सत्य

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

© रमा (रेश्मा डोळे )
दिवसभराचा प्रकाशाचा पसारा आवरता घेऊन सूर्य नारायण निवांत परतीला निघाले होते.
आकाशात कुठे गुलाबी, कुठे नारंगी, कुठे काजळलाली रंगांची उधळण झाली होती.
हे सगळं मनापासून एंजॉय करत…एकेक रंग निरखून पाहत,हवाहवासा वारा अंगावर घेत दुर्गा, सुमेधची वाट पाहत समुद्र किनारी बसली होती.
तिला आज जुन्या जुन्या खूप आठवणी येत होत्या.
दुर्गाला सुमेधच्या आठवणीनी उगाच दाटून आल्या सारखं झालं. किती भोळा माणूस या कलियुगात कुठे आला ! याचं तिला आश्चर्य वाटायचं. ती प्रेमानी त्याला भोळासांबच म्हणायची. 

कातरवेळ ही फार जीवघेणी असते. सगळं स्वस्थ असताना अचानक एकदम अस्वस्थता मनात दाटून येते. एक अनामिक हुरहूर वाटायला लागतें. जुन्या आठवणी मन हळवं करून जातात. जीव कातरला जातो शब्दश : …. याच कातरवेळी  दुर्गाला आठवली दोघांची पहिली भेट.
बस मध्ये शेजारी शेजारी बसलेले दुर्गा आणि सुमेध… पावसाचे दिवस होते.. एक सर येऊन गेलेली….पावसाची ओली धुंदी वातावरणात भरून राहिलेली… त्या वातावरणात हरवलेली दुर्गा .. उतरायच्या नादात दुर्गा छत्री सीट वरच विसरून घाईत उतरली… सुमेध च्या लक्षात आलं आणि तो पण तिच्या मागे उतरला.

आता दुर्गा पुढे सुमेध मागे… नाव माहित नाही.. एका अनोळखी परस्त्रीला भर रस्त्यात हाक कशी आणि काय मारावी.. हा बिचारा मागे मागे.. दुर्गाला हे लक्षात येताच… ती जागेवर थांबली. आणि चप्पल काढून अंगावर धावून गेली…
नाही नाही तें बोलली… एक सुंदर मुलगी बोलतेय म्हणल्यावर रस्त्यावरच्या अनेक तरुण मुलांना मदतीचा उत्साह संचारला. काय झालंय हे माहित नसून सगळे सुमेधवर ओरडायला लागले. तरी सुमेध शांत होता.
दुर्गाची आरडाओरड जरा ओसरल्यावर त्यानी शांतपणे सांगितलं,”तुम्ही बस मध्ये छत्री विसरलात..  पावसाचे दिवस आहेत तुमची अडचण होईल म्हणून हे द्यायला आलो. असं म्हणून त्यानी छत्री पुढे केली .”

हे ऐकल्यावर दुर्गा एकदम ओशाळून गेली .. आणि भांडणाचा बार फुसका निघाल्यामुळे मदतीचे सगळे हौशी कलाकार निघून गेले.
दुर्गानी विचारलं, “अहो मग आधी का नाही बोललात…? ” 
“सत्य आणि समोरच्याचे बोलणे आधी ऐकत चला ” असं म्हणून सुमेध फक्त एक स्माईल देऊन निघून गेला.
सुमेधचं हे वाक्य आणि सुमेध, दुर्गाच्या मनात चांगलाच ठसला…
बस मध्ये गर्दी नसेल तेव्हा हसून ओळख वाढत गेली. मग ठरवून एकच वेळची बस घेतली जाऊ लागली.. मग शेजारी बसून प्रवास सुरु झाला …. त्याच शांत पणे व्यक्त होणं दुर्गाला आवडायला लागलं होतं…

हळू हळू दोघात मैत्री होतं गेली. बस प्रवासात ती जसजशी फुलत गेली..तसतसा दुर्गाला सुमेधचा स्वभाव कळू लागला. त्याला कुणाला जाब विचारणं, अरे ला कारे करण जमायचंच नाही …
एकदा एके ठिकाणी दोघ चहाला थांबले तिथे चहा पिऊन झाल्यावर पॆसे देऊन उरलेले पॆसे चहावाला काही केल्या परत करेना…. सुमेधनी एकदा आठवण करून दिल्यावर तो मुखरस कसाबसा सांभाळत सुमेधवर डाफरला,”ओ साहेब, दिले कीं काय राव गरिबाला लुटता?”
सुमेध पण “हो का बर बर “म्हणून निघाला. दुर्गा नी हे पाहिलं आणि तिनी नेहमीचा दुर्गा अवतार  घेतला.

चहावाल्यावर तिनी आवाज चढवून विचारलं… “काय पुरावा तुमच्याकडे पॆसे परत दिले याला? तुम्ही गरीब आणि आम्ही तुला लुटतो होय रे.. गप, खरं बोल कधी दिले पॆसे? किती दिले? सुट्टे दिले कीं बंदे दिले?.. कुणाच्या हातात दिले?” तिच्या या अवेशनी तो गांगरून गेला….
“माफ करा मीं बहुतेक दुसऱ्या कुणाला तरी दिले वाटत.” असं म्हणून त्यानी बाकी पॆसे परत दिले…
” काय रे सुमेध.. लगेच समोरच्यावर विश्वास ठेवू नको.. हे कलियुग आहे… इथे नाठाळा सोबत नाठाळ बनाव लागत. किती नुकसान करून घेत असशील अशा स्वभावामुळे तू “

” अग तू आहेस कीं मला सांभाळायला ” असं म्ह्णून तो नेहमी विषय हसण्यावर न्यायचा….आणि एक सांगू का मला असं कायम वाटत कीं समोरचा हा सत्यच बोलत असणार… तो का खोटं बोलेल “…तिला त्याच्या या सत्य या शब्दाची फार मजा वाटायची.
एकदा दुर्गाच्या ऑफिस पाशी तिची वाट पाहत असताना…. तिच्या ऑफिसमधला शेखर खाली येऊन उगाच त्याला धाक दाखवून म्हणाला, ” दुर्गाचा मित्र ना तू, मित्रच राहायचं बर का… आम्ही लवकर लग्न करणार आहोत “…तें ऐकून हळवा झालेला सुमेध तिला आठवला.
दुर्गा समोर आल्यावर तो फक्त मन खाली घालून तिला म्हणाला, “अभिनंदन!पण मला हे सत्य एकदा तरी सांगायचंस “…

दुर्गानी खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यानी सगळं सांगितलं… दुर्गा खळखळून हसू लागली  म्हणाली,” अरे!आज एक एप्रिल.. एप्रिल फुल केल त्यानी तुला.. आज सकाळ पासून तो सगळ्यांची खेचत आहे “
” सुमेध पण जर तुझा जीव इतका तुटला तर तू एकदा पण त्याला जाब विचारला नाहीस… इतका नको रे समोरच्यावर विश्वास ठेवू… गमवून बसशील आयुष्यात अशा स्वभावामुळे काही…”
” एक सांगतो दुर्गा माझा स्वभाव बदलेल कीं नाही मला माहित नाही, मीं काय गमवेन, कमवेन माहित नाही… पण आता एक खरं आयुष्यात जोडीदार म्हणून तू सोडून दुसरीचा विचार नाही…करणार नाही “

सुमेधच्या याच गोष्टींनी दुर्गा त्याच्यात गुंतली होती… 
दिवस वर्ष भराभर जात होते. सुमेधला चांगली नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी चांगली माणसं मिळाली होती, त्यामुळे त्याचा निष्पाप स्वभाव सांभाळून घेतला जात होता..
आज त्याच्या प्रमोशनचीच पार्टी करायला दोघ भेटणार होते.
सुमेधनी येऊन खांद्यावर हात ठेवला आणि दुर्गा विचारातून जागी झाली… दोघांनी खूप गप्पा मारल्या.. भेळ पाणीपुरी, आईस्क्रीम… धमाल केली…

अचानक दुर्गा एकदम शांत झाली…,
” सुमेध…”
“बोल ना… काय झालं अशी एकदम शांत का झाली ” 
“उद्या पासून आपण भेटू शकणार नाही रे… आजी गावाला आजारी आहे… मला तिच्या सोबत जाऊन राहावं लागणार आहे… आई गेल्यावर तिनी माझं खूप केलय…सुट्टी टाकली आहे मीं पंधरा दिवस .”
“……..” 
क्षणभर कुणीच काही  काही बोललं नाही…. मग सुमेध हसायला लागला… दुर्गाला कळेच ना…. 

“माझी मजा करतेय ना…. मीं सत्य न विचारता.. तुला जां म्हणेन… मग तू मला थांबवलं पण नाहीस म्हणून चिडून बसशील… हो ना?” 
“अरे नाही खरंच…” 
“बर बर… जां.. फोन वरून आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू…”
“सुमेध…. ऐक मीं नसताना एकदा घरी जाऊन बाबांना भेट आपल्या लग्नाचा विषय काढ… आता आजी कडे गेले कीं तीच पण लग्नासाठी टूमणं मागे चालू होईल.आणि बाबा पण मुलं बघायला लागले आहेत…. त्यांच्या मित्राचा एक मुलगा त्यांच्या मनात आहे…” 

“तू नसताना कसा जाऊ घरी मीं? ” 
” अरे, उलट  मीं नसेन तर् तू मोकळे पणानी बोलू   शकशील.. “
दोघं निशब्द बसून राहिले…. दुर्गाला सुमेध नी घरी सोडल… दुर्गानी घरी येऊन बोलायचे पुन्हा पुन्हा बजावलें… 
****** ****** ****** ****** ******
दुर्गाचा गावी पोचल्याचा आणि बाबांना जाऊन भेटण्याचा एक मेसेज येऊन गेला…. एक दोनवेळा फोन वरून कॉन्टॅक्ट झाला पण गावात रेंज नसल्यामुळे नीट बोलणे होऊ शकले नाही…

शनिवारी ऑफिस मधून लवकर निघून सुमेध मनाची तयारी करून दुर्गाच्या बाबांना भेटायला गेला.
करारी नजरेचे बाबा पाहून दुर्गात एवढा करारीपणा कसा आला हे सुमेधला समजले…
तोंड ओळख झाल्यावर.. दुर्गाच्या बाबांनी चहा केला… आणि मुद्याला हात घातला…. 
“दुर्गा, मला तुमच्याबद्द्ल बोलली आहे… पण एक बाप म्हणून मीं स्पष्ट सांगतो.. ती आईविना लाडात वाढलेली पोर आहे… तुमचे चाळीतले घर, कॉमन स्वच्छतागृह… तुमचा पगार बरा आहे.. पण घरी जबादारी आहे…. या सगळ्याचा विचार करता ती तिथे कितपत रुजेल मला माहित नाही…. तुम्ही माणूस भले आहात… पण प्रेम संपलं कीं हे भलेपण टोचायला लागत….डोळ्यावरची धुंदी ओसरते….तिच्या साठी मीं चांगला दुसरा मुलगा बघितला आहे….स्वतःच घर… चांगला पगार..”

सुमेधच्या हळव्या स्वभावामुळे डोळे भरून यायला लागले त्याला पुढचे काही ऐकू येईना…. कसबासा चहा संपवला आणि तो उठला.. 
” काका हे सगळं जे बोललात तें सत्य आहे ना? ” 
“बेशक.. यात असत्य काय असणार???.. आणि यातलं तुम्ही दुर्गाला काही कळू देऊ नका… तिला नकार कसा सांगायचं तें मीं पाहतो.. तुम्ही शक्य तितके आणि शक्य तितक्या लवकर तिच्या पासून लांब जा ” 
विचित्र मनस्थिती सुमेध घरी आला…. काय निर्णय घ्यावा त्याला कळेना…. दुर्गा चे बाबा खोटं का बोलतील तें सत्य च सांगणार…. दोन तीन दिवसात त्यानी दुसऱ्या गावी बदली करून सगळं बस्तान हलवलं… 
****** ****** ****** ***** ****** ******

दुर्गाचा सुमेधशी काही संपर्क होऊ शकला नव्हता. खूप अस्वस्थ मनाने ती घरी परतली होती. घरी आल्यावर बाबांना सुमेध बद्द्ल विचारल्यावर त्यानी तो भेटायला आला नाही असे सांगितले…. तिला खरं वाटेना… सरळ घरी जाऊन त्याला जाब विचारावा म्हणून तिनी त्याची चाळ गाठली….पण तिथून तो कुठे गेला.. का गेला कुणाला पत्ता नव्हता.
नोकरीच्या ठिकाणी तीच गत….. सुमेध असं वागेल यावर तिचा विश्वास बसत नव्हता….. राग,संताप अपमान… फसवणूक सगळं एकत्र साठून आलं होतं…घरी येऊन दुर्गा नी खूप चिडचिड.. रडारड केली… पण उपयोग शून्य होता… सुमेध दूर गेला होता… तिला न सांगता??.  हे सत्य मन स्वीकारत नव्हत….

काही दिवस गेले… वातावरण जरा निवळल्यावर बाबांनी दुर्गा जवळ लग्नाचा विषय काढला…. तेव्हा दुर्गानी स्पष्ट आपण आता कधीच लग्न करणार नाही आणि परत हा विषय काढलात तर जीवाचं बर वाईट करून घेईन म्हणून  ठणकावून सांगितलं…. बाबा तरी अडून अडून अधून मधून सुचवायचे.. पण दुर्गाचा निर्णय अटळ राहिला…..
वर्षां मागून वर्ष गेली…. काळ ना कुणासाठी थांबला.. ना कुणासमोर झुकला…. दुर्गाचे बाबा आता या जगात नव्हते.. पण जाताना तें दुर्गाला सत्य सांगून गेले… सुमेध येऊन गेला. हे त्यांनी तिला सांगून तिची माफी मागितली…

पण आता पुला खालून इतकं पाणी वाहून गेलं होतं कीं माफी मागून आणि सत्य कळून उपयोग नव्हता….पण मनात आशा जागी झाली होती कदाचित सत्य जिंकेल… सुमेध परत भेटेल… नियती असा असत्याचा विजय होऊ देणार नाही…. 
****** ****** ****** ****** ****** ******
दुर्गा आज खूप दिवसांनी सर्वजनिक अशा ठिकाणी बाहेर पडली होती…. खास मैत्रिणीच्या मुलीच लग्न होतं… तिनी खुपच आपुलकीने बोलावलं होतं..
बाबा आणि आजी गेल्यावर इतकं आपुलकी दाखवणार कुणी उरलं नव्हतं त्यामुळे ती लग्नाला गेली होती…. पूर्वीचा उत्साह आनंद सुमेध घेऊन गेला होता… एका कोपऱ्यात ती शांतपणे सगळं पाहत बसली होती.

मैत्रिणीनी तें पाहिलं… तिला एकटं वाटू नये… कार्यात सहभागी करून घ्यावं म्हणून मैत्रिणीनी तिला जेवणाचं कुठवर आलं पाहायला भटारखान्यात पाठवलं.
ती भटारखान्यात आली…. तिथे एक गृहस्थ पदार्थ टेस्ट करत होतें…. आपण कशाला अजुन लुडबुड करा म्हणून दुर्गा तशीच माघारी फिरली…. इतक्यात कानावर शब्द आले…, ” खवा चांगला वापरलाय ना रे गुलाबजाम मध्ये. मुरलेत न नीट पाकात ” 
” हो साहेब… ” 
“सत्य सांगत आहात ना “.. 
तो ओळखीचा आवाज आणि सत्य हा शब्द ऐकून दुर्गा गर्रकन मागे वळली…..

तिनी हलकेच हाक मारली… “सुमेध!”
त्या बरोबर सुमेध दचकून मागे वळला….
“दुर्गा तू? इथे? “
दुर्गाच्या डोळ्यातून फक्त घळाघळा पाणी वाहत होते….
” अरे कुठे गेलास तू मला सोडून…. तू इथे कसा….?? तिला जास्त काही बोलवत नव्हते…. 
” अग घरचे लग्न आहे.. मी मुलाचा…. ” 

” तुझ्या मुलाचे लग्न आहे हे ??? फसवलं मला तू” दुर्गाला आता भोवळ येईल असे वाटत होतें…. 
“सत्य आणि समोरच्याचे आधी ऐकत जां ग…तू अजुन तशीच आहेस ” 
“माझ्या बहिणीच्या मुलाचे लग्न आहे… मी मुलाचा मामा आहे…मी लग्न केले नाही… तू नाहीस तर कुणी नाही…” 
सुमेधनी बाबांची भेट… त्यानी सांगितलेली परिस्थिती सगळं सांगितल….तुला जर माझ्या पेक्षा चांगला मुलगा पाहिला असेल तर मी काय बोलणार होतो… त्यानी जे सांगितलं तें सत्यच असणार ना… “

आता, दुर्गाची चिडचिड झाली, “अरे सत्य सत्य सत्य….. पण तुला मीं सतत सांगायचे कीं लगेच विश्वास ठेऊ नको.. भले तें माझे बाबा असतील… तुला सांगता आले नाही… कीं तुझ्यात धमक आहे मीं तिला सर्व सुख देईन… तीचं प्रेम आहे ती पण ऍडजेस्ट करेल… “
दुर्गानी पूर्वीचा दुर्गा अवतार घेतला होता…
सुमेध नी तिला पाणी देऊन शांत केल….
“तू पण नाही केलस लग्न?”
“नाही “…. आणि हे सत्य आहे..” डोळ्यातून येणारा राग, प्रेम, पाणी सगळं दाखवत दुर्गा ओरडली….

सुमेधनी नेहमीच्या शांत पणे तिला जवळ घेतलं.
“दुर्गा आजपासून शब्द आहे… मी समोरच्याच्या बोलण्याची खात्री करेन…. खूप नुकसान झालं आपलं… या सत्य असत्याच्या माझ्या भ्रमात…. पण एक खरं सत्याचा विजय झाला… आपलं प्रेम खरं होतं तेच जिंकलं… “
सत्यानी आपली खेळी नियतीच्या साथीने खेळून विजयश्री खेचून आणली होती ….
गुलाबजाम पाकात विरघळत होते.
दोन मन परत जुळत होती आणि कार्यलयातून मंगलष्टका ऐकू येऊ लागल्या होत्या.
© रमा (रेश्मा डोळे )

सदर कथा लेखिका रमा (रेश्मा डोळे ) यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!