© सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
अंजली गरीब घरातली एक मुलगी, वडिलांचा अत्यंत कमी पगार, आई सतत दम्याने आजारी, लहान चार बहिणी, अंजली सर्वात मोठी मुलगी. आई आजारी त्यामुळे कमी वयातच अंजलीवर बहिणींची काळजी घ्यायची जबाबदारी आली होती.
एकोणीसाव्या वर्षीच वडिलांनी तीचं लग्न ठरवलं, तिला पुढे खूप शिकायचं होतं पण तीचं ऐकणारं कोणीच नव्हतं.
सासरी आली आणि घरकामात शिक्षण बाजूलाच राहीलं.
अंजली दिसायला खूप सुंदर होती. त्यामुळे हुंडा नं घेणार सासर मिळालं.
मुलीचं चांगल झालं, पोरीने नशीब काढलं असं सगळे घरचे म्हणाले.
पण म्हणतात ना ज्याच्या साथीने पुढे जायचं ठरवून ती ह्या घरात आली होती तो तिचा नवरा ( अशोक ) अतिशय तापट आणि रागीट होता. घरातले सगळे त्याला घाबरत असत. त्यात आता अंजलीचाही समावेश झाला.
सतत चिडत राहणे, कायम तिरसटासारखे बोलणे, त्यात सतत पैश्याच्या मागे धावणे ह्या त्याच्या सवयी होत्या.
लग्न झाल्यानंतरचे सुरवातीच्या दिवसांत अंजलीला सतत वाटे, ह्याने माझ्याबरोबर गप्पा माराव्यात, दोघांनी एकमेकाला समजून घ्यावे, पण अशोक ला त्याचं काहीच नसे. त्याच्या दृष्टीने त्याची बायको म्हणजे हक्काची एक गुलाम होती. जी त्याने हाक मारली कि पुढच्या मिनिटाला त्याच्या समोर हजर राहील.
अंजलीला आता स्वत:च्या भावना दाबून ठेवण्याची सवय लागली. नवर्याच्या मनासारखं कितीहि केलं तरी तो कायम मी कोणीतरी खूप मोठा आहे ह्याच आविर्भावात असे. ह्या वेळी तो खुश तर पुढच्या पाचव्या मिनटाला तो संतापे.
त्याचं वागणं अचंबित करणार असे. असेच दिवस जात होते.
अंजली त्याला खूप घाबरून राहत असे.
माहेरी जास्त जायचं नाही अशी त्याची ताकीद होती त्यामुळे ती गप्प गप्प असे आणि तिथे जावून तरी ती कोणाला आपलं दुखणं सांगणार होती ! आई आजारी, बहिणी लहान होत्या. ती अशीच कुढत दिवस काढू लागली.
लग्नानंतर दोन वर्षांनी बाळाची चाहूल लागली. ती खूप खुश झाली. पण अशोक मुलगाचं होईल असचं सतत म्हणे.
अंजली मनात म्हणे मुलगी झाली तर काय होईल काय माहित?
अंजलीला डिलिव्हरीला माहेरी पाठवणार नाही. तिथे कोणी करणार नाही हे अशोकने आधीच सांगून ठेवलं होत.
त्यामुळे अंजली गरोदरपणात सासरीचं राहिली. पण सासू चांगली होती. अंजलीची काळजी घेत होती.
नऊ महिने झाल्यावर अंजली ने मुलीला जन्म दिला.
मुलीला पाहण्यासाठी अशोक हॉस्पिटलला आला.
मुलगी खूप सुंदर होती. अंजल ने त्याच्याकडे बघितलं आणि तिचा सगळा आनंद हरवला.
“मुलगीच झाली तुला ! तुझ्या माहेरी जशी मुलींची रांग आहे तशी आता इथे लावू नकोस म्हणजे झालंं” असं अशोक बोलला. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं.
“आधीच आईने गरिबाघरच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं, आता त्यात तू मुलीलाच जन्म देवून अजून त्रास देते आहेस” असं अशोक बोलला.
हे ऐकताच अंजली म्हणाली, “अहो त्यात माझा काय दोष ??”
अशोक तिच्या ह्या वाक्याने चिडला. “एकतर मुलीला जन्म दिलास आणि वर उलटून बोलतेस?” असं रागारागाने बोलत तो हॉस्पिटल मधून निघून गेला.
नंतर त्या चार दिवसात तो एकदाही हॉस्पिटलला आला नाही, सासूच असे सतत हॉस्पिटलमध्ये तिच्याबरोबर..
बाळ झाल्यानंतर सतत अशोकचं हे तिरसट वागणं , पदोपदी तिचा अपमान , सतत अवहेलना झेलत दिवसेंदिवस तीचं सौंदर्य ढासळत चाललं होत.
ती दुःख झेलत निर्जीवपणे जीवन जगू लागली.
घरची गृहिणी म्हणून सर्व कर्तव्य व्यवस्तीत पार पाडत होती. कालांतराने दोन्ही दिरांची लग्न झाली.
सासरे वारल्यावर सासूही खचली. कमी बोलू लागली. आजारी पडू लागली. अशोक च्या ह्या विचित्र स्वभावामुळे दिरांनी ते घर सोडून स्वत:ची वेगळी घरं केली. दोन नंबरचा दीर सासूलाही त्याच्याकडे राहायला घेवून गेला.
आता घरी अंजली, अशोक आणि त्यांची मुलगी ( रुपाली ) असे तिघेच घरी उरले.
अशोक अजूनच फोफावला, घरी ओरडणारं कोणीच मोठं नाही बघून जास्तीत जास्त बाहेर मित्रांबरोबर राहू लागला.
घरचे सर्वच निघून गेल्यावर अशोक अजूनच कामात बिझी राहू लागला. त्याची पैसे कमावण्याची लालसा अजूनच वाढली. कितीतरी वेळा रात्री तो घरीही येत नसे, त्याच्या रागामुळे त्याला काही विचारण्याची सोय नव्हती.. घरी आपली पत्नी आणि मुलगी आहे याचा विचारचं तो करत नसे.
अंजली खूप दुखी असे, पण हळूहळू ती परिस्थितीशी जुळवून घ्यायला लागली. तिने आपलं विश्व मुलीपुरतंच मर्यादित ठेवलं.
पहिल्या मुलीच्या जन्मानंतर सात वर्ष झाली तरी अंजली पुन्हा गरोदर राहीना हे बघून अशोक अजूनच तिच्यापासून दूर दूर राहू लागला. दारू पिवून रोज तिला त्रास देवू लागला.
अशोकच्या मते बायको म्हणजे उपभोगाची वस्तू.
रात्री अंजलीला जरा झोप लागली कि अशोक उशिरा दारू पिवून घरी येत असे, झोप लागतेच आहे तो पर्यंत दारूच्या नशेत तो तिच्यावर जबरदस्ती करे, तिला ते सगळ अगदी नकोसंच वाटे.
‘पण कोणाला सांगणार?’ असा तीला प्रश्न पडे. त्याची हक्काची गुलाम आहे अंजली असं तो तिला वागवत असे.
अंजलीच्या माहेरची माणसं तिच्या परीस्थितीचं, वैभवाचं कौतुक करत. “तीचं नशीब किती चांगलं आहे , घरी सगळं वैभव आहे, “ अशी सगळी माहेरची मंडळी म्हणत असत.
त्यांना सांगायचं तरी काय… मुलीचं ऐश्वर्य पाहून माहेरी सगळेच खुश होते, त्यांना हि परिस्थिती सांगून नाराज तरी कसं करायचं, त्यांना कशाला त्रास द्यायचा असं तीला वाटे.
कधीतरी अशोक ला उपरती होईल, तो चांगलं वागेल यावर तिचा विश्वास होता.
ती त्याला खूप समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. पण अशोक तिच्यावरच सतत संतापे तिला नाही नाही ते बोलून अपमानित करत असे. तिला खूप कमी लेखत असे. त्याच्या दृष्टीने ती कमी शिकलेली आणि चार चौघात उठून दिसणारी नव्हती.
असेच दिवस जात होते. लग्नाला दहा वर्ष होत आली होती.
अशोकने त्याला प्रमोशन मिळाले म्हणून घरी एक दिवस पार्टी ठेवली होती.
अशोक ला प्रमोशन मिळाल्यामुळे त्याला आता अधून मधून परेदेशी जावे लागणार होते.
अंजलीने मनात म्हंटले कि नशीब मला निदान तेवढी तरी ह्याच्या स्वभावापासून, ह्याच्या त्रासापासून सुटका मिळेल…
अशोकचे सगळे मित्र पार्टीसाठी घरी आले होते. त्यातलाच एक मित्र ( जयंत ) अगदी दिलखुलास स्वभावाचा होता. पार्टीच्या वेळी त्याची आणि अंजली ची ओळख झाली.
तीचं ते सतत गप्प गप्प राहणं, अशोकचं तिच्याबरोबर फटकून वागणं हे सगळं जयंत ने बरोबर जाणलं.
अशोक आताशा परेदेशी सतत जावू लागला होता आणि तो कधी जातोय, कधी येतोय हे जयंतला माहित असे.
जयंत अशोक गेल्यावर घरी येवू लागला.
रुपाली बरोबर खेळू लागला. त्याचा तो खेळकर, मस्करी करणारा स्वभाव अंजलीला आवडू लागला.
अंजलीच्या मनातलं टोचणारं दुख: त्याने बरोबर ओळखलं होतं. त्याच्यामुळे अंजली हसू लागली. त्याचा सहवास तिला आवडू लागला. त्याच ते विनोदी बोलणं तिला हसवत असे.
अंजली ने एकदा त्याला सहज म्हंटल, “तुझा इरादा काय आहे रे! मी अशी सहज तुझ्या जाळ्यात फसू शकत नाही हा.”
जयंत हसला आणि म्हणाला, “तू का त्या अशोक पुढे अशी शरण जातेस? तुझं शिक्षण कमी आहे म्हणून आणि तुझ्याकडे पैसे नाहीत किंवा ते तू कमवू शकत नाहीस असे तुला वाटते का? अशोकवर तुम्ही दोघी मायलेकी डिपेंड आहात. तो घरातला एकमेव कमावता पुरुष आहे.. …म्हणून ना? मग लढ कि त्याच्याबरोबर बिनधास्त , का सतत अशी घाबरून राहतेस?”
अंजलीला पटकन आठवलं, महिनाभरापूर्वी तिला खूप बरं वाटत नव्हतं. तिला प्रचंड विकनेस होता. एवढा कि तिला उठायला पण त्रास होत होता. आणि अशोक तिला त्याच अवस्थेत सोडून परेदेशी निघून गेला.
या घटनेनंतर तिचा अशोकवरचा विश्वास अजूनच कमी झाला.
संसार बिघडू नये म्हणून तिने ह्या दहा वर्षात खूप प्रयत्न केले होते पण अशोक कायमच पैश्याच्या मागे धावत राहिला. तिला पुरतील किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे तो आता घरात तिच्याकडे देवून जावू लागला. अशोकच्या दृष्टीने प्रेम ,आत्मीयता हे सगळचं पैश्यापुढे निरर्थक होतं. अंजली रडू लागली.
त्यावर जयंत म्हणाला,” मी एखादया स्त्रीला अशी रडताना बघू शकत नाही.”
जयंत सांगू लागला,”मला तीन बहिणी आहेत. त्यातल्या मोठ्या बहिणीला मी असं तुझ्यासारखं हतबल बघितलं आहे. तिच्या नवर्याच्या विचित्र स्वभावामुळे आम्ही तिला लग्नानंतर पाच वर्षांनी घटस्पोट घ्यायला लावला. ती आता आमच्याकडे असते. माझ्या मते स्त्री पुरुषाच्या जीवनाचा आधार आहे, आणि तू आधीच त्या अशोकच्या जाळ्यात अडकलेली असताना मी तुला का फसवू! तू काहीच वेगळा विचार करू नकोसं माझ्याबद्दल…..मित्र म्हणूनचं बघ नेहमी माझ्याकडे.”
अशोक आता सतत परदेशी जावू लागला होता. आणि त्यामुळे जयंत आणि अंजली ची मैत्री वाढत होती. पण तिला आपला संसार मोडायची अजिबात इच्छा नव्हती.
अंजली आणि जयंत आता वारंवार भेटू लागले. जयंत बरोबर बोलल्यावर अंजलीला आता बरं वाटत असे. अंजलीला मनातून खूप वाटत असे कि हे जी मी जयंत बरोबर शॉपिंगला जातेय त्या ठिकाणी अशोक हवा होता. मला हे सर्व सुख: त्याच्याकडून हवे होते. अशोकला ती हे सर्व सांगायला जरी गेली तरी त्याचं वेगळच असे, त्याच्या मते एवढं मोठं घर आहे , सगळ्या सुखसोयी आहेत अजून काय हवे असते एका स्त्रीला हे त्याच उत्तर असे.
अंजली म्हणे,”मला ह्या सगळ्यापेक्षा तुमचा सहवास , आणि प्रेम हवे आहे.”
हे असं बोललं कि अशोक संतापून बोले, “मी तुझ्याजवळ बसून राहून माझं काम कोण करेल? मला नोकरी आहे माझी अंजली”
असं काही बोलली कि अशोक हा वाद अगदी तू कशी लायकीची नाहीस चारचौघात नेण्यासाठी इथपासून तुला मुलगीच झाली इथपर्यंत वाढवे.
तिला शेवटी वाटे वैवाहिक सुख: कदाचित माझ्या पत्रिकेतच नसेल पण मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करूनही हा माणूस जुळवून घेवू इच्छितच नाही. तिने एकदा त्याला बोलून बघितलं कि “मी माझं मन रमवण्यासाठी एखादा व्यवसाय करू का?”
.हे मात्र अशोकला पटले, कारण नफा घरात येणार होता ना.
अंजलीने वर्षभरात केक, पाव- ब्रेंड, बिस्किट्स असे सगळे बेकरी प्रॉडक्ट कसे बनवतात त्याचे प्रशिक्षण घेतले.ती त्यात अगदी माहीर झाली आणि मग तिने एक दुकान भाड्याने घेवून त्यात तिचा हा नवीन बिझनेस चालू केला. आता ह्यातून बर्यापैकी पैसे येवू लागले होते म्हणून मग अंजली पैसे साठवू लागली.
ह्या व्यवसायाला दोन वर्ष झाल्यावर अंजली ने अशोक ला म्हंटले कि मी एक निर्णय घेतला आहे. मी माझ्या कमाईतला चाळीस टक्के हिस्सा एका अनाथ मुलांच्या संस्थेसाठी दर महिन्याला द्यायचा असे ठरवले आहे.
अशोक चिडला कशाला काही गरज नाही आहे अस बोलू लागला. अंजली बरोबर त्याच खूप मोठं भांडण झालं. अंजली तिच्या मुद्द्यावर ठाम राहिली. त्यांनतर अशोक अजूनच तिच्याशी बोलेनासा झाला..
मध्ये एक महिना गेला आणि अशोक एक दिवस म्हणाला, “मी कायमच परेदेशी शिफ्ट व्हायचं ठरवलं आहे, माझा सगळा बिजनेस तिकडेच तर आहे.”
त्याच्याकडे बघत अंजली म्हणाली, “अहो असा अचानक कसा निर्णय घेतलात तुम्ही …..माझं आणि रुपालीचं काय?”
अशोक बोलला, “मी तुम्हाला दोघींना तिकडे नेवू शकत नाही , तुम्ही इथेच राहा, मी पैसे पाठवेन तिकडून …. आणि काही अगदीच इमेर्जेन्सी आली तर जयंत आहे मदतीला …मी सहा महिन्याआड एखादी फेरी मारेन.”
अंजली “हो बरंं” एवढंच बोलू शकली.
अशोक गेल्यावर अंजली ला थोडे दिवस कसंतरीच वाटलं. पण त्याची कडक शिस्त, त्याचा रागीट स्वभाव, त्याचे ते कायमच टोचेल असं बोलणे, वागणे ह्याच्यातून ती आता कायमची मोकळी झाली होती. पण तरीही तिला राहून राहून मनात वाटे कि अशोक असा अचानक तिकडे शिफ्ट कसा काय झाला… त्याने ह्यावेळी तिकडे गेल्यावर दोन तीन महिने झाले फोनच केला नाही… अंजलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
असेच दिवस जात होते. अशोक गेलेल्याला वर्ष होत आलं होतंं. तो वर्षभरात इकडे फिरकलाच नव्हता. एक दिवस जयंत सकाळीच घरी आला अंजलीकडे बघून बोलला, “मी आज एक बातमी सांगायला आलो आहे. अशोकने तिकडे त्याच्या कलीग बरोबर लग्न करायचं ठरवलं आहे.”
अंजलीच्या डोळ्यात अश्रू आले. ती बोलली, “तेव्हाच तो वर्षभरात इकडे अजिबात आला नाही.”
तिने नकळत जयंत च्या खांद्यावर डोक ठेवलं आणि ती रडू लागली.
जयंत बोलू लागला, “स्त्रीला कायमच प्रेम हवे असते. अशोकला हे कधी कळालेच नाही. आता तू त्या अनाथआश्रमात पाहिजे ती मदत कर. तुला पहिजे तेव्हा तू तिथे जात जा आणि माझी काही मदत हवी असेल तर तास सांग.”
अंजली आनंदित झाली. अंजली आता अनाथ मुलांसाठी काम करू लागली. त्यांच्या एनजीओला सामील झाली. असाच काळ जात होता.
अंजली ची मुलगी रुपाली आता वयात आली होती. तिला विसावे वर्ष लागले होते.
एके दिवशी जयंत घरी आला होता, त्याला बघताच रुपाली ने रागाचा कटाक्ष टाकला. जयंत जास्त करून रुपाली शाळेत असली कि अंजली बरोबर गप्पा मारायला येत असे. जयंत बद्दल आजतागायत मायलेकींच काहीच बोलणं झाले नव्ह्ते.
अशोक तीन वर्ष झाले घरी आला नव्हता, हल्ली त्याला का कोण जाणो पण रुपाली बद्दल आस्था वाटत असे त्यामुळे तो रुपालीशी बोलण्यासाठी फोन करत असे. पण आईला फोन दे असं तिला कधीही सांगत नसे.
रूपालीला हि आपले वडील चांगले आहेत, माझी चौकशी करतात, तिथून कुरिअर ने छान छान वस्तू पाठवतात असे वाटत असे. रुपालीने कधी येणार आहात हे विचारलं कि तो तिकडून लवकरच येतो असं नेहमी बोलत असे.
एके दिवशी अंजलीच्या वाढदिवसाच्या दिवशी जयंतने तिला बाहेर जेवायला नेले. आणि तिथे पोचल्यावर बोलला, “अंजली आज मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. माझा एका मुलीबरोबर साखरपुडा झाला होता, पण लग्नाला चार दिवस बाकी असताना ती दुसर्या कोणाबरोबर तरी पळून गेली. पत्रिका वाटून झाल्या होत्या, सगळी लग्नाची तयारी झाली होती. आणि मग हे असं झाल्यावर मी खूप खचून गेलो होतो. मला पुन्हा लग्न करायची भीती वाटू लागली. मी नंतर स्थळ बघणे च बंद केलंं.
त्यानंतर हळू हळू वय वाढत गेलं. मग मुली मिळणे कठीण झाले. मग मी म्हंटलं लग्नच नको करूया. या कारणामुळे मी अजूनही अविवाहित आहे. आणि मग तू भेटल्यावर वाटलं, अशी असावी आपली सहचारिणी. अशी सर्वाना सांभाळून घेणारी, दुसर्यांची मनं जपणारी बायको मला हवी होती. अंजली मला तुझ्याबरोबर आयुष्य घालवावे असं वाटतंय, माझी जोडीदार होशील का? मी तुला लग्नासाठी विचारतोय.”
जयंतच्या अशा बोलण्यावर अंजली अचंबित झाली आणि बोलू लागली, “अजून माझा अशोक बरोबर घटस्फोट झालेला नाही आणि रुपालीला आपले वडील परदेशी असतात हे माहिती आहे तिला काय वाटेल? मला तुझी जोडीदार व्हायला आवडेल खरंतर. पण मला रूपालीला विचारावे लागेल. असं काही मी केलं तर तिला काय वाटेल?”
जयंत बोलला, “रुपाली माझा वडील म्हणून स्वीकार करणार असेल आणि तुला हरकत नसेल तर आपण घटस्फोटाचा अर्ज करू मग.” अंजली हसून हो बोलली.
जयंत तिला गाडीने घरी सोडून गेला.
अंजली रडू लागली, ती विचार करू लागली. काय करावे. माझं सुख, आनंद शोधावा कि रुपाली चे भविष्य?
अशोक तर सगळ सोडून कसलाही विचार न करता सर्व सोडून गेला आणि मी इथे एवढे वर्ष हळहळत बसली आहे. पण घरात तारुण्यात प्रवेश करणारी मुलगी आहे आणि मी ह्यावेळी हा असा निर्णय घेणे योग्य होईल का?
समाजाच्या दृष्टीने ती एक संसारी बाई होती , जीचा नवरा परदेशी असतो, त्याच दुसरं लग्न झाले आहे हे फक्त तीला आणि जयंतलाच माहिती होते. तिच्या माहेरी सारखी आई म्हणत असे तुझ्यासारखं सासर सर्वाना मिळो. पैसा आणि संपत्ती हेच सर्व काही नसत हे तिच्या माहेरी ती कशी सांगणार होती?
ती विचार करत राहिली आणि मनोमन म्हणाली रुपालीला सांगायला हवे की तुझ्या वडिलांनी तिकडे दुसरं लग्न केल आहे आणि मग जयंत च्या प्रस्तावाबद्दल पण बोलेन.
रुपाली पण तिच्या वडिलांच्या स्वभावावर गेली होती. तिला अहंपणा खूप होता. हेकेखोर होती…..अंजली विचार करत बसली कि कधीतरी तीला हे कळायलाचं हवे. दुसर्या दिवशी अंजली रूपालीला बोलली, “अग आज मी तुझ्या कॉलेजच्याजवळ एका कामासाठी येणार आहे तर मी तुला कॉलेजला न्यायला पण येते मग मस्त दोघी बाहेर जेवून आरामात घरी येवू.”
रुपाली हो चालेल बोलली..
ठरल्याप्रमाणे अंजली रुपालीला भेटायला कॉलेजला गेली आणि तिथून त्या दोघी जेवायला एका हॉटेल मध्ये गेल्या.
अंजली बोलली,”रुपाली मला तुला काहीतरी सांगायचे आहे.”
त्यावर रुपाली बोलली, “आई मला पण तुला काहीतरी विचारायचे आहे”.
अंजली मनातून घाबरली आणि मनातल्या मनात म्हणाली हिला नक्कीच जयंतबद्दल विचारायचे असणार.
“आई मला हेच बोलायचं होतं, कि मला जयंत काकाचं आपल्या घरी येणे आवडत नाही, माझ्या मैत्रिणी पण काहीबाही बोलत होत्या तुमच्या दोघांबद्दल. मी माझ्या बाबांच्या जागी दुसर्या कोणाचा विचारही करू शकत नाही. तू जयंत काकांना सांग मी आता मोठी झाली आहे आणि मला हे तुमच्या दोघांच नातं पटत नाही आहे.”
अंजली तिची वाक्य ऐकून सुन्न झाली. तिला काय बोलावे हेच सुचेना. दोघी घरी आल्या.
अंजलीने रात्रभर खूप विचार केला आणि ती शेवटी एका निर्णयापर्यंत पोचली होती.
दोन दिवसांनी जयंत अंजली चा निर्णय ऐकण्यासाठी तिला भेटायला आला.
अंजली त्याला म्हणाली, “माझ्या एकुलत्या एक मुलीच्या सुखासाठी मी एक निर्णय घेतला आहे. मी रुपालीच्या बाजूने विचार करायचे ठरवले आहे… मी हे लग्न नाही करु शकत.”
जयंत तिचा निर्णय ऐकून खट्टू झाला आणि पटकन तिथून निघून गेला.
अंजली तो गेल्यावर खूप रडली. पण रूपालीच आपल्या जगण्याचा आधार आहे तिच्याबाबतीत ती खूप हळवी झाली. तिच्या चांगल्या भविष्यासाठी स्वतच्या सुखाचा विचार करणे तिने बंद केले. अंजलीला मातृत्व निभावणे जास्त महत्वाच वाटलं.
अंजलीशी जयंतने पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही…
अंजलीला मनातून वाटत असे कि एक मित्र म्हणून जयंत ची गरजेला चांगली साथ लाभली होती.. अशोक गेल्यावर कोणाशी तरी खूप बोलावेसे वाटे आपलं मन मोकळं करावस वाटे तेव्हा जयंत हजर असे. खूप वेळा रडावेसे वाटले पण जयंत ने सावरले….पण हि साथ निभावणे कदाचित नियतीला मान्य नव्ह्ते….
अंजलीने रूपालीच आपलं जग आहे, तीचं शिक्षण करणे, तीचं चांगल्या घरात लग्न लावून देणे हे आपले आद्य कर्तव्य समजले.. अंजलीने तिचा बेकरीचा व्यवसाय चालूच ठेवला.
रुपाली चांगली शिकली, …. इंजिनीअर झाली…. अंजलीने तिच्या पंचविसाव्या वाढदिवसाच्या दिवशी तिला अशोकचं सत्य सांगितलं, ती खूप रडली.
रुपाली एका मोठ्या कंपनी जॉबला लागली होती. अशोकचं सत्य कळल्यापासून ती अंजलीची खूप काळजी घेत असे. तिला जराही दुखवत नसे. आता त्या दोघींचं नात खूप छान झालं होत.
सुख- दुख, त्या आता एकमेकींशी शेअर करू लागल्या होत्या. आई – मुलीच नातं आता मैत्रिणीसारखं होवू लागल होत.
रुपालीने दोन वर्ष जॉब केल्यानंतर तिच्याच ऑफिस मधल्या एका मुलाबरोबर तिचं प्रेम असल्याच आईला सांगितले.
अंजलीने सगळी चौकशी केल्यानंतर सगळचं छान आहे हे बघून हो म्हंटले….
लग्न ठरले, लग्नमंडप सजला, वर्हाडी मंडळी जमली. समारंभ अगदी छान झाला.
रुपाली सासरी जाताना आईला बिलगून सारखी रडत होती…..एकीकडे सगळं चांगलं झालेल्याचा आनंद होता तर दुसरीकडे तिच्या वियोगाच दुख: होतं.
अंजली ने मनातल्या मनात म्हंटल मी त्यावेळी माझ्या सुखापेक्षा रुपालीच्या भविष्याला प्राधान्य दिल ते बरच झालं. त्यामुळेचं तर मी आज हे मातृत्वसुख अनुभवू शकले.
*****
समाप्त
© सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा