गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

© शुभांगी मस्के
“अगं, छानच आहे की तू, अगदी सडपातळ चवळीच्या शेंगेसारखी, सडपातळ सुंदर बांधा, तुला कशाला हवीय फिटनेस सेंटरची माहिती?. छान खात-पित जा, हेच वय खाण्या-पिण्याचं. एकदा का वय वाढायला लागलं की हवा खाल्ल्यानेही वजन वाढत की काय, असं वाटतं!!  संसारवेलीवर एखादं गोंडस फुल उमललं की जेवणाच्या फक्त वेळा बदलत नाही रात्रीची झोप सुद्धा हराम होऊन जाते”. अल्काताईंच्या बोलण्यावर रिया गोड लाजली. 
अल्काताईं आणि माधवरावांचा, आरव एकुलता एक मुलगा. आरव, लहानपणापासून समजदार, मेहनती, अभ्यासात हुशार होता. प्रत्येक वर्षी वर्गात नव्वदीपार असायचा. एक एक पाऊल पुढे जात असताना, यशाच्या शिखरावर पोहचला.

इंजिनिअरिंगला असतानाच, कॅम्पस सिलेक्शन होऊन मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत त्याला नोकरी मिळाली. 
माधवरावांची फिरतीची नोकरी होती. आरवच्या शिक्षणाच्या दृष्टीने, त्यांच्या गावाला लागून तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी एक छोटंसं टुमदार घर खरेदी केलं होतं. आरवचं शिक्षण इथेच झालं.
नोकरीच्या शेवटच्या दिवसात, माधवराव इथेच रहायला आले होते. आणि आता त्यांनी इथेच रहायचं ठरवलं. आईबाबांनी एकटंच, आपल्यापासून दूर राहायचं, आरवला बाबांचा निर्णय फार आवडला नव्हता. 

आपल्याला तरी कोण आहे? लेकरापासून दूर, एकुलत्या एका मुलाशिवाय, अल्काताईचा जीव खालीवर व्हायचा.
“आज ठीक पण उद्या सून येईल, घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारचं… उगाच ओढाताण करून जुळवून घेण्याच्या नादात, तडजोड करण्यापेक्षा, दूर राहून गोडीगुलाबीने राहायचं”,  माधवराव तटस्थ होऊन परिस्थितीकडे बघणारे होते. 
खूप हट्टाने आरवने आईबाबांना त्याच्या नोकरीच्या जागी बंगलोरला बोलवून घेतलं. आईबाबांना तो एक सरप्राइज देणार होता. 
आरव त्याच्या नोकरीत सेटल्ड झाला होता.
रहायला म्हणून एक फ्लॅट त्याने खरेदी केला होता. आज त्याला पझेशन मिळणार होतं. 

 “आईबाबा, आपलं घर!”… घराच्या चाव्या दोघांच्या हातात देत आरवने झुकून नमस्कार केला.
दोघांनाही भरून आलं. लेकाने स्वबळावर घेतलेलं घर!! याहून मोठा आनंद तरी काय होता. दोघांनाही खूप आनंद झाला होता. 
रीया आणि आरव.. एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. हजरजबाबी, हुशार, चाणाक्ष बुद्धीची त्याची मैत्रिण रिया त्याला आवडायची. मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि आता दोघांनी लग्न करून एकमेकांच होऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. 
आरवने रियाबद्दल आईबाबांना सांगितल्या लगेच कुठलेच आढेवेढे न घेता त्यांनी “तुझी पसंती ती आमची पसंती”, “मिया बिबी राजी तो क्या करेगा काझी” म्हणत, लग्नासाठी ग्रीन सिग्नल दिला. 

रियाच्या घरीसुद्धा नात्याला विरोध झाला नाही.
दोन्ही कुटुंब सुशिक्षित आणि लेकरांच्या सुखासाठी झटणारे त्यामुळे “चट मंगनी पट ब्याह”, असच झालं. ऑफिस कलिग्जसाठी तर आरव रीया म्हणजे “मेड फॉर इच अदर” जोडी होती. 
दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने, देवा ब्राम्हणांच्या आशिर्वादाने… एंगेजमेन्ट, मेहंदी, हळद, लग्न, रिसेप्शन सगळे कार्यक्रम विधीवत पार पडले.  
“रीयाला सून म्हणून नाही तर आमच्या लेकीप्रमाणे जपू, रियाच्या आई तुम्ही निश्चिंत रहा”…  निरोपाच्या वेळी, रीयाच्या आईच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे बघून, त्यांना आधार देताना स्वभावाने हळव्या अल्काताईंचाही कंठ दाटून आला होता.

 “बाळा आजपासून सासुबाईमध्ये आईला शोध”,  हातावर साखर देत त्यांनी रियाला हसत-हसत निरोप दिला होता. 
घरी येताच, अल्काताईंनी दारातच नवरी नवरदेवाच्या डोक्यावरून, भाकर तुकडा ओवाळला, अलाबला काढली. औक्षण केलं.
अंगणात घर…घराला अंगण
आपुलकीच्या नात्याला…प्रेमाचं वंगण
तो इंजिनिअर तर मी एच.आर मॅनेजर 
आजपासून या घरची….मीच होम मिनिस्टर..

अल्का देशमुख….सासूबाई 
आजपासून माझ्या आई होणार
सुख दुःख सर्वांची एक म्हणत 
सर्वांची जबाबदारी मी घेणार
माहेर सोडून आज आले मी सासरी
तरी, मी होणार नाही, बर का सेंटी
तुमच्या सर्वांच्या साक्षीने,
रिया आरव बनून मी घेते…..देशमुखांच्या घरात ऐट्री
सुंदरशा उखाण्यात सर्वांचे नाव गुंफत, तांदळाचं मापट ओलांडून रीयाचा गृहप्रवेश झाला.

एकमेकांना वेळ देता यावा म्हणून दोघेही छान पंधरा दिवस केरळ ट्रीपला जाऊन आले. 
सगळं स्थिरस्थावर झालं होतं, माधवरावांना आता गावाला जायचे वेध लागले होते.
“आई तुझ्या तब्बेतीच्या कुरबुरी, वाढल्यात गं हल्ली. सतत काही ना काही दुखतं-खुपतं म्हणून ओरडत असतेस. कधी छातीत कळा, कधी कंबर, कधी गुडघे, कधी डोकं”. काळजी वाटते गं तूझी.
“तुम्ही कुठेच जायच नाही, आपण सगळे इथेच सोबत राहू. गावाला एकटे राहाण्याचा निर्णय मला काही पटला नाही, उदया अडल्या-नडल्याला, तुम्ही तिकडे आम्ही इकडे, कोण बघणार तुमच्याकडे?”. आरवने चिंता व्यक्त केली.

“अरे, बाळा मी आजारी थोडीच आहे. वाढतं वय, त्यामुळे शरीरात होणारे बदल, हार्मोन्सच असंतुलन त्यात कणकण हिशोबात खाऊन, किलो-किलोने वाढणार वजन. माझ्या दुखण्याच खरं कारण!”. वाढत्या वयाला, वाढत्या वजनाच माप देऊन, अल्काताईंनी सोप्या शब्दात आरवला समजावण्याचा प्रयत्न केला.
“आजकाल प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस हवी असते. आज ठीक पण उद्या आम्हा म्हाताऱ्यांची तुम्हाला अडचण होणार नाही कशावरून? जन्मदाते आईवडील जड होतात हल्ली,  त्यापेक्षा बाबांनी जो निर्णय घेतलाय, तो अगदी योग्य आहे, थोड प्रॅक्टिकली विचार केलेला बरा”, अल्काताईं स्पष्टच बोलल्या.

“अगं काय हे? स्पेस वगैरे! माझा जन्म झाला, माझ्या येण्याने तुमच्या स्पॅसेमध्ये आली का अडचण? तुम्ही माझी दुखणी-खुपणी काढली, माझा वाढता अभ्यास, रात्ररात्र जागायचीस माझ्याबरोबर, उन्हातान्हाची किंचितही पर्वा न करता, मला शाळेत ने-आण करायचीस. माझं हवं नको ते बघताना तुझी तारांबळ या डोळ्यांनी बघितलीय मी.
मी तसा आळशीच होतो, पसारा करायचो, ओला टॉवेलही वाळत टाकायचा कंटाळा मला, तू कधीच तक्रार केली नाही. माझे खाण्याचे चोचले पुरवलेस. माझी अडचण झाली का गं तुला?” आरवनेही स्पष्टच विचारलं.
“नाही रे बाळा!! आईवडिलांना आपल्या लेकरांची कधीच अडचण होत नसते”. 

“आईसाठी तर तिच्या लेकरांचा सांभाळ, याहून मोठ सुखच नसतं. तूझ्या दुखण्या-खुपण्याने अस्वस्थ होणारी मी, धीराने परिस्थितीला सामोरे जायला तुझ्यापासूनच शिकले. तुझा ओला टॉवेल, दोरीवर वाळत घालणं असो की अस्ताव्यस्त पडलेली तुझी खोली आवरणं,  तूझ्या कपड्यांच्या घड्या घालायला, तुझी छोटी छोटी काम करायला आवडायचं मला, तुला आवडीच करून खाऊ घालताना, माझ्यातलं मातृत्व धन्य व्हायचं.  किती आनंद व्हायचा म्हणून सांगू”, अल्काताई बोलत होत्या.
“हो ना! आवडीने केलंस, आताही करतेसच!  तुम्ही दोघेही खूप झटलात माझ्यासाठी. मला आठवतंय, आजी आजोबांच्या गरजेच्या वेळी तू होतीस सोबत. घर संसार, आजी आजोबांची सेवा, स्वतःला गुंतवून घेतलं होतस तू, स्वतःला विसरून जबाबदाऱ्या, कर्तव्य निभावत राहिलीस.

आज मी माझ्या आयुष्यात, यशस्वी होऊ शकलो, ते फक्त तुमच्या दोघांमुळे”. अल्काताई आणि माधवराव आरवकडे कौतुकाने बघत होते. 
“आमचं कर्तव्यच होतं रे ते, तू तूझ्या कष्टाच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहचलास,  तूझ्या यशाचं श्रेय तुलाच!”, बाबांनी आरवच्या खांद्यावर थोपटत म्हटलं…
“आईवडील म्हणून, कर्तव्याला तुम्ही नाही चुकलात आता माझी वेळ, मुलगा म्हणून विश्वास देण्यात कमी पडतोय का मी!”, आरवचा कंठ दाटून आला होता.

“स्पेस वगैरे…. पुढचं पुढे बघू, महत्वाचं म्हणजे ती प्रत्येकाने प्रत्येकाला द्यायला हवी. आम्ही तुम्हा दोघांना ही कुठेच जाऊ देणार नाही. तुम्ही दोघेही आम्हाला आमच्या जवळच हवे आहात”. रियाने हट्टच धरला… 
“घर आवडलं नाही का तुम्हाला? करमत नाही का इथे? काही अडचण आहे का?” रीया आरवने प्रश्नांचा भडिमारच केला, दोघेही अनुत्तरीत होऊन फक्तच बघत राहिले.
आरवने घेतलेला फ्लॅट खूप स्पेशिअस होता. आवश्यक तेवढं मोजकच सामान होतं घरात. सर्व कामाला बाई सुद्धा लावली होती.

“आपल्या घरात बाहेरच्या बाईने येऊन झाडू का मारायचा? घरातल्या बाईने कसं घराच्या कोपऱ्या कोपऱ्यावरून प्रेमाने हात फिरवायचा.  घराच्या भिंती ही मग तिच्याशी बोलू लागतात. बायकांच्या एकटेपणात तिचं घरच तिला साथ देत”. आईला समजावणं कठीण होतं, त्यामुळे ते डिपार्टमेंट आरवने आईकडेच सोपवलं होतं.
अल्काताईंना घरात सगळंच, नीटनेटक जिथल्या तिथे आवरलेलं लागायचं. घराच्या स्वच्छतेकडे त्या जातीने लक्ष देत. हे घर, तर लाडक्या लेकाने स्वतःच्या मेहनतीने घेतलेलं होतं. हल्ली त्यांचा कर्तासवरता हात काही केल्या रिकामा राहत नव्हता. 

सकाळ संध्याकाळ, सुरेशराव बगीच्यात फेरफटका मारायला जात. नव्यानेच त्यांनी हास्य क्लबही जॉईन केला होता. सोबत येण्यासाठी ते अल्काताईंना आग्रह करत. “खे..खे.. खो..खो, हसण्या खिदळण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही आणि वॉकिंग-बिकिंग माझ्याच्याने काही झेपत नाही”… “माझा स्वर्ग घरातच”  माधवरावांच म्हणणं त्या उधळून लावायच्या.
आजकाल, अल्काताईंचा कसा म्हणून हात रिकामा राहत नव्हता. सततची आवराआवरी, साफसफाई बघून, माधवराव ओरडत, “जित्याची खोड काही मेल्याशिवाय जाणार नाही” म्हणत दुर्लक्षही करत.

माहेरी, रीया आईला मदत करायची, तिला कामाची सवय होती. रियाची आई नोकरी करून घर सांभाळायची, त्यामुळे कोणत्या गोष्टीला कधी? किती? महत्त्व द्यायचे, कामाचं नियोजन ती आईकडून शिकली होती. 
सुट्ट्या संपून दोघांच ऑफिस सुरू झालं होतं. रीया जबाबदारीने उद्याच्या भाजीची तयारी,आदल्या दिवशीच करून ठेवायची.  अल्काताईंना रियाच कौतुक वाटायचं. सासूबाईवर कामाचा भार पडणार नाही, रीया पुरेपूर काळजी घ्यायची. 
एक दिवस, भेंडीची भाजी करायची म्हणून रीयाने रात्रीच भेंडी धुवून पुसून ठेवली. दुसऱ्या दिवशी, वेळेत जाग आलीच नाही. आवरून किचनमध्ये येईपर्यंत, अल्काताईंचा अर्धापर्धा स्वयंपाक आटोपला होता. 

“आई, सॉरी हं! उशीरच झाला म्हणत ” रीया दुसऱ्याच क्षणाला कामाला लागली. 
“अग, सॉरी काय त्यात, मी रोज आरवसाठी टिफीन बनवत होतेच.. उलट आता तु असतेस मदतीला. स्वयंपाक तेवढा हक्काने बनवते मी… बाकी मी केलेली दुसरी इतर कामं, घरात कुणाच्याच दृष्टीने महत्वाची नसतात”. अल्काताई बोलल्या.
“तसं काही नाही, भाजी छान झाली की, जेवणाच्या ताटावर तीन बोटांचा मोर नाचवतो, भाजी छान झाल्याची पावती देतो. ओरडुन, राग व्यक्त करतो, मदत मिळाली की थँक्यू म्हणतो, तसच चुका ही मान्य करायलाच हव्यात ना!… एका हेल्थी नात्यासाठी, पारदर्शकता महत्वाची, त्यासाठी हे सॉरी”. . 

आता, दररोज अल्काताई सवयीप्रमाणे आणि कर्तव्यदक्ष सुनेच्या भूमिकेत रीया, मिळून घरातली काम करायच्या. 
कधीकधी संध्याकाळी, ऑफिसमधून थकून आल्यावर, अल्काताई रीयाला किचनमध्ये येऊ द्यायच्या नाही. “एक से भले दो”, म्हणत रीया मदतीला जायचीच. 
आरव रीयाच्या ऑफिसच्या घाईत, घरातली सगळी काम वेळेत आटपायची. देवपूजा झाली की अल्काताईंना निवांत वेळ मिळायचा. या निवांत वेळेत काय करावं? मोठा प्रश्न पडायचा. वाट्याला आलेला रिकामा वेळ आता त्यांना खायला उठायचा. मग उगाच हे पुस – ते पुस.. इतरांच्या दृष्टीने गरजेची नसलेली स्वच्छता…..!!!

आज रिया घराजवळ, फिटनेस क्लब शोधत होती, “अग बारीकच आहेस तू, तुला गरज काय व्यायामाची?  अल्काताईने आश्चर्याने विचारलं.
“आई, फक्त वाढलेलं वजन कमी करण्यासाठी नसतो फिटनेस क्लब. आपली फिजिकल शिवाय मेंटल हेल्थ चांगली राहावी यासाठी सुद्धा गरजेचा असतो. व्यायामाचा लठ्ठ किंवा बारीक असण्याशी काहीच संबंध नसतो.
वय वाढत जातं, नैसर्गिकरीत्या शरीरात बदल घडतात, हार्मोन्सचा इंबॅलन्स तर खूपच नॉर्मल. मूड स्विंग्ज होतात, चिडचिड वाढते.  दुखणी खुपणी मागे लागतात. आपण वाढत्या वयाला दोष देत मुकाट्याने परिस्थितीला सामोरे जात राहातो. 

आत्मनिरिक्षण करतो तेव्हा कळतं, इतरांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलंय. लक्षात येईस्तोर आवडी-निवडी, छंद ही, आपले राहिलेले नसतात. माझ्या मते, एकमेकांना जशी आपण स्पेस देतो तशीच, स्वतःला, स्वतःसाठी स्पेस मिळवून द्यायला हवी…  मी टाईम म्हणूया हवं तर.
म्हणूनच, आपल्यासाठी फिटनेस सेंटर शोधतेय, जिथे चांगले प्रशिक्षित ट्रेनी असतील, जे आपल्याला मार्गदर्शन करतील”. तुम्ही आणि मी, दोघींमध्ये बोट हलवत तिने इशारा केला.

“आपल्याला म्हणजे????”, कपाळावर आठ्या उमटवत अल्काताईंनी विचारलं.
“अहो आई, दोघी मिळून घर सांभाळतो, तसाच आजपासून आपला फिटनेस ही सांभाळायचा दोघी मिळून. थोड काम झालं तरी तुम्हाला धाप लागते. बाहेर फिरायला गेल्या की तुम्हाला लगेच थकवा जाणवतो, साधं शॉपिंगला सोबत यायचं टाळता तुम्ही. वजनामुळे हालचाली मंदावल्या म्हणून तुम्हीच तर सांगता ना, त्यासाठीच हा खटाटोप”,  रीयाने सासूबाईंना विश्वासात घेत समजावलं.
“व्यायामामुळे आपल्यातला स्टमिना वाढतो.  कॅलरी रुपात शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी जाळली जाते. लवचिकता येते, उत्साह वाढतो आणि बरेच फायदे आहेत”…. : रीया बोलली

“अगं, घरची काम करतेच ना मी, व्यायामच नाही का तो?”, अल्काताईं हसतच बोलल्या.
“हो आई, घरकामाने सुद्धा शरिराला व्यायाम होतोच,  पण कदाचित तेवढा व्यायाम पुरेसा नसावा, तेव्हाच तर सगळं रूटीन जशास तस असतानाही, बदल जाणवतात.
आपल्या शरीरातल्या बदलांना स्वीकारता यायलाच हवं, पण कधीकधी याच बदलांमधून, डिप्रेशनसारखे मानसिक आजार ही मागे लागतात”….: रीया
“मला झेपेल का पण ते व्यायाम वगैरे… झेपणार असेल तर, फिट राहण्यासाठी कुठलं ही दिव्य करायला तयार आहे मी. पण ते डाएटफाएट नाही बाई जमणार मला. उकळलेल्या भाज्या वगैरे. गिळायच्या म्हणजे”. 

“चवीचे चार घास त्यावर बंधन नाही ना गं येणार?”. तेल, तिखट, मीठ नसलेलं उकळलेलं बोलताना… नाक मुरडत, कपाळावरच्या आठ्या एका जागी जमा केल्या तशी त्यांना बघून रिया जोरात हसली.
“नाही हो आई, घरगुती सात्विक, कमी तेलात रुचकर जेवण बनवता तुम्ही, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स,कॉर्ब्सचा इंबॅलन्स असतो, त्यासाठी करू काहीतरी. उलट आम्हीच दाबेली, पिझ्झा, बर्गर खाऊन आमच्या सवयी बिघडवतोय हल्ली.. त्यासाठीच म्हणतेय, व्यायामाचा प्रकार कोणता का असेना, महत्वाचाचं!”.
गप्पा गप्पांमध्ये जेवण बनवून तयार झालं होतं. रियाचा फिटनेस सेंटरचा शोध संपला होता. लगेच तिने कॉल करून माहिती मिळवली.

“कसल्या एवढ्या गप्पा सुरू आहेत सासू सुनेच्या. गप्पांनी पोट भरणार आहे की जेवायला मिळणार आहे आज”.   
“काय तर मग ठरलं का? “बोलता बोलता माधवराव दोघींकडे बघत हसले.
“हो बाबा ठरतंय ठरतंय, माझी ॲरोबिक्स आणि आईंची प्राणायाम, योगासन वर्गासाठी ॲडमिशन करायचं ठरवलयं”.  रियाने सांगितलं.
“आई… उद्यापासून वरची सर्व काम मावशीकडून करवून घ्यायची जबाबदारी तुमची! मी ऑफिसला गेल्यावर, मागे राहीली साहीली बरीच काम तुमच्यावर पडतात. दमता हो तुम्ही” रीया बोलली… 

“सरप्राइज!”,  ऑफिसमधून आल्या-आल्या, ओरडतच.. नव्या कोरा मोबाईलचा बॉक्स आरवने आईसमोर धरला. 
“अरे, फक्त दुरुस्त करून आणायला म्हटलेलं होतं, चांगलाच होता मोबाईल…..”: अल्काताई. 
“आई अगं, वरवर सगळं छान दिसत असलं तरी, आत काही तरी बिघाड झालेली असूच असते ना!, जी वरून दिसत नसते.  म्हणूनच तर वस्तू टिकाव्या म्हणून सर्व्हिसिंग करतात ना! असो, दुरुस्तीला खर्च येणार होता बराच, म्हणून नवीन फोन तुझ्यासाठी”.. नवाकोरा मोबाईल हातात देत आरव बोलला.
“आई, मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्स डाऊनलोड करून दिलेत मी, काही पुस्तकांची पीडीएफस पण आहेत. वाचनाची आवड आहे ना तुम्हाला. एका क्लिकवर आता तुम्हाला छान वाचायला मिळेल.” ॲप्सची माहिती देत रीया बोलली.

” योगा क्लाससाठी सलवार कुर्ता घालावाच लागेल, तुमच्यासाठी स्पोर्ट्स शूज पण घेऊया… उद्या लवकर येते, जाऊया शॉपिंगला”, रीया उत्साहात बोलत होती.
अल्काताईंचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.
“काय झालं आई!! डोळ्यात पाणी?” रियाने विचारलं… 
“हे आनंदाश्रू गं!!!” अल्काताईंनी, डोळ्यांच्या कडा पदराने पुसल्या.

“थँक्यू….” ओठांचा चंबू, डोळ्यांची मंद हालचाल करत, माधवराव आणि आरवने रियाकडे बघून हलकेच डोळे मिचकवले. 
लगेच दोन दिवसात, सासू सुनेची जोडी, आपापला फिटनेस जपण्यासाठी फिटनेस क्लबला जायला लागल्या. व्यायामामुळे दिवसभर उत्साह असायचा. कथा वाचनात गुंतलेल्या अल्काताईंना आता, मागे पडलेला वाचनाचा छंद जोपासता येत होता. अल्काताईंच्या व्यवहारातले बदल, माधवरावांनी लगेच टिपले.. “शाब्बास सूनबाई!”, म्हणत त्यांनी तिचे कौतुक ही केले.
अल्काताईंना, कशाचीच किंचित कल्पना न येऊ देता, आवराआवरी, साफसफाई, अती स्वच्छतेच्या नावे.. ओसीडी (ओब्सेसिव कंपलसिव्ह डिसऑर्डर) आजाराकडे  स्वतःला झोकू बघणाऱ्या… अल्काताईंच लक्ष,  दुसरीकडे वळवण्यासाठी पहिलं पाऊल, डॉक्टरांच्या प्राथमिक उपचारांतर्गत रियाने उचललं होत.
त्यात ती यशस्वी नक्कीच होणार होती कारण,  तिला न कळत का होईना, अल्काताईंची पुरेपूर साथ मिळत होती.
© शुभांगी मस्के

सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!