जाणीव

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

©️ सौ.स्मिता मुंगळे
“आई,अग कोणत्या विचारात हरवली आहेस? चल लवकर स्टेजवर.बघ किती लोक लाईनमध्ये थांबले आहेत आपल्याला भेटायला”,संकेत म्हणाला तशी शशी भानावर आली.किती वेळ ती विचारात हरवली होती देव जाणे.
संकेत…शशीचा एकुलता एक लाडका लेक.आज त्याच्या लग्नाचे रिसेप्शन आहे.खरेतर एकुलत्या एक लेकाचे धुमधडाक्यात लग्न आणि लग्नासंबंधी सर्व कार्यक्रम तिने अगदी डोळे दिपण्यासारखे केले होते.
गेले आठ दहा दिवस घर आप्तस्वकीयांनी गजबजून गेले होते. शशीने सगळ्यांना आमंत्रणच तसे दिले होते.

इतके सगळे असले तरीही या सगळ्या गडबडीत आणि लग्नाच्या धामधुमीत शशी वरचेवर तिचा भूतकाळ आठवून त्यात हरवून जात होती. लेकाने तिला भानावर आणले तशी ती लगेच मुलगा,सून आणि नवऱ्यासोबत स्टेजवर जाऊन उभी राहिली.गेल्या अनेक वर्षात जोडलेली,प्रेमाच्या,मैत्रीच्या आणि रक्ताच्या नात्याने बांधलेली अशी कित्येक मंडळी रिसेप्शनला आली होती. स्टेजवरून ती गर्दी बघून तिला समाधान वाटत होते.एकापाठोपाठ एक येणारे आप्त,हितचिंतकाना ती नव्या सुनेची ओळख करून देत होती.

“शशी,खरचं नशीबवान आहेस ह तू…खूप छान सून मिळाली आहे तुला” या वाक्याने खुश होत होती. होतीच तिची सून नक्षत्रासारखी सुंदर,हुशार आणि मनमिळाऊ सुद्धा.आज तर गुलाबी कलरच्या घागऱ्यात आणि माफक प्रमाणात केलेल्या मेकपमध्ये तिचे सौन्दर्य जरा जास्तच खुलून दिसत होते.मनातल्या मनात शशी तिची सारखी दृष्ट काढत होती.
तेवढ्यात अनाथाश्रमातल्या मुलींचा ग्रुप स्टेजवर आला.सगळ्या त्या नवख्या वातावरणात अगदी बावरून गेल्या होत्या.
त्यांना बघताच रेणू… शशीची सून पुढे आली.तिच्या चेहऱ्यावर मैत्रिणींना बघताच हास्य विलसले. तिचा आनंद बघून शशी मनोमन सुखावली.

सगळ्या मैत्रिणींबरोबर ग्रुप फोटो काढून झाला.”तुम्ही घ्या ग सगळ्याजणी डिश.पोटभर जेवा”,शशी म्हणाली तसे सगळ्याजणी माना डोलावत स्टेजवरून खाली उतरल्या.या नवख्या वातावरणाचे त्या मुलींना दडपण आल्याने त्या कितपत जेवतील याची शशीला शंका होतीच.त्या रेणूकडे पुन्हा पुन्हा वळून बघत होत्या आणि रेणूचे लक्ष देखील सारखे त्यांच्याकडेच जात होते.
तो दिमाखदार सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.त्यामुळे त्यांना घरी यायला सहाजिकच उशीर झाला. नंतर उशीर होणार हे माहिती असल्याने रेणूच्या मैत्रिणींना ड्रायव्हर आधीच आश्रमात सोडून आला होता.

लग्नाची धावपळ, दगदग आणि नकळत लोक काय म्हणतील याचा मनावर असणारा ताण यामुळे शशीला दुसऱ्याच दिवशी ताप आला. तिचे अंगदेखील खूप दुखत होते.जास्त तापामुळे तिला ग्लानी येत होती.तापामुळे तोंडाला चव नव्हती आणि जेवण्याची इच्छा होत नव्हती.ती तिच्या खोलीत डोळे मिटून दिवसभर पडून राहिली.
संध्याकाळीसुद्धा उठून खोलीतील लाईट लावावा असे तिला वाटत नव्हते.मनात भूतकाळातील आठवणींचे वादळ घोंघावत होते.खरे तर जुन्या आठवणींमुळेच तिला जास्त शीण आला होता. अचानक तिला कोणाचीतरी चाहूल लागली. तिने डोळे उघडून पाहिले तर रेणू आत आली व तिने खोलीतील दिवा लावला.

शशीच्या जवळ येत तिच्या कपाळावर हात ठेवत रेणू म्हणाली,”आई,ताप कमी आलाय आता.मी चहा बिस्किटं घेऊन आलीये ती खाऊन घ्या बरं.डॉक्टरांनी दिलेली औषधे स्ट्रॉंग आहेत,ऍसिडिटी वाढेल तुमची उगाच. का तुम्हाला काही खायला गरम करून आणू?”शशीच्या चेहऱ्यावरचे भाव बघत रेणू पुढे म्हणाली,”अहो तुम्हाला दुपारी ताप जरा जास्त होता म्हणून संकेतने डॉक्टरांना घरी बोलावले होते.” ” मला काहीच आठवत नाहीये ग,लग्न झाल्यानंतर तुला उगाच लगेचच त्रास”,असे शशी म्हणाली.
तशी रेणुने लगेच तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाली,”आई,मला त्रास झाला असेल असे तुम्हाला खरंच वाटते? तसे असेल तर मग तुम्ही अजून मला आपली मानत नाही असे मी म्हणेन.”

रेणूच्या अशा बोलण्याने शशीच्या डोळ्यात पाणी आले.
रेणुला जवळ बसवून घेत शशी म्हणाली,”अग, आता तू आमचीच आहेस. मनात उगाच काही विचार आणू नकोस.आश्रमात पहिल्यांदा तुला पाहिले ना तेव्हाच मला तुझ्याबद्दल आपलेपणा वाटला होता.”
“आई,एक विचारू?अगदी खरं खरं उत्तर द्याल?”,रेणुने विचारली. “विचार ग,त्यात काय? आणि सासूशी नाही तर आईशी बोलते आहेस अशा मोकळेपणाने बोल.”शशी हे म्हणाली खरी पण क्षणात तिला तिची चूक लक्षात आली आणि तिला उगाच अपराधी वाटले.
काही क्षण शांततेत गेले.उगाच दोघीही अवघडून गेल्या.शेवटी शशी म्हणाली,”सॉरी रेणू,मी सहज बोलून गेले.मला तुला दुखवायचे नव्हते ग.गैरसमज करून घेऊ नकोस.”

“आई,अहो सॉरी काय? असे म्हणून मला लाजवू नका.पण एक सांगू,मला खरचं आईशी कसे बोलतात हेच माहिती नाही. लहानपणापासून फक्त सांगितलेले ऐकायचे माहिती आहे.कधी कोणाला प्रश्न विचारलेच माहिती मी,नव्हे तशी सोयच नव्हती आश्रमात. म्हणून थोडं अवघडलेपण आले.बाकी काही नाही.”
वातावरण हलकं करण्यासाठी शेवटी शशीच म्हणाली,”बास आता नमनाला घडाभर तेल.विचार काय विचारायचे ते.नाहीतर संकेतने हाक मारली की जाशील लगेच पळून.” आता मात्र रेणू लाजली.खाली मान घालून म्हणाली,”आई,सगळी सुख पायाशी लोळण घेत असताना तुमच्या एकुलत्या एक,हुशार आणि देखण्या लेकासाठी माझ्यासारखी अनाथ मुलगी आश्रमातून सून म्हणून का आणलीत तुम्ही?”…

“रेणू….”शशीच्याने पुढे बोलवेना जणू तिचे शब्द मुके झाले होते. तिचे डोळे भरून आले.रेणूने तिला प्यायला पाणी दिले अन तिच्या पाठीवरून हात फिरवत ती काही क्षण शांत बसली.
“काय झाले आई? एवढ्या हळव्या का झालात तुम्ही,सांगा ना”,रेणू म्हणाली तसे डोळे पुसत शशी तिला सांगू लागली.”रेणू बाळा कधीतरी मी तुला हे संगणारच होते पण इतक्यात सांगावे लागेल असे वाटले नव्हते.अग, तू जशी मायेची भुकेली आहेस अगदी तशीच मीदेखील आहे ग.” सासूबाई हे काय बोलताहेत त्याचा रेणूला काहीच अर्थबोध होईना.

“आई,तुम्ही काय बोलता आहात ते खरचं मला काही कळत नाहीये.”
“रेणू,आता मी काय सांगते ते नीट ऐक. कारण यापुढे हा विषय परत नको आहे मला.”
रेणूच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पहात ती पुढे बोलू लागली.”रेणू,आता ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर….अग, सुंदर,श्रीमंता घरची,सुशिक्षित मुलगी सून म्हणून घरी आणणे मला अजिबात अवघड नव्हते.नव्हे संकेतला तशाच मुली सांगून येत होत्या. पण मीदेखील मनाशी काहीतरी ठरवले होते आणि परमेश्वराच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली.”

“म्हणजे काय आई?”…..रेणूच्या अजूनही काही लक्षात येत नव्हते.
“रेणू,तुझी जशी कहाणी आहे ना अगदी तशीच माझीदेखील.जसे कळतेय तसे मी अनाथाश्रमातच लहानाची मोठी झाले.जन्मताच मला माझी आई त्या आश्रमाच्या पायरीवर सोडून गेली होती म्हणे.जसजशी मोठी होत होते तशा या गोष्टी माझ्या कानावर पडत गेल्या आणि मला माझा भूतकाळ कळू लागला. सहाजिकच आपण कधीच कोणाला आवडत नाही असा न्यूनगंड माझ्या मनात तयार झाला.पण मुळातच देवाने मला बुद्धीचे आणि रूपाचे वरदान दिले होते.अगदीच त्याने माझी निराशा केली नव्हती. त्यामुळे आश्रमातील कार्यक्रम असो वा आणखी काही,कोणी मंडळी आश्रमात भेट द्यायला आली की मी पुढे असे.

तिथेच शेखरने…संकेतच्या बाबांनी मला पाहिले आणि पाहताक्षणी त्यांना मी आवडले होते.खरे तर तेदेखील लहानपणीच आई वडिलांच्या मायेला पारखे झाले होते. कुठच्यातरी लांबच्या नातेवाईकांनी त्यांना शिकवून पायावर उभे केले. पण अंगभूत हुशारीवर ते बघताबघता यशाची शिखरे गाठू लागले.पण जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी अनाथाश्रमातील मुलीशी लग्न करेन हे मनाशी ठरवले
होते. त्यांच्याशी लग्न करुन या घरात आले आणि आता तू बघतेच आहेस सगळं कसं भरभरून दिले आहे मला देवाने.

म्हणूनच संकेतचे लग्न करण्याची वेळ आली तेव्हा मीदेखील त्याच्यासाठी आश्रमातील मुलगी पसंत करायचे ठरवले आणि माझ्या या निर्णयाला शेखरने मनापासून दुजोरा दिला. एक लक्षात ठेव रेणू,” परिस्थिती बदलत असतेच पण म्हणून आपण कुठून आलो आहोत हे विसरता कामा नये आणि आपणही या समाजाचे काही देणे लागतो हे कधीही विसरू नकोस.”
शशीच्या या बोलण्यावर रेणूला काय बोलावे हेच कळेना.”आई……” एवढेच बोलून ती शशीच्या कुशीत शिरली तसे शशीने तिला घट्ट पोटाशी धरले.आज रेणूला सासू नाही तर आई मिळाली होती आणि शशीला अगदी हवी तशी लेक.एक वर्तुळ पूर्ण झाले होते.
©️ सौ.स्मिता मुंगळे

सदर कथा लेखिका सौ.स्मिता मुंगळे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
सोशल मिडियाच्या परिणामांची ही कथा अवश्य वाचा.

Leave a Comment

error: Content is protected !!