वचनपूर्ती ( भाग 2 )

भाग 1 इथे वाचा

एक दिवस सहज म्हणून सुधीरने प्यून रमेशच्या बाला,  राजारामला बोलावले.
पेंडसे सरांचा विषय निघताच राजारामच्या डोळ्यात पाणी आले.
“साहेब तुमास्नी सांगतो, देव माणूस होते साहेब  पण या लोकांनी त्यांचे लई हाल केले. मी खोलीबाहेर बसून असायचो, काही बाही कानावर यायचे, सरांना मनाविरुद्ध काम करायला लय भाग पाडले जायचे. सरांनी त्यांच्याविरुद्ध कागदपत्र तयार केले आहेत असे कळताच त्यांच्या सहीचा कागद तयार करून डाव त्यांच्यावरच उलटवला गेला.

कात्रीत सापडले सर, लय वादविवाद झाले. मला इंग्रजी बोललेलं बरेच समजलं नाही पण सरांनी राजीनामा दिला नी दोनच दिवसात गेले की, शेवटी फार तडफड झाली त्यांच्या जीवाची .
त्यानंतर  मी तीन-चार वर्षे होतो नोकरीवर. एक साहेब आले होते त्यांच्या खुर्चीवर ते आपल्या अध्यक्षांच्या मर्जीतले ते सांगतील  तसे काम करणार. 
पण काही दिवसातच त्यांची तब्येत बिघडली आणि तेही गेले. 

नंतर एक मॅडम होत्या . एक दिवस त्या मला विचारत होत्या पेंडसे सरांच्या कामाबद्दल. पण काय झाले कोण जाणे ते,   त्या बाई खूप घाबरलेल्या असायच्या. सहा महिन्यातच बाईपण गेल्या.
असे दोन तीन जण मेल्यावर गावांत लोक बोलू लागले पेंडसे सरांचा आत्मा  फिरतो , शाळेत  खुर्ची वर आलेल्या नवीन साहेबांसी तो तरास देतो.
आता खर खोटं देव जाणे. त्यानंतर बरीच वर्ष कोणीच आले नाही.

शाळा छोटे सर सांभाळत होते. आता तुम्ही आलात पण सांगू का साहेब ,तुम्ही सांभाळून राहा. हे मोठे लोक तुम्हालाही त्रास देतील मनाविरुद्ध काम करून घेतिल” राजारामकडून बरीच माहिती सुधीरना मिळाली.
पेंडसे सरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तरी सुधीरने येथे काम करायचे ठरवले आणि तेही सरांच्याच पद्धतीने.
रात्रीचे दहा वाजले होते, सुधीर नित्यनेमाप्रमाणे डायरी लिहीत बसले होते.
ज्या शाळेत आपले शिक्षण झाले त्याच संस्थेत सेवा देण्याचे सौभाग्य मिळेल ,असा स्वप्नातही विचार केला नव्हता,

माधवी जर असती तर तिच्या सोबतचं आयुष्य किती तरी वेगळ असतं पण देवाची इच्छा काही तरी वेगळीच असते. 
अगदी इथे नोकरी करायचा विचार केला तेव्हा असा काही जीवघेणा प्रकार इथे घडला असेल असा संशयही मनाला शिवला नव्हता.
हा दैवयोग म्हणावा की पेंडसे सरांच्या मृत आत्म्याची इच्छा??
पुढचे काही महिने शाळेची घडी नीट बसवण्याच्या मागे सुधीर लागले.
मधल्या एक-दोन वर्षात शाळेत विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी झाली होती. 

आजूबाजूच्या तालुक्यात ही अनेक शाळा असल्याने व सध्याची परिस्थितीही त्याला कारणीभूत होती.
शाळेसाठी दोन कम्प्युटरही गरजेचे होते पण मॅनेजमेंटने फंड नसल्याचे कारण पुढे केले तेव्हा सुधीरनी स्वखर्चाने व्यवस्था केली.
मुलांना शिकवण्यासाठी  शिक्षकांचीही गरज होतीच.
अशा अनेक अडचणी होत्या, त्या हळूहळू दूर होतील असा विश्वास ही होता . पण पेंडसे सरांच्या नावावर जो कलंक लागला होता तो जोपर्यंत पुसला जाणार नाही तोपर्यंत मनाला समाधान लाभणार नाही.
आता ते शाळेला जास्तीत जास्त वेळ देऊ लागले.

अधून-मधून ऑफिसमध्ये खुर्चीवर बसताना मागे कोणीतरी उभे आहे असे बरेचदा सुधीरना जाणवत असे.
एक-दोनदा  जुना प्यून राजाराम भेटला तो ही बोलला, ” मला बी कधी कधी मोठ्या सरांचा शाळेत भास होत असे. पण ते मला त्रास देत नसत म्हणून मी कोणाजवळ बोललो नाही”
नव्या एक मॅडमचे सिलेक्शन होऊन त्या नोकरीवर रुजू झाल्या या मॅडमही मॅनेजमेंट च्या जुन्या मेंबरच्या नातेवाईक होत्या.
शिक्षकांचा पगार ही अध्यक्षांच्या सहीने यायचा. पण सही केलेले पैसे पूर्ण मिळत नसल्याने शिक्षक ही शिकवण्यात टाळटाळ करतात असे चित्र दिसत होते. अश्या अनेक भानगडी हळूहळू उलगडत होत्या.

अशोक शी फोनवर बोलताना सुधीरने सर्व भानगडींचा खुलासा केला.
अशोक ने स्पष्ट शब्दात सांगितल तू या सर्व भानगडीत नको पडू, सांभाळून राहा आपले काम बरे आणि आपण बरे एवढेच ठेव.
हे लोक फार खालच्या थराला जाऊ शकतात म्हणून ताकीदही दिली,
मेनेजमेंटमधे बरीच बडी प्रस्थ आहे. आणखीन एक, पेंडसे काकू गावाला येत असल्याचेही सांगितले.
संध्याकाळी काकू स्वतः हजर, हातात एक डायरी घेऊन, “अरे सुधीर यांच्या सामानात ही एक डायरी होती ते रोज लिहित असत” असे म्हणून सुधीरना सरांची डायरी देऊन गेल्या.

डायरी वाचायची,ती ही आवडत्या सरांची, डायरीवर प्रेमाने हात फिरवत सुधीरने डोक्याला लावून नमस्कार केला.
डायरी वाचता वाचता रात्रीचा एक वाजला, बरेचसे वाचले प्रत्येक कामाची नीट नोंद होती व खाली  सरांची लफ्फेदार सही.
दोन दिवस झाले नव्या आलेल्या मॅडम ने सुट्टी घेतली होती ,त्यांचे सासरे आजारी असल्याचे कळवले .
त्यांना पाहायला म्हणून सुधीर जाऊन आले जुन्या मॅनेजमेंट मधले एक मेंबर होते.  ते काहीतरी असंबद्ध बडबडत होते .
त्यांच्या बोलण्यात पेंडसे सरांचे नाव येताच सुधीर सतर्क झाले. त्यांच्या बोलण्यातून एवढेच जाणवले की त्या घोटाळ्यात तेही शामिल होते. आता त्यांना पेंडसे सरांचा समोर असल्याचा भास होतअसतो.

“सर ,हे माझे सासरे, अताशा भ्रमिष्ट झाले आहे. सारखे दाराकडे पाहून मला माफ करा मी चुकलो असे बडबडत असतात” काहीतरी मागचे आठवते वाटतं त्यांना. नवीन मॅडम म्हणाल्या.
मध्ये दोन दिवस शाळेला सुट्टी होती. सुधीर मुंबईला जाऊन आले, तिथल्या घराचे भाडेकरू बदलले होते म्हणून.
परत आले तो शाळेत मोठी चोरी झाल्याचे कळले. ऑफिसचे लाॉकर तोडण्यात आले होते.
पोलीस इंक्वायरी सुरू झाली सर्व शिक्षकांची विचारपूस झाली, रमेश बेपत्ता होता म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली.

दसऱ्या दिवशी सुधीर शाळेत असताना राजाराम प्यून शाळेत  आला,”सर रमेश माहित नाही कुठे आहे  पण हे काही कागदपत्र रमेशच्या खोलीत सापडले बघा काही कामाची हाय कां?  कालपासूनच घरी नाही आलाय पोरगा. काय तरी वंगाळ काम करुन तर नाही ना बसला, हीच काळजी माझ्या जिवाला लागली.”
कागद पाहून सुधीर ना धक्का बसला हे त्या फाईल चेच कागद होते, ज्यामुळे पेंडसे सरांवर आरोप झाले होते. .
कागदांवर कबुलीजबाब व खाली सही होती.

सही पाहाताच सुधीर दचकले डायरीतली सरांची सही व या कागदांवरची सही या दोन्हीमध्ये बरेच अंतर होते.
सुधीर ते कागद घेऊन तडक पोलिस स्टेशनला रवाना झाले.
पोलीस इन्स्पेक्टरने त्यांना पाहताच” नमस्कार सर, मी धनंजय मात्रे, आपला जुना मुंबई शाळेचा माजी विद्यार्थी .काय मदत हवी  सर?” असे विचारले .
सुधीरने हातातले कागद देत सर्व हकीकत इन्स्पेक्टरना सांगितले व सही मधले अंतरही दाखवले.

पुढच्या घटना नंतर भराभर घडत गेल्या.
रमेश फाईल सकट पकडला गेला. त्याने कबुलीजबाब दिला कि हे काम शाळेचे ट्रस्टी  यांनी करवले. 
मग ट्रस्टीनींही कबुलीजबाब दिला की, त्यांनी पेंडसे सरांच्या नांवावर घोटाळा केला. 
सकाळी सुधीर उठले तेव्हा त्यांना खूप प्रसन्न , मन हलकं झाल्यागत वाटत होते.
देवाची पूजा करून त्यांनी पेढ्याचा प्रसाद ठेवला. तेवढ्यात पेंडसे काकूंची हाक कानावर आली .

सुधीरने काकूंना वाकून नमस्कार करत त्यांच्या हातावर पेढा ठेवताच काकू म्हणाल्या, “तू खरंच मोठ्या संकटातून सुटका केली रे, ह्यांच्या नावावरचा कलंक पुसला गेला. अरे काल स्वप्नात आले होते रे, खूप आनंदात दिसत होते बहुत करून त्यांना मुक्ती मिळाली असे वाटते”.
दोन दिवसांनी सुधीर  शाळेत गेले, त्यांनी पेंडसे सरांच्या फोटोला हार घातला व नमस्कार केला. ऑफिसमध्ये येऊन खुर्चीवर बसले तेव्हा मागे कोणीच नाही हे त्यांना जाणवले.
समाप्त
******
© सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!