© योगेश साळवी
सकाळचे साडेअकरा पावणे बारा वाजले असतील. कार्यालयातील सगळेच जण स्थिरस्थावर होऊन कामाला सुरुवात झालेली. लंच टाईम होईस्तोवर आता कोणीच शक्यतो आपापल्या जागेवरून शक्यतो उठणार नव्हतं.
‘ दीपक बॉयलर्स अँड प्रेशर वेसल्स प्रा. लिमिटेड ‘ कंपनीचे ऑफिस आताच कुठे कामाचा वेग पकडू लागलं होते.
ऑफिसच्या रिसेप्शनमध्ये मात्र आज थोडी गडबड वाटत होती.
मीनाला भेटायला नेमके सकाळीच तिची काही जुन्या कंपनीतली दोस्त मंडळी आली होती.
रिसेप्शन मधुन फोन करून कोणी भेटायला आल्याचं मीनाला सांगताच खरं तर मीना विचारात पडली होती. पण बाहेरच्या स्वागत कक्षात बऱ्याच दिवसांनी तिला राकेश, लता आणि कल्पना दिसले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचं चहा पाणी झालं तर अघळपघळ गप्पा यात स्थळ काळाच भान विसरली होती मीना आणि नेमकं त्याचवेळी काहीतरी काम निघून रिसेप्शनमध्ये नेमक्या दिक्षिता मॅडम आल्या.
समोर कामाच्या वेळात आपली कर्मचारी गप्पाटप्पा मारते बघितल्यावर त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली.
मीनाला त्यांनी खुणेने बाजूला यायला सांगितलं.
भेटायला कोण आलेत ते विचारलं. मीनाने घाबरत आधीच्या ऑफिसातील दोन-तीन जण तिला भेटायला म्हणून आल्याचे सांगताच दिक्षिता मॅडमनी तिला जरा लवकर आटपायला सांगितलं आणि मग नंतर केबिनमध्ये भेटायला ये म्हणून सांगितलं.
पाहुणे निघून गेल्यावर मॅडमनी मीनाला केबिनमध्ये चांगलंच फैलावर घेतलं.
” पण मॅडम… ते माझे जुन्या कंपनीतले सहकारी होते…. इथे जवळच काही कामासाठी आलेले ते सहज मला भेटायला भेटायला आले.” मीनाने आपली बाजू सावरायचा प्रयत्न केला.
” ते काही असो. ही कामकाजाची वेळ तुमच्या वैयक्तिक भेटी साठी नव्हे. तुला कोणाला भेटायचं असेल तर लंच टाईम मध्ये नाहीतर मग काम सुटल्यावर घरी जाताना. पून्हा ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही ” दिक्षीता मॅडम काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या.
मीनाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा जमुना कडे दुर्लक्ष करीत मॅडम नी पुढं निक्षुन सांगितलं ” आणि लक्षात असू त्या मिस मीना… तुम्हाला किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याला अगदी मला सुद्धा हाच नियम लागू आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल.”
सकाळी सकाळी घडलेल्या या घटनेवर चर्चा झाली नसती तरच नवल. कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जेवणाच्या वेळात हा विषय सर्वांनी आपापल्या परीने मांडला. या नवीन नेमणूक झालेल्या दिक्षिता मॅडमचा वागणं सर्वांनाच खटकलं होतं. जेमतेम सहा-सात महिने झाले असतील नसतील त्यांना येऊन…. म्हणजे कंपनीत दहा दहा पंधरा वर्षे काम केलेल्यांसाठी त्या नव्याच होत्या.
फार काटेकोरपणे वागणारी बाई होती. H.R. च्या प्रशासकपदी त्या आल्या तेंव्हा पासूनच बेशिस्त, कामात दिरंगाई पण आणि गबाळे पण खपवून घेतलं जाणार नाही हे एक मीटिंग घेवून त्यांनीच सांगितलं होते.
आतापर्यंत कंपनी चे मालक स्वतःच महत्वाचे निर्णय घ्यायचे. पण आताशा मालक दीपक साहेब पोर्तुगाल ला नवा व्यवसाय उभारण्याच्या गडबडीत व्यग्र होतें. त्यांना या कामासाठी देशाबाहेर वारंवार जावं लागायचं. या कारणास्तव ते असताना किंवा त्यांच्या अनुपस्थित सर्व निर्णय प्रक्रियेची जवाबदारी H.R. च्या प्रशासकाला त्यांनी स्वतः देवू केली होती.
यामुळेच दीक्षिता मॅडम असा शिस्तीचा बडगा उगारतात असं सर्वांचं मत झालं होते. महिला कर्मचारी श्रीमती ढवळे, श्रीमती तरे आणि पुरुष वर्गातील वरिष्ठ अधिकारी श्री. साटम तसे चारचौघात बोलुन दाखवत. महिला प्रसाधनगृहात येणाऱ्या दुर्गंधी आणि
अस्वच्छता यावरून मागे एकदा मॅडम नी रवी बेनारे या सफाई कामगार ला जाब विचारला होता. पाण्याची टाकी बरेचदा रिकामी असतें… नळाला पाणी हवं तेव्हढे येत नाही वगैरे कारण सांगताच मॅडम नी पाण्याची नवी टाकी बसवली.
खर्चाची मान्यता घेवून नविन पंप बसवला. महागडं लिक्वीड आणि पावडर रवीच्या स्वाधीन केली आणि टॉयलेट स्वच्छ ठेवण्याबद्दल त्याला ताकीद दिली. तेंव्हा पासून रवि त्यांना बिचकुन असायचा.
कार्यालयात उशिरा नेणाऱ्या माणसांना तीन लेट मार्किंग झाल्यावर सरळ मेमो द्यायची पद्धत सुरू केली मॅडमनी. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पंधरा मिनिटे आधीच लोक येऊ लागली. बारीक सारी कारण काढून आवाज तो दांड्या मारण्याचे प्रमाण कमी झालं.
आता ते सर्व नियम घालून देणारे व्यक्तीला स्वतः काटेकोर असावं लागतं. हाताखालच्या लोकांवर बंधने लावताना आपणही त्या बंधनांना बांधील आहोत की नाही हे सारखं पहावे लागतं.
दिक्षिता मॅडम त्याबरहुकूमच वागत असल्याने कोणाला काही बोलायला जागाच राहायची नाही.
मग काही विघ्नसंतोषी माणसं मॅडमच्या पाठीमागे त्यांचा एकेरीत उल्लेख करीत…. बाई अशी आहे आणि बाईने आज हे केलं… ते केलं वगैरे. पण दीक्षिता मॅडम ना त्याची पर्वा नव्हती.
मॅडम मध्येच कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जात. तिथं कोणी दुसरा कर्मचारी.. हाताखालचे सहकारी चहा नाश्ता करताना दिसले की त्यांच्या स्वतः करता आलेला चहा नाश्ता त्या सहकाऱ्याला द्यायचा आणि आपण त्यांचा चहा बरोबर आहे की नाही ते बघायचं. अशा अदलाबदल केलेल्या गोष्टीत फरक आढळला की कॅन्टीनच्या मालकाला उत्तर द्यावे लागायचं. पूर्ण भंबेरी उडायची त्याची अशावेळी.
ऑफिसमध्ये या सर्व गोष्टींमुळे दोन जनप्रवाह.. गट तयार झालेले. ऑफिसला शिस्तीची गरज आहे आणि मॅडम योग्य तेच करत आहेत असं मानणारा एक गट आणि मॅडम अतिच करतात… दुष्टपणा आणि अविवेकीपणा त्यांच्यात औतप्रोत भरला आहे… असं मानणारा दुसरा गट.
नियमांचे हत्यार चालून कुणाचीही नोकरी त्या घालवू शकतील अशी भीती आणि प्रचार करण्यात हा दुसरा गट अग्रेसर असायचा. या दुसऱ्या गटात अर्थात काही जुनी जाणती मंडळी संख्येने अधिक होती. ढवळे बाई , नुकतीच लग्न झालेली तरे , मिस्टर परब आणि प्रभू मिळेल तिथं या कर्मचाऱ्यां होणाऱ्या कथित अन्यायाला वाचा फोडण्याचे काम अगदी स्वतःच्या नोकरीवर उदार होऊन करत.
त्यादिवशी मीनाला केबिनमध्ये बोलावून तिला समज दिल्याची बातमी ऑफिसात कानोकानी पोचली आणि हा विषय मॅडमच्या विचारांच्या विरुद्ध आणि त्यांची शिस्त अवाजवी वाटणाऱ्या दुसऱ्या गटात आवर्जून चर्चिला गेला.
मॅडम ना काही करून त्यांच्या पदावरून पाय उतार व्हायला …त्यांना राजीनामा द्यायला लावायचं या विचारावर शिक्कामोर्तब झालं. वेळ काळ न बघता कोणावरही डाफरणाऱ्या अविवेकी बाईला धडा शिकवायचा असा चंग जणू या गटातील धुरीणांनी बांधला.
” तू एका मोठ्या फुलस्केप कागदावर ही झालेली घटना सविस्तर लिही. ही बाई विनाकारण हाता खालच्या कर्मचाऱ्यांवर ओरडते. कार्यालयातलं हस्त खेळतं आणि सोहार्दपूर्ण वातावरण बिघडवून टाकते. कर्मचाऱ्यांच्या शोषण विरोधी या निवेदनात आम्ही सर्वजण तुला साथ देऊ. आमच्या सह्या असतील या निवेदनावर. या बाईंचा वागणं आम्हाला पसंत नाही आणि या बाईचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आपण त्यात करू.” मिस्टर अय्यंगार मीना ला म्हणाले.
मिस्टर अय्यंगार सेल्स आणि मार्केटिंग मध्ये होते. मागे एकदा लखनऊला कामानिमित्त टूरवर गेले असताना काही वाउचर वर अवास्तव आणि असंबंधित खर्च असल्याचा आक्षेप दिक्षिता मॅडमनी घेतला आणि वाउचर वर सही करण्यास नकार दिला.. या गोष्टीचा राग अय्यंगार साहेबांना आला होता.
आपला पाणउतारा सर्वांसमक्ष केलाचा राग मीनाच्या मनात होताच. काम तर नेहमीच असतं .घेतले थोडा वेळ विरंगुळ्याचे काही क्षण तर मॅडमना एवढा भाऊ करायची काहीच गरज नव्हती.
ते राजीनामा वगैरे जाऊ दे.. पण या दिक्षिता मॅडम ना आताच कोणाकडून ताकीद मिळाली नाही तर पुढे त्या शेफारतील… मिस्टर परब म्हणतात तसं एखाद्याच्या नोकरीवर गदा यायला पण त्यांचा आक्रस्ताळेपणा कारणीभूत होऊ शकतो. ते काही नाही या वेळेला आपलं म्हणणं कंपनीच्या मालकांना लिहून कळवायचं असं तिने मनात पक्क केलं.
आज आपला जसा अपमान झाला, बोलणी खावी लागली तसे अजून कोणी दुखावलेले कर्मचारी आहेत का याचा शोध घ्यायची व त्यांचं म्हणणं सविस्तर ऐकायची मोहीम च तिने सुरू केली. या निवेदनात त्यांची तक्रार लिहून घ्यायचा विचार त्यामागे होता.
त्या दिवशी मीना घरी आली तर तिची आई तापाने फणफणली होती. डॉक्टरांनी एका नुकत्याच येऊन गेलेल्या महासाथीचे निदान केलं. त्यासाथीची म्हणे ही दुसरी लाट आली होती.
तत्काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा नाहीतर रोगाच्या जीवाला धोका उद्भभवू शकतो असेही स्पष्ट सांगितलं. मीनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे वडील वारल्यावर आई आणि एक मोठा भाऊ एवढेच तिचे कुटुंब होतं. भावना आणि तिने मिळून आईला योग्य इस्पितळ मिळवण्याची खटपट सुरू केली. त्यांच्या जेमतेम चारशे चौरस फुटाच्या फ्लॅटमध्ये आईला वेगळं ….विलगीकरण करून ठेवणं आणि उपचार करणारे धोक्याचे ठरेल असं डॉक्टरच म्हणाले होते.
मोबाईल वाजला तशी त्याच्या रिंगटोन ने मीना ची तंद्री भंगली. फोनच्या स्क्रीनवर एच आर ऍडमिन.. कंपनी असं नाव झळकत होतं. मीनाने सावधपणे फोन उचलला.
” हॅलो.. मीना साने??” मॅडमचा काहीसा रूक्ष आवाज ओळखायला मीनाला वेळ लागला नाही.
” हो मॅडम. मीच बोलतेय . दोन दिवस माझी आई अत्यवस्थ असल्याने येऊ शकले नाही. पण मग तसं मी प्रशांत सरांना कळवलं होतं…” मीना म्हणाली. दिक्षिता मॅडम रजेचा फॉर्म भरला नसेल आणि दोन-तीन लागोपाठ रजा घेतली तर असं करणाऱ्या व्यक्तीला मॅडम स्वतःहून फोन करतात हे तिच्या कानावर आलं होतं.
” हो.. ते कळलं मला. ” मॅडम त्यांच्या रूक्ष धीरगंभीर स्वरात म्हणाल्या.
” आता आई कुठल्या इस्पितळात आहे..?? कुठे ऍडमिट केले तिला?..”
” नाही मॅडम. साथीचे रुग्ण एवढे आहेत की कुठेच भरती करून घ्यायला कोणी तयार नाही. घरातच विलगीकरण करून ठेवले तिला. आईचे वय सुद्धा बरच असल्याने रुग्ण दगावेल ही भीती डॉक्टर सरळ सांगतात. एक दोघांनी लाख.. दीड लाख देता तर लगेच ऍडमिट करतो असे सांगितलं…” मीनाचा आवाज आता कातर झाला होता.
” मी सांगते तसं कर… धन्वंतरी हॉस्पिटल मधून मी लगेच रुग्णवाहिका पाठवतेय. व्हाट्सअप वर मला तुझ्या करता पत्ता आणि आईचं नाव पाठव.” मॅडमनी आज्ञा केली.
मीनाला आता काय बोलावं ते कळेना. या बाईला धडा शिकवायच्या हिशोबात आपण गेले काही दिवस होतो. आज ती आपल्याला मदत करू पाहतेय हे गणित तिच्या आकलानापलीकडचं होतं.
मॅडम म्हणत होत्या तसं घरचा पत्ता आणि रुग्णाचे नाव तिने मॅडमच्या मोबाईलवर पाठवला.
‘ धन्वंतरी’ हॉस्पिटलमध्ये तिच्या आईला भरती करून उपचार सुरू झाले. मॅडमच्या काही डॉक्टरांची चांगल्या ओळखी होत्या. त्यांनी नुसत्या फोनच्या बोलीवर हे घडवून आणलं होतं. खरंच… पैसा असला की मान… प्रतिष्ठा मिळते. श्रीमंत लोकांच्या सगळीकडे ओळखी होतात.. त्यांची कामे अडून राहत नाहीत. मीनाच्या मनात विचार येत होते पण आता मॅडम विषयी असलेला राग जाऊन तिथं त्यांच्याविषयीची कृतज्ञता होती.
” आई.. कसं वाटते आता? काही त्रास होतोय का असेल तर सांग मला…” डॉक्टरांनी आईच्या प्रकृती विषयी अलबेला असल्याचा सांगितल्यावर मीना आईला विचारत होती.
” अगं आता बरं वाटतंय… अगदी आपुलकीने डॉक्टरांनी काळजी घेतली बरं… आणि उद्या डिस्चार्ज पण देणार आहेत. तुझ्या त्या बॉस दीक्षिता मॅडम तर देव माणूसच आहेत. खरंच त्यांनी आपलं काम केलं म्हणून…”आईच्या आवाजात कृतज्ञता होती.
” अगं मीने.. तुला माहिती आहे का.. मी इथं बाजूला बेड असलेल्या वेंगुर्लेकरांशी गप्पा मारत होते . तेव्हा त्यांनी सांगितलं की दिक्षिता मॅडमचे मिस्टर गेल्या दोन वर्षापासून दुसऱ्या इस्पितळात उपचार घेत आहेत.” आई सांगत होती.
” काय..? काय झालंय काय त्यांना?” आपल्या वर उपकार करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असं व्हावं… मीनाच्या मनात विचार आला.
” हो ग. विवाहा नंतर चार वर्षातच तिच्या संसाराला ग्रहण लागलं. नवरा चांगला मिलिटरीत चांगल्या हुद्यावर होता. उत्तम खेळाडू… हॉकी खेळायचा. हॉकीत अनेक बक्षीस मिळालेली त्यांना. ….”
“एकदा कॅम्पवर हॉकी खेळताना अकस्मात पक्षाघात झाला म्हणे. कमरेखालचं शरीर लुळे पडले. कायमचं! सारे उपाय थकले. सैनिकांसाठी असलेल्या कुठल्या इस्पितळात नवे नवे उपचार घ्यावे लागतात. कुठे जायचं असेल तर सगळ व्हीलचेअर वर बसून.” मीना आईचं म्हणणं वेड्यासारखे डोळे विस्फारून ऐकत होती. आपण काय ऐकतोय यावर तिचा विश्वास बसत नव्हता.
एवढा मोठाले संकट अंगावर असतानाही स्त्री दुसऱ्याला मदत करते… स्वतःचं दुःख उगाळत बसणारे बरेच जण तिने पाहिले होते. पण मॅडम सारख्या अशा फार कमी व्यक्ती असतात जे आपल्या दुःखाचा गाजावाजा न करता परिस्थितीला धैर्याने सामर्थ्याने तोंड देतात. एवढेच नाही तर ते दुःख, संकट आपल्या समाजासाठी असलेल्या बांधिलकीच्या आड येऊ देत नाहीत.
नाहीतर आपण… स्वतःवर झालेल्या अवमानाने या बाईचा काटा कसा काढायचा विचार करत होतो.
आईच्या आजारानंतर बऱ्याच दिवसांनी मीना आज कामावर आली होती. रजेवर असल्याने प्रलंबित राहिलेलं बरचसे काम एक-दोन दिवसात पूर्ण करायला हवं होतं. इतक्यात तिच्या समोरच्या इंटर कॉम फोन ची बेल वाजली.
फोनवर मिस्टर अय्यंगार होते.
” मीना मॅडम… कशी आहे आईची तब्येत?..” अय्यंगारांनी मधाळ स्वरात सुरुवात केली.
” आणि हे बघा मिस मीना…, आपलं ते काम बाकी आहे बरं.. तो निवेदनाचा पेपर… सगळ्या लोकांच्या सह्या घेतलेल्या… आज आपले मोठे साहेब येणार आहेत.. आठवणीने भेटा त्यांना.”
मीनाला आठवलं.. अय्यंगार दीक्षिता मॅडम विरुद्ध केलेल्या तक्रारीच्या निवेदनाबद्दल बोलत होते. कामाच्या वेळेला इतक्या शूद्र गोष्टीचा वापर करणाऱ्या अय्यंगार चा तिला रागच आला.
” अय्यंगार साहेब.. मॅडम नी मला माझ्या संकट काळात मदतीचा हात दिला आहे. तसंच माझा राहिलेला अपमान सुद्धा आता मी विसरूनच गेले आहे. खरंतर अपमान नव्हताच तो.. हाताखालील माणसाला त्याच्या वरिष्ठाने गैरवर्तणुकीबद्दल दिलेली समज होती.”
” तर ते निवेदन देण्याचा निर्णय मी रद्द करत आहे. आणि याबाबतीत याऊपर काही स्पष्टीकरण मला द्यायचं नाही.”
एवढं बोलून मीनाने रिसिव्हर ठेवला. शांतपणे पुढील टेबलाच्या ड्रॉवर मधून मेहनतीने काही दिवसापूर्वी तयार केलेला निवेदनाचा कागद काढून तो पेपर कटिंग च्या यंत्रात टाकला आणि बटन दाबलं.।कर कर आवाज परत त्या कागदाचे बारीक तुकडे होऊ लागले.
© योगेश साळवी
सदर कथा लेखक योगेश साळवी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.