अरे संसार संसार…जसा तवा चुल्ह्यावर

© सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
विभाच्या माहेरी ती, भाऊ, आई, वडिल असं चोकोनी कुटुंब. विभाचं लग्नाचं वय झाल्यावर आई – वडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरवात केली. एक चांगलं स्थळ सांगून आलं आणि लग्न झालं.. ती विभा अजित जोशी झाली… अजित स्वभावाने अतिशय चांगला होता. विभाची खूप काळजी करायचा. सर्व ठीक चाललं होतं.
भावाचं लग्न झाल्यानंतर ती आज प्रथमच जास्त दिवसांसाठी माहेरी राहायला चालली होती. गेले चार महिने आईबाबा भावाने त्याच्या लग्नानंतर नवीन फ्लॅट घेतला तिथे राहायला गेले होते. तीला का काय माहिती पण आईबाबांची खूप काळजी वाटत होती. ते दोघं दिवसभर घरात काय करत असतील, नवीन ठिकाणी बोर होतं असतील. भावाचं नवीन लग्न झालंय, त्या दोघांना कशाला आई – वडिलांची पर्वा असेल आता, असे विचार तिच्या डोक्यात सतत येत होते.

तीला लगेच नवीन लग्न झाल्यावरचे तिचे दिवस आठवू लागले.. रात्री उशिरापर्यंत गप्पा, त्यामुळे सकाळी उशिरा उठणं, घरी जेवण, नाश्ता करायला कामवाली बाई होती. त्यामुळे अजित ऑफिसला गेल्यावर ती आपल्या बेडरूम मध्ये बसून मासिक वाचणे, मैत्रिणींना फोन करणे, अधून मधून अजितला कॉल करणे असं करत असे.
दुपारी कामवाली बाई जेवायला ‘चला वाहिनी’ असं बोलत असे तेव्हाच ती रूम मधून बाहेर जात असे, सासू – सासरे तिची जेवायला वाट बघत असत. पण हिला त्यांचं काहीच कौतुक नव्हत. जेवून झालं कि ती पुन्हा आपल्या खोलीत दुपारी आराम करायला निघून जायची. सासू सासर्यांशी जास्त बोलायची पण नाही.

एक – दोन दिवसाआड अजित ऑफिस मधून आला कि ती दोघं फिरायला जात असत. असेच तीन महिने गेले. आणि तीला दिवस गेले. विभा आता अतीच सर्व गोष्टींचा बाऊ करू लागली होती. अजितला पण वाटायचं कि तीला गरोदरपणात त्रास होतं असेल. त्यामुळे तो पण तिची सतत काळजी घेत असायचा.
त्यावेळी अजित सकाळी ऑफिसला गेला कि संध्याकाळी परत आल्यावर त्याच्या पण आई – वडिलांना वाटत असे त्याने आपल्या बरोबर दोन शब्द बोलावे. पण विभा त्याला मी गरोदर आहे तू माझ्याशी सतत इथे आत बेडरूम मध्ये बोलत, गप्पा मारत बसावस असं मला वाटत असं बोलून आत गुंतवून ठेवत असे.

रात्री जेवल्यानंतर पण दोघं आपल्या खोलीत गप्पा मारत असत. दार बंद करून घेत असत.
सासूला तिच्या बाळ होण्याचे खूप कौतुक वाटे…सासू बरेचदा तिच्या बंद दारावर टक  टक करून तीला विचारत असे, दुध, फळ देऊ कां आणून, पण हिला तीच विचारण कटकट वाटायची…
विचार करता करता तीच मन अजून थोडं मागे गेलं. तीला आठवलं एकदा बोलता बोलता अजित बोलला मला कायम चं असं एकत्र कुटुंब आवडत.. आजी – आजोबा चं प्रेम आपल्या होणाऱ्या बाळाला् मिळणार हे किती छान ना… ती तेव्हा मनातल्या मनात बोलली म्हणजे सासू – सासरे हे  कायमचं आपल्या बरोबर असणार… ती मनातून नाराज झाली..

जुन्या आठवणी खूप उसळून येत होत्या. आज आपल्या आई – बाबांबरोबर दादा – वाहिनी असे वागले तर… ह्या विचारानेच तीला कसतरीच झालं…
विभा माहेरी पोचली तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. घरी पोचल्यावर ती फ्रेश झाली.  ती फ्रेश होई पर्यंत वहिनीने उपमा आणि चहा केला आणि ती आल्यावर पटकन गरम गरम तीला खायला दिला.
विभा आई – बाबां बरोबर बोलेपर्यंत वहिनीने रात्रीच्या जेवणाची तयारी पण करायला घेतली. दीड तासात तिने लगबगीने जेवण पण तयार केले. आणि मग मस्त हसत, बोलत सगळे टीव्ही बघू लागले.

विभाला पटकन आठवलं तिने हट्टाने अजित कडून तिच्या रूममध्ये पण टीव्ही लावून घेतला होता.. तीच म्हणणं असायच तुझ्या आई – वडिलांना मराठी सिरीयल लागतात बघायला आणि मला स्टार प्लसच्या हिंदी आवडतात त्यामुळे मला आत टी व्ही पाहिजे, अजितने ही मग त्यांच्या रूममध्ये टीव्ही लावून दिला तीला..
तिच्या घरी कामवाल्या काकी होत्या. त्या सकाळी आठला येऊन संध्याकाळी सहाला जात असत.
सकाळी सर्वांना नाश्ता, दोन टाइमचं जेवण, संध्याकाळचा चहा असं सर्व करून काकी संध्याकाळी सहाला जात असत. त्यामुळे तीला जेवण, नाश्ता काय करावं ह्याच कधीच टेन्शन नसायचं.

अजित तीला लग्न झाल्यावर बोलला होता कि माझे आई – वडिल दोघं ही नोकरीला होते त्यामुळे घरी ताईला आणि मला सांभाळायला आमचं जेवण करायला ह्या काकू आहेत लहानपणी पासून. त्या स्वयंपाक पण छान  करतात आणि आम्हाला सर्वांना त्यांच्या हातच जेवण खूप आवडतं.
तुला कुठला वेगळा पदार्थ करून हवा असेल किंवा काही वेगळं खावंसं वाटत असेल तर तू बिनधास्त काकींना सांग त्या बनवून देतील. विभाला तेव्हा ऐकूनच छान वाटल होतं कि अरे वा, दिवसभर  काहीच कामं नाही. मज्जा आहे…तीला मोबाईल वर गाणी ऐकायची खूप आवड  होती.. ती मनातल्या मानत म्हणाली मी मस्त गाणी ऐकेन… मासिक वाचेन…

विभा आणि दादा – वहिनी सर्वांनी आई – बाबांच्या खोलीत गप्पा मारल्या आणि मग दादा – वहिनी त्यांच्या खोलीत झोपायला गेले..तिलाही थोड्या वेळाने झोप लागली. सकाळी वहिनी ने उठवलं तेव्हा तीला जाग आली.
“ताई उठा, नाश्ता तयार आहे” वहिनी  म्हणाली…ती पटकन अंघोळ करून बाहेर आली. सगळे तिचीचं वाट बघत होते..
मस्त हसत, गप्पा मारत ब्रेकफास्ट झाला… आईने सुनेला सांगितले कि… मी आणि तुझी नणंद आता गप्पा मारतोय तू पण आराम कर दुपारच्या जेवणाला अजून वेळ आहे.. वहिनी पण हो बोलून गेली तिथून…

आई – बाबांच्या खोलीत माय – लेकी बोलत बसल्या.. बाबा पण तिथेच बसून पेपर वाचत होते… वहिनीने मध्येचं अकरा वाजताच्या दरम्यान पुन्हा एकदा चहा आणून दिला… आणि एक वाजता वहिनी ने जेवायला हाक मारली…. आई – बाबा, ताई  जेवायला चला…
विभा सतत वहिनी वर लक्ष ठेवून होती.
वहिनी सगळं एकदम व्यवस्थित करत होती… मधून मधून आईला जेवनातलं काही- बाही विचारत होती, आई च्या सल्ल्याने सर्व कामं करत होती… दुपारी जेवणाला वहिनी ने मस्त बेत केला होता, गोड म्हणून गुलाबजाम पण केले होते.. जेवण पण सुंदर केले होते.. विभाला मनात वाटून गेलं मी कधीच असं माझ्या घरी सासू – सासर्यांनसाठी आजपर्यंत आवडीने काहीच केलं नाही…

विभा चार दिवस राहणार होती म्हणून वहिनी ने सर्व दिवसांचा बेत आधीच ठरवला होता.. पुरणपोळी, श्रीखंड – पुरी, असे मस्त मस्त बेत तिने चार दिवसांसाठी ठरवले होते..
वहिनी सर्वांना छान  जपत होती. आई – बाबांची औषधं वेळेवर देत होती.
झोपताना सर्वांच्या खोलीत आठवणीने पाणी ठेवलं आहे कां ते बघत होती…ह्या छोट्या छोट्या गोष्टी वहिनी आवडीने करत होती..
विभा न  राहवून बोलली पण, “वहिनी चारच महिन्यात छान सांभाळते आहेस ग सगळं.”
वहिनी हसून म्हणाली, “अहो ताई  त्यात काय आपल्याच घरचं तर करतेय आणि आईंकडून पण शिकतेय जे जमत नाही आहे ते.” विभाला उगाचच मनात वाटून गेलं मी कां अशी  वागू शकले नाही माझ्या घरी.. मला श्रीमंती चा माज चढला होता कां कि मी सासू – सासर्यांना आमच्या संसारात अडचण समजत होते…..

विभाने चार दिवस राहून पाचव्या दिवशी सकाळी सासरी निघायचे ठरवले. सकाळी लवकर विभा निघाली. वहिनी आणि भाऊ ही तिला सोडायला आले होते स्टॉप पर्यंत.. विभा भावाला बोलली पण अरे तुम्ही कां एवढ्या लवकर उठलात.
त्यावर दादा म्हणाला.. “ही तुझी वहिनी – ताई निघाल्यात चला उठा करून मला ओरडू लागली.” कौतुकाने दादाने बायकोकडे बघितलं.. वहिनी म्हणाली – “मग उठायला नको, नंतर तुम्ही मला ओरडला असतात ताई जाताना कां नाही उठवलंसं म्हणून.”
त्याचं वेळी पटकन विभाला आठवलं, तिची नणंद एकदा माहेरी आलेली होती तेव्हा ती पुन्हा सासरी निघाली तेव्हा अजित झोपला होता.. पण विभा जागी होती.
तीला बाहेर हॉल मध्ये गडबड चालू असल्याचा आवाज आला पण ती जागी होती तरी उठली नाही, आणि अजित ला पण तिने उठवलं नाही.

त्या दोघांना न भेटताच नणंद निघून गेली. उठल्यावर अजित ला खूप वाईट वाटलं.. अजित तीला ओरडला पण त्यावरून पण तीला नणंद गेली न भेटता त्याबद्दल काहीच वाटल नाही, पण अजित ओरडला त्याचा राग आला होता खूप.
आता जर वहिनी ने भावाला उठवलं नसतं तर ती ही न भेटताच गेली असती .. पण वहिनी ने सासर, घरं, नाती, सर्व छान  जपली असं तीला मनात वाटून गेलं… आणि मी कायम चं स्वतः चा स्वार्थ बघत आले… मला अजित चं हवा असायचा सारखा… बाकी त्याच्या घरचे नको असायचे… विभा विचार करू लागली…आई चा पण चेहरा वहिनी बद्दल बोलताना कौतुकाने फुलला होता.
खरं तर विभा ला आनंद वाटायला हवा होता.. सगळं छान होतं, सगळे खुशीत आहेत, पण तीला आनंद वाटत नाही आहे, वहिनी सगळं व्यवस्थित करतेय, आई सतत सुनेचं कौतुक करतेय, ते तीला बघवत नव्हत कि अजून काही…..

कि भाऊ – वहिनी चं एकमेकांवर चं प्रेम… पण अजित चं ही  तिच्यावर खूप प्रेम आहे… अजित ही तीच सगळं ऐकतो..मग विभा कां अस्वस्थ होती… तीला आज कसलं दुःख वाटत होतं….
पटकन वीज चमकावी तसं तिला समजून गेलं… तिच्या घर – संसार च्या कल्पना फक्त अजित पुरत्याच मर्यादित होत्या.. त्या पलीकडे तीला संसारात अजून कोणी नको असायचं.
तीला सगळं आठवत गेलं कि ती शनिवारी रात्री एकदा सासर्यांना बोलली होती कि रविवारी अजितची सुट्टी असते त्यामुळे मला सकाळी उशिरापर्यंत झोपायचं असत तर तुम्ही सकाळ सकाळ टीव्ही वर बातम्या लावून बसता मोठ्या आवाजात त्यामुळे लवकर जाग येते…

सासरे त्यावर हो बरं पुढच्या रविवार पासून सकाळी टीव्ही लावणार नाही असं बोलले होते.. त्यावेळी ती पटकन बोलली हो असं केलंत तर बरं होईल. सासरे हिरमुसले होते हे तिने बघितलं… पण तीला त्याचं काहीच वाटल नव्हत.
त्यावेळी.. तिने उलट मनात म्हंटल होतं बरं झालं. सासू पण बोलली होती तेव्हा असूदेत हो झोपूदेत त्यांना उशिरापर्यंत आठवड्यात एकचं तर सुट्टी असते अजितला.
एकदा तर तिचे सासू,- सासरे रुटीन हेल्थ चेक अप ला रविवारी सकाळी जायचं कां असं अजित ला विचारत होते तेव्हाच ही पटकन ओरडून बोलली रविवारी पण आता सकाळी लवकर उठून बसायचं कां त्यासाठी.
सासू मग त्यावर बोलली अग अजितला रविवारीचं सुट्टी असते ना, नंतर कोण येणार आमच्याबरोबर? आता विभा ला वाटून गेलं मी तेव्हा कां बोलू शकले नाही कि आई – बाबा मी येईन तुमच्या बरोबर हॉस्पिटलला.

 लग्न फक्त दोन देहांचं मिलन नसतं, दोन घरांच, सर्व कुटुंबाच नातं असत ते.. सर्वांना समजून, सांभाळून घेण्यातच खरा आनंद असतो, हे आज तिच्या वहिनी ने सिद्ध केलं होतं.
ह्या सर्वांतचं नवीन सुनेने आपलं सुखं शोधायचं असत.. आणि ते सुखं वहिनी ने शोधलं होतं.
विभाला आता सगळयाची जाणीव झाली होती.. पण आता वेळ निघून गेली होती.
तिच्या अशा वागण्याला कंटाळून सासू – सासरे दोन महिन्यापूर्वी चं गावाला गेले होते.. तीला तेव्हा किती आनंद  झाला होता…
विभाने गावी सासू – सासर्यांना फोन करायच ठरवलं.. पण काय आणि कसं बोलू असं तीला झालं होतं कारण ते इथे असताना ती कधीच त्यांच्याशी चांगली वागली नव्हती.

तिने खूप विचार केला आणि मग ठरवलं कि अजितचा वाढदिवस आहे पंधरा दिवसांनी तर त्याचं निम्मित करून त्यांना बोलवावं आणि मग आल्यावर त्यांची माफी मागावी…
तिने गावाला फोन  केला. सासूने उचलला ती हळूच बोलली आई एक कामं होतं.
त्या तिकडून अगदी प्रेमाने बोलल्या हा बोल ना.
विभा म्हणाली आई अजितचा वाढदिवस जवळ येतोय तर त्या दिवशी सकाळी तुम्ही इथे येऊन त्याला अचानक सरप्राईझ द्याल…त्याला खूप आनंद होईल…त्या पण हो चालेल बोलल्या.. विभाला पण बरं वाटलं…

ठरल्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी सकाळी सासू – सासरे आले अजित खूप खुश  झाला.
संध्याकाळी वाढदिवस, त्या नंतर हॉटेल मध्ये जेवण झालं.. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे बोलले अजित आमची दोन दिवसांनी पुन्हा गावी जायची तिकीट काढ त्यावर पटकन विभा बोलली आई – बाबा आता तुम्ही कुठे चं जायचं नाही इथेच राहायचं.. माझं चुकलं मला माफ करा.. असं बोलून विभा त्यांच्या पाया पडली.
त्यांनी ही मोठ्या मनाने तीला माफ केलं… आणि मग सगळे गुण्या – गोविंदाने राहू लागले.
© सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!