आधुनिक सासुरवास

© वर्षा पाचारणे
“कशी आहेस बाळा? सगळं ठीक आहे ना? काळजी वाटते बघ तुझी.. जीव तुटतो सारखा तुझा आवाज ऐकण्यासाठी.. रात्र रात्र झोप लागत नाही बघ”.. रोज ठरलेल्या वेळी एका लॅंडलाइन वरून येणाऱ्या नंबरवरून आलेला फोन उचलताच आईने मनातील घालमेल व्यक्त केली. 
आपण ‘हॅलो’ म्हणायच्या आधीच आईने मीच फोन केला आहे, हे कसं अचूक ओळखलं, या विचाराने श्रद्धाला देखील गहिवरून आलं. मनातल्या भावना आसवांच्या रूपात व्यक्त झाल्या. दोन्ही बाजूंनी अश्रू वर्षाव सुरू होता..

फोन बूथवरच्या काकांना देखील आता सवय झाली होती. ही मुलगी निदान वीस मिनिट तरी फोनवर बोलणार, हे माहित असल्याने त्यांनी तिला पलिकडच्या बाजूचा फोन वापरायला सांगितला.. म्हणजे इतर गिर्‍हाईकांना अलीकडच्या बाजूचे फोन वापरता येतील आणि तिला देखील मनमोकळेपणाने समोरच्या व्यक्ती बरोबर बोलता येईल.
‘कोणाशी बोलत असेल ही मुलगी रोज याच वेळेला? गळ्यात मंगळसूत्र दिसतंय, म्हणजे लग्न झालेली आहे’. रोज फोनवर बोलताना तिचे पाणावलेले डोळे पाहून काकांना देखील गहिवरून यायचं.काय कारण असेल? ‘काही त्रास असेल का हिला’… ‘कोणी छळ करत असेल का काही?’.. असे असंख्य प्रश्न काकांच्या मनात देखील काहूर माजवत होते..

ही फोन करणारी मुलगी म्हणजे श्रद्धा.. सामान्य पण सुशिक्षित कुटुंबात जन्मलेली श्रद्धा मूळची धडाडीची.. बडबड्या स्वभावाची श्रद्धा आपल्या बोलण्याने कुणाचेही मन जिंकून घ्यायची. 
श्रद्धाचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले आणि तिने एका छोट्याशा कंपनीत नोकरी करायला देखील सुरुवात केली. नोकरीला जेमतेम दोन महिने कुठे होत नाही, तर तिला लग्नासाठी एक स्थळ सांगून आलं. 
निम शहरी भागात राहणाऱ्या श्रद्धाला मुंबईसारख्या मोठ्या शहरातील स्थळ आलं होतं. आईबाबांच्या मनाची घालमेल वाढली आणि विचारांची कालवाकालव सुरू झाली. 

श्रद्धाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. ती तिच्या संसारात सुखी होती. तिचा मोठा भाऊ अखिलेश हा सरकारी नोकरीत होता. वडिलांनी देखील सरकारी नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली असल्याने ‘निवृत्तीचा पैसा या भावा बहिणीच्या लग्नासाठी वापरायचा’, असं त्यांनी ठरवलं होतं.. दोघांच्याही लग्नासाठी स्थळं बघण्याची सुरुवात केली होती.
एक दिवस असंच अखीलेशचा एक मित्र घरी आला आणि म्हणाला ,”आपल्या ताईसाठी माझ्या सासरच्या मंडळींमध्ये एक स्थळ आहे. मुलगा सरकारी नोकरीत आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. 
मुलाच्या बहिणींची लग्न झालीत, त्यामुळे घरी केवळ आई-वडील आणि हा मुलगा. तुम्ही म्हणत असाल तर उद्याच फोन करून आपण मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम करून घेऊ. स्थळ तसं उत्तम होतं. नावं ठेवायला कुठेच जागा नव्हती… त्यामुळे लगेच दोन दिवसांनी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला.

मुलाची उंची साधारण सहा फूट आणि श्रद्धा पाच फुट चार इंच.. मुलाकडच्या लोकांना घराचा पत्ता सापडत नसल्याने अखिलेश त्यांना मुख्य चौकात घ्यायला गेला. 
पाहुणे मंडळींना घरी घेऊन आल्यावर अखिलेश पटकन आपल्या खोलीत आला आणि म्हणाला “अवघड आहे.. मुलाकडची मंडळी खूपच हाय फाय वाटतात.. त्या मुलाची उंची पण जवळपास सहा फूट”.. अखिलेशने असे म्हणताच श्रद्धाने देखील मनातून मुलगा बघायच्या आधीच आशाच सोडून दिली.
मुलगी दाखविण्याच्या कार्यक्रमासाठी साधारणपणे आई-बाबांना अंदाजे पाच-सहा लोक येतील, असं वाटलं होतं. परंतु बाहेर मात्र वीसएक माणसांचा गोतावळा जमा झाला होता. आईने पहिलं घाईघाईने त्या लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. 

सासुबाई तर इतक्या मॉडर्न वाटल्या की जाताना श्रद्धाच्या हातात हात घेऊन “चल बाळा, बाय.. मी येते” असं म्हणून गेल्या, तेव्हा आपल्याला अगदी सुशिक्षित आणि मनमिळावू सासू भेटणार असे श्रद्धाला मनातून वाटून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मुलाकडच्यांचा होकार येताच मग मात्र आनंदाला उधाण आले.
साखरपुड्याची तारीख निश्चित केल्यावर श्रद्धाच्या आई-बाबांनी तयारीमध्ये कुठेही कमतरता पडू नये, यासाठी कंबर कसली. घर मोठं असल्याने अंगणात साखरपुडा करूयात, असा विचार वर पक्षाला बोलून दाखवताच ‘आमची लोकं खूप असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला एखादा हॉल बुक करावा लागेल’, असं कळवण्यात आले..

“मग त्यापेक्षा साखरपुडा आणि लग्न एकत्रच केलं तर नाही का चालणार?”, बाबांच्या या प्रश्नावर सासूबाईंनी लगेच हौसे मौजेचं कारण पुढे करत सांगितलं ,”आमच्या मोठ्या मुलाचे लग्न असल्याने, ते अगदी थाटामाटात झालं पाहिजे, अशी घरच्या सगळ्या मंडळींची इच्छा आहे. त्यामुळे लग्नात कुठेही कमतरता पडायला नको”.
श्रद्धाच्या बाबांनाही वाटलं ,’ठीक आहे. आपलं हे शेंडेफळ आहे, त्यामुळे थोडाफार खर्च इकडे तिकडे झाला तर त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही’. साखरपुड्यासाठी हॉल बुक करण्यात आला. 
साखरपुड्याला दोन भाज्या, वरण, भात मसाले भात, चटणी, कोशिंबीर, पापड, पुरी, गुलाबजाम असा साग्रसंगीत मेनू ठेवण्यात आला होता. जेवणाच्या पंगतींवर पंगती पडत होत्या. 

सगळा कार्यक्रम यथासांग पार पडल्यानंतर आता वरपक्षाची मंडळी पुन्हा घरी जायला निघाली. श्रद्धा आणि समीर एकमेकांबरोबर इशाऱ्याने बोलत होते. आता केवळ महिनाभराची वाट पाहायची होती. महिन्याभराने दोघेही लग्नबेडीत बांधले जाणार होते.
साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशीपासून दोघांचीही फोनाफोनी सुरू झाली. दोघेही एकमेकांशी तासन-तास गप्पा मारायचे. 
आई-बाबा गमतीने श्रद्धाला म्हणायचे देखील कि , “अगं, महिन्याभराने लग्न होणारच आहे. मग आता थोडी आमच्याशीही गप्पा मार”.. अखिलेश दादादेखील श्रद्धाची टिंगल करत म्हणायचा ,”लग्न झाल्यावर असं कोणी एकमेकांशी तासनतास गप्पा मारत नाही”.. 

त्यावर श्रद्धा लटक्या रागाने म्हणायची , “नाही बरं का, आम्ही लग्न झालं, तरीही त्यांच्या लंच टाइममध्ये ते मला फोन करुन असेच गप्पा मारतील”.. त्यावर अखीलेश दादा तिची खाल्ली उडवत म्हणायचा “अच्छा! म्हणजे तू त्यांना डबा देणार नाहीस आणि त्याबदल्यात गप्पा मारून त्यांचं पोट भरणार तर”… श्रद्धाचा लाजेने गोरामोरा झालेला चेहरा बघून घरातील सारे जण खळखळून हसायचे.
साखरपुड्यानंतर आठ दिवसांनी श्रद्धाच्या सासूबाईंचा फोन आला. लग्नाच्या बैठकीत ‘आम्हांला काही नको, म्हणणाऱ्या सासूबाईंनी ‘आम्ही आमच्या मुलीला अकरा तोळे सोनं घातलं आहे, तुम्ही देखील तुमच्या मुलीला अकरा तोळे सोनं घाला, असा फर्मान सोडलं.

‘अकरा तोळे?.. आम्हाला एवढे शक्य होणार नाही’,.. बाबांनी तिथल्या तिथे मत व्यक्त केलं. “अहो, मी कुठे म्हणते की आमच्या लेकाला चैन घाला, ब्रेसलेट घाला.. जे काही दागिने करायचे ते तुमच्या लेकीला घाला, भविष्यात त्यांनाच उपयोगी पडतील”. असे म्हणत सासूबाईंनी आपला मुद्दा पुढे रेटला.
नाही, हो करता-करता आता साखरपुडा झाल्यावर जास्त वादावादी नको म्हणत आई-बाबांनी दागिने केले. म्हणजे तसे आईने श्रद्धाच्या लग्नासाठी आधीच सहा-सात तोळ्याचे दागिने करून ठेवले होते. त्यात आणखी भर घालून आई बाबांनी अकरा तोळे पूर्ण केले. 

मग पुन्हा लग्नासाठी छान मंगल कार्यालयाचा शोध सुरू झाला. ‘आम्हाला मोठ्या गार्डनमध्ये लग्न करून हवे’, ही मागणी ऐकताच आता मात्र बाबांचं ब्लडप्रेशर वाढू लागलं. 
लग्नासाठी पाच हजार रुपये भरून बुक केलेले कार्यालय सासूबाईंनी रद्द करायला लावले. पाच हजार रुपये विनाकारण बुडले, कारण एकदा भरलेले पैसे पुन्हा मिळत नाहीत. आणि या साऱ्या अवाजवी अपेक्षा समीरच्या अपरोक्ष केल्या जात असल्याने त्याला याबाबत कसलीच कल्पना नसे. 
त्याच्यासमोर सासूबाई आदर्शतेचा बुरखा घालून वावरल्याने ,’आपली आई सुनेचे कोड कौतुक करते’, याने तो बिचारा सुखावून जायचा.

वधू पक्षापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या एका मोठ्या राजवाड्याप्रमाणे उभारलेल्या कार्यालयात लग्न सोहळा थाटामाटात पार पडला. 
लग्नात झालझेंडा म्हणून मुलीला सर्व संसारोपयोगी वस्तू देण्याची पद्धत असल्याने श्रद्धालाही तिच्या आई-बाबांनी सारं काही दिलं होतं. पण केवळ घेऊपासडा स्वभाव असलेल्या सासूबाईंना मात्र कुठलीच गोष्ट पटत नव्हती.
श्रद्धा आणि समीरचं लग्न झालं. पाठराखण म्हणून श्रद्धाची मोठी बहीण आणि आजीदेखील तिच्या बरोबर गेली.
देवदर्शन आणि इतर विधी आटोपल्यानंतर तिसऱ्या दिवशी अशाच सगळ्या महिला गप्पा मारत असताना श्रद्धाची मावस नणंद श्रद्धाच्या मोठ्या बहिणीला म्हणाली,” खरंतर मावशीला तुम्ही केलेले दागिने, लग्नात दिलेल्या वस्तू, लग्नातले जेवण यातली कुठलीच गोष्ट पसंत पडली नाही. तिला सगळं कसं जिथल्या तिथे लागतं”.

आधीच हळव्या असलेल्या श्रद्धाच्या बहिणीचे डोळे पाणावले. “खरं सांगू का ताई, माझ्या आई बाबांनी खूप कष्टाने हे इतकं सारं देऊ केलं आहे.. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.. आणि आवडले नाही असं म्हणण्यासारखं खरंच काही नव्हतं. कारण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू आई बाबा आणि श्रद्धा तिघांनीही अगदी शोधून, पारखून घेतली होती”.
हे ऐकताच मावस नणंदेने तोंड वाकडं करत पुन्हा एकदा सुनावलं.. ‘मला काय.. मी सांगायचं काम केलं.. ऐकायचं, नाही ऐकायचं हा तुमचा प्रश्न’. असं म्हणून ती निघून गेली.
बाजूलाच बसलेल्या श्रद्धाने ही गोष्ट ऐकताच तिला आपण लग्न करून मोठी चूक तर केली नाही ना, असंच वाटून गेलं. कारण आई-बाबांचे कष्ट, त्यांनी मोठ्या मुश्किलीने लग्नासाठी केलेला खर्च, हे सारे तिने पाहिलं होतं.

पाच परतवणीसाठी पहिल्यांदा श्रद्धा माहेरी येणार होती. ‘माहेराहून येताना शंभर पुरणपोळ्या घरी आणाव्या लागतील’, असा हुकूम पुन्हा एकदा सासरकडून सोडण्यात आला.. 
‘आमच्या इथे सगळ्या नातेवाईकांना बुथी वाटावी लागते आणि पहिली बुथी म्हणजे पुरणपोळ्याच असतात’, असं सांगून सासुबाई मोकळ्या झाल्या. 
श्रद्धाची आई, ताई, आजी या तिघींनी रात्रभर जागून शंभर पुरणपोळ्या बनवल्या.. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा ते सारं घेऊन सासरी पोहोचली. एवढं सारं केलेलं पाहून देखील सासूबाईंचा चेहरा मात्र वाकडा तो वाकडाच.

आता कुठे खर्‍या संसाराला सुरुवात झाली होती. समीर अतिशय शांत, सुस्वभावी होता. श्रद्धाची तो पुरेपूर काळजी घ्यायचा. ती कधीही दुखावली जाऊ नये असा त्यांचा प्रयत्न असायचा. पण आईच्या खाष्ट आणि एकछत्री कारभारापुढे जिथे सासरेबुवा सुद्धा ‘भिगी बिल्ली’ बनून राहत होते, तिथे समीरची काय गत. 
सासुबाई रोज नव्या सुनेबरोबर काही ना काही भांडण उकरून काढत होत्या. समीरने श्रद्धाची बाजू घेताच त्या त्याला धमकी द्यायच्या,” हे बघ समीर, एवढेच वाटत असेल, तर माझ्या घरातून आधी बाहेर व्हायचं.. माझ्या घरात ही असली नाटकं चालणार नाहीत.. इथं फक्त माझं म्हणणं चालेल”.. 

लग्न झाल्या झाल्या लगेच वेगळा संसार थाटणं शक्य नसल्याने शांत बसणं हा एकच पर्याय समीरकडे होता. श्रद्धाची मात्र घुसमट वाढत चालली होती.
श्रद्धाची आई शिकलेली असल्याने त्यामुळे सासूबाईंना मात्र एक वेगळाच न्यूनगंड येत होता. आपल्या मुलाने सासू-सासऱ्यांच्या संपर्कातच येऊ नये, यासाठी त्यांची अनेकदा धडपड चालू असायची. 
पण समजूतदार असलेला समीर आठवड्यातून एकदा तरी श्रद्धाच्या आई-बाबांना फोन करून त्यांची विचारपूस करायचा ही गोष्ट मात्र सासूबाईंना फार खटकत होती. खरं पाहता श्रद्धाची आई मनमिळावू, समजूतदार, शांत स्वभावी असल्याने तिने कधीही आपल्या शिक्षणाचा गर्व दाखवला नव्हता. 

पण मग विहीणबाई आपल्यापेक्षा जास्त शिकलेली, समाजात वावरणारी आहे, हा राग कसा काढायचा, या विचाराने एक दिवस सासुबाईंनी भांडणात श्रद्धाला फैलावर घेत सांगितलं, “तुझ्या आई बापाने माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही”. आता मात्र श्रद्धाला रडू कोसळले. 
आपल्या जन्मदात्या आई वडीलांना आपल्याला भेटता येणार नाही, या नुसत्या विचाराने देखील तिला कुठेतरी जाऊन जीव द्यावा, असं वाटून गेलं.. इतके दिवस शांततेने, निमूटपणे ऐकून घेणारी श्रद्धा आता मात्र चवताळली.. “आजवर तुम्ही म्हणाल, ते सगळं ऐकून घेतलं.. पण म्हणून मी माझ्या आई-वडिलांना भेटायचंच नाही, हा तुमचा निर्णय मला मान्य नाही”.

घरात कधीही आपल्याला कोणीही उलट उत्तर दिले नाही आणि आज कोण कुठली ही पोर आपल्यासमोर आवाज चढवून बोलते, या रागाने सासुबाईंने तिला धमकावलं.. “आजपासून माझ्याशी भाषा करशील तर याद राख”. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर संध्याकाळी श्रद्धाने स्वयंपाक करून देखील सासूबाईंनी वेगळे जेवण बनवले. 
सासरे बुवा आणि स्वतःला ते जेवण वाढून घेतलं. समीरने याबाबत विचारणा करताच श्रद्धाच्या नावाने उलट सुलट गोष्टी सांगायला सुरुवात केली. 

मग मात्र श्रद्धाने सकाळची हकीकत सांगताच समीरने श्रद्धाची बाजू घेताच ,”माझ्या घरात कुणी यायचे, कोणी जायचे हे मी ठरवणार. ही काल आलेली मुलगी मला अक्कल शिकवू पाहते. आणि तुला जर एवढाच पुळका असेल, तर दोघांनी माझ्या घरातून चालतं व्हायचं.. बाहेर पडल्यावर डाळ तांदळाचा भाव समजला, की मग तुमची अक्कल ठिकाणावर येईल”, असं म्हणत सासूबाईंनी जवळपास धमकी दिली.
नवा संसार थाटायला हरकत काहीच नव्हती, पण भाडे तत्वावर घर घेऊन त्यासाठी लागणारे डिपॉझिट, दर महिना भाडे भरणे जरी शक्य असले तरी लग्नात मिळालेली भांडी आणि इतर वस्तू अशा लगेच नेणं शक्य नव्हतं आणि एकदा तुटलेलं नातं सहज सांधणं शक्यच होणार नाही, हे समीर जाणून होता. 

आता सासूबाईंनी रोज वेगळ्या स्वयंपाकाचा घाट घालायला सुरुवात केली. स्वतः केलेला स्वयंपाक नवरा, मुलगा आणि स्वतःला वाढून घेताना त्यांना एक वेगळाच असुरी आनंद मिळत होता. 
समीरला आता दोघींच्या हातचं गरमागरम पौष्टिक जेवण ताटात मिळत होतं, परंतु मनात मात्र श्रद्धा बद्दलचे प्रेम आणि तिची होणारी घुसमट त्याच्या मानसिक अस्वस्थतेला कारणीभूत ठरत होती.
श्रद्धाला तिच्या आई-वडिलांशी संपर्क करतेवेळी समीर घरात असेल तेव्हा सकाळी किंवा रात्री ती त्याचा मोबाईल वापरायची. पण मग एक दिवस सासुबाईंनी सकाळी सकाळी त्या गोष्टीवरून वाद घालत भांडण उकरून काढलं. आता तर तिने आई-वडिलांशी बोलूही नये, असं नसतं बंधन त्या घालू पाहत होत्या. 

समीर सकाळी ऑफिसला निघाला असल्याने त्याच्यासमोर नसते वाद नकोत, म्हणून श्रद्धा शांत बसली.
दुपारी भाजी आणायच्या निमीत्ताने बाहेर पडल्यावर तिने चौकातलं एसटीडी बूथ गाठलं. आईला फोन करून तिने घडलेली हकीकत सांगितली. 
‘आपण श्रद्धाच्या लग्नाच्या बाबतीत निर्णय घेताना सपशेल चुकलो’, या विचाराने आईला गहिवरून आले.
सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या या कुटुंबात आपल्या लेकीचा इतका मानसिक छळ होतोय, हे पाहून आई-बाबांचा संताप अनावर होत होता. 
अखिलेशने श्रद्धाला अनेकदा विचारले देखील ,’तुला खूप त्रास होत असेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही.. आपण योग्य तो निर्णय घेऊ’ . पण श्रद्धाला मात्र समीरची मधल्यामध्ये होणारी कोंडी जाणवत होती.

या सगळ्या परिस्थितीत लग्नाला दोन वर्षे झाली. श्रद्धाची मुलगी आता एक वर्षाची झाली होती.
पण घरातली परिस्थिती मात्र जैसे थे होती. 
मग रोज संध्याकाळी बाळाला बागेत फिरवून आणायच्या निमित्ताने श्रद्धा बाहेर पडायची. एसटीडी बूथ मधून आई बाबांना फोन करून त्यांची चौकशी करायची. घरातील त्रास खूपच असह्य झाला, तरच ती आई-बाबांना बोलून दाखवायची. 
श्रद्धाच्या केवळ आवाजावरूनच ती अस्वस्थ आहे का, याची आई-बाबांना कल्पना यायची. एव्हाना एसटीडी बूथवाले काका देखील श्रद्धाला ओळखू लागले होते.

आज श्रद्धाचे आई-बाबा तिला भेटायला आले होते. सासूबाईंना आईबाबांनी नमस्कार म्हणत त्यांची चौकशी केली. पण सासुबाई मात्र ढिम्म. आईबाबा त्यांच्याशी बोलले, तरी त्या मात्र पेपरमध्ये डोकं खुपसून बसल्या. 
शेवटी आईबाबांना अगदीच तिथे बसणं अशक्य झालं. या अशा व्यक्तीबरोबर आपली लेक कशी राहत असेल, या विचारानेही काळीज तिळतिळ तुटत होतं. शेवटी आईबाबांनी श्रद्धाच्या डोक्यावर हात ठेवून ,’निघतो बाळा आम्ही’, असं म्हणत तिचा निरोप घेतला.
तितक्यात इतकावेळ शांत असलेल्या सासुबाई कडाडल्या. “आज माझ्या दारात पाऊल ठेवलंय, पण पुन्हा यायची हिंमत केली तर माझ्यासारखी वाईट बाई नाही”. “ज्या दिवशी लेकीचं लग्न लावून दिलं, त्याच दिवशी ती परकी झाली, हे लक्षात ठेवायचं”.

आता मात्र बाबांना रागाचा पारा सहन होत नव्हता. ते काही बोलणार इतक्यात श्रद्धाने त्यांना थांबवलं. ‘आई बाबा, तुम्ही या.. मी खंबीर आहे या साऱ्या परिस्थितीत लढण्यासाठी’, असं म्हणत इतका वेळ डोळ्याच्या कडा पाणावल्याले अश्रू आता रागाने उष्ण होऊन गालावरून ओघळत होते. 
आई-बाबा देखील तिथून निघाले खरे परंतु घरी जाण्याच्या संपूर्ण प्रवासात हे जोडपं आपल्या अश्रूंचा बांध रोखू शकत नव्हतं. ‘श्रद्धाला कायमचं माहेरी आणावं’, असा विचार मनात यायचा, परंतु तो विचार बोलून दाखवताच श्रद्धा मात्र म्हणायची ,”एका व्यक्तीसाठी मी माझा हक्काचा जोडीदार का गमावू? त्या एकछत्री कारभाराला कधीतरी अंत असेलच.. त्यासाठी मी माझा सौभाग्याचा खेळ का मांडू?”..

आपल्या लेकीच्या तोंडून असं समजूतदारपणाचं बोलणं ऐकताच समोर असलेल्या परिस्थितीचं दुःख मानू की समजूतदार लेक पोटी असल्याचा आनंद मानू, असं आई-बाबांना वाटून जायचं. 
आयुष्यभर मानाने जगलेल्या आपल्या आईवडिलांनी एखाद्या हेकेखोर व्यक्तीमुळे अपमानित होऊन जगावं, हे श्रद्धाला मुळीच सहन होत नव्हतं. त्यामुळे आई बाबा, यापुढे तुम्ही माझ्या घरी येऊ नका.. मीच तुमच्याकडे जमेल तसे येत जाईल”, असं श्रद्धा म्हणाली. 
पण जरी ती असं म्हणाली, तरी आई बापासाठी या सासुरवाशीण लेकीचं काळीज मात्र दर दिवसाला यातना सहन करत होतं. आईच्या कुशीत शिरून रडावं, प्रत्येक संकटात बाबांचा खंबीर आधार असलेला हात खांद्यावर असावा, असं वाटून मन दुःखाच्या लहरींवर हेलकावे घ्यायचं. 

या साऱ्यात शांत संयमी स्वभाव असलेल्या समीरला तिला अजिबात दोष द्यायचा नव्हता. कारण कुठल्याही परिस्थितीत समीरने तिला कधीही दुखावलं नव्हतं. गपचूप का होईना तिचे सारे हट्ट, लाड तो पुरवत होता.
कधीकधी दिवसभरातल्या घडामोडी श्रद्धाने सांगताच समीरचे डोळे पाणावायचे. मग श्रद्धाला शांत करत, काहीतरी बोलून तो वातावरण हलकंफुलकं करायचा प्रयत्न करायचा. पण आतून मात्र दर दिवसाला तोही तितकाच तीळ तीळ तुटत होता. 
एकीकडे आई आणि दुसरीकडे बायको. दोघींपैकी एकीची बाजू घेतली की दुसरी दुखावणार होती. श्रद्धाची बाजू कितीही खरी असली, तरीही मोठ्यांबद्दलचा आदर म्हणून तो आईला कधीही काहीच बोलू शकत नव्हता आणि त्याच्या याच शांत स्वभावाचा आईने फायदा घेतला होता.

आई बाबांबरोबर बोलायचं असल्यास आता समीरचा मोबाईल न वापरता श्रद्धा दर दोन-तीन दिवसांनी एसटीडी बूथ मध्ये जाऊन फोन वरून घरच्यांची विचारपूस करायची. श्रद्धाच्या चेहऱ्यावरची काळजी कधीकधी इतकी स्पष्ट दिसायची, की आज ही मुलगी अस्वस्थ आहे हे काकांना देखील कळायचं..
परंतु असं दुकानात येणार्‍या कुठल्याही व्यक्तीला त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारू शकत नसल्याने ते मनातला विचार मनातच ठेवायचे. आपल्या आई-बाबांना भेटण्यासाठी केलेल्या बंदीमुळे हळवी झालेली श्रद्धा आपल्या लेकीचं कोडकौतुक आई-बाबांना फोनवरून कळवायची. 
कधी वीस-पंचवीस मिनिटे बोलणारी श्रद्धा आज मात्र केवळ दोन मिनिटं फोनवर बोलल्यने काकांनी नकळतपणे तिला विचारलं ,”काय ताई आज दोन मिनिटातच झालं तुझं काम”.. 

‘हो काका’, असं म्हणत श्रद्धा तिथून निघणार तोच काकांनी तिला विचारलं माहेर कुठलं बाळा तुझं. श्रद्धाने ‘लोणावळ्याच्या जवळच आहे’, एवढेच उत्तर देऊन त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे काका देखील पुढे काही न बोलता पेपर वाचण्यात मग्न झाले
आता स्वयंपाकाबरोबर घरातील साबण, तेल, पावडर असा सामान ही वेगवेगळे होऊ लागलं होतं. श्रद्धा घराबाहेर पडली की तिचं कपाट उघडून बघण्याची सवय सासूबाईंना लागली होती. आता मात्र दिवसागणिक वाढणारा हा मानसिक छळ वाढत असल्याने समीरने देखील वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.
‘वेगळा राहिलास तर माझ्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडायचे’, अशी आईने त्याला धमकी दिलेली असूनही त्याला मात्र या साऱ्या परिस्थितीचा विट आल्याने शेवटी त्याला निर्णय घ्यावा लागला. एका जवळच्या मित्राच्या फ्लॅटमध्ये श्रद्धा आणि समीर आता भाडेतत्त्वावर राहू लागले.

पण त्या दिवसापासून सासू सासऱ्यांनी श्रद्धा बरोबर थोडेफार टिकून असलेले संबंधही तोडून टाकले. पण लेकाला आपल्या बाजूने कसा वळवून घेता येईल, या विचाराने काही ना काही कारण काढून रोज ते त्याला स्वतःकडे घरी बोलावत होते. त्यामुळे वेगळे राहुनही श्रद्धा आणि समीरला मात्र एकमेकांसाठी वेळ देता येत नव्हता. 
कधी आईची तब्येत बरी नाहीये म्हणून, कधी बँकेची कामं आहेत म्हणून, तर कधी अन्य काही.. असं म्हणत समीरची प्रत्येक सुट्टी आई बाबांसोबत जात होती.. तसेच केवळ सुट्टीच नव्हे तर संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर घरी येण्याच्या रस्त्यावरच पहिले आई बाबांचे घर असल्याने समीरचा अर्धाअधिक वेळ तिथे जात होता.. 

पण श्रद्धा मात्र फार समजूतदार होती. उगाच कुठल्याही गोष्टीवरून ती समीरच्या मागे भुणभुण करणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेत होती.
आज श्रद्धा आणि समीरचा संसार सुखात सुरू आहे. श्रद्धा आणि समीरच्या लग्नाला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. कालांतराने माणसाचा स्वभाव बदलतो, त्याप्रमाणे काही वर्षांनी सासू सासऱ्यांनी श्रद्धाबरोबर पुन्हा एकदा बोलणं सुरू केल. 
पण लग्न ठरल्यापासून प्रत्येक गोष्टीत स्वतःचा हेका मिरवण्यासाठी झालेली तिच्या आई-बाबांच्या आर्थिक परिस्थितीची गळचेपी, मानसिक खच्चीकरण, सतत एखाद्या आश्रिताप्रमाणे दिलेली वागणूक, प्रत्येक वेळेस मुलगा आणि सुनेला एकमेकांपासून वेगळे करण्याचा केलेला प्रयत्न, आणि या साऱ्यामुळे श्रद्धाला झालेला मनस्ताप आयुष्यात कधीही न भरून येणारा आहे.

या साऱ्या प्रवासात एसटीडी बूथ मधून फोनवरून अगदी काही मिनिटांसाठी झालेला आई बाबांबरोबरचा संवाद मात्र तिच्या आयुष्यातलं सुखावणारं गोड गुपित आहे. ज्याने या साऱ्या त्रासदायक प्रवासात तिला दोन घटकांचा का होईना, पण आपलेपणा मिळत होता. आज घरोघरी प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतोच असतो, पण काही वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईलचं प्रस्थ इतकं मोठ्या प्रमाणात वाढलेलं नव्हतं, त्यावेळी मात्र त्या एसटीडी बूथ मधून केलेल्या फोनला आजही तिच्या आयुष्यात मात्र अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
जोडीदारापासूनही काही कारणास्तव लपवावं लागलेलं हे गुपित आजही तिच्या मनात एक गुपित बनूनच राहिल आहे.


‘वाचकहो, काळ जरी कितीही बदलला, तरीही आजही अनेक घरांमध्ये जगासमोर सासुरवास न दिसता देखील सुनेला होणारा अशा प्रकारचा मानसिक छळ संपलेला नाही. अशा परिस्थितीमुळे अनेकदा घटस्फोट, आत्महत्या यासारखी पावलं उचलली जातात. सासुरवास करून देखील ‘सुनेने कसं घर तोडलं’, याबद्दल सुनेच्या बदनामीचा सगळीकडे बोभाटा केला जातो. त्यामुळे वृद्धांना आपुलकी आणि सुनेच्या पारड्यात मात्र अनेकदा बदनामी वाढत जाते. अशा या आधुनिक सासुरवासला कुठे ना कुठेतरी चाप बसावा, एवढीच काय ती अपेक्षा.
© वर्षा पाचारणे
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

1 thought on “आधुनिक सासुरवास”

Leave a Comment

error: Content is protected !!