वेगळं राहायचंय आम्हाला

© सौ. प्रतिभा परांजपे
“कॉलेजमध्ये जाता जाता ताईकडे जायला जमणार आहे का?” सुधाताईंनी विचारले.
“हो पण कां?”
“गाजराच्या वड्या केल्या आहेत मनीषला खूप आवडतात.”
“पाहते, देऊन ठेव डब्बा.”
मनाली कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. सोनाली तिची ताई  ,सहा सात वर्षांनी मोठी. दिसायला सुंदर, स्मार्ट कॉलेजचे शिक्षण होताच मनीषच्या घरुन तिला मागणी घातली.

नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. मनीष एम.बीए करत होता.
वडिलांचा व्यवसाय होता पुढे जाऊन त्यांलाही त्यातच काम करायचे होते.
सोनालीचे खूप कौतुकाने स्वागत झाले प्रधानांच्या घरात.
सासूबाई खूप हौशी सोनालीला खूप मोकळीक होती.
मनीषपेक्षा चार वर्षांनी लहान मिलिंद होता. तोही शिकत होता.
छान व्यवस्थित स्थळ आपल्या मुलीला मिळाल्याने प्रमोदराव निश्चिंत होते.

सोनालीच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होता होता सासुबाईंचा अचानक हार्टफेलने मृत्यू झाला.
आता सगळी जबाबदारी सोनावर आली.
तिने आपल्या कर्तुत्वाने ती व्यवस्थित संभाळली म्हणूनच सुधाताईंना तिचे खूप कौतुक होते .
मनीषचे ही एम.बीए पूर्ण होऊन तो वडिलांच्या व्यवसायात स्थिरस्थावर झाला होता.
मनाली ताईकडे दुपारी पोहोचली. ताई घरी नव्हती.

घरी ताईचे भाऊजी मिलिंद होते त्यांनी हसून स्वागत केले.
“अरे व्वा तुम्ही?”
“ताई?”
“वहिनी  बाहेर  गेली आहे पण- आम्ही आहोत की, मी आणि बाबा.”
बराच वेळ मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मिलिंद खूपच हसतमुख बोलके वाटले. कॉलेजच्या बऱ्याच गमती जमती सांगून हसवत होते.

 ताई परत आली तेव्हा मग मोना जायला निघाली.
“अग तू कळवायचं तर..”
“आईने वड्या दिल्या होत्या त्या द्यायला आले.”
“अरे वा- बघू.”
“हे काय इतक्याच?”
“वहिनी आम्ही घेतल्या त्यातून ,मस्त झाल्या होत्या.”

ताई काही बोलली नाही तरी कां कोण जाणे मनालीला वाटले ताईला फारसे आवडलेले दिसले नाही.
अधून मधून मनाली ताईकडे जात असे, ताईचा सुखाचा संसार पाहून तिला ताईचं कौतुक वाटे.
“ताई जीजू केव्हा येतात ग घरी?
“अगं फॅक्टरीत खूप काम असतं ,बाबांच्यांनी फारसं होत नाही. त्यामुळे सर्व जबाबदारी यांच्यावर आहे आणि घरातली माझ्यावर.
मिलिंदला हे म्हणतात तू ही लक्ष घाल पण त्याला नाही फारसा इंटरेस्ट. त्याचं काही कळतच नाही नाटकाच्या तालमी कर, तर पेंटिंग कर आणि मग अभ्यास. याव्यतिरिक्त काही नको त्याला. मनीषला खूप ताण पडतो.”

ताईने जीजूचं कौतुक आणि दिरावरचा राग बरेचदा आईसमोर बोलून दाखवला.
आताशा मनालीला पाहून मिलिंद घरी थांबतो हे सोनाच्या लक्षात येऊ लागले होते.
“आई मी गेले होते ताईकडे काल पण ती दवाखान्यात गेली होती.”
“हो म्हणाली होती पाहू काय रिपोर्ट आहे ?’
“म्हणजे ?”
“तू मावशी होणार दिसतय !”

“अय्या खरंच ?”
संध्याकाळी सोना आनंदाची बातमी घेऊन आली .
आता घरी खूप उत्साहाचे वातावरण होते. यथावकाश सोनाला मुलगा झाला आणि मनालीच्या दवाखान्यातल्या फेऱ्या वाढल्या.
तिथे बरेचदा मिलिंदही येत असे. दोघं खूप गप्पा मारत .
दोघांची होणारी जवळीक मनीषच्याही लक्षात येत होती .

सोना आई बाबांजवळ बोलली. मनाली आणि मिलिंद दोघ एकमेकांना पसंत आहे पण तो अजून नोकरी किंवा बिजनेसमध्ये लक्षही घालत नाही. त्याचे नाटकांचे प्रयोगआणि  दौरे चाललेले असतात. अजून काही स्थिरस्थावर नाही. फॅक्टरीतही त्याला काही इंटरेस्ट नाही.
सुधाताईंनी मनालीला विचारले “आम्ही तुझ्या करता स्थळ पाह्यचा विचार करतो आहे. कोणी आहे का मनात ?”
“इतकी का घाई? आत्ता तर माझं शिक्षण पूर्ण झालं मला नोकरी करायची आहे. मी एक दोन ठिकाणी  रिज्युमे पाठवलाय.”

“हो पण लग्न लगेच ठरेल असं नाही ना?”
” पाहू ग” म्हणत मनालीने विषय बदलला. पण मनातलं अजून कोणाजवळ बोलावे कळत नव्हते.
बाळाचे बारसे ठरले ,सगळेजण खूप उत्साहात होते.
” बघ बाळाची मावशी…मावशी म्हणू की काकू?” मनीषने मुद्दाम मिलिंदकडे पाहत विचारले. 
“मला विचारले तर हरकत नाही मोनाला आवडेल का काकू म्हटलेलं?” मिलिंदने मनालीकडे पाहून डोळे मिचकावले.

मनाली लाजली पण काहीच उत्तर दिले नाही.
प्रमोदरावांनी सुधाताईंना विचारले.
सुधाताई म्हणाल्या, “दोघी मुली एकाच घरी असल्यास आपली काळजी संपेल पण मिलिंदचे नेमके काय करायचे ते ठरु द्या.”
सोनालीचे सासरे म्हणाले, “घरचा उद्योग असताना नोकरी का करेल?”
त्यामुळे मग नाही म्हणण्याचे काहीच कारण उरले नाही चांगल्या मुहूर्तावर मनाली आणि  मिलिंदचे शुभमंगल झाले.

मनालीला लवकरच नोकरीही लागली. सर्व छान चाललंय असं दिसत होतं.
मिलिंद फॅक्टरी च्या कामात लक्ष घालत होता, पण अधून मधून त्याचे नाटकाचे दौरे असत.
मग तितके दिवस मनीष आणि बाबा यांच्यावर कामाचे प्रेशर असायचे .
या सगळ्यात बाबांची तब्येत साथ देत नव्हती. त्यांचे बीपीही वाढलेले असायचे.
मनीषवर कामाचा ताण वाढला की तो घरात वेळ देत नसे. मग त्याचे आणि सोनालीचे वाद होत असत

आताशा सोनाली आई जवळ बडबड करायची “भाऊजींच काही कामात लक्ष नाही. त्यांना जर यात इंटरेस्ट नाही तर आधीच बोलायचं.”
एकदा रात्री मिलिंद नाटकाच्या दौऱ्यावरून परत आला.
खूप खूप खुश होता त्याच्या कामाचे खूप कौतुक होत होते. त्याचा हा दौरा सफल झाला होता.
सकाळी मनीषने त्याला नवीन टेंडरच्या विषयी विचारले, “मिलिंद टेंडर भरुन पाठवलं?”

“अरे बापरे ! मी तर साफ विसरलोच नाटकाच्या गडबडीत.”
एक मोठं कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलं. त्यांचा खूप मोठा लॉस झाला. बाबा खूप नाराज झाले .
घरातले वातावरण बिघडत चालले होते. 
मनीषने मिलिंदला स्पष्टच विचारले “तुझ नेमकं काय करायचं नक्की आहे? दोन दगडांवर पाय ठेवून चालणार नाही. एक काहीतरी नक्की कर.”
“मला अभिनय सोडता येणार नाही” असे  मिलिंदने स्पष्ट सांगितले.

घरात आता एक वेगळा ताण जाणवू लागला. ताई मनालीशी आणि मिलिंदशी वरवर जरी नीट वागत असली तरी एक दुरावा सतत  जाणवत असे.
घरखर्चाच्या नियोजना वरूनही मत वेगवेगळे होते.
मिलींदला नियमित असा पैसा मिळत नसे.
मनालीचा पगार नियमित असे पण त्यावरही सोनालीची कुरबुर असे.
एक दिवस आई आलेली असताना सोनाली बोलून गेली,”फॅक्टरीचं सगळं काम मनीषनाच करायचे तर मग बाबांनी  फॅक्टरी मनीषच्या नांवानें  करावी.”

मिलिंदचं एक्टिंग मधलं करिअर पुढे आकार घेत होतंं . त्याला एका मराठी मालिके करताही ऑडिशनसाठी बोलावले होते .
पण घरात त्याची किंमत कोणालाच नव्हती. एक बायको म्हणून  मनालीला त्याच कौतुक होतं .
या फिल्डमध्ये नियमित असं काही नसतं. कधी काम असतं कधी नाही, पण मनालीचा जाॅब त्यांच्या संसाराला पुरेसा स्थैर्य देणारा होता.
आता घरात दोन भावांच्या दोन दिशा असे होऊ लागले.

सोनाली मनालीशी एक बहीण म्हणून नीट वागत असली तरी मिलिंदशी तिच वागणे मनालीला पटत नसे. 
मिलिंद तिचा नवरा होता. आपल्या नवऱ्याची होणारी अवहेलना तिला जाणवत असे.
मनीष जीजू म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचे तिला ही खूप कौतुक होते पण मिलिंदही त्याच्या क्षेत्रात चमकत होता .
पण सोनाच्या बोलण्या वागण्यात होणारा सतत त्याच्या कामाचा अवमान तिला सहन होत नव्हता.

मोठी वहिनी म्हणून मिलिंद कधीही तसेच जाणवू देत नसत. पण हे सगळं कुठेतरी थांबायला हवे असे मनालीला वाटायला लागले.
एक दिवस मिलिंद दौऱ्यावर गेले होते, ऑफिसला हाफ डे पाहून  मनाली  माहेरी आई-बाबां कडे आली.
आई बाबांना खूप आनंद झाला,
“अरे वा –आज आलीच आहे तर राहणार की लगेच जाणार?”
“राहणार बाबा, मिलिंद दोन दिवस बाहेर गेलेत नाटकाच्या दौऱ्यावर.

“हं नेहमीचच “
आईला फारसे कौतुक नाही हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतं.
रात्री जेवण झाल्यावर “चल आईस्क्रीम घेऊन येऊ” म्हणत बाबा मनालीला बाहेर घेऊन गेले.
“काय झालं आहे मनाली? काहीतरी बोलायचं आहे ना तुला? दिसतंय तुझ्या वागण्यातून.”
” हो बाबा, पण…”

“काय आहे ते बोल मोकळेपणानी”
“बरेच  दिवसांपासून बोलावंसं वाटतय बाबा, मी व मिलिंदनी वेगळे राहायचं ठरवलं आहे. त्या मागची आमची अशी काही कारणं आहेतच.”
“हो नक्कीच”, बाबांनी तिच्या हातावर हात ठेवत म्हंटले , “सांग मोकळेपणाने”
“बाबा, मिलिंदचा पिंड  मुळातच बिझनेस करण्याचा नाही, त्याला अभिनयाची आवड आहे पण– या क्षेत्रात निश्चित मिळकत नसली तरी आमच्या संसाराला पुरेल इतकी आहे. त्याच्याशी लग्न करताना मला याची पुरेपूर जाणीव होती.

पण त्या घरात जीजूच्या यशोगाथेपुढे त्याची दखल घेतली जात नाही. माझा नवरा म्हणून मला त्याचीही अवहेलना नाही पटत. आम्ही वेगळा संसार थाटला म्हणजे समाजात मिलिंदची अशी एक वेगळी इमेज असेल. त्या घरात राहिल्याने आम्ही मोठ्या वृक्षाखालचं झाडं होतो आहे. सावली तर मिळते पण वाढ खुंटते अशी अवस्था मला नाही पटत.
वेगळ्या घरांत राहून संसार कसा चालवायचा हे कळेल. सुरवातीला अडचणी येतील पण तुम्ही सर्व आहात वेळोवेळी मार्गदर्शन करायला. जबाबदारी आली की आर्थिक नियोजनही कळेल. मुख्य म्हणजे मिलिंदला त्यांच्या कामामुळे वेगळी अशी आयडेंटिटी मिळेल. म्हणून आम्हाला वेगळं राहायचं आहे.”

“पण- तुझ्या घरच्यांना विशेषतः  मिलिंदच्या बाबांना आवडणार नाही.”
“हळूहळू पटेल त्यांना, आणि आम्ही घर वेगळे केले तरी येणे जाणे असणारच.”
“तसं तर तुझ्या आईलाही पटणार नाही, पण मी समजावेन तिला. तू निश्चिंत राहा. वेगळे राहा पण आनंदाने राहा एकोप्याने रहा,” म्हणत प्रमोदरावांनी मनालीला हसून आश्वासन दिले.
बाबांनी जज न करता आपल्याला समजून घेतलं आणी आईलाही समजवण्याची तयारी दाखवली म्हणजे आपण बरोबर आहोत, या विचाराने निश्चिंत झालेली मनाली आपल्या नवर्‍याला नवी ओळख मिळवून देण्यासाठी वेगळा संसार थाटायला सज्ज झाली.
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा

2 thoughts on “वेगळं राहायचंय आम्हाला”

Leave a Comment

error: Content is protected !!