स्वप्न

© अमृता देशपांडे
श्यामली झपझप पावले टाकत चालत होती, नव्हे कुठली तरी अदृश्य शक्ती तिला त्या जुन्या पडक्या वाड्याकडे ओढून नेत होती… उध्वस्त, भग्नावस्थेतील तो वाडा, त्या वाड्याचं ते भव्य सागवानी द्वार! आजही वाड्याच्या श्रीमंतीची ग्वाही देत होतं. आत जागोजागी झाडे-झुडपे वाढलेली, जमिनीवर सर्वत्र पसरलेला जीर्ण पाला-पाचोळा… वाड्याच्या चौकात मध्यभागी भग्नावस्थेतील तुळशी-वृन्दावन, आणि समोरच्या ओसरीत मध्यभागी बसलेली ती भलं-मोठ्ठ कुंकू लावलेली, नववारी पातळ नेसलेली धाय मोकलून रडणारी ती बाई! तिच्या मांडीवर पाच-सहा वर्षाचं निपचिप पडलेलं पोर!

ते दृष्य बघून श्यामलीच्या काळजात चर्र होतं. ती बाई कोण? कुठली तिला काहीच समजत नाही, पण त्या बाईची नजर श्यामलीवर
पडताच त्या बाईचे डोळे आग ओकू लागतात. बघता-बघता तिथे त्या बाईप्रमाणेच इतर अनेक बाया मांडीवर निपचिप पडलेल्या पोरांना घेऊन धाय मोकलून रडत बसलेल्या दिसतात. पाठिमागून मोठमोठ्याने हसण्याचे पुरुषी आवाज येऊ लागतात. त्या बायांच्या रडण्याचा नि त्या पुरुषांच्या हसण्याचा जो काही विचित्र कोलाहल माजतो, तो वातावरणाला अधिकच भेसूर, भयावह करून सोडतो. आता
श्यामली तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागते, मात्र तिला पाय उचलताच येत नाहीत. तिचे पाय जणू जमिनीला खिळून जातात.

हळूहळू त्या बाया उठून मांडिवरच्या पोरांना घेऊन श्यामलीच्या दिशेने सरकू लागतात. श्यामली, ‘नाही, नाही’ करत किंचाळत उठते. हळूहळू भानावर येते. ती तिच्या घरी, तिच्या बेडरूमध्ये असते. तिचं शरीर घामाने थबथबलेलं होतं. तिच्या आवाजाने बाजूला झोपलेला तिचा नवरा शुभंकर उठतो, तिला पाणी प्यायला देऊन शांत करतो. ‘परत तेच स्वप्न बघितलंस का?’ शुभंकर
‘हो रे, आज सलग आठव्यांदा मला तेच, जसंच्या तसं स्वप्न पडलंय… काय असेल रे हे? माझ्या मनाचे खेळ? कि अजून काही? तो पडका वाडा कुठला? त्या बाया कोण-कुठल्या मला काहीच कळत नाही…’ श्यामली काकुळतीला येऊन बोलते.

‘बरं, काळजी नको करू, आपण उद्याच मनसोपचार तज्ञांकडे जाऊ. आता झोप शांतपणे…’ श्यामलीची समजून काढून शुभंकर तिला कुशीत घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करू लागला. दोघांच्या पलंगाशेजारील पाळण्यात त्यांचा लहानगा 2 महिन्याचा आरुष शांत निजलेला होता.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
त्या मोठ्याशा कॉन्फरन्स हॉलमध्ये भारतातील आणि भारताबाहेरील अनेक जगप्रसिद्ध आणि बुध्दिमान मानसोपचार तज्ज्ञांची सभा सुरु होती, विषय होता “स्वप्न!’ गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील अनेक शहरांतील स्त्रियांना, विशेषत: लहान बाळ असलेल्या मातांना थोड्याफार फरकाने त्या पडक्या वाड्यातील ते विचित्र स्वप्न वारंवार पडत होते.

काही तज्ज्ञांच्या मते हे केवळ असंबद्ध स्वप्न होते, काहिना तो त्यांच्या मनाचा खेळ वाटत होता, तर काहिना त्या स्वप्नात गूढ संकेत दडल्यासारखे जाणवत होते. परंतु काही केल्या त्यांच्यात एकमत होत नव्हते. बरं ज्या स्त्रियांना हि स्वप्ने पडत होती, त्यांचा एकमेकींशी काहीही संबंध नव्हता, कोणीही एकमेकाना ओळखत देखील नव्हते. तो पडिक वाडा, त्या वाड्यातील त्या स्त्रिया, त्यांच्या
मांडीवरील मुले यांनाही कुणी ओळखणारं नव्हते… मग या सगळ्यांना ही एकसारखी स्वप्नं, तीही वारंवार का पडावी हे कोडंच होतं. डॉ. निरंजन पारेख हे त्यांच्यातील बरेच वरिष्ठ आणि बुद्धिमान मानसोपचार तज्ज्ञ होते.

त्यांचा स्वप्न आणिस्वप्नातील सांकेतिक विज्ञान यावर गाढा अभ्यास होता. त्यांचा अदृष्य दैवी किंवा अमानवी शक्तींवर देखिल
विश्वास होता. या शक्ती माणसाला स्वप्नात येऊन काही विशिष्ट संकेत देऊ शकतात, असे त्यांचे मत होते. अर्थात त्यांच्या या मतावर कोणाचा फारसा विश्वास नव्हता. त्यांच्या मनात एक विचार चमकला. आणि त्यांनी तो सर्वांसमक्ष मांडला. त्या विशेष स्वप्न पडणा-या स्त्रियांमधे कोणतातरी एक समान धागा मिळतो का, याचा अभ्यास केला जावा असे त्यांचे मत होते. इतरांचा त्यांच्या मतांवर विश्वास नसला तरी त्याही
दिशेने प्रयत्न करून बघावा यासाठी त्या महिलांसोबत एक विशेष बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
………………………………………………………………………………………………………………………………………………

बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीची कसून चौकशी, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्ती, घटना नोंदवल्या गेल्या. सगळ्यांचा डेटा एकत्र केल्यावर असे लक्षात आले कि या स्त्रियांच्या मुलांचे कुठल्या ना कुठल्या अवयवाचे प्रत्यारोपण केले गेले आहे. कुणाचे किडनी प्रत्यारोपण तर कुणाचे हृदय प्रत्यारोपण, कुणाचे यकृत प्रत्यारोपण तर कुणाचे नेत्र प्रत्यारोपण… हा सगळा डेटा बघितल्यावर डॉ. पारेख उत्साहित झाले. मग हे प्रत्यारोपण कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले याचा शोध घेतल्या गेला. तिथे मात्र त्यांची निराशा झाली. कारण हे प्रत्यारोपण देशातील वेगवेगळ्या दवाखान्यात, काहिंचे तर विदेशात केले गेले होते.

ज्यांचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारे संबंध नव्हता. डॉ. पारेख पुन्हा विचार करू लागले. यावेळी त्यांनी त्यांच्या मदतीला त्यांची सेक्रेटरी निशाला घेतले.
‘निशा, या केसमध्ये काहीतरी महत्वाचं माझ्या नजरेतून सुटतंय असं सारखं वाटतंय गं! पण काय ते नक्की समजत नाही..’ हातांची अस्वस्थ हालचाल करत डॉ. पारेख म्हणाले.
‘सर, एक सुचवू का?’ निशा. डॉ. पारेखांनी खुणेनेच होकार दिला.
‘सर, या सगळ्या स्त्रियांच्या स्वप्नातला एक महत्वाचा दुवा आपण मिस करतोय…’ डॉ. पारेख प्रश्नार्थक नजरेने निशाकडे पाहू लागले.

‘सर, तो वाडा! ज्याचं वर्णन सगळ्या स्त्रियांनी जवळपास एकसारखं केलंय…’ निशा लगेच उत्तरली.
‘अगदी बरोबर! गुड निशा, गुड! पण एवढ्या विशाल देशात तो जुनाट वाडा शोधायचा कसा?”
‘त्याची काळजी मी घेईन…’ डॉ, पारेखांना मध्येच तोडत निशा पुढे म्हणाली, ‘सर, माझी एक मैत्रिण स्केच आर्टिस्ट आहे. ती तोंडी वर्णनावरून हुबेहुब चित्र काढते. एकदा चित्र समोर असल्यावर वाडा शोधणे कठिण नाही…’
‘य्येस्स! दॅट्स ग्रेट!” निशाच्या बोलण्याने डॉ. पारेखांनाही उमेद आली.
……………………………………………………………………………………………………………………………………………….

दुसर्याच दिवशी श्यामलीला बोलवून त्या स्केच आर्टिस्ट मार्फत त्या पडक्या वाड्याचे चित्र काढले गेले. त्याचप्रमाणे त्या स्वप्नातील बायांचेही चित्र काढण्यात आले. देशभरातल्या त्या स्वप्नाने पीडित पेशंटना पाठवण्यात आले. डॉ. पारेखांच्या अंदाजाप्रमाणे सगळ्यांना दिसणारा वाडा आणि वाड्यातील बाया सारख्याच होत्या. आता त्यांच्यापुढे प्रश्न होता, तो म्हणजे हा वाडा कुठला हे शोधून काढणे. डॉ.पारेखांची एक मैत्रिण पुरातत्व विभागात अभ्यास करणारी होती. तिला ते चित्र दाखवताच तिने सांगितले कि हा वाडा मराठा राजवटीतला वाटतोय, परंतु त्यातील बायकांची ठेवण मात्र कानडी पद्धतीची वाटत होती.

त्यावरून हा वाडा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या भागातील असावा असा अंदाज बांधून तपास सुरु करण्यात आला. डॉ. पारेखांचे स्नेही इंस्पेक्टर जगतापांनीही तपासकार्यात मदत करण्याची तयारी दाखवल्याने काम सोपे झाले.
तपासकार्य युद्धपातळीवर सुरु होतं. आणि एक दिवस सकाळी इंस्पेक्टर जगतापांच्या फोनवर पोलिसी खब-याचा फोन आला. जगतापांनी लगोलग डॉ. पारेखांना बेळगावला जाण्याची तयारी करण्याच्या सुचना दिल्या. पोलिसी खब-याने त्या चित्रातील एका बाईला बेळगावात एका मंदिरात भीक मागताना पाहिले होते.

दुस-याच दिवशी डॉ.पारेख, इंस्पेक्टर जगताप आणि श्यामली बेळगावात दाखल झाले. खब-याने संगितलेल्या मंदिरात अपेक्षेप्रमाणे ती बाई दिसली. तिला बघताच श्यामलीच्या भावना उचंबळून आल्या. ती त्या बाईच्या दिशेने जाणार इतक्यात इंस्पेक्टर जगतापांनी तिला थांबवले.
‘अहो जगताप, चला ना. आपल्याला त्या बाईची चौकशी करायला हवी?’ डॉ. पारेखही उतावीळपणे म्हणाले.
“अहो डॉक्टर, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जाऊन विचारणार आणि ती बया खरं काय ते सांगणार? इतकं सोपं नाही ते. या लोकांची टोळी असते. आणि यांचा म्होरक्या इथंच यांच्या आजूबाजूला घुटमळत यांच्यावर पाळत ठेवून असतो…” इंस्पेक्टर जगताप

‘मग आपल्याला सत्य कसं समजणार?’ श्यामली अधीरतेने म्हणाली
‘समजेल, समजेल, त्यासाठी आपल्याला यांचा माग काढावा लागेल…’ इंस्पेक्टर जगताप दोघांनाही समजावत म्हणाले.
त्यानंतर डॉ. पारेख, इंस्पेक्टर जगताप आणि श्यामलीने मिळून एक प्लॅन बनवला; त्यानुसार श्यामली त्या आणि तिथल्या सगळ्या भिकारणींना एक एन.जी.ओ.ची कार्यकर्ती म्हणून भेटून तिचा माग काढणार होती.
तिला संशय येऊ नये म्हणून तिथल्या सगळ्या भिका-यांची त्यांनी चौकशी केली. डॉ. पारेख त्यांचे हेल्थ चेकअप करतील असेही सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सगळ्यांना फूड पॅकेट्स पुरवले.

तरीही कुणी जास्त बोलत नाही हे बघुन शेवटी श्यामलीने शंभराची नोट पुढे केली. पैसे पाहताच एक बाई बोलायला तयार झाली…
तिने श्यामलीला खुणेनेच मंदिरापाठीमागच्या स्वच्छतागृहात चलण्याविषयी खुणावले. त्यानुसार आधी श्यामली आणि पाच-सात मिनिटांनी ती बाई तिकडे भेटल्या. त्या बाईने थोडक्यात तिला सांगितले, की त्या घरातून काढून टाकलेल्या, बेवारस, वेश्यावस्तीत काम केलेल्या बायका आहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलांना गुंडांच्या टोळीनी खाऊ-पिऊ घालण्याच्या, निवारा देण्याच्या आमिषाने एका पडक्या वाड्यात डांबून ठेवले आहे.

ते लोक यांना जबरदस्तीने इथे भीक मागायला लावतात. यांच्या मुलांनाही मजुरीला पाठवतात. यांना मिळालेली सगळी भीक, मुलांची मजुरी ते ठेवतात, त्याबदल्यात अगदी तुटपुंजे आणि खराब अन्न खायला आणि फाटके कपडे घालायला देतात. कोणी यांचा विरोध केला किंवा भीक कमी मिळाली तर त्यांना खूप मारतात. हे लोक जिथे भीक मागतात, तिथे त्यांचा माणूस यांच्यावर पाळत ठेवून असतो. त्यांनी यांना बजावलेले असते कि कोणी खायचे पदार्थ, वस्तु दिल्यास घ्यायचे नाही, फक्त पैसेच मिळाले पाहिजे… श्यामलीने त्यांना पडक्या वाड्याचा पत्ता विचारला तर तिने माहित नाही असे सांगितले, कारण त्यांना डोळ्याला पट्टी बांधून ट्रकमध्ये डांबून इथे आणले व परत नेले जाते.

मला वाटलच! या लोकांचा पाठलाग करूनच आपल्याला यांच्या पत्त्यावर पोहोचावं लागेल…’ इंस्पेक्टर जगताप सगळ्या गोष्टी ऐकल्यावर उत्तरले. पोलिसांनी अखेर त्यांचा पाठलाग करून तो पडका वाडा गाठलाच! तिथल्या गुडांना बेसावध अवस्थेत पकडून नेले, नंतर तिथे श्यामली आणि डॉ. पारेख पोहोचले. आपल्या स्वप्नातला पडका वाडा प्रत्यक्षात पाहून श्यामली दचकली. आत त्याच बाया, त्यांच्या मांडिवरील मुलांना पाहून घाबरली.
डॉ. पारेखांनी तिला धीर दिला. त्या बायांनी त्यांच्या मुलांच्या शरीरावरील ऑपरेशनच्या खुणा दाखवल्या. वाड्याच्या मध्यभागी खणण्यास सांगितले, तिथे खणले असता अनेक मुलांचे सांगाडे सापडले.

मग त्या गुंडांना पोलिसी खाक्या दाखवून बोलतं केलं. त्यांनी सांगितले की, ते लोक अनेक वर्षांपासून राज्यभरातील बेवारस बायका मुलांना पकडून इथे आणतात. बायांना भीक मागायला लावतात, तर मुलांना मजुरीला. बरीच वर्ष यांनी हा धंदा चालवला.
‘तीन चार वर्षांपूर्वी आम्हाला अवयव विक्री धंद्याबद्दल समजलं. या धंद्यात प्रचंड पैसा होता, एकेका अवयवाचे लाखो रुपये मिळत. मग यांनी राज्यातील काही बड्या डॉक्टरांशी संगनमत करून हाही धंदा केला. या बायांच्या नकळत यांच्या मुलांचे किडनी, हृदय, यकृत काढून आम्ही विकू लागलो… ‘ त्या टोळीचा म्होरक्या उत्तरला.

‘जिवंत, चालत्या-बोलत्या माणसांचं शरीर म्हणजे काय खेळणं वाटलं काय रे तुम्हाला, कि एकाचं काढून विकलं आणि दुस-याला बसवलं?’ इंस्पेक्टर जगताप ओरडले.
‘हा प्रश्न या अडाणी माणसाला विचारण्यापेक्षा स्वत: ला उच्च विद्या विभूषित म्हणवणा-या डॉक्टरांना विचारायला पाहिजे ना इंस्पेक्टर साहेब…’ श्यामली
‘नक्कीच, त्यांच्यापर्यंतही आम्ही लवकरात लवकर पोहोचू, आणि त्यांनाही जास्तीत जास्त शिक्षा होईल याची काळजी घेऊ…’ इंस्पेक्टर जगतापांनी आश्वासन दिले.

‘पण तरीही… यासगळ्याचे संकेत तुम्हाला स्वप्नात दिसण्यामागचे कारण अजुन समजले नाहीच!’ डॉ. पारेख विचारात बुडत बोलले.
‘डॉक्टर साहेब, माझा मानसशास्त्राचा विशेष अभ्यास नसला तरी एका आईचे मन मी समजू शकते. माझ्या आरुषचे हृदय कमकुवत आहे, हे डॉक्टरांनी सांगितल्यावर माझ्या मनाला काय यातना झाल्या हे माझे मला माहित. माझ्या मुलाला बरं करण्यासाठी मी कितीही पैसा खर्च करायला तयार झाली असली, तरी एका दुस-या आईपासून तिचं बाळ हिरावून मला माझ्या बाळाला बरं नव्हतं करायचं… कदाचित त्या आईच्या हृदयातील आक्रोश ती त्या स्वप्नामार्फत माझ्यापर्यंत पोहोचवत असेल…’

यानंतर श्यामली त्या बायांना हात जोडून म्हणाली,’मला माफ करा. तुमच्यासारखीच मीही एक आई आहे. आणि एक आई म्हणून तुमचे दु:ख मी समजू शकते. पण माझ्या मुलाला बरं करण्यासाठी मी जो पैसा ओतला, तो घेऊन डॉक्टर अश्या मार्गाने माझ्या मुलाचा जीव वाचवतील हे माहित असते, तर मी हे घडू दिले नसते. जे झाले ते तर मी बदलू शकत नाही. पण इथून पुढे मी अवयव प्रत्यरोपण करू इच्छिणा-या लोकांमध्ये कायदेशीर प्रत्यारोपणाविषयी जागरूकता पसरविण्याचे काम करीन’
© अमृता देशपांडे
सदर कथा लेखिकाअमृता देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!