© सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
आईवडिलांच्या लाडानं, कोडकौतुकानं आस्था इतकी बिघडली की तिला दारूचं व्यसनच लागलं. त्या रात्री पार्टीहून परतताना नेमकं काय घडलं, ज्यामुळे आस्थाचं आयुष्यच बदललं.
रात्रीचे दोन वाजले होते. आस्था अजूनही घरी परतली नव्हती. आस्थाच्या आईच्या फाटकापासून घरापर्यंत फेऱ्या सुरू होत्या.
ती फार काळजीत होती. आस्थाचे वडील आपल्या स्टडीरूममध्ये काम करत होते. बायकोची बेचैनी त्यांना कळत होती.
ते एका फर्ममध्ये ऑफिसर होते. काम तसंच ठेवून ते स्टडीरूममधून बाहेर आले.
दिलासा देत बायकोला म्हणाले, ‘‘तू झोप आता…मी अजून जागा आहे. मी बघतो.’’
‘‘झोपू तरी कशी? झोप यायला हवी ना? आस्था ला समजावून समजावून थकले…पण तिला समजतच नाही…’’
तेवढ्यात कार थांबल्याचा आवाज आला. आस्था उतरली.
ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मुलाशी काहीतरी बोलली…जोरात हसली अन् घराकडे आली.
आई अन् पप्पाना जागे बघून म्हणाली, ‘‘ओह, आई पप्पा तुम्ही अजून जागेच आहात?”
“तुझ्यासारखी बेजबाबदार मुलगी असल्यावर झोप कशी येणार आम्हाला? तुला कुठे काळजी आहे आमची? आम्ही वाट बघतोय, कधी पासून तुझी.”
“आई – पप्पा, तुम्ही बदलत्या काळाबरोबर बदलत का नाही? “सायंकाळी सातच्या आत घरात’ असं नसतं हल्ली, तुम्ही उगाचच काळजी करत बसता.”
आस्थाच्या आईला – अस्मिताला झोप येत नव्हती.
डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एकुलत्या एका लाडक्या पोरीला कसं समजवायचं, हेच तिला कळत नव्हतं.
आस्था एकुलती एक मुलगी असल्यामुळे आजी – आजोबा, आई, वडील सगळ्यांकडून प्रेम अन् कौतुकच वाट्याला आलं होतं तिच्या. खरं तर आईवडिलांनी चांगलं वळण लावलं होतं, पण ती थोडी मोठी होता होता तिचं वागणं बदलत गेलं.
ती आत्मकेंद्री झाली. फक्त आपलाच विचार, लाइफ एन्जॉय करणं, अत्याधुनिक वेशभूषा, वागण्यात निर्लज्जपणा.
अस्मिता तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची, पण आस्था ऐकून न घेता भांडणं करायची. आईशीही अत्यंत वाईट भाषेत बोलायची.
आस्था आजोबांची फार लाडकी होती. त्यांनीच बाहेरगावी पाठवून तिचं शिक्षण केलं होतं.
ती आता एका चांगल्या फर्म मध्ये कामाला होती. भराभर दिवस उलटत होते. आस्था आपल्या मर्जीनं घरी यायची. केव्हाही निघून जायची. आईवडिलांच्या रागावण्याचा, बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.
त्यात कहर म्हणजे आजोबा तिला अधिकच लाडावत होते, ‘लहान आहे. येईल समज?…असं बोलत राहायचे.’
हल्ली ते आजारी असायचे. आपण आता फार जगणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली सर्व संपत्ती आस्था च्या नावे करून दिली.
एका रात्री ते जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. तिघांनाही फार वाईट वाटलं. खूप रडले.
कितीतरी दिवस सर्व नातलग येतजात होते. हळूहळू पुन्हा सर्व नॉर्मल झालं.
आस्थाने तसंही फार काही गांभीर्यानं घ्यावं असा तिचा स्वभाव नव्हता. आता तर आजोबांची सगळी संपत्ती तिच्या हातात आली होती. इतका पैसा बघून तर ती हवेतच तरंगत होती. तिनं आईवडिलांना न सांगता एक कार खरेदी केली.
अस्मिता म्हणाली, ‘‘एवढ्यात गाडी कशाला गं, घेतलीस? आम्हाला निदान विचारायचंस तरी?’’
‘‘मॉम, मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू द्या ना. लाइफ एन्जॉय करायचं आहे. गाडीमुळे मी आता स्वतंत्र आहे. रात्री कुणी सोडेल का ही काळजी नको. मी इंडिपेंडट झाले यात आनंद मानायचा सोडून कटकट काय करताय? आजोबांनी इतका पैसा दिलाय, तर मी आपल्या इच्छेनुसार का जगू नको?’’
‘‘अजून तुला गाडीची प्रॅक्टिस नाहीए. काही दिवस माझ्याबरोबर ड्रायव्हिंगला चल,’’ वडिलांनी म्हटलं.
‘‘आता गाडी घेतली आहे. तर प्रॅक्टिसही होईलच ना? माझं ड्रायव्हिंग लायसेन्सही तयार झालंय. आता तुम्ही दोघं थोडं रिलॅक्स राहायला शिका ना !’’
आता तर आस्थाच्या वागण्याला काही ताळतंत्रच राहिलं नव्हतं.
केव्हाही खायची, केव्हाही जायची. गाडी फारच जोराच चालवायची.
अस्मिता ने एकदा म्हटलं, ‘‘गाडी इतकी वेगात चालवू नकोस. मुंबईचं ट्रॅफिक अन् तुझा स्पीड…भीती वाटते गं…’’
‘‘मॉम, आय लव्ह स्पीड, आय एम यंग, वेगाने पुढे निघून जायला मला फार आवडतं.’’
‘‘तू पार्टीत डिंक्कस घेतेस, दारू पिऊन गाडी ड्राइव्ह करणं किती धोक्याचं आहे, कळतंय का तुला? भलतंच काही घडलं तर?’’ ‘‘ममा, मी थकलेय तुझा उपदेश ऐकून ऐकून, काही घडेल तेव्हा बघू ना? आत्तापासून काळजी कशाला?’’ रागानं आस्था गाडीची किल्ली घेऊन निघून गेली.
एका रात्री आस्था पार्टीत भरपूर दारू प्यायली. आपल्या नव्या ब्रॉयफ्रेंडसोबत, खूप डान्स केला. मग ती त्याला त्याच्या घरी सोडायला निघाली. गाडीपर्यंत येतानाही तिचा तोल जात होता. कशीबशी ती ड्रायव्हिंह सीटवर बसली.
त्याने विचारलं देखील, ‘‘तू कार चालवू शकशील ना? की मी चालवू.’’
‘‘डोंट वरी, मला सवय आहे.’’ आस्था ने असं म्हणत गाडी सुरू केली.
नेहमीप्रमाणे खूप वेगात. तिला भीतिही वाटत नव्हती की कोणाची काळजीही नव्हती.
अचानक तिचा गाडीवरचा ताबा सुटला अन् गाडी उलट दिशेला वळली. समोरून येणाऱ्या गाडीला तिने जोरदार धडक दिली गेली. दोन्ही गाड्यांमधून किंकाळ्या उठल्या…दोन्ही गाड्या थांबल्या…
दुसऱ्या कारमध्ये एक पुरुष ड्रायव्हर सीटवर होता. शेजारी बायको, मागच्या सीटवर मुलगा.
आस्थालाही खूप लागलं होतं. तिचा बॉयफ्रेंड खूप घाबरला होता. कसाबसा गाडीतून उतरला. आस्था ला बाहेर यायला मदत केली. समोरच्या गाडीपाशी ती दोघं पोहोचली.
आतलं दृश्य बघून आस्था ने हंबरडाच फोडला. तिघंही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले…
“आस्था संपलंय सगळं…आता पोलीस केस होईल…’’ तिच्या बॉयफ्रेंडने म्हटलं.
आस्थाची दारूची धुंदी खाडकन् उतरली. ती रडायला लागली.
‘‘सॉरी आस्था, मी काहीच करू शकत नाही. आता पोलीस केस होईल…प्लीज माझं नाव यात प्लीज घेऊ नकोस. माझे डॅडी मला घरातून हाकलून देतील. आय एम सॉरी, मी जातोय…’’ तिचा बॉयफ्रेंड असं बोलून पटकन निघू लागला.
‘‘काय?’’ आस्थाला धक्काच बसला, ‘‘अरे…इतक्या रात्री, अशा अडचणीच्या वेळी तू मला सोडून जातो आहेस?’’
त्याने उत्तर दिलं नाही.
तो उलट दिशेने पळत सुटला. दिसेनासा झाला.
जखमी अवस्थेत, निर्मनुष्य रस्त्यावर मध्यरात्री आस्था एकटीच उभी होती.
आस्थाला त्यावेळी एकच नाव आठवलंं.
तिनं ताबडतोब तिच्या एका बालपणीच्या मित्राला, चिन्मयला फोन केला. नेहमीप्रमाणे तो लगेच मदतीला आला.
त्याला बघून आस्था जोरजोरात रडायला लागली. ती खूप घाबरली होती. भीतिनं थरथर कापत होती. तिचं रडणं थांबेना.
“मी करतो काहीतरी. तुला खूप लागलंय. तुला डॉक्टरकडे नेतो. त्या आधी दोन जरूरी फोन करतो,’’ त्यानं त्याचा पोलिस इन्स्पेक्टर मित्र आनंद अन् डॉक्टर सुमितला फोन केला.
आनंद अन् सुमित आले. डॉक्टरने त्या तिघांना बघितलं.
तिघांनाही खूप लागले होते, नशिबाने वाचले पण ते.
आस्थाला तर जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. आधी तिला हॉस्पिटलला नेलं.
आस्थाचे आईवडील तिथं पोहोचले. आस्थाला तर आईवडिलांकडे बघायचं धाडस होत नव्हतं.
कित्येक दिवस पोलीस, कोर्टकचेरी, वकीलांचे प्रश्न, उलटतपासणी यात गेले.
शारीरिक जखमा अन् मनावरचा ताण यामुळे आस्था पार थकली होती. तिची तब्येत खालावली होती.
एका क्षणात आयुष्य एन्जॉय करण्याची, आधुनिक लाइफ स्टाइलची कल्पना पार बदलली होती.
ती कायम कुठंतरी नजर लावून हरवल्यासारखी बसून असे. ती स्वत:ला क्षमा करू शकत नव्हती. स्वत:च्या वागणुकीची तिला खूप लाज वाटत होती.
वारंवार ती स्वत:च्या आईवडिलांची क्षमा मागत होती. तिचा खटला चालला.
खूपच मोठ्या रकमेच्या जामिनावर तिला काही दिवसांनी सोडण्यात आलं. किती तरी दिवसांनी तिनं मोकळा श्वास घेतला.
तिची तब्येत अजूनही सुधारत नव्हती. तिची नोकरी सुटली होती. पार्टीतले मित्र मैत्रिणी कुठं नाहीसेच झाले होते.
हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या ती आपल्या आयुष्याचा विचार करायची. रात्री बेरात्री दचकून उठायची. कार एक्सिडेंट डोळ्यांपुढे दिसायचा.
कोर्टकचेरीच्या जंजाळातून आई वडिलांनी पैसे देऊन तीला सोडवलं होत . पण स्वत:च्या मनाच्या न्यायालयात ती स्वत:च दोषी ठरत होती.
आईवडिल सतत तिच्यासोबत होते. तिला समजावत होते. धीर देत होते.
तिला शारीरिक व मानसिक विश्रांती कशी मिळेल हे बघत होते.
त्यांच्या प्रेमळ सान्निध्यात ती हळूहळू सावरत होती. आता तिला आईवडिलांच्या प्रेमाचा, काळजीचा अर्थ समजला होता. माणुसकी, मैत्री, जबाबदारीचा अर्थ कळला होता.
आधुनिकता अन् वागणूक, राहणीमान विचारसरणी सगळ्याच गोष्टी आता तिला पूर्णपणे लक्षात आल्या होत्या.
अशीच वर्ष जातं राहिली आणि एक दिवस आस्थाने स्वतः तिचा मित्र ( चिन्मय ) ज्याने तीला ह्या सर्व कोर्ट केस आणि अॅक्सिडेन्टच्या वेळी मदत केली होती त्याला घरी बोलवून घेतलं .
‘‘यावेळी कामासाठी किंवा मदतीसाठी नाही बोलावलं मी.’’ आस्था ने म्हटलं, ‘‘सगळ्यांच्या समोर कबूल करायचं आहे, आय एम सॉरी, फॉर एव्हरी थिंग. तुम्हा सगळ्यांची मी क्षमा मागते. तुम्ही सगळीच माणसं खूप खूप चांगली आहात.
चिन्मय , तू खूप चांगला आहेस, पण मी फार वाईट आहे रे… तू माझ्यावर लहानपणापासून प्रेम करत होतास पण मी कधीच तुला समजू शकले नाही, मी वेगळ्याच दुनियेत वावरत होते, सॉरी.”
बोलता बोलता आस्था रडायला लागली अन् तिनं चिन्मय ला मिठी मारली.
प्रथम तर चिन्मय थोडा गडबडला.
उपस्थित सर्वांच्या म्हणजे आस्थाच्या वडिलांच्या चेहऱ्यावर अपूर्व समाधान, संतोष होता.
डोळे मात्र पाणावले होते. मनातली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळाले होते.
सहा महिन्यांनी आस्था आणि चिन्मय चं लग्न झालं. आस्थाने सुखी संसाराला सुरवात केली.
*******
© सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा