नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)

 1. तिची गगन भरारी
 2. डाग
 3. सुख
 4. सत्य
 5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
 6. तडा
 7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
 8. प्रायश्चित्त
 9. उत्तर 
 10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
 11. निलिमा
 12. आपली माणसं
 13. विश्वास
 14. जाणीव
 15. गुलमोहोर
 16. हिऱ्याची अंगठी
 17. सासूबाईंचे माहेर
 18. सवाष्ण

©अर्चना अनंत धवड 
“काय निधी कुठे चाललीस?” निधीची पॅकिंग सुरू पाहून तिची मैत्रीण दारातूनच म्हणाली.
“अरे स्नेहा ,अशी अचानक? ये ना आणि तुझा चेहरा का असा दिसतो?”
“अग ,तेच नेहमीचं…ती मयुरी…..”सोफ्यावर बसत त्रासिकपणे स्नेहा म्हणाली.
“काय झालं ? तुला नेहमी म्हणते, तू लक्ष देऊ नको. त्यांचं जीवन त्यांच्या पद्धतीने जगू दे … चार दिवसासाठी येतात मुलगा सून तर त्यांना त्यांच्या पद्धतीने राहू दे आणि आज काय झालं आणखी?”

“काही नाही ग . मयुरी ह्यांच्या समोर थ्री फोर्थ घालून आली. मी म्हटलं पूर्ण पँट तरी घालायची ,तर म्हणते कशी? तुमची मुलगी हॉट पॅन्ट घालते ते चालतं का?
“बरोबर तर आहे तिचं”
“तू ना …तुला चालत असेल.. ती तुझी संजना घालते हाफ पॅन्ट.. मला नाही चालत आणि मुली सोबत तुलना कशाला करायची.. ती माझी मुलगी आहे आणि माहेरी ही काय घालते त्याबद्दल माझं काही म्हणणं आहे का?” चिडत स्नेहा म्हणाली
‘तेवढ्यासाठी एवढी डिस्टर्ब झालीस?”

“नाही ग ..ते तर आता नेहमीचं झालं”
“मग आता काय नवीन झालं आणखी?”
“अग,काल काहीतरी पार्सल आलं .तर मी ते द्यायला रोहनच्या रूममध्ये गेले .रोहन आमच्या सगळ्यासाठी काहीतरी ट्रीप प्लॅन करीत होता. तर ती म्हणाली कशी ,काय गरज आहे आई बाबांना सोबत घ्यायची ?”.
“अगं पण कुठेच फिरले नाही ते.. मी आईला म्हटलं होतं की आपण या उन्हाळ्यात कुठेतरी फिरायला जाऊ म्हणून” रोहित तिची समजूत घालीत म्हणाला.

” जा मग तू त्यांच्यासोबत ..मी नाही यायची.. तिथे गेल्यावरही, हे नको घालू, ते नको घालू, मध्ये मध्ये बोलणार त्या आणि सगळ्या ट्रिपचा पचका करणार”
“अग, पण… रोहन काहीतरी बोलणार तर त्याला काही बोलू न देता ती परत म्हणाली “एवढेच वाटत असेल तर शेगावला पाठवा की. या वयात देवदर्शनाची गरज आहे आणि तुमच्या आईला तर जास्तच. उगीच माझ्या चुका शोधत असतात”. चिडून मयुरी म्हणाली.
“इतकी वाईट आहे का ग मी ?” डोळ्यात पाणी आणत स्नेहा म्हणाली
“नाही ग ,तू वाईट नाही. पण तू जास्त लुडबुड करतेस त्यांच्या आयुष्यात. मला वाटतं ते तू थांबवावं”

“काय बाई.. म्हणजे काही बोलूही नये.. दिवसभर पार्सल येतात.. कधी कपडे तर कधी खाण्याचे.. मग बोलते मी.. तर त्याचाही राग येतो..बरं ते जाऊदे ते तू कुठे चाललीस?” विषय बदलत स्नेहा म्हणाली.
“आम्ही अनुरागकडे चाललो बेंगलोरला. चार दिवसांसाठी. संजना सारखी बोलवते आहे.. नविन नोकरी घेतल्यामुळे तिला लग्नानंतर चारच दिवसात परतावं लागलं होते.. त्यामूळे सोबत राहिलोच नाही आम्ही”
“जा बाई पण सांभाळून राहशील. या आजकालच्या पोरींना कुणी नको असते आणि तुझ्या सुनेला तर साधी पोळी सुद्धा करता येत नाही. तिथे गेले की तुला मोलकरीण करते” हसत स्नेहा म्हणाली.

“अगं मला काय नेहमीसाठीच जायचं आहे ? चार दिवस तर जातो आम्ही आणि नोकर चाकर आहेत त्यांच्याकडे”
“अगं, चार दिवस काय आणि दोन दिवस काय? मी माझ्या सूनेकडे दोन दिवसासाठी गेले होते आणि एक दिवस बाई नाही आली तर सगळी काम मलाच करावी लागली.. काय तर म्हणे आम्हाला वेळ नाही. आमची मिटींग आहे .एक ना अनेक बहाने “
“तीने तुला करायला लावली “निधीचे विचारले.
“नाही.. ती म्हणाली उद्या बाई आली की करेल.. पण बरं दिसतं का ते ओट्यावर भांड्यांचा ढीग, ते बाहेरचं खाणं.. मग मीच केले सर्व”

“मग काय झालं करावं लागलं तर आपल्याच मुलाचं घर आहे ना?” निधी तीला समजावीत म्हणाली.
“ते तुला नाही कळणार .तू कधी सुनेसोबत राहिली नाही ना .जा म्हणजे तुला कळेल”
“हो बघूया.” असं म्हणत तिने आपली पॅकिंग सुरूच ठेवली.
“चल ,तू बिझी आहे निघते मी’
“अग बस ना, मी चहा करते”
“नको ,तू आल्यावर येईल. तुझा सुनेकडे कसा पाहुणचार झाला ते ऐकायला” सुचकपणे स्नेहा म्हणाली.

“हो येशील “असं हसत निधी म्हणाली परंतु मनात म्हणाली “ही कधी सुधारणार नाही .हीच चोंबडी आहे आणि सुनेला नाव ठेवते पण खरंच ही म्हणते तशाच असतात का आजकालच्या पोरी ? नाही माझी सून तशी नाही आणि उगीच ऐकून पूर्वग्रह करून घेऊ नये असं मनाला समजावत तिने तयारी केली.
सकाळी आठच्या सुमारास बेंगलोरच्या विमानतळावर पोहोचताच कॅब तयार होती . जाणे येण्याच्या विमानाच्या तिकिटा पासून तर कॅब पर्यंत सगळी व्यवस्था मुला-सुनेने केली होती. कॅब सोसायटीमध्ये पोहोचताच सून आणि मुलगा खाली घ्यायला आले.. निधीच्या हातातली बॅग संजनाने आणि बाबांच्या हातातली बॅग अनुरागने घेतली. चौघेही फ्लॅटमध्ये आले

“आई-बाबा तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी चहा आणते” असं म्हणत संजना चहा करायला आत गेली
सगळ्यांनी चहा घेतला .
संजना म्हणाली, “आई काय खाता पोहे की उपमा?”
“कशाला त्रास घेतेस ?आम्ही चिवडा लाडू आणला आहे. तोच खाऊया”
“नाही काहीतरी गरमागरम खाऊया ..पोहे खाता?”
‘अगं असू दे. कशाला त्रास घेते “परत निधी म्हणाली.
“आई त्यात कसला त्रास ?मी काही स्वतः बनवणार नाही .ऑर्डरच करणार आहे’

निधीला हसायला आलं पण ती हसू दाबत म्हणाली “अगं मग पोहे कशाला ?ते तर आम्ही रोजच खातो .असं कर मेदुवडे ऑर्डर कर”
थोड्यावेळात डिलिव्हरी बॉय गरमागरम मेदू वडे ,सांबार ,चटणी घेऊन दारात हजर.
सगळ्यांनी मस्त नाश्ता केला…
थोड्यावेळात कुक आला . त्याने सगळा स्वयंपाक केला.
दुपारी जेवण झाले आणि सगळ्यांनी आराम करायचा ठरवलं

निधीच्या मुलाचा वन बीएचके फ्लॅट होता..
आई तुम्ही आमचे बेडरूम मध्ये झोपा आम्ही हॉलमध्ये बसतो.
“अगं पण तुमची रूम.. तुमच्या रूममध्ये तुम्हीच आराम करा ना “निधी संजनाला म्हणाली.
“आई आम्हाला काम करायचं आहे त्यामुळे आम्ही बाहेरच बसतो आणि मॅच पण पाहायची आहे… आणि इथेच झोपू तूम्ही बेडरूममधे झोपायचं “
अनुरागच्या बाबांना पण मॅच आवडायची म्हणून तिघेही बाहेर हॉलमध्ये बसले आणि निधी एकटीच बेडरूममध्ये झोपायला गेली… झोपली असताना कुणाचा तरी डोक्याला स्पर्श झाला तशी ती दचकून जागी झाली

‘हॅलो ऑंटी ,मी टीना .. अरोमा मसाज करते”
“अगं पण संजना हॉलमध्येच आहे’
“आई तुमचाच मसाज करायला बोलावलं मला संजनाने
“काय ?संजना इकडे ये ही बघ काय म्हणते”
‘आई मीच बोलवलं. तुम्ही शांतपणे डोळे लावून झोपा”
टीनानी पूर्ण शरीराची सुगंधी तेलाने मालिश केली. डोक्याला तेल लावून मालिश केली कदाचित बाळंतपणानंतर पहिल्यांदाच अशी मालिश निधीने अनुभवली असावी,..

ऑंटी एका तासाने आंघोळ करा असं म्हणून मालिशवाली निघून गेली .निधीने एक तासाने आंघोळ केली आणि झोपली. इतकी शांत झोप तिला किती तरी दिवसांनी लागली असावी.
चार दिवस संजनाने सासू-सासर्‍यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. कधी ही गार्डन तर कधी तो पार्क ,कधी हा मॉल तर कधी हॉटेलिंग..
अनुरागला सुट्ट्या न मिळाल्यामुळे तो मात्र ऑफिसमध्ये जात होता.
दुसऱ्या दिवशी त्यांना निघायचं होतं आणि सायंकाळी कूक येणार नव्हता.

‘आई ,आज कूक येणार नाही .आपण बाहेर जायचं का जेवायला?”
“अगं बाहेर कशाला ?मी करते ना स्वयंपाक”
“नाही आई,मी ठरवलं होतं की मी तुम्हाला पूर्णपणे आराम द्यायचा”
जबरदस्तीने निधी स्वयंपाक करू शकली असती पण तीच्या भावनांचा आदर करु या असं तीने ठरवलं आणि म्हणाली,”मग असं कर तुला जे येते ते कर”
“आई मला पोळ्या येत नाही “हळूच संजना म्हणाली.

‘मग वरण भात कर की. दाल फ्राय आणि जीरा राईस’
“होय ..आनंदाने संजना म्हणाली.
“आई मी जीरा राईस करते ? दाल फ्राय अनुराग करेल .तो छान करतो. चालेल न?”तीच्या उत्तराची वाट न पाहता दोघांनी किचनचा ताबा घेतला आणि तासभरात पानं मांडली.
दाल फ्राय, जीरा राईस, दही, पापड ,लोणचं ,काकडी ,मुळा, गाजर आणि स्वीट म्हणून रसगुल्ला”

“आई पोळी मागवू का ? पाच मिनिटात येते “संजना हळुच म्हणाली.
“असू दे ..आम्हाला वरण भात पण आवडतो”
सगळ्यांनी मस्त जेवण केले .तेवढ्यात बेल वाजली .डिलिव्हरी बॉय आईस्क्रीमचे पॅक घेऊन दारात उभा होता.
आईस्क्रीम खाता खाता सगळे गप्पा करू लागले.
“आई तुम्ही काय काय पाहिलं आजपर्यंत? म्हणजे कुठे कुठे फिरल्या?”संजना निधिला म्हणली.

“मी जम्मू कश्मीर, हिमाचल ,आसाम असं थोडंच पाहिलं. माझ्या नोकरीमुळे मला विशेष सुट्ट्या मिळत नाही त्यामुळे खूप काही नाही फिरले “
“संजना तुला माहिती आहे आईने अजून समुद्र नाही पाहिला” अनुराग संजनाला सांगू लागला
“काय ?तुम्ही समुद्र नाही पाहिला?” आश्चर्याने संजना म्हणाली.
“नाही पाहिला त्यात एवढं काय आश्चर्य?” निधी संजनाकडे रोखून पाहत म्हणाली.
“खरंच आई, तुम्ही समुद्र नाही पाहिला?” परत संजना म्हणाली.
“नाही पाहिला बाई “,हसत निधी म्हणाली..

रात्री ते झोपायला बेडरूम मध्ये गेले आणि संजना आणि अनुराग हॉलमध्ये काम करत बसले.
“छान आहे ना आपली संजना ? मला फार भीती वाटायची ..ती स्नेहा नेहमी तिच्या सुनेचे गाऱ्हाणे करायची .
आयटीवाल्या मुली अशा असतात ..त्यांना वेळ नसतो ..त्यांना सासू-सासरे नको असतात पण मला आज फार समाधान वाटतं . तसंही आपल्याला किती दिवस त्यांच्याकडे राहायचं आहे.. अशीच प्रेमाने वागली की झालं..” निधी नवऱ्याला म्हणाली
“अग स्वभाव आणि शिक्षण याचा काही संबंध नसतो”

“खरंय तुमचं.. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिले की ते छानच वागतात .. ती स्नेहा नेहमी सुनेच्या कपड्यावरून ,तर त्यांच्या बाहेर जाण्यावरून तर काही मागवलं बाहेरून तर त्याच्यावरून, त्याच्यामध्ये लुडबुड करते. मग कशी वागणार सून मोकळी तिच्याशी?”निधी म्हणली.
“खरं आहे , झोप आता. उद्या लवकर उठावे लागेल. दहाची फ्लाईट आहे”
सगळी तयारी करून दोघे जायला निघाले
संजना पाया पडायला वाकली तर निधीने तिला मिठी मारली असेच दोघे आनंदी रहा असं म्हणत तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

“आई ,हे घ्या ..”असं म्हणत तिने एक पॉकेट निधीच्या हातात दिले.
“काय आहे” उत्सुकतेने निधी म्हणाली.
“आई ,हे अंदमान टूर्सचे पॅकेज आहे ..पुढच्या महिन्यात तुम्ही दोघे फिरायला जाताय” अनुराग म्हणाला
“अरे ,पण याची काय गरज?”निधी म्हणली.
“अगं ,तू समुद्र नाही पाहिला याचे संजनाला फार नवल वाटत होतं. आणि तुला समुद्र दाखवावा ही तिची इच्छा होती “अनुराग म्हणाला.

“तसं तर आपण चौघांनी सोबत जावे अशी माझी इच्छा होती पण सध्या असलेलं जॉबच टेन्शन बघता ते शक्य नाही त्यामुळे तुम्ही जा” संजना म्हणाली.
निधीने परत तिला मिठी मारली ..नकळत निधीचे डोळे पाणावले.
“आई पुन्हा या…” असं म्हणत संजनाने निधीची बॅग आपल्या हातात घेतली व निधी समाधानांनी मुलाच्या घरच्या पायऱ्या उतरायला लिफ्टमध्ये शिरली.
©अर्चना अनंत धवड 

सदर कथा लेखिका अर्चना अनंत धवड यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!