सुख

 1. तिची गगन भरारी
 2. डाग
 3. सुख
 4. सत्य
 5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
 6. तडा
 7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
 8. प्रायश्चित्त
 9. उत्तर 
 10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
 11. निलिमा
 12. आपली माणसं
 13. विश्वास
 14. जाणीव
 15. गुलमोहोर
 16. हिऱ्याची अंगठी
 17. सासूबाईंचे माहेर
 18. सवाष्ण

©️ सौ. सायली ध. जोशी
संध्याकाळी सातच्या सुमारास सीमा दार उघडून घरात आली.
स्वयंपाक घरातून येणारा धूर आणि करपलेला वास साऱ्या घरभर पसरला होता.
हे पाहून सीमा घाबरून पट्कन आत आली. 
“आई, अहो काय हे?” सीमा सगळी दारं, खिडक्या उघडत म्हणाली. 
अचानक आलेल्या आवाजाने सुमित्रा ताई दचकल्या.

“अगं, खिचडी करायला गेले आणि ती करपली तरी देखील माझं लक्ष गेलं नाही. मी इथेच, कट्ट्याजवळ उभी होते गं. पण मनात विचारांनी गर्दी केली आणि साधं खिडक्या उघडायचं देखील भान राहिलं नाही बघ मला.”
“आई, असू दे. मी काही म्हणाले का? आज मला यायला नेमका उशीर झाला. मी उद्या सकाळी खिचडी करून देईन तुम्हाला. इतकं मनाला लावून घेऊ नका. तुम्हाला काही झालं नाही हे महत्वाचं. नाही का?” सीमा कट्टा आवरत म्हणाली.
“अगं, राहू दे मी करते ते. आत्ताच आलीस ना? जा हात -पाय धुवून घे. तोपर्यंत मी चहा टाकते.”
“नको आई. मी करेन चहा.” सीमा दाराशी थांबली.

“खिचडी जमली नाही म्हणून मला चहा सुद्धा जमणार नाही असे वाटले की काय तुला?” सुमित्रा ताई चहाचे आधण ठेवत म्हणाल्या.हे ऐकून सीमा आवरायला पळाली.
फ्रेश होऊन, चहा पिऊन सीमा पट्कन कामाला लागली.
थोड्या वेळाने बाहेर सासऱ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. “मी म्हंटले होते ना? तुला जमणार नाही. मग ती खिचडी करायची गरज काय होती? आपलं वय झालं, हे तरी मान्य करा आता.”
आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून सुमित्रा ताई गप्प बसल्या.

आत येऊन त्यांनी डोळ्याला पदर लावला आणि त्या सीमाला मदत करू लागल्या.
“आई, अहो करते मी. जा तुम्ही आराम करा.” सीमा.
“आता तुलाही असंच वाटतं का? मला काही जमणार नाही म्हणून?” सासुबाईंच्या डोळ्यात पाणी आलं.
“नाही आई. इतकी वर्षे सगळं केलं ना तुम्ही?आता आम्ही काळजीने बोलतो. बस् इतकंच. हे तुमचे आराम करायचे दिवस आहेत. ते छान एन्जॉय करा. दोघे मस्त फिरायला जा. कधी नाटकाला जा. ते हास्य क्लब, योगाचे क्लास जॉईन करा हवं तर.” सीमा मनापासून बोलत होती.

“मी जाईन गं. पण हे तयार व्हायला हवेत ना? आयुष्यभर यांनी ऑफिसरची नोकरी केली. तिच त्यांच्या अंगात भिनली. त्यांना वाटते, आता घरीही सर्वांनी आपलं ऐकावं. मी सांगेन तसं वागावं. इतकी वर्षे ऐकलं गं मी यांचं. पण आता मन बंड करून उठतं, म्हणतं जे मनात होतं ते करायचं राहून गेलं.”
“नाना नाही म्हणतात ना? मग तुम्ही एकट्याने जायला काय हरकत आहे आई? आपल्या पलीकडच्या बागेत सकाळी योगाचा क्लास असतो. मीही रोज तुमच्या सोबत येत जाईन. महिन्यातून एकदा आपण नाटक किंवा सिनेमाला जाऊ. नंतर मलाही असे वाटायला नको, आपल्या मनाचं ऐकायचं राहून गेलं.” सीमा हसत हसत म्हणाली. 

सुमित्रा ताई आपल्या सुनेकडे कौतुकाने पाहत होत्या.
‘नोकरीला लागल्यापासून किती बदल झाला आहे हिच्यात! आधी शांत शांत असणारी, कधीतरी बोलणारी सीमा आता आत्मविश्वासाने बोलत असते. पुढे होऊन सगळी कामे करते. आधी वाटलं होतं, ही नोकरी करायला लागली तर घरची सगळी जबाबदारी आपल्यावर पडेल. पण तसं झालं नाही.
खरंतर सीमा आपल्याला काहीच करू देत नाही. घर तिच सांभाळते आणि ऑफिसचं कामही! 

सीमामुळे ही खाष्ट सासू सौम्य झाली. नाहीतर यांचा राग अजून किती दिवस मी तिच्यावर काढला असता देव जाणे.’
“आई, कसला विचार करता आहात? हे अजिबात कम्पल्सरी नाही. तुम्हाला मनापासून वाटलं तर जाऊ आपण.” सीमा.
“आज जेवायला मिळणार आहे की सासु -सुनेच्या गप्पांनीच पोट भरणार आहात आमचं?” सासरे स्वयंपाकघरात येत म्हणाले.
“अगंबाई, साडे आठ वाजले? बसा, मी वाढते जेवायला.” सुमित्रा ताईंनी पट्कन एक पान वाढलं.
“आई, तुम्हीही बसा. मी वाढते.” 

हे ऐकून सुमित्रा ताई आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघत उभ्या राहिल्या. पण नाना मात्र खाली मान घालून मुकाट्याने जेवत राहिले. याचा अर्थ असा की, बायकोने नवऱ्याचे जेवण झाल्या नंतर जेवायला बसावे.
पण बोलता बोलता सीमाने सुमित्रा ताईंचे पान वाढले. “आई, खरंच जेवून घ्या. विक्रम यायची वेळ काही पक्की नसते. पुढचे आवरायला उशीर होतो मग. जरा पाठ टेकली की सकाळ कधी उजाडते? हे कळतच नाही.”
“मग नोकरी करायची कशाला? माझा मुलगा उत्तम कमावतो. सर्वांना पोसू शकेल इतपत.” आज पहिल्यांदाच नानांचा जेवताना न बोलण्याचा अनेक वर्षांचा नियम मोडला.

सुमित्रा ताई थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिल्या. 
“नाना, अहो नोकरी करायला छान वाटतं. स्वतःचे चार पैसे हाती येतात. उद्या आमच्या मुला-बाळांना हेच पैसे कामी येतील.” बोलता बोलता सीमाने आपली जीभ चावली. आपण जरा जास्तच बोललो असे वाटून ती शांतपणे पुढची कामे करत राहिली.
नाना जेवण करून शतपावली करायला गेले तर सुमित्रा ताई शेजारी देशपांड्यांच्या घरी गेल्या.
——————————

“सीमा, अगं देशपांडे बाई त्या हास्य क्लबला जातात म्हणे. मीही त्यांच्या सोबत जाईन उद्यापासून. तू तुझं आवरून जात जा. बाकी राहिलेली कामे मी करत जाईन. तूच सगळं किती करशील?” सुमित्रा ताई घरी येत म्हणाल्या. 
“अचानक काय झालं आई? रोज तर तिच बघते सारं.” विक्रम जेवता जेवता म्हणाला.
“अरे, त्या देशपांडे बाई सीमाचे कौतुक करत होत्या. म्हणाल्या, तुमची सून नोकरी करते. सगळा भार तिच्यावर टाकू नका.” सुमित्रा ताई म्हणाल्या.
“आई, तुम्ही एवढं म्हणालात तेच खूप आहे.” सीमाला समाधान वाटलं.

दुसऱ्या दिवसापासून सुमित्रा ताई हास्य क्लबला जाऊ लागल्या.
हळूहळू तिथे रुळल्या, त्यांच्याच वयाच्या मैत्रिणींत मस्त रमल्या.
इतकी वर्षे घराच्या जबाबदारीतून वेळ मिळाला नाही. नंतर सून आल्यावर तिने घरची सगळी जबाबदारी घेतली. मग मिळणारा हा मोकळा वेळ कुठे सत्कारणी लावावा? त्यांना उमगत नव्हतं. 
त्यातच नानांचा स्वभाव कडक! ते म्हणतात, तसे वयानुसार आपल्याला काही जमेल की नाही? सुमित्रा ताईंना असे सारखे वाटत राही. मनात असूनही त्यांना काही करता येत नव्हते. 
मात्र सुनेने मानसिक बळ दिले आणि सुमित्रा ताईंचा आत्मविश्वास दुणावला. त्या उत्साही, आनंदी आणि खुश राहू लागल्या. 

एरवी आपल्याच नादात राहणाऱ्या नानांना सुमित्रा ताईंचे बदललेले हे रूप आवडू लागले.
आपणही आपल्या बायकोच्या आनंदात सहभागी व्हावे असे मनापासून वाटू लागले त्यांना. ‘आपण आपल्या बायकोला ही मोकळीक आधीच द्यायला हवी होती.’ नानांना कसेतरीचं झाले.
‘विक्रम सुनबाईंना जसा सपोर्ट करतो, तसा आपण सुमित्राला करायला हवा होता. पण माझा अट्टाहास होता, मी म्हणेन तसे तिने वागायला हवे आणि तिनेही तो नकळत मान्य केला.’
रात्री झोप येत नव्हती म्हणून खोलीत फेऱ्या मारत असलेले नाना अचानक आपल्या बायको जवळ आले.” सुमित्रा..माफ कर गं मला.” 

“अहो, इतके दिवस काय चाललं आहे तुमच्या मनात, हे कळतं नाही की काय मला? आणि तुमच्या डोळ्यात दिसतं सारं.” 
नाना पुढे काही न बोलता सुमित्रा ताईंचा हात हातात घेऊन स्फुंदत राहिले.
“इतक्या वर्षात तू मला ओळखलंस. पण मी ओळखू शकलो नाही तुझ्या मनात काय आहे ते.”
सुमित्रा ताई नानांच्या हातावर कितीतरी वेळ थोपटत राहिल्या. “अहो, माझी काहीच तक्रार नाही. आज इतक्या वर्षांनी मला माझा सुख गवसलं. यात तुम्हाला सामील व्हावंस वाटतं हेच खूप आहे.” सुमित्रा ताईंच्या या बोलण्यावर नाना त्यांच्याकडे पाहतच राहिले. 
“बायकोला आपल्या नवऱ्याच्या मनातलं सगळं कळतं असतं.” सुमित्रा ताई हसून म्हणाल्या आणि नानांनीही या वाक्याला हसून साथ दिली.
©️ सौ. सायली ध. जोशी

सदर कथा लेखिका सौ. सायली ध. जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!