डाग

 1. तिची गगन भरारी
 2. डाग
 3. सुख
 4. सत्य
 5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
 6. तडा
 7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
 8. प्रायश्चित्त
 9. उत्तर 
 10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
 11. निलिमा
 12. आपली माणसं
 13. विश्वास
 14. जाणीव
 15. गुलमोहोर
 16. हिऱ्याची अंगठी
 17. सासूबाईंचे माहेर
 18. सवाष्ण

©️ मोनाली हर्षे-किराणे.
कुसे वस्तीच्या शाळेला अगदी नव्या नवरीचे रूप आलं होतं. रोज कुठल्या ना कुठल्या शासकीय विभागाची माणसं येऊन वस्तीची स्वच्छता, नळांना येणारं पाणी, कार्यक्रम ज्या शाळेत होणार तिची डागडुजी सर्व पहात होते.
चारच दिवसांपूर्वी लाल दिव्याची गाडी शाळेपुढे थांबली.
त्यातून उतरलेल्या साहेबांनी गुरुजींच्या हातात एक कागद कोंबला.
त्याची पाठ वळताच गुरुजींनी शाळेचा सूचनाफलक लिहायला घेतला.

येत्या रविवारी शाळेत जंगी कार्यक्रम होणार होता. नंतर पटांगणात सर्व वस्तीला भोजनही होते.
शासनाने चालवलेल्या कुटुंब नियोजन नसबंदी अभियाना अंतर्गत कुसे वस्तीला सर्वात जास्त शस्त्रक्रियांबद्दल प्रथम पारितोषिक व त्या भागाच्या विकासासाठी नगरसेवक साठेंना 50 लाखांचा चेक हस्तांतरित करण्यात येणार होता.
हा सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी माननीय धनंजय माने यांच्या हस्ते होणार होता.

वाचता येणाऱ्यांनी वाचून आणि ऐकू येणाऱ्यांनी ऐकून ही बातमी कर्णोपकर्णी पोहोचवत सारी वस्ती तयारीला लागली. पाणी असो वा नसो ठिबक सिंचनासारखा गळणारा एकमेव नळ बाया माणसांनी घेरला गेला. ज्याला त्याला पाणी भरून स्वच्छ होण्याची घाई झाली. न जाणो टीव्ही च्या बातमीदाराने आपल्याच तोंडापुढे माईक धरला तर जगात आपली प्रसिद्धी  मळक्या तोंडाने नको.

वस्तीतला एकमेव न्हावीही गावी जाण्याचं रद्द करून वस्तऱ्याला धार लावू लागला. अचानकच दाढी करून घेण्याची साथ त्या वस्तीत आली.
शाळेपुढे तर रोज एक टेम्पो येऊन रीता होत होता. मांडव घालून झाला, प्लास्टिकच्या खुर्च्यांची चळत एका बाजूला मांडून झाली, पताकांच्या माळा फडफडू लागल्या. आंब्याच्या बुंध्याला धरून बऱ्यापैकी स्टेज उभारलं गेलं.

बायकांनी धडोतीच्या डोळ्यात भरतील अशा रंगांच्या साड्या धुवायला घेतल्या.
आपलीच मुलं आपल्यालाच ओळखू येऊ नयेत इतपत त्यांच्या तोंडांना पूर्ण साबण धुवून संपला.
बघता बघता कुसे वस्तीचा कायापालट झाला.
इकडे जिल्हा परिषद कार्यालयात धनंजय मानेंनी त्यांचा पी.ए जोशी यांना कुसेवस्तीच्या माहितीची सर्व कागदपत्र हजर करायला सांगितली.

धनंजय माने हे मूळ वैद्यकीय शिक्षण घेऊन शासकीय यंत्रणेत कामाला लागले होते. त्यांना शिकत असतानाच लोकांची नसबंदी प्रति असलेली उदासीनता माहीत होती. अचानकच शिबिराला इतका विक्रमी प्रतिसाद मिळाल्याने प्रामाणिक धनंजयच्या मनाला काहीतरी चुटपुट लागली होती.
धनंजयचं आज पर्यंत वीस वर्षांचं करिअर बेदाग होतं . त्यानं एका पैशाचा भ्रष्टाचार केला नव्हता.

जोशींना त्यानं दोन दिवसात कुसेवाडी शिबिराची चुपचाप आतून चौकशी करण्याचे आदेश दिले.
जोशींनी त्यांच्या हाताखालच्या दोन कारकुनांना दोनशे रुपये हातात टेकवून दोन दिवसात वस्तीत फिरून सखोल चौकशीचे वरचे आदेश खाली पोचते केले. ही दोन माणसं फुकटच्या चहा पोह्यांबरोबर वस्तीतल्या टपरीवर शासकीय माणसांचा बडेजाव मिरवत, गप्पा छाटत माहिती घेऊन आली.

त्यांच्या माहितीप्रमाणे कुसे वस्तीत कुटुंब कल्याण शिबिर जाहीर झाल्यावर इथल्या माहेरवाशींणी ज्या जवळच्या खेडोपाडी पांगल्या होत्या त्या त्यांच्या नवऱ्यांना माहेरी महिनाभर आराम आणि शासनाकडून मिळणारे पाच हजार रुपये या आमिषावर घेऊन आल्या. त्यामुळे मूळ लोकसंख्या आणि झालेल्या नसबंदी शस्त्रक्रिया यांचा जरासा ताळमेळ बसत नव्हता .
आता लोककल्याणाच्या कामाला का आपण कोणाला येऊ नका म्हणणार? जोशींचा प्रश्न रास्तच होता.

घरातही दोन दिवस अस्वस्थपणे फिरणाऱ्या धनंजयला त्याची बायको मनीषा म्हणाली ,”अरे धनंजय ,कुठल्या का वस्तीत नसबंदी होवो. माणसं स्थलांतर करून का येवोत शेवटी भारताचीच लोकसंख्या आटोक्यात येईल ना! कशाला स्वतःचा जीव उगीच जाळत बसला आहेस?” स्वतःच्या मनाला समजावून चांगला रेमंडचा सूट घालून रविवारी धनंजय तयार झाला.

शाळेपुढे बरोबर पाच वाजता लाल दिव्याची गाडी हजर झाली.
मानेंना माहिती नसताही अचानकच आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी शालिनीताई ही येऊन हजर झाल्या.
जोशींनी लगबगिने माणूस पाठवून त्यांच्या सत्काराचे नारळ आणि खणाचे कापड हजर केले.
शे पाचशे माणसांनी मांडव फुलून गेला.
आधी गुरुजींनी प्रस्तावना केली. मग मा. नगरसेवक साठेंचं वस्तीला उद्देशून कृतज्ञता दर्शक धन्यवादाचं भाषण झालं.

त्यांनी पुढची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून वस्तीचे तोंड फाटेस्तोवर कौतुक करून मिळणाऱ्या रकमेतून आपण कसं कायमस्वरूपी पाण्याची टाकी उभारून वस्तीचा पाणी प्रश्न निकाली काढणार ते सांगितलं.
शाळेचं छप्पर हादरेल एवढ्या टाळ्या गरजल्या.
धनंजय माने ५० लाखांचा चेक मिस्टर साठेंच्या हाती देऊन स्थानापन्न झाले.
नेमके ते खुर्चीत बसायला आणि आंब्याच्या झाडावरच्या कावळ्याला दोन नंबर सुचायला गाठ पडली. धनंजयच्या चकचकीत स्वच्छ कोटाच्या उजव्या खांद्यावर कावळा विष्ठा करून मोकळा झाला.

क्षणार्धात धनंजयचा उजवा कोटाचा भाग त्या विष्ठेने ॲबस्ट्रॅक्ट चित्रासारखा रंगवला.
प्रसंगावधान राखून जोशींनी मास्तरांना खूण करून माने साहेबांना स्टेज मागून जवळच्याच एका घरी नेलं.
घरातली सर्व माणसं नटून थटून कार्यक्रमाला गेली होती. एका डोळ्यात फूल पडलेली म्हातारी आणि बरीच वर्ष लुळा पडलेला अंथरुणाला चिकटून गेलेला तिचा नवरा दोघंच घरात होते.
मास्तरांचा ओळखीचा चेहरा बघून म्हातारीने धनंजयला मोरी दाखवली.

त्याचं कोट स्वच्छ करणं चालू असता म्हातारी तिच्या तारेत बोलू लागली,” काय रे पोरा कोण तो शासन त्याचं लग्न मांडलं जणू शाळेत? सारखी गडबड त्या बाजूस. एक वरिस झालं. हाफिसर घरी येऊन दादल्याचं नाव लिवून गेले, लंगोटातला माझा नातू आयुसमान त्याचं बी नाव दिलं. आता वर्षभराचं तरी राशन देईल का तो शासन?” धनंजयच्या डोक्यात बत्ती पेटली .
“आजी काय नाव तुमच्या नातवाचं?”
“अरे तो टीव्हीवाला नाय का आयुसमान त्याचं पाहून सुनेने ठेवलं. आयुसमान सोनकांबळे.”
कुसेवस्तीची माहिती वाचतानाच हे नाव व पुढे वय४९ धनंजयला जरा खटकलंच होतं.

कारण आयुष्यमान खुराणा 50 वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हता. हे नाव त्या पिढीत मेळ बसणार नव्हतं.
आपला निषेध नोंदवायला गडबडीतच धनंजय त्या घरातून बाहेर पडला.
पण शाळेत पोहोचेतो सर्व मंडप रिकामा.
पटांगणावर सगळी माणसं रांग करून जेवणाच्या आशेने एकच कलकल करीत होती. टीव्ही रिपोर्टरचं बोलणं पुसटसंच धनंजयच्या कानावर आलं, “अरे यार !त्या आरोग्यमंत्र्यांचा हा साठे मेव्हणा .अचानकच त्यांची बायको शालिनीताई हजर होणार अशी कुणकुण लागली. दुसरीकडे जाणारा ताफा इकडे वळवला न्यूज कव्हर करायला.”

धनंजयच्या हातात त्याचा धुतलेला कोट होता.
त्यावरचा तो डाग स्वच्छ करूनही एक विचित्रच आकार घेऊन स्पष्ट दिसत होता.
त्याच्या स्वच्छ करिअरवरही या नसबंदी शिबिरानं असाच एक न जाणारा डाग कायमचा लावून दिला होता!
******
©️ मोनाली हर्षे-किराणे.
सदर कथा लेखिका मोनाली हर्षे-किराणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!