहान मुलासारखे ती जपू लागली.

लग्नानंतरची पहिली दिवाळी. लक्ष्मीचे मन माहेरी जाण्यासाठी तळमळत होते पण तिच्या मामीमुळे तिने जाणे टाळले.
दिवाळीची खरेदी जोरात सुरू झाली. नव्या सूनेसाठी नवीन दागिने घडवायचे सासूबाईंचा अट्टाहास. त्यांनी पसंत करून सुंदर सुंदर दागिने घडविले गेले. 
घरात फराळाची तयारी सुरू झाली. यावेळी प्रत्येक फराळ लक्ष्मीने आपल्या हाताने केला. मदतीला होत्या कामवाल्या पण तरीदेखील तिने जितके होईल तितके आपण स्वतः केले. तिच्या हातची चव चाखून पाटील खुप खुश झाले. 
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीने आपल्या नवऱ्याची आंघोळ उटणे लावून भल्या पहाटेच उरकली. घरात सर्वत्र फुलांची सजावट करून दारासमोर रांगोळी काढली. घर खुप सुंदर रितीने सजवले. यानंतर ती आंघोळ करून नवीन साडी नवीन दागिने घालून तयार झाली.

तिला पहाताच,” आज खरोखरची लक्ष्मी दिसत आहेस तू. कोणाची दृष्ट न लागो.” असे म्हणत सासूबाईंनी तिची दृष्ट काढली. दिवसभर घरात येणाऱ्या जाणाऱ्या नातलगांना, मित्रांना पाटिल आपल्या सूनेचे गोडवे गात तिने बनवलेला फराळ देत होते.
बघता बघता सुगीचे दिवस आले. लक्ष्मीने जातीने लक्ष देऊन शेतीमध्ये खूप सुधारणा केली होती. पाटिल आपले फुललेल्या शिवारात उभे राहून लक्ष्मीची पाठ थोपटून म्हणायचे,” लेकी तू खरी लक्ष्मी आहेस बघं. मी तुझा अपराधी आहे मला क्षमा कर. मी तुझ्या मामीच्या सांगण्यावरून सुरजला करून घेतली. पण खरंच पोरी इथेच चुकलो मी . मला माफ कर बेटा.”
” नाही नाही आबा. माफी कशाला मागता. जे माझ्या नशीबी होते तेच झाले. पण खरे सांगू का मी इथे खूप आनंदी आहे. मला माझे आईबाबा तुम्हा दोघांत मिळाले.” लक्ष्मी म्हणाली.

दोन दिवसांवर पिके काढायची होती. रात्री शिवारात राखणीसठी चार कामगार नेमले होते. रात्रभर जागून ते पहारा देत होते.
” अगं बाई मी आज बाहेर वाळत घातलेले कपडेच आणले नाही. किती वेंधळेपणा माझा.” एकदम झोपायला गेलेल्या लक्ष्मीला आठवले आणि ती ताडकन उठून बाहेर अंगणात कपडे आणायला गेली.
” जा लवकर सगळी झोपलीत तोपर्यंत काम फत्ते करा. पळा लवकर…!!!” कोणीतरी दबक्या आवाजात बोलत होते.
लक्ष्मीला हे बोलणे ऐकू गेले तसे तिने आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले अंधारात कोणी दिसेना म्हणून तिने विचारले,” कोण ? कोण आहे तिकडे?”
तिच्या आवाजाने एकदमच अंगणातील झाडांचा सळसळ आवाज आला. कोणीतरी दबलेल्या पायाने हळूच पळ काढला असे तिला जाणवले. तशी ती पटकन कपडे घेऊन आत आली. 
” आबा…! आबा..! झोप लागली आहे का तुम्हाला ?” तिने हळू आवाजात पाटलांना विचारले.

पाटलांना झोप लागली होती. त्यांनी प्रतिउत्तर दिले नाही. लक्ष्मी तिथून मागे फिरली. घरात कोपऱ्यात खुरपे पडले होते ते तिने घेतले आणि ती घराच्या बाहेर पडली. 
अंधार वाढू लागला होता. रस्त्यावर कुत्री भुंकत होती. गावचे रस्ते सुनसान झाले होते. एकही माणूस बाहेर दिसत नव्हता. लक्ष्मी न घाबरता तशीच सपसप पाय उचलत चालू लागली. 
लक्ष्मी आपल्या शेताजवळ आली तोच तिला दोन पुरुष हातात मशाल आणि तेलाचा डबा घेऊन उभारलेले दिसले.
” ये, कोण रे ? काय करतात रे ? एकेकाला चिरून काढीन. व्हा बाजूला…!” असे म्हणत ती जोरात पळू लागली.
इतक्यात मागुन तिला कोणीतरी धरले .

” अजून जळलेले नाही शेत ते विझविण्यासाठी तू पळतेस. आणि इतक्या दिवसांनी माझ्या आत लागलेल्या आगीचे काय ? ती कधी विझवणार. इतकी सुंदर बया तू त्या खुळ्याच्या पदरात टाकले तुला. छ्छे…! तुझी जवानी बरबाद होईल अशाने. चल ये मी तुला सगळे सुख देईन. चल माझी राणी. मी तुला रोज बघत असतो आमच्या छतावर चढून. जेव्हा तू आंघोळ करून येतेस ना तेव्हा. आहाहा…! काय ते तुझे रुप काय तुझा कमनीय बांधा काय तुझे हे….!” इतके बोलून होते न होते तोच लक्ष्मीने फाटकन त्याच्या कानफाडात मारली.
आणि त्या व्यक्तीचा हात धरून पुन्हा एक कानशिलात देणार तर ती त्या व्यक्तीला बघून स्तब्ध होऊन उभी राहिली.
तो इसम दुसरा तिसरा कोणी नसून तिचा चुलत सासराच होता.

” अरे नालायका तुझ्या मुलगी सारखी मी. माझ्याकडे अशा नजरेने बघत असतोस तू. थ्थू…!अरे तुझ्या भावाने म्हणजेच माझ्या सासऱ्यांनी स्वकष्टाने कमावलेली ही जमीन आहे यावर आम्ही आमचे घाम गाळून हे शिवार फुलवले आहे तू असे जाळायला निघाला आहेस.स्वत: तर करणे दुरच पण दुसऱ्यांचे बघवत नाही तुला. अरे चांडाळा माझा जीव गेला तरी चालेल पण मी शिवाराला हात लावू देणार नाही याद राख.” असे म्हणत तिने त्याच्या तोंडावर थुंकले.
हे ऐकून तो आणखीनच चिडला.
” अरे बघताय काय असे पेटवा पेटवा शेत सारे .मला जमीन दे म्हटले तर देत नाही हिचा सासरा. मला नाही तर याला पण नाही खाऊ देणार मी जमिनीचे सुख.पेटवा पेटवा..!!! मी हिला बघतो आता बरोबर. हिच्या सासऱ्याचे नाक कापायचे आहे आता. चल चल…!” असे म्हणत तो लक्ष्मीला ओढू लागला.

लक्ष्मीने आपल्याला सोडवायचा प्रयत्न करू लागली. या आरडाओरडा ऐकून शेतावर राखण करणारी कामगार पळत आले. तोपर्यंत पेटत्या मशाली टाकून शेत जाळायला सुरुवात झाली होती. 
इकडे लक्ष्मीला त्याने ओढत नेत जमीनीवर पाडले. तिच्या पदरावर हात घालणार तोच लक्ष्मीने आपल्या हातातील खुरपे त्याच्या हातावर दाणकन मारले. तसा त्याचा हात कापला गेला. तो जोरजोरात ओरडत पळू लागला. 
लक्ष्मी पटकन उठली ती पळत पळत हातातील खुरपे घेऊन जळलेले शेताची पिके सपासप कापू लागली जेणेकरून आग पुढे न जावो. कामगार पण आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले.  

तोच एकदम मोठ्या पाईपने पाण्याचा वर्षाव सुरू झाला. पाणी आले त्या दिशेने सर्वांनी पाहिले तर तिथे पाटिल पाण्याचा टँकर घेऊन उभे होते. 
” शाब्बास सूनबाई. आज आम्ही धन्य झालो. जशी हवी होती तशीच सून मिळाली. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.” 
” पण आबा तुम्ही कसे काय आलात ?” 
” अगं श्यामाने येऊन सांगितले मला. सयाजीरावांना पण फोन केला आहे मी. ते पोलिस कम्प्लेंट करून येतीलच इतक्यात. तू खरोखर वाघिण आहेस वाघिण.” 
हे सगळेजण घरीच परतले. लक्ष्मीच्या अंगावर काहीशी जळलेली साडी रक्ताचे डाग बघून सासूबाई रडू लागल्या.

” अहो रडताय काय. तिची आरती ओवाळा. लक्ष्मीच्या पावलांनी वाघिण आली आहे आपल्या घरी. ” असे म्हणत पाटलांनी तिची पाठ थोपटली.
सयाजीराव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करुन घरी आले.
” आता त्याला चांगलीच शिक्षा होणार.एक हात तर गेलाच आहे त्याचा आता आयुष्य पण असेच संपणार काळकोठडीत.” सयाजीराव म्हणाले.
चहापाणी झाल्यावर पाटिलीनीने लक्ष्मीला ,” जा पोरी झोप जा निवांत. माझी गुणाची पोर.” असे म्हणत आत पाठविले.
सकाळी उठल्यावर लक्ष्मीला घरात काही तरी उत्सव असल्यासारखे दिसले. घरात वेगळीच आरास केली होती.

‘आज तर कोणता सण नाही काही नाही तर एवढी सजावट घरात कशाला? ‘ असे मनात म्हणत लक्ष्मी स्वयंपाक घरात गेली. 
” अगं नको आज तू काही काम करावयाचे नाही.” सासूबाई म्हणाल्या.
हिला काहीच कळले नाही. ती तशीच उभी राहिली.
” झाले का तयार ? येतील आता पाहुणे. लक्ष्मी कुठे आहे ?” पाटलांचा आवाज आला.
” हो हो झाले झाले…! लक्ष्मी तू आज नवी साडी नेस काठापदराची हिरवी. ” सासूबाई म्हणाल्या.
” बरं. पण कोण येणार आहेत ?” 
तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्या आपल्या कामात व्यस्त झाल्या.

” या … ! या स्वागत आहे तुमचे..!” पाटिल आनंदाने म्हणाले.
” लक्ष्मी बेटा लक्ष्मी. तयार झाली तू. चल ये माझ्या बरोबर.” असे म्हणत सासूबाईंनी तिला खोलीमधून बाहेर घेऊन आल्या.
सगळे पाहुणे बसले होते. सुचेता पण समोरच होती. 
‘ अरे हे तर ताईंच्या सासरची मंडळी.’ असे मनात म्हणत लक्ष्मी आदराने सुतेजाच्या सासू सासऱ्याच्या पाया पडली.
” औक्षवंत हो अष्टपुत्री सौभाग्यवती हो बाळा.” असा आशीर्वाद देत सुतेजाच्या सासूने तिला आपल्या जवळ बसविले.
अष्टपुत्री ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिने कोणालाही कळू न देता अलगदपणे डोळे पुसले.

” अगं पोरी आजच्या एवढ्या आनंदाच्या क्षणी रडायचे नसते. वेडीच आहे. हे बघ आता हे तुझे सासू सासरे आहेत. सयाजीरावांनी आपल्या धाकटे बंधू विलासरावांसाठी तुला मागणी घातली आहे. तुला सुरजसाठी आम्ही आमच्या स्वार्थासाठी करुन आणले तिथेच आम्ही चुकलो. पण ती चुक मरायच्या आधी सुधारणा करायची संधी सयाजीरावांनी दिली आहे.
विलासराव शहरात एका नामवंत कंपनीत काम करत आहेत. त्यांनी आपल्या भावाच्या पसंतीस होकार दिला आहे. यावेळी तुझी फसगत होणार नाही कारण रविवारी विलासराव येणार आहेत तेव्हा तू हो म्हणालीस तर तेव्हा तुझा साखरपुडा करायचा असे ठरवले आहे आम्ही. तुझे लग्न झाले तर तू आम्हाला परकी झाली असे नाही बरं का. जशी सुतेजा तशीच तू आमची दुसरी मुलगी. माहेरपणाला इथेच यायचे. तुझे कन्यादान करणार आम्ही.” असे म्हणत पाटलांनी नकळतच त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या पुसल्या.

लक्ष्मीला हे सगळे अजबच वाटले.
हे पाहून सयाजीराव म्हणाले,” काही काळजी किंवा विचार करु नका ‌‌. जे काही घडते ते आपल्या बऱ्यासाठीच घडतं. तुमच्या साठी आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असे आम्हाला वाटते. तुमचे आयुष्य आमच्या बंधूबरोबर सुखाचे जाणार यात तीळमात्र शंका नाही. तरीदेखील तुम्ही तुमचा निर्णय विचारपूर्वक करुन सांगावा. ” 
रविवारी दुपारी विलासराव घरी आले.
या दोघांना एका खोलीत बोलण्यासाठी पाठविले.
विलासरावांचे ते राजबिंडे रुप बघून लक्ष्मीच्या मनात थोडी चलबिचल झाली.

विलासराव होतेच तसे देखणे राजबिंडे रुप,गोरा रंग, उंचपुरे ,कपडे अगदी जिथल्या तिथे व्यवस्थित कडक इस्त्री केलेले. त्यांना बघताच कोणीही घायाळ झालेच असते असे व्यक्तिमत्व असलेले विलासराव.
दोघांची एक तासभर बोलणी झाली.
त्यानंतर हे दोघे खोलीच्या बाहेर आले. दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखताना सर्वानी जे ओळखायचे ते ओळखले. 
” आणा ते पेढे. आधी देवासमोर ठेवा मग वाटा सर्वांना.” असे म्हणत पाटिल आनंदाने लक्ष्मीकडे बघू लागले.
तोच विलासराव आणि लक्ष्मी दोघांनी एकदमच म्हटले ,” थांबा थांबा तुमचा काही तरी गैरसमज होत आहे.” हे ऐकताच सर्वजण क्षणभर स्तब्ध होऊन बसले. एक भयाण शांतता पसरली.

ती शांतता भंग करत लक्ष्मी पटकन बाहेर अंगणात जाऊन तिथे मुलांबरोबर खेळत असलेल्या सूरजचा हात धरून आत घेऊन आली. तो देखील लक्ष्मीचा हात धरून आत अगदीच आनंदाने उड्या मारत,” आज केला आहेस नवीन खाऊ तू मला लछमी. गोडच केले आहे न. आणि ते चाॅकलेट माझे तुझ्याजवळ ठेवले होते ते कोणाला दिले नाहीस न. मला रात्री दे बरं का. 
“गोड गोजिरी लाज लाजरी, लछमी माझी मैतरणी” असे म्हणत सूरज उड्या मारत होता ‌.
” हो हो…! देते खाऊ तुम्हाला. आणि हो मी काय शिकवले आहे खेळून आल्यावर काय करायचे.”
” हात पाय स्वच्छ धुवून देवाला नमस्कार करायचा.” सूरज म्हणाला.
” व्हेरी गुड…!” लक्ष्मी म्हणाली.

” आलोच मी हात पाय धुवून. कपडे बदलून. तोपर्यंत माझा खाऊ तयार ठेव ग लछमी.  गोड गोजिरी लाज लाजरी लछमी माझी मैतरणी…!” असे म्हणत सूरज उड्या मारत आत बाथरूममध्ये गेला.
तो आत गेल्यावर लक्ष्मी सर्वांसमोर उभी राहिली आणि बोलू लागली ,” तुम्ही सर्वांनी पाहिले न आता काय झाले. या आधी सूरज मला बघताच ओरडायचे मला मारायला यायचे . कधी कधी तर मला बॉल फेकून मारले होते. एकेक वेळी तर माझ्या पैजणांचा आवाज आला की भूत भूत म्हणून घाबरून पळायचे. तेव्हा पासून मी पैंजण घालायचे बंद केले. मला समोर पाहताच,” तू कोण आहेस. जा तू माझ्या समोरुन. आई हिला घराबाहेर काढ असे म्हणायचे.

नंतर मी त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन  त्यांच्या आवडीचा शिरा करुन दिला , चॉकलेट आणून दिले . त्यांच्या आवडीचे खेळ खेळले. अगदी लहान बाळासारखे वागले मी. कधी कधी खोटे खोटे भांडले रुसले बोललेच नाही त्यांच्या बरोबर. तेव्हा शंभर वेळा ते मला मनवायचा प्रयत्न करत होते. मला खायला आणून देत होते. पण काहीही बोलले नाही की खाल्ले नाही. तेव्हा मात्र आईंजवळ जाऊन आईंना सांगितले तेव्हा आईनी येऊन आमचे भांडण मिटवून दिले त्या पण माझ्या खोट्या रुसण्यावर हळूच हसत होत्या.
आता परिस्थिती बदलली आहे. सूरज माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाकडेही इतके व्यवस्थित राहत नाही.
मी दिवसभर शेतावर गेले की इकडे घर डोक्यावर घेतात. माझे लग्न झाले आहे यांच्याबरोबर. आता आमची सात जन्माची गाठ बांधली गेली आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात.  मी माझा पत्नीधर्म सूरज बरोबर निभावणार जोपर्यंत माझे आयुष्य आहे तोपर्यंत. कसेही असले तरी ते माझे पती परमेश्वर आहेत. त्यांना सोडून मी दुसऱ्या लग्नाचा विचार करण शक्य होणार नाही. माझ्या या मतावर विलासरावांनी देखील होकार दिला आहे.”

” अगं पण बाळा  तू तुझे संपूर्ण आयुष्य कसे जगणार.स्त्री पूर्ण कधी होते जेव्हा ती आई बनते. हे सुख भोगण्यासाठी स्त्री आतुरतेने वाट पाहत असते. पण हे सुख तुला कसे मिळणार गं. बघ अजूनही वेळ गेलेली नाही विचार करून निर्णय घे. हवं तर आम्ही अजून दोन दिवस वाट बघतो. काही गडबड नाही.” सासूबाई म्हणाल्या.
” नाही आई…! माझ्या या निर्णयावर मी ठाम आहे. मला लहानपणापासून आईबाबांची माया ममता वात्सल्य प्रेम मिळाले नाही हे मला इथे तुम्हा दोघांकडून मिळाले. मी खूप नशीबवान आहे असे दृष्य लागण्यासारखे सासर मला मिळाले. बहिणीची माया देणारी नणंद आहे. सारे सुख ओंजळीत घेऊन उभे आहे. आणि मुलाचे काय मी मूल दत्तक घेईन. पण मी दुसरे लग्न करणार नाही.

आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी तुम्हा दोघांची सेवा करण्यासाठी आजन्म मी तुमची सून म्हणून नाही तर लेक म्हणून राहीन. काय माहित तो वर बसलेला देव बाप्पा प्रसन्न झाला तर सूरज अगदीच बरे होतील. या आशेवर मी सर्व आयुष्य आनंदाने जगायला तयार आहे. मी माझ्या छातीची ढाल करून तुम्हा सर्वांचे संरक्षण करेन.” असे म्हणत लक्ष्मी आपल्या सासूसासऱ्यांच्या पाया पडली.

तोच आतून सूरजचा आवाज आला,” लछमी ये लछमी. केव्हा पासून उभारलो आहे देवासमोर. ये न लवकर मला खूप भूक लागली आहे. ” 
” हो हो आले आले…!” असे म्हणत ती आत पळाली.
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पाटिल आपले डोळे म्हणाले ,” खरोखरच आमचे अहो भाग्य आहे अशी लेक आम्हाला मिळाली. नशीबाने थट्टा केली सूरजवर . पण त्याचे नशीब बनवायला लक्ष्मी या घरात आली. कामात धाडशी असलेली मनाची श्रीमंती बाळगणारी वाघिण आहे ही वाघिण.”
समाप्त
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!