धगधगते वास्तव

© वर्षा पाचारणे
शाळेची घंटा वाजली आणि ती धावत वर्गात शिरली… उशीर झाल्याने खूप धास्तावलेली.. ‘आता गुरुजी ओरडणार तर नाहीत ना?’, म्हणून डोळ्यात अश्रूंनी दाटी केलेली… नववीत शिकणाऱ्या मुक्ताला दरदरून घाम फुटला होता. कारण देशमुख गुरुजी होतेच कडक शिस्तीचे… त्याच्या सामान्य बोलण्यातही एक विशेष दरारा असायचा.. अन् रागावल्यावर तर विचारता सोय नव्हती..
गुरुजी वर्गात पोहोचले.
मुलांनी ‘एक साथ नमस्ते’ वगैरे करून झाल्यावर गुरुजींनी हातातील डस्टर समोरच्या बाकावर जोरात आपटताच त्याची धूळ आजूबाजूला उडाली.. मग शिकवायला सुरुवात करताच ‘आता गुरुजींनी कालचा गृहपाठ तपासायला मागितला तर काय करायचे?’, असा विचार मुक्ताला पुन्हा गोंधळात टाकू लागला.

दोन दिवसापासून आईची तब्येत बरी नसल्याने घरातील कामाचा भार मुक्तावर येऊन पडला होता. त्यामुळे त्या साऱ्या नादात ती गृहपाठ करायला विसरली होती.. पण हे सगळं गुरुजींसमोर बोलायची हिम्मत मात्र नव्हती.. त्यामुळे आता शिक्षा भोगणे अटळ होते, हे तिने जाणले होते. पण गुरुजी मात्र आज अतिशय शांत दिसत होते. त्यांनी ना गृहपाठ तपासला, ना मुक्ताला उशिरा आल्याचे कारण विचारले… शाळा सुटल्यावर गुरुजी निमूटपणे वर्गाबाहेर पडले, पण क्षणात काही आठवल्यासारखे  वाटून त्यांनी मुक्ताला आवाज दिला. मुक्ता खाल मानेने गुरुजींसमोर उभी राहिली.

गुरुजींनी तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि म्हणाले,” बाळा, मला माहित आहे, तुझी घरची परिस्थिती बेताची आहे… त्यात तुझी आई आजारी असल्याने घरची जबाबदारी तुझ्यावर येऊन पडली आहे. पण तरीही अभ्यासात खंड पडू देऊ नको.. या शाळेकडून, तुम्हा मुलांकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या.. त्या अपेक्षा कदाचित तुम्हाला त्रासदायक वाटत असतील आणि म्हणूनच”… एवढं बोलून गुरुजींनी चष्मा काढून डोळे पुसले अन् निघून गेले..
रोज कडक शिस्तीचे धडे देणारे गुरुजी आज गहिवरलेले पाहून मुक्ता देखील विचारात पडली.. काय झालं असेल गुरुजींना? का त्यांचे डोळे पाणावले होते? नेहमी आदरयुक्त दरारा वाटणाऱ्या गुरुजींमध्ये तिला जणू मायेचा ओलावा देखील पहावयास मिळाला होता. विचारांच्या तंद्रीत मुक्ता घरी परतली.

आईला धाप लागली होती. मुक्ताने आईला पाणी देऊन तिचं डोकं मांडीवर घेतलं. आईला थोडं बरं वाटल्यावर  तिने शाळेत घडलेली हकीकत आईला सांगितली..
“बाळा, गुरुजींची लांबच्या गावी बदली करण्यात आली आहे”. गुरुजींनी शाळेतील गलथान कारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सूड उगवण्यासाठी त्यांची बदली केली आहे.. गावच्या मुलांचं शिक्षण उत्तम रीतीने पार पडावं, यासाठी झटणारे ते शाळेतले एकमेव गुरुजी होते.. आणि आता तेच गेले म्हणल्यावर गावातील लांडग्यांचे शाळेचे वाटोळे करायचे प्रयत्न यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही “.

आईच्या बोलण्याने मुक्ताला रडूच कोसळलं. “म्हणून, मघाशी गुरुजी गहिवरले होते”. एका चांगल्या शिक्षकाला गमावण्याची किंमत फार मोठी असते, हे तिला आज प्रकर्षाने जाणवत होतं. त्या दराऱ्यात दडलेला निस्वार्थ मायेचा झरा आत्ता कुठे तिला गवसला होता आणि तोही इतक्या उशिरा.
दोन दिवसांनी वर्गात नवीन तरुण शिक्षक दाखल झाले.. शहरातून येत असल्याने त्यांचे राहणीमान गावापेक्षा खूप वेगळे होते.. मुलांना ओरडण्याऐवजी मुलांना किस्से, विनोद सांगून त्यांनी नववी दहावीतील विद्यार्थ्यांची अगदी अल्पावधीतच मनं जिंकली.. आता मुलं मुली मोकळेपणाने नवीन आलेल्या संजय सरांबरोबर  गप्पा मारायची. गुरुजी म्हटलेलं आवडत नसल्याने ‘मला संजय सरच म्हणा’, असं त्यांनी आल्याबरोबरच सांगून ठेवेलं होतं.. आता शाळेत कुठलीही समस्या उद्भवली तरी आधी संजय सरांकडे मुले धाव घेऊ लागली.

संजय सरांशिवाय आता मुलांचं पानही हलत नव्हतं. ‘मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी मी त्यांना पुस्तके वाचायला देणार आहे’, असे सांगून सरांनी याच नववी दहावीत शिकणाऱ्या अवखळ वयाच्या मुलांना प्रेम कथा वाचायला दिल्या. मुली मात्र त्यानंतर संजय सरांपासून थोडं अंतर राखून वागायला लागल्या.
हळूहळू संजय सरांचा मोकळेपणाचा स्वभाव मुलींना जाचक वाटू लागला. कारण वही घेण्याच्या निमित्ताने मुलींच्या हाताला नकोसा स्पर्श करणं, एकटी मुलगी बघून नको तसे विनोद करणे, इतरांचे लक्ष नसताना एखाद्या मुलीकडे पाहून विचित्र हावभाव करणे या गोष्टी संजय सरांकडून सातत्याने होत असल्याने त्यांच्या मनातील विचित्र हेतू आता मुलींना जाणवू लागला होता.

मुक्ता ची आई आजाराने पुरती खंगली होती. आई आणि मुक्ता दोघीच राहत असल्याने मुक्ताला ही परिस्थिती असह्य होऊ लागली होती. आईचं दुखणं बघवत नव्हतं. अशातच शाळेत उदास बसलेल्या मुक्ताला आज सरांनी ‘थोडावेळ जास्त अभ्यास करायचा आहे’, असं शाळा सुटल्यावर तिला वर्गात थांबायला सांगितलं. सरांनी सांगितल्यावर ऐकायलाच हवं म्हणून मनात नसतानाही मुक्ता कशीबशी वर्गात बाकावर बसून राहिली. थोड्याच वेळात संजय सर त्यांचे काम आटोपून वर्गात आले. शाळेत आता इतर कोणीही नव्हते. मुक्ता मनातून फार घाबरली होती.
संजय सर तिच्या जवळ आले. मुक्ताच्या जवळ जाऊन बसले, तशी मुक्ता थोडी बाजूला सरकली.

“अगं, घाबरतेस काय? तुझ्या आईची तब्येत बरी नाही असं कळलं. घरी दुसरं कोणी मदत करणारं नाही, हेही मला माहित आहे आणि म्हणूनच हे पैसे ठेव… वेळी-अवेळी उपयोगी पडतील”, असं म्हणत संजय सरांनी मुक्ताच्या हातात पाचशे रुपये सरकवले. आता मात्र मुक्ताला रडूच कोसळलं… आधीच घरच्या परिस्थितीने बेजार असलेली मुक्ता कुठेतरी मन मोकळं करू पाहत होती. ती ढसाढसा रडू लागली. संजय सरांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पण मुक्ताला त्यावेळी देशमुख सरांची प्रकर्षाने आठवण आली. देशमुख सरांनीदेखील जाताना इतक्याच मायेने मुक्ताची विचारपूस करून तिच्या डोक्यावरून हात फिरवला होतं.

संजय सरांनी तिला घट्ट जवळ ओढलं.. “घाबरू नकोस, कधीही काही मदत लागली तर मला हक्काने सांग. शाळेतील सर म्हणून नाही तर एक मित्र म्हणून सांग”, असं म्हणत तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत ‘आता हास पाहू”, असं म्हणत तिला घरी जायला सांगितले.. आईच्या औषधांसाठी पैसे लागत असल्याने मुक्ताने संजय सरांना वाकून नमस्कार केला आणि मनापासून आभार मानले. इथेच संजयच्या मनातील वाईट विचारांची जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. गरिबाच्या अडीनडीचा फायदा घेणारं जग गरिबाला कधी उध्वस्त करून टाकतं हे कळतही नाही..
आता दुसर्‍या दिवशीपासून संजय सर रोजच काहीना काही निमित्ताने मुक्ताला शाळा सुटल्यावर थांबवून घेत होते. मानसिक आधार देण्याच्या निमित्ताने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. ‘एकमेकांना मिठी मारणं म्हणजे काही गैर नाही, तर आपल्या सोबत कोणी तरी भक्कम आधाराप्रमाणे आहे’, असं त्यांनी मुक्ताच्या मनावर बिंबवलं होतं आणि त्यामुळेच हे मीठी प्रकरण आता रोजचंच झालं होतं.

मुक्ताही आता संजय सरांबरोबर अगदी मोकळेपणाने वागू बोलू लागली होती. संजय सर सोबत असले की तिला घरच्या परिस्थितीचा थोडातरी विसर पडत होता. संजय सर जास्त अभ्यास करून घेण्याच्या निमित्ताने रोज शाळेतील त्या वर्गाची चावी स्वतःकडेच ठेवत होते. मुक्ताच्या घरची परिस्थिती सगळ्यांनाच माहित असल्याने अशा हुशार विद्यार्थिनीला जरा जास्त मार्गदर्शन मिळालं, तर शाळेचे नावही मोठे होईल हे सांगून शाळेतील वरिष्ठांची देखील संजय सरांनी परवानगी मिळवली होती.
आज मुक्ता शाळेत आली नव्हती. त्यामुळे संजय सर अगदीच बेचैन झाले होते. त्यांचे शिकवण्यात लक्ष लागत नव्हते. शाळा सुटताच ते मुक्ताच्या घरी पोहोचले. मुक्ताची आई अंथरुणावर पडली होती. मुक्ताची मावशी देखील घरात काम करत होती. कसलीतरी सामानाची आवरा आवर करत असल्याचे दिसताच संजय सरांनी मुक्ताच्या आईला त्याबद्दल विचारणा केली.

“सर, आम्ही गरीब माणसं…  ना कोणाचा आधार ना जवळ पैसा पाणी.. पण त्या दिवशी तुम्ही देव माणसासारखे धावलात. तुम्ही दिलेल्या पैशातून मुक्ताने औषध पाणी आणलं.. पण असं दुसऱ्यावर तरी किती अवलंबून राहणार. मुक्ताची या सगळ्यात खूप फरफट होते आणि म्हणूनच मुक्ताची मावशी आम्हांला शहरात तिच्या घरी घेऊन जायला आली आहे.. तिच्यावर पण भार नको, म्हणून इतके दिवस मी जाणं टाळत होते.
पण आता मात्र मुक्ताची अवस्था मला बघवत नाही. कमी वयात जबाबदारीच्या ओझ्याने पोर पुरती वाकली आहे. तिकडे गेल्यावर शाळेत जायचं का नाही ते बघू… पण निदान जगण्यातल्या अडचणी तरी थोड्याफार प्रमाणात कमी होतील.
“अहो आई, पण मुक्तासारखी हुशार विद्यार्थिनी अशी शाळा सोडून गेली तर सगळ्यांनाच फार वाईट वाटेल आणि तुमच्या बोलण्यातून मला जाणवतंय की तुम्हाला बहिणीच्या घरी देखील असं ओझं बनून राहायला आवडणार नाही.

म्हणून तुमची तब्येत बरी होईपर्यंत तुम्ही तिच्या मावशीकडे नक्कीच जा. मुक्ताचं दहावीचं वर्ष सुरू होईल. आता मध्येच शाळा सोडली तर पुढचं शिक्षण थांबलंच असं समजावं लागेल.. त्यापेक्षा मी माझ्या ओळखीच्या आश्रम शाळेत तिची सोय करतो. अगदी घरच्याप्रमाणे जातीने लक्ष ठेवतो. पण तिच्या शिक्षणात असा खंड पडू देऊ नका”… “काय ग तुला जायचं आहे का मावशी बरोबर का शिकायचं आहे पुढे”, असे विचारताच मुक्ताने आईकडे पाहिलं..
“आई सर म्हणतात तसं तू एकटी जाशील का ग मावशी बरोबर?.. मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. देशमुख सरांनी जाताना माझ्यावर जो विश्वास दाखवून मला खुप शिक असा सल्ला दिलाय तो सार्थ करायचा आहे.. अर्ध्यावर शिक्षण सोडून पुढचं आयुष्य नरक बनण्यापेक्षा शिकून मोठं होऊन तुला सुखात ठेवायचं आहे”, असं म्हणत मुक्ता मुळूमुळू रडू लागली

आईने देखील डोळ्याला पदर लावला. “मोठी झालीस पोरी.. आईच्या सुखासाठी किती झटतीस अगं.. संजय सरांसारखा भला माणूस असताना मला खरंच काळजी नाय”… असं म्हणून आईनेही पोटच्या लेकराला आश्रम शाळेत ठेवण्यासाठी परवानगी दिली.
“आणि तुम्ही काहीच काळजी करू नका.. दर दोन दिवसांनी तुमची हीच मुळूमुळू रडणारी लेक तुम्हाला गावातल्या टेलिफोन बूथ मधून फोन करून स्वतःची ख्यालीखुशाली कळवेल हा माझा शब्द आहे. मग काय मावशी, देताय ना तुमचा शहराकडचा नंबर”, असं म्हणत संजय सर हसले तसं वातावरण थोडं हलकं झालं…
दोन दिवसांनी मुक्ताची आई मावशी बरोबर जाणार असल्याने संजय सरांनी अगदी पोटच्या लेकाप्रमाणे सामानाची आवरा आवर आणि इतर थोडीफार मदत करत मुक्ताच्या आईचा विश्वास कमावला.

जाताना मुक्ताच्या आईने संजय सरांसमोर हात जोडत ‘सर आता तुमचाच आधार… तुमच्या आधीचे देशमुख गुरुजी पण लई चांगले होते.. लेकरांच्या भल्यासाठी दिवस-रात्र झटला तो माणूस, पण बिचाऱ्याची बदली करण्यात आली.. तुमच्यात पण मला तसाच देव माणूस दिसतो’.. असं म्हणून डोळे पुसत पुन्हा एकदा संजय समोर हात जोडले..
आईला एसटीत बसवून मुक्ता आणि संजय सर माघारी फिरले. संजय सरांबरोबर आश्रम शाळेत जायचं असल्याने स्वतःबरोबरची कपड्यांची पिशवी आणि वह्या पुस्तकांचे दप्तर एवढंच काय ते सामान घेऊन मुक्ता निघाली. एका ओळखीच्या आश्रम शाळेत संजय सरांनी मुक्ताला सोडले ‘अगदी घरच्याप्रमाणे काळजी घ्याहा ताई तिची’, असे सांगून संजय सर निघाले.

त्याबरोबर मुक्ता धावत संजय सरांकडे आली आणि म्हणाली ,” सर आश्रम शाळा तर गावापासून खूप लांब आहे. मी इथुन शाळेत कसे जाणार”. त्यावर सर म्हणाले ,”उद्यापासून ती जबाबदारी पण माझी.. मी तुला गाडी घेऊन इथे घ्यायला येतो आणि पुन्हा सोडतही जाईल”. आता मात्र मुक्ता थोडी निर्धास्त झाली. आश्रम शाळेत तिच्यासारख्याच बऱ्याचशा मुली होत्या. दिवसभराच्या गप्पा नंतर त्यांची चांगलीच गट्टी जमली. घरातल्या वातावरणापेक्षा देखील मुक्ताला आज तिथे त्या मोकळ्या वातावरणात खूप छान वाटत होतं.
संजय सर आता रोज गाडी घेऊन मुक्ताला शाळेत ने आण करत होते. आता तो येण्या-जाण्याचा वेळ, पुन्हा शाळा सुरू असतानाचा वेळ आणि शाळा सुटल्यावर जास्त अभ्यास करायच्या निमित्ताने मुक्ताला थांबून घेतलेला वेळ मिळत असल्याने, मुक्ता दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ संजय सरांबरोबर घालवत होती..

संजय सरांची दिवसागणिक काहीना काही कारणावरून जवळीक वाढत चालली होती आणि एक दिवस सरबतातून गुंगीचे औषध देऊन अचानक संजय सरांनी मुक्ताला अगदीच घट्ट मिठीत ओढल. तशी मुक्ता बावरली. ती प्रतिकार करू लागली.. पण औषधाच्या परिणामामुळे तिच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. आणि त्याचाच फायदा घेत संजय सरांनी मात्र स्वतःचा वाईट हेतू साध्य केला. आणि पुन्हा मुक्ता शुद्धीवर आल्यावर ,’काय गं मुक्ता, चक्कर वगैरे आली होती का काय?’, असेल काळजी घेतल्याचा आव आणत विचारत त्यांनी दिला आश्रम शाळेत सोडलं.
आता दर आठ दिवसांनी संजय सरांचे हे प्रताप सुरु झाले. शाळेच्या शिपायाला याची थोडीशी खबर लागताच संजय सरांनी त्यालाही आपल्या दुष्कृत्यांत सामील करून घेतले आणि मग वासनेने बरबटलेल्या शिपायाने देखील पुन्हा तेच पाशवी कृत्य मुक्ता बरोबर करून स्वतःची वासना भागवली.

गुंगीत असताना आपल्यासोबत काय होतंय, हे कळत असूनही मुक्ता काहीच करू शकत नव्हती..
पण आता ती मनातून पूर्णपणे कोलमडली होती. संजय सरांपासून लांब जाऊ पाहत होती परंतु सहजासहजी तिला सोडेल तो संजय कसला! ‘या प्रकरणाची कुठेही वाच्यता केलीस, तर तुझ्या आईला सगळं काही खरं सांगेल’, असं सांगून तो तिला ब्लॅकमेल करत राहिला. दर दोन दिवसांनी तिला फोनसाठी पैसे देऊन आईला ख्याली-खुशाली कळवायला सांगत होता. फोनवर संजय सर स्वतः देखील बोलत असल्याने आईदेखील तिकडे निर्धास्त होती. पण तिकडे लेकीची अवस्था किती वाईट आहे, याची मात्र तिला कल्पना नव्हती.

शहरात दिवसागणिक आईची तब्येत खालावत गेली आणि एक दिवस तिच्या मृत्यूची बातमी मुक्ताला समजली.. आता तर या जगात आपलं कोणीच राहिलं नाही, या विचाराने ती पुरती कोलमडली. आईला या प्रकरणाची माहिती देइल असे सांगून ब्लॅकमेल करणाऱ्या संजय सरांना आता घाबरण्याचे काहीच कारण नव्हते, हे तिने जाणले आणि हणूनच तिने हे प्रकरण आश्रम शाळेत कोणाला तरी सांगावे असे ठरवले. परंतु त्याआधीच आज तिच्या पोटात दुखू लागल्याने तिची तब्येत बिघडली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुक्ता प्रेग्नंट असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
संपूर्ण आश्रम शाळा या प्रकरणाने हादरली. ‘कसं शक्य आहे! इथे फक्त महिलावर्ग कार्यरत होता. आश्रम शाळेत निवासी म्हणून राहणाऱ्याही फक्त मुलीच होत्या. मग हे असं झालं तरी कसं? कोणी फसवलं मुक्ताला?’… आश्रम शाळेच्या संचालिका मुक्ताला काकुळतीने विचारत होत्या, पण मुक्ता केवळ अश्रूंना वाट करून देत होती.

तोंडातून शब्द फुटत नव्हता. स्वतःचीच घृणा वाटत होती.. मनात विचारांचे कोलाहल माजले होते. संपवून टाकावं आयुष्य हा एकच विचार आता डोकं वर काढत होता.
आश्रम शाळेतील बाईंनी तिला आधार देऊन थोडे निर्धास्त केले आणि जो कोणी तुझा फायदा घेत असेल त्याला कायद्याने शिक्षा होईल, असे आश्वासन दिल्यानंतरही मुक्ता काहीच बोलत नव्हती. आणि इतक्यात तिची नजर रस्त्याकडे गेली.
“देशमुख गुरुजी!… हो देशमुख गुरुजीच आहेत ते”.. असे म्हणत ती धावत रस्त्याच्या दिशेने पळू लागली. देशमुख गुरुजींना तिने वाकुन नमस्कार केला आणि ढसाढसा रडू लागली..

“अगं मुक्ता, तू इकडे कशी आज? शाळा नाही का तुला?”, देशमुख गुरुजींनी असं विचारताच मुक्ताने आईच्या निधनासकट मध्यंतरीच्या काळात घडलेला सारा प्रकार देशमुख गुरुजींना सांगितला. देशमुख गुरुजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली… हा आणि असेच कितीतरी गलथान कारभार समूळ नष्ट करण्यासाठी आणि शाळेतील भयाण वास्तव जगासमोर आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या देशमुख गुरुजीना म्हणून तर बदलीच्या नावाखाली तिथून हटवण्यात आले होते..
आज मात्र या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच, असे ठरवून देशमुख गुरुजी मुक्ताला आणि आश्रम शाळेच्या संचालिकेला घेऊन शाळेत पोहोचले. आपल्याला कोणीही तिथे दाद देणार नाही, या विचाराने त्यांनी पोलिसांनाही सोबत घेतले होते. सारेजण शाळेत पोहोचताच संजय सरांच्या नावाने आरडाओरड सुरू झाली.

पण संजय च्या कटात सामील असलेल्या त्या विकृत शिपायाने आधीच शाळेत वर्दी दिल्याने संजय सर मात्र पसार झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापकापासून शिपायापर्यंत आणि नुकत्याच मिसरूड फुटू लागलेल्या मुलांपर्यंत सगळ्यांना थोड्याफार फरकाने अशा विकृत वागण्याची चटक लावलेल्या संजय सरांनी मात्र राजीनामा देऊन काही वेळापूर्वीच तेथून कायमचा पळ काढला होता. राजीनाम्यावर मुख्याध्यापकांच्या संमतीने महिनाभर आधीची तारीख लिहीली असल्याने ,’संजय सर आता कुठे असतील याची काहीच माहिती नाही’ असे सांगून मुख्याध्यापकांनी देखील हात वर केले. गावातील धनिकांना हाताला धरून पैशाच्या जोरावर हे प्रकरण जागच्या जागीच दाबले गेले. आश्रम शाळेतील संचालकेला देखील आश्रम शाळेच्या बदनामीची भीती दाखवत तोंड बंद ठेवण्यास भाग पाडले.

आधीच बेताची परिस्थिती, आईचे आजारपण, नंतर आईचे निधन आणि… आणि दरम्यान सतत झालेला बलात्कार.. यामुळे मुक्ताची खंगलेली मानसिक आणि शारीरिक अवस्था काही केल्या सुधारलीच नाही. आश्रम शाळेतील संचालिकेने मानसिक भावनिक आधार देण्याचा खूप प्रयत्न करूनही दहावीची परीक्षा झाल्यानंतर मुक्ताने मात्र न्याय न मिळाल्याने शेवटचे टोकाचे पाऊल उचलले. तिने आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकण्याचा प्रयत्न केला. बदनामी आणि दुःख यांनी  विचारांवर मात केली आणि शेवटी मुक्ताचा अंत झाला. नाहक बळी गेलेल्या विद्यार्थिनीला पाहून आणि जिवापाड प्रयत्न करून आदर्श ठरवू पाहणाऱ्या शाळेचे असे अधःपतन होताना पाहून, सत्यावर असता त्यांनी मिळवलेला विजय पाहून देशमुख गुरुजींना वेड लागले..

समाजातल्या विकृतीने सत्यावर, संस्कारांवर मात केली होती. गाव गुंडगिरीच्या दिशेने प्रवृत्त झाला होता. एक भयाण वास्तव सर्वदूर पसरलं होतं.. पण वेडाच्या भरातही देशमुख गुरुजी मात्र आजही त्यांच्या लाडक्या विद्यार्थिनीला आणि शाळेला उद्ध्वस्त करणाऱ्या संजयला शोधताना गावाच्या वेशीवर फाटक्या मळक्या कपड्यात, जटा वाढलेल्या अवस्थेत फिरत आहेत… फक्त न्यायासाठी… जो  न्याय आता खरंतर त्यांच्यासाठी मृगजळ ठरला होता…
‘वाचकहो, समाजात आजही कितीतरी ठिकाणी बलात्कार होऊनही आरोपी मात्र उजळ माथ्याने फिरताना दिसतात.. कित्येक संस्थांमध्ये तत्त्वांनी वागणाऱ्या माणसांनाच डावलले जाते आणि स्वार्थाने बरबटलेल्यांचा उदोउदो केला जातो. सत्य अनेकांना नकोसे झाले आहे आणि असत्याची कास धरून समाज गुन्हेगारी प्रवृत्ती आणि विकृतीकडे ओढला जात आहे.. हे सारं कधी थांबेल, सांगता येत नाही. आणि तोवर अशा किती मुक्तांचा बळी जाईल, याची गणनाही करता येणार नाही.

आणि म्हणूनच समाजात वावरताना स्वसंरक्षण, निर्भयता आणि प्रसंगावधान या गोष्टींची नितांत गरज आहे. कुठल्याही भीतीपोटी अन्याय अत्याचाराला लपवण्यापेक्षा त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला तरच गुन्हेगारीला किमान थोड्या प्रमाणात का होईना पण आळा बसेल.
© वर्षा पाचारणे
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा

Leave a Comment

error: Content is protected !!