आपली माणसं

©️ सायली पराड कुलकर्णी.
“डॉक्टर, आज तरी मिळणार ना डिस्चार्ज मला?” पूजाने काकुळतीला येऊन डॉक्टरांना विचारलं.
“अहो तुमच्या तब्येतीत म्हणावी तेवढी सुधारणा नाही झालीये. रिपोर्ट नुसार तुमचं ब्लड प्रेशर आणि काही व्हिटॅमिन्स, हिमोग्लोबीन  बऱ्यापैकी कमी आहेत. त्यात तुम्हाला विकनेससुद्धा प्रचंड आहे, सगळी झीज जर भरून काढायची असेल तर अजून काही दिवस तरी तुम्हाला इथे दवाखान्यात राहणं अत्यावश्यक आहे.

तुमच्या आणि तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य विचार करून मी तरी सध्या काही तुम्हाला डिस्चार्ज नाही देऊ शकत.” राऊंडला आलेले  डॉक्टर म्हणाले आणि तिच्या उत्तराची वाट नं पाहता पुढच्या रुग्णाकडे वळले. पूजाच्या डोळ्यात आता काळजी स्पष्ट दिसत होती.
तिच्या नकळतपणे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
घरी तिच्या थकलेल्या सासूबाई, पाच वर्षांची लेक प्रांजली दोघीचं. कारण हिच्या सोबत दवाखान्यात सोबतीला नवरा थांबलेला. दिवसभर ऑफीस करून मग तो परस्पर दवाखान्यात येत होता.
मग रात्री तिथेचं थांबी.

तिच्या अशा अवस्थेत तिला काय हवं नको ते पाहायला त्याला तिच्यापाशी थांबणं गरजेचं होतंच. तिला आता सातवा महिना संपत आलेला. घरात पाय घसरल्याचं निमित्त झालं आणि तिला अकालीचं प्रसूतिकळा यायला लागल्या. कसंबसं करून सासूबाईंनी शेजाऱ्यांच्या मदतीने घाईने तिला दवाखान्यात दाखल केलं.
त्यालाही आता चार पाच दिवस उलटले होते. पण आपल्याला बरं वाटत नसलं तरी आपल्या लेकीची आणि घराची काळजी तिला स्वस्थ पडू देत नव्हती.

त्यात पोटात वाढणाऱ्या जीवाचं टेन्शन होतं ते वेगळंच. त्यात दवाखान्याचं वाढतं बिल हाही विषय तिच्या डोक्यात येत होता.”आपण धडधाकटपणे घरी असल्यावरही काही वेळा आपल्याला काम उरकत नाही आता आपल्या अनुपस्थितीत सासुबाई आणि प्रांजली कसं करत असतील…? प्रांजली आजपर्यंत कधी मला सोडून झोपली नाही काय वाटत असेल त्या लहानग्या जीवाला? आई कुठे असेल म्हणून कासावीस झालं असेल पिल्लू!” विचारांच्या गर्दीने तिचं डोकं भणभणलं अगदी.

जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतलं घोटभर पाणी प्यायली मग जरा बरं वाटलं तिला. पण जीव आतून तुटत होताचं. “तरी मी नको म्हणत होते हे दुसऱ्या बाळाचं. आपल्याला हे परवडणारे नाही आणि झेपणार पण नाही पण ह्यांनी ऐकलं नाही. एकाला दोघे भावंडं असावीत गं, आपल्या नंतर त्यांना कोणीतरी हवं ना रक्ताचं असं म्हणत राहिले मग आपणही तयार झालो.” डोक्यांत पुन्हा विचारांचा भुंगा गुणगुणू लागला. तसं परत तिचं डोकं चढलं.

एवढ्यात औषधाची वेळ झाली म्हणून नर्स आली आणि ही अस्वस्थ झालेली पाहून तिने सलाईन मधून एक इंजेक्शन सोडलं. जरा वेळानं मग पूजाला शांत झोप लागली. संध्याकाळी गौतम येईपर्यंत तिच्यावर झोपेचा अंमल होताचं. पण दिवसभर आराम झाल्यामुळे आता तिला जरा तरतरीत वाटत होतं.
आज दोन तीन दिवसांनी स्वतःहून उठून तिने स्वतःचं स्वतः जाऊन चेहरा धुतला, गुंता झालेले विखुरलेले केस तेल लावून व्यवस्थित विंचरून वेणी वैगरे घालून बेडवर बसली.
खरंतर तेवढ्यानेही तिला थकवा आला होता.

पण आज गौतमलाही तिच्याकडे पाहून जरा बरं वाटलं. तो आज सोबत प्रांजलीला घेऊन आलेला.
प्रांजली खोलीत येतांच आईला बिलगली.
कितीतरी वेळ पूजा प्रांजलीच्या केसांत प्रेमानं गोंजरात राहीली.
“आई घरी कधी येणार तू? मला खूप आठवण येते तुझी” म्हणत प्रांजली आईला अधिकचं बिलगली.

“घरी आजीला त्रास नाही ना देत बाळा? मी आता लवकर बरी होऊन घरी येणार हं. शहाण्या बाळासारखं वागायचं. हट्ट करायचा नाही. आता लवकर आपल्याकडे अजून एक गोड पिल्लू येणार अगदी तुझ्या सारखं मग तू खेळणार की नाही त्या बाळाशी? मग मला काही दिवस अजून इथे राहावं लागेल. तू येत जा बाबांसोबत हं मला भेटायला. माझं गुणी पिल्लू ते.”
पूजाने आपल्या परीने चिमुकल्या प्रांजलीला समजवून सांगितलं.

प्रांजलीनेही समजूतदारपणे मान डोलावली. जरावेळाने गौतम तिला घरी सोडून आला. प्रांजलीला पाहिल्यापासून तर पूजाला क्षणभरही चैन पडेना. तिची होणारी आबाळ पूजाला स्पष्ट दिसत होती. तिने घाईघाईने मोबाईलवरून बहिणीला फोन लावला. 
“हॅलो, ताई! अगं मी बोलतेय. तुझी पूजा. मिळेल त्या गाडीने इकडे निघून ये…” तिला हुंदका आवरेना. पलिकडे फोनवर आरतीला समजेचं ना की पूजाला अचानक काय झालं असावं. 

“तू आधी शांत हो बघू काय झालं मला सांग. मी आहे ना….” ताईच्या धीराच्या शब्दांनी पूजाला जरा हायसं वाटलं. घडलेलं सगळं तिने आपल्या लाडक्या बहिणीच्या कानावर घातलं. मन मोकळं झाल्यामुळे असेल किंवा आता मदार ताईवर असं वाटल्याने का असेना पण पूजा शांत झाली. “मी सकाळी पोहचते तिकडे. तू काही काळजी करू नकोस. तसंही इकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मुलं निवांत आहेत. आणि अगं एवढं झालं मला कळवलंससुद्धा नाहीस होय! आता आले की चांगली पहातेंच तुला.”

ताईच्या शब्दांनी पूजा सुखावली खरी पण सगळं कसं होणार ह्या विचारांनी रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत, तळमळत तिने रात्र कशीबशी ढकलली.
पहाटेची मंद गार वाऱ्याची झुळूक  खिडकीतून आत आली तशी तिला जरा झोप लागली.
जरा वेळानं कसल्यातरी चाहुलीने तिने डोळे उघडले तर ताई पुढ्यात…! किती निस्सीम प्रेम ते.
आपल्या एका फोनवर ही एवढ्या लांब निघून आलीये. पूजाच्या डोळ्यांत पाणी आलं.

“रडतेस काय वेडी. आई नाही म्हणून नाहीतर आत्ता तिने तुझा कान पकडला असता हे नक्की. काय अवस्था करून घेतली आहेस. पण आता काळजी नको करुस मी आहे तुझ्याजवळ आता. मगाशी घरी जाऊन काकूंना आणि प्रांजलीला भेटून आलेय. आता तू घरी येईपर्यंत तुझ्या स्वयंपाकघराचं आणि प्रांजली बाळाचं तू टेंशन घ्यायचं नाहीस. मी ह्याबद्दल भावजींशी पण बोलले आहे. आता तू फक्त आनंदी राहायचं हं आणि तब्येत जपायची. पूजा अगं अशा अवस्थेत होतीस आणि मी तिकडे अज्ञानात! इतकं झाल्यावर ताईची आठवण आली होय तुला…” बहिणीच्या अवस्थेकडे पाहून ताईलाही अश्रू अनावर झाले होते. 

दोघी बहिणी कितीतरी वेळ मिठी मारून रडत होत्या. मन मोकळं झाल्यावर दोघींनाही बरं वाटलं.
पूजाला ताई आल्यामुळे खूप सुरक्षित वाटत होतं. 
दुसऱ्या दिवशी पासून तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि बघता बघता पूजा घरी सुद्धा आली.
ह्या सगळयात आठवडा उलटला होता.
आता मनाने आणि शरीरानेही सुधारलेली पूजा आनंदी दिसत होती.

आपल्या नवऱ्याच्या निखळ सोबतीने, जीवाला जीव देणाऱ्या आणि नुसतं म्हणण्यासाठी नाही तर तिच्या अवघड प्रसंगी सगळं सोडून धावत तिच्यासाठी हजर राहणाऱ्या तिच्या ताईची, तिच्या छोट्या लेकीची, होऊ घातलेल्या चिमुकल्या जीवाची आणि थकलेल्या पण प्रेमळ सासूबाईंचीही ती ऋणी होती. त्यांच्या प्रयत्न आणि प्रार्थनेने ती आज स्वतःच्या पायावर उभी होती.
एका क्षणी तिला “कसं होणार सगळं?” ह्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर हसतमुखपणे तिच्या समोर उभं होतं ते म्हणजे तिची आपली माणसं….! 
*******
©️ सायली पराड कुलकर्णी

सदर कथा लेखिका सायली पराड कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!