वादळातील वाटा

© अनुराधा पुष्कर
मयुरी आणि रितेशचं लग्न थाटामाटात झालं. संसार छान सुरु होता. रितेश एका मोठ्या कंपनीत कामाला होता.
मयुरीचंही शिक्षण झालं होतं पण सुरवातीला तिने घराच्या जबाबदाऱ्या आणि घरच्याना समजून घेण्यासाठी म्हणून नोकरी केली नाही.
दिवस फुलपाखरांसारखे उडून जात होते.
लग्नानंतर ३ वर्षात रितेशच्या नोकरीवर गदा आली. घरी खूपच मोठं तणाव सुरु झाला.
रितेश एकटाच कमवणारा होता आणि खाणारी तोंड ५ होती.
रितेश ,मयुरी ,सासू सासरे आणि रितेशची बहीण रिया.

अजून त्या दोघांनी स्वतःच्या कुटुंबाचा विस्तार केला नव्हता. एकदम अचानक असं वादळ आलं होतं.
रितेश आणि मयुरी दोघेही आता नोकरी शोधात होते. रितेशची चिडचिड खूप वाढली होती.
त्याला कस सांभाळावं हे मयुरीला कळतच नव्हतं. शक्य तेवढा ती प्रयत्न करत होती रितेशला सांभाळण्याचा ,घरच्याना सांभाळण्याचा.
घरातल सगळं बघून ती एका कोचिंग सेंटरला जाऊ लागली. तेवढाच काय तो हातभार संसाराला लागेल म्हणून.
त्यात रितेशला अजून राग यायचा. त्याचा पुरुषी अहंकार कुठं न कुठे सतत डोकावत राहायचा.

मयुरीने दुर्लक्ष केले होत ह्या सगळ्याकडे. तिला आशा होती कि सगळं काही पुन्हा सुरळीत होईल आणि तिची प्रार्थना ,तिची आशा फळाला आली. रितेशला ८ महिन्यानंतर नोकरी मिळाली.
आता परत घरात हसरं वातारवरण होतंं .
पण लगेचच चार महिन्यातच मयुरीच्या सासर्‍यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
हसणारं घर परत एकदा कोलमडलं. ह्याही वेळेस मयुरी खंबीरपणे घरच्यांसाठी घरच्यांबरोबर उभी राहिली.
सासूबाई तर दुःखात बुडाल्या होत्या ..रितेशच्या डोक्यावरचे आधाराचे छप्पर गेले होते. रिया तर कोमेजून गेली होती.
आता संसारात एक पाहुणा येणं गरजेचं होतं.

रोजचे व्यवहार हळू हळू परत सुरु झाले. वर्षश्राद्ध झालं ..ह्याही वादळातून तिने घरच्याना बाहेर काढले.
रितेश आणि मयुरीने आता आई बाबा होण्याचे ठरवले.
आधी त्यासाठी त्यांनी डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घेतली. तपासणीत सगळं व्यवस्तिथ होतं पण काही केलं तरी मयुरीला दिवस राहत नव्हते.
बाहेरच्या लोकांबरोबरच आता घरी सासूबाईही बोलू लागल्या होत्या. “आधीच निर्णय घ्यायला हवा होता ,आमचं कोण ऐकत पण ..”असं एक ना दोन बरेच टोमणे तिला ऐकायला मिळत असत.

आता मयुरी कोलमडू लागली. स्वतःला सावरायला पण तिला जमेना. आलेलं वादळ मोठं होतं. पुढे काय ते काही सुचत नव्हते.
रितेशहि गप्प असायचा. सासूबाईंनी तर एकदा रितेशच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विषय काढला तेव्हा मयुरीचा बांध सुटला आणि हुंदके देऊन ती रडायला लागली.
असेच काही महिने गेले .
एका मागे एक वादळं येतच होती. त्यातच रियाचं जमलेले लग्न मोडले. मयुरीने स्वतःचं दुःख बाजूला ठेवून परत एकदा रियाला आणि रितेशला सावरले.

सासूबाईंचा अबोला मधून मधून अजून सुरूच होता .. तिला काय करावे काहीच कळेना..
बरेच जप जाप झाले ,पूजा हवन सगळं करून झालं पण काही उपयोग झाला नाही.
ते म्हणतात ना संकट जेव्हा येतं तेव्हा चारही बाजूने येतं, तसंच काहीसं झालं होतं..
आणि त्यादिवशी ..सोमवार ची सकाळ …रोजच्या प्रमाणे सकाळची काम चालू होती …पण आज मयुरीचं चित्त थाऱ्यावर नव्हत. सारखं मन सैरभैर होत होतं. भीती वाटत होती कशाची तरी ….सगळीकडे खूप शांतात जाणवत होती .आज काय होणार ? जणू काही अघटित होणार असं राहून राहून वाटू लागलं नवीन तर काही संकट येणार नाही ना असे अचानकच मयुरीला वाटू लागले.

तीचं लक्षच लागत नव्हतं. कसतरी सगळं आवरून तिने रितेशला डब्बा दिला आणि तो कामावर गेला.
मयुरी जरा वेळ बेडरूम मध्ये जाऊन झोपली. तिला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. घरात तर कोणीच नव्हते ..सासूबाई आणि रिया गावाला गेले होते.
सोसाट्याचा वारा सुटला होता…..घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज भयानक होता. ती झटकन उठली आणि दोरीवरचे कपडे काढले तेवढ्यात जोरदार पाऊस सुरु झाला. खूप मोठ वादळ सुरु झालं होत.
हे वादळ तिच्या घरी येऊन धडकलं ,तिचा फोन वाजला …

रितेश च्या अपघाताची बातमी आली. मयुरीच्या पायाखालची जमीनच सरकली . ती मटकन सोफ्यावर बसली, तिला काही सुचत नव्हते ,स्तब्ध झाली होती.
कोणाला बोलवावं ?काय करावं ?काय झाले असेल ?कसे झाले असेल सगळ्या प्रश्नांनी डोक्यात गर्दी करायला सुरवात केली.
घरी एकटीच..शब्द सापडत नव्हते …मोठ्याने ओरडायचं होत पण आवाज निघत नव्हता .. जीव गुदमरला होता तिचा.
कसतरी करत ती उठली ,डोळे पुसले आणि निघालं निघाली.
हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितले तर तो बेड वर पडलेला होता. खूप लागलं होत त्याला.
डॉक्टरांनी सांगितलं कि आता ह्याला चालता येणं मुश्किल आहे ..परत एकदा मयुरीच्या खांदयावर सगळी जबाबदारी आली ..

आता मात्र तिला काय करावं काहीच कळेना ..शून्यात नजर लावून बरेच तास बसून होती ….घरी येऊन स्वतःला एका खोलीत डांबून घेतलं होत तिने ……अश्रू अनावर झाले होते …तिन डोळ्यातल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली आणि हंबरडा फोडला …
मन पूर्ण मोकळं होईपर्यंत रडून घेतलं.
रडून रडून इतकी थकली कि त्यातच केव्हा झोपली तेही कळलं नाही.
पहाटे जाग आली तेव्हा पक्ष्यांची किलबिल ऐकू आली …बेडवर उठून बसली .

सगळीकडे शांतात होती ….रोजच्याप्रमाणे सूर्य उदयाला आला होता, त्याची कोवळी किरणे झाडांवर फुलांवर पडली होती …पावसाच्या पाण्याचे थेंंब जे पानावर पडले होते ते चमकत होते …..ती अशीच शांत झाली होती आणि सगळं दृश्य बघत होती ..
“काल एवढ मोठं वादळ आलं सगळं काही हलवून गेलं ..जी झाड कमकुवत होती ती उन्मळून पडली ….ज्यांनी मातीत पाय घट्ट रोवले होते ती झाडं अजूनही तशीच उभी आहे ..आलेलं वादळ त्यांचं काहीच बिघडवू शकल नाही ….ते पक्षी त्यांचं घरटं सुद्धा मोडलं पण आज ते परत घरटं बांधत आहेत ..त्यांनी हार नाही मानली …मग मी कशी हार मानू शकते?
कालच अपघातात रितेशचा जर प्राण गेला असता तर ..तर केवढा अनर्थ झाला असता ..त्याच्या पायातली शक्ती गेली आहे पण आज तो माझ्यासमोर आहे हे काही कमी आहे का ?नाही.

मला असं हार मानून चालणार नाही. आता मलाच त्याचा आधार बनायची गरज आहे. पुन्हा नव्याने घरटं उभं करायची गरज आहे “-ती स्वतःशीच निश्चय करून खोलीच्या बाहेर आली . 
सगळं आवरलं आणि हॉस्पिटलला आली. रितेशशी बोलली. त्याला आधार दिला.
बरेच दिवस असेच सुरु होतं ..आता सासूबाई पण जास्त काही बोलत नव्हत्या.
घरातली जबादारी ,बाहेरची नोकरी ,आणि रितेशची तब्बेत सगळं काही हिमतीने पार पाडलं.
तिने हळू हळू रितेशला पूर्ण बर केलं. तब्बल एक वर्षानंतर आता तो काठी घेऊन उभा राहत होता.
घरातल्या घरात चालायचं प्रयत्न करत होता.

त्यालाही कुठेतरी मयूरीचं कौतुक वाटत होतं.
आपल्यासाठी सतत झटणारी ,नेहमी सोबतीने उभी राहणारी मयुरी.
आपण तिला काहीच देऊ शकत नाही ह्या विचाराने कधी कधी तो खचून जात असे पण मयुरीने पक्के ठरवलं होत कि काहीही झालं तरी ती परिस्थितीपुढे झुकणार नाही..आणि एके दिवशी तिने घरच्याना तिचा निर्णय सांगितला ,
“रितेश ,मी मूल दत्तक घेण्याचं ठरवलं आहे …. ह्या जगात अशी कित्येक मुलं आहे ज्यांना आई वडिलांच प्रेम मिळत नाही .अशाच एखाद्या जीवाला मी आईची माया देणार आहे . त्याला हक्काचं घर देणार आहे ..”

तिला वाटलं होत सासूबाई नाराज होतील ..संमती देणार नाही पण काय आश्चर्य ! त्यांनी कौतुकाने तिची पाठ थोपटली.
“मयुरी तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच ..केवढी वादळं ह्या घरावर एकामागोमाग आली पण तू तरीही घट्ट पाय रोवून उभी राहिलीस …आम्हा सगळयांना सावरलंस…ह्या वादळ वाटेवरून न हार मानता चालत राहिलीस …..तुझा निर्णय योग्य आहे पोरी ..मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेहमी राहीन. ह्या आधी जेव्हा जेव्हा मी तुला बोलले त्यासाठी मला माफ कर …मी फक्त मुलाच्या प्रेमापायी वेडी होते. मला हे उशिरा समजलं कि मुलगाच नव्हे तर सून सुद्धा घराचा आधारस्तंभ बनू शकते…तू ते सिद्ध केलंय …आज मी रितेश ला भाग्यवान समजते कि त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली ..”-सासूबाई भरभरून बोलत होत्या.
तिचेही डोळे पाणावले होते.

मैत्रिणींनो ,एका गृहिणीच्या आयुष्यात रोजच नवे आव्हान, नवे वादळ येत जात असते …पण ती मात्र आपले पाय घट्ट रोवून उभी असते घर सावरायला, न डगमगता ,न हारता लढत असते,तिच्या मुळेच एक घर उभं असत कायमच ……आणि त्या वादळातूनच नव्या वाटा शोधात असते …..
हि कथा लिहण्यामागे हाच उद्देश होता कि अशा अनेक मयुरी आहेत ज्या रोजच लढतअसतात. नव्या नव्या वादळांना सामोऱ्या जात असतात ,पण त्या हार मानत नाहीत. मोठे वादळ सुद्धा त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही …..त्यामुळे तुम्हीसुद्धा हार मानू नका…लढत राहा यश नक्की मिळेल .
मी फक्त एवढच म्हणेन कि,
“कधी काळोख भिजला ,कधी भिजली पहाट
हुंकाराला नदीकाठ ,कधी हरवली वाट
वारपावसाची गाज, काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट “
(वरील पंक्ती ह्या वादळवाट मालिकेच्या आहेत ..खूप सुन्दर गाणं आहे ..जरूरऐका ‘)
© अनुराधा पुष्कर

सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा

Leave a Comment

error: Content is protected !!