दागिना

© धनश्री दाबके
“किती प्रेमाने आणि मनमोकळेपणाने बोलत होत्या ग तुझ्या होणाऱ्या सासूबाई. अगदी हसतखेळत झाली आजची खरेदी. 
शिरीष, त्याची बहीण आणि सासरेबुवा सगळीच खूप बोलकी माणसं आहेत नाही?” चहा घेता घेता आई म्हणाली.
त्यावर मुग्धाने मान डोलावत फक्त ” हं, हो ” म्हंटलं आणि चहाचा सिप घेत मोबाईलमधे डोकं खुपसलं.
“कशी काय तू त्यांच्या घरात रुळणार ग? किती वेळा तुला सांगितलंय जरा घडघडून बोलत जा. निदान तुला काय आवडलंय, काय हवय हे तरी मोकळेपणाने सांग. पण नाही. त्या चार चार वेळा विचारतायत आणि तुझं नुसतं हो, नाही, चालेल एवढचं उत्तर. नक्कीच तू शिष्ठ आहेस असंच वाटलं असणार त्यांना”

“असं काही नाही ग आई. मला नाही लागत जास्त बोलायला, इतकंच.”
“अगं आम्हाला सवय आहे त्याची. पण त्यांना नाही ना. कुठलही नातं रुजतांना पुढाकारा इतकाच प्रतिसादही महत्वाचा असतो ग. त्यांच्या अगत्याला, प्रेमाला तू ही जर तितक्याच प्रेमाने प्रतिसाद देऊ शकलीस तरच मनं जुळतील ना?.”
“होईल ग सवय…त्यांना माझ्या न बोलण्याची आणि मला त्यांच्या स्वभावाची.” मुग्धा शांतपणे म्हणाली.

“जाऊ दे. हे काही आपण पहिल्यांदा बोलत नाहीयोत. अगदी तुझ्या बाबांवर गेलीयेस. तेही असेच होते. का एवढे शब्द महाग असतात ग तुम्हाला? .” रागारागाने उठून आई कप उचलून आत निघून गेली.
इतक्यात सुबोध ऑफिसमधुन आला.
मुग्धाने लगेच त्याच्या हातातून ऑफिसची बॅग घेतली. फॅनचा स्पीड वाढवला आणि आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आली.
“झाली का खरेदी मुग्धे?” सुबोधने पाण्याचा ग्लास उचलत विचारले.

” हो दादा, झाली.”
“आवडली का अंगठी”
“हो”
“आणि अंगठी घालणारा? आज परत भेटलीस ना म्हणून विचारलं.”
” काय रे दादा? तो आवडला म्हणून तर अंगठी घेतली ना?” असं म्हणून मुग्धा आत पळाली.
तिच्याकडे हसून बघत सुबोध सोफ्यावर टेकला. 

स्वैपाकघरातुन भांड्यांचा जोरात आवाज यायला लागला. तसा आईचा मूड बिथरला असल्याचा सुगावा त्याला लागला.
तो लगेच आत गेला. 
आईकडून त्याला आजच्या खरेदीचा in depth वृतांत कळला जो मुग्धाकडून काढून घेण्यासाठी त्याला खूप मेहेनत करावी लागली असती.
आईच्या बोलण्यातून शिरीष आणि त्याच्या घरचे सगळेच आपल्यासारखे बोलके आहेत हे कळल्यावर त्याला जरा बरं वाटलं आणि मुग्धाचा या बोलक्या माणसांच्या घरात कसा निभाव लागणार याचं थोडं दडपणही आलं.

मुग्धा…सुबोधची एकुलती एक धाकटी बहीण. दोघांमधे दोनच वर्षांच अंतर. पण दोघांच्या स्वभावात जमीन आसमाना इतका फरक. 
सुबोध आईसारखा बोलका, हसरा, मनमिळाऊ तर मुग्धा अगदी शांत, घुमी आणि क्वचितच हसणारी. बाबांसारखी.
गोरा रंग, रुंद कपाळ, घारे डोळे, सरळ धारदार नाक, नाजूक जीवणी आणि पांढरेशुभ्र मोत्यांसारखे सरळ दात असलेल्या मुग्धाची उंची, फिगर, कंबरेपर्यंत पोचणारे लांब सडक सरळ केस सगळं कसं अगदी चपखल होतं. 
मुळात मनाने सरळ आणि चांगली असली तरी आनंद, दु:ख, राग या कशाचच दर्शन मुग्धाच्या चेहऱ्यावर व्हायचं नाही. मनातलं सगळं मनातच राहायचं. त्यामुळे समोरच्याला तिच्या मनात काय चाललय याचा अजिबात अंदाज यायचा नाही. 

मुग्धाच्या शब्दांसारख्या तिच्या मैत्रीणीही अगदी मोजक्याच दोघी तिघी. त्या तेवढ्या तिला तिने काही न सांगताच समजून घेऊ शकायच्या. बाकीचं कोणी फारसं तिच्या फंदातच पडायचं नाही.
आधीच अबोल स्वभाव त्यात बाबा अचानक गेल्याने चेहऱ्यावरचं हसू पूर्ण गायब झालेलं. त्यामुळे मुग्धाचं गोरं घारं सौंदर्य उग्रतेकडे झुकायचं आणि बघणाऱ्यांना ती रागीट आणि अहंकारी वाटायची. 
हिच्या वयाच्या मुली किती बडबड्या, चिवचिवाट करणाऱ्या एखाद्या खळाळत्या झऱ्यासारख्या असतात आणि ही अशी कशी?

आज साखरपुड्याची साडी, अंगठी सगळी खरेदी झाली तरी ही तशीच घुमी. कसला आनंद नाही की कसलं वर्णन नाही. कसं होणार या मुलीचं?
बाबांनंतर मुग्धा आणि आईची सगळी जबाबदारी अचानक अंगावर येऊन पडल्यामुळे सुबोध तसा तणावाखालीच असायचा. 
त्यात मुग्धासाठी वर संशोधन करतांना तर त्याची झोपच उडाली होती. हल्लीच्या जगातले फसवा फसवीचे प्रकार पाहाता मुग्धासाठी तिला सुखासमाधानात ठेवणारा योग्य जोडीदार शोधण्याचा त्याला प्रचंड ताण आला होता.

शिरीषने मुग्धाला होकार दिल्यावर सुबोधने शिरीषबद्दल त्याच्या बिल्डींगमधे, ऑफिसमधे सगळीकडे चौकशी केली. आपल्या मित्रांना कामाला लावून त्याचे मिळतील तेवढे डीटेल्स काढले.
त्यात जेव्हा काही आक्षेपार्ह आढळलं नाही तेव्हाच त्याने मुग्धाला तो पसंत असल्याची शहानिशा केली आणि पुढे सरकायचा निर्णय घेतला. 
पण तरीही लग्न सुखरुप पार पडून मुग्धा आनंदाने तिच्या घरी रुळेपर्यंत सुबोधला शांतता मिळणार नव्हतीच.
साखरपुड्याला शिरीषच्या मित्रमैत्रिणींच्या मोठ्या गृपने आवर्जून हजेरी लावली.

सारखी मस्करी, चिडवा चिडवी आणि धमाल सुरु होती. 
ते पाहून सुबोधला हायसं वाटलं. ह्याचं सर्कल बरंच मोठं आहे म्हणजे हा सगळ्यांशी जमवून घेणारा दिसतोय. तसंच घेईल तो आपल्या अबोल मुग्धालाही समजून या विचाराने सुबोध जरा शांत झाला. 
औपचारिकता म्हणून का होईना पण मुग्धाही त्या सगळ्यांशी थोडंफार बोलत होती.
साखरपुड्यानंतर लग्न लागेपर्यंत जस जशा शिरीषशी गाठीभेटी होत गेल्या तस तसा सुबोधला शिरीषचा समजूतदारपणा जाणवू लागला. 

जे मनात तेच चेहऱ्यावर असणारा शिरीष त्याला आवडला आणि दोघांची मैत्री झाली. 
शिरीषलाही या बहीण भावांच्या स्वभावातला फरक जाणवला. सुबोधला वाटणारी मुग्धाची वाटणारी काळजीही त्याला बरोब्बर समजली.
बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. सगळे विधी यथोचित पार पडले. लग्न लागले आणि सासरी निघालेली मुग्धा शिरीष सोबत दादा आशिर्वाद दे म्हणून सुबोधसमोर वाकली. 
काल काल पर्यंत लहान वाटणारी आपली बहीण आज सासरी निघाली.

तिला नववधूच्या वेषात बघून सुबोधला एकदम गलबलुन आले. मुग्धाही रडत रडत त्याला बिलगली. आईच्या डोळ्यांना तर धाराच लागल्या होत्या. 
सुबोधने दोघांना मनभरुन आशीर्वाद दिला आणि शिरीषला शेकहॅंड केले. 
हात मिळवतांना शिरीषने सुबोधच्या हातावर आपला दुसरा हात ठेवून तो किंचित दाबला आणि तुझ्या बहीणीला खूप जपेन असा शब्द काही न बोलताच त्याला दिला.
नव्या नवलाईचे दिवस सरले आणि मुग्धा सासरी स्थिरस्थावर झाली. 

सासर माहेर दोन्ही एकाच गावात असल्याने मुग्धा शिरीषचे घरी येणे जाणे सुरुच असायचे. पण त्यांच्यात सगळं काही ठीक आहे हे सुबोधला मुग्धापेक्षा शिरीषच्या चेहऱ्यावरच दिसायचे. 
आईशीही शिरीष भरपूर गप्पा मारायचा. लेकीपेक्षा जावयाकडूनच त्यांच्या नात्यातलं समाधान आईपर्यंत पोचायचं. 
लग्नानंतर काही महिन्यांतच शिरीषला प्रमोशन मिळाले आणि कंपनीने त्याला वर्षभरा करता ऑस्ट्रेलियाला पाठवले. मुग्धाही शिरीष बरोबर ऑस्ट्रेलियाला गेली.
मुग्धानंतर आईला आता सुबोधच्या लग्नाचे वेध लागले. 

आईने लग्नाचा आग्रह घरल्यावर एका संध्याकाळी सुबोध त्याच्या कॉलेजमधल्या मैत्रीणीला मंजिरीला घरी घेऊन आला. 
सुबोधला साजेशी अशी सुंदर, हुशार मंजिरी आईला बघता क्षणी पसंत पडली आणि तिने लग्नाला संमती दिली. 
सुबोधचा मंजिरीच्या घरच्यांशी परिचय होताच. त्यांनाही जावई म्हणून सुबोध पसंत पडला. 
आपण आईला कधीच अंतर द्यायचे नाही हे सुबोधचे म्हणणे मंजिरीला मान्य होते.
सुबोध आणि मंजिरीचे लग्न ठरले.

महिन्याभरात साखरपुडा आणि सहा सात महिन्यांनंतरच्या मुहूर्तावर लग्न करु असे ठरले. 
मुग्धा आणि शिरीषही तोपर्यंत ऑस्ट्रेलियाहून परतणार होते.
सुबोध आता मुग्धाच्या जबाबदारीतून मुक्त झाला होता. मंजिरी बरोबरच्या सहजीवनाचे त्याचे स्वप्न सत्यात उतरु पाहात होतं. त्यामुळे खूप आनंदात होता. पण तरी मनातून त्याला मुग्धाची काळजी वाटतच राहायची. 
शिरीष तसा समजूतदार मुलगा आहे. बाहेरुन बघतांना त्यांच्यात सगळं ऑल वेल आहे. पण खरंच मुग्धा त्याच्याबरोबर सुखी आहे का? आता तर इतक्या लांब परदेशात आहे. तिथे रुळली आहे का? 

मुग्धा थोडी जरी एक्स्प्रेसिव्ह असती तरी तिची काळजी वाटली नसती पण ती काही त्रास असेल तरी सांगणार नाही. त्यामुळे तिच्या सुखाबद्दल मन नेहमी साशंक असते. 
आज बाबा असते तर किती आधार वाटला असता त्यांचा.
बाबांच्या अनुपस्थितीत आई आणि मुग्धा दोघींच्याही सुखाची जबाबदारी माझ्यावरच तर आहे. मला ती जबाबदारी पूर्णपणे निभावता यायलाच हवी. कुठल्याही परिस्थितीत. हा विचार सतत सुबोधच्या मनात असायचा.

सुबोधचं लग्न जमतंय ही बातमी कळताच मुग्धा आणि शिरीषचा फोन आला. मुग्धा मंजिरीला ओळखत होतीच. तिने सुबोधचे अभिनंदन केले. शिरीषनेही खूप आनंदाने सुबोधचे अभिनंदन केले.
अजून बराच वेळ आहे म्हणता म्हणता सहा महिने भरकन सरकले आणि लग्न महिन्यावर येऊन ठेपले सुद्धा. 
ठरलेल्या प्लॅननुसार मुग्धा आणि शिरीष लॅंड झाले. लगेच दोन दिवसांत दोघं इकडच्या घरी आले. इतक्या दिवसांनी दोघांना प्रत्यक्ष भेटून सुबोध आणि आई खूप आनंदले.

मुग्धाला पाहून तर सुबोध हरखूनच गेला. 
आता ती आधीपेक्षाही सुंदर दिसत होती. मुळचा गोरा रंग अजून तजेलदार वाटत होता. अंगाने थोडी भरली होती. आज जराशी बोलतही होती. शिरीष बद्दल बोलतांना तिचा चेहरा खुलत होता. परदेशातले वेगळे जीवन आणि तिथल्या गमतीजमती सागंतांना चक्क हसत होती. 
लग्नानंतर तिच्या डोळ्यांतल हेच समाधान तर पाहायचे होते.

शिरीषच्या प्रेमळ सहवासाची ग्वाही मुग्धातल्या या बदलामुळे सुबोधला मिळाली. 
शिरीषही खूप खुश वाटत होता. 
तो आणि मुग्धा दोघं एकमेकांत पूर्णपणे रमलेत आणि त्यांच्या नवीन आयुष्यात आनंदी आहेत ते पाहून सुबोध सुखावला.सुबोधच्या लग्नाच्या तयारीच्या आणि खरेदीच्या गप्पा रंगल्या. 
शिरीष म्हणाला “सुबोध संध्याकाळी काय करतोयस? चल आज आपण पेठ्यांकडे जाऊ. मुग्धाला आणि मला तुझ्यासाठी एक छानसं ब्रेसलेट घ्यायचं आहे. तुझ्या पसंतीने. लग्नानिमित्त आमच्याकडून एक छोटासं गिफ्ट म्हणून घे.

तुला काय द्यावं याचा खूप विचार केला. मग ठरवलं काहीतरी दागिना द्यावा जो कायम तुझ्याजवळ आमची आठवण म्हणून राहिल”
ते ऐकून सुबोध म्हणाला “पण तू तर मला आधीच एक छान, मला कायम आनंद देईल असा दागिना दिला आहेस. ज्याची मी आतुरतेने वाट बघत होतो अगदी तोच.”
शिरीष आणि मुग्धा गोंधळून त्याच्याकडे बघायला लागले.
“अरे..म्हणजे.. ते बघ. माझ्या लाडक्या बहीणीच्या चेहऱ्यावरचे हे सुंदर स्माईल. ज्याचे क्रेडीट फक्त तुला आहे. ह्याशिवाय दुसरा कुठला दागिना हवाय मला? ह्याचीच तर वाट पाहात होतो मी.”

सुबोधने असं म्हणताच ‘काय रे दादा’ म्हणून मुग्धा लाजली.
“अगं वेडे, खरंच. आपली आई, बहीण, बायको या आम्हाला घडवणाऱ्या  स्त्रियांच्या चेहऱ्यावरचे हे सुखासमाधानाचे, आनंदाचे स्माईल हाच तर खरा दागिना असतो पुरुषांसाठी. ज्यासाठी आम्ही आयुष्यभर धडपडत असतो. तेव्हा माझं गिफ्ट तर मला आधीच मिळालय.”
आई म्हणाली “अगदी बरोबर बोललास. मुग्धा, तुझ्या चेहऱ्यावरचं हे समाधान खरंच लाख मोलाचं आहे बघ. आज हे असते तर तेही अगदी असंच म्हणाले असते. सुबोध तू कधी स्पष्ट बोलला नाहीस तरी तुझ्या मनावरचे दडपण मला समजत होते. ह्यांच्यानंतर मोठ्या धीराने तू परिस्थिती सावरलीस. आर्थिक बाजू तर सांभाळलीसच पण तू मला आणि मुग्धाला जीवापाड जपलस. अजूनही जपतोयस. मुग्धाच्या लग्नाची जबाबदारी उत्तमरीत्या निभावलीस. शाब्बास आहे तुझी.”

आईने केलेल्या एवढ्या कौतुकाने अवघडून गेलेल्या सुबोधने आई पुरे ग आता माझं कौतुक म्हणून विषय बदलला.
मनात असणाऱ्या मुग्धाबद्दलच्या काळजीला आज पूर्णविराम देत सुबोध आनंदाने आयुष्यात येऊ घातलेली मोठी जबाबदारी स्विकारायला सज्ज झाला.
समाप्त
वडील गेल्यानंतर आई आणि बहिणीची जबाबदारी अचानकपणे खांद्यावर आलेल्या तरूणाची मानसिकता रेखाटण्याचा केलेला प्रयत्न कसा वाटला ते कमेंटमधून जरूर कळवा.
© धनश्री दाबके
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव आहेत. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!