तिची गगन भरारी

 1. तिची गगन भरारी
 2. डाग
 3. सुख
 4. सत्य
 5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
 6. तडा
 7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
 8. प्रायश्चित्त
 9. उत्तर 
 10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
 11. निलिमा
 12. आपली माणसं
 13. विश्वास
 14. जाणीव
 15. गुलमोहोर
 16. हिऱ्याची अंगठी
 17. सासूबाईंचे माहेर
 18. सवाष्ण

© ज्योती हलगेकर जाधव.
आज गीताच्या घरी एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे पत्रकार तिची मुलाखत घेण्यासाठी आले होते. नुकताच मुंबईत एका दूरदर्शन वृत्त वाहिनीवर ‘तिची गगन भरारी’ या कार्यक्रमामध्ये तिला गौरविण्यात आले होते. त्या संदर्भातच ही मुलाखत सुरू होती.
मुलाखत संपताच गीताचा सर्व कुटुंबियांबरोबर एक फोटो घेतला, मुलाखत सुरू असताना तिचे एकटीचे फोटो तर काढून घेतलेच होते. फोटोसेशन झाल्यानंतर आलेल्या पत्रकारांचा चहापाणी नाश्ता झाला आणि ते निघून गेले. 
ते निघून जाताच गीता सासूबाई-सुशिलाबाईंना म्हणाली, “आज सकाळी शेतावर जाणे झाले नाही, आता जाऊन येते.”

सुनेकडे कौतुकाने पहात सुशिलाबाई म्हणाल्या, “आधीच उशीर झालाय, जास्ती फिरत बसू नगं लगेच माघारी ये, ऊन वाढाय लागलंय आता.”
त्यांना होकार देत तिने आपली अॅक्टिवा बाहेर काढली आणि तिला किल्ली लावली.
किल्ली फिरवताच गाडी सुरू झाली तिच्यावर बसून गीता शेतावर निघाली. गावाच्या बाहेर पडत शेतांवर आली. तिला पाहताच सुजाता, निर्मला तिच्याजवळ धावतच आल्या.
“ताई, तुमचा कार्यक्रम बगितला आमी काल टी व्हीवर,” सुजाता म्हणाली.

“आमास्नी लयी भारी वाटलं तुमाला तो पुरस्कार घेताना बगून, ” निर्मलानेही पुस्ती जोडली.
“होय का? माझ्यासारख्या अजून १०-१२ जणी होत्या तिकडे. काही विशेष नाही गं केले मी,” गीता नम्रतेने म्हणाली.
“त्ये कायबी असलं तरी आमाला आमच्या वयनीचं कवतुक हायेच. तुमचाबी सत्कार केलाच न्हवं त्या च्यानेलवाल्यांनी म्हंजे तुमचंबी काम मोठंच हाय की,” थोड्या अंतरावर नागेश कसलेतरी वाफे तयार करीत होता तिथूनच तो म्हणाला. 
“अक्शी बराबर बोललास नागेश, ” सुजाता म्हणाली. 
“झाले का कौतुक माझे आता? कामाला लागा. काल पाठविली का फुले नाशिक, पुण्याला ऑर्डरप्रमाणे? ” गीताने त्या तिघांनाही थांबवत विचारले. 

नागेश म्हणाला, “वयनी, ती कालच पाठिविली आन त्यास्नी मिळाली म्हून मगाशी फोनबी येऊन गेला मला.” 
“ठीक आहे. ती बाहेर पाठवायची फुलेही चांगली निवडून काढून व्यवस्थित पॅकींग करून आज संध्याकाळी पाठवून द्या मुंबईला, तिथून ती बाहेर जातील,” गीताने सांगितले. तसे ‘व्हय जी’ म्हणत तिघेही आपापली कामे करू लागले. 
 गीता ग्रीन हाऊसकडे फेरफटका मारत होती आणि तिचे मन मात्र भूतकाळात गेले होते…
बारा वर्षापूर्वी गीताचे लग्न सुरेश गोविंद शिंदे बरोबर झाले आणि ती या विकासवाडी गावात आली. गीताही कला शाखेची पदवी घेतलेली खेड्यातच रहाणारी पण मुळातच खूप हुशार असलेली.

तालुक्याच्या गावी काॅलेजला जात असताना परत येताना गावाला येणारी बसची वाट पहात तास दीड तास वेळ वाया जातो हे लक्षात येताच संगणकाच्या वर्गांना प्रवेश घेऊन वेळेचा सदुपयोग करणारी. तिच्या माहेरची परिस्थिती बरी असली तरी तिला अनुरूप चांगला नोकरी करणारा मुलगा शोधून थाटामाटात लग्न लावून देण्यासारखी परिस्थिती नव्हती. 
सुरेश पदवीधर होता पण नोकरी मिळत नव्हती. वडील-गोविंदरावही थकले होते. शेती करणारे दुसरे कोणी नव्हते, ६-७ एकर शेती होती. नाईलाजाने तो शेतीच करीत होता.
एव्हढी शेती नावावर असलेले आणि मुलगा पदवीधर, गावात घर हे सर्व पाहूनच तिचे सुरेशशी लग्न ठरविले आणि दोन्हीकडच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत जास्त मोठा सोहळा न करताच लग्न झाले होते.

एव्हढी शेती असली तरी दुष्काळी भाग त्यामुळे पावसाअभावी शेतीचे उत्पन्न नगण्यच होते. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपल्यावर एक एक सत्य समोर येऊ लागले.
सुरेश, त्याचे आई, बापू(वडील) स्वभावाने तसे चांगलेच होते, लग्न झालेल्या दोनही बहिणी अधूनमधून येत खेळीमेळीने रहात, वागत असत. या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी याच शेतावर कर्ज काढलेले होते. दुष्काळी भाग असल्याने जेमतेम कर्जाचे हप्ते भरले जात होते. 
सुरेश आपली शेती प्रामाणिकपणे पारंपारिक पद्धतीने करीत होता. कधी बियाणेच खराब तर कधी अवर्षण, लहरी पाऊस यामुळे शेतीचे नुकसानच होत होते. जे मिळे त्यामध्ये कसेतरी दिवस चालले होते. घरी एक बैलजोडी, दोन म्हैशी होत्या. त्यामुळे दूधदुभत्याचा प्रश्न सुटत होताच तसेच दुधामुळे थोडे पैसे गाठीस उरत होते.

अशीच चार पाच वर्षे गेली. सुरेश गीताच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. घरचा खर्च वाढला होता पण उत्पन्न मात्र घटतच होते. तिने नोकरीचा निर्णय घेतला आणि घरची परिस्थिती पाहता घरातील सर्वांनी होकार दिला. लवकरच तिला तालुक्याच्या गावी एका कार्यालयात तिला नोकरी मिळाली.  
आता गीताचा दिनक्रम खूपच घाईचा असे. सुशिलाबाई तिला मदत करीत असत, दिवसभर मुलांची काळजी घेत. मुले आजी-आजोबांबरोबर दिवसभर मजेत होती.  महिन्याला ठराविक पैसे हातात येत असल्यामुळे सगळेच समाधानी होते.
बापू जास्त बोलत नसले तरी मुलाच्या डोक्यावर आपण कर्जाचा डोंगर ठेवला आहे याचा सल त्यांच्या मनास सलत असे. कधीतरी बोलताना ते जाणवत असे. 

एक वर्ष बरे गेले. गेल्या वर्षी पावसाने बरीच ओढ दिली होती. अगदीच थोडा पाऊस पडला होता त्यामुळे शेतात पीकच आले नव्हते, कर्जाचे हप्ते सगळे तसेच राहिले होते, यावर्षी तरी पाऊस पडेल का, या विचारात सुरेश होता. शेती पेरणीसाठी  तयार करून पावसाची वाट पहात होता परंतु यावर्षीही पावसाने पाठ दाखवली आणि उधारीवर घेतलेले बी बियाणे, खत सगळे वाया गेले. दुबार पेरणी केली पण तीही वाया गेली.
सुरेश आधीच कर्जाच्या ओझ्याने वाकला होता, अबोल झाला होता त्यात यावर्षी हे असे झाले त्यामुळे तो अधिकच अंतर्मुख झाला. दिवस दिवसभर कुठेतरी असाच आकाशाकडे पहात विचार करीत बसलेला असे. गीता आपल्या दिनक्रमात व्यस्त होती. सुशिलाबाईंनी तिच्या कानावर ही गोष्ट घातली.
तिने सुरेशला समजवून सांगितले..

एक दिवस ती घरी परतली. घराजवळच येताच तिला दिसले की घराच्या अंगणात गावकरी जमले आहेत. तिच्या मनात पाल चुकचुकली. तिची पावले जड झाली, कशीतरी ती घराच्या अंगणात आली, सगळे गावकरी महिला पुरूष तिच्याकडे पाहू लागले.
ती घरात जाताच समोरच तिला सुरेशला खाली चटईवर झोपवलेले दिसले.
तिला पाहताच दोन्ही मुले तिला बिलगली आणि म्हणू लागली, ‘आई, बघ बाबांना काय झाले उठतच नाहीत.’ ती अविश्वासाने इकडेतिकडे पाहू लागली, ती खूपच गोंधळली होती, दुःखी झाली होती. खूपच विचित्र परिस्थिती तिच्यावर आली होती. त्याने आत्महत्या केली होती.
तिला काय करावे सुचत नव्हते.  हे असे कसे झाले? सुरेशच्या आईवडिलांचीही अवस्था खूपच वाईट झाली होती. गावातील त्यांच्या वयाचे गावकरी येऊन त्यांचे सांत्वन करीत होते.

पोलीस आले आपले काम करून गेले, बाकीचेही सर्व सोपस्कार झाले, जाबजबाब घेतले गेले आणि कर्जाच्या विळख्यात दुष्काळग्रस्त भागातील अजून एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची सरकारी दरबारी नोंद झाली.
सुरेशच्या अशा अचानक जाण्याने पुढे कसे जगायचे नि या बाकी चार जणांना कसे जगवायचे हा गीतापुढे मोठा प्रश्न होता. सासू सासरे वृद्ध तर मुले अगदी लहान पाच सहा वर्षांची. या सर्वांची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर आली होती. 
रात्र रात्र तिला झोप येत नव्हती, विचार करून करून डोकं दुखत होतं. पण मार्ग सापडत नव्हता.  शेतीतर आता सहा महिने अशीच पडणार होती.
असेच दोन तीन महिने गेले. ती नोकरी करीत होती पण शेतीचे काय करायचे हा प्रश्न तिच्या मनात होताच, पाण्यासाठी काय करावे हा विचार सतत डोक्यात पिंगा घाली.   

एक दिवस ती बसमधून तालुक्याला नेहमीप्रमाणे निघाली असताना एस टीच्या आतील भागात समोरच तिला शासनाच्या ‘जल संधारणा’च्या उपक्रमाची जाहिरात दिसली.
एक दोन वर्षापासून ती या उपक्रमाविषयी ऐकून होती, त्याला मिळणारा प्रतिसाद आणि फायदे हेही माहीत होते, सुरेशला तिने एकदा याबद्दल सुचविलेही होते पण गावकरी ऐकणार नाहीत त्यांना कोण समजवणार, अशी उत्तरे त्याने देत दुर्लक्ष केले होते. 
तिने कार्यालयात आल्यानंतर जेव्हा काम नव्हते तेव्हा जल संधारणाची पूर्ण माहिती संगणकावर वाचून काढली, जर आपल्या गावात योजना राबवायची असेल तर काय काय करावे लागेल, कोणाशी संपर्क करावा लागेल हे सर्व व्यवस्थित वाचून आणि महत्त्वाचे नोंद करून ठेवले. 
घरी येताच तिने बापूंना सांगितले. त्यांना ही संकल्पना आवडली पण गावकरी ऐकतील का याची त्यांनाही खात्री नव्हती. तिने ही जबाबदारी स्वतःच पार पाडायची ठरवली. दुसर्‍या दिवशी शनिवार असल्याने गीताला सुट्टी होती.           

तिने सकाळी लवकर उठून घरातील आवरले. ती आणि बापू सरपंचाच्या घरी गेले. तिने त्यांना जल संधारणाच्या कामाविषयी सर्व समजावून सांगितले. सरपंचांना तिचे म्हणणे पटले आणि गावची दोन वर्षातील दयनीय अवस्था, सर्वांची पाण्यासाठी चाललेली वणवण ते पहात होते.
गावात दोन वर्षात चार आत्महत्या झाल्या होत्या.
त्यांनी सर्व गावकर्‍यांना रविवारी इथे बोलवणे करतो पण त्यांना समजवून तिलाच सांगावे लागेल, अशी अट घातली. बापू आपल्या सुनेकडे आश्चर्याने पहात होते.  एव्हढे धाडस हिच्यात कुठून आले याचा ते विचार करीत राहिले. 

दुस-या दिवशी सर्व गावासमोर तिने जलसंधारण प्रकल्पाविषयी सांगितले.  पण कोणाला त्याबद्दल औत्सुक्य वाटले नाही. नकारार्थी माना डोलवत सगळे निघून गेले.   
सरपंच म्हणाले, “आपल्या गावातील लोकास्नी हे पचनी पडंल असं काय वाटत न्हाई. जुनी लोक मानायची न्हाईत. दोन एक वर्षामागं एकदा असंच मी बोललो हुतो पर कोणी ऐकायच तयार न्हवती. नायतर ही दोन चार पोरं फुकट जीव गमावून बसली ती येळच आली नसती.”
“बरं, मी शेततळ्याबद्दलही माहिती काढली आहे,….” असे म्हणत तिने सर्व माहिती सांगितली. 
“होय होय, असली शेतातली तळी मी टपाल वाटायला पारगावला जातो, तिथल्या पाटलाने आपल्या शेतात केली आहेत,” पोस्टमनकाका मध्येच बोलले.  

“बगू आपन, या योजनाला काय म्हणत्यात ही गावकरी मंडळी. पुढच्या ऐतवारी पुन्यांदा सभा बोलवू तवा हे नाही ठरलं तर तुमी या शेततळ्याचं सांगा. मी, पाटील आणि पोस्टमन पारगावला जाऊन ती शेततळी बगून येतो,” सरपंच म्हणाले.
गीता बापूंसह निघून गेली.
“गोविंदाची सून लयी हुशार हाय पर आपल्या या अडग्या लोकास्नी कळल काय हे समदं? जुनं सोडायचं न्हाई ह्या मतावर हाईत जुनी लोकं. पोरगी येवढी धडपडतिया समजून घ्याया पायजे आपून, भलंच हाय गावाचं,” पाटील स्वतःशीच बोलल्यासारखे म्हणाले.  पोस्टमनकाका आणि सरपंचांनी सहमती दर्शक मान हलवली. 
दुसर्‍याच दिवशी ती मोबाईलच्या दुकानात गेली आणि जुना कमी किंमतीतील मोबाईल फोन विकत घेतला. आता तिला प्रवासात, घरी वेळ मिळेल तेव्हा कधीही, कुठेही शेती विषयक, जल संधारण किंवा अशा योजनांची माहिती वाचण्यास मिळत होती.

तिने विविध योजनांची माहिती गोळा करून ठेवली. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी करावयास लागणार्‍या कागदपत्रांची, अर्जांची माहिती, अर्ज, विनंती कधी, कशी, कुठे करायची याची इत्यंभूत माहिती तिने जमा केली.
गावकरी तिच्या जल संधारणाच्या उपक्रमात सहभागी होण्यास तयार नव्हते.  तिने शेततळ्याबद्दल माहिती दिली. जे लोक शेततळी पाहून आले त्यांच्याशी गावातील लोकांना बोलून घेण्यास सांगितले आणि मग सरपंच, पाटील, पोस्टमनकाका यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.  तिला तर यासाठीही किती लोक तयार होतात याबाबत शंकाच होती. पण ती स्वतः, सरपंच, पोलीस पाटील, जे दोघे तिघे शेततळी पाहून आले होते ते आणि या सर्वांवर विश्वास ठेवून सुरेशचे दोन शेतकरी मित्र यासाठी तयार झाले.
गीताने पुढच्या सर्व प्रकिया फटाफट पूर्ण केल्या, आपला व या सर्वांचा अर्ज भरून शासनाकडे पाठविलासुद्धा. तसेच वापरलेल्या पाण्याचे जमिनीत जिरविण्यासाठीचे शोषखड्डे, शौचालये व इतर कामासाठीही ग्रामपंचायती तर्फे तिने सरपंच, पाटील या सर्वांच्या परवानगीने विनंती अर्ज शासनाकडे पाठविला. 

थोड्याच दिवसांत तिच्या या धडपडीचे सार्थक झाले. शासनाने सर्वेक्षणासाठी चार माणसांची टीम विकासवाडीत पाठविली, दोन्ही कामांची पाहणी करून गेली. महिन्याभरातच दोन्ही कामांसाठी परवानगी मिळाली. 
मे अखेर या सात आठ जणांच्या शेतामध्ये शेततळी तयार करून घेतली. आता पावसाची वाट पहात होते.
गावात शोषखड्डे व इतर कामेही आकार घेत होती. गीता, गोविंद, सरपंच, पाटील आणि पोस्टमनकाका आता या पाच जणांचा एक गटच तयार झाला होता.
ते या सर्व कामांची पाहणी करत असत. गावच्या लोकांना अजूनही हे सर्व एक वाया जाणारे कामच वाटत होते, याचा काहीच उपयोग होणार नाही या मतावरच ते ठाम होते. 

लवकरच पावसाळा सुरू झाला. या दुष्काळी भागात दरवर्षी पडे तसाच यावर्षीही पाऊस झाला पण गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी यावर्षी वाढलेली दिसत होती. ज्यांनी शेततळी बनवून घेतली होती ती तळी भरली होती.
गावकर्‍यांना आता आपल्या निर्णयाचे वाईट वाटू लागले. विरोध केल्याची चूक हळूहळू लक्षात येऊ लागली.
पण आता यावर्षापुरती वेळ निघून गेली होती. गीता आणि तिचा गट मात्र आनंदात होता. गीता आता कमी पाण्यात, कमी दिवसांत, शहरात जास्त मागणी असणार्‍या शेती उत्पादनांचा अभ्यास करीत होती आणि तिने तेच केले.
तिने शहरात हाॅटेलसाठी लागणारा भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. तसे तिने इतरांनाही सुचवले परंतु पारंपारिक पिकेच घेणार यावर बाकीचे ठाम राहिले. 

दोन तीन महिन्यांतच भाजीपाला शेतात डोलू लागला, फळभाज्या, पालेभाज्यांनी शेत हिरवेगार दिसू लागले. गावकरी आश्चर्य करू लागले. कधी शेतात पायही न ठेवणारे बापू स्वतः शेतात येऊन शेतमजूरांना कामे सांगत, स्वतःही काम करू लागले.
गीताने आधीच ठरविल्याप्रमाणे ही सर्व भाजी शहरात विक्रीसाठी पाठवून दिली. घरच्या गरजेपुरते धान्यही शेतातून पिकले होतेच पण ते घरात येईपर्यंत ही कमी काळातील भाजीपाल्याची दोन पिके आणि त्याचे पैसे हातात आले. बँकेचे हप्ते व्यवस्थित दिले भरले जाऊ लागले. उन्हाळ्यात इतरांची शेते ओस पडली होती पण गीताचे शेत हिरवेगार होते. भाजीपाला बहरला होता. यावेळी तिने थोडी फुलशेतीही केली होती.  या उन्हाळ्यातील शेतीसाठी तिने शेततळ्याच्या पाण्याचा वापर केला. ठिबक सिंचन प्रणाली संपूर्ण शेतात बसवून घेतली होती. पारंपारिक शेती घेतल्यानंतर शेततळी असलेल्या इतरांनीही आपापल्या शेतात गीताचे मार्गदर्शन घेत भाजीपाला लावला. 

वर्ष निघून गेले एका वर्षातच गीता आणि चार पाच जणांचे जीवन बदलले. गावकरी हे पहात होते. आपल्या विचारांचा, केलेल्या विरोधाचा पश्चाताप झाला. सगळे एकत्र आले आणि ते सरपंचाकडे गेले व आपण यावर्षी मागच्या वर्षी गीताने आणलेली योजना आपल्या गावात राबविण्यास, त्यामध्ये सहभागी होत श्रमदान, योगदान देण्यास तयार आहोत हे सांगितले.  सरपंचांनी त्वरेने गीताला पंचायतीत बोलावून घेतले आणि गावकर्‍यांचे म्हणणे सांगितले. 
गीताला फारच आनंद झाला. तिने लगेचच शासनाकडे तसा विनंती अर्ज केला. 
यावर्षी मात्र सारा गाव गावाबाहेरील जागेत श्रमदान करीत होता. गावची तरूणाई तर रात्रीसुद्धा जल संधारणाची कामे करीत होती. लहान-थोर, स्त्री-पुरूष सगळेच या कामाने पछाडले होते.
एक नवा हुरूप संचारला होता, दिवसरात्र घाम गाळत होते आणि याचे गोड फळ त्यांना लवकरच मिळाले.

या पावसाळ्यात कायम उजाड, ओसाड असलेल्या माळरानावर सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते, विहिरींच्या पाण्याची पातळी आणखीन वाढली होती, १०वर्षे कोरडा पडलेला झरा खळाळत वहात होता. सगळ्या गावात आनंदोत्सव होत होता. गीताचे सर्व गावकरी स्त्री-पुरूष कौतुक करीत होते. हे पाहून गोविंदराव-सुशिलाबाईंच्या सुखावत होते. 
गीताचे मार्गदर्शन घेण्यास सगळेच उत्सुक असत. तिच्या सल्ल्याने एकाच प्रकारची उत्पादने शेतात न पिकविता प्रत्येकाने योजून दिलेली उत्पादने घ्यायची ठरवली आणि त्यामुळे पिकाचा योग्य भाव त्यांना मिळत राहिला, भाजीपाला शेतातूनच थेट शहरात, परदेशात जाऊ लागला. गाव सुखात नांदू लागले.
चार पाच वर्षांतच या सर्वांची परिणिती म्हणजे एकेकाळी दुष्काळग्रस्त आणि आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचा गाव अशी ओळख झालेले गाव आज सदाहरित, पाणिदार, स्वच्छ, सुंदर, भाजीपाला निर्यात करणार्‍या शेतकर्‍यांचे गाव म्हणून नावारूपाला आले.

राज्य शासनाचा ‘आदर्श गाव’ हा पुरस्कारही विकासवाडीला देण्यात आला. आदर्श गावाचा पुरस्कार जेव्हा देण्यात आला तेव्हा सरपंचांनी याचे सारे श्रेय गीता सुरेश शिंदे यांना असल्याचे प्रामाणिकपणे कबूल केले. 
आणि एके दिवशी एका वृत्त वाहिनीच्या संपादकांचा तिला मोबाईलवर फोन आला की गीताच्या कार्याची दखल घेत त्या वृत्तवाहिनीच्या ‘तिची गगन भरारी’ या कार्यक्रमामध्ये तिचा सत्कार करण्यात येणार आहे.
तिच्याबरोबरच महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या १० महिलांचाही सत्कार करण्यात येणार होता. या सत्कारासाठी तिला मुंबईला जावे लागणार होते. त्यासाठी वृत्त वाहिनी गाडीची सोय करणार होते. 

सुनेचे कौतुक पाहण्यासाठी दोन्ही नातवंडांना घेऊन गोविंदराव, सुशिलाबाई गीताबरोबर गेले होते. तसेच सरपंच, पाटील काही गावकर्‍यांना घेऊन मुंबईला त्या कार्यक्रमास उपस्थित झाले होते. निवेदिकेने गीताचे नाव पुकारल्यानंतर गीता व्यासपिठावर गेल्यावर तिने केलेल्या गावासाठीच्या कार्याचे स्वरूप सांगितले गेले, सर्व उपस्थितीत प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिच्या कामाचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिचा यथोचित सत्कार करण्यात आला यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिचे कौतुक करीत ‘आजच्या शेतकऱ्यांसमोरचा आदर्श आहे ही महाराष्ट्राची कन्या, सून’ या शब्दात वर्णन करताच प्रेक्षकांनी उभे रहात पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला. सुनेचे हे कौतुक, सत्कार पाहून गोविंदराव, सुशिलाबाईंच्या डोळ्यांतील आनंदाश्रू थांबता थांबत नव्हते. 

सरपंच, पाटील, गावकरी यांचीही अवस्था वेगळी नव्हती आणि हा सोहळा काल दूरदर्शनच्या त्या वाहिनीवर सार्‍या गावाने पाहिला होता आणि गावात जल्लोष झाला होता. ती पुरस्कार घेऊन आल्यानंतर संपूर्ण गावातर्फे तिचा सत्कार करण्यात आला होता आणि आज या वृत्तपत्राची मुलाखत…….
“वयनी, ओ वयनी….” कोणाच्यातरी हाकेने तिची तंद्री भंग पावली. तिने वळून पाहिले नागेश धापा टाकत हाक मारत होता. “ते कुटल्यातरी पेपरची दोन माणसं आली हाईत फोटूचा क्यामेरा तेन घेऊन, तुमची भेट मागत हाईत. मी म्हटलं की बसा, त्या हाईत इथंच, बोलवून आणतो,” एका दमात नागेश बोलला.
“चला, आलेच मी. त्यांचे चहापाणी करायला सांगाल का सुजाता, निर्मलाला?” असे म्हणत नागेशच्या मागून ती चालू लागली. 
© ज्योती हलगेकर जाधव

सदर कथा लेखिका ज्योती हलगेकर जाधव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!