सासूबाईंचे माहेर

 1. तिची गगन भरारी
 2. डाग
 3. सुख
 4. सत्य
 5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
 6. तडा
 7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
 8. प्रायश्चित्त
 9. उत्तर 
 10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
 11. निलिमा
 12. आपली माणसं
 13. विश्वास
 14. जाणीव
 15. गुलमोहोर
 16. हिऱ्याची अंगठी
 17. सासूबाईंचे माहेर
 18. सवाष्ण

© सौ. प्रभा निपाणे
“आई उद्या प्रदीप येतोय घ्यायला.”
“मग उद्याच निघणार की राहणार आहे?” 
“तो उद्याच निघू म्हणतो.”
“अगं तो भले म्हणेल, पण आपले काम आहे एक दोन दिवस थांबवून घ्यायचे. आपण बहिणी माहेरी जाऊन मस्त पाहुणचार करून  घेतो. पण बिचारे भाऊ, घ्यायला येतात आणि जातात.
आपल्या सासरी त्यांचा पाहुणचार नाहीच.  ते काही नाही, तू त्याला थांबवून घे. फार फार तर परवा जा म्हणावे. त्याला काय काय आवडते ते सांग ? सगळे करू.”

“आई खरच मी खूप भाग्यवान. तुमच्या सारख्या सासूबाई मिळाल्या.”
“शिल्पा ,मला ऐकुलता एक मुलगा. मुलीची खूप हौस पण नाही झाली. दुसरा मुलगा झाला. पण दुर्देवाने त्यालाही आमच्या पासून हिरावून घेतले. आता सौरभ आणि तू, तुम्ही दोघेच. मी तर आधीच ठरवले होते. येणारी सून ही माझी सून नसुन मुलगी असेल. तिचे खूप लाड करू, सगळे हट्ट पुरवू. आई ऐवढे कदाचित नसेल देऊ शकले पण प्रयत्न करते ग!”
“नाही हो आई , खरंच आईपेक्षा पण जास्तच प्रेम दिले. आई, जेव्हा घरात माझ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा तर मी आणि आई वैऱ्या सारख्या भांडलो.”

“का ग?”
“घरी असली की आईच्या तोंडाचा पट्टा चालू. दहा वाजले ? ही उठायची वेळ आहे का ? अग पण याधी मी उठत होते ना तेव्हा तर म्हणायची झोपू द्या हो पोरीला ! सासरी जाऊन सगळ करायचं आहे! नेमक आताच काय घडल? आता तुझे लग्न करायचे आहे. करायचे आहे, झाले नाही ना ! उठली की पुन्हा सुरू, किचन मध्ये ये. जरा शिकून घे जेवण बनवायला.
ओढून ताणून किचन मध्ये घुसवणार. हा पदार्थ आज करून बघ, कधी पोळ्या लाटून बघ.
पीठ मळायला  मला अजिबात आवडत नव्हते. पण ती मुद्दाम पीठ मळायला लावून पोळ्या करायला लावायची. भाकरीचे तर नवीनच.  भाकरीसाठी पाण्याचे आधन घेऊन , ते गरम पाणी मध्ये पिठाचा गोल करून त्यात बरोबर पाणी टाकून पीठ मळायचे. मग पोळपाटावर पिठ टाकून पातळ भाकरी थापायच्या, लाटायच्या नाही. मग ती भाकरी तव्यावर टाकून वरून पाणी लावायचे. ही तारेवरची कसरत. किती वेळा हाताला चटके लागले. पण तिने तिचा हट्ट सोडला नाही. असे घडले की बहिणाबाई ची कविता ऐकवणार.

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर…..आई, पण आता कळते. आई किती पुढचा विचार करते. सासरी गेल्यावर आपल्या मुलीला किमान वरण, भात , भाजी ,पोळी हा साधा स्वयंपाक करता यावा. जेणेकरून सासरी माहेरचा उध्दार होऊ नये. आई, माझ्या ऑफिस मध्ये नवीनच लग्न होऊन एक मुलगी आली. आई, वडील बऱ्यापैकी श्रीमंत. पण ही दिसायला अती सामान्य. त्यामुळे खूप  मुलांनी नकार दिला. आता साधारण घरी पडली. माहेरी सर्व कामाला नोकर. हिला फारसे काही जमत नाही. आता जाता येता म्हणे सासरचे उध्दार करतात. काही वळण लावल नाही पोरीला.
मला रोज काहीना काही विचारत असते. मग घरी जाऊन करते. त्यातही समाधान कमी खोटच जास्त काढतात म्हणे. असच केलं, तसच केलं. मीठच कमी, तिखटच जास्त.”

“शिल्पा तुला असे नाही वाटत आपले बोलता बोलता विषयांतर झाले. प्रदीप येतो आहे, त्याला फोन करून सांग एक दिवस थांबून मग जाऊया.
आम्ही तुमच्या सारखेच दोघे बहिण भाऊ. माझे लग्न झाले तेव्हा आईबाबा पेक्षा तोच जास्त रडत होता. खूप प्रेम होते त्याचे माझ्यावर. आई म्हणायची त्याला तुझ्या सोबत सासरी घेऊन जा बाई. सलमान खानचा एक सिनेमा होता, तो त्याच्या बहिणी सोबत आला होता. अश्विनी भावे त्याची बहीण. खूप प्रेम होते त्याचे त्याच्या बहिणीवर. तुला माहिती आहे का तो सिनेमा? जॅकीश्रॉफ ने अश्विनी भावेच्या नवऱ्याचा रोल केला. “बंधन” असेच काहीसे नाव आहे. तुला आठवते का नाव?”
“नाही हो आई , मलाही नाही आठवत.”

“थांब गूगल वर सर्च करते. अग हो बघ बंधनच आहे ! माझा भाऊ कित्येक वर्ष मला भाऊबिजेला घ्यायला  यायचा. सुनंदा माझी वहिनी ती सुध्दा तुझ्या सासऱ्यांना ओवाळायची. दणक्यात भाऊबीज व्हायची. कधी आम्ही तिकडे, कधी ते इकडे . कधी मी तिचे, कधी तिने माझे माहेरपण केले. आधी भाऊ गेला, दोन वर्षांनी हे गेले आणि आमची भाऊबीज संपली कायमची. आठ वर्ष जास्त झाले या घटनेला.  दिवाळीच्या दोन दिवस आधी भाऊ गेला . सुनंदा काळजावर दगड ठेऊन,आपल्या नवऱ्याच्या आठवणी हृदयाच्या कप्यात ठेऊन यांना ओवाळायची. लगेच दोन वर्षाने हे गेले. आमचे दोघींचे माहेर आहे, भाऊबीज संपली, कायमची. कारण त्या दोघी बहिणी. त्यात एक भारता बाहेर. दोन चार वर्षात कधीतरी भेटतात. म्हणून म्हणते इतके छान नाते बहिण भावाचे टिकवून ठेवा. नशिबाने तुला वहिनी पण चांगली मिळाली.”
“हो आई, माझ्या कडून मी पूर्ण प्रयत्न करेन हे नाते जपायला. आई, चला तुम्ही थोडावेळ आराम करा. फार दगदग झाली. किती फराळाचे केले तुम्ही!”
“चल तू पण पड जरावेळ.”

शिल्पा रूममध्ये गेली. डोक्यात एकच विचार. सासूबाईंचे माहेरपण करायचे. ते सुध्दा माझ्या आईकडे. त्यांना भाऊ नाही. पण बाबा आहेत ना. आता तेच त्यांचे भाऊ. पण आईला कसे तयार करायचे? त्यांच्या नकळत हे व्हायला पाहिजे. प्रदीपला फोन करून सांगते. उद्या तू येऊ नको. बाबांना बोलवू या. तेच बोलतील,  ताई  माहेरी चला. शिल्पाची सासू म्हणून नाही तर माझी बहीण म्हणून. हो असच करू या. बाबांनाच फोन करते.
“हॅलो बाबा!”
“शिल्पा, कशी आहेस बेटा?”
“बाबा, मी खूप सुखात आणि मजेत आहे. बाबा, माझे तुमच्याकडे एक काम होते. आधी प्रॉमिस करा करतो म्हणून.”
“अगं लबाड आधी काम सांग! असेच कसे प्रॉमिस करणार?”

“बाबा काम सोप्पे आहे. हो म्हणा ना हो !”
“बर ! करतो ! सांग काय काम आहे?  दिवाळीला काही स्पेशल गिफ्ट हवे का?”
“नाही ओ बाबा. खूप केले तुम्ही माझे ! आता मी करेन तुमच्यासाठी!”
“अग वेडे ! मुलीकडून काही घ्यायचा रिवाज नाही आमच्यात.”
“बाबा ! हे हो काय ? सारखं काय आमच्यात तुमच्यात करता.”

“बर जाऊ दे बोल काय पाहिजे?”
“भाऊ”
“भाऊ ? अगं काय ते स्पष्ट बोल ना!”
“स्पष्टच बोलते. भाऊ पाहिजे. पण मला नाही.”
“अग बाई इतके कोड्यात बोलू नको. गोंधळून गेलो मी.
“बाबा, उद्या प्रदिपला घ्यायला नका पाठवू!”

“का? तुझे येणे रद्द केले की काय?”
“नाही हो बाबा! “बाबा उद्या तुम्हाला यायला जमेल का?
“हो जमेल की ! पण प्रदिप का नको?”
मग शिल्पा ने सासूबाई सोबत झालेला संवाद सांगितला. “बाबा उद्या तुम्ही घ्यायला या आणि माझ्या सासूबाई उर्फ आई यांना सोबत यायचा आग्रह करा. नुसता आग्रह नाही, तर त्यांना म्हणा तुम्ही येणार नसाल तर मी शिल्पाला सुध्दा नेणार नाही. मग तयार होतील. बाबा खूप प्रेमळ आहेत माझ्या सासूबाई. माझ्या छोट्या छोट्या आनंदाचे क्षण साजरे करतात.  नेहमी असे वाटते, आपण एखाद्या बागेतून एखादे रोपटे आणतो. आणि मग ते आपल्या घरी रुजवतो. लावल्यावर ते कोमेजू नये म्हणून त्याची विशेष काळजी घेतो. जेणेकरून ते चांगले रुजावे. प्रेमाने खतपाणी घालतो. चांगले बहरून यावे म्हणून. तशाच….अगदी तशाच…जपतात बाबा मला आई!बाबा, प्लिज तुम्ही याल ना? ही एक भेट मला द्याल ना?”

“शिल्पा! बाळा खूप अभिमान वाटतो तुझा. मी नक्की येतो.  पण एक नाही दोन बहिणींना घ्यायला.”
“नाही समजले!” 
“तुझ्या सासऱ्यांना कोण ओवळत होते?” 
“सौरभची मामी”
“मग आपण त्यांना पण घेऊन येऊ या. तू विनीतला फोन करून तसे सांग.  त्यांना सुध्दा सरप्राइज.”
“बाबा तुम्ही तर ग्रेटच आहात हो!”

“बाबा कुणाचे?”
“बाबा ! खूप खूप धन्यवाद.”
“शिल्पा ,बाळा अभिमानाने आज माझा माथा उंच झाला. अशीच घरच्यांची काळजी घे. जप ही नाती. येतोय उद्या. तयार राहा.”
सर्वात आधी शिल्पाने विनीतला फोन लावला.
दोघांचे जुजबी बोलणे झाले. मग शिल्पाने त्याला तिचा सगळा प्लॅन सांगितला. शिल्पाच्या कल्पनेचे त्यालाही खूप कौतुक वाटले. त्याने वनिताला म्हणजे त्याच्या बायकोला सांगून आईची बॅग भरून ठेवायला सांगितली.

सासूबाईंना चहा देऊन, त्या मंदिरात गेल्यावर शिल्पाने सासूबाईच्या रूममध्ये जाऊन त्यांची बॅग भरून, बॅग आपल्या रूम मध्ये नेऊन ठेवली.
सासूबाई मंदिरातून आल्यावर  प्रश्नपत्रिका वाचू लागल्या.
“शिल्पा झाली का तयारी? बॅग भरून ठेवली का? प्रदिप थांबणार आहे ना दोन दिवस? त्याला काय आवडते ते विचारले का? काय करायचे आजच ठरवावे लागेल.”
शिल्पाची उत्तर पत्रिका तयार, “आई बॅग भरून ठेवली. त्याला चिकन आवडते, तेच करूया. सुके चिकन.” 
“बर. तो राहणार आहे ना?”

“नाही आई! तो म्हणाला पुढल्या वेळी नक्की राहतो.”
“ बर! आजच सांग काय काय कसे कसे मसाले वापरायचे ते, नाहीतर त्याला आवडायचे नाही.”
“आई तुम्ही करता तसेच करा. वेगळी चव जरा.”
“बर आजच तयारी करून ठेवते. तू काही काळजी करू नको, मी सगळे बघते. तू तुझे सामान नीट घे.” 
किचनमध्ये सगळी तयारी करून सासूबाई पुन्हा शिल्पाला म्हणाल्या, “शिल्पा फराळाचे सगळे डबे भरून घे. आणि हो सगळ्यांना आणलेले गिफ्ट आठवणीने घेऊन जा.

“आई माझी सगळी तयारी झाली. आता तुम्हाला काय मदत करू ते सांगा.”
“माझी सुध्दा सगळी तयारी झाली.”
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गाडी घेऊन शिल्पाचे बाबा दारात.
“भाऊ तुम्ही? प्रदीप येणार होता ना?”
“वेळेवर त्याचे काम निघाले, म्हणून मला यावे लागले. चालेल ना?”
“अहो असे काय म्हणताय? चालेल काय धावेल. लग्न झाल्यापासून आलाच नव्हतात. बंर झाल तुम्ही आलात ते. शिल्पाला उठवते. काल रात्री पर्यंत  काय काय काम चालले होते तिचे. नाहीतर उठते हो सकाळी.”

“ताई खूप भाग्यवान आहे मी तुमच्या सारख्या समजूतदार सासूबाई माझ्या लेकीला मिळाल्या.”
“नाही भाऊ, भाग्यवान तर मी आहे. एक गुणी आणि संस्कारी लेक तुम्ही माझ्या पदरात घातली.”
शिल्पा उठून हॉल मध्ये आली. “बाबा तुम्ही सकाळी सकाळी!”
“प्रदीपला यायला जमले नाही म्हणून मी आलो. लवकर लवकर आवर, जेवून निघू या.”
“भाऊ लगेच निघणार?” 
“ताई निघणार नाही, आपण जाणार आहोत.” 

“तेच ते..निघणार…जाणार.”
“नाही ताई, आपण निघणार आहोत.” 
“म्हणजे ? मला नाही कळले. ताई माझ्यासोबत तुम्ही सुध्दा येणार आहात.” 
“नाही हो ! मला नाही जमणार. शिल्पाला घेऊन जा.”
“ताई तुम्ही येणार नसेल तर यावर्षी पासून शिल्पासुध्दा भाऊबीजेला माहेरी येणार नाही.”
“भाऊ हे काय नवीन?”

“नवीन नाही ,जुनेच आहे ताई. तुम्ही मला भाऊ म्हणता, बरोबर?”
“अहो सुनेच्या वडीलांना भाऊच म्हणतात. तशी परंपरा आहे आपली.”
“आणि जावयाच्या आईला ताई म्हणतात. हा पण रीवाज आहे ना !”
“हो तर ! मी कुठे नाही म्हणाले?
“या रीवाजाप्रमाणेच मी आज तुम्हाला घ्यायला आलोय. ताई लवकर तयारी करा. हा भाऊ तुम्हाला घ्यायला आला आहे.”
“अहो पण माझी काहीच तयारी नाही.”

तेव्हढ्यात शिल्पा किचनमधुन हात पुसत बाहेर आली. “आई, मी कालच तुमची बॅग भरून ठेवली. त्यासाठीच तुम्हाला घाई घाईने चहा करून दिला आणि मंदिरात पाठवले जरा लवकर.”
“अगं पण सौरभला सांगावे लागेल ना?”
“आई त्याला सांगून सगळे ठरवले आहे. तुम्ही आता फक्त यायचे आहे.  परवा तो येईल आपल्याला घ्यायला. चला तुमचे सुके चिकन करायचे बाकी आहे.”
“शिल्पा अग काय हे?”
“आई तुम्ही येणार आहात. आता यात बदल नाही.”

 “शिल्पा , रवी भाऊ खरच तुमचे आभार कसे आणि किती मानू? शब्दच नाहीत.“
“ताई, अहो मलाही दोन भाऊ. बहिणीची उणीव तुम्ही भरून काढणार.  भाग्यवान तर मी आहे 
बहिणीची माया आजवर अनुभवली नाही. पण आज अनुभवतो . मला आवडते म्हणून सुक्या चिकनचा घाट घातला. चला आवरा लवकर. भूक लागली बाबा जोरात.”
हसतच दोघी सासासूना किचन मध्ये गेल्या.  जेवून दुपारी निघाले, ते थेट सासूबाईंच्या माहेरी.
त्यांना गाडीत डोळा लागला. उठल्या तर त्यांचा माहेरचा वाडा बघून आश्चर्य वाटले.

“शिल्पा अग मी झोपेत आहे का अजून? माझ्या माहेरचे घर दिसते हे तर.”
“आई तुम्ही जाग्याच आहात. आपण तुमच्या माहेरीच आलोय. इथे चहापाणी घेऊन,  मामींना सोबत घेऊन आपण बाबांकडे जायला निघणार आहोत.”
“मामींनी घेऊन?”
“हो आई! मामी बाबांना ओवाळायच्या ना?”
“हो!”
“मग त्या सुध्दा या वर्षी पासून बाबांना ओवाळणार.”

“बाई ग!”
“यावर्षी पासून तुमची दोघींची भाऊबीज होणार दरवर्षी.”
“तुझे करावे तितके कौतुक कमीच ग! एक एक सुखद धक्केच देत आहेस बाई!”
“आई नाती जपायची कला मी खरच तुमच्या कडून शिकले. चला उतरा तुमचे माहेर आले.
मामींना यातले काही सांगू नका.”
“बर!”

नणंद बाई, शिल्पा आणि तिचे बाबा बघून सुनंदा ताई गोंधळून गेल्या.
“ताई तुम्ही सगळे, ते सुध्दा अचानक! काही काम आहे का इकडे शिल्पाच्या बाबांचे?”
“ते तर मलाही माहिती नाही ग! शिल्पा म्हणाली आई माझ्या माहेरी जायचे आहे. सुनेची आज्ञा बसले गाडीत. बघते तर गाडी माझ्या माहेरच्या वाड्यात.”
गेल्या गेल्या वनिता ने चहापाणी केले. विनीत पण तेव्हढ्यात घरी आला. 
“झाली का तयारी?” विनीत म्हणाला.
“विनीत, वनिता तुम्ही कुठे चालले आहात?”

“नाही.”
“मग कोण कुठे चालले? का कोड्यात बोलता रे?” सुनंदा मुलांकडे बघून म्हणाली.
शिल्पा मामीजवळ गेली, “मामी कोणी कुठे जात नाही आहे!”
“मग तयारी झाली असे का विचारतो विनीत?”
“मामी तुम्ही आमच्या सोबत येताय माझ्या माहेरी. बाबा ,आईंना आणि तुम्हाला मुद्दाम घ्यायला आले.”
“शिल्पा अगं तू काय बोलते काहीच उमजत नाही बाई. काय ते स्पष्ट बोल.”

“मामी, आई तुम्हा दोघींचे माहेर होते आणि कायम असणार.  पण आठ वर्ष झाली भाऊबीज नाही केली. बरोबर ना?”
“कशी करणार? देवाने दोघींचे पण भाऊ हिरावून घेतले. हे तर अगदी दिवाळीच्या दोन दिवस आधी. तुझ्या सासूबाईची भाऊबीज कायमची संपली. कसेबसे दोन वर्ष मी मुकुंद दादाला ओवळत होते. देवाला तेही बघवले नाही. त्यांना पण आमच्या पासून हिरावून घेतले.” दोघींच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली.
“मामी यावर्षी पासून तुम्ही आणि आई दरवर्षी भाऊबीज साजरी करणार.”
“नाही समजले ग! काय फोटोला ओवाळायचे का?”

“नाही मामी. भावाला.
“शिल्पा तू काय बोलते खरंच काहीच उलगडा होत नाही आहे ग!”
“मामी, तुम्ही आणि आई दोघी पण यावर्षी पासून माझ्या बाबांना ओवाळणार.”
“काय?”
“हो मामी!”
शिल्पाच्या सासूबाईंचां ऊर अभिमानाने भरून आला. त्या आपल्या सुनेचे मनोमन कौतुक करू लागल्या.  आजकालची नवीन पिढी असाही विचार करू शकतात याचेच त्यांना जास्त कौतुक वाटत होते. जिथे सासू सासरे अडगळ वाटतात.  आजकाल मुली लग्न ठरवतांना सांगतात सासू सासरे पाहुणे म्हणून चालतील,  कायमचे नाही . अश्या पिढीमध्ये सून आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करते. त्यांच्या आनंदासाठी प्रयत्न करते. खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे ही.

म्हणतात न पेराल ते उगवते. खरच रवी भाऊ आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली ताई यांनी आपल्या मुलीवर केलेले संस्कार प्रेमाचा वटवृक्ष बनून माझ्या घराला मायेची सावली देत आहे.
“चला झाली का तयारी? निघायचे का?” रवी भाऊच्या आवाजाने सगळे भानावर आले.
“दादा मला कशाला हो? ताईंना घेऊन जा.”
“मामी आता यात बदल नाही. होना विनीत?” शिल्पा म्हणाली.
“येस बहना! तुझी भन्नाट कल्पना मला आणि वनिताला खूप आवडली. ‘सासूबाईंचे माहेर…’
© सौ. प्रभा निपाणे
सदर कथा लेखिका सौ. प्रभा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!