परीक्षा

© धनश्री दाबके 
‘मॅडम आल्या.. मॅडम आल्या’..वॉर्डबॉयने येऊन संगितले आणि आभाने सुटकेचा निश्वास टाकला.
कितीही हुशार आणि कॉंफिडंट असली तरी ह्या केसचं कालपासून आभाला प्रचंड दडपण आलं होतं. 
काल संध्याकाळी दिवस पूर्ण भरलेली रुपा डीलेव्हरीसाठी ॲडमिट झाली.
रूपा आधीच खूप टेंशनमधे होती आणि त्यात रचना मॅम नाहीत हे ऐकल्यावर तर ती अगदी गर्भगळीतच झाली. 
आता आपलं कसं होणार हा प्रश्न तिच्या आणि तिच्याबरोबर आलेल्या तिच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला.
रचना मॅम का येणार नाहीत हे कळल्यावर तर रूपा रडायलाच लागली. 

“मला रचना मॅंडमच वाचवू शकतात. आता माझं आणि माझ्या बाळाचं काय होणार??”  हा प्रश्न विचारून विचारून तिने आभाला हैराण केलं.
शेवटी सगळा सारासार विचार बाजूला ठेवून आभाने रचना मॅमना फोन केला आणि रूपाची अवस्था त्यांच्या कानावर घातली. 
इतक्या कठीण परिस्थितीतही रचनाने शांतपणे आभाचे म्हणणे ऐकून घेतले, तिला नेहमीप्रमाणे भराभर सूचना दिल्या आणि मी आहे तू काळजी करू नको म्हणून धीरही दिला. 
आभाला मनोमन रचनाचं खूप कौतुक वाटलं. इतका दुसऱ्याचा विचार करायला कसं जमतं मॅडमना?? मला तर उभ्या आयुष्यात नाही जमणार बाबा असं म्हणत आभाने डीलेव्हरीची तयारी करायला नर्सना सांगितलं आणि रूपालाही समजवायला सुरुवात केली. 

आज बरोब्बर दहावा दिवस होता रचनाचे आयुष्य होत्याचे नव्हते होऊन. आता कसं जगावं असा प्रश्न पडला होता तिला. पण जगावं तर लागणारच होतं. 
२६ वर्ष साथ दिलेला जीवाभावाचा जोडीदार तिला एकटीला मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. तेही कुठलीही पूर्वकल्पना न देता. लेकाकडे पुण्याला निघाला होता आणि वाटेतच ॲक्सिडेंटच्या निमित्ताने काळाने आपल डाव साधला होता. 
“निघतोय ग मी. अमोलकडे पोचलो की फोन करेन.” हे त्याचे शेवटचे शब्द रचनाच्या कानात घुमत होते. कारण तो निघाल्यावर काही तासांत जो फोन आला तो सगळं संपल्याचा सांगणारा अमोलचा फोन होता.  

प्रत्येकाला त्याची वेळ आल्यावर जावंच लागतं आणि मागे राहिलेल्यांना जगावंच लागतं. पण खरंच ते जगणं सोपं असतं?
आज विजय असता तर म्हणाला असता,  “ठरवलं ना की प्रत्येक गोष्ट सोपी असते रचना आणि तुझ्यासारख्या बुद्धीवान स्त्रीसाठी तर असतेच असते.” पण खरंच बुद्धीवान असले तरी जमेल मला विजय शिवाय एकटीने धीराने जगायला? 
सगळी जीवाभावाची जवळची माणसं भेटायला येत होती. लांबच्या नातेवाईकांचे चौकशीचे आणि सांत्वनाचे फोन येत होते. 

दोघी बहीणी येऊन सोबत राहील्या होत्या. घरातल्यांची काळजी घेत होत्या. दिवस कार्याची सगळी तयारी करत होत्या. बावीस वर्षांचा, वडलांच्या अचानक जाण्याने कोसळलेला, लेक आणि पंचाहत्तरीच्या, स्वतःच्या लेकाचा मृत्यू डोळ्यांनी बघणाऱ्या सासूबाई, या दोघांकडे बघून रचना कसंबसं स्वतःला सावरत होती.  
त्यात काल रात्री आभाचा फोन आल्यापासून तर रचनाची मनस्थिती अजूनच बिघडली होती.
आज विजयचा दहावा आणि आजच रूपाची प्रसूती. एका जीवाची या भवसागरातून सुटका तर दुसऱ्याचं आगमन. काय करावं हे रचनाला सुचत नव्हतं. जाणारा आणि येणारा दोन्ही जीव तिच्यासाठी तितकेच महत्वाचे होते. 

का रे देवा ही अशी जीवघेणी परीक्षा मांडली आहेस माझी? रचना विचारांच्या झंझावातात अडकली होती. आयुष्याचा सगळा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांसमोरून सरकत होता. 
नेव्हीचा डेकोरेटेड ऑफिसर होता विजय. त्यामुळे तिथली शिस्तबद्धता, धडाडीची निर्णयक्षमता आणि विचारातली क्लॅरिटी त्याच्या नसानसांत भिनलेली होती. सुरवातीला डॉक्टर शुभदा देसाईंकडे इंटर्नशीप करत असतांना शुभदा मॅडमचा भाचा म्हणून विजय आयुष्यात आला. आला आणि त्याने अख्ख आयुष्यच व्यापून टाकलं. 
आधी नुसता एक ओळखीचा समवयस्क, मग मित्र आणि नंतर जीवाभावाचा सखा झाला. तेव्हा जसा अचानक आयुष्यात आला तसाच आता २६ वर्षांनी निघूनही गेला. अचानकच.

नेव्हीबद्दल कसलीही माहिती नसलेल्या मला विजयमुळे एका नवीन जगाचं दार उघडलं. लग्नानंतर सुरवातीची काही वर्षं विजयचं जिथे कुठे पोस्टींग असेल तिथे मी त्याच्याबरोबर गेले. माझ्या करीअरला ब्रेक लावला. 
पण ‘रचना तू एक हुशार गायनॅक आहेस. तू तुझी स्वतःची प्रॅक्टीस सुरु केलीच पाहिजेस. माझ्या प्रायोरीटीजच वेगळ्या आहेत. माझ्या देशाचं रक्षण हेच माझ्यासाठी जगण्याचं कारण आहे ग. बाकी सगळं त्याच्यानंतर येतं माझ्यासाठी. जसं मी माझ्या नेव्हीसाठी जगतोय तसंच तूही तुझ्या धेय्यासाठी जगायला हवंस. जे इथे राहून शक्य होणार नाही. तू मुंबईला परत जा आणि तुझी स्वतःची प्रॅक्टीस सुरु कर. प्रत्येकाचा जगात येण्याचा एक उद्देश असतो व तो ज्याने त्याने आपापल्या मार्गाने जात पूर्ण करायलाच हवा. 

म्हणूनच तू तुझं इतकं कष्ट करून मिळवलेले शिक्षण असं माझ्याबरोबर फिरण्यात वाया घालवलेलं मला चालणार नाही. तू लवकर मनावर घे आणि पुढचे प्लॅन्स आखायला लाग.’ असं सतत बजावत विजयने माझ्या करीअरला आधाराचं भक्कम कोंदण दिलं व कालांतराने माझ्या यशाचा हिरा झगमगायला लागला. 
मुंबईला परत येऊन मी माझी प्रॅक्टीस सुरू केली. आधीच इतकी गॅप झालेली आणि त्यात अमोलची जबाबदारी वाढलेली. त्यामुळे आता परत प्रॅक्टीसला सुरुवात केली तर आपल्याला जमेल की नाही, वेळ देता येईल की नाही असं वाटत होतं. 
पण विजयची आई आणि शुभदा मॅडम दोघीही खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या. मी परत डॉक्टर शुभदांच्या दवाखान्यात काम करू लागले. 

मग काही वर्षांनी स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टीस सुरू केली. विजय, सासूबाई आणि कळायला लागल्यावर अमोलही,  सगळ्यांनीच नेहमी प्रोत्साहन दिले.  
बघता बघता जम बसत गेला. पेशंट्स वाढत गेल्या आणि एका छोट्या दवाखान्याचे आज एक अद्ययावत हॉस्पिटल उभं राहीलं. सगळे चांगले डॉक्टर्स जॉईन होत गेले. व्याप वाढला आणि टीमही. 
आभाही त्याच टीममधली एक अत्यंत हुशार आणि माझी विश्वासू असिस्टंट डॉक्टर. मी नसतांना सगळं अगदी उत्तम सांभाळते. तिच्या भरवशावर तर मी हॉस्पिटल सोडून दिलंय सध्या. 

पण काल तिने फोन केला की रूपा आलीये आणि तुम्ही नसल्याने खूप अपसेट झालीये. तेव्हापासून मीही बेचैन आहे. शेवटी निमित्तामात्र असले तरी येणाऱ्या जीवांचा जगात येतांनाचा मार्ग सुकर करणारी एक डॉक्टर आहे मी. त्यात ही रूपाची डीलेव्हरी म्हणजे सगळ्याच बाजूंनी अवघड केस. 
तिने रडून रडून आभाचाही कॉन्फिडंस हलवला असेल. तरी इतक्या दिवसांत कितीतरी वेळा समजावलंय ह्या रूपाला. तू खंबीर राहिलीस तरच माझ्या प्रयत्नांना यश येईल म्हणून. पण समोर असली की हो हो करते नुसती आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडली की परत ये रे माझ्या मागल्या. 

निराशेने ग्रासलेल्या व मनाने पूर्णपणे खचलेल्या या रूपाला दोन वर्षांपूर्वी मी मातृत्वाच्या आशेचा किरण दाखवला. आजही तो दिवस मला स्पष्ट आठवतो जेव्हा रूपाची आई तिला माझ्याकडे घेऊन आली होती. 
रूपाची पहिली दोन वेळेला लगेचच दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच मिसकॅरेजेस झालेली आणि तिसऱ्या वेळेला तर आठव्या महिन्यात बाळ पोटात गेलेले. 
त्या अनुभवातून स्वतःला सावरू न शकलेली रूपा मी कधीच आई होणार नाही हा विचार मनात पक्का रूतवून बसलेली. सततचे नैराश्य आणि बाळ गेल्याच्या दु:खात जगणे विसरलेल्या रूपाला ताण घेऊन घेऊन बीपी चा आजार जडला. 

रूपाचा नवरा जे झाले त्यातून तिला बाहेर काढायचे अतोनात प्रयत्न करत होता. खरंतर बाळ त्याचंही गेले होते पण तरीही स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून तो रूपाला सांभाळत होता. 
पण दु:खातून बाहेर येण्यापेक्षा रूपा दिवसेंदिवस अजूनच खचत चालली होती. त्यात घरातून सासू सासऱ्यांनी परत चान्स घेण्यासाठी ट्रीटमेंटचा तगादा लावला होता ज्याला रूपा अजिबात तयार नव्हती. 
ह्या अशा अवघड पार्श्वभूमीवर रूपाची आई तिला माझ्याकडे घेऊन आली. आणि तिच्यासाठी फक्त गायनॅक न राहाता मी तिची सायकोलॉजिस्ट सुद्धा झाले. तिच्या कलाकलाने घेत, तिला समजावत मी तिला मातृत्वाच्या जबाबदारीसाठी परत तयार केले. 

तिला दिवस गेल्यापासून डोळ्यात तेल घालून तिला जपले.
आज रूपाचे सुखरूपपणे भरलेले पूर्ण दिवस हे माझ्या हुशारीचे, इतक्या वर्षांच्या अनुभवाचे आणि रूपा व तिच्या कुटुंबियांच्या धैर्याचे, सहकार्याचे फलित आहे.
रूपा स्वतः मनाने थोडी तरी खंबीर असती तरी आभावर सगळं सोपवून मी शांत चित्ताने विजयच्या पिंडाला नमस्कार करू शकले असते. पण आता कसं करू? 
टेंशन घेतल्याने रूपाचं बीपी वाढून बसलं तर उगीच नसते कॉंप्लिकेशन्स होऊन बसायचे.

विचार कर करून रचनाचे डोके शिणले होते आणि डोळे अव्याहतपणे वाहात होते. 
हॉस्पिटलमधे लगेचच जाणेही आवश्यक होते आणि घरी थांबणेही. परत एकदा गेल्यावर किती वेळ लागेल याचाही काही भरवसा नव्हता. 
रचना सुन्नपणे बसून होती. समोर कालच डेव्हलप करून आणलेला विजयचा हसरा प्रसन्न फोटो होता. रचनाच्या मनात गोंधळाचे वादळ घोंघावत होते. 
अमोललाही विजय गेल्यापासून शांत अशी झोप लागलीच नव्हती. त्यात आज दहाव्यासाठी लवकर घाटावर जायचं होतं. त्यामुळे तो पहाटेच उठून रूम मधून बाहेर आला. बघतो तर रचना रडत बसलेली. 

आपल्या इतक्या खंबीर आईला असं रडतांना पाहून अमोलला गलबलून आलं. 
“आई, नको ना ग रडू. तूच अशी रडलीस तर मी आणि आजीने काय करायचं ग ” म्हणून अमोलही रडायला लागला. त्याच्या बोलण्याने जागा झालेल्या रचनाच्या सासूबाईही उठून आल्या. 
“आजच नेमकी एका अशा डीलेव्हरीची केस आहे ज्यासाठी मी आत्ता जाणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे विजयचा दहावा आणि  डीलेव्हरी यातलं एकच काहीतरी जमणार आहे” असं रचनाने म्हणताच दोघांना तिच्या इतक्या पराकोटीच्या अस्वस्थतेचे कारण समजले. दोन मिनिटे कोणी काहीच बोलले नाही. 

मग विजयच्या फोटोकडे पाहात सासूबाई म्हणाल्या ” आज विजय असता तर त्याला तुझं या अशा परिस्थितीत इतर कुठल्याही कारणामुळे हॉस्पिटलला न जाणं पटलं असतं का? नाही ना? मग आजही तो तुझ्यासोबतच आहे असा विचार कर आणि हॉस्पिटलला निघायची तयारी कर. मी आहे अमोलला सांभाळायला. अगं विजय काय नी तुझे सासरे काय, दोघांसाठी त्यांचे कर्तव्यच जीवापेक्षा जास्त महत्वाचे होते आणि विजयची बायको म्हणून तुझेही तसेच असायला हवे. गेलेल्या जीवापेक्षा एका येऊ घातलेल्या बाळाचा आणि होणाऱ्या आईचा जीव नक्कीच जास्त महत्वाचा. तेव्हा इतर कसलाही विचार न करता तू तुझं आटोप आणि निघ लगेच.” 

सासूबाईंनी दिलेल्या भक्कम आधारामुळे रचनाच्या मनातला सगळा गोंधळ क्षणात दूर झाला. तिने अमोलला ड्रायव्हरला फोन करायला सांगितला आणि ती कपडे बदलायला गेली. 
बेडरूम मधे समोरच्या भिंतीवर तिचा आणि विजयचा एक मोठ्ठा फोटो लावलेला होता ज्यात विजय त्याच्या पांढऱ्या शुभ्र कडक ड्रेसमधे होता आणि रचना विजयला आवडणाऱ्या लाल साडीत त्याच्याशेजारी उभी होती. 
दोघांचेही चेहरे परिपूर्ण आणि समाधानी सहजीवनाच्या आनंदाने उजळून निघाले होते.

विजयच्या हसऱ्या फोटोकडे पाहात रचनाने आत्ता फक्त ही एक अवघड केस आणि मी .. इतर काहीही नाही.. अगदी विजयसुद्धा नाही.. असा विचार करत स्वतःभोवती खंबीरतेची एक भक्कम भिंत उभारली आणि रचना हॉस्पिटलला जायला निघाली.
हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर रचनाने रूपाच्या फाईलवर आणि आभाने नोंद करून ठेवलेल्या आजच्या ऑब्झर्वेशन्सवर नजर टाकली आणि ॲप्रन बांधून ती लेबर रूममधे शिरली. आता ती फक्त आणि फक्त एक डॉक्टर होती आणि तिच्या मनातले विजयच्या वियोगाचे दु:ख तिच्यातल्या निष्णात गायनॅकॉलॉजिस्टवर मात करू शकणार नव्हते. 
एका बुद्धीमान, कर्तबगार आणि धाडसी स्त्रीने नियतीच्या इतर परीक्षांसारखीच ही परीक्षाही यशस्वीरित्या पार पाडली होती. 
समाप्त
© धनश्री दाबके 
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!