वाडा ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा

© उज्वला सबनवीस
क्षमा उत्तराच्या अपेक्षेने रघुनाथ कडे बघत होती . बाई तिच्याकडे निरागसतेने बघत होत्या. त्यांच्याकडे बघुन क्षमाला भडभडुन आलं. कोण आहेत या , का असं ठेवलय यांना .
ती पुन्हा रघुनाथकडे बघायला लागली. तो काय उत्तर देतो , याची तिला उत्सुकता होती .
रघुनाथने घसा खाकरला . पुढे जाउन दाराला कडी घातली . अन बाईंचा हात धरुन पलंगवर बसवलं.
त्या आता थोड्या शांत झाल्या होत्या .

” माझी आई आहे ही ” .रघुनाथ कळवळुन बोलला . क्षमाला आश्चर्य वाटलं . “मग , त्या कोण आहेत , ज्या घरात वावरतात .”
रघुनाथ काहीच बोलला नाही . त्याने गोळी आणि पाणी आणलं. त्या पुन्हा डोळे फिरवायला लागल्या . क्षमाने त्यांचा हात धरला , प्रेमाने त्यांच्या हातावर ती हात फिरवायला लागली . बाईंच्या डोळ्याला धारा लागल्या . त्यांनी आपणहुन आ केला , रघुनाथने गोळी दिली .आणि पाचच मिनीटात त्यांना झोप लागली.
रघुनाथ ममतेने त्यांच्या अंगावरुन हात फिरवत होता . क्षमा स्तब्ध बसुन होती.
“ही जर तुमची आई आहे तर ह्यांना इथे का कोंडलय . प्रेमाने वागलं तर त्या ब-या होतील . “

“मला समजतं ग सगळं , पण मी हतबल आहे. ” रघुनाथ दु:खाने बोलला.
“मला सगळं सविस्तर सांगाल का रघुनाथ , माझी मदतच होईल तुम्हाला , आपण काढु यातुन मार्ग ” क्षमा आत्मविश्वासाने बोलली .
” निघेल यातुन मार्ग ?, होईल का खरच सगळं पुर्वी सारखं? “. रघुनाथ लहान मुलाच्या उत्साहात म्हणाला .
” का नाही होणार , तुम्ही सांगा तर सगळं ” . क्षमाने त्याच्या हातावर आपला हात ठेवला .
रघुनाथ भराभर बोलायला लागला . एवढे दिवस मनात साचलं होतं , ते या निमित्ताने बाहेर पडत होतं .

अप्पासाहेब जहागिरदार , रघुनाथचे वडिल , मोठं प्रस्थ होतं गावातलं . पण बुद्धी फिरली आणि कावेरी बाईंच्या जाळ्यात अडकले .
घरी सरस्वती ही सोन्या सारखी बायको , दोन मुलं होती. पण तरीही ते कावेरीच्या पंज्यात पुर्ण अडकले . तिने त्यांच्यावर कब्जा केला. कर्जात बुडाले . कावेरीने थोडी त्यांना मदत केली , आणि घरातच येउन राह्यली. सगळ्या घरावर कब्जा केला .
“आईला हा धक्का सहन झाला नाही. मला जरा समजत होतं . पण सगूणा लहान होती . आईला एकदम वेड्याचे झटके यायला लागले . माझा संताप व्हायचा , पण लहान असल्यामुळे काही करु शकत नव्हतो . कावेरी बाईंनी आईला या खोलीत बंद केलं .‌अन हेच तिचं जीवन झालं. “. रघुनाथ मोकळा होत होता.

नंतर बाबांना पश्चात्ताप व्हायला लागला. पण आता कावेरीबाई वरचढ झाल्या होत्या .आता त्यांनी आईला पुर्ण वेडं ठरवलं. खोलीत बंद करुन टाकलं. त्यांनी आई आजारी झाल्या पासुन घराची काळजी घेतली होती. सगुणा लहान असतांना तिचं केलय त्यांनी. पण मला भयंकर राग येतो त्यांचा , मी एक दोनदा केला प्रयत्न आईला बाहेर काढायचा .पण त्यांना पाह्यलं की आई आक्रमक होते .त्या आरडाओरडा करतात बाबा संतापतात .सगुणा बिचारी घाबरते , आणि मी पार गळुन जातो. मग हे असं तिला बंद ठेवावं लागतं . रघुनाथ काकुळीतेने बोलत होता.
“सांग न क्षमा ,काय मार्ग निघेल यातुन ” तो घायकुतीला येउन बोलला .

“हो हो , काढु मार्ग .मला विचार तर करु द्या ” . क्षमा आत्मविश्वासाने बोलली.
काय होणार होतं उद्या , काय करणार होती ती , हे तिलाही आत्ता या क्षणी माहित नव्हतं.
दार लाउन दोघेही खोलीत आले . क्षमाचं डोकं आता काम करायला लागलं होतं . वाट कठीण आहे पण ती तर चालायचीच आहे . आईंवर झालेला अन्याय तर दुर करायचाच आहे .तिने रघुनाथ कडे बघितलं . तो शांतपणे झोपला होता , सगळा भार क्षमावर टाकुन .त्याने हिला पुर्ण स्वातंत्र्य दिलं होतं .
सकाळी उठल्या बरोबर क्षमाने “त्या ” खोलीची किल्ली रघुनाथला मागितली.

त्याने काहीही प्रश्न विचारले नाहीत .फक्त हात हातात धरला . त्या स्पर्शातुनच त्याची साथ क्षमाला जाणवली . ती आता निर्धास्त झाली . तिला सगळी घडी नीट बसवायची होती , अन तेही कोणाचेही मन न दुखावता .
तिने कानोसा घेतला .सासरे नेहमी प्रमाणे टेबलवर पेपर वाचत होते . सगुणा नुकतीच उठली होती , आणि कावेरी बाई ओट्या जवळ होत्या . ती शांतपणे चालायला लागली.
धडधड होत होतं . होईल न सगळं ठरवल्या प्रमाणे . तिला तिच्या बाबांचं वाक्य आठवलं . चांगल्या मनाने काही काम केलं तर यश नक्कीच मिळतं.
तिने आत्मविश्वासाने त्या खोलीचं दार उघडलं .

सरस्वतीबाई पलंगावर शांत बसल्या होत्या . तिला बघताच एक क्षण त्यांच्या डोळ्यात ओळख दिसली . लगेच त्यांचे डोळे निर्विकार झाले. ती त्यांच्याकडे बघुन आश्वासक हसली .
तिने त्यांचे केस नीट केले . अन हाताला धरुन उठवलं . प्रेमाने त्यांना म्हणाली ,
“मी तुमची सुन आहे बरं का आई , आता मीच तुमची काळजी घेणार . हे घर तुमचं आहे , मुलं तुमचे आहेत , तुम्ही मालकीण आहात या घराच्या . अन हो नवराही तुमचाच आहे . आता बिल्कुल घाबरायचं नाही . सगळीकडे लक्ष द्यायचं , तुम्हाला काहीही झालेलं नाही . “.क्षमा त्यांना समजावत होती . 

बि ए ला सायकालाॅजी विषय होता तिचा . ते शिकलेलं आता कामात पडत होतं .अशा पेंशटला प्रेमाची गरज असते . हे तिला पक्क ठाउक होतं. आई लवकरच ब-या होतील याची तिला खात्री होती .
त्या काही जन्मजात वेडया नव्हत्या . त्यामुळे थोडेसे योग्य औषधोपचार आणि प्रेम या जोरावर ती त्यांना बरं करणारच होती .
कावेरी बाईंनी रघुनाथपुढे चहा आपटला . सगुणा विषयी त्यांना थोडं तरी प्रेम होतं .ती थोडी बरी वागायची त्यांच्याशी .रघुनाथ मात्र सदैव त्यांना वसवस करायचा . खरं म्हणजे त्यांना रघुनाथ बद्दलही खुप राग नव्हता , पण तो त्यांना आपलं मानत नव्हता , त्यामुळे त्याही खार खाउन असायच्या . 

त्याही खुर्चीवर बसल्या. आज रघुनाथने टोमणा कसा मारला नाही , म्हणुन त्याने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं . तो सारखा खोलीच्या बाहेर बघत होता अस्वस्थ पणे .
एकदम त्याच्या चेह-यावर हसु फुललं . तो कुठे बघतोय म्हणुन कावेरीबाईही त्या दिशेला बघायला लागल्या . त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता .
क्षमा , सरस्वतीबाईंचा हात धरुन सैपाक खोलीत येत होती . सरस्वतीबाई उत्साहात सगळीकडे बघत होत्या . किती सुंदर दिसतात या अजुनही . कावेरीबाईंच्या मनात असुया निर्माण झाली . नाही मी आता मागे हटणार नाही . मी मिळवलेली जागा परत त्यांना देणार नाही . त्या रागाने थरथरायला लागल्या .

सासरेही चहा अर्धवट टाकून एकदम उभे राह्यले . सगुणा धावत आईकडे आली .
अन रघुनाथ ,तो तर आनंदाने रडायलाच लागला आईला असं सैपाक खोलीत बघुन .
कावेरीबाई संतापाने धावत आल्या . अन एकदम ओरडल्या
” या वेडीला ने इथुन . थांब मीच नेते ” .असं म्हणत त्यांनी क्षमाच्या हाताला हिसडा दिला .
सगळेच घाबरुन आता काय होईल हे बघत राह्यले .

कावेरी बाईंनी क्षमाच्या हाताला हिसडा दिला .पण क्षमाने कावेरीबाईंचा हात धरला आणि आत्मविश्विसाने संयतपणे म्हणाली,
“आई आता , त्या बंद खोलीत राहणार नाही , त्यांना काहीही झालेलं नाही . त्या मोकळ्या फिरतील घरात . घर त्यांचं आहे . कोणीही त्यांना अडवलं तर गाठ माझ्याशी आहे . ” कावेरीबाई एकदम मागे सरकल्या .
” सगुणा धर ग आईला ” . क्षमाने सगुणाला आवाज दिला .
तिला त्या गायी सारख्या गरीब मुलीच्या मनातली भिती घालवायची होती .
सगुणाने केविलवाणे पणाने वडिलां कडे पाह्यलं . त्यांच्या डोळ्यात मुक संमती दिसली . ती आनंदाने आई जवळ आली .

सरस्वतीबाई तिच्या कडे निर्विकारपणे बघत होत्या. ती त्यांना फारशी दिसायची नाही . ती फक्त ताट ठेवायची .जेवण रघुनाथच भरवायचा .
” आई मी तुझी छकुली ” सगुणा रडवेल्या आवाजात म्हणाली .
सरस्वतीबाईंच्या डोळ्यात चमक आली . त्यांनी तिला प्रेमाने कुरवाळले. सगळेच भावुक झाले . एकट्या कावेरी बाईच संतापाने बेभान झाल्या . आणि जोरात ओरडल्या, ” पुरे झाला फॅमिली ड्रामा , घर माझ्याच तालावर चालेल . आत्ता आलेली कोण ही क्षमा का फमा मला अडवु शकत नाही “.त्यांचा तो अवतार बघून सरस्वतीबाईंना पुन्हा झटका आला , त्या पण ओरडायला लागल्या . क्षमाने त्यांना सावरलं . एका खुर्चीवर बसवलं . गोळी दिली .

“घेउन जा त्या वेडीला अन बंद करा खोलीत ” . त्या अप्पासाहेबांना म्हणाल्या .
क्षमा ठामपणे त्यांच्या समोर उभी राह्यली , अन जोरात म्हणाली ” त्या कुठेही जाणार नाही . तुम्हाला वाटत असेल कर्ज आहे अजुन आपलं , आपण अजुनही आपलाच हेका चालवु तर ते आम्हालाही कळलय की कर्ज कधीच संपलं आहे . “
कावेरीबाई संतापल्या होत्या .
रघुनाथ , सगुणा , एवढच काय अप्पासाहेबांचही सगळं लक्ष सरस्वती बाईंकडे होतं.
कावेरीबाई माघार घेणार नव्हत्या . त्या जागेवरच संतापाने खदखदत होत्या .

क्षमा शांतपणे त्यांच्याकडे बघत होती . तिच्या मनात प्रचंड उलथापालथ सुरु होती . मार्ग पुर्ण मोकळा झालेला नाही याची तिला पुर्ण जाणीव होती . पुढे काय हा रघुनाथच्या डोळ्यात प्रश्न होता .
उत्तर, ती आत्ता देउ शकत नव्हती . तिला अजुन थोडा वेळ हवा होता .
ती उत्तर देणार होती , मार्ग काढणार होतीच . तिने पहिले , तिच्या ओळखीच्या चांगल्या डाॅक्टरांचे औषध सरस्वती बाईंना सुरु केले. त्या आता मोकळ्या घरात वावरत होत्या . त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होत होती .

कावेरी बाई हतबल होत चालल्या होत्या . अप्पासाहेब मात्र अजुनही सरस्वती बाईंशी विशेष बोलत नव्हते . ते कावेरी बाईंशीही बोलत नव्हते . घरात अजुन तणाव होताच .
कावेरी बाई मुकपणे घरात वावरत होत्या .क्षमा लांबुनच त्यांचं निरीक्षण करत होती . त्यांनी अजुनही सैपाक खोलीचा ताबा सोडला नव्हता . क्षमा घाई करणारच नव्हती .
सगुणा आईशी बोलत असली की कावेरी बाईंच्या चेह-यावर वेदना दिसायची .ती आता कावेरीबाईंशी जास्त बोलत नव्हती . त्या दुखावल्या सारख्या वाटत होत्या . सगुणाचं लहानपणी त्यांनी केलं होतं . तिच्या विषयी त्यांना ममता होती . क्षमा हे सगळं शांतपणे बघत होती .

सरस्वतीबाई सगळं विसरुन कावेरीबाईंशी एखादा शब्द बोलायला लागल्या होत्या . अप्पासाहेब गंभीर , अस्वस्थ वाटत होते . आता त्यांना बोलतं करणं क्षमासाठी गरजेचं झालं होतं . ती संधी शोधत होती .
त्या दिवशी अप्पासाहेब ,बंगईवर निवांत बसले होते . रघुनाथही घरी नव्हता . क्षमाने संधी साधली .आणि ती त्यांच्या समोर जाउन बसली .
त्यांनी तिच्याकडे बघितले , “काही हवं आहे का बेटा ” .ते प्रेमाने म्हणाले .
क्षमाला भडभडुन आलं . या सगळ्या प्रकारात हे किती सहन करतायत .

ती काहीच न बोलता नुसतीच शांत बसुन राह्यली . अप्पासाहेबांनीच त्या शांततेचा भंग केला .
“मला माहित आहे , तुला अनेक प्रश्न आहेत . हो. झाली माझ्या हातून चुक ,कावेरी बाबत घसरला माझा पाय , पण मी माझ्या कुटंबावर अन्याय केला नाही .मी त्यांचं व्यवस्थित करतच गेलो . मान्य आहे धक्क्यामुळे ,सरस्वतीला वेडाचे झटके यायला लागले , माझं थोडं दुर्लक्ष झालं .” ते भराभर बोलत होते .
क्षमा शांतपणे त्यांना मोकळं होउ देत होती.

“कावेरी घरात राह्यला आली ,हे खरं आहे ,पण त्यामुळे सगुणाची मला काळजी राह्यली नाही , कारण सरस्वती तिचं करण्याच्या स्थितीत नव्हती .कावेरी सगळं बिनबोभाट करत राह्यली .तिने मुलांचा दुस्वास नाही केला . आता रघुनाथ वागतो थोडा वाकडा तिच्याशी , तीही चिडते .पण मनाने चांगली आहे ती तशी .मला तर काहीच सुचत नाही सुनबाई “. ते विव्हल होत बोलले.
क्षमाला त्यांच्या मनाची अवस्था कळत होती .
“रघुनाथ आता मोठा झाला .तुही सक्षमपणे घराची जबाबदारी घेतली आहे .मुलांची आईही आता सुधारली आहे .तुम्ही ठरवाल तसं . कावेरीला मी सांगितलं आहे की आता या घरात तुला जागा नाही . तू तुझा मार्ग शोध”.

क्षमा शांतपणे तिथुन उठली .अन आत आली .कावेरीबाई सैपाक खोलीत होत्या, सरस्वतीबाई टेबलवर बसल्या होत्या .
कावेरीबाईंनी त्यांना खाण्याची डिश दिली .
क्षमा अस्वस्थपणे तिथुन निघाली. तिला आता रघुनाथशी बोलणं गरजेचं झालं होतं .
तिला उत्तर खरच सापडलं होतं का , तिच्या मनात खुप द्वंद्व चाललं होतं . रघुनाथशी ती सविस्तर बोलली.
सरस्वतीबाई आता खुपच सुधारल्या होत्या . आता त्यांचे झटके जवळपास थांबलेच होते .
कावेरीबाई खुप दुखावल्या होत्या .क्षमाला भिती होती , या काही कुरापती काढतील अन आईंना पुन्हा झटका येईल .

त्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे सगळे सैपाक खोलीत चहाला जमले होते .अप्पासाहेब पेपर वाचत होते , पण त्यांचे मन लागत नव्हते . आत कुठेतरी तुटत होते .
सरस्वतीबाई दोन्ही मुलांच्या मधे बसल्या होत्या . त्या मुलांना एक मिनीटही सोडत नव्हत्या . क्षमाला हसु आलं त्यांचं .
तेवढ्यात कावेरीबाई बॅग घेउन आल्या . अप्पासाहेब उठुन उभेच राह्यले . कावेरी हे पाउल उचलेल असं त्यांना वाटलं नाही . रागाच्या भरात ते म्हणाले त्यांना, पण , त्या घर सोडतील हे त्यांना वाटलं नाही.
रघुनाथ निर्विकारपणे कावेरीबाईं कडे बघत होता . सगुणा थोडी अस्वस्थ झाली . अन सरस्वतीबाई काहीच बोलत नव्हत्या . त्या आपल्या मुलांमधेच खुश होत्या .

“मी हे घर सोडुन चालली आहे ”. कावेरीबाई अतीव दु:खाने म्हणाल्या .
कोणी काहीच बोललं नाही .त्यांना कोणाचं बोलणं अपेक्षितही नव्हतं . अप्पासाहेब काही म्हणतील याची त्यांनी एकच मिनीट वाट बघितली . पण काहीच घडलं नाही. अन त्यांनी निराश मनाने बॅग उचलली ,अन त्या चालायला लागल्या .
” छोटी आई , ” क्षमाने आवाज दिला , त्या गरकन मागे वळल्या .
क्षमाने प्रेमाने त्यांचा हात धरला . त्या क्षमाकडे आश्चर्याने बघत राह्यल्या .

” हो ,मी तुम्हालाच आवाज दिलाय ,छोटी आई म्हणुन . तुम्ही या घरात आता छोटी आई म्हणूनच राहणार आहात . अहो या वयात आम्ही तुम्हाला बाहेर काढणार नाही . तुम्ही आता इथेच राहणार आहात . रघुनाथची पण परवानगी आहे .”
कावेरीबाईंचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता . सरस्वतीबाई जागेहुन उठल्या आणि त्यांनी कावेरीबाईंचा हात हातात धरला
” कावेरी मागचं सगळं विसरुन जाउ आपण .आता कारभार मुलांच्या हातात देउन हरीहरी करु , काय हो “. सरस्वती बाईंचं ते शहाणपणाचं बोलणं ऐकुन सगळेच स्तब्ध झाले ‌. अन आनंदीही झाले .

” सुनबाई ” .गदगदलेल्या आवाजात अप्पासाहेब एवढच बोलु शकले .
आता सगळ्यांच्या चेह-यावर आनंद पसरला . सगळं घर खुशीत हसत होतं. कावेरी बाईंच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या . त्या पाण्या बरोबर सगळे हेवेदावे , वाईटपणा वाहुन चालला होता . त्यांचा चेहरा आनंदाने फुलुन गेला होता . तिचा निर्णय योग्य ठरला होता .थोडा रघुनाथने विरोध केला होता .त्याची अजिबात इच्छा नव्हती , कावेरी बाईंनी इथे रहावं अशी. पण क्षमा त्याला समजावण्यात यशस्वी झाली होती .”कावेरी बाईंचं या जगात आता कोणी नाही .त्या कुठे जातील.एक माणुसकी म्हणुन आपण त्यांना ठेउन घेउ. बाबांना पण बरं वाटेल. या वयात त्यांना कशाला दुःखी करायचं. आणि आता आपण सगळे आईं बरोबर आहोत. कावेरी बाई आईंच्या केसालाही धक्का लावायची हिंमत करणार नाहीत. “क्षमाचं हे आत्मविश्वास पुर्ण बोलणं ऐकून , रघुनाथचा विरोध मावळला.

आता कुठलच दुःख द्वेष त्याला नको होतं. खुप वर्ष घुसमटत काढली. आता आनंदाची झुळुक आली आहे. त्या आनंदाचं, समाधानाचं, तृप्तीचं मोकळ्या मनाने स्वागत करायलाच पाहिजे .त्याने क्षमाचं म्हणणं मान्य केलं.अन क्षमाने निश्वास सोडला.
क्षमाने अभिमानाने संपुर्ण वाड्यावर नजर फिरवली . आता तो वाडा तिला गुढ वाटत नव्हता .सगळे क्लिमीष वाहुन गेले होते .
क्षमाने रघुनाथकडे बघितले , त्याच्या डोळ्यात कौतुक , प्रेम होते .त्याने प्रेमाने क्षमाचा हात धरला . सगळ्यांनी उत्सफुर्त पणे टाळ्या वाजवल्या . क्षमा लाजली , ख-या अर्थाने त्यांचा संसार आता सुरु होणार होता .
वाडा सुखाने ,आनंदाने , समाधानाने काठोकाठ भरला होता ,अन ते सुख सगळ्यांमधे झिरपत होते .
समाप्त
© उज्वला सबनवीस
सदर कथा लेखिका उज्वला सबनवीस यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
या कथेचे अभिवाचन करण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची विशेष नोंद घ्यावी.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा

6 thoughts on “वाडा ( भाग 2)”

  1. अप्रतिम सुंदर कथा, उत्तम लिखाण, एकदम सही निर्णय

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!