निर्व्याज प्रेम

© तृप्ती देव
“बाबा! बाबा मला मोजे, स्वेटर आणि कान टोपी हवी आहे. बाबा! चला ना.. आज  आपण बाजारात जाऊ.”
” का?”
“मी किती दिवस झाले मी तुमच्या मागे लागलो आहॆ. मला नवीन स्वेटर आणि मोजे हवे आहेत. बाहेर थंडी पण खूप पडली आहॆ. पण तुम्ही लक्षच देत नाही.  रोज हो! हो! म्हणता नुसतं,पण चलतच  नाही.”
“अरे आज मी घाईत आहे जरा. उद्या  नक्की सुट्टी  आहॆ ना, मग निवांत बोलू. काय हवं नको ते सगळं” असं म्हणून राघवचे बाबा बाहेर कामाला जायला घराबाहेर पडले.

पण गाडी चालवताना रस्ताभर बाबा विचार करत होते.
राघव इतका मागे का लागला? आताच थंडचे कपडे विकत घेतले होते राघवला. मग अजून कपडे कशाला हवेत? अजूनही जुने कपडे भरपूर आहेत, मग अजून कशी काय गरज आहॆ त्याला? खरंच अजून नवीन कपड्याची गरज असेल का? खरंतर तसा तो हट्ट करत नाही कधी. खूप समजुदार शहाणा आहॆ पोर. परिस्थितीची जाणीव आहॆ त्याला. पण शेवटी लहानच आहे रघु, वाटलं असेल त्यालाही म्हणून बाबा कामावर निघून गेले
संध्याकाळी उशिरा आले  बाबा. तेव्हा रघु शांत झोपलेला होता.

त्यांची भेट सकाळी दुसऱ्या दिवशीच झाली.
उठल्या उठल्या सकाळी चहा,नाश्ता व बाकीची कामं बाबानीं उरकली. रघुला उठवलं.
रघु उठल्या उठल्या बाबाच्या मागे लागला स्वेटर साठी.
हो नाही म्हणत शेवटी बाबा रघुबरोबर त्याला नवीन स्वेटर, टोपी मोजे आणायला गेले.
बाबा एका कपड्याच्या दुकानात सेलमन्स होते. दुकान मोठं असलं तरी पगार मात्र कमीच होता.

त्या कमी पगारात घरातला खर्च आणि रघुच्या शिक्षणाचा खर्च जेमतेम भागत होता .
त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक त्यामुळे त्याचा खर्चही बेतात असायचा.
या सगळ्याची जाणीव बारा वर्षाच्या रघुला होतीच. म्हणूनच तो मुदाम कोणताच हट्ट करत नव्हता. कुठली गोष्ट उगीचच मागून बाबांना त्रास देत नव्हता कधी.
पण आज मात्र रघु खूप मागे लागला स्वेटर विकत आणण्यासाठी.
त्याचा हट्ट म्हणून बाबा नवीन थंडीचे कपडे आणण्यासाठी बाजारात गेले.

रघुनी स्वेटर, टोपी, मोजे, सगळं आनंदाने पसंत केलं. आज त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता.
तो बघून बाबाही खूप आनंदी झाले.
शेवटी काय मुलांच्या चेहऱ्याव चा आनंद हा पैशापेक्षा जास्त महत्वाचा असतो. खरेदी झाली आणि दोघे घरी आले.
नेहमी  प्रमाणे  बाबांनी सकाळी उठवून रघुला तयार केलं शाळेत जाण्यासाठी.
नवीन स्वेटरही घालून दिला. सोबत डबा नास्ता जेवण सगळं तयार करून रघुला शाळेत सोडून ते स्वतः कामावर गेले.
परत येताना दुपारी शाळेतुन रघुला घेऊन आले. रघुचे कपडे बदलवले.

“अरे रघु तुझा नवीन स्वेटर कुठे आहे?” बाबांनी विचारलं.
“बाबा तो स्वेटर शाळेत राहिला. उद्या येताना मी घेऊन येईन.”
परत दुसऱ्या दिवशी बाबांनी त्याला शाळेत जाण्यासाठी तयार केलं आणि घरातला जूना स्वेटर त्याला घालून दिला.
सोबत डबा नास्ता करून रघुला शाळेत सोडून आले.
पण आजही रघु नवा स्वेटर न घेताच घरी आला.
बाबांनी विचारलं “नवीन स्वेटर नाही आणलं?  परत विसरलास का?”
अजून तीन चार दिवस असेच गेले. रोज बाबा त्याला विचारायचे आणि रघु काहीच बोलायच नाही.

मग बाबांनी  ठरवलं रघुच्या शाळेत स्वतःच जायचं आणि स्वेटर शोधायचा.
एक दिवस दुकानातून सुट्टी घेऊन  शाळेत गेले. तेव्हा मधली सुट्टी होती. काही मुलं डब्बा उघडून नाश्ता करत होती तर काही मुलं बाहेर शाळेच्या प्रांगणात खेळत होती. सगळ्याचे  शाळेचे ड्रेस सारखेच .आता या इतक्या मुलांमधून रघुला शोधायचं कसं.?
पण शाळेत गेल्यागेल्या बाबांना रघु समोरच दिसला.बाबांना पाहून तोच धावत आला.
“बाबा काय झालं? तुम्ही इथे कसे काय?”
” काही नाही रे. तुझा स्वेटर  शोधायला आलो आहॆ. चल मिळतोय का ते पाहू नाहीतर शाळेतल्या शिक्षकांना विचारू.”म्हणून रघुचा हात बाबांनी हातात घेतला आणि वर्गात जायला निघाले.

तेवढ्यात रघु चा मित्र समोर आला आणि त्याने रघु म्हणून आवाज दिला.
बाबांनी त्याच्या कडे पहिलं.
त्याच्या अंगावर रघुचा नवीन स्वेटर होता. दोघेही एकमेकांकडे पाहू लागले.
“अरे हें काय? तुझा स्वेटर त्यानी घातला? कसं काय?? तू तर म्हणत होतास की मीं विसरलो, मला सापडत नाही म्हणून… रोज काहीनाकाही कारण सांगायचास म्हणून मी आज मुद्दाम शाळेत आलो. मग माझ्याशी असं खोटं का बोललास?”
रघुचा मित्र फार केविलवाण्या नजरेने दोघांकडे बघत होता. त्याला काय बोलवं ते कळतच नव्हतं.

“हो बाबा मला खोटं बोलायचं नव्हतं पण मी खरं सांगितलं तर तुम्ही मला रागवाल. म्हणून भीतीने मी तुम्हाला शाळेत स्वेटर विसरला असं सांगत होतो. बाबा  ह्याची आई रोज माझ्यासाठी डब्बा पाठवते. ह्याच्यासोबत मला काय आवडतं तेही तिला माहित आहॆ. माझ्या डब्यातलं तो जेवतो आणि त्यांच्या आईनी पाठवलेलं डब्यातलं मी आवडीने खातो.
मला माहित नाही ना बाबा आईच्या हातच जेवण कसं असत,??? मी कधीच आईच्या हातच जेवण खाल नाही ना मग मला कसं कळणार??पण ह्याच्या आईच्या हाताचं जेवण खाल्ल्यावर कळलं मला आईच्या हातचं जेवण आणि प्रेम.

बाबांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. रघु लहान असताना त्यांची आई हे जग सोडून गेली. त्याला आईचं प्रेम मिळालच नाही. लहानपणापासून बाबाच त्याला आई आणि बाबा या दोघांच प्रेम देत होते.
पण आई ती आईच असते तिची जागा घेऊन तीची कमी कोणालाच पूर्ण नाही करता येत. आणि आईचं प्रेम रघुला त्याच्या मित्राच्या आईमुळे मिळत होत.
रघु म्हणाला, “बाबा ह्याच्याकडे थंडीचे चांगले कपडे नाहीत. त्यांचे आई बाबा त्याच्यासाठी वीन कपडे नाही घेऊ शकत. त्याचे बाबा आजारी आहॆत. नवीन स्वेटर साठी पैसे नाही खर्च  करू शकत. म्हणून तो रोज जुना  फाटलेला स्वेटर शाळेत घालून यायचा आणि काही मित्र त्याला त्यावरून रोज चिडवायचे.

म्हणून मी त्याला हे स्वेटर, मोजे आणि टोपी दिली. आणि तुमच्याशी मी खोटं बोललो की मला हवे आहॆ म्हणून. बाबा मी जर खरं बोललो असतो तर मला तुम्ही हे नसतं घेऊन दिलत. मग मी माझ्या मित्राची मद्दत कशी केली असती? आणि मलाही त्याच्या आईने केलेलं जेवण रोज खायला मिळतं नं.”
रघुचं बोलणं ऐकून बाबांना काय बोलावं, काय म्हणावं ते सुचतच नव्हतं.
किती लहान आहॆत ही मुलं पण मोठ्यांपेक्षाही किती चांगला विचार करतात.
त्यांचं हें प्रेम किती निर्व्याज आणि निःस्वार्थी असतं.

बाबांनी रघु आणि त्याच्या मित्राला जवळ घेतलं आणि आपल्याला अंगावर असलेली शाल रघुच्या मित्राच्या हातात दिली.
“ही शाल तुझ्या आईसाठी. कारण डबा तर तुझी आईच पाठ्वतेना???? म्हणून एक तिला ही एक छोटीशी भेट.”
तेवढ्यात शाळेची सुट्टी संपली आणि ते दोघेही परत आपापल्या वर्गामध्ये गेले.
पण रघु वर्गात जायच्या आधी त्याने बाबांना घट्ट मिठी मारली आणि खूप आनंदाने तो परत शाळेत गेला.
रघुच्या चेहऱ्यावर आनंद पाहून दुकानात स्वेटर  विकत घेतानाचा त्याचा चेहरा बाबांना आठवला. जणू तो स्वतःसाठीच ते सगळं घेतो आहे असचं वाटत होतं
कधी कधी लहान मुलंही नात्याचं महत्व कसं सांगून जातात आणि नकळतपणे मोठ्यांना एक सुंदर संदेश देऊन जातात.
© तृप्ती देव

सदर कथा लेखिका तृप्ती देव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!