निलिमा

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

©️ कृष्णकेशव
सकाळचे नऊ वाजले होते. निलिमाची ऑफीसला निघायची वेळ झाली होती.
आज होळी असल्यामुळं स्वयंपाकाला उशीर होता, त्यामुळे  डबा न घेताच निलिमानं लॅपटॉप खांद्यावरच्या सॅकमध्ये टाकला आणि दाराजवळच्या शू रॅकमधले सँडल काढून पायात अडकवायला सुरवात केली…
आणि इतक्यात हॉलमध्ये पेपर वाचत बसलेल्या तिच्या सासर्‍यांनी…मोठ्या बाबांनी..तिला हाक मारली.
तिचे सासरे सगळ्या भावात वडील त्यामुळं सगळे त्यांना ‘मोठे बाबा’ म्हणायचे..

“निलिमा ..स्कूटर जरा सावकाश चालव बर का..! आत्ताच मी वाचलं चांदणी चौकात स्कूटर आणि भरधाव कारची धडक झाली म्हणून..!” आणि ते ऐकताच कामासाठी बाहेर जाताना हटकू नये हे तिच्या मैत्रीणीचं नेहमीच वाक्य तिला एकदम आठवलं.. 
“बाबा मी काहीं लहान  नाहीय..मागची वीस वर्षे मी गाडी चालवतीय..”
निलिमानं तिरसटपणे त्यांना उत्तर दिलं आणि डोळ्यावर गॉगल चढवून बाहेर पडली.

मागच्या आठवड्यात कंपनीत एचओडीच्या पोस्टसाठी तिचा इंटरव्हयू झाला होता आणि आज डायरेक्टर मिटींगमध्ये तिचा निर्णय होणार होता आणि नेमकं निघताना  बाबांनी तिला हटकलं  होतं..
मागच्या महिन्यातही असंच आईंनी  एका रिसेप्शनला जाण्यासाठी बाहेर पडताना “निलिमा..शालू छान दिसतोय गं तुला..आल्यावर दृष्ट काढ बाई..!” म्हणून कौतुक केलं होत आणि नेमकं सँडलमध्ये पाय अडकून ती पडली होती.! 
तसं बघायला गेलं तर अशा पोरकट श्रद्धा आणि समजूती यावर तिचा विश्वास नव्हता आणि मैत्रीणींशी गप्पा मारताना तिनं  ह्याबाबतीत त्यांची अनेकवेळा चेष्टा आणि टिंगल केली होती…

“काय फालतूपणा आहे..! म्हणे बाहेर जाताना कुणी अडवलं की काम होत नाही आणि काय  तर म्हणे उंबरठ्यावर शिंकलं की अशुभ असतं..पाल चुकचुकली की अशुभ असतं..आता शिंक येणं ही शरीराची नॅचरल ॲक्ट आहे.. त्यात काय अशुभ..!” आपल्या मैत्रीणींबरोबर तिनं आजपर्यंत  कितीतरी वेळा ह्यावरती वाद घातलेला होता…!
आणि आज नेमकं तेच तिच्या बाबतीत घडलं होत आणि ती मोठ्या बाबांवर  चिडली होती..
खरं तर ती आणि निलेश दोघही  चांगल्या पोस्टवर होते.

छोट्या वेदला सांभाळायला घरातलं कुणीतरी पाहिजे म्हणून तिनंच निलेशच्या मागे लागून त्यांना गावाकडून बोलावुन घेतलं होतं..
आणि आईबाबांना तसं निलिमाचं फार अप्रूप आणि कौतुक होतं.
श्रीमंत घरची लेक असूनही आपलं घर व्यवस्थित सांभाळून ती नोकरी करत होती याचा त्यांना सार्थ अभिमान होता… 
निलिमानं आपली ‘ॲक्टिव्हा’ स्टार्ट केली आणि ती आजच्या रिझल्टचा विचार करतच रस्त्यावरच्या  ट्रॅफिकमध्ये शिरली..

आणि कधी नव्हे ते चौकात ट्रॅफिक पोलीसांच्या ‘चेकिंग स्क्वॉड’नं तिला आडवलं. नेमकं ‘पोल्युशन सर्टिफिकेट’ची मुदत संपलेली. पंधरावीस मिनीट गेली ती गेलीच पण पाचशे रूपये भुर्दंडही बसला..!
अजून बाहेर पडून दहा मिनिटही झाली नव्हती आणि तिला पोलिसांना सामोरं जाव लागलं होतं आणि पैसे गेले ते वेगळेच.
पुन्हा एकदा तिला घरून निघतानाच्या बाबांच्या त्या  ‘टोकण्या’ची आठवण झाली आणि मनातल्या मनात ती थोडीशी अस्वस्थ झाली..

अर्धा पाऊण तासात ती ऑफिसला पोहोचली.
आपल्या केबीनमध्ये जाऊन लॅपटॉप ऑन केला आणि आज आलेले  मेल चेक करायला लागली..
कसबसं तासाभरात  रूटीन काम संपवलं आणि  तिन कॉफी मागवली..
पण तिच मन आज सैरभैर झालं होतं..
बारा वाजता सुरू होणारी डायरेक्टर बोर्डाची मिटींग अजूनही   सुरू झाली नव्हती..

आणि जसजसा उशीर होऊ लागला तिची अस्वस्थता वाढू लागली. न राहवून तिनं जी.एम.ना कॉल केला…
“एम.डी.सरांचा मुलगा यु.एस.ला चाललाय..सर तिकडे गेले आहेत. मिटींग होईल की नाही सांगता येत नाही..”
तिनं काहीं विचारायच्या आधीच जी.एम.नी उत्तर दिलं..
आता मात्र आज आपलं काम होणार नाही याची तिला खात्री वाटू लागली.
काहीं कारण नसताना तिला बाबांचा राग यायला लागला होता..

आणि महत्वाच्या क्लायंटचे  कॉल अटेंड करता करता एवढ्याशा कारणानं चिडलेल्या निलिमाच्या डोक्यात  आजचं  सिलेक्शन जर पुढे गेलं  तर आईबाबांना गावाकडे परत पाठवायचा आततायी विचारही क्षणभर  येऊन गेला..! 
दोन वाजून गेले होते. लंचची वेळ झाली होती.
डबा  नसल्यामुळे ती लंचसाठी शेजारच्या ‘फुडकोर्ट’कडे जायला निघाली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला..
समोर मोठे बाबा तिचा लंचबॉक्स घेऊन उभे होते..! 

उन्हातून आल्यामुळे त्यांचा चेहरा घामानं निथळत होता पण त्यांच्या डोळ्यातनं सुनेबद्दलची आपुलकी ओसंडून वहात होती..!
“निलिमा..अग.. सकाळी तू डबा न घेता घाईनं घाईनं तशीच निघून  आलीस…आज होळी आहे ना..आईंनी खास  तुझ्या आवडत्या खरपूस  पुरणाच्या पोळ्या  पाठवून दिल्या आहेत..!” बाबा रुमालानं चेहर्‍यावरचा घाम टिपत म्हणाले.
निलिमा स्तब्ध झाली होती.
तिला आता गहिवरून आलं होतं..!

मोठ्या बाबांच्या दोन्ही गुडघ्यांची ऑपरेशनस् झाली होती आणि काठीशिवाय त्यांना चालता येत नव्हतं..
केवळ तिला पुरणपोळी आवडते म्हणून सहसा घराबाहेर न पडणारे पंचाहत्तर वर्षाचे बाबा उन्हातान्हात आईंनी दिलेला तो ‘प्रेमा’नं ओथंबलेला डबा घेऊन इतक्या लांब कंटाळा न करता आले होते..!!
पुरणपोळी खायच्या आधीच तिचं पोट आज तृप्त झालं होतं..
आईंच्या मायेच्या त्या साजूक तुपात तिचं ह्रुदय विरघळून गेलं होतं..

एका अदृष्ट प्रेमाची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली होती..!! आणि एका पोरकट समजुतीपायी थोड्या वेळापुर्वीच आपण त्यांना गावाकडे परत पाठवण्याचा विचार करत होतो  याची तिला आता लाज वाटायला लागली होती..
तिनं हात धरून मोठ्या बाबांना खुर्चीवर बसवलं. 
ओल्या झालेल्या आपल्या पापण्यांच्या कडा पुसल्या आणि थंड पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देत म्हणाली,”बाबा कशाला एवढ्या उन्हात इतक्या लांब आलात..मी  आल्यावर रात्री  खाल्ल्या असत्या ना पोळ्या.!

जाऊ दे पण आता सांगून ठेवते ..इथून पुढे तुम्हाला कधीही कुठे बाहेर जायचं असेल तर मला फोन करायचा.
मी टॅक्सी पाठवुन देत जाईन..”
प्रमोशन हे आता तिच्या दृष्टीनं गौण झालं होतं..!  तिनं जी.एम.ना कॉल लावला.
“सर मी आज जरा लवकर घरी जातेय. माझे सासरे मला घ्यायला आले आहेत. महत्वाचं फॅमिली काम आहे.
तशी मी फोनवर ‘ऑनलाईन’ आहेच…सॉरी.! “

तासाभरात तिन समोरचं काम आवरत घेतलं आणि ती बाबांना घेऊन निघाली.
बर्‍याच दिवसापूर्वी तिला बाबांनी डोळ्याचा नंबर चेक करायचा आहे म्हणून सांगितलं होतं.
जाता जाता तिनं नंबर चेक करून नवीन फ्रेम करायला टाकली आणि आईंसाठी एक छानसा गजरा विकत घेतला..
घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती.
सोसायटीच्या होलिकोत्सवात गृपमधल्या मैत्रीणींबरोबर तिनं भाग घेतला..

वातावरणातल्या अशुभ आणि दुषित उर्जेबरोबरच आपल्या मन आणि अंतःकरणांत गोचीडासारखं घट्ट चिकटून बसलेल्या कालबाह्य आणि पोरकट समजूतींच तिनं ‘होलिकादहन’ केलं होतं..!!
दुसर्‍या दिवशी ती नेहमीच्या वेळी जागी झाली.
उशालगत ठेवलेला मोबाईल तिनं ऑन केला आणि व्हॉटसअपवर मेसेज चेक करायला सुरवात केली..

आणि पहिलाच मेसेज तिच्या जी.एम.चा होता.. “निलिमा मॅडम.. रात्री उशीरा ‘बोर्ड मिटींग’ झाली..तुमचं ‘हेड ऑफ डिपार्टमेंट’ म्हणून सिलेक्शन झालंय.. अभिनंदन..!”
निलिमानं अंगावरचं पांघरुण बाजूला फेकून दिलं  आणि ती मोठ्या बाबांच्या रूमकडे धावत निघाली..!
ती आनंदाची बातमी तिला आज सगळ्यांच्या आधी आपल्या मोठ्या बाबांना सांगायची होती..!!
त्यांचे कालचे ‘ते’ शब्द आज तिच्यासाठी आशिर्वाद होऊन आले होते..!!! 
©️ कृष्णकेशव

सदर कथा लेखक कृष्णकेशव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “निलिमा”

  1. नात्यातील गोडवा आणि मनातील शुभाशुभ संकेताचा कालवा दाखवत एच ओ डी चे पोस्ट मिळाल्याचे सांगत सुखद धक्का दिला.
    सुखद मांडणी ओघवती लेखणी. अप्रतिम.
    छानच.
    अभिनंदन

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!