मैन्नाज्जी

© रमा (रेश्मा डोळे )
फोन वर मेसेज आला मैना आजी गेली. एक ना एक दिवस ही बातमी येणारच होती. आजी आता खूप थकली होती. कधी यमराव येतात कुणास ठाऊक हे ती भेटलो कीं नेहेमी म्हणायची.
आधार वृद्धाश्रमात ती सध्या राहत होती. तीच असं कुणी नव्हतं बहुदा तिला. कोकणात जमिनी होत्या तिकडून पॆसे यायचे पण सख्ख असं कुणी नव्हतं.
वाडा पडायला आला तसा महानगर पालिकेनी धोक्याची वास्तु म्हणून एकेक बिऱ्हाड हलवलं. वाड्याची नाती खूप घट्ट होती.
मैन्नाज्जीला कुणीही हसत सोबत न्यायला तयार होतं. पण ती मानी होती. ती स्वेच्छेने आश्रमात गेली.

वाड्यातले अण्णाकाका, जना काका न चुकता भेटायला जायचे त्यांच्याकडून खबर कळायची. आम्ही मुलं पण नोकऱ्या सांभाळून अधेमध्ये भेटून यायचो. पण वाडा सोडावा लागला हे दुःख तिला आतून छळत होत.
आम्ही गेलो कीं ती वाड्याच्या आठवणी डोळ्यात पाणी आणून आणून सांगायची. त्यावेळी फक्त तीच बोलायची. आम्ही फक्त श्रोते असायचो.
आजची भेट नेहमी सारखी होणार नव्हती. आज आजी गप्पा मारायला नव्हती.
आधार आश्रमात निघालो आज्जीला शेवटचं भेटायला जातोय हेच सहन होत नव्हतं.
मनात लहानपणीच्या आठवणीं उड्या मारून बाहेर यायला लागल्या.
****** ****** ******* ****** ******** ******** *******

माझं लहानपण एका वाड्यात गेलं. त्या वाड्याचं सर्वस्व होती आजी ..मैना आज्जी  ..लहानपणी आम्हाला फार नवल वाटायचं .. हे असं नाव का ठेवलं असेल आज्जीच? पण आम्ही तिला हे कधी विचारायचा शहाणपणा केला नाही ..
एक खरं आम्हाला जाम मजा यायची तिला मैन्नाज्जी म्हणताना.. हो मैना आजी कुणी म्हणायचं नाही तिला हाक मैन्नाज्जीच मारली जायची.
या मैन्नाज्जीच्या दोन गोष्टी आज ही आठवतं होत्या.. एक म्हणजे …  आजीच्या हातचे शेंगदाणा लाडू…. शाळेतून येताना दिसलो कीं हाक मारून ये बाळ, लाडू खातोसं?किंवा खातेस?हे ती विचारणारच.
भूक लागली, घरात कुणी नसलं कीं तिच्या घरी जाऊन उभं राहायचं आणि हक्कानी लाडू मागून खायचा.

तिला कुणी नव्हतं त्यामुळे आम्ही आपणहून जाऊन लाडू मागणं हे तिला स्वर्गसुख वाटायचं… कदाचित आपलं कुणीतरी आहे ही भावना तिला सुखावत असावी… आता हे अर्थ कळतात तेव्हा फक्त मतलब फक्त लाडुशी होता.
तिच्या लाडुची खासियत अशी कीं ती लाडवाच्या मधोमध एक छोटा गुळाचा खडा पेरत असे.. आणि लाडू त्या भोंवती वळत असे..
एकदा भोचक सुलीनी लाडुचा तोबरा भरून आज्जीला विचारलं “आज्जी,तू असा खडा का ग ठेवते मध्ये? गूळ बारीक करायचा राहतो का तुझा?”
आजीनी सुलीचा कान पकडून डोळ्यात पाणी आणून सांगितलं ” अग ढमाले, ही जग रहाटी अशी आहे कीं काम संपलं कीं तुम्हाला विसरून जाईल… म्हणून जोवर तुमचं अस्तित्व तुम्ही दाखवता तोवर तुम्ही इथले राजे… लाडू एकदम गटम केला तर तू क्षणभरात मला विसरशील, पण लाडू संपून जोवर हा गुळाचा खडा तुझ्या तोंडात विरघळत राहील तोपर्यंय मैन्नाज्जी तुला आठवतं राहील.

गुळाचा गोडवा जसा तोंडात राहील तुझ्या, तसंच आपण असू नसू तो गोडवा आपल्या नंतर आठवला पाहिजे…या पिकल्या पानाला कुणी पटकन विसरू नये एवढीच म्हातारीला वाटतं ग बयो “… हे म्हणताना तिनी डोळे टिपलेले आम्ही पाहिलं होत.  मैन्नाज्जी नी कान धरत सांगितलेलं आम्हाला डोक्यावरून गेलं होत, आजी रडेल आणि सुलीमुळे लाडवाचा रतीब बंद होईल या भीतीनी आम्ही आज्जी कशी बरोबर हा दुजोरा दिला होता..
आज्जीची दुसरी गोष्ट म्हणजे आजीला लोकांना टोपण नाव ठेवायचा  भारी छंद होता.. आम्हाला वाटायचं तीच नाव मैना होत तें तिला आवडत नसावं म्हणून त्याचा बदला म्हणून ती इतर लोकांचे नामकरण  करत असावी.. अर्थात ही आमची बालवयातली समजूत होती …. खूप कमी लोकांना ती त्यांच्या खऱ्या नावाने हाक मारी…अर्थात तिच्या या नाव ठेवण्याचा कुणी राग मानला नाही..

वाड्यात दूध घालायला एक गव्हाळ रंगाचा.. उंच, अतिशय किडकीडीत दूधवाला यायचा… त्याच्या दोन्ही हातात दुधाच्या किटल्या असायच्या त्यामुळे तो कधी ताठ चालायचा नाही कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूला झुकलेला असायचा… ती त्याला तराजू म्हणायची.
काळे काकूंचा मुलगा कधीही बघितलं तरी घरात लोळलेला दिसायचा. आम्ही त्याला बसलेला खूप कमी वेळा पाहायचो… त्याला ती अजगर म्हणायची… “ढोलीत सुस्त होऊन पडलेलं अजगर कुठंय बोलावं त्याला लाडू खायला ” हा तिचा आवडता डायलॉग.
आळीत एक मारवाडी दुकानदार होता.. तो काठीसारखा बारीक होता.. त्याला ती चिम्बाट… म्हणायची (कोकणात लहान छाडी किंवा काठीला चिंबट म्हणतात. हे असले शब्दांच ज्ञान आम्हाला आज्जीकडून मिळायच )

दाणे संपले किंवा गूळ संपला कीं ती वाड्याच्या दरवाज्यातून ओरडायची चिंबट्या दाणे आणि गूळ घेऊन येरे… आणि चहा टाकतेय लगोलग ये.. येशील नाहीतर निवांत “
या चिंबट्याला कधीच तिनी खऱ्या नावाने हाक मारली नाही…एकदा वाड्यातला बाब्या दुकानात जाऊन चिंबट्या काका आईनी रवा मागितला हे म्हंटला होता… आणि मार खाताखाता वाचला होता…खरतर कांतीलाल शेठ ला पण या नावाची सवय झाली होती… दाणे देता देता तो ओरडायचा “बुढी, काय मला चिंबाट म्हणते ग..?”
मैन्नाज्जी उत्तर द्यायला बांधील नसायची… सामानाचे पॆसे आणि चहा दोन्ही हातात देऊन मोकळी व्हायची… “चहा पी आणि जां पटकन” इतकं बोलून विषय संपवायची. हे दृश्य आम्ही अनेकदा पाहायचो..

वाड्यात तेव्हा कॉमन स्वछता गृह असायची… ही सार्वजनिक स्वच्छता गृह साफ करायला येणारा भीमा म्हणजे दिसायला एकदम सोज्वळ. चेहऱ्यावर एकदम सात्विक भाव असणारा.. कपाळावर बुक्का गंध लावणारा…त्याला ती विठोबा, विठुराया, सावळ्या म्हणायची….”सफाई झाली कीं ये रे विठुराया लाडू चहा घ्यायला ” तिचे सोवळ फार होत पण त्या पलीकडे जाऊन ती माणसं जपताना दिसायची…हीच माणसं तिला शेवट पर्यंत जपत राहिली… नातेवाईक नसल्याचं दुःख तिनी कधी केलंच नाही..
जनार्दन काकांच्या डोक्यावर पूर्ण टक्कल होते पण मधोमध केसांचा एक चौकोनी तुकडा होता.. लहान बाळाला जावळ ठेवतात ना तसा .. पार्ले च्या बिस्कीटाच्या अकराचा… ती त्यांना बिस्कीट अशीच हाक मारायची ….ती जनार्दनकाकांच्या बायकोला बिंदिक्कत विचारायची, “काय ग बिस्कीट गेलं का हापिसात?”

तुला लेकराला पाहायचं असेल, तर् भाज्या नीट करायला दे आणून मीं रिकाम टवळीच आहे तुला मदत करते. “
असं म्हणल्यावर त्या काकाच्या बायकोला पण आपल्या नवऱ्याला आजी बिस्कीट म्हणाली याच काही वाटतं नसे..
वाड्यातल्या शांता काकूच्या पोटात काही राहत नसे… तिला सगळ्या बातम्या गोळा करून याच्या त्याला सांगायची सवय होती.. तिला आज्जी अभिषेक पात्र म्हणायची…. बायका बायका पापड घालायला, वाळवण करायला बसल्या.. आणि काकु बोलायला लागली कीं ती काकूला ओरडायची, “तोंडाला सतत लागलेली धार बंद कर ग बयो.. तोंड नाही हात चालव.थोडावेळ अभिषेक बंद ठेव “
नानाची सुमी अतिशय अव्यवस्थित घर ठेवायची.. तिला ती भालकाभुलूक (बेशिस्त) म्हणायची…

अण्णाकाका चार मुलींच्या लग्नाच्या चिंतेत कायम असायचे. त्यांना ती टाकुळलेला अण्णा( सदा दुर्मुखलेले )हाक मारायची…
वाड्यातल्या काही जेष्ठ लोकांमध्ये ती होती… तीचं बोलण टोकदार असलं तरी पोटात अफाट माया  होती… वाड्यातलं कुणी अडलं नडला तरी ती मदतीला कायम पुढे असायची… अण्णाकाका च्या मुलीच लग्न पैशाविना अडू लागलं तेव्हा ती स्वतःची कोकणातील जमीन विकायला  निघाली होती… अण्णा नी ऐकलं नाही तेव्हा तिनी स्वतःची एक गळ्यातली साखळी देऊ केली होती.. तिचे पाय धरून रडलेले अण्णा सगळ्या वाड्यानी पहिले होते… तेव्हा ताणलेले वातावरण हलक करायला ती अण्णा काकांना म्हणाली होती “टाकूळण्या आता जोर धरा लग्नाचा.. काही कमी पडलं तर ही तुझी बहीण आहे लक्षात ठेव…”तिचा असा आधार होता सगळ्यांना त्यामुळे कुणाला तीच नावं ठेवणं खूप गौण वाटायचं.. सगळे लक्षात ठेवायचे तें तीच प्रेम आणि धाक.

ती कधी पैशानी मदतीला उभी असायची, कधी कष्टानी…आमच्या आयांच तर तें काउनसेल्लीग सेंटरच होत, मन मोकळ करायचं हक्काचं स्थान… आणि आम्हा मुलांवर तर नातवंडांवर करावं तस प्रेम करायची….
आज आजी नाही पण तीचं तें एकाकी पणाचं दुःख किती होत हे आज लक्षात येतंय… अर्थात हे लक्षात येण्याचं तें वयही नव्हतं..तिच्या अफाट आठवणी सोबत होत्या…
आज भरल्या डोळ्यांनी वृद्धाश्रमात शिरताना दरवाजा धूसर दिसायला लागला होता… आणि एकदम भास झाला…”बाळा लाडू खातोस?” आणि डोळे घळाघळा वाहायला लागले….
कदाचित तिने हे यमाला पण विचारलं असेल…आधी खाऊन घेतोस मग जाऊ……तिचा प्रेमळ चेहरा डोळ्यासमोर आला आणि खच्चून ओरडावस वाटलं मैनाज्जी लाडू हवाय भूक लागली आहे.
********
समाप्त
© रमा (रेश्मा डोळे )
सदर कथा लेखिका रमा (रेश्मा डोळे ) यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा

Leave a Comment

error: Content is protected !!