तेथे कर माझे जुळती 

© सौ प्रियंका शिंदे बोरुडे
“अगं अनघा, ऐकलंस का? आपल्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये आता पन्नास पेशंटस् झालेत. या समाजकार्यासाठी आपल्याला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय नाही?”
” हो प्रसाद! अरे आपला सुमेध ज्याप्रमाणे आपण घडवला, तसे योग्य मार्गदर्शन आपण इतर स्पेशल पाल्यांच्या पालकांना आता करू शकतो. कारण एका स्पेशल मुलाला वाढवणे, संगोपन करणे ही काही सोपी गोष्ट नाही. खरंच आपण या पुण्यकर्माच्या माध्यमाने का होईना सर्व विशेष मुलांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो.

आपला सुमेध लहान होता तेव्हा असे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला कोणीच नव्हते. त्यावेळी आपल्याला योगायोगाने या क्षेत्रातील चांगले फिजिओथेरपिस्ट मिळाले हे आपले भाग्यच पण बरेचसे इतर बारकावे आपण सुमेधच्या सहवासातून, वागणुकीतून शिकलो.म्हणून इतर स्पेशल मुलांच्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी योग्य समुपदेशन देणे खूप गरजेचे आहे. 
बऱ्याचदा अनेक पालकांना आपल्या मुलाला कसे ओळखायचे ? त्याला काय आवडतं? त्याचा कल कशामध्ये आहे? हे समजत नाही; कारण बऱ्याच स्पेशल मुलांना बोलता येत नाही किंवा व्यक्त होता येत नाही, असा त्यांच्या पालकांचा समज असतो पण ही सुद्धा एक वेगळी भाषा असते , कला असते हे आधी पालकांना समजून घ्यावे लागते आणि त्यानुसार आपल्या मुलांची भाषा किंवा त्यांच्याशी संवाद साधावा लागतो.

शेवटी स्पेशल जरी असली तरीही ती सुद्धा मुलेच आहेत. फरक फक्त एवढाच की त्यांना आपण आपल्यासारखे व्यक्त व्हायला शिकवायला हवे. नेमके या मुख्य गोष्टीसाठीच स्पेशल मुलांचे पालक विशेष प्रयत्नशील नसतात. मग कुठेतरी पालक उदास होतात आणि आपल्या मुलावर त्यांचा फोकस राहत नाही.”
“हो ,अनघा.बरोबर बोलतेस् तू. म्हणूनच तर मला  स्पेशल मुलांच्या पालकांना बऱ्याच बारकाव्यांचे योग्य प्रशिक्षण द्यायचे आहे, जेणेकरून कुठलीही उदासीनता त्यांच्या मनात राहणार नाही. याचसाठी तर मी माझी नोकरी सोडून नेचरोपॅथी आणि फिजिओथेरपीचे स्पेशल शिक्षण घेतले आहे. आपला सुमेध आता बरीचशी म्हणजे जवळपास ९५ टक्के कामे त्याच्या हातानेच करतो ही सर्व याच वैद्यकीय शास्त्राची आणि पर्यायाने तुझ्या खडतर परिश्रमाची पोचपावती आहे.”

” अरे प्रसाद असं काय करतोस? हे श्रेय फक्त माझे एकटीचेच नाही तर तुझेही आहेच की! तू  अर्थार्जन केलेस आणि मी माझा गृहिणी व आईचा धर्म, कर्तव्य निभावले. तुझी साथ नसती तर आपल्या सुमेधला मी आज एवढे स्वावलंबी बनवू शकले नसते.”
“बरोबर आहे अनघा तुझे. या नाजूक मुलांना आई आणि वडील या दोघांचीही बरोबरीची साथ, आपुलकी ,प्रेम हवे असते. यासोबतच जर एकत्र घरातील आजी,आजोबा, मामा, मामी, आत्या ,काका, काकू यांनी अशा स्पेशल मुलांना आपला लळा लावला, थोडे प्रेम दिले तर नक्कीच या मुलांची प्रगती वेगाने होऊ शकते. म्हणूनच मी केवळ या मुलांच्या फिजिओथेरपीवरच भर देत नाही तर प्रेम , आपुलकी, कौटुंबिक मूल्ये, संस्कार या वातावरणात ही मुले मोठी व्हायला व्हावीत असे मी पालकांना माझ्या व्याख्यानमालेतून वेळोवेळी सांगत असतो.”

“हो खरे आहे. प्रसाद, आज तू सेंटरला सर्व पालकांना किती वाजता बोलवले आहे? आजच्या सेंटरवरील कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे?”
” आज माझे स्पेशल मुलांच्या पालकांसोबत चर्चासत्र म्हणजे एक व्याख्यान असणार आहे. त्यानंतर मग प्रत्येक मुलानुसार फिजिओथेरपीचे व्यायामाचे प्रकार, त्यातील बारकावे हे सेशन असणार आहे.”
“पण तू मला हे का विचारते आहेस आज? तू माझ्या सोबतच असणार आहेस ना सेंटरवर नेहमीप्रमाणे!”
“अरे मला शरद शिंदे म्हणून एका माणसाचा फोन आला होता. तू दिवसभर बिझी असतोस आणि संपर्क म्हणून तू माझा नंबर सर्वत्र दिला आहेस. मग मी त्यांना म्हणाले की तुझा फ्री टाईम मी तुम्हाला कळवते म्हणून.”

” ठीक आहे. त्यांना सांग आज संध्याकाळी भेटायला या म्हणून.चल आता सेंटरवर जाऊया.” अनघाने कॉल बॅक करून शरद शिंदे यांना संध्याकाळी यायला सांगितले.
अनघा आणि प्रसाद त्यांच्या ‘ सुमेध नेचरोपॅथी अँड फिजिओथेरपी सेंटर फॉर स्पेशल चाइल्ड केअर ‘ येथे पोहोचले. तिथे आज नेहमीपेक्षा बऱ्याच पालकांची गर्दी झालेली होती.
” प्रसाद सर,आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवे आहे.आम्ही खूप दुरून आलो आहोत.”

” हो हो . बसा तुम्ही आत.सर्वांना इथे योग्य मार्गदर्शन मिळेल.आपण आधी एक व्याख्यान घेणार आहोत. त्यानंतर प्रत्येक मुलाची तपासणी होईल आणि त्यानुसार पालक आणि पाल्याचे समुपदेशन केले जाईल, फिजिओथेरपी म्हणजेच व्यायाम दिले जातील. मी जे व्यायाम सांगेल ते मुलांकडून नित्यनेमाने करवून घेणे ही पालकांची जबाबदारी आहे. 
सर्वप्रथम आपल्या सर्वांना मला हे सांगावेसे वाटते की, आपली मुले ही स्पेशल मुले आहेत म्हणजे ती कोणी वेगळी आहेत असे तुम्ही समजूच नका. त्यांना वेगळी ट्रीटमेंट देऊ नका.

त्यांना साऱ्या गोष्टी म्हणजे अगदी दैनंदिन नित्यकर्मापासून ते नातीगोती, मोकळा संवाद,देवाची पूजाअर्चा अगदी मनापासून शिकवा. मान्य आहे की तुम्हाला या स्पेशल मुलांना शिकवताना तारेवरची कसरत होईल, खूप कष्ट सोसावे लागतील, पण हीच तर आपल्यासारख्या पालकांची संयमाची खरी कसोटी आहे.
अजून एक कायम लक्षात ठेवा की, ही मुले म्हणजे आपल्याला देवाने दिलेले एक सुंदर गिफ्ट आहे; कारण गिफ्ट असे कोणालाही मिळत नाही. आपणही कोणीतरी खास आहोत, आपल्यातही काहीतरी करण्याची सचोटी आहे म्हणून तर देवाने या मुलांची देखभाल करण्यासाठी आपल्याला निवडले आहे,असा विश्वास कायम मनात बाळगून यांच्यावर मेहनत करा.

बऱ्याचदा, तुम्ही थकून जाल, तुम्हाला कंटाळा देखील येईल तेव्हा अशा वेळी मुलांच्या आणि तुमच्याही मेंदूला काहीतरी वेगळं खाद्य द्या. एखादा पिक्चर पहा, कुठेतरी मस्त फिरायला जा. हो की नाही?
स्वतःचा आणि मुलाचा आनंद शोधा ,त्याच्याशी एकरूप होऊन त्याची फिजिओथेरपी घ्या.
आणखी एक गोष्ट! आता ही फिजिओथेरपी दिवसातून किती वेळा घ्यायची? तर जास्तीत जास्त वेळा. आता तुम्ही म्हणाल मुलाला आराम हवा की नको? मी म्हणेन फिजीओथेरपी कम ॲक्टिविटीज वर जास्त भर द्या.

ते कसे?तर मी तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा, जर तुम्हाला तुमच्या मुलाला विनासपोर्ट बसवायला शिकवायचे असेल तर तो गमती-जमतीत कसा बसू शकेल याचा तुम्हाला थोडा विचार करावा लावेल. मग तुम्ही त्याला अंघोळीसाठी गोलाकार टबमध्ये बसवा, त्याला त्याच्या डोक्यावर चाळणी धरायला लावा अन् मग त्यातून त्याच्या अंगावर पाणी टाका. म्हणजे बघा असे केल्याने मुलगा दोन्ही हात वर करून चाळण धरेल आणि तो  बॅलेन्स करून बसेल.

म्हणजे त्याची अंघोळही होईल ,बसण्याची फिजीओथेरपी होईल आणि त्याला मजाही येईल. हे मी उदाहरणादाखल सांगितले. अशाप्रकारच्या क्लृप्त्या तुम्ही तुमच्या मुलासाठी शोधून काढू शकता. म्हणजे त्यांची आपण फिजिओथेरपी घेतोय हे त्यांना जाणवणार सुद्धा नाही आणि रोजचे दिनक्रम देखील ते सहजरीत्या शिकू शकतील.”
तेवढ्यात एका पालकांनी एक प्रश्न विचारला,
” सर, माझा एक प्रश्न होता.”
” हो,बोला.”

 “या स्पेशल मुलांचे जसे वय वाढते तसे वजन देखील वाढत जाते. त्यांचे वजन आटोक्यात राहण्यासाठी काही उपाय आहे का?”
” छान प्रश्न विचारला तुम्ही! याचे उत्तर आहे योग्य डायट. मी तुम्हा सर्वांना आज एक पत्रक देणार आहे ज्यामध्ये आपल्या स्पेशल मुलांचे आहाराविषयीचे पथ्य सांगितले आहेत.”
त्यानंतर प्रसाद प्रत्येक मुलाकडे जाऊन, त्याची पाहणी करून योग्य ती फिजिओथेरपी त्याच्या पालकांना समजावून सांगू लागला.
सर्व पालकवर्ग प्रसादच्या मनमोकळ्या स्वभावाने व अनेक बारीक-सारीक गोष्टी त्याने वेळीच स्पष्ट केल्याने खूप प्रभावित झाला होता.

प्रसादची बोलण्याची लकब, व्यक्तिमत्व, प्रत्येक स्पेशल मुलाला वैयक्तिक जवळ जाऊन विचारपूस, खेळीमेळीचे बोलणे, मुले व त्यांच्या पालकांबद्दल असलेली त्याची काळजी, आपुलकी दर्शवत होती. अशा रीतीने त्याचे फिजिओथेरपी सेंटरवरील आजचे सर्व कार्यक्रम पार पडले. प्रसाद व अनघा घरी परतले.
प्रसाद आणि अनघा चहा घेऊन दिवसभराचा थकवा घालवून जरा निवांत झाले. थोड्या वेळातच दारावरील बेल वाजली.
“थांब मी बघते कोण आहे ते!”
अनघाने दार उघडले.

” नमस्कार.”
” नमस्कार.आपण कोण?”
” मी पत्रकार शरद शिंदे. मला प्रसादसरांना भेटायचे होते. मी त्यासाठी तुम्हाला आज सकाळी फोन केला होता.”
” हो हो. या, या.आहेत सर.”
शरद शिंदे आपल्या चॅनल टीमसोबत आत येतात.
” नमस्कार सर,मी पत्रकार शरद शिंदे. तुमच्या स्पेशल व मतिमंद मुलांच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची , खरंतर थोर समाजकार्याची आमच्या न्यूज चॅनलने दखल घेतली आहे. म्हणून  आम्ही तुमचा सन्मान करू इच्छितो.त्यासाठी आमच्या चॅनलवर तुमचा सत्कार सोहळा लाइव्ह ठेवण्याचा आमचा मानस आहे.”

” माफ करा. पण मला माझ्या समाजकार्याचे कौतुक करायचे नाही, तसेही मी इतका मोठासुद्धा नाही. सन्मानसोहळा वगैरे मला काही पटत नाही.”
“खरंच सर तुम्ही ग्रेट आहात! इतर लोक काहीही न करता मी समाजकार्य करतो, अशी खोटी बातमी देऊन उगाचच जाहिरात करून लोकप्रियता वाढवतात. आमच्याकडून सन्मान करवून घेतात. पण तुम्ही मात्र पुर्णतः एक अलौकिक व्यक्तिमत्व आहात! 
आज मी तुमच्या सेंटरला आलो होतो. माझी भाची स्पेशल चाइल्ड आहे.

तुमची या क्षेत्रातील इत्थंभूत माहिती , स्पेशल मुलांबद्दल मनापासून असणारी कळवळ मला आज तुमच्या व्याख्यानातून तीव्रतेने जाणवली. सर तुमच्या या साधेपणापुढे व समाजकार्यापुढे माझे कर आपोआप जुळले जात आहेत, तेव्हा मला तुमचे आशीर्वाद द्या. तुमच्यासारख्या चंदनाचे पावित्र्य असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा परिसस्पर्श माझ्यासारख्या पामराला झाला यातच मला धन्यता मिळाली आहे!”
पत्रकार शरद प्रसादचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकले.
” अहो नाही नाही, असे करू नका!” असे म्हणत प्रसाद, शरद शिंदे यांचे हातात हात घेत म्हणाला ,

“मी कोणी देव नाही हो असे पाया वगैरे पडायला.मला फक्त माझ्यापाशी असलेले ज्ञान लोकांना मिळावे आणि कुठल्याही स्पेशल मुलाची आबाळ न होता, त्याला व त्याच्या पालकांना योग्य मार्गदर्शन, आधार मिळावा असे प्रामाणिकपणे वाटते. कारण मी आणि अनघाने माझ्या सुमेधबाबत आजवर अज्ञानामूळे खूप काही भोगलेले आहे. त्यामुळे मला साधेच राहू द्या.”
शरद शिंदे आणि चॅनल टीममधील  साऱ्यांनी प्रसादला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि म्हंटले,
” सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी ,या पवित्र कार्यासाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा! आमची ही मानवंदना तरी स्वीकार करावी.”

प्रसादने सर्वांच्या विनंतीला मान देत, सगळ्यांचे अभिवादन स्वीकारले आणि तो देखील त्यांना प्रतिसाद देत हात जोडून उभा राहिला. अनघा आपल्या नवऱ्याचे असे कौतुक पाहत हर्षोल्हासित झाली अन् तिनेही प्रसादला मान देत आपले कर जुळवले.
खरच जिथे महान, थोर कार्याचा सुवास दरवळत असतो, तिथे माणसाचे कर आपोआप जुळले जातात याची प्रचिती आज सर्वांनाच आली होती.
© सौ प्रियंका शिंदे बोरुडे
सदर कथा लेखिका सौ. प्रियंका शिंदे बोरुडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!