” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

©️ शरणप्पा नागठाणे
आज सोमवार… बाजारचा दिवस.. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आज पहिला श्रावणी सोमवार …
शेवंता पहाटेच उठली, लगबगीनं सगळं आवरलं आणि भाकर तुकडा करायला घेतला…
मच्छिंदरला – तिच्या नवऱ्याला आज लवकर बाजारात जायला पाहिजे होतं..
अंथरुणात लोळत पडलेल्या नवऱ्याकडे पहात शेवंता बोलली – ” उठा की वं.. किती वेळ पडून ऱ्हाणार हाय ?? ..जल्दी जल्दी तयार होवून बाजारला जावा..आज बाजारचा वार हाय..चार पैसं जास्ती मिळत्याल…आवरा बरं जरा ..” 

मछिंदर अंगावरची वाकळ बाजूला सारत अंथरुणात उठून बसला…अंगमोडी दिली… अंगात घातलेल्या कापडी बनियानच्या कोपरीतून बिडीचं बंडल काढून एक बिडी शिलगावली..
एक लांब झुरका घेत म्हणाला -” अगं बाजार तर भरू देशील का न्हाई ??..मला कुटं जाऊन लगी दुकान लावायचं हाय बाजारात…आपुन सोंगाड्या मानूस…बहुरूपी…सोंग दाखवायचं अन् हात पसरून पैसं मागायचं…”
शेवंताला हे बोलणं आवडलं नसावं, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले आणि मछिंदर अंथरुणातून उठला.. 

खोपटाच्या मागच्या बाजूला न्हाणी होती.. बिडी ओढत ओढत तिकडे गेला..
आषाढ संपला होता.. श्रावण सुरू झाला होता..
यंदा आषाढात पावसाने भयंकर थैमान घातलं होते…
थोडं कुठं उघडीप मिळते असं वाटलं रे वाटलं की पुन्हा रप् रप् यायचा.. झोडपून जायचा…
नदी नाले रोज दुथडी भरून वाहत..

रस्ते, पाऊलवाटा, पांदनभर नुसता चिखल चिखल.. रस्त्याच्या दुतर्फा गुडघाभर तरवटा माजलेला…
मछिंदर भोईरचं खानदान काही बारा बलुतेदारापैकी नव्हतं..
मछिंदरचा आज्जा गावाच्या सार्वजनिक समारंभात सोंगं आणायचा… सोंगाड्या..
एक दिवस गावात मुरळी आली.. आज्जाला बघितलं , त्याच्या अंगातला गुण बघितला अन् त्याला घेऊन गेली.‌.
आज्जा तमाशात गेला..वग करायला लागला… 

पुढं मछिंदरचा बाप ही तमाशात गेला पण बाईच्या नादानं बाटली हातात आली… संसाराचं पार वाटोळं झालं..फड सुटला…
मग तो बहुरूपी होऊन सोंग करत गल्लोगल्ली, गावोगावी फिरू लागला.. तेंव्हा कुठं चार पैसे मिळू लागले.. घर चालू लागलं…
लहानपणापासून आपल्या बापाला बघून लहानग्या मछिंदरला ही वाटायला लागलं की हे फार छान आहे… सोंग करायचं…ऐट मरायची की मग लोक पैसे देतात…
इतकं सोप्पं वाटायचं…तो ही बहुरूपी झाला… 
गावोगावी सोंग घेऊन फिरू लागला.. 

बाजारात, यात्रेत तो सोंग घेऊन जाई.. त्यानं वटवलेलं सोंग इतकं बेमालूम असे की लोक खुश होऊन जात… हसून हसून लोकांची पुरेवाट होत असे..
अख्ख्या पंचक्रोशीत एवढा चांगला बहुरूपी दुसरा नव्हता… 
पण गेला महिनाभर पाऊस लागला आणि त्याला एक दिवस ही कामधंद्यासाठी  घराबाहेर पडता आलं नाही.. काम नाही.. धंदा नाही…
अख्खा आषाढ ओढाताणीत गेला… 

बायको उसनवारी करून कसं तरी घर चालवत होती..
आता तर  किराणा दुकानवाला ही चार आण्याची जीन्नस द्यायला कां कूं करू लागला होता..
घर चालवणं तर भाग होतंच पण लोकांची थकलेली देणी , हात उसने घेतलेले पैसे परत करणं ही तेवढंच जरूरीचं होतं…नाही तर पुढच्या वेळी लोकांकडे मदत मागायला कोणत्या तोंडाने जाणार ??…
अंगावर भडाभडा चार तांबे पाणी ओतून मछिंदर खोपटात आला..

बायकोनं ताट पुढं केलं.. कसंतरी चार घास त्याने घशाखाली ढकलले…हात धुतले…धुतलेले हात धोतराला पुसत खोपटाच्या कोपऱ्यात गेला..
कोपऱ्यात एक भली मोठी जुनाट ट्रंक होती…ती त्याने उघडली.. ट्रकेंत पार आजोबा पासूनचे वेगवेगळया बहुरूपी सोंगाचे ड्रेस ठेवलेले होते..
रावणाचा ड्रेस अन् दहा तोंडे असलेला मुखवटा.. गणपतीचा मुखवटा… ऋषी मुनींच्या जटांचा टोप….
शंकराचा – महादेवाचा अगदी रबरी नागासकट गेटअप.. राजाचा ड्रेस..

पोतराजाचा , मस्सण जोगीचा ड्रेस.. पोलिसाचा ड्रेस..‌ 
पोलिस इन्स्पेक्टरचा ड्रेस … किती तरी वेगवेगळे ड्रेस…
मागच्या वेळी पोलिस इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून मछिंदरने अजय देवगण स्टाईल – ‘ सिंघम ‘  सोंग केलं होतं…
ते लोकांना फारच आवडलं होतं.. लोक फर्माईश करून करून सिंघम – सिघंम करायला सांगत…
आज कोणतं बरं सोंग करायचं ??.. मछिंदर विचार करत होता…

श्रावण महिना म्हणजे लोकांसाठी देव , दानधर्म करण्याचा महिना… सत्यनारायण, वरदा शंकर घालण्याचा महिना…मछिदंर विचार करू लागला… येत्या चतुर्थीला आपण गणपतीचा गेट अप करु…शनिवारी मारुतीचा – हनुमानाचा…
आज सोमवार आहे … चला तर आज शंकर महादेवाचे रुप घेऊ…
पहिलं बाजार फिरायचं आणि मग महादेवाच्या देवळासमोर…
ठरलं …

शेवंताकडे पहात तो म्हणाला – ” आज श्रावण सोमवार.. महादेव करावं म्हणतोय आज..”
शेवंताला ही हे पटलं – ” एकदम बेस्ट्ट ..आवरा बघू पटापट ..”
मछिंदर मेकअप करायला लागला…
निळा रंग तयार केला.. सबंध अंगावर रंग चढवला.. 
डोक्यावर केसाचा टोप बसवला, त्यावर चंद्रकोर चिटकवली …. जटेमधून वाहती गंगा दिसावी म्हणून प्लास्टीक सेट केलं.. गळ्यात रबरी नाग…रुद्राक्ष माळा घातल्या..

कपाळावर, दंडावर भस्माचे पट्टे ओढले… कमरेला कापडी व्याघ्रचर्म बांधले.. 
त्रिशूल आणि डमरू हातात घेऊन सज्ज झाला..
” हुबेहूब शंभू महादेव वाटायला लागलाव बघा…बेस ..” – खुश होत – हसत शेवंता बोलली..
मछिंदर तयार झाला..
सायकल काढली… सायकलवर टांग टाकली अन् पेडल मारत बाजाराकडे निघाला..

शंकराचा गेट अप इतका चांगला झाला होता की रस्त्यात लोक  त्याच्या अवताराकडे बघून क्षणभर जागेवर थांबून उभे रहात…
‘ हर हर महादेव ‘ अशी आरोळी ठोकत ..‌. 
कोणी ‘ बम बम भोले म्हणे तर कोणी जय भोले शंकर ‘ म्हणत..  
हे बघून आजचा गेट अप मस्त जमलाय असं मछिंदरला वाटायला लागलं.. तो स्वत:वरच खुश झाला…
सायकल पळत होती… मछिंदर बाजारात पोहचला..

ओळखीच्या दुकानदाराकडे सायकल लावली आणि मुख्य बाजारपेठेत आला.. बाजार फुलला होता.. 
लोकांची गर्दी वाढत होती..पाली लावून , दुकान थाटून व्यापारी गिऱ्हाईक करण्यात दंग होते.. 
कोणी कापड दुकान लावलं होतं तर कुणी मसाल्याचं… कुणी हाँटेल थाटलं होतं तर कुणी कटलरी… 
भाजीपालावाले , मिठाईवाले, बत्ताशेवाले ही मोठमोठ्याने ओरडून लोकांना आपल्या ठेल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते…
एका दुकानासमोर उभा राहून मछिंदरने डमरू वाजवला.

शंख फुकला अन् मोठ्या आवाजात बोलला – ” बेटा, प्रत्यक्ष शंकर महादेव तुझ्या दारी आले आहेत, तेंव्हा स्वागत कर, यथाशक्ती दान दे आणि पुण्यप्राप्ती करून घे… अशी संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नसते..”
दुकानदाराने दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि  एक बंदा रुपाया दिला….‌
भवानी चांगली झाली होती…बंदा रूपाया कपाळाला लावला आणि मछिंदर पुढे सरकला…
दुकान दर दुकान मछिंदर  पुढं जात राहिला..

कोणी रुपाया दिला.. कोणी ५ रुपये… कोणी दहाची नोट देई.. कोणी चिल्लर …
मछिंदर एका पालीपुढून दुसऱ्या पालीकडे चालू लागला..
आज त्याच्या अपेक्षेप्रमाणे कमाई होत होती…
अर्धा बाजार पालथा घातला…बऱ्यापैकी पैसे जमले होते….
मछिंदर खुश झाला…

थोडी विश्रांती घ्यावी म्हणून तो एका हाँटेलसमोर आला.. ‘ शंभू महादेव की जय ‘ असा आवाज दिला…
हाँटेलवाल्याने बसा म्हणून हातानेच इशारा केला… 
मछिदंर एका लाकडी बाकावर विसावला…
हाँटेल मालकानं कपभर चहा दिला..
मछिंदर बाकड्यावर बसून चहा प्याला.. 
बिडी काढून शिलगावली आणि एक मोठ्ठा झुरका घेत नाकातोंडातून धूर सोडला…

नेमकी हीच ती वेळ..‌घात झाला…
समोरच्या बाकड्यावर बसलेल्या पोराने  मोबाईलमध्ये  मछिंदरचा बिडी पितानाचा – झुरके मारत धूर सोडतांना फोटो काढला…
” अरं व्वा, आपला कोणी तरी फोटो काढतंय ” – हे बघून मछिंदर मनोमन खुश झाला..
तोंडात बिडी धरून आणखी एक लांब झुरका मारत मछिंदरने आपले दोन्ही हात जोडून  त्या पोराला नमस्कार केला.. 
समोरच्या पोराने ही उजव्या हाताचा अंगठा वर करत – ‘ थम्स अप ‘ करत – रिअॅक्शन दिली..

मछिंदर हसला….तो पोरगा ही हसला….
दुसऱ्याच क्षणाला त्या पोराने मछिंदरचा महादेवाच्या गेट अप मधला बिडी पितानांचा तो फोटो सोशल मीडियावर फाॅरवर्ड  केला – खाली लिहिले – ”  फक्त कालीमाताच धुम्रपान करते असं नाही बरं का ??!! …आज श्रावण सोमवारी भगवान शंकर यांना ही  धुम्रपान करताना बघा आणि पुण्य कमवा… प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर त्वरा करा …आपल्या शहरात – आज, आता बाजारात प्रत्यक्ष शंभू महादेव भक्तांना दर्शन देऊ शकतात… “….
कमानीतून बाण सुटला होता…
* * * * *

सब इन्स्पेक्टर भालेराव मोबाईल मध्ये डोळे खुपसून बसले होते…
एक एक मेसेज स्क्रोल करून पहात होते…
पहाता पहाता त्यांनी आपल्या मोबाईच्या what’s up वर आलेला मछिंदरचा फोटो अन् मेसेज पाहिला अन्  ताडकन उडाले… ओरडले  – ” घुले, ताबडतोब जीप काढ.. एकदम  अर्जंट “…
निवांतपणे बसलेला हवालदार घुले एकदम दचकला…”आपल्या साहेबाला अचानक कुत्रं बित्रं चावलं की काय ” – असा विचार करत म्हणाला – ” काय झालं साहेब ??”

भालेराव – ” आयला,  आजकालच्या ह्या पोरांच्या हातात मोबाईल काय आला.. बघ कसं सळो की पळो करून सोडलंय साल्यांनी…. परवा कुठल्यातरी एका सटवीनं कालीमातेचा सिग्रेट पितांना फोटो इंटरनेटवर टाकला आणि धुमाकूळ घातला… आता आपल्या गावात कुठल्यातरी उपटसुंभानं शंकराचा बिडी पितानाचा फोटो टाकलाय..”
” अस्स ?? ” – म्हणत घुलेने आपला मोबाईल उघडला आणि म्हणाला – ” खरंच की साहेब..”
थोडा फोटो मोठा करत त्याने निरखून पाहिले…
” साहेब, हा तर उंब्रजचा बहुरूपी सोंगाड्या मछिंदर… आजचा बाजारातला फोटो आहे हा..”

भालेराव म्हणाले – ” चल मग.. जीप काढ…धरला पाहिजे ह्याला नाही तर बाजारात पोरं तमाशा करतील…”
* * * * *
चहा झाला…
बिडी पिऊन झाल्यावर मछिंदर उठला… 
आपला गेट अप ठिकठाक केला आणि पुढच्या पालीकडे निघाला..
फार फार तर पंधरा वीस मिनिटे गेली असतील..
इतक्यात पोलिसांची जीप बाजारात घुसली अन् मछिंदरच्या समोर येऊन उभी राहिली…

हवालदार घुले जीपमधून उतरला.. धांवत मछिंदरच्या जवळ आला…
काही कळायच्या आतच काठीचे ३-४  तडाखे मछिंदरच्या पार्श्वभागावर बसले..
मछिंदर कळवळला..
पोलिस शिपायाने त्याचा टोप हिसकावून घेतला… मेकअप उतरवला आणि गर्दी जमायच्या आंत त्याला जीपमध्ये कोंबला…
” काय झालं..काय झालं “-  असं लोक एकमेकांना विचारत  राहिले..
आली तशी झटक्यात जीप निघून ही गेली.‌. 

कुणाला काही कळेना की नेमकं झालं तरी काय ??..
* * * * *
पोलिस ठाण्याच्या आवारात जीप थांबली..
हवालदार घुलेने मछिंदरच्या  दंडाला धरून त्याला ओढत ठाण्यात आणला..
भालेराव साहेबांनी पुन्हा एकदा त्याच्या उघड्या पाठीवर आपला राग काढला..
हात जोडून गयावया करत मछिंदर म्हणाला – ” साहेब, मला का मारायला लागलाय??..माझा कसूर तर सांगा ??..”

” कसूर… बघायचाय तुला ??!!” – असं म्हणत सब इन्स्पेक्टर भालेराव यांनी आपल्या मोबाईल मधला त्याचा बिडीचे झुरके घेत बिडी पितानाचा फोटो मछिंदरला दाखवला…
भालेराव – ” हा फोटो तुझाच ना ?”
मछिंदर – ” होय जी .‌”
भालेराव यांनी मछिंदरच्या कानशिलात भडकावली अन् ओरडले – ” वरून होय जी म्हणतोस भोXXXX च्या..देवाचा अपमान करतोस ..‌देवाला, महादेवाला बिडी ओढताना कधी  तुझ्या बापाने तरी पाह्यलंय का??…”

मछिंदर – ” मला माहित न्हाई जी..”
भालेराव ओरडले -” मग हा असा फोटो तु काढून घेतलासच कसा ? तुझी हिम्मतच कशी झाली भडव्या ?…”
मछिंदर गयावया करत म्हणाला – ” फोटो मी नाही काढला जी..मी बहुरूपी आहे जी.. महादेवाचं सोंग करतो अन् पोटापाण्यासाठी पैसे मागतोय जी..”
भालेरावाचा राग कमी झालेला नव्हता – ” अबे साल्या, असल्या फोटोनं अन् तुमच्या असल्या सोंगानं देशात आग लागलीय आग.. माहीत आहे का तुला?? ..”

मछिंदर – ” मला काय माहित साहेब… पण साहेब, असली सोंगं घेणं तर माजं रोजचं काम आहे जी… पोटापाण्यासाठी मी हे करतो…माझा आज्जा करत होता…माझा बाप करत होता..”
भालेराव – “असेल.. ते मला काही माहित नाही, आतापासून ही असली सोंग घेणं अन् सोंगं करणं बंद म्हणजे बंद … नाही तर बाराच्या भावात गेलासच म्हणून समज.. घुसलं का टकुऱ्यात की बघायचं आहे चौदावं रत्न ??”
मछिंदरला काही अर्थबोध होईना…

आपण बहुरूपी – सोंग घेऊन लोकांचं मनोरंजन करणं आपल्या रोजीरोटीचं साधन.. आणि हा साहेब तर  म्हणतोय की हे ताबडतोब बंद केले पाहिजे..
डोळ्यात पाणी आणून मछिंदरने विचारलं – ” साहेब, हे बंद केल्यावर आम्ही खायचं काय ??.. आणि आम्ही जगायचं तरी कसं ??!!..”
************
©️ शरणप्पा नागठाणे.
सदर कथा लेखक शरणप्पा नागठाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा

Leave a Comment

error: Content is protected !!