जिवलगा कधी रे येशील तू?

© सौ. प्रतिभा परांजपे
“गौरी अगं चलतेस ना? लंचटाईम झाला, नंदा वाट पाहत असेल.” सुषमा ,नीता, वैदेही ,राधिकाने कॅन्टीन मधे जाता जाता गौरीला आवाज दिला.
“तुम्ही व्हा पुढे , मी  हे काम पूर्ण करून येते” गौरी मुद्दाम पंधरा-वीस मिनिट काम करत राहिली, तिला सर्वांबरोबर लंच नव्हते करायचे .
पण शेवटी नंदाचा  फोन आला तेव्हा ती नाईलाजाने उठली.
ती पोहोचली तेव्हा सर्वजणी जेवून तोंड धुवायला गेल्या होत्या. नंदा वाट पाहत बसली होती.

 “अगं तू जेवून घ्यायचे ना”.
” असं- कसं? आज मुद्दाम मी तुम्हा सर्वांना चैत्राची सवाष्ण म्हणून टिफिन आणला आहे. बस आता,” मग नंदाने तिच्या प्लेटमध्ये आंबाडाळ करंजी वाढली व थर्मास मधून गारेगार पन्हं दिल.
“बघ बरं जमली की नाही  डाळ??”
“असं  करते मी घरी घेऊन जाते, आज पोट जरा गडबड आहे .”
“अगं,चव तर पहा– तुला खूप आवडते ना?”

“मनच नाही होत गं,शेखरला पण खूप खूप आवडते पण आता तो—” म्हणत गौरी चुप झाली.
तिच्या हातावर हात ठेवून नंदाने तिला सांत्वना दिली.
संध्याकाळी घरी जाता जाता आईचा फोन ,’गौरी परवा अक्षय तृतीया आहे   ,ये ना जेवायला’.
गौरीने काहीतरी कारण पुढे करून ‌न जायचं ठरवलं.
रात्री बागेतल्या झोक्यावर कितीतरी वेळ गौरी बसून होती.आजुबाजुला मोगरा घमघमत होता, आणि मन– झोक्याबरोबरच पुढे मागे जात होतं.

शेखरचे नी गौरीचे लग्न झाल्यानंतरचा पहिला सण गुढीपाडवा आला. गौरीची पंधरा दिवस सुट्टी होती. सासुबाईंनी तृतियेच्या दिवशी तिच्याकडून गौर बसवून घेतली व हळदीकुंकवाचा घाट घातला.
गौरीच्या मनात खूप उत्साह व उत्सुकता होती.
आई सकट घरच्या सगळ्यांनाच आमंत्रण दिले.
करंजी,पुरणपोळी, आंब्याची डाळ सर्व पदार्थांची रेलचेल होती. जेवणं आटोपल्यावर गौरी ची आरास करण्यात शेखर नी पुढाकार घेतला.

वाळूच्या सहाय्याने पर्वत तयार केला, थर्माकोल, कापूस रांगोळी च्या साह्याने बर्फाच्छादित हिमशिखरं तयार केले, त्यांच्या तळाशी सुंदर बाग त्यात गौर बसवली. इतका सुंदर देखावा की पाहणारेही थक्क झाले.
आईकडे दोन बेडरुम किचनचा फ्लॅट होता त्यामुळे गौर देव्हाऱ्यातच बसवून आई पांच जणींना बोलावून हळदीकुंकू करीत असे.
शेखरच्या बाबांचा मोठा बंगला, आजूबाजूला बाग त्यात खूप फुलझाडं ,झोका असा थाट होता.
सासरची माणसं प्रेमळ व हौशी, वहिनी तर हे सर्व पाहून म्हणाली ” नशीब काढलं हो गौरी न”

गजरा माळून घातलेला आंबाडा, नाकात नथ , लुगडं नेसून गौरी जेव्हा पैंजण रुणझुणत  बाहेर आली तेव्हा शेखर सकट सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
मग खूप वेगळ्या वेगळ्या पोझ मधेफोटो काढले गेले.
आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकवा बरोबर खमंग आंब्याची डाळ, करंजी, थंडगार पन्ह आणि गजरे दिले, ओल्या हरभर्‍यांनी ओटी भरली. मग गौरी ला उखाणा घ्यायचा आग्रह केला.

“हिमालयाच्या पायथ्याशी केली देवीगौरीची आरास,
शेखर चा  गौरी ला लाभो नित्य सहवास…”
अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि गौरी भानावर आली.
रात्री स्वप्नातही शेखर तिच्यासोबत होता.
सकाळी सासुबाईंनी विचारले”आज सुट्टी आहे आई कडे जाणार आहे कां”?

“नाही मला जरा पेंडिग काम पूर्ण करायचे आहे. मी तेच पूर्ण करेन.” गौरी म्हणाली.
“बरं बर” मग सासुबाईंनी पण आग्रह केला नाही.
गौरीला ठाऊक होते आज आई कडे हळदी कुंकू असणार, मागे वैभव लक्ष्मीच्या हळदी कुंकवाला ती आई कडे गेली होती .
गौरी आत तयारी करत होती. बाहेर बायकांची कुजबुज तिच्या कानांवर आली. .
त्यावर आईचे उत्तर “अहो तिला आहे विश्वास ते येतील म्हणून”

मग एकजण म्हणाली, “हो पण– बरेच महिने झाले बेपत्ता होऊन.”
गौरीला बाहेर आलेली पाहून बायका चपापून गप्प झाल्या पण त्यांच्या त्या सहानुभूती युक्त नजरेने गौरीला घायाळ केले.
ते सर्व आठवून तिने आज आई कडे जाणे टाळले.
रात्री गौरीला झोप येत नव्हती ‌, लग्ना नंतरचे ते मंतरलेले दिवस आठवत होते. 
गौरी, शेखर अगदी दुधात साखरेसम एकामेकात विरघळून गेले होते.

एक दिवस दोघं समुद्र किनारी फिरायला गेले , बोलता बोलता खूप खूप पुढे , पौर्णिमेचा चंद्र आकाशात , समुद्राला भरती आली होती, मोठ्या मोठ्या लाटा पाहून गौरीला भिती वाटत होती म्हणून ति शेखरचा हात धरायलाला गेली आणि तिचा पाय घसरला.
घाबरून ती शेखरला बिलगली. त्याने उचलून तिला पाण्यात सोडले तशी ती अजून घाबरली व रडू लागली. मग शेखर ने तिला उचलले आणि किनार्यावर वाळू त ठेवले नंतर कितीतरी वेळ गौरी थरथरत होती.
तिला घट्ट जवळ घेत,”माझ कोकरू ग इतकी घाबरते पाण्याला??”

“अरे तू हसतोय ?? माझा जीव गेला असता.”
तिच्या ओठावर ओठ टेकवून ” तुझा जीव तर इथे माझ्या जवळ आहे” आपल्या ह्रदयावर हात ठेवून शेखर म्हणाला,
“चल ,तुला मस्करी सुचते” म्हणत  गौरी लाजली.,
सगळं जणू काही काल घडल्या प्रमाणे वाटत होते. 
गौरी उठून बाल्कनीत आली.
शेखर ला ट्रेकिंग ची खूप खूप आवड होती , अनेक दुर्गम अश्या पर्वतावर तो जाऊन आला होता.

एकदा गौरी म्हणाली,”मला ते सिनेमात दाखवतात तसे बर्फात फिरायला जायचं आहे”.
“पुढच्या वर्षी नक्की जाऊ आपण’पण यावेळी आमचे ट्रेकिंग च आधीच ठरले होते. तुला ही मी  शिकवीन”
“नको रे बाबा मला खूप भिती वाटते.”
निघायच्या एक दिवस आधी रात्री दोघ टेरेस वर बसले होते.
आकाशात चंद्र आणि  असंख्यचांदण्या लुकलुकत  होत्या. 
शेखर कधी चांदण्यां कडे तर कधी गौरीच्या डोळ्यात पहात होता.

 “अरे काय चाललंय हे’??”
“तुझेडोळे म्हणजे लुकलुकणारे चांदणे आहे अगदी.” तिच्या डोळ्यात पहात शेखर म्हणाला.
“पुरे कौतुक चल झोपू या.” ठरल्याप्रमाणे शेखर व त्यांचा गृप ट्रेकिंग करता दिल्लीला रवाना झाले, तिथून पुढे ते हिमालयाच्या—श्रीखंड महादेवकैलाश अश्या दुर्गम भागात .-जाणार होते.
त्या दिवशी सकाळी शेखर ने खूप फोटो ही पाठवले.
चार दिवसांत परतणार होते आणि संध्याकाळी बातमी धडकली

ट्रेकिंग सुरू झाल तेव्हा हवामान सामान्य होते पण अचानक हवामान बिघडलं. हिमस्खलन सुरू झालं ,काय होत आहे कळायच्या आधी सर्व जण बर्फात गडप झाले, टिव्ही वर बातम्या होत्या. फोन लागतं नव्हते.
काही जणांना जख्मी अवस्थेत बाहेर काढलं काहीं अजून बेपत्ता होते त्यात शेखर ही बेपत्ता, बाॅडी पण मिळाली नव्हती.
सासू सासरे रडून रडून अर्धे झाले. पण गौरी स्तब्ध होती.
गौरीच्या आई ने रडतरडत तिला जवळ घेतले तेव्हा” अग रडू नकोस तो नक्की परत येईल मला विश्वास आहे” म्हणत आईचे डोळे पुसले.

आलेले सर्व जण गौरी कडे विस्मित नजरेने पाहत होते, गौरीच्या चेहर्‍यावर द्रुढनिश्चय दिसतं होता.
पहाता पहाता चार पांच महिने झाले.
शेखर  अजूनही बेपत्ता होता.
गौरी अजुनही तशीच वाट पाहत होती.
सर्व आठवता आठवता रात्री केव्हा तरी गौरी ला झोप लागली.

सकाळी उशिरा जाग आली, बाहेर बागेतल्या आम्रवृक्षावर कोकिळ आपल्या कुजनाने वसंतोत्सव साजरा करत होती. 
मधुनच एका फांदीवर कांवकांव करीत कावळा जणू काही शुभ शकून सांगत होता.
आपले सर्व आटोपून गौरी खाली आली. हाॅलमधे मोगरा घमघमत होता, सासुबाई प्रसन्न चेहऱ्याने लगबगीने आतबाहेर करत होत्या. एक परिचीत सुगंध तिच्या श्वासात भरला, ती बावरली तिची नजर हाॅलभर सुगंध शोधू लागली.
अचानक मागून तिच्या कमरेला मिठी बसली आणि ‘गौरी’ अशी हाक कानांवर आली.

स्वप्न आहे कि सत्य????
गौरीने डोळ्यांची उघडझाप करत मागे पाहिले. तर तिचा शेखर तिथे उभा होता .
तिचे ह्रदय आनंदात धडधडू लागले, स्पंदने वाढलीआणी डोळे पाझरू लागले.
“किती वाट पहायला लावली रे!” म्हणत ती शेखरच्या कुशीत शिरली.
रात्री  गौरी व शेखर बागेतल्या झोक्यावर कितीतरी वेळ बसून होते.

“तुला सांगतो गौरी मला काही काही आठवतं नव्हते मी कोणंआहे? कुठे आहे माझं घर.”..
“मग???”
“एका रात्री असाच वेड्या सारखा भटकत होतो आकाशात चंद्र आणि असंख्यचांदण्या लुकलुकत होत्या त्यांना पहाता पहाता मला अचानक तुझे लुकलुकणारे डोळे आठवले आणि ओठांवर गौरी हे नांव आले आणि तुझा चेहरा डोळ्यासमोर येताच सर्व लख्ख प्रकाशासारखे आठवायला लागले आणि मी बावरलो.
मी इथे कसा आलो केव्हा पासून आहे? असं विचारतच होतो, तेवढ्यात एका म्हाताऱ्या शेरपा ने  मुन्ना म्हणून मला आवाज दिला .त्याने सर्व सांगितले मग हळूहळू सर्व आठवले.

आमचा कॅम्प -थाजडू–येथे थांबला होता मी सहजच बाहेर निघालो , थोडं पुढे गेलो तर एक सुंदर पक्षी तिथे दिसला  अगदी वेगळाच,मी त्याचा फोटो काढावा म्हणून  पाठीवरची सॅक खाली ठेवून मोबाईल वर फोटो घेणार तेवढ्यात तो  झुडपात लपला मी फोन मध्ये पहात पहात पुढे जायला लागलो, आणि  खोल खोल दरीत कोसळलो.
पुढे काय झाले मला काहीच आठवत नाही.. बरेच दिवस मी विमनस्क अवस्थेत होतो. इतक्या वरुन कोसळलो पण तरीही जिवंत कसा राहीलो हे पण आश्चर्यच आहे. शेरपाने माझ्या परतण्याची व्यवस्था केली.”
“आता मला सोडून कुठेही जाऊ नकोस,” म्हणत गौरीने शेखरचा हात घट्ट धरला.

सकाळी गौरी अंघोळ करून देवघरांत आली .
आज अक्षय तृतीया , सासुबाईंनी पुजेची तयारी करून ठेवली होती.
गौरीने अन्नपूर्णेची साग्रसंगीत पूजा करुन साडी,खण आणि नारळानी  देवी ची ओटी भरली व  वाकून नमस्कार करुन हात जोडून मनात देवीची करूणा भाकली.
“माते तुझ्या कृपा प्रसादाने माझे सौभाग्य माझा जिवलग  परत आला, मला माझी”अक्षय प्रीत” लाभली.”
*****
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

1 thought on “जिवलगा कधी रे येशील तू?”

Leave a Comment

error: Content is protected !!