© रमा (रेश्मा डोळे )
आज खूप दिवसांनी छे वर्षांनी, सुट्टी घेऊन गावाला घरी जाण्याचा बेत सफल संपन्न होत होता.
मुंबईत येऊन नुसतं पळून पळून जीव थकून गेला होता खूप अराम करायचा होता.
फोन नको,मिटिंग्ज नको, opd नको, पेशंट नको, त्याच्या नातेवाईकांचे काळजी भरले चेहरे नको, अगतिकता नको, धावपळ नको…काही म्हणजे काही नको झालं होतं.
हवी होती फक्त मानसिक शांतता… आणि ते मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे माझं कोकणात असणार गावचं घर.
गाडीत बसून डोळे मिटून अख्खा गावचा आठव यायला लागला. आम्ही गावचे खोत, त्यामुळे आमची मोठी दुमजली प्रशस्त हवेली होती. आता जरा वादळ पावसाचे तडाखे खात काही ठिकाणी पडझड झाली होती, पण गावाची शान म्हणजे अण्णा खोताची माडी. आजूबाजूला ५००/५०० कलमं, नारळी फोफळी नि वेढलेली ही माडी खरंच गावची शान होती.
आण्णा …माझे आजोबा त्यांनी खुप कष्टानी, प्रेमानी उभारली होती त्यामुळे त्यात एक उबदारपणा आणि पोझीटीव्हीटी जाणवायची. गावचं कुणी पण आपलं गाऱ्हाणं घेऊन यावं अन त्यावर तोडगा काढून न्यावं ही अण्णांची ख्याती.
कुणीही अडला नडला यायचा आणि समाधान मिळवून जायचा.
आजोबा वैद्य असल्यामूळे बाया पण आजी कडून आपली दुःख अण्णां पर्यंत पोचवत आणि समाधानी होत. आण्णा अणि आजीची ही परंपरा आबा आणि वाहिनी नि छान सांभाळली.
आख्खा गाव आईला वहिनी म्हणत असे म्हणून मी पण वहिनीच म्हणायचो..
विचार गंगेत झोप लागून गाव कधी आला कळलं नाही.
स्टेशन वर म्हातारा मुक्या घ्यायला आला होता, हा मुका होता आणि अण्णांना देवळात सापडला त्यांनि घरी आणला आणि हा आबांसोबत वाढला.
खरं नाव पांडुरंग ठेवलं होतं अण्णांनी पण सगळे त्याला मुक्याच म्हणत…घरी आलों.
आनंद उरात मावत नाही, स्वर्ग दोन बोटं उरण, हर्षउल्लाहस या सगळ्या अवस्था मी अनुभवत होतो, कैक वर्षांनी घर पाहिलं होतं तसच माहेरवशींणीच करावं तस माझं अगत स्वागत झालं.
फ्रेश झालो,मस्त चहा घेतला ,वहिनी नि पानग्या केल्या त्या पोटभर खाऊन एक दणकून झोप काढून वाहिनी आबांशी भरपूर गप्पा मारल्या.
कोण गेलं, कोण म्हातारं झालं, गावातले बदल ,नारळ आंब्याचा धंदा कसा अवघड झालाय, एक ना दोन अनेक विषयांवर आम्ही बोलत होतो,आणि तेवढ्यात दारात गोदाई आली.
अशक्य बारीक झालेली, केसांच्या जटा झालेल्या,पण शरीर स्वछ. कपाळावर रुपया एवढ कुंकू.
वहिनी नि तिला भाकरी दिली तीची नजर हरवलेली होती कुठेतरी, भाकरी घेतली आणि निघून गेली…
मी काय पाहतोय हे मला कळायला बराच वेळ गेला.
गोदाई आमच्या अण्णांचा लाडका गडी रामा याची बायको.
ही पंधराव्या वर्षी आमच्या इथे लग्न होऊन आली. आजी आणि वहिनीची लाडकी झाली.
कामात झटपट, टापटीप , आळस नाही त्यमुळे आजीची ती खूप लाडकी.
गोदाई अशी हाक घाले पर्यंत ती काम पूर्ण करून आलेली असे इतकं तिला अण्णा आजीचं वेळापत्रक पाठ झालं होतंं.
गोदाईला अठराव्या वर्षी दिवस गेले पण बाळ काही टिकलं नाही. पण पट्ठी हरली नाही, आजीला वहिनाला हसून म्हणायची मी वाट पाहेन. माझा किसनाची येईल तो, एकदिवस.
पण तो दिवस यायला दोन वर्षे जावी लागली….
पुन्हा गोड बातमी आली या वेळी वहिनी नि तिला तिच्या नजरेखाली ठेऊन काळजी घेतली.
जून महिना आला. अण्णांचा मोठा माल मुंबई पुण्याला पाठवायचा होता, दर्या चांगलाच खवळला होता, पाऊसानी तांडव घालायला सुरवात केली होती.
वट पौर्णिमा आणि गोदाऊचा बाळंत दिवस दोन दिवसावर आला होता.
गलबत अजून अण्णां खोताचा माल यायचा म्हणून एक दिवस जास्तीत जास्त थांबणार होते, नंतर त्यानांही थांबणं शक्य नव्हतं , दर्याच बेट आणि गाव यात एक दोदाणा वाहायचा, पण त्यात होडी घालणं जिवाशी खेळणं होणार होतं.
अण्णा आबा काळजीत होते , अण्णा म्हणाले, “मालाच नुकसान झालं तरी चालेल पण माझा कुणी गडी दोदाण्यात मी पाठवनार नाही,”
पण रामा काही ऎकायला तयार होईना, “मी झटकन होडी डालतो, माल खाली करेन न पटकन वापीस येतो, ऎका की खोतानु… ” आबा, आण्णा नि रामा यांची याच विषयावर झटपट चालू होती.
शेवटी दोदाणा जर पिसाटला तर रामा तिथुनच होडी परत फिरवेल, आणि सुखरूप पोचला तर गलबतावरून मशालीच निशाण दाखवेल,या अटीवर रामा निघाला.
वाहिनी नि दही साखर दिलं, गोदाईला काळजी घे बायो ,करू नकोस.. असं सांगून अण्णांच्या पाया पडून, वहिनींना गोदाकडे लक्ष द्या सांगून झपाझप ,होडी कडे वळला हैश्या , हैश्या, हरहर महादेव आशा आरोळ्या हळू हळु विरत गेल्या.
गोदाई गोरिमोरी होवून डोळ्यातील पाणी असवून उभी होती.
अण्णांनी जवळ बोलवून धीर दिला येईल हो बाळे तो नीट नको काळीज हलकं करुस…अण्णा दोन रात्र झोपले नव्हते पण रामाची मशाल दुसऱ्या दिवशी गलबतावर दिसली आणि सगळेच निवांत झालो.
मी जेमतेम १0/१२ वर्षांचा असेन पण आजही हा चित्रपट मनावर कोरला गेला आहे …त्या रात्री सगळेच निवांत झोपले, दुसऱ्या दिवशी वट पौर्णिमा आणि त्याच दिवशी गोदा ला कळा सुरू झाल्या.
आणि कसं काय वारा फिरला आणि दोदाणा जबर पिसाटला आणि येताना त्यानी रामाच्या होडीच्या ठिकऱ्या केल्या…अबू खलाशी ही बातमी घेऊन आला आणि अण्णांच्या पाया खालची जमीन सरकली.
गोड मुलाला जन्म दिलेली गोदा, हसरा रामा, गोदा ला सांभाळा म्हनणारा रामा डोळ्या समोर उभा राहिला.
या पोरीला कस सावरू सांगू त्यांना कळेना…
त्यांनी आजी नि वाहिनी ला ही अवघड जबाबदारी दिली, पण या बायकांनी खूप धीराने घेतलं.
तिचं दूध तुटेल म्हणून लगेच सांगितलं नाही, पण गोदाईपन चाणाक्ष होती तिचा लक्षात आलं होतं काहीतरी बिनसला आहे.
आबा अण्णा शांत असतात, वाहिनी जास्तच काळजी घेतात, आजी माझ्यापाशी बसून डोक्यावर हात फिरवत देवाचे नाव घेत बसते, धनी कधी येणार विचारलं की येईल हो बेटा हा दोदाणा शांत झाला की येईल… अस डोळ्यात पाणी आणून सांगते.
१५ दिवस गोदा शांत बसली ,मग हिय्या करून अण्णांच्या समोर जाऊन उभी राहिली, आणि सरळ डोळ्यात डोळे घालून जाब विचारू लागली, तेव्हा अण्णा हहलें, ढसाढसा रडले आणि गोदा बाळा रामा गेला ग…!!! अस म्हणाले.
तेव्हा गोदाई शांत झाली, तिनी शांतपणे विचारलं ,खोतनू माझा धनी चा देह पहिला काय, दर्यावर आलेला नाही ना म कशे म्हणता धनी गेला, मी वाट पाहीन तो येईल.
ती रडली नाही, शांतपणे तिच्या खोलीत गेली आणि बाळाला थोपटत राहीली, पण त्या दिवसापासून ती आमच्यात राहीली नाही सकाळी बाळाला दूध पाजून झोपवायच आणि दर्या आणि दोदाणा यांच्या मध्ये असणाऱ्या टेकडीवर बसून रामाची वाट पहायची हळू हळु ती बाळासाठी पण येईना झाली वाहिनीच त्या बाळा चं करायची.
अण्णा आणि आबांनी सांगितलं होतं ,तिला हवं तसं राहू द्या, अण्णांनी रामाचं जाण फार मनाला लावून घेतलं होतं.
ते सर्व दोष स्वतःला लावून घेत झुरत होते, इकडे पोर वाढत होत पण म्हणावं तस अंग धरत नव्हतं.
गोदा तर आता अजिबात बघत नव्हती, तिला फक्त टेकडीवर जाणं आणि रामाची वाट पहात बसुन राहणं एवढंच काम होतं.
तिन्ही सांजेला घरी यायची आले का धनी ? असं समोर दिसेल त्याला विचारायची,आजी वाहिनी काहीतरी खायला घालून तिला निजवायची, एक दिवस तापाच निमित्य होऊन त्या बाळानी पण जीव सोडला,अण्णांनी आपल्या वैद्यकीय प्रयत्नांची पूर्ण पराकाष्टा केली पण व्यर्थ ठरले.
आता मात्र अण्णा आतून तुटले रामाची ही ठेव आपण जपू शकलो नाही याचं त्यांना खूप वाईट वाटले.
ते पण सतत आजारी पडू लागले, एक दिवस त्यांनी सगळ्यांना बोलवून गोदा ला ती ज्या टेकडीवर जाते ती तिच्या नवे करून तिथे तीला एक चांगला आसरा बांधून दयायला सांगितला, ती आता तिथेच झोपडीत राहते…
गोदा आज ६० ची असेल ती आज ,अजून रामा येईल म्हणून वाट पाहत आहे, दर वटपौर्णिमेला उपास करते, आज गोदाई ला पाहून इतका पटकन जुना काळ डोळ्यासमोरून सरकला.
भूक लागली तर घरी येऊन ती काही खायला नेते, नाहीतर वहिनी टेकडीवर पाठवून देते, टेकडी उतरुन खाली आली आणि तेवढयात रामा आला आणि त्याला आपण दिसलो नाही तर?? ही भीती तिला आहे.
वहिनी ला विचारलं की काय करते ती एवढ्या उन्हात टेकडीवर, वहिनी म्हणाली, आरे कसलं ऊन..दर पौर्णिमेला ती रामाच्या आठवणीनं आंबा फणस , नारळी फोफली कोणतं तरी झाड रामा साठी लावते, अक्खी टेकडी तिनी हिरवी गार केली आहे, नुसती बसेल ती गोदा कसली…
क्षणभर माझं मन सुन्न झालं, दर्याच्या अफाट अथांगते सारख हीच प्रेम, वाट पाहणं म्हणजे किती तर सगळं तारुण्य, मातृत्व पणाला लावून,वाट पाहते आहे आजही ती.
किती विश्वास असावा प्रेमावर…इन्स्टस्ट ब्रेकअप, डिवोर्स या काळात मी कोणती प्रेम कथा पहात होतो…
तिच्या विश्वासाला,प्रेमाला मनोमन सॅल्युट ठोकूला,अस वाटलं गावी येणं सार्थकी लागलं.
प्रेम,पेशन्स,धीर,विश्वास एक ना अनेक गोष्टी पुन्हा शिकलो..
गोदा तू ग्रेट आहेस ! खूप ग्रेट आहेस !!!
© रमा (रेश्मा डोळे )
सदर कथा लेखिका रमा (रेश्मा डोळे ) यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.