ओवाळणी

© सौ. प्रभा निपाणे
अरुंधती फराळाचे पदार्थ आणि भरपूर नवीन कपडे बांधून, सुनेच्या म्हणजे राधिकाच्या, आईकडे दरवर्षी पाठवायच्या.
२६ वर्ष झाले पण यात खंड पडला नाही.
राधिका हॉस्पिटल मध्ये admit असल्यामुळे खरतर या वर्षी काहीही करायची त्यांची इच्छा नव्हती. तरीही त्यांनी फराळाचे केले . राधिकाचा भाऊ रवी याला एक चिठ्ठी लिहिली .
भाऊबीजेची ओवाळणी आणि राखीची लाज राखण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर मला येऊन भेट.

आपल्या विश्वासू नोकराला सुनेच्या माहेरी पाठवून, त्याला चिठ्ठी रवीच्याच हातात द्यायला सांगून, राधिकाने लग्न झाल्यावर तिने त्यांना सांगितलेल्या आणि अनुभवलेल्या भूतकाळात अरुंधती हरवून गेल्या.
राधिका….त्यांची सून…खरतर सून हा शब्द तिला लागू पडत नाही. आल्याआल्या तिने सगळ्या घराला आपलेसे केले आणि संपूर्ण घराने तिला त्यांच्यात सामावून घेतले.
एका मुलीचे करतो तसेच तिचे कोडकौतुक आणि लाड केले.
अशी ही वासू दादा आणि शांताताई यांची गोड मुलगी. आणि रवीची प्रेमळ बहिण… राधिका..

राधिका…. जेमतेम डिग्री हातात घेऊन एका छोट्या कंपनीत नोकरी करत होती. भाऊ तिच्यापेक्षा लहान, अजून शिकत होता.
आई, वडील दोघेही लोकांच्या शेतात मजुरी करायचे. ती सुध्दा सुट्टीच्या दिवशी आई बरोबर शेतावर जायची.
खरतर आई तिला मुद्दाम सोबत घेऊन जायची.
राधिका नक्षत्रा सारखी दिसायला सुंदर होती . लांब सडक केस, काळया भोर रेखीव भुवया, गालावर खळी , घारे डोळे ,रस्त्याने चालत असेल तर थबकून लोक तिला पाहत होते. तरुणच नाही तर वृध्द सुध्दा.
इतकी नक्षत्रा सारखी पोर सांभाळ करणं तिच्या आईवडिलांना खूप जोखमीचे वाटायचे .

अशीच एक दिवस आई सोबत राधिका शेतावर गेली होती.
सगळ्या एका झाडाखाली बसून दुपारची भाकरी खात होत्या. तेव्हढ्यात शेताचे मालक सदा काका आणि त्यांच्या सोबत एक तरुण येताना दिसला.
सगळ्या जणी उठून उभ्या राहिल्या. एकसुरात ‘नमस्कार सदा काका’ म्हणून त्यांना वाकून नमस्कार केला.
तो तरुण देहभान विसरून राधिका कडे पाहत होता. तिच्या आईच्या हे लक्षात आले.

“राधिका! चला बेटा कामाला लागू या!” असे म्हणून त्या आपल्या लेकीला बाजूला घेऊन कामाला लागल्या.
तो तरुण अजूनही तिच्याचकडे पाहत होता .
त्याने सदा काकांच्या कानात काहीतरी सांगितले. चाणाक्ष राधिकाच्या आईच्या नजरेतून हे सुटले नाही.
आपल्या मुलीचे सौंदर्य धोक्यात आहे असेच तिला वाटत होते.
मनोमन तिने एक निर्णय घेतला, लवकरात लवकर पोरी चे लग्न करून द्यायचे. उगाच जीवाला घोर नको.

रात्री घरी आल्यावर तिने शेतात घडलेली घटना तिच्या नवऱ्याला सांगितली.
लवकरात लवकर वर संशोधन करायचे असे त्याला सांगितले .
राधिका म्हणाली, “आई असं लोक माझ्या कडे बघतात म्हणून तू माझे लग्न करणार आहेस का? अग ! पोरीवर पण जरा विश्वास ठेव ना! मी जाते का कुठे एकटी? सुट्टीच्या दिवशी सुध्दा तुझ्या बरोबर शेतावर येते.
सगळ्या मैत्रिणी बोलतात अग आता नोकरी करते, मग कशाला शेतात जाते?
मी घरी एकटी असेल तर तुझ्या जिवाला घोर लागेल माहित आहे मला. मी मैत्रीणीना सांगते, तसे नाही ग! घरी बसून तरी काय करणार? तेवढेच चार पैसे शिल्लक पडतात.

हसतात ग मैत्रिणी मला! पण मी नाही त्याची पर्वा करत. फक्त तुला काळजी वाटू नये म्हणून.”
तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले, “अग बरोबर बोलते पोरगी. राहू दे की थोडे दिवस आपल्या संग. काय घाई आहे तिच्या लग्नाची.
माझी पोरगी इतकी सुंदर आहे, एखादा राजकुमार येईल आणि तिला घोड्यावर बसून घेऊन जाईल.”
“अहो! स्वप्नातून भानावर या. आधी आपली ऐपत बघा मग राजकुमाराचे स्वप्न !”
“शांते आपली परिस्थिती जराशी बरी असती तर खरच एखादं चांगल स्थळ आपल्या राधिकाला सांगून आलं असतं.
समद्या गावात इतकी सुंदर अन् सुशील पोरगी दिसत नाय.”
“अहो, म्हणूनच जीवाला घोर लागतो. ते काही नाही, आता स्थळ पाहायला सुरुवात करू या.”
ठीक आहे, बघू म्हणून जेवून झोपले.

सकाळी सकाळी सदा काका राधिकाच्या घरी.
“वासू घरी आहे का?” गाडीचा आवाज, आणि सदा काकांचा आवाज दोन्ही वासू च्या ओळखीचा.
वासू धावत बाहेर आला.
“सदा काका तुम्ही? या गरिबाच्या झोपडीत? मला बोलावणे धाडायचे ना! लगोलग भेटायला आलो असतो.”
“अरे वासू माझे काम आहे. मग तुला बोलवून कसे चालेल?”
“काय काम आहे काका?”
“अरे जरा बसू तर दे!”

त्याने हाताने चादर झटकली.
“बसा काका! राधिका पाणी दे काकांना.”
“नको , आधी मुद्द्याच बोलू दे!”
“बरं! काका ! बोला काय करायचे आहे म्या पामराला?”
“राधिकाचे लग्न!”
“काय?”
सदा काकांनी काल शेतात घडलेली घटना सांगितली. त्याला लगेच बायकोने सांगितलेला शेतातला प्रसंग आठवला.
भानावर आला.

“माझा भाचा आहे तो. त्याला राधिका खूप आवडली. त्यामुळे त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे.”
“सदा काका हे कसे शक्य आहे हो!”
“का? का शक्य नाही? तु सुध्दा शह्यांनव कुळी मराठा आहेस ना!”
“हो!”
“आम्ही सुध्दा तेच “
“जातीचे नाही बोलत मी.”
“मग?”

“काका मी गरीब माणूस. हातावर पोट आमचे.”
“ते काय मला माहित नाही का? तुला आठवते का वासू, मी तुला एकदा बोललो होतो? वासू मला मुलगा असता तर तुझ्या लेकीला सून करून घेतली असती. पण मला दोन्ही मुली. आता माझा भाचा तुझ्या लेकीच्या प्रेमात पडला .म्हणजे कुठेतरी ती माझ्या घराण्यात येणार. अरे इतकी घरंदाज आणि देखणी मुलगी शोधून सापडणार नाही.
कालच माझे बहिणीशी बोलणे झाले. ती म्हणाली दादा उद्याच बोल. त्यांचा होकार असेल तर मी ताबडतोब येते. आपल्या गावापासून ४० किलोमिटर दूर आहे तिचे गाव.”

“सदा काका! हे कसं शक्य आहे हो? कुठं माझी झोपडी ! कुठं तुमचा महाल!
तुम्ही तर म्हणता तुमची बहीण तुमच्या पेक्षा पण श्रीमंत आहे.”
“वासू ते गरीब श्रीमंत सोड! फक्त तुला मुलगी द्यायची आहे की नाही ते सांग!
थांब ! आधी मी मुलगा काय करतो ते सांगतो. तो BSC AGREECULTURE आहे. नोकरी त्याला करायची नव्हती. जवळ जवळ दीडशे एकर शेती आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करतो. कोणतेही व्यसन नाही. आईवडिलांचा एकुलता एक आहे.
राधिका तुझा काय विचार आहे?”

“सदा काका! इतक्या मोठ्या घरी लग्न करून जाणे खरच नाही झेपणार हो मला.”
“आम्ही तुला पूर्ण सांभाळून घेऊ. तू त्याची चिंता करू नको. शिवाय माझी बहिण आणि तिचे मिस्टर दोघेही खूप प्रेमळ आहेत. तुला समजून घेतील. वासू बोल लवकर? शांते! तू तरी काही बोल.”
“सदा काका तुमची हीच इच्छा असेल तर पोरीचे भाग्य म्हणावे लागेल.”
“म्हणजे तुमचा होकार समजू?”
वासू उठून सदा काकांच्या पाया पडला. मग राधिकाची आई आणि राधिका सुध्दा.

सदा काका उठून उभे राहिले. गाडीजवळ जाऊन गाडीच्या मागे उभ्या असलेल्या आपल्या भाच्याला बोलावले.
“चला , मंडळी नाही बोलतात तुमच्याशी लग्न करायला.”
सुहासचा चेहरा एकदम पडला.
“मामा चल,” असे म्हणून तो गाडीचा दरवाजा उघडणार इतक्यात सदा काका गाडीचा दरवाजा बंद करत म्हणाले, “मग कधी चढायचे बोहल्यावर.?”
“मामा!”
“हो ! त्यांनी होकार दिला. आईला आजच बोलवून घेतो. उद्या बोलणी करून टाकू . चल ,वासूच्या घरी जाऊ. त्याला बघू दे त्याचा होणार जावई! राधिका ने सुध्दा तुला नीट पाहिले नसेल ना! बघून घ्या एकमेकांना.”

दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मुलगी बघायला गेलो. पाहताक्षणी पोर डोळ्यात भरली.
चॉईस आहे पोराला !
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
अरुंधती म्हणाली, “वासू दादा आता मुद्द्याचे बोलू या!”
किती घाबरले होते सगळे.
“वासू दादा , मला अगदी खर खर सांगा, जर तुम्ही दुसरीकडे कुठे मुलीचे लग्न ठरवले असते तर नेमके लग्न कसे केले असते?”

वासू गोंधळून गेला. त्याला काय उत्तर द्यावे सुचत नव्हते.
“ताई साहेब ! तुम्ही काय म्हणता मला नाही समजले?”
“अहो सोप्प आहे. मला म्हणायचे आहे जर दुसरीकडे कुठे लग्न ठरवले असते तर, मुलाचे कपडे, मुलीचे कपडे, दागिने हे कसे केले असते?”
“अस होय! सांगतो! ताई मुलाचे कपडे आम्ही घेतो. मुलीचे कपडे मुलाकडचे घेतात.”
“बरं ! मग साधारण किती? आणि किती रुपया पर्यंत ड्रेस घेता?”

“दोन ड्रेस घेतो. एक साखरपुड्याला, दुसरा लग्नाला. एक हजार बाराशेला दुसरा अजून जरा स्वस्त. बूट , एक अंगठी, बाकीच्या छोट्या वस्तू असतात. आणि कन्यादानाचे पाच भांडे.”
“बरं! मुला कडचे कितीची साडी घेतात?”
“तेवढ्याच किमतीत, मुलाच्या ड्रेसला शोभेल अशी आणि डोरल करतात.”
“ठरले तर मग. आम्ही राधिकाला अशीच स्वस्त साडी घेणार, तुम्ही तसेच कपडे मुलाला घ्या. तुमच्या दारात मंडप टाका.

मी, माझे मिस्टर , नवरा मुलगा, माझा भाऊ म्हणजे तुमचे सदा काका, त्यांची बायको आणि त्याच्या दोन मुली आणि जावई आम्ही इतके लोक लग्नाला येऊ. तुमच्या मुलीची वरात तुमच्या घरून निघणार.
आम्हाला काहीही कपडा लत्ता घ्यायचा नाही. लग्नाला आम्ही सुध्दा साधेच कपडे घालू. तुमच्या मंडपात शोभेल असेच. तुमच्या कडून लग्नाला ज्याला बोलवायचे त्याला बोलवा. हवे तर अर्धा अर्धा खरच करू.”
“नाही ताई साहेब, मी लग्न करून देतो.”
“ठीक आहे. वासू दादा ! दुसऱ्या दिवशी आमच्या कडे रिसेप्शन असेल तेव्हा तुम्ही मात्र तिकडे सर्वांनी यायचं.”

सगळे शांत झाले.
शांतता भंग करत तिचा भाऊ म्हणाला, “आमच्या कडे कुठे भारी कपडे असणार तुमच्या कडे कार्यक्रमाला यायला.”
सगळे स्थब्ध झाले.
“अरे कपडे आम्ही पाठवू, तू नको काळजी करू.”
थोड थांबून म्हणाला, “ताई मी तुला दरवर्षी ११ रुपये ओवाळणी देतो भाऊबीजेला. इतक्या मोठ्या घरी तु जाणार. माझ्या ११ रुपयाची किंमत काहीच नाही राहणार ग!”

अरुंधती , राधिकाच्या सासूबाई, त्याच्या जवळ गेल्या,”रवी ,अरे ओवाळणी ही ओवाळणी असते. त्यात पैश्याचे मोल नाही होऊ शकत बाळा. मी तुला सांगते तू दर वर्षी तुझ्या ताईला ११ रुपयेच ओवाळणी द्यायची. तू कितीही मोठा झाला, श्रीमंत झाला तरीही. ह्या ११ रुपयाचे मोल अनमोल आहे. पण हो जेव्हा जेव्हा तिला तुझ्या मदतीची गरज असेल तेव्हा तू तिच्या पाठीशी खंबीर उभा राहा.
तुझ्या कडून ही ओवाळणी मात्र कायम दे.”
“हो! मी कायम माझ्या ताई सोबत असेन.” असे म्हणून त्याने राधिकाला मिठी मारली.

अरुंधती भानावर आल्या. माणूस डबा घेऊन पोहचला असेल. रवी आजच यायला हवा भेटायला. तसा मधून मधून येतोच पण आता त्यालाही त्याचा संसार आहे .
राधिकाला रवीने किडनी द्यावी ही माझी इच्छा पूर्ण होणार का?
पैसा आहे पण किडनी दाता मिळत नाही. मिळाला तर किडनी मॅच होत नाही. देवा माझ्या सुनेला लवकर किडनी दाता मिळू दे .
तेवढ्यात रवी दारात.
“अरुंधती काकु, तुमचा निरोप मिळाला. लगोलग आलो.”

“रवी मी कशाला इतक्या तातडीने बोलावले काही समजले का तुला?”
“हो !”
“काय ठरवले तू?”
“काकु मी माझ्या ताईला माझी एक किडनी देणार. देव करो आणि माझी किडनी तिला मॅच होवो!”
“नक्की होणार ! रवी मी सगळी माहिती काढली आहे. एका किडनीने तू तुझे आयुष्य नेहमी प्रमाणे जगू शकतो.”
“काकु हे मलाही माहित आहे. पण खर सांगू? हिम्मत होत नव्हती. काल तुमची चिठ्ठी वाचली, ठरवले हीच ती वेळ.
माझ्या बहिणीला या दिवाळीत माझी किडनी देऊन तिला जीवदान द्यायचे. हीच यावर्षी माझ्याकडून ११ रुपया सोबतची ओवाळणी.”

“मी म्हणाले होते रवी आठवते ना? तू कायम तिच्या पाठीशी उभा राहा. आणि आज तू कसलाही विचार न करता तिच्या पाठीशी उभा आहेस. तुझ्या किडनीचे मोल होऊच शकत नाही. या अनमोल ओवाळणी बद्दल खूप खूप धन्यवाद रवी.”
“काकु” अशी साद घालत रवीने काकूंना मिठी मारली.
राधिकाला या बद्दल काहीही सांगायचे नाही असे रवीने आधीच सांगून टाकले.
चार दिवसात सगळ्या टेस्ट करून आज राधिकाचे किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन होते.

आज सकाळ पासून राधिका रवी आला नाही का म्हणून विचारत होती.
“तुझे ऑपरेशन होईपर्यंत नक्की येतो. असे बोलला तो.”
“येईल ग इतक्यात.”
राधिकाचे ऑपरेशन झाले. ती शुध्दीवर आली.
“आई ,बाबा ,वहिनी भाचे दिसले पण रवी नाही. रवी कुठे आहे.?”
“अग येऊन तुला बघून गेला. आता सुहास बरोबर डॉक्टरकडे गेला.
घरी काही काम आहे म्हणाला तर तिकडून घरी जाईल. उद्या सकाळी भेटेल तुला. तू नको काळजी करू. आई, बाबा, वहिनी आणि भाचे आहेत बघ.”

सगळ्यांकडे डोळे भरून पाहिले. तिला पुन्हा ग्लानी आली.
रवीला थोडा विकनेस आला होता.
दुसऱ्या दिवशी अरुंधती ओवळणीचे ताट घेऊन आल्या.
“राधिका बघ रवी आला. तुझी ओवाळणी घेऊन.”
“काय झाले रवीला? तुम्ही त्याला स्ट्रेचर वर का आणले? रवी? रवी?”
“राधिका शांत हो! रवी ठीक आहे!”
“हो ताई मी बरा आहे. तू लवकर बरी हो.”

“हो! अरे पण तुला काय झाले? बोला ना काहीतरी? काय झाले माझ्या रवीला?”
“राधिका रवीने तुला आज खूप मोठी ओवाळणी दिली बाळा. त्याने तुला ओवळणीत आपली एक किडनी दिली.”
“काय?”
“हो राधिका!” अरुंधती राधिका जवळ गेल्या .तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“राधिका बघ रवीने तुझ्या राखीची आणि भाऊबीज दोन्हीची लाज राखली. कोण म्हणते रवी गरीब आहे?
त्याच्या एवढा श्रीमंत भाऊ नाही राधिका. बघ किती मोठे गिफ्ट दिले तुला. आज रवी मुळे तुला जीवदान मिळाले.
रवी तुझ्या या ओवळणीची परत फेड होऊच शकत नाही रे!”

राधिका रवीकडे अभिमानाने पाहत होती. आपल्या गरीब भावाचा तिला सार्थ अभिमान वाटला.
त्याने उशीखाली हात घातला ११ रुपये अरुंधती घेऊन आलेल्या ताटात टाकले.
राधिका साश्रू नयनांनी आपल्या मनाने श्रीमंत असलेल्या भावाला मनोमन ओवळत होती.
दोन्ही भाचे आपल्या ” मा ” ला जीवदान दिलेल्या “मामा” कडे डोळे भरून पाहात होते.
सुहास आणि त्याचे बाबा दोन्ही हात जोडून रवी पुढे उभे होते.
समाप्त
*********
© सौ. प्रभा निपाणे
सदर कथा लेखिका सौ. प्रभा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “ओवाळणी”

Leave a Comment

error: Content is protected !!