परंपरा

© तृप्ती देव
आज सायली सकाळ पासून अस्वस्थच होती.
आठ दिवसांवर दिवाळी आली, पण दिवाळीच्या तयारीत तीचं मनच  लागत नव्हतं आणि त्यात मुलंही मागे लागली होती की बाजारात जाऊन कपडे, फटाके, दिवाळीची खरेदी करू म्हणून.
मुलांचा हट्ट होता पण दरवर्षी प्रमाणे सायली उत्साही नव्हती.
का कोणास ठाऊक  पण आज तीचं मन जुन्या आठवणीतच रमलं होतं.
तिचा पहिला दिवाळ सण…..तिच्या डोळ्यासमोर सगळ्या आठवणी एक एक करत येऊ लागल्या.   

लग्नानंतरची ती पहिलीच दिवाळी होती.
सासूबाईं सोबत खरेदी करायला खूप उत्साहाने बाजारात गेले होते. सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन खरेदी झाली. कोणाला काय हवं ते सगळं सासूबाईंनी घेतलं. पण मला काय आवडतं ते विचारलंही नाही त्यांनी.
माझ्यासाठी म्हणून काहीच खरेदी केली नाही.
एकदा वाटलं आपण बोलावं आवडलेल्या साडीबद्दल. पण मला जाणवत होतं की माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष होतंय.
त्यात त्यांची एकुलती एक लाडकी लेक, तिचा पण दिवाळ सण. मग तिच्या आवडीचं काय हवं नको तेही सगळं खरेदी केलंं. 

त्याच वेळेस एक सुंदर मोत्याची नथ मला आवडली. मी ती नाकात घालून पहिली, पण दोनदा हातात घेऊनही नको नको म्हणत परत ठेवली आणि सासूबाईं सोबत परत खरेदीला सुरवात केली. 
दोन तीन दिवस अशीच खरेदी सुरु होती. मी माझ्या आवडीच्या रंगाचे कपडे बघायची,  पण नेमका सासूबाईंना दुसराच रंग आवडायचा. मग मी परत ठेऊन दयायची. कदाचित माझी आवड त्यांना योग्य वाटत नव्हती.
तीनचार दिवसांच्या खरेदी नंतर घरातली सगळी तयारी, पुजेची रांगोळी, डेकोरेशन, दिवाळीचा फराळ, घरातील साफसफाई.. न थकता नेटाने उत्सहाने सगळं व्यवस्थितपणे शिस्तीने केलं सासूबाईंनी.

मला जमेल तशी मी मदत करायची आणि सासूबाई सांगितलं ते सगळे काम करायचं प्रयत्न सुरु होता माझा. आण त्यांच्या हाताखाली हळूहळू मी शिकत होते घराच्या जवाबदाऱ्या. आणि दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आला. सकाळ पासून  कामाची घाई गडबड.
दिवाळीचं लक्ष्मीपूजन पण झालं. नणंद, जावई, नणंदेच्या सासरचे सगळे जण आले होते दिवाळ सणाला.
दुपारच्या जेवणाची सगळी जय्यत तयारी झाली. नणंदेचं आवडते  सगळेच  पदार्थ बनवून झाले. खास करून तिला आवडत तेच केले होते.
सगळे जेवायला बसले. 
सासूबाईंनी माझं आणि अवीचं पानही सोबतच वाढलं.

नाही नाही म्हणत सासूबाईंनी अवीला आणि मला पहिला दिवाळ सण म्हणून त्यांच्या सोबत जेवायला बसवलं.
ताटाभोवती रांगोळी, सुगंधित उदबत्ती.
वेगवेगळ्या पदार्थांच्या सुवासाने मन अगदी भरून गेलंं. आम्ही सगळे जेवायला बसलो.
नणंदेच्या पानात तिला आवडतात म्हणून खास घरी केलेल्या ओल्या नारळच्या करंज्या आणि सुरळीच्या वड्या वाढल्यानंतर सासूबाईंनी माझं ही पाना वाढलं.
माझ्या आवडीचे पदार्थ चिरोटे आणि पनीरची भाजी वाढली.

आणि हळूच मायेने माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या, “सावकाश जेव. तुझी आई करते तशी नसेल जमली  मला, पण तुझी आई ज्या प्रेमाने तुझ्याकरता करेल त्याच प्रेमाने ही भाजी केली आहे मी”
मला काहीच कळत नव्हतं. सासूबाईंनी हेंसगळे पदार्थ केव्हा बनवले? त्यांना कशी कळली माझी आवड?
सगळ्यांचे जेवण आटोपले.
मी हात धुवायला उठणार तेवढ्यात सासूबाई हळदीकुंकू घेऊन आल्या.
नवीन कपडयांना  हळद कुंकू लावून मला आणि नणंदेला एका ताटात  दिवाळीचा आहेर दिला .

मी तो आहेर हातात घेतला. हातात धुवून सासूबाईंच्या पाया पडल्यानंतर आहेर उघडून पाहिला आणि माझ्या डोळ्यात पाणीच आलं.
दिवाळीची खरेदी करताना  मला आवडलेली पर्स आणि अजून काही गोष्टी त्यात होत्या.
सोबत माझ्या आवडीच्या रंगाची साडी आणि मला दुकानात आवडलेली मोत्याची नथ पण दिली होती.
पण मला मात्र काहीच कळू दिलं नव्हतं. मला कशाचा थांगपत्ताही लागू न देता, किती सहजतेने सासूबाईंनी माझी आवड जपली होती. 
त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी मला त्या एक नवीन साडी आठवणीनी दिवाळीला आवर्जून घ्यायच्या.

गेली दहा वर्ष त्यांनी दिलेली साडी म्हणजे घरच्या लक्ष्मीचा मान होता आणि आमच्या नात्यातलं प्रेम होतं.
लक्ष्मी म्हणून..कागदी नोटा, पणत्या, दागिने, झाडू, वही पेन, सगळ्यांचंपूजन करायचं. निर्जीव आहेत माहित असूनही, मग
घराच्या गृहलक्ष्मीचं पूजन का नाही करायचं?
म्हणूनच दिवाळीला घरच्या लक्ष्मीचा मानही केला गेला पाहिजे अश्या विचारांच्या त्या होत्या.
त्यांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजनाचा अर्थच  घरच्या स्त्रियांचा मान म्हणजे लक्ष्मीचा सन्मान असा होता.
आणि त्यांची ही परंपरा आणि विचार दिवाळी सणाचा अर्थ सांगतो.

सायली आठवणीतून बाहेर आली, आज तिच्या सासूबाई तिच्या सोबत नव्हत्या. 
त्यांना जाउन आता एक वर्ष होईल आणि ही दिवाळी आता आपल्याला सासूबाईंशिवाय साजरी करायची आहे हा विचारच तिला करवत नव्हता.
मन घट्ट करून ती एकेक काम  उरकायला  लागली. दिवाळीच्या तयारीला लागली.
बघता बघता लक्ष्मीपूजनाचा दिवस आला.
घरात पूजा झाली. मुलांनी फटाके  उडवले. फराळाचे पदार्थ बनवले  नवीन कपडे घेतले मुलांसाठी आणि नेहमी प्रमाणे ती सासऱ्यांंच्या पाया पडायला त्यांच्या खोलीत गेली.

सासऱ्यांनी तिला आशीर्वाद दिला. दिवाळीच्या शुभेच्छा  दिल्या आणि कपाटात ठेवलेली साडी तिच्या हातात दिली.
तिला आवडते ती मिठाईही तिच्या हातावर ठेवली. 
सायलीच्या डोळ्यात पाणी जमा झालं. तिचे अश्रू अनावर झाले.
“तुझी सासू आज या जगात नाही. पण तिने मला सगळं शिकवलं. व्यवहार आणि घराच्या गृहलक्ष्मीचा मान कसा जपायचा, तिचा सन्मान कसा ठेवायचा हेही. जिथे  गृहलक्ष्मीचा आदर असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. तिची ही शिकवण आणि परंपरा आज मीं जपतोय. तिचा हया घरातला आदर असाच कायम असावा.

तिची परंपरा आहे  ही, तीच मी पूर्ण करतोय. ती नसली तरी  हया जगात तरी पण तिच्या हया  परंपराने ती कायम आपल्या जवळच आहे आणि पुढे तुलाही ही परंपरा जपयाची आहॆ.
घरात आलेली नवीन सून  तिला समजवून घ्यायचं आहॆ. तूझ्या सासूने तुला सून म्हणून कधीच अंतर दिल नाही आणि तू पण तिला सासू म्हणून कधीच समजलंच नाही. तुमच्या मायलेकीच्या नात्याची परंपरा तुला पुढे सांभाळायची आहॆ.”
” हो बाबा, मी कधीच हे विसरणार नाही” असं म्हणून सायलीने डोळे पुसले.
*******

वाचकहो,
ही कथा काल्पनिक असली तरी नातं जपणारी आहॆ. आईची जागा कोणाला देता येत नाही. सुनेला मुलगी समजणं सोपं नाही पण अशक्यही नाही. फक्त त्यासाठी आपला दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. एकमेकींच्या चुका सहजपणे सांगता आल्या पाहिजेत . आपली चूक असेल तर ती मान्य करून  मोठ्या मनाने माफ करून  आपला आयुष्य सोपं आणि आनंदी करता येते.
नात्यांत एकमेकांना समजवून घेतलं तर घराच नंदनवन होईल आणि त्यासाठीच्या काही चांगल्या परंपरा आपल्या आपणच निर्माण करायच्या आणि पाळायच्या.
© तृप्ती देव

सदर कथा लेखिका तृप्ती देव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा

2 thoughts on “परंपरा”

Leave a Comment

error: Content is protected !!