माणसं जपायला हवी

©कांचन सातपुते हिरण्या
“सीमाताई आबांना बरं नाहीये. ताप आहे कालपासून . तुम्हाला फोन करू नको म्हणून सांगितलंय त्यांनी पण आता मी लावलाच वाट बघून . काल रात्री दवाखान्यात नेऊन आणलंय . थोडासा भात कसातरी खातात . पडूनच आहेत आज सकाळपासून . त्यांचे मित्र भेटायला आले होते त्यांनी सांगितलं की सीमाला फोन करून सांग .” आबांना जेवणाचा डबा देणाऱ्या मेसमधला माधव बोलत होता.
” बरं बरं मी येते रात्रीपर्यंत तोवर काळजी घे ,”
सीमाने फोन ठेवला आणि लगेचच कामानिमित्त दिल्लीला गेलेल्या सागरला फोन करून सांगितलं ,”शरयू आणि मी दोन दिवस पुण्याला जातोय‌.”

गाडीतून खिडकीबाहेर बघणाऱ्या सीमाच्या मनातले विचारही वेगाने धावत होते . आईच्या आठवणीनं डोळे राहून राहून भरून येत होते तिचे .आताही तसंच झालं .
चार महिन्यांआधी बाहत्तरावावा वाढदिवस साजरा केलेली आई अचानकच हृदयविकाराच्या झटक्याने सगळ्यांनाच कायमची सोडून गेली . सीमाला अजूनही खरं वाटत नव्हतं.
आबांचा फोन आला होता सकाळीच , “अगं उठून देवपूजा करून देवांना फुल वाहून केसात चाफा माळला . देवापुढं दूध साखर ठेवली . आम्हाला दोघांना दूध घेतलं आणि खुर्चीत बसली ती उठलीच नाही गं .”

आबा फोनवर रडत होते तेव्हा पोटात खड्डाच पडला .
आईचे सगळे विधी सीमा आणि तिच्या नवऱ्याने सागरने केले . शरयूसुध्दा खूप रडली आज्जीला शेवटचा नमस्कार करताना .
सीमा एकुलती एक , तिची लेक शरयूसुद्धा एकुलतीच. खूप जीव दोघी लेक आणि नातीवर आई आबांचा .
नाशिकहून फोन आला त्यांचा येताहेत की आईची लगबग सुरू व्हायची .
या वयातही थालीपीठ , मसालेभात , दलिया , खवा पोळी अजून काय काय स्वयंपाकाच्या मावशींच्या मदतीने करत राहायची .

आबासुद्धा लगेचच शरयूसाठी मस्तानी , बाकरवडी , पेढे काय काय आणून ठेवत . तीन-चार दिवसांच्या मुक्कामात तळ्यातला गणपती , मंडई , तांबडी जोगेश्वरीला जाणं ठरवायचे लगेचच आई आबा . 
मी नाही म्हणाले की म्हणायची , ” तू आल्यावर तरी जाणं होतं गं सीमा . आता सारखं सारखं घराबाहेर पडत नाही आम्ही दोघं म्हातारा म्हातारी आणि शरयूला बघू दे की आजोळचं वैभव . आपल्या शरुला पुण्यातलं स्थळ बघ म्हणजे तू जरी नाशिकला असलीस तरी नात दिसेल आम्हांला डोळ्यांपुढं .”
आबांचा सुद्धा डोळ्यांनीच आईच्या म्हणण्याला दूजोरा असायचा . 

सीमाच्या डोळ्यांतून आठवणी वाहत होत्या. दोन वर्षांपूर्वी शरयूची दहावीची परीक्षा झाली तेव्हा आई ओरडलीच .
“सीमे संसार एके संसार गुरफटलीस एवढी वर्षे. आता जरा स्वतःची आवड जप. कशाची तरी सुरुवात कर पुन्हा. एवढे मेहंदी रांगोळी कशाकशाचे क्लास केलेस लग्नाआधी .”
आई म्हणाली तसंच झालं. हळूहळू मेहंदी काढायला सुरुवात केली आणि करता करता आधी ओळखीतल्या आता तर कार्यक्रमांच्या मेहंदीच्या ऑर्डर शही येऊ लागल्या अगदी हाताखाली दोन मुली मदतनीस म्हणून घ्याव्या लागल्यात .

“आई अगं कशाचा एवढा विचार ? किती हाका मारल्या मी. चल पुणं आलं .”
सीमाच्या विचारांना विराम मिळाला पण तात्पुरताच .
शांत पडलेल्या आबांना बघून तिला भरून आलं .
“तुम्ही दोघी अशा काय इथं ?कुणी सांगितलं ?”
“आबा ते सगळं राहू दे पण यावेळी मी तुमचं काही ऐकणार नाही . आता तुम्ही नाशिकला यायचं आमच्याबरोबर ‌.”

आबांनी तेवढ्यापुरती मान हलवली . दोन दिवसांत त्यांना बराच फरक पडला .
” साधा ताप होता गं सीमा . किती घाबरतेस तू . मी काही शरूचं लग्न बघितल्याशिवाय जात नाही . येईल तुझ्याकडे पण नंतर . थोडे दिवस राहू दे इथं मला .”
शेवटी आठ दिवसांनी पुन्हा येते म्हणून मायलेकी नाशिकला परतल्या . 
“आई बाबा कधी येणारे गं टूरवरून ?”

” येतील दोन दिवसांत , का गं ? त्यांची ऑफिस दूर कधी आठ दिवसांच्या आत संपते का ?”
” काही नाही गं मला तुमच्याशी बोलायचं होतं जरा.”
” काय बोलायचंय मला सांग की .”
” नाही दोघांना एकत्रच सांगणार .”
दोन दिवसांनी सागर आल्यावर शरयूनं दोघांना समोर बसवलं .

“आई-बाबा माझा बारावीचा रिझल्ट लागेल महिन्याभरात , मग ऍडमिशन..”
बाबा हसला , “शरयू तू कधीपासून टेन्शन घ्यायला लागलीस रिझल्टचं ?”
“बाबा माझं बोलणं तरी ऐका . मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ का ? तुम्ही दोघे हो म्हणालात तर .”
” माझी काही हरकत नाही , तुझ्या आईचं बघ तू .”
” आई तुला काय वाटतं ?”
“असं अचानक का ठरवलंयस तू ?”

“आई अगं मी आबांकडे राहीन . त्यांनासुद्धा बरं वाटेल . शिवाय तुझ्या कॉलेजमधल्या आठवणी सांगत असतेस ना सारख्या म्हणून आणि..”
“आणि काय?”
“खरं सांगायचं तर घरात एकटेच बसलेले आबा आठवले की कसंतरीच होतं . नाशिकला चला म्हटलं तर म्हणतात नाही आहेत माझे मित्र इथे लक्ष द्यायला म्हणून टाळतात आबा सारखं . त्यामुळं तर आता खूप वाटतं की जावंच पुण्याला . आपल्या माणसांना जपायला हवं ना.”
शरयूचं बोलणं ऐकून सीमाला काय बोलावं सुचेना .

“आई आबा एकटेच आहेत ना तिकडं , तू बोलत नाहीस पण त्यांच्या काळजीने तुझं झुरणं दिसतं बाबांना आणि मला आणि मी तिकडे गेले की शनिवार रविवार तुम्ही पण यायचं तिकडे..”
रिझल्ट लागला , शरयूला डिस्टिंक्शन मिळालं आणि शरयू पुण्याला शिफ्ट झाली .
सुरुवातीला महिनाभर सीमा राहिली पुण्याला . शरयूचं ऍडमिशन , खरेदी , सामान लावून देणं , क्लासेस..
लेक आणि नात बरेच वर्षांनी एवढे दिवस राहिल्यामुळे आबांच्या चेहऱ्यावर नाही म्हटलं तरी समाधान होतं .

सकाळी मित्रांबरोबर चालायला जाणं , गप्पा , घरी आल्यावर शेजारच्या बिल्डिंगमध्ये मेस लावलेली तिथून नाश्ता , जेवणाचे डबे , संध्याकाळी फेरफटका असं रुटीन असलं तरी मधला दिवस आबांना रिकामाच असायचा . पण आता शरयू आल्यामुळे बराच फरक पडला .
सीमा नाशिकला परतली .
शरयूचं कॉलेज सुरू झालं . सुरुवातीला सवय नसल्यामुळे गडबड व्हायची काही दिवस . पटपट आवरणं , मशीनला कपडे लावणं , आबांसाठी , स्वतःसाठी कॉफी बनवणं आणि मग कॉलेजला पळायचं .

दुपारी आली की मेसमधून आलेले जेवण आबा आणि शरयू गप्पा मारत करत. दुपारी थोडी विश्रांती , संध्याकाळी शरयूनं योगा क्लास लावला . आल्यावर अभ्यास , रात्री मेसमधून डबा आला की पुन्हा दिवसभर काय काय झालं यावर गप्पा मारत जेवण .
शरयू झोपायला गेली तरी आबा थोडा वेळ बाल्कनीत बसून मग झोपायला जात .
” नात आल्यापासून घर पुन्हा हसतं खेळतं झालंय गं . मागचे काही दिवस कोंडल्यासारखं झालेलं एकट्याला पण आता खूप हलकं वाटतं‌. सीमाचे लाड पुरवले तेव्हा आता शरयूच्या निमित्तानं पुन्हा संधी दिलीय देवानं .” आबा आकाशाकडे बघत बोलत होते .
मागून बघणार्‍या शरयूला रडू आवरलं नाही .

“सीमा तुझ्या लेकीत मला तूच दिसतेस गं . कधी कधी बडबड , नाही तर कधीतरी फुगा होतो बाईसाहेबांचा .” फोनवर बोलता बोलता आबा हसत सुटले डोळ्यांत पाणी येस्तोवर .
सीमाला खूप बरं वाटत होतं . शरयूचा रोजच फोन होता दिवसातून दोनदा पण आता आबासुद्धा स्वतःहून फोन करून काय काय सांगत राहत .
“हॅलो आई ओळख कुठे आलोय आबा आणि मी ?”
” अरे वाह ! वैशाली मध्ये पार्टी का दोघांचीच ?”

“मग तू नाहीस यावेळी. तुझी मिस झाली .”
“आज काय विशेष ?”
” काही नाही गं कंटाळा आला म्हणून . आता संध्याकाळी गाण्याच्या कार्यक्रमाला पण जाणारे आम्ही .”
” मजा करतात ना आजोबा नात मिळून‌. मी आले की पुन्हा जाऊ आपण .” 
” हल्ली कितीतरी घरांमधे आईवडिलांना मुलं नीट सांभाळत नाहीत आणि देवा तू मला एवढी गुणी एवढी गुणी लेक दिलीस .”
सीमाला खूप छान वाटत होतं .

लगेचच व्हाट्सअपवर सेल्फी पण आला शरयूचा आणि आबांचा .
रात्री आबांचा फोन आलाच.
“सीमा तुझ्या लेकीमुळे शेवटचे दिवस ढकलायला कारण मिळालंय ग मला . आज काल आई-वडिलांकडे मुलांचे लक्ष नसतं तिथे ही पोर मला जीव लावतीय . तुला सांगायचंच राहिलं . परवा मला ताप भरला . दवाखान्यात नेऊन आणलं शरयूनं . कॉलेजला गेली नाही . स्वतः वरणभात शिजवून मला भरवला . काय बोलू ?”
तिकडून आबांना बोलवेना आणि इकडून सीमा निःशब्द ….
©कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!