गुलमोहोर

 1. तिची गगन भरारी
 2. डाग
 3. सुख
 4. सत्य
 5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
 6. तडा
 7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
 8. प्रायश्चित्त
 9. उत्तर 
 10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
 11. निलिमा
 12. आपली माणसं
 13. विश्वास
 14. जाणीव
 15. गुलमोहोर
 16. हिऱ्याची अंगठी
 17. सासूबाईंचे माहेर
 18. सवाष्ण

©️ डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर
” तू फार फार बदललास….. आधी कसा मागे पुढे करायचा , सारखं फिरायला न्यायचा आणि गिफ्ट आणायला तर काही कारणच लागायचं नाही . रोमँटिक होतास अगदी .आता मात्र…. ह्यातली एकही गोष्ट होत नाही .  मला तुझा थोडा वेळ हवाय ही साधी अपेक्षाही तू का पूर्ण करत नाहीस ? सतत काम काम काम ! मी खूप नाराज आहे ” केदारला असा सेंटी मेसेज टाकून केतकी जड मनाने कामाला लागली . खूप दिवसापासून केदारजवळ मन मोकळं करायचं असं ती ठरवत होती पण काही जमून येत नव्हतं . आजूबाजूला सतत मुलं , सासू सासरे असल्यामुळे बोलण्यावर बंधनं यायची आणि रात्री तिला वाटायचं , जाऊ दे कुठे छेडायचा हा विषय , दमून आलाय तो . पण आज अखेर तिने मेसेज करून का होईना तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या . 

केदार कसा रिऍक्ट होईल ? उगीच टेन्शन दिलं का त्याला ? पण मी तरी कोणाजवळ मन मोकळं करणार ? आणि सहन तरी किती करायचं ? घरात कामवाल्या बाईसारखं राबतो आपण आणि त्याबदल्यात काय मागतो तर नवऱ्याचा वेळच ना ?
एक ना दोन , हजारो विचार करत संध्याकाळची जेवणाची तयारी करत असणाऱ्या केतकीला केदार तिच्या मागे येऊन उभा राहिलेला कळलंच नाही . त्याने हळूच तिच्या पाठीवर फुंकर घातली , नवीन लग्न झाल्यावर घालायचा तश्शी ! केतकी दचकली . 
केतकीने मागे वळून बघताच केदारने तिला पटकन जवळ ओढलं . वीज चमकावी , शॉक बसावा तशी ती पटकन बाजूला झाली .
” कोणी बघेल ना , काहीतरीच काय ? ” ती म्हणाली .

” हं , चल , बाहेर जेवायला जाऊ , आपण दोघेच , पटकन तयार हो ” केदारने फर्मान सोडलं .
तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून तो म्हणाला , ” कुणीतरी खूप नाराज आहे म्हणे , मग समजूत नको काढायला ? सगळ्या मिटिंग कॅन्सल केल्या आणि आलो . आवर ना आता पटकन….” केदार
” अरे , पण आज मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं ना ? कशाला कॅन्सल करायची मिटिंग ? आता कॉन्ट्रॅक्ट गेलं म्हणजे? तू म्हणजे ना….” केदार फक्त हसला .

” ए , आवर आता….” केदार
” असं अचानक कसं ? आणि मुलांचं काय ? त्यांना नेऊया ना . मुख्य म्हणजे आई बाबांना सांगितलंय का ? ” केतकीच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली .
” डार्लिंग , झालंय सगळं सेटिंग ! राणीसरकार , चलावं आता….” म्हणत केदारने एक flying kiss दिलं . 
” अरे , बघेल ना कोणी , काय आपलं कॉलेज तरुणांसारखं करतो आहेस ? मी काय म्हणते, मुलं ? “
” नो , नो , नो , आपण दोघेच जाणार आहोत . हे बघ अर्धा तास इथेच गेला , चल लवकर ” केदार

”  असं अचानक सरप्राईज कसं रे…. मी पटकन स्वयंपाक करते मग जाऊ ” केतकी
” नाही , आई करेल , बोललोय मी तिला ” केदार
हो नाही करत अखेर केदार आणि केतकी निघाले . ” मला वाटलं छान तयार होशील, तू तर अगदी साधेच कपडे घातले. घालायचा ना तो ब्लॅक वनपीस ” म्हणत केदारने डोळा मारला . 
” गप रे, मला असं सगळं सोडून यायचंच नाहीये खरं तर पण…. चल आता ” म्हणत केतकी गाडीत बसली.  मुलांनी बाय करताच केतकीला पिळवटून आलं , ” नेऊया ना रे त्यांना पण . त्यांनाही आवडतं हॉटेलमध्ये जेवायला….” 

” केतकी , मी आता चिडेल हं….” केदारने आवाज चढवला .
गाडी निघाली खरी पण केतकी घरीच घोटाळत होती . कोपऱ्यावर पोहोचताच तिने घरी फोन केला ” चिंटू , होमवर्क राहिलाय तुझा . आजोबांसोबत बसून कर . आणि ते HCF, LCM कळलंय का ? उद्या क्लास टेस्ट आहे . हे बघ , मी परत एकदा सांगते, ऐक…..” आणि तिने फोनवरून पाच मिनिटं परत एकदा रिव्हिजन घेतली .
एकदाचा फोन ठेवला आणि अपराधी नजरेतून केदारकडे पाहिलं . ‘ टिपटीप बरसा पानी , पानीने आग लगायी…’ रेडिओवर गाणं लागलं आणि केदारने केतकीचा हात धरला . ” अरे देवा , केदार ,  बेसिनचं पाणी गळतंय, थांब प्लम्बरला फोन करते, सकाळपासून करेन म्हणते….विसरले “

” हॅल्लो, भैय्या , वो पाणी टपटप गळने लगा है, सब ओला हो जाता है , अभि के अभि आ जाओ. और मागच्या वेळेला जादा पैसे लिये थे , आता बराबर लेने का…. ” अशा सूचनांमध्ये पुढची पाच मिनिटे गेली. दोघे हॉटेलला येऊन पोहोचले .
” कर ऑर्डर , हवं ते….” केदार म्हणाला. केतकीने मेनू कार्ड उजवीकडून डावीकडे म्हणजे आधी किंमत मग मेनू असं बघायला सुरुवात केली . ” किती महाग हॉटेल आहे हे, त्यापेक्षा मी घरी खिचडी टाकली असती पटकन….त्यासोबत पापड तळले असते आणि मस्त कैरीचं लोणचं ” केतकीने कुरकुर केली . 
 ” आता सांगतेस की नाही ? कर ना ऑर्डर, किती दिवसांनी आलोय जेवायला….परवाच बोनस दिलाय तुझ्या हातात, किती विचार करतेस? ” केदार तिच्या जवळ सरकत म्हणाला .

” केदार , अरे , समोर बस ना, हे काय असं शेजारी खेटून…लहान आहोत का आपण ? बरं दिसतं का ते? आजूबाजला किती लोक आहेत बघ” म्हणत केतकी दूर सरकली.
जेवण आल्यावर, अगदी रोमँटिक स्टाईलने केदारने पहिला घास भरवायला तिच्या तोंडासमोर धरला, ” पोरं जेवली असतील ना रे ? चिंटू खातो पण परीला मात्र खाऊ घालावं लागतं तरच पोटभर जेवते. तू पण ना, आईंना होत नाही आता उठबस , त्यांनाच करावे लागेल सगळे आज . दुपारी तरी सांगायचं मी करून ठेवलं असतं….” केतकीला त्या प्रेमळ घासात मुळीच इंटरेस्ट नव्हता .
” पण मेसेज तर तू संध्याकाळी केलास ना ? मग दुपारी कसं डिनर प्लॅन करणार ? राणीसरकार, बरं हे घ्या ….” त्याने तिला गिफ्ट दिलं.

सुंदर सोन्याचे कानातले बघून केतकी उडालीच ! ” अरे , कशाला खर्च केलास ? तू म्हणजे ना , आता तर मुलांच्या शाळा बदलल्या, इतका खर्च झाला. आईंचं  आजारपण सुरूच असतं . मागच्या महिन्यात वाढदिवसाला केवढी महागडी पर्स घेतलीस. तुला नको का कळायला ? पैसे सेविंग करू रे आपण, नको असे उधळत जाऊस ” 
” हं , केतकी , तूच बघ आता . तू तक्रार करतेस की बाहेर नेत नाही , रोमँटिक होत नाही , गिफ्ट देत नाही आणि मगासपासून तू काय करतेस बघ बरं…. ” केदारने तिला विचारलं.

पुढे तो तिला समजावू लागला. ” हे बघ केतकी, घरी मुलं, आई -बाबा असतात तर बाहेर ओळखीचे चार लोक असतात त्यामुळे थोडं रोमँटिक झालं की तू डोळे वटारतेस. तुला कधी बाहेर चल म्हंटलं तर तू तुझ्या कामांचा पाढा वाचतेस. चुकून बाहेर आलीस सोबत तरी मन मात्र घर, मुलं ह्याभोवतीच घुटमळत असतं, कशातच लक्ष नसतं तुझं. गिफ्ट्सचेही तसंच! मी किती प्रेमाने आणलंय ह्यापेक्षा त्याची किंमत काय आहे आणि कशाला एवढा पैसा खर्च केला, सेविंग करू हे लेक्चर चालू करतेस. सगळी कामं आटोपून रात्री  बेडरूम मध्ये यायला तुला उशीर तर होतोच शिवाय तो कळकट, वासांनी भरलेला गाऊन, विस्कटलेले केस, अवतारच असतो सगळा. एवढंच नाही, एकांताच्या नाजूक क्षणी, कधीतरीच येतो म्हणा तो क्षण, तुझं लक्ष असतं, रंगकाम काढायला हवं रे ह्यावर. खरं बोलतोय ना मी? ” केदारने केतकीला विचारलं.

खरंच होतं केदारचं. अगदी असंच घडतं पण….. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.
तिच्या मनातील भाव लक्षात येऊन केदार म्हणाला, ” स्वीटू, अगं मी मुळीच नाराज नाही तुझ्यावर. मला कळतंय, तुझ्या आयुष्यात ह्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे जास्त प्राधान्याचं आहे. पण खरं सांगू, मागच्या काही वर्षात तू नवरा म्हणून मला समजूनच घेत नाहीस असं मला वाटलं. मी हे तुझ्याशी नुसतं बोललो असतो तर कदाचित तुला कळलं नसतं. लग्नानंतर लगेचच मुलांची म्हणजे नवऱ्याची जबाबदारी खूप वाढते, संसार त्यानंतर येणारी मुलं आणि करियरच्या नव्या संधी ह्यात मी कबूल करतो की थोडी वर्षे नाही देऊ शकलो मी तुला पुरेसा वेळ. पण आता बिझनेस मध्ये मी सेटल झालोय तर तू तुझ्या व्यापात अडकलेली आहेस. मला वेळ असतो तेव्हा तुला नसतो एवढंच घडतंय. प्रेम कमी तर होणारच नाही गं ” केदार तिला समजावत होता.

” पण , पण, ह्याला काहीच उपाय  नाही का रे? असंच झुरत रहायचं का एकमेकांसाठी? ” केतकीला हुंदका आला.
” तू प्लिज रडू नको, मला नाही बघवत तुझं रडणं. सगळ्यात आधी सॉरी, मागचे काही दिवस मी मुद्दाम अजिबात वेळ देत नव्हतो, तुला माझी ओढ प्रकर्षाने वाटावी म्हणून! एकतर मनातून हे काढून टाक की आपण बदललोय. आपण फक्त वेळ आणि परिस्थितीनुसार priorities बदलल्यात. आपलं प्रेम मुळीच कमी झालं नाही उलट  मुरलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ठरवून एकमेकांना वेळ देणं. सुरुवातीला अवघड वाटेल, वेळ काढणं शक्यच नाही असं वाटेल पण  प्रयत्न तरी करूया. छोटे छोटे बदल करू दिनचर्येत म्हणजे कितीही घाई असली तरी सकाळचा चहा बरोबर घेणं, रात्री पंधरा मिनिटे सोबत walk ला जाणं. ठरऊनच टाकू महिन्यातल्या शेवटच्या रविवारी आपण दोघांनीच नाश्त्याला किंवा जेवायला जायचं, उगाच मुलांसाठी हळवं व्हायचं नाही.

पंख लावून ते आता उडून जातील पण आपले दिवस  येतील का परत? आणि एक जेवण त्यांच्याशिवाय करणं हा काही अन्याय नाही त्यांच्यावर. मी पण पूर्ण प्रयत्न करेल, एक तास तरी लवकर येण्याचा आणि तू देखील जमव कामं लवकर संपवणं. आणि हो, थोडं रोमँटिक होऊ दिलंस तर मी होईन हे पण लक्षात घे.
केतकी, उन्हाने लाही लाही होत असताना, सगळीकडे शुष्क वातावरण असतानाही बहरून आलेला गुलमोहोर आपल्याला दोघांनाही आवडतो, हो ना? हा फुललेला गुलमोहोर सगळ्यांनाच मनस्वी आनंद देतो. परिस्थितीच्या उन्हाळ्याला दोष देण्यापेक्षा गुलमोहोरासारखं आपण आपलं प्रेम प्रगल्भतेने फुलवलं तर? “

मला वाटलं उन्हाळा आला, पण केदारचं मुद्दाम असं वागणं हा तर उन्हाळ्यातला गारवा ठरला असा विचार करून केतकी खुदकन हसली आणि तिच्या गालावरचे निखळ हसू बघून केदारचाही गुलमोहोर फुलून आला…..
काय मग फुलणार का तुमच्याही घरी गुलमोहोर?
©️ डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर
सदर कथा लेखिका डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
सर्व सामान्यांच्या आयुष्यावर होणार्‍या सोशल मिडीयाच्या परिणामांची ही कथा जरूर वाचा.

Leave a Comment

error: Content is protected !!