उत्तर 

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

©️ ज्योती रानडे
प्रेरणा सप्रे! हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठे नाव. उंच कमनीय बांधा, बोलके डोळे, चाफेकळी नाक आणि मिळालेल्या भूमिकेचे सोनं करणारा अभिनय.
गेली १७ वर्षे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केलेली प्रेरणा आता ३९ वर्षाची झाली होती.
किर्ती, पैसा,बंगला, गाड्या सर्व काही होते. पण हवे ते सर्व मिळाल्यानंतरही मनाच्या एका कोपऱ्यात एक अशांती, हुरहूर कायमच्या वास्तव्याला येऊन बसली होती. मन प्रसन्न नव्हतं. 

प्रत्येक क्षेत्रात असे काही ना काही असतंच म्हणून प्रेरणा ती बेचैनी झटकून टाकत असे आणि लखलखणाऱ्या दिवाणखान्यात लावलेले स्वतःचे पुरस्कार आणि वेगवेगळ्या भूमिकेतले फोटो बघण्यात मन रमवत असे. 
मेडिकल कॅालेज नाट्यस्पर्धां गाजवलेली प्रेरणा खरोखरच रवि वर्म्याची कलाकृती होती.
दिग्दर्शक भरत शाह यानी हे रूप-गुण हेरले आणि “ये गलियाँ” द्वारे चंदेरी सृष्टीमधे वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रेरणाचं आगमन झाले. आई- बाबाना तिचा डॉक्टरकी सोडून अभिनयाच्या मृगजळामागे धावण्याचा निर्णय आवडला नव्हता.

“बाबा, अशी संधी परत परत येत नाही” हे सांगून त्यांना कसेबसे पटवले. आई-बाबा नाईलाजाने तयार झाले पण आजी मात्र नाराज होती. 
“अग प्रेरणे, तुझ्याकडे रंग, रूप, अभिनय सारे काही आहे. पण गेंड्याची कातडी मात्र नाही. कसं व्हायचं तुझं त्या जगात?
“ये गलियाँ”नी बरेच विक्रम मोडले आणि आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होत गेलं.
जसजशी यशाची शिखरे दिसू लागली तसतसा आपण घेतलेला निर्णय १००% बरोबर आहे अशी प्रेरणाची खात्री पटली.
पण चेहर्यावरचा रंग उतरवताना रोज मन विचारायचे, “जे तुला हवे होते ते मिळाले का?”
आतून उत्तर यायचे, “हो. जे हवे ते सर्व मिळाले आहे!” मग ही बेचैनी कुठून आली? 

नुकतेच तिला एका शाळेच्या उद्घाटनाला बोलावले होते. फिक्या गुलाबी साडीतील प्रेरणा आकाशातील परी जमिनीवर उतरल्यासारखी दिसत होती. 
तिथे शिक्षिका म्हणून काम करणारी शाळेतील जिवलग मैत्रीण स्मिता भेटली आणि प्रेरणाचं मन भरून आलं. 
स्मिताच्या कडेवरची दोन वर्षाची गोड मिनू बघून पोटात तुटले. मिनूला कडेवर घेतल्यावर वाटलं माझं मुलं पण असच गोड दिसेल. नंतर दिलेल्या फराळाचे दोन चमचे खाल्ल्यासारखे करून ती घरी परतली.
झिरो फिगर टिकवायची असेल तर वडा, चिवडा, लाडू असं वाट्टेल ते खाऊन चालत नाही म्हणत तिने सफरचंदाच्या दोन फोडी तोंडात टाकल्या पण त्या झणझणीत चिवड्यानं चाळवलेलं मन कितीतरी मागे गेलं.  

“पाटील गाडीवर मैत्रिणींबरोबर तिखट भेळ अन् ती कैरीची फोड खाताना कसं नाका तोंडातून पाणी यायचं. अहाहा! हाय हुई करत ती भेळ खाणं, मनसोक्त हसणं, आणि आजी रागवेल म्हणून तिन्हीसांजेपूर्वी घाईत घरी पोचणे! अशा लहान वाटणार्या गोष्टीतच मोठा आनंद असतो.
आजीने केलेले रव्याचे लाडू खाऊनही किती वर्षे झाली. आता मात्र लाडू खाल्ला तरी एक छोटा तुकडा खायचा आणि ती हवीहवीशी चव जिभेवर राहू नये म्हणून घटाघटा पाणी प्यायचं.
सॅलड आणि टोफू चे जेवण. कमरेचा घेर वाढू नये म्हणून दोन दोन तास जिम. यश मिळवणं सोपं का असतं? हजारो प्रलोभनं टाळावी लागतात तेव्हा कुठेतरी काहीतरी मिळतं. 

बंगला, गाड्या, परदेश प्रवास, हॉलिवूड मधे मिळालेला छोटी भूमिका यासाठी सर्व मोहांचा त्याग करावा लागतो. आणि तरी “ये गलियाच्या” वेळी माझ्या मागे  लागलेल्या भरतजीना आता “जीत” मध्ये मात्र २५ वर्षांचा नवा चेहरा हवा आहे. त्या शंतनूकुमार समोर मी मोठी दिसते म्हणे.”
“आई हल्ली फार हळवी झाली आहे. काल म्हणाली,” तुझ्यावर खरे प्रेम करणारे, आनंद मोघे सारखं कुणी आहे का? नको सांगू मला त्या शिवा आणि त्या कुमारचं काही. त्यांचे प्रेम तुझ्या प्रसिद्धीवर आहे”.
“आई, मी लग्न करायचे म्हटले तर रांग लागेल बाहेर मुलांची!” “पण मेडिकल कॉलेज मधल्या आनंद मोघे सारखे, मी कोणीही नसताना मनापासून प्रेम करणारा, एकजण तरी असेल का त्या रांगेत?” आनंदच्या आठवणींनी तिचे डोळे ओले झाले. 

“ तू माझी प्रेरणा आहेस. आपण खेड्यात जाऊन दवाखाना काढूया. ज्यांना वैद्यकीय मदत मिळत नाही अशा लोकांसाठी आपण काहीतरी करू. त्याच्या मुलांना शिकवू.”
आनंदच्या तरतरीत डोळ्यातली आर्तता आणि अनुकंपा तिच्या हृदयापर्यंत पोचायची.
समाजासाठी काम करण्याच्या चर्चेत तासनतास घालवले होते.
“किती कष्ट करतो आनंद आजही. एवढी मोफत वैद्यकीय शिबिरे घेतो पण आजवर त्याला काय मिळालय? हजारो लोक येतात पण अजून एकही पुरस्कार मिळालेला नाही.” तिने स्वत:च्या अनेक पुरस्कारांवर एक नजर टाकली.  

“आनंद, मला भरतजी त्यांच्या नव्या चित्रपटात लिड रोल देत  आहेत.” आनंदचा चेहरा उतरला.
काही वेळ बोललाच नाही. पण एक मोठा श्वास घेऊन म्हणाला, “ तुला जे करायचं ते तू ठरव. मला काय करायचे आहे तुला माहित आहे. तुझी स्वप्नं पायदळी तुडवून त्यावर माझं स्वप्न उभे राहू शकत नाही. पण जो निर्णय घेशील तो मात्र विचार करून घे.” 
सदाशिव ने दिवाणखान्यात गरम चहाचा कप आणून दिला. “ताई दमलीस का? तुला आवडणारे कांदेपोहे करतो. “नको रे बाबा, २५ वर्षांच्या मुली पाहिजेत म्हणून मला भूमिका मिळत नाहीत हल्ली. त्यात पोहे खाल्ले तर मी पन्नाशीची दिसेन. सदाशिव, तुला ग्वेनेथ पॅल्ट्रो नावाची नटी माहित आहे? हॅालिवुड मधली?

ती सकाळी फक्त काळी कॅाफी, दुपारी सूप व संध्याकाळी भाज्या खाते.” प्रेरणा तिच्या फोनवरचा ग्वेनेथ चा फोटो त्याला दाखवत होती.
सदाशिव नकारार्थी मान हलवत म्हणाला, “ताई बरोबर नाही हे. तू तान्ही असल्यापासून तुला बघितलय म्हणून बोलावसं वाटतं. असं सतत मन मारून जे मिळतय त्यात आनंद असतोय होय?”
बाहेर दिसणाऱ्या समुद्राच्या लाटा किनार्‍यावर धाडधाड आपटत होत्या. प्रत्येक लाटेचा आवाका वेगळा आणि शक्ती वेगळी. किनार्‍याकडे काहीतरी तक्रार केल्यासारख्या धडकत होत्या आणि विरून जात होत्या. अगदी वैतागलेल्या माणूस तक्रार करून शेवटी गप्प होतो तशा!

विचारांनी शिणून तिचे डोळे मिटले. तास भर झोप लागली असावी पण डोळे उघडताच तेच चक्र नव्याने चालू! 
“माझ्या जीवनाच्या चित्रपटात मी यशस्वी आहे का? मी काय मिळवलं आणि काय गमावले? सौंदर्य म्हणजे काय? आजीला माझ्या पातळ ओठाच्या जिवणीचे केवढं कौतुक पण आता पातळ ओठांचा जमाना संपला. ओठ जाड हवे म्हणून घेतलेली ती इंजेक्शने, इतर लहान मोठ्या सौदर्यवर्धक शस्त्रक्रिया करताना झालेली चिडचिड, आणि या क्षेत्रात हे लागतच म्हणत केलेली मनाची फसवणूक. चेहऱ्यावर सतत एक मुखवटा.

त्या मुखवट्यामागे वाट्टेल तशी टिका आणि अफवांनी रक्तबंबाळ झालेलं माझं मन. कसं व्हायचं गेंड्याच्या कातडीचे? पडद्यावरचे माझे रूप म्हणजेच मी समजणाऱ्या अनोळख्या लोकांनी केलेली टिका, कौतुक याला किती महत्व द्यायचं?” आजी बरेचदा काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. काय सांगायचे असतं तिला नक्की कळलेले नाही पण परतीची वाट फार मागे राहिली आहे.”
“परवा “देवदूत” कार्यक्रमात आनंद ची  मुलाखत बघितली. त्याच्या मोफत वैद्यकीय शिबीरात त्याला जोडले गेलेले अनेक थरथरणारे कृतज्ञ हात बघितले. ते भरल्या डोळ्यानी आशीर्वाद देत होते. लोकांना विनामूल्य उपचार करणारा आनंद आयुष्याचे दान देणार्या देवासारखा दिसत होता.

“डाक्टर या की भाकरी खायला” म्हणत त्याला बोलावणारे लोक! त्याच्या बरोबर आरामात भाकरी आणि तिखट डाळ खाणारा दमलेला पण समाधानी आनंद!  जिथे माझं काम रुजू व्हायला हवे त्या ईश्वरचरणी ते पोचले असले म्हणजे झालं. याशिवाय कुठलेही सत्कार,बक्षिसे काही नकोत म्हणणारा आनंद माझे भावविश्व उध्वस्त करून टाकतो.” प्रेरणाने डोकं दुखायला लागलं म्हणून गोळ्या घेतल्या. 
आयुष्यात सर्व काही मिळवलेल्या रॉबिन विल्यम्स, मायकेल जॅक्सन आणि गुरुदत्त सारख्या अनेक दिग्गजांनी आयुष्य का संपवले कळू लागले. यशाची किंमत अशी द्यावी लागते? त्यांच्याकडे बघून काहीतरी शिकलं पाहिजे. काहीतरी बदललं पाहिजे. पुढच्यास ठेच लागल्यावर मागचा शहाणा नाही झाला तर काय उपयोग? 

लहानपणी वाईट वाटलं, रडू आलं की मी आजी जवळ जाऊन बसायची. आजी जे काही बोलेल ते ऐकता ऐकता कशाचं वाईट वाटलं ते विसरून जायची आणि कधी हसू यायला लागलं कळायचही नाही. आता मात्र कामामुळे आजीला भेटणे जमत नाही. 
तिनं फोन उचलला. डोळ्यात काहीतरी निर्धार दिसत होता.
“आजी येतेस का इथे? मला बरे वाटत नाही. गाडी पाठवू का?”
आजी गेल्या महिन्यातच कोविड मधून कशीबशी बाहेर पडली होती. अशक्त असतानाही ती तासाभरात प्रेरणाकडे आली. तिच्या थरथरणाऱ्या हातातली मायेचा प्रेमळ स्पर्श होताच प्रेरणाच्या मनातलं वावटळ थोडे शांत झाले.

“आजी मी काय करू ग? माझा निर्णय चुकला का? मी फार दमले आहे.”
आजी हसली आणि म्हणाली, “प्रेरणे,मला समजते तुझी ओढाताण. आजवर तू जे केलस ते चूक नाही कारण तुझ्यासारखा अभिनय करणारे लोक या जगात फार कमी आहेत. तुझे  चित्रपट बघताना लोकं काहीवेळ स्वत:चं दु:ख विसरले ही तुझी खरी कमाई. पण त्या चंदेरी जगात सतत स्पर्धा आहे. ती देखील शारीरिक, बाह्य सौंदर्याची.
अग, तू तर  डॅाक्टर आहेस. सांग बर! शरीर वयाप्रमाणे बदलणार की नाही? चाळिशीला तू विशीची दिसणे शक्य आहे का आणि साठीला तू तिशीची दिसशील का? काय वाट्टेल ते केले तरी. आणि सतत तरूण दिसण का एवढं महत्वाचं? माझ्याकडे बघ. पंचाहत्तरीला छान दिसते ना मी?” आजी हसली. 

“त्या त्या वयाचे एक सौन्दर्य असतं. त्याचा आदर करायचा असतो.  वाढणाऱ्या वयाला भल्या बुर्‍या अनुभवाची जोड मिळाली ना की मगच आयुष्य समजायला लागतं. रोज सकाळी उठणं हा चमत्कार आहे पण आलेल्या दिवसाचं उत्साहानं स्वागत करावंसं वाटण हा अजून मोठा चमत्कार! शरीर नश्वर आहेच. ते कितीही नटवून थटवून सजवले तरी ते मातीतच मिसळणार आहे. आनंदा मागे दु:ख आणि दु:खामागे आनंद अशा अनेक जोडलेल्या कड्या म्हणजे आयुष्य. तुला आनंद म्हणजे काय (मोघे नव्हे बरं म्हणत ती गालात हसली) कळलं आहे का?  पुरस्कार म्हणजे आनंद नव्हे.

नवे चित्रपट, त्यासाठी लागलेली प्रेक्षकांची रांग म्हणजे आनंद नव्हे. लखलखणारी झुंबरं, अलिशान दिवाणखाने,ती तुझी काय ती एमडब्लू गाडी म्हणजे आनंद नव्हे. जो आनंद आज मिळाला आणि उद्या संपला तो आनंदच नाही. आनंदाची  व्याख्या मला माहित नाही पण सकाळी अंथरूणावरून उत्साहानं उठावस वाटणं म्हणजे आनंद हे नक्की. 
अग हा संघर्ष फक्त तुझा नाही. प्रत्येक माणसाचा आहे.  माणूस विषयाच्या आणि हव्यासाच्या वादळात अडकला आहे.  फक्त रूप वेगळं प्रत्येक वादळाचे,  त्या लाटा कशा वेगळ्या दिसतात ना तसं! माणूस आयुष्यभर आनंद म्हणजे काय हे ठाऊक नसताना आनंद देईल असे वाटणर्‍या कल्पनांमागे धावत राहतो आणि एक दिवस संपून जातो.

आपण गेल्यावर किती डोळे खरच पाणावतील? किती जीवानी आपल्यामुळे सुखाने चार श्वास घेतले? आपल्या अस्तित्वामुळे जगातलं काय सुधारले? रोज फळं पडतात झाडावरून म्हणून रोज काही तो न्यूटन निर्माण होत नाही. आपल्या जीवनाचा चित्रपट असा असावा की त्यातून पुढच्याना खरी “प्रेरणा” मिळावी. खरा आनंद मिळावा! 
प्रेरणे माझ्याकडे दोन्ही आहे बघ. प्रेरणा पण आहे आणि आनंद पण.”आजीला असे विनोद पेरल्याशिवाय बोलताच येत नसे.  नंतर  हळू आवाजात प्रेरणाकडे कलत बारीक डोळे करून ती पुटपुटली. “कालच येऊन गेला. तुझ्याबद्दल विचारायला येतो पण दाखवतो मात्र माझी तब्बेत बघायला आलाय असं! मला कळत का नाही? पण गुणी आहे बघ मुलगा!”आजी खळखळून हसली.

आजी नेहमी असच बोलायची तिच्या शिवणाच्या वर्गातल्या बायकांबरोबर, सल्ले विचारण्यास येणाऱ्या कित्येकांशी पण आज तिचं बोलणं माझ्या डोक्यात शिरत होतं. “आजी तू बोलत रहा”. ती हसली, “अग मी अडाणी बाई. मला काय कळतय?
प्रेरणे, माझ्यासाठी एकच कर. महिनाभर सर्व कामं बंद कर. करशील? माझ्यासाठी? या महिन्यात – ती खोकला आल्यानं थांबली. “हा कोविड मला घेऊन नाही गेला हे आश्चर्य. बरं हे बघ या महिन्यात ना मी सुचवेन ते करायचं. माझ्यावर विश्वास ठेऊन! 
सूर्योदय बघायचा, चंद्र-चांदण्या बघायच्या, सदाफुली आणि गुलमोहर लावायचा, अनाथाश्रम, वृध्दाश्रम बघायचे, एखाद्या थकलेल्या माऊलीच्या खांद्यावरचा भार कमी करायचा, एखाद्या शेतकऱ्याचं गार्‍हाणं ऐकायचं. लिहायचं, वाचायचं पूर्वीसारखं. तुझं नाव आहे सर्वत्र त्याचा योग्य वापर करून आजूबाजूला काही ना काही चांगला बदल घडवून आणायचा!

समुद्र किनारी शांत बसून आणि स्वत:ला शोधायचं. हे सोपे नाही पण प्रयत्न केला तर कठीण नाही. आजोबा गेले तेव्हा मी ५३ वर्षाची होते. सैरभैर मनाला असे काही ना काही देत गेले आणि एक दिवस समजलं की माझ्यासारख्या एकट्या पडलेल्या बायकांसाठी मला काहीतरी करायचं म्हणून तर शिवण शिकवायला सुरूवात केली आणि जे ईश्वराने शिकवले ते त्यांना सांगत गेले. 
बर या एक महिन्यात तुला “रोज” अभिनयाची आठवण झाली तर तिकडे जरूर परत जा. आजी “रोज” वर भार देत म्हणाली. 
“पण इतर काही करताना देहभान हरपले तर तेच तुझं क्षेत्र आहे हे पक्क समजून घे.”
जे करतो त्यातून खरा आनंद मिळाला की ते काम वाटत नाही. कोणतेही अनुभव वाया जात नाहीत. ते अनुभवच तुला घडवत असतात.

तुझं  काहीही चुकलं नाही आणि कशालाही उशीर झालेला नाही. अभिनय फक्त पडद्यावर करायचा असं कुठे सांगितलय? रडणाऱ्या बाळाला हसवणार्‍या आईचा अभिनय बघ. तुमच्या सर्वांहून ए-वन असतो” म्हणत तिने तर्जनी आणि अंगठा जोडून ए-वन ची नेहमीची कृती केली. 
“अरे सदाशिव – प्रेरणेला आणि मला साखरेचा चहा, भरपूर आले घालून दे रे. अगदी तिला कॉलेजमधे आवडायचा तसा. कांदेपोहे पण कर.”
सदाशिवचा आश्चर्यचकित चेहरा बघून प्रेरणा मनापासून हसली. अनेक वर्षांनी तिच्या मनातलं वादळ आता मंद, प्रसन्न वार्‍याचं रूप घेऊ लागले होते.

आजीने आयुष्याचे सार सांगितलं होते. पुढचा मार्ग दाखवला होता. मार्ग दाखवणारे अनेक असतात पण जोपर्यंत तो बघण्याची आपली तयारी नसते तोपर्यंत तो मार्ग अनेकांनी दाखवूनही दिसत नाही. कांदेपोहे खाऊन सुखावलेल्या प्रेरणाचे शांत झालेलं डोकं आजीच्या मांडीवर होते. चेहर्‍यावर स्मित हास्य होतं. 
उद्या उत्साहानं अंथरूणातून उठून काही नव्या गोष्टी करायच्या होत्या.
अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आजी तिच्या केसातून हात फिरवत आपल्या जगावेगळ्या नातीकडे बघत होती. तिलाही गेल्या महिन्यात झालेल्या कोविडमधून परमेश्वराने का वाचवले याचं उत्तर मिळालं होतं.
©️ ज्योती रानडे
सदर कथा लेखिका ज्योती रानडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “उत्तर ”

  1. प्रेरणदायक कथा . आनंद कशात शोधावा हे छान सांगितले

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!