© धनश्री दाबके
‘से चीज’ फोटोग्राफर ओरडला आणि सगळ्यांच्या स्माईल्स एका झकास फोटोत कैद झाल्या.
“ए चला चला..आता कपल फोटो..बोलवा सगळ्यांनी नवऱ्याला..आपापल्या हा..” हसत हसत कोणीतरी म्हणाली आणि आपसूकच सुगंधा तिथून बाजूला झाली.
तिने कोपऱ्यातली एक खुर्ची पकडली आणि तिथून ती पुढचे फोटोसेशन बघू लागली.
मग सगळी नवरे मंडळी स्टेजवर जमली. आधी नवरे एका बाजूला आणि त्याच क्रमाने बायका दुसऱ्या बाजूला मग बायका खुर्चीवर बसलेल्या व नवरे आपापल्या बायकोच्या खुर्चीमागे उभे असलेले असे विविध प्रकारातले कपल फोटो काढून झाले आणि फॅमिली फोटोकरता मुलाबाळांना बोलवायला सुरवात झाली.
आज अश्विनी आणि अनिकेतच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा होत होता.
सकाळी घरी सत्यनारायण आणि संध्याकाळी हॉलवर पार्टी असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होता. ज्यासाठी दोघांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी सहकुटुंब उपस्थित होते. अपवाद होता तो फक्त सुगंधाचा.
गृपमधली तीच एक तेवढी एकटी आली होती.
सगळ्यांना सुगंधाच्या एकटं येण्याची सवय झालेली असल्याने सुधीर आणि स्मृती का नाही आले असं कोणी तिला विचारलंही नव्हतं.
पण जरी कोणी काही विचारलं नव्हतं तरी स्टेजवरची ती आनंदी जोडपी पाहून सुगंधाचे डोळे भरून आलेच. मग डोळ्यांसमोरचं दृष्य धुसर झालं आणि सत्तावीस वर्षांपूर्वी तिच्या लग्नात घडलेला तो प्रसंग परत समोर घडू लागला.
नव्या आयुष्याची स्वप्नं रंगवत सुगंधा आणि सुधीरने एकमेकांना हार घातले. डाळींबी रंगाचा नाजूक बुट्टे असलेला शालू, ललचुटूक मेंदीने रंगलेले गोरे हात, त्यावर भरलेला हिरवागार चुडा, लांबसडक दाट केसांचा शेपटा, त्याच्या प्रत्येक पेडावर दिमाखाने विसावलेली चांदीची वेणी आणि गजरे घातलेली गोरी गोमटी आणि मुख्य म्हणजे आनंदी असलेली सुगंधा अतिशय सुरेख दिसत होती. ‘नंतर हीची दृष्ट काढ ग न विसरता’ असं बऱ्याचजणी तिच्या आईला बजावत होत्या.
सुधीरही आपल्या होऊ घातलेल्या सुंदर बायकोला पाहून खुश होत होता. भविष्याची सुरेख स्वप्नं रंगवत होता.
लग्नविधी पार पडला आणि सुगंधाच्या मैत्रीणींनी तिला गराडा घातला. सुधीरवरून चिडवून चिडवून सगळ्यांनी तिला बेजार केलं.
सुधीर थोडा लांब गेलाय असं पाहून एक मैत्रीण म्हणाली “किती सुंदर दिसतेयस ग तू सुगंधा..पण ह्याच्यात काय पाहिलंस ग?”
तेवढ्यात दुसरी म्हणाली “अगं असं काय करतेस? आत्ताच कुठे पाहाणार ती? आता हनीमूनवरून आल्यावर विचारूया ना तिला. काय पाहिलं ते..सगळं एकदम डीटेल्ड मधे जाणून घेऊ मग.”
मैत्रीणींच्या ह्या खट्याळपणामुळे सुगंधा कानकोंडली होऊन गेली.
सुधीरला यांचा हा आगावूपणा ऐकू गेला नाही म्हणजे मिळवलं या विचाराने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि इतका वेळ आनंदात असलेला त्याचा चेहरा एकदम उतरलेला पाहून त्याने हे सगळं ऐकलंय ते तिला कळून चुकलं.
एक क्षण त्या मैत्रीणीचा रागही आला.
समजावूया याला नंतर असा विचार करून सुगंधा पुढच्या विधींच्या गडबडीत रमली.
सुधीर मात्र त्या एका प्रश्नाने तेव्हा जो अवस्थ झाला तो कायमचाच. मी माझ्या बायकोला शोभत नाही हा विचार त्याच्या मनात ठाण मांडून बसला.
दोघं हनीमूनहून आले. सुरळीतपणे संसार सुरु झाला. सुगंधाच्या वागण्या बोलण्यात आपण तिला शोभत नसल्याचा साधा मागमूसही दिसला नाही सुधीरला कधी.
‘माझ्या त्या मैत्रीणीला मूर्ख म्हणून सोडून दे’ असं सुगंधाने खूप वेळा सांगूनही सुधीरच्या मनातला न्यूनगंड तसाच राहिला.
हळूहळू तो सुगंधाबरोबर चारचौघात जायचे टाळायला लागला.
पहिल्या वर्षातल्या सणासुदीला आणि नातेवाईकांच्या आमंत्रणांसाठी जिथे कुठे एकत्र जावंच लागलं तिथे सुधीर सुगंधाबरोबर गेला. पण नंतर मात्र सुधीर प्रत्येकवेळी काहीनाकाही कारण देऊन जोडीने बाहेर पडणं टाळत गेला.
सुरवातीला सुंगधाने त्याला खूप समजावून पाहिलं. कधी प्रेमाने, कधी रागाने, अबोल्याने तर कधी खूप हट्ट धरून, पराकोटीची भांडणं करून तर कधी अगदी समंजसपणे …. अनेक प्रकारे सुगंधाने त्याचं मन वळवायचा प्रयत्न केला. पण सुधीर नाही तर नाहीच बधला. ‘माझ्या मनात तू मला शोभत नाहीस असा साधा विचार सुद्धा कधी येत नाही’, हे सांगून सांगून सुगंधा थकली. पण लग्नाच्या दिवशीच्या त्या एका कमेंटमुळे सुधीर कायमचा दुखावला गेला.
बाकी कुठल्याच बाबतीत तक्रारीला जागा नसल्याने हळूहळू सुधीरचा हा अलिप्तपणा सुगंधाने अंगवळणी पाडून घेतला.
जगाच्या एका निकषाला सर्वस्व मानणाऱ्या सुधीरला, आहे तसा स्वीकारत सुगंधाने जोडीने बाहेर जाण्याच्या आनंदाकडे कायमची पाठ फिरवून टाकली.
दोघांचा संसार पुढे जात राहिला. स्मृतीच्या रूपाने घरात सुख आले. सुगंधा मातृत्वाच्या जबाबदाऱ्या निभावण्यात रमली. स्मृती अगदी पितृमुखी होती. रंगही तिने सुधीरचाच उचलला होता. पण ती स्वभावाने मात्र सुगंधासारखी लाघवी, प्रेमळ आणि हसरी होती. लहानपणी सतत आई आई करत सुगंधाच्या मागे मागे असणारी स्मृती, तिला कळायला लागले तशी मात्र आईपासून अंतर ठेवून वागू लागली.
कारण परत तेच.. तोच दिसण्यातला फरक आणि ‘ही अगदी वडलांवर गेलीये…अजिबात तुझ्यासारखी गोरीगोमटी नाहीये’ अशा इतरांच्या कमेंट्स. शिवाय जस जशी समज यायला लागली तस तसे आपले आईबाबा एकत्र कधीच कुठे जात नाहीत हेही तिला कळायला लागले.
नक्की का ते कळत नसलं तरी बाबा आईबरोबर न जाता नेहमी घरीच थांबणं पसंत करतात हे तिला माहीत झाले. मग कधी कुठे जायची वेळ आली की, आई मी नाही येत मला अभ्यास करायचा आहे, म्हणत स्मृतीही सुधीरसोबत घरीच थांबू लागली.
एकपाठी आणि अभ्यासात हुशार असलेल्या स्मृतीने स्वतःला अभ्यासाच्या कोषात बांधून घेतले.
सुगंधाने हळूहळू त्याचीही सवय करून घेतली आणि ती सगळीकडे एकटीच जाऊ लागली.
मग कुठलंही फंक्शन असो, सुगंधा एकटीच येणार याची सवय माहेरच्यांना आणि मैत्रीणींनाही होत गेली.
‘आयुष्य जसं येईल तसं स्वीकारायचं आणि कसलीही तक्रार करत रडत बसायचं नाही’ या विचाराने जगणाऱ्या सुगंधाने मग सुधीर आणि स्मृतीला बरोबर येताय का हे विचारणंही बंद करून टाकलं.
ती एकटीच असली तरी मजेत सगळीकडे जात येत राहिली. सगळ्या नातेवाईकांशी तिने चांगले संबंध जपले. काळ भराभर पुढे सरकला. बघता बघता स्मृती मोठी होऊन CS करून गलेलठ्ठ पगाराची नोकरी सुद्धा करू लागली.
आजही सुंगधा एकटीच एका बाजूला बसून कपल फोटो सेशन बघत होती. भूतकाळात रमलेल्या मनामुळे डोळ्यांतून कधी दोन थेंब गालांवर ओघळत आले ते तिचे तिलाही आधी समजले नाही. पण ते समजल्यावर मात्र घाईघाईने सुगंधाने डोळे पुसले आणि चेहरा नेहमीसारखा हसरा ठेवत ती पुढच्या कार्यक्रमात सामील झाली.
आजचा सगळा सोहळा अगदी दृष्ट लागावी असा पार पडला. मग एका मैत्रीणीने सुगंधाला कारने घरी सोडले. या गोष्टीचीही सगळ्यांनी सवय करून घेतली होती. प्रत्येकवेळी सुगंधा एकटीच असल्याने कुठेही जातांना आणि येतांना आपसूकच सुगंधाला पिकअप आणि ड्रॉप मिळायचाच. सुधीरलाही मग तिच्या एकटीने जाणायेण्याची काळजी वाटायची नाही.
सुगंधा रात्री घरी आली तर दोघांची जेवणं आटपून स्मृतीने छानपैकी मागचं सगळं आवरलं होतं. बापलेक दोघं मिळून कुठलातरी मूव्ही बघत बसले होते. सुगंधा आल्यावर स्मृतीने कार्यक्रमाबद्दल विचारपूस केली, आज कुठल्या मावशीने घरी सोडलं तेही अगदी आवर्जून विचारलं. आई दमलीस का? कॉफी करून देऊ का? हेही प्रेमाने विचारलं.
आपल्या लेकीचा समजूतदार आणि प्रेमळ स्वभाव बघून सुगंधा भरून पावली. ही ज्या घरात जाईल तिथे अगदी प्रेमाने सगळ्यांना जिंकेल असं वाटून सुगंधामधली आई सुखावली. शेवटी रंगरूपापेक्षा माणसाचा चांगला स्वभाव लाखमोलाचा असतो. स्मृतीच्या याच लाखमोलाच्या स्वभावावर आणि हुशारीवर भाळणारा एखादा चांगला मुलगा लवकर तिच्या आयुष्यात येऊ दे रे देवा.. अशी प्रार्थना करतच सुंगधा झोपायला गेली.
लवकरच सुगंधाची ही प्रार्थना फळाला आली. एक दिवस आई बाबा तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणत स्मृतीने तिच्या ऑफिसमधल्या केदारवर प्रेम असल्याचं सांगितलं.
केदार चांगल्या घरातला, शिकलेला मुलगा होता. शिवाय स्मृतीला आवडला होता. त्यामुळे विरोधाला काही कारणच नव्हतं. त्याला लवकर घरी भेटायला घेऊन ये… असं सुधीर आणि सुगंधाने स्मृतीला सांगितलं.
पुढच्याच आठवड्यात स्मृती केदारला घेऊन घरी आली. गोरापान, उंचपुरा, पीळदार शरीरयष्टीचा केदार अगदी हॅंडसम आणि आवडण्यासारखाच होता.
म्हणजे इथे नवरा देखणा आणि बायको दिसायला सामान्य असा प्रकार होणार होता. त्याला पाहून सुधीरला आनंदही झाला आणि काळजीही वाटायला लागली.
एक प्रकारची असुरक्षितता किंवा न्यूनगंड जो माझ्या मनात होता तोच स्मृतीच्या मनात निर्माण झाला तर.. तिचाही संसार असा माझ्या आणि सुगंधासारखाच झाला तर.. या विचाराने सुधीर अस्वस्थ झाला.
केदारला पाहून सुगंधालाही एक क्षण असंच वाटून गेलं.. पण लगेच दुसऱ्याच क्षणी तिच्यातली सकारात्मकता जागी झाली.. आणि नाही असं काही होणार नाही असं म्हणून तिने मनातल्या आधीच्या विचाराला हुसकावून लावलं.
केदारच्या घरूनही ग्रीन सिग्नल मिळाला आणि दोन्ही कुटुंबांनी भेटून पुढच्या गोष्टी ठरवायला भेटायचं असं ठरलं.
आता सुधीरपुढे पर्यायच नसल्याने तो सुगंधा आणि स्मृतीबरोबर केदारच्या घरी गेला.
पहिली मीटींग तरी खूप छान पार पडली. केदारचे आईवडील शिकलेले आणि सुसंकृत होते. केदारही वागाबोलायला खूप साधा आणि मोकळा होता. सुधीरला स्मृतीच्या निवडीचा अभिमान वाटला.
मग साखरपुड्याची तारीख काढली गेली आणि त्यासाठीची तयारी सुरू झाली. परत खरेदीला एकत्र जायचा प्रसंग उभा राहिला. सुधीरने काहीतरी कारण शोधण्याआधीच स्मृतीने गळ घातली आणि सुधीरला खरेदीला जावं लागलं.
आधी स्मृतीची साडी खरेदी झाली, मग केदारचा सूट आणि मग सगळ्यांचा मोर्चा ज्वेलर्सकडे वळला. लेकीसाठी, तिच्या होणाऱ्या सासूबाईंसाठी आणि स्वतःसाठीही साडी घेतांनाचा सुगंधाचा आनंदी आणि समाधानी चेहरा पाहून सुधीर सुखावला.
खरंच किती प्रिय असते बायकांना खरेदी.. इतक्या वर्षात सुगंधाचा हा आनंद आपण जपायचा तर दूरच पण लांबूनही कधी पाहिला नाही.
तिच्या या आनंदापेक्षा माझा न्यूनगंड खरंच मोठा होता का? सुधीर विचारात पडला.
खरेदीनंतर हॉल बघणे, कॅटरर्स कडे जाणे, आमंत्रणं करणे.. अशा बऱ्याच कारणांमुळे सुधीर आणि सुंगधा एकत्र बाहेर पडले. केदारच्या आईवडलांनाही भेटले.
केदारही अधेमधे घरी येत जात राहिला.. आणि आपल्या जोडीतल्या या वैगुण्याने आपल्याला वाटत राहातो तितका कोणाला खरंच फरक पडतो का? असा प्रश्न सुधीर स्वतःला विचारू लागला.
सुगंधाच्या मैत्रीणीच्या त्या कमेंटला खरोखरीच इतकं सिरीयसली घ्यायची गरज होती का? कोणाच्यातरी त्या एका निकषाने मी सुगंधावर, आपल्या नात्यावर खूप अन्याय केलाय याची जाणीव सुधीरला होऊ लागली.
पण माणसाचं मन हे एक अजब रसायन असतं.. एकदा वाटलं आणि त्याने लगेच ऐकलं असं होत थोडीच ! सुधीर हळूहळू विचार तर करत होता पण तरी.. स्मृतीच्या साखरपुड्याच्या वेळी केदारकडच्या काही लोकांच्या नजरेत याने काय पाहिलं या मुलीत? हा भाव सुधीरला दिसलाच आणि स्वतःच्या न्यूनगंडातून बाहेर पडायला बघणारा सुधीर परत बॅकफूटवर गेला.
त्याला स्मृतीची भयंकर काळजी वाटू लागली. नको नको ते विचार मनात गर्दी करू लागले. कसं बसं मनाला सावरत सुधीर साखरपुड्यात वावरला.
स्मृतीचे लग्न ठरल्यापासून हळूहळू मोकळा होत जाणारा सुधीर तिच्या साखरपुड्याच्या दिवसापासून मात्र परत आपल्या त्याच भावनेच्या गर्तेत जातोय हे सुगंधाला जाणवलं.
पण तिने त्यावर गप्प राहाणंच पसंत केलं. आयुष्याची संध्याकाळ होत आली तरी जर एखाद्याला कशाला किती महत्व द्यावं हे समजत नसेल तर आपण तरी काय करणार? ‘सावरू दे त्याचा त्याला’ असा विचार करून सुगंधाने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं.
साखरपुड्यापासून बाबांच्या वागण्यात झालेला बदल स्मृतीलाही जाणवत होता.
स्मृती केदारला भेटून आली किंवा त्याच्या मित्रमैत्रीणींबरोबर पार्टीला जाऊन आली की सुधीर तिला असंख्य प्रश्न विचारत असे. ज्या सगळ्यांचा हेतू तिला बरोब्बर समजत असे..
खरंतर सुरवातीला केदारने जेव्हा तिला प्रपोज केलं होतं तेव्हा आपण याला शोभणार नाही हाच विचार स्मृतीच्याही मनात आला होता.
कधीकधी तर अजूनही येत होता. पण बाह्य रूपाच्या पलिकडे जाऊन स्मृतीच्या चांगल्या स्वभावाकडे, गुणांकडे, कर्तृत्वाकडे बघायची दृष्टी केदारकडे होती. त्याचं तिच्यावर खरं प्रेम होतं आणि ते व्यक्त करून तिच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण करण्यात केदार यशस्वी झाला होता.
त्याच्या आश्वासक सोबतीमुळे, मनापासून केलेल्या प्रेमामुळे आणि स्वतःच्या सकारात्मक विचारसरणीमुळे स्मृतीने तिला वाटणाऱ्या असुरक्षिततेवर मात केली होती.
अतिशय आनंदाने आणि आत्मविश्वासाने ती त्याच्याबरोबर नवे आयुष्य सुरू करणार होती.
बघता बघता दिवस सरले. स्मृती आणि केदारचं लग्न थाटामाटात पार पडलं. स्वतःच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावाने स्मृतीने सासरच्या मंडळींना आपलंस करून घेतलं.
स्मृतीला सुखाने सासरी नांदतांना पाहून सुगंधा आणि सुधीर भरून पावले.
स्मृती, केदार दोघंही आपापल्या करीअरच्या पायऱ्या चढत गेले.
एका आलिशान कॉम्पेक्समधे नुकतेच दोघांनी मोठे घर बुक केले आणि स्मृतीला मातृत्वाची चाहूल लागली.
लेक जावयाच्या चहूबाजूंनी बहरणाऱ्या आयुष्याकडे बघत सुखावत गेलेला सुधीर लेकीच्या भविष्याबाबत निर्धास्त झाला आणि हळूहळू स्वतःच्या निकषांवर जगायला शिकला.
रिटायरमेंट नंतर आता मोकळा वेळ असतो म्हणत सुगंधाबरोबर बाहेर जाऊ येऊ लागला.
सणा समारंभांच्या कार्यक्रमांना सुगंधाही आता जोडीने हजेरी लावू लागली.
स्मृतीच्या बाळांतपणाच्या जबाबदारी आधी तुला थोडा चेंज म्हणून सुधीरने चक्क त्याचे आणि सुगंधाचे हिमाचलच्या टूरचे बूकिंग केले. सुधीरमधे झालेला हा बदल पाहून मायलेकी दोघी खूप सुखावल्या.
बऱ्याच वर्षांनी का होईना पण आपल्या सहजीवनाची गाडी योग्य मार्गाला लागली या विचाराने हरखलेली सुगंधा आनंदाने सुधीरबरोबर सुखाच्या टूरवर निघाली.
समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.