यतिप्रदेश

© किरण मोरे
काही महिन्यांपूर्वी मला कोणी असे भविष्य सांगितले असते, की थोड्याच दिवसांत मी माझी चांगली वैद्यकीय प्रॅक्टिस, चैनीचे आयुष्य सोडून हिमालयाच्या अगाध, अमर्यादित कुशीत रानोमाळ हिंडणार आहे, तर मी सांगणाऱ्याला अगदी वेड्यात काढले असते. दैव ,धर्म ,साधू, योगी ,पुराणकथा यावर माझा अजिबात विश्वास नाही.
पण कोणत्या वळणावर काय घडेल, आणि आपले आयुष्य बदलून जाईल हे सांगता येणार नाही.ती महान व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि माझे सर्व विचारच पूर्णपणे बदलून गेले. माझ्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध !
काही महिन्यांपूर्वी हिमालयात केदारनाथ बद्रीनाथ बाजूला भटकंतीला गेलो होतो.

सतत साथ देणारी शुभ्र खळखळणारी गंगानदी,जागोजागी कोसळणारे धबधबे,बर्फाच्छादित हिमशिखरे, ब्रह्मकमळे आणि इतर दुर्मिळ कधीही न पाहिलेली फुलझाडे, पक्षी बघून “प्रथम तुझं पाहता जीव वेडावला “असा प्रेमातच पडलो त्या निसर्गाच्या. स्वर्ग म्हणतात तो येथेच आहे, येथेच आहे, हे येथे आल्यावर पूर्णपणे पटलं.
 थोडसं पाणी प्यायला एका झऱ्याजवळ थांबलो.
“तो इतका या निसर्गात रमलाय की, त्याला आता आवरणं मुश्कील आहे .त्याचं निसर्गात भान विसरून जाणं काही नवीन नाही.’ म्हणून मित्र मला चिडवत पुढे चालू लागले . आरामात एका प्रचंड शिळेवर बसून मी आजूबाजूचा महान निसर्ग अनुभवात होतो. कशाला जायचे परत त्या आपल्या स्पर्धेच्या जगात, किती सुंदर आहे इथलं जगणं, शांत, पवित्र,निरामय.
इतक्यात दुरवरून झपाझप माझ्याच दिशेने येणारी एक आकृती दिसली. इतकी जलद चाल कधीच पाहिली नव्हती. जशी काही त्या धुक्याच्या रस्त्याने ती व्यक्ती उडतच चाललेय असं वाटत होते. क्षणात ती व्यक्ती माझ्या जवळच्या शिळेवर येऊन बसली.

त्याच्या प्रभावी दर्शनाने काही क्षण दिपून गेल्यासारखेच वाटले मला. मी त्याच्याकडे भान हरपून बघतच राहिलो. त्या अत्यंत तेजपुंज असामान्य देखण्या तरुणानी शुभ्र धोतर आणि वर उपरणे असा वेश परिधान केलेला होता.
केस कुरळे, मानेपर्यंत लांब होते त्याचे. डोळे तेजस्वी, त्यातून प्रकाश बाहेर येतोय असे विशाल, सुंदर बुद्धिमत्ता दर्शक ,अजून पर्यंत कोणाचेच असे डोळे पाहिले नव्हते. एक तर तो देव असावा, प्राचीन सम्राट किंवा पुराणातील योगी असावा, असे व्यक्तिमत्व लाखो लोकांमध्ये सहज ठळकपणे उठून दिसले असते.
नुसत्या नजरेनेच दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते.
अति लोभसवणे मंदस्मित करत तो हसला, म्हणाला,” मित्रा फार वाट पाहायला लावलीस, चल, आपल्या जगात परत जाऊया. सर्व वाट पाहत आहेत.”

आवाज तर इतका मधुरगंभीर घंटा नादासारखा, मी मंत्रवत त्याला नमस्कार केला. माझ्या मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केलेली होती. “नचिकेत,तू मला ओळखत नाहीस. पण मी तुला मागच्या जन्मापासून ओळखतो.”
अरे, हे काय मी विचार करू लागलो “माझं नाव तर रविंद्र आहे आणि हे देवतुल्य व्यक्तीमत्व तर माझ्यापेक्षाही फार तरुण आहे मला मागच्या जन्मातली ओळख सांगतोय हा भ्रम आहे की भास.”
“या हिमालयातले तुझ्या मनातले विचार मला कळतात. माझं नाव देवर्षी,तू फक्त माझ्याबरोबर चालत राहा. आपोआप तुझ्या मनावरचे धुके दूर होईल. लख्ख प्रकाशासारखे तुझे पहिले जीवन उलगडत जाईल.” हसत हसत देवर्षी म्हणाले.

त्यांनी हलकेच माझ्या हाताला स्पर्श केला आणि ते झपाझप समोरच्या पांढऱ्याशुभ्र बर्फाने झाकलेल्या अतिदुर्गम पर्वताकडे चालू लागले. मीही भारल्यासारखा मागोमाग जात राहीलो. मागच्या आयुष्यातील पाटी पूर्णपणे कोरी झाली होती. किती चाललो किती पर्वत दऱ्या, नद्या, दाट वनराई पार केली. काहीच कळत नव्हतं. पण इतकं खरं की मी अजिबात थकलो नव्हतो, की तेवढ्या वेळात भूक, तहान झोप लागली नाही.
देवर्षीपासून काही अंतर सोडून मीही सहजपणे झपाझप चालत होतो. अगदी तरंगल्यासारखं हलकं हलकं वाटत होतं. गोठलेल्या नद्या, शुभ्र सुवासिक फुलांनी डवरलेल्या डोंगरावरून किंवा असंख्य पक्षांची किलबिल ऐकत मी जसा काही आनंद लहरीने मला वेढलंय असं वाटत होतं.

येथे फक्त आनंदची आनंद आहे. मी स्वतःशीच गुणगुणत होतो.
“हो, म्हणूनच तुला येथे आणले आहे मी. शाश्वत आनंदाचे जीवन जगण्यासाठी ” देवर्षी हसत हसत, मधुर आवाजात बोलत होते. “आपण महिनाभर चालत होतो.आज आपल्या नगरीजवळ आलो आहोत. कमांडलूतील हे पेय घे.”
त्यांनी कमंडलुतील थंडगार अतिचविष्ट पेय मला दिले. दोन घोट प्यायला बरोबर मला ताजेतवाने चैतन्य आल्यासारखे वाटले. 
“हे अमृतासारखेच पेय आहे. आता तू ही ते पेय प्राशन केल्यामुळे शंभर दोनशे वर्ष आनंदात जगणार आहेस. आहेस त्यापेक्षा तरुण आणि तेजस्वी. हा यती प्रदेश आहे.आमच्या शिवाय कोणालाही माहीत नसलेला आणि कधीही माहित होणारही नाही.
तू येथे येणारा पहिलाच आहेस. तू इथलाच असल्यामुळे तुझी अत्यंत आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो.”

देवर्षींनी त्यांच्या जवळचा शुभ्र गुलाबी कडा असलेला शंख वाजवीला. हसण्याचे बोलण्याचे आवाज येऊ लागले. बघता बघता, त्या पर्वतावरच्या अनेक वाटांवरून, असंख्य देखणे पुरुष, लावण्यवती स्त्रिया,मुले आमच्या स्वागतासाठी येऊ लागली.
” हे आपले महाराज नचिकेत, आज परत आपल्यात आले आहेत. त्यांचे स्वागत करा.” देवर्षी हा अद्भुत पुरुष त्यांचा देव, गुरु किंवा राजा यापैकी कोणीतरी असावा.
त्या सर्व लोकांनी आदरपूर्वक प्रथम त्यांना नमस्कार केला.
नंतर सर्व माझ्या भोवती जमून, मोठ्या प्रेमाने, आनंदाने कुठल्या तरी अगम्य भाषेत बोलू लागले. देवर्षींनी किंचित हसत माझ्या दोन डोळ्यांच्या मध्ये अंगठ्याने बराच वेळ दाब दिला.

“नचिकेतमहाराज,तुमची कुंडलिनी मी जागृत केली आहे. अनेक जन्म घेतल्यामुळे तुम्ही सर्व विसरला होतात. सर्व विस्मृतीची पटले दूर होत आहेत. आता तुला सर्वांना आपल्या प्रजेला, या भूमीला ओळखायला येऊ लागेल. फार वर्षे झाली नाहीत फक्त शंभर वर्षे झाली आहेत.
तुम्ही आमच्यातून विलग झालेल्या गोष्टीला, तुमच्या त्या आधुनिक जगातील शंभर वर्षे पण आमची तीस वर्षे.
त्या काळात तुझे अनेक जन्म झाले, पण आता तुला ते आठवणार नाहीत. आता हे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यावर या प्राचीन अमर राज्याचा उपभोग घे. कारण तू येथील राज्यकर्ता आहेस आणि मी तुझा राज पंडित, गुरु, सल्लागार आहे.

मी आजूबाजूच्या लोकांवर नजर टाकली.
जगाच्या कोणत्यातरी भागात खोलवर पसरलेल्या, शेकडो एकर जागेत गच्च वनराईत हे नगर ऐसपैस पसरले होते.
अनेक सुंदर महाल, घरे, तलाव, विहिरी, लांब रुंद रस्ते, असलेले हे नगर मोठे नेटके रेखीव दिसत होते. रस्त्यांवर विविध पोशाखातील माणसांची, मुलांची वर्दळ सुरू होती.
” पण देवर्षी, आमच्या जगात यती म्हणजेच अति धिप्पाड रानटी अवस्थेतील जवळजवळ माकडांसारखे दिसणारे प्राणी. बऱ्याच वेळा गिर्यारोहकांना ते यती दिसतात. अर्थात प्राचीन काळापासूनच पुराणात ग्रंथात यतींचे वर्णन आहे. काही वर्णने काल्पनिक असतीलही. पण त्या यतींच्या पावलांचे वर्णन तीन चार फुटांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले आहे. आकार गोरिला पेक्षाही भयंकर. काही माणसांनी मोठ-मोठी झाडे हलविण्याचा, गाडी रोखून धरण्याचा अनुभव सांगितला आहे. खरं खोटं कोण जाणे, पण, त्या यतींनी प्रत्येक वेळा माणसांना टाळले होते.”

“आपण यतीच आहोत. यती भेटल्याचा  गिर्यारोहकांचा अनुभव खराच होता.” देवर्षी म्हणाले,”पण,यतीत दोन प्रकार आहेत. सूर आणि असूर, म्हणजे आपण फार पूर्वी देवांच्या स्वर्गातील म्हणजे हिमालयीन पठारावरून स्थलांतर केलेले गिर्यारोहकांना दिसणारे यती. म्हणजेच असो ते आपल्या अगोदर पासूनच हिमालयात राहत आहेत. लपून छपून.
ते आपल्यासारखे बुद्धिमान देखणे नाहीत. त्यांचा आणि आपला संघर्ष प्राचीन काळापासून नेहमीच चालू आहे.”
ते बोलत असताना दोन प्रचंड वाघ तेथे आले आणि माझ्याकडे बघत देवर्षींच्या बाजूला अंगरक्षकांसारखे उभे राहिले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत देवर्षी काहीतरी बोलले. त्याबरोबर दोन्ही वाघ शांतपणे त्यांच्या पायाशी बसून राहिले.

देवर्षी बोलतच होते.” नचिकेत, राजन, आपल्याला फार मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. त्या रानटी असूर यतिंचा त्रास फार वाढलाय. ते नरभक्षक नाहीत. पण, त्यांना सर्वच माणसांचा अतिशय तिटकारा वाटतो. आपल्याकडील अनेक स्त्रिया त्यांनी पळवून नेल्या आहेत. कारण आपल्याप्रमाणे देखणी संतती त्यांना निर्माण करायची आहे. त्यांच्याकडेही आपल्यासारखीच महाभयंकर शस्त्रे आहेत, युद्ध झाले तर भयंकर विनाश ठरलेलाच आहे.मुत्सद्देगिरीने त्यांचा नाश करायचा आहे. उद्यापासून त्या कामाला आरंभ करू”.
त्या रात्री समारंभ पूर्वक मला राजवाड्यात नेण्यात आले.
त्या भव्य राजवाड्याभोवती कमळाच्या पानाच्या आकाराचा विस्तीर्ण तलाव होता. मधोमध संगमरवरी नक्षीदार मार्ग होता. राजवाडा अतिशय सुंदर होता. त्या रात्री त्या भव्य शय्यागृहात पडल्या पडल्या मला अगदी शांतपणे झोप लागली.

मागच्या आधुनिक जीवनातील थोडे थोडे आठवत होते. पण तेही हळूहळू पुसट होत गेले. उद्याच्या मोहिमेचा विचार करताना झोप कधी लागली ते कळलेच नाही.
पूर्वजन्माच्या सवयीप्रमाणेच भल्या पहाटे जाग आली. देवर्षींनी मला मागच्या जन्मात परत आणले होते. आजूबाजूच्या सर्वांनाच मी ओळखायला लागलो होतो. जसं काही मधली साडेतीनशे वर्ष कुठेतरी नाहीशीच झाली होती.
माझे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते.
भल्या पहाटे माझ्या सेवकांनी सर्व तयारी केली. देवर्षी आलेलेच होते त्यांच्याबरोबर सशक्त. शस्त्रांनी सज्ज असे निवडक लोक होते. देवर्षीच्या म्हणण्याप्रमाणे ते शंभर वीर हजारो लोकांना भारी होते. त्या सर्वांना आता मीही ओळखत होतो.

सुरुवातीला घोड्यांवरून चाललो होतो. पुढचा मार्ग अत्यंत कठीण होता. घोडे तेथेच ठेवून आम्ही पुढे वाटचाल सुरू केली.
उंच पर्वत,कधी खोल, पार पाताळात गेलेल्या दऱ्या, आम्ही पार केल्या. कधी कोणत्यातरी चिवट वेलींच्या साह्याने दरीतून पर्वत चढलो. मार्ग अतिशय कठीण होता. पण इतरांप्रमाणे मलाही अगदी सोपा वाटत होता.
मधून मधून आमच्या अगदी जवळून वाघ, सिंह यांसारखे प्राणी जात होते. पण मनुष्य आणि मानव मित्र असल्यासारखं वाटत होतं. जवळजवळ चार दिवसांचा प्रवास पण जराही थकल्यासारखे वाटत नव्हतं.
मधून मधून अतिशय गोड फळे, मध आणि ते आमचे अमृत प्राशन करत होतो.

 “तो बघा त्या असुर यतींचा प्रदेश,” एका उंच पर्वतावरून विस्तीर्ण पठाराकडे देवर्षीनी दृष्टिक्षेप टाकत देवर्षी बोलले.
सर्वत्र दरीपासून पर्वतांपर्यंत अनेक घरे पसरलेली होती. मधोमध जसा काही आकाशाला भिडणारा प्रचंड दगडी गड होता.
“तो त्यांच्या नायकाचा वाडा. अभेद्य आहे. पण आपण त्याचा पाडाव करणारच.” आता दुरूनच त्या असुर यतींच्या हालचाली दिसत होत्या.
बहुतेक सर्वच दहा फुटांपेक्षा उंच असावेत. केसाळ गोरिलासारखे दिसत होते. सर्वच हालचाली थोड्या वाकूनच चालल्या होत्या. मधूनच थोडेसे देखणे असुर यतीही होते. मोठमोठ्या शिळा उचलून कोठेतरी नेत होते.

“त्यांचा तो गड किंवा वाडा म्हणजे भुलभुलैय्या आहे. ३६५ खोल्या असाव्यात. त्यांचे शस्त्रागारही तेथेच आहे.” देवर्षी म्हणाले. त्यांनी हलकेच टाळी वाजवली. त्याबरोबर आमच्यातील दोन माणसे आम्हा दोघांनाही लवून, अभिवादन करून पुढे आली.
“तुम्ही वेषांतर करून त्यांच्यातलेच वाटणारे असुर यति बनून त्यांच्या हालचाली,बेत, शस्त्रसाठा याबद्दल माहिती देत राहा.” देवर्षींनी आज्ञा दिली. थोड्याच वेळात ते त्वरित वेषांतर करून आले. अगदी पूर्णपणे असूर यती वाटत होते ते.
ठरल्याप्रमाणे वेगाने असुर येथील राज्यात मिसळून गेले तोपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही पुढचा बेत ठरवत त्या आमच्या दोन सैनिकांच्या संदेशाची वाट पाहू लागलो.
“हो, आला संदेश. त्यांच्या मनातून माझ्यापर्यंत पोहोचलाय. फारच चोख काम केलंय.

त्यांच्या नगराच्या भोवताली विषारी वायूंचा वेढा टाकला आहे. तिथपर्यंत अन्य कोणी गेले तर ते भस्मसात होतील काही क्षणातच. पण आपल्याकडे त्या विषारी वायू विरोधक अस्रे आहेत.
त्यांचा नायक त्यांच्या 365 खोल्यांपैकी सर्वात खालच्या, म्हणजे तळघरात राहतो. तेथे कायम विषारी सर्पांनी वेढा घातलेला असतो. सर्वात उंचावरच्या दालनात त्यांचा तो भयंकर शस्त्रसाठा आहे. तेथे अनेक छुपे मार्ग आहेत. कधी ते दार वाटते. पण तो काळ मार्ग असतो. दरीकडे. मगरी असलेल्या जलाशयात. शत्रूला जाळ्यात अडकवायचा!
हा पहा, सर्व नकाशा आपल्या हेरांनी पाठविला आहे. आता देवर्षींच्या मनातील चित्र माझ्या मनातही दिसू लागले. मी विचारले,” कोणती अद्भुत विद्या आहे ही कोण जाणे?” 

” ही विद्या कठोर योग साधनेमुळे मला प्राप्त झाली आहे. राजन आपल्या पराक्रमाने बुद्धीने आपण या असूरांवर नक्कीच मात करू.” देवर्षीं हसत हसत म्हणाले.
दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी आणि सर्व निवडक सैन्यांनी असुरांसारखे वेषांतर केले. पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्या असुर नगराच्या विषारी वायू निर्मित वेशीजवळ गेलो.
हलकेच देवर्षींनी त्यांच्या जवळच्या कुपीतून कसला तरी थोडासा वायू त्या रेषेच्या कोपऱ्यातल्या जागेत फुंकला. तिथे एक माणूस सरपटत जाऊ शकेल असे भुयार तयार झाले. प्रथम देवर्षी, नंतर मी असे सर्वजण त्या भुयारातून नगरीत शिरलो. तेथे लपून बसलेले आमचे दोन हेर होतेच.

थोडा वेळ आम्ही तेथेच अवतीभवती फिरू लागलो. ते भुयार आता बंद झाले होते. कोणीही आल्याची कसलीच खूण राहिली नव्हती. हळूहळू त्या असुरात आम्ही मिसळून गेलो. त्यांच्या आणि आमच्या भाषेत फरक नव्हताच. निरनिराळ्या घरात आम्ही सहज सामावून गेलो.
दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे मोठा उत्सव होता. सर्व असूर त्यांच्या आद्य पुरुषाची म्हणजेच कश्यप मुनींच्या महाप्रचंड मूर्तीची आराधना करत असत. सर्व स्त्री पुरुष, त्यांचा प्रमुख असुर राजकंटक हेही सामील होणार होते.
त्याच दिवशी ते बेसावध असताना आम्ही आक्रमण करायचे ठरवले. त्या रात्री आम्ही अलगद त्या नृत्य समारंभात सामील झालो. सर्व असूर अगदी त्यांचा प्रमुख कंटक सुद्धा सर्व परिवारासह सामील झाले होते. सर्व धुंद होऊन नाचत होते.

देवर्षीनी संकेत दिल्याबरोबर असुर वेषांतील मी हळूहळू सरकत अगदी कंटकाजवळ नृत्य करू लागलो. धुंदीत कंटकाने माझा हात धरून अगदी उन्मेषांत नृत्य सुरू केले. किती भयंकर रूप होते त्याचे. जवळजवळ आदिमानवच. आठ फुटांपेक्षा उंची असावी त्याची.( अजूनही माझ्या भाषेत पूर्वीचे आधुनिक शब्द येत होते ) मी हळूच देवर्षींकडे नजर टाकली.
असुरांत मिसळलेल्या आमच्या सैन्यांची नजर सुद्धा देवर्षींकडेच होती.
त्यांनी संकेत देताच आमच्या जवळच्या अगदी सूक्ष्म त्रिकोणी वज्र अस्त्राने असुरांच्या छातीला ते नुसते टेकवले. क्षणार्धात आगीचा प्रचंड लोळ उठला. त्या अग्नीत ते असूर भस्म होऊ लागले. पण कंटक आणि काहींनी  (बहुतेक ते कायम त्यांच्या जवळच ठेवलेले असावे ) जवळच्या अंगरख्यातून लहान कुप्या काढून त्याचा फवारा आपल्या अंगावर मारून घेतला आणि जीव वाचवण्यासाठी समोरच्या तलावात उड्या मारून कुठेतरी नाहीसे झाले.

कोणास ठाऊक देवर्षींनी सर्वांना त्याच ठिकाणी तळ्यात उड्या मारून असून गायब झाले होते तेथे जायला सांगितले. अनेक असुर त्या वज्र अस्त्राने भस्मसात झाले होते. आम्ही त्या तळ्यात उड्या मारल्या. तेथे वर वर जाण्याचा मार्ग दिसत होता. वाटेत अनेक अडथळे होते.
कधी मोठमोठ्या मगरी चाल करून येत होत्या. कधी सर्व अंगाला प्रचंड खाज येत होती. तो मार्ग एकच नव्हता. वेगवेगळ्या वळणांचे अनेक मार्गांचे नुसते जाळेच पसरले होते. पण देवर्षींच्या व आमच्या हेरांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही कुठून कसे पण, उंच चढत चढत त्या प्रचंड गडाच्या दाराजवळ आलो.
अजून पर्यंत असुरांकडून प्रतिकारच झालेला नव्हता. आश्चर्यच होते. नुसती निरव शांतता जसं काही सर्वच हे गड सोडून गेले असावे. आणि म्हणूनच आम्ही अगदी सावधपणे पुढे जात होतो.

कधी तो मार्ग एखाद्या दरीत, तर कधी समुद्र आणि काही वेळा तर त्याच त्याच ठिकाणी परत येत होतो. असंख्य मार्ग होते. आम्ही अति उंच उंच पायऱ्यांवरून सरळ वरच्या दिशेकडे चाललो होतो. पण तेथे आम्ही एका दगडी दाराजवळ आलो. दरवाज्याला स्पर्श झाल्याबरोबर तो अचानक उघडला.
आंत एक अतिशय लावण्यवती युवती थरथर कापत, भेदरून ऊभी होती. साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत. त्या स्वर्गीय लावण्याने कोणालाही वेडच लावले असते. मला तिच्याकडे बघून अतिशय दया, सहानुभूती वाटू लागली.
देवर्षींनी तिला न विचारताच ती हात जोडून अत्यंत काकुळतीने विनवू लागली,”मला सोडवा यातून. या भयंकर राक्षसांनी कंटकाशी विवाह करायला नकार दिल्यामुळे या जागी मला कैदेत  ठेवले आहे.

मी तुमच्या सुर लोकांमधीलच आहे. यतींकडील अनेक स्त्रिया पळवून नेल्या होत्या असूरांनी. त्यातलीच मी एक. मला येथील सर्व माहिती आहे. अगदी खडानीखडा. मी तुम्हाला या मोहिमेत मदत करू शकेन. मलाही त्यांचा सूड घ्यायचा आहे. तिच्या स्वर्गीय सौंदर्याने सर्वांनाच मोहित केले होते. माझी थोडी वैराग्यवृत्ती असल्याने माझे तितकेसे लक्ष नव्हते. सहज लक्ष गेले. तिची नजर माझ्यावरच खिळली होती.” माझं नाव चैत्रगंधा” ती हसत सांगू लागली. माझ्याकडे पहात!
“आम्हाला मार्गदर्शन कर. पण द्रोह करण्याचा विचारही करू नकोस. परिणाम अत्यंत वाईट होतील.” माझ्याकडे बघून देवर्षी म्हणाले.”हे आमचे महाराज आहेत.नचिकेत महाराज,” मंद स्मित त्यांच्या चेहऱ्यावर तरळत होते. का कोणास ठाऊक.

” चला महाराज,”असे म्हणत त्या दालनातल्या एका विशिष्ट जागेवर तिने बोट टेकले. आणि त्या भिंतीतून एक उंचच उंच जाणारा पायऱ्या पायऱ्यांचा राजमार्ग दिसू लागला. एकाएकी तो मार्ग बदलून एका विवक्षित जागेवर तीन वेळा स्पर्श केला उजव्या हाताच्या अंगठ्याने. तसे आम्ही सर्व जरासे दचकलोच. काही कपट तर नाही ना या विचाराने, एका मागोमात एक भव्य पाषाण दालने कुठून कशी ते सांगता येत नाही ओलांडत .एका प्रचंड काळ्याकभिन्न गुहेत आलो.
” आता तुम्ही पुढे व्हा. तिथेच कुठेतरी कंटक लपला असेल.” अत्यंत सावधपणे आम्ही पुढे जाऊ लागलो. तितक्यात भयंकर गर्जना करून एका वाघाने आमच्यावर झेप घेतली. माझ्या वज्राने तत्परतेने त्याच्या शिराचा वेध घेतला.

इतक्यात चारी बाजूंनी कोणत्या भिंतीतून,दरवाज्यातून आले होते कोणास ठाऊक, पण कंटका सारखेच दिसणारे दहा बारा कंटक आणि आपली अजस्त्र शस्त्रे परजत आमच्यावर चालून आले. देवर्षींनी एक क्षणभर विचार करून त्यापैकी एका प्रचंड वानरासारख्या दिसणाऱ्या कंटकावर मला आक्रमण करायला सांगितले.
इतर कंटकांशी आमचे सैनिक भिडले. घनघोर लढाई सुरू होती. शेवटी आमच्या सैनिकांनी सर्वांना ठार मारले. भयंकर रक्तपात झाला होता. मी आणि तो कंटक, यांच्यात घणाघाती चालूच होती. तोही माझ्या तोलास तोल योद्धा होता. शेवटी अतिशय प्रचंड आवाजात आरोळी ठोकत तो तिथल्या गुप्तद्वारातून एकदम अदृश्य झाला.

पाठोपाठ एका स्त्रीच्या आवाजातील किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या.  आवाजाच्या दिशेने आम्ही धावतच गेलो. आमच्याबरोबर कंटकाच्या अत्यंत जखमी झालेल्या सैनिकाला जीवदान देण्याच्या आश्वासनाने कंटक पळालेला मार्ग दाखवायला सांगितले.
कंटक त्या स्वर्गीय सुंदरीवर, चैत्रगंधेवर वार करणार इतक्यात,आम्ही तेथे पोहोचलो.
एकच घाव माझ्या वज्राचा कंटकावर घालून चैत्रगंधेला सोडवले,आणि देवर्षींकडे सोपवले.
” तिला कशाला वाचवता? ती माझी हेर आहे. तुम्हाला भुलवून मी येथपर्यंत आणायला तिला सांगितले होते. पण तिने माझ्याशी कपट केले. तिला जिवंत ठेवू नका.” कंटक ओरडत होता.

” थांब,तुला ठार मारण्याचा आमचा विचार नाही. आम्ही हिंसक नाही. तुम्ही कितीही रानटीपणे, क्रूरपणे वर्तन केले तरी तुमची असुर जात आम्हाला नष्ट करायची नाही. कारण आदिती, दीती व कश्यप मुनी हेच आपले मूळ वंशज आहे. तुम्ही आमच्यात सामावून राहा. सुसंस्कृत चांगले नागरिक व्हा. दुसरा पर्याय,तुमचे राज्य आम्ही स्वतंत्र ठेवू.पण मैत्रीचा करार करू.” कंटकाला दुसरा मार्गच नव्हता. त्याला तर चीत केलेच होते पण तिकडे त्याच्या असंख्य सैनिकांना आमच्या पराक्रमी सैन्याने पराभूत केले होते.
थोडा विचार करून कंटक यासाठी तयार झाला.”पण, चैत्रगंधा. तिचे काय करायचे? तिने माझ्याशी कपट केले आहे. तिला प्रायश्चित्त घ्यायलाच पाहिजे.” कंटक मोठ्या द्वेषाने बोलत होता.

नाही देवर्षींनी ठाम आवाजात सांगितले की, “ती आमच्या सुरांपैकी एक आहे. तुम्ही बळजबरीने तिला नेले होते. ती आमच्याबरोबरच येणार.” शेवटी कंटक तयार झाला. एक समारंभ करून आम्हा सर्वांना निरोप देण्यात आला. चैत्रगंधाही आमच्याबरोबर होती. आमचा राजधानीच्या मार्गाकडे प्रवास सुरू झाला.
चैत्रगंधा त्या कठीण मार्गाने आमच्या इतक्यात सहजपणे चालत होती. एका अवघड वळणांवरून दरीत उतरणाऱ्या मार्गांवरून एकापाठोपाठ अत्यंत काळजीपूर्वक आम्ही चाललो होतो. एकाएकी भयंकर दरड कोसळल्याचा आवाज आणि त्या पाठोपाठ चैत्रगंधेच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या. मी आणि देवर्षींनी मागे वळून पाहिले. चैत्रगंधा त्या पार पाताळात जाणाऱ्या खोलदरीत घसरत चाललेली होती.

एकही क्षणाचा विचार न करता मी पाठोपाठ त्या मार्गाने उडी घेतली. चैत्रगंधेच्या पाठोपाठ मी त्या निमुळत्या दरीतून अजून अजून खाली चाललो होतो घसपटत,जखमी अवस्थेत आता आम्ही दरीच्या अगदी तळाशी आलो होतो.
चैत्रगंधा बेशुद्ध अवस्थेत एका शिळेवर पडली होती. माझ्या जखमी अवस्थेचा जराही विचार न करता मी तिला उचलून माझ्या कुपीतले ते अमृत पाजले. ती ताबडतोब शुद्धीवर आली.
मला बघितल्याबरोबर हसत हसत लज्जेने तिने आपला चेहरा सुंदर लांब सडक हातांनी झाकून घेतला. त्याच क्षणी मला जाणीव झाली माझी विरक्ती तिला पाहिल्यापासूनच अगदी लयाला गेली होती. पण मला कळले नव्हते.

आज तिला तशा जखमी स्थितीत बघून मला एकदम जाणीव झाली. या जगात तिच्याशिवाय मला काहीही प्रिय नव्हते.
इतक्यात आमचा शोध घेत आमचे सैन्य तेथे आले.
सर्वजण अखेर आमच्या यतिराज्यात पोचलो.
थोड्याच दिवसात अगदी थाटामाटात आमचा विवाह झाला.
आता या यतिराज्यात चैत्रगंधा, गुरु देवर्षी, यांच्या बरोबर मी अनेक वर्षे स्वर्ग सुखाचा आनंद घेत या यतीनगरीत राजा म्हणून राज्य करत आहे.
माझ्यामागे आधुनिक जगात काय चाललंय याची मला जराही परवा नव्हती.
© किरण मोरे

सदर कथा लेखक किरण मोरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!