हिऱ्याची अंगठी

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

© वर्षा कुमठेकर.
आज रविवार असल्यामुळे रत्नमणी बंगल्यात रतन शेठच्या मुली आणि  मैत्रिणी, यांचा केव्हापासून दंगा चालू होता.
हल्ली हे नित्याचे झाले होते.
बराच वेळ झाला, मुले खेळण्यात मग्न होती, रतन शेठची वीस वर्षाची मोठी मुलगी सोना, चौदा वर्षाची रूपा आणि आठ वर्षाची हीरा. या बहिणींबरोबर शेजारच्या बंगल्यातील रूपाच्या वर्गातील तिच्या दोन मैत्रिणी टीना आणि बिना आणि ड्रायव्हर भोलाची हिराच्या बरोबरीची दोन भावंडे असा मित्रपरिवार होता.
अंगणातल्या बागेतील झोपाळ्यावर, मुलींची दादी सगळ्यात छोट्या चार वर्षाच्या जवाहरला आपल्या मांडीवर घेऊन त्याला खेळ दाखवत  बसली होती.

पण आज दादीचे लक्ष मात्र घरातल्या सर्वात मोठ्या आणि गुणी नाती कडे होते. खरोखरच त्या घरातली मोठी मुलगी सोना ही  खूपच गुणी  होती.
लहानपणापासून घरात एवढे वैभव असून सुद्धा, सोना अगदी साधी राहत असे. अतिशय रूपवान आणि अभ्यासात सुद्धा खूप हुशार असलेली सोना तिला कशाचाच गर्व नव्हता आणि ह्या  तिच्या विशेष सदगुणामुळे, रतन शेठच्या बडोद्याच्या मित्रांनी आपल्या मुला करता तिला चक्क मागणी घातली होती. कारण मुलगाही, असाच हुशार शिकलेला आणि रूपानेही तिला शोभणारा असा उत्तम होता.     

लग्न एका वर्षानंतर होणार होते पण साखरपुडा मात्र दिवाळीत होता. आणि म्हणून दादी आपल्या ह्या लाडक्या नाती कडे डोळे भरून पाहत होती आणि मध्येच तिचे डोळेही भरून येत होते.
तिला वाटायचे एक वर्ष काय रंगीबेरंगी साबणाच्या फुग्यासारखे भुरभुर उडून जाईल आणि ही माझी लाडकी लग्न करून सासरी जाईल आता तिला डोळे भरून पाहावे ,वर्षभर तिचे लाड करावेत आणि जमेल तेवढे तिला खुश ठेवावे ,असे दादिला सारखे वाटायचे. अखेर नातवंड म्हणजे दुधावरची सायच ना! ‌   
मध्ये मध्ये मुलींची आई मणी बेन आणि भोलाची बायको पारुल या सुद्धा हातातले काम सोडून थोडीशी विश्रांती घेण्यासाठी बाहेरच्या बाकावर पाच मिनिटे बसत होत्या आणि मुलींचे कौतुक करत होत्या

मुलींचं हसणं खिदळणं पाहून मणीबेनला पण वाटत होते किती छान आणि आनंदी असतं मुलींचं आई-वडिलांच्या घरचं आयुष्यं ! किती मोकळेपणाने सोना बागडते आहे .
माहेरच्या बागेत फुलणारी ही कळी अजून उमलली पण  नाही तोवरच दुसऱ्या बागेची शोभा वाढवायला चालली, तिचं फुलणं एक आई म्हणून आपण पाहूच शकणार नाही.
मध्येच जवाहरला पाणी हवे होते म्हणून दादिला बरोबर घेऊन तो किचनमध्ये गेला .
परत दोघे बाहेर येऊन झोपाळ्यावर बसली.

आत्ता सूर्य मावळतीकडे झुकत  होता.
थोड्याच वेळात अंधार होईल तोपर्यंत शेठजी जेवायला घरी येतील, त्यांना सूर्यास्तानंतर थोड्या वेळातच जेवायला लागत असे.
एकाएकी आपल्या ओढणीशी चाळा करत, अतिशय रडक्या चेहऱ्याने सोना दादिच्या  समोर उभी राहिली.
ते पाहून दादिला एकदम तिची काळजी वाटली, काय ग बेटा काय होत आहे तुला? दादिने तिचा हात प्रेमभराने हातात घेत विचारले.
दादीजी. पप्पांनी मला मागच्या महिन्यात केलेली अंगठी कुठेतरी हरवली आहे बहुतेक खेळता खेळता.

अगदी किंमती हिरा वापरून, अतिशय सुंदर घडवलेली अंगठी, मी लग्नाआधी मला नको म्हणून म्हणत असताना त्यांनी मला प्रेमाने आणि थोडी सक्ती करून घालायला लावली होती. म्हणाले आता तुझं शिक्षण संपलं आहे तू काही फार बाहेर फिरणार नाहीस आणि अचानक तुझ्या सासरची माणसे आली तर त्यांच्या श्रीमंतीला शोभेल असा हा सुंदर दागिना तुझ्या हातात हवाच. तेवढ्यासाठी मी, हा मूल्यवान हिरा दुबई वरून मागून घेऊन तुला अंगठी बनवली.

दादी म्हणाली अग तू नक्की घातली होतीस का तुझ्या बोटात ती अंगठी? कारण कधी कधी तू  ती काढून पण ठेवत असतेस ना तशी तू काढून ठेवली आहेस का ? तुझ्या रूममध्ये जावून तुझ्या ज्वेलरी बॉक्स मधे बघुन ये बरं.
नाही  दादीजी , ती माझ्या बोटातच होती नक्की आठवते आहे मला, आता तर सोनाला रडू आवरेना. आता थोड्यावेळाने पप्पा जी जेवायला घरी येतील तेव्हा काय सांगायचं?
अगं बेटा घाबरू नकोस. अजून उजेड आहे आणि बागेतच पडली आहे ना अंगठी? तू आणि सर्व मुलं शोधायला सुरुवात करा पाहू  लगेच सापडेल. दादी ने तिची समजून घातली.

तेवढ्यात सर्व मुलेही तिच्या भोवती जमली होती त्यांनी हे ऐकले आणि  सर्वजण म्हणाली चला चला दिदीची अंगठी आपण शोधूया, आणि मुले जिथे तिथे अंगठी शोधू लागली.
बाग मोठी होती, त्यात बरीच मोठी झाडे आणि छोटी फुलझाडे होती. मध्ये मध्ये बाक होते. छोटे छोटे सुंदर दिवे जमिनीत होते शेजारी  देखणे कारंजे होते. सगळी मुले उत्साहाने दिदीची अंगठी शोधत होती.
दादी मात्र सगळ्या मुलांच्या मध्ये फक्त रूपा वर लक्ष ठेवून होती. कारण पप्पांनी एवढी सुंदर आणि महागडी अंगठी फक्त दिदीला दिली मला का नाही म्हणून ती मम्मी बरोबर खूप भांडली होती, आणि पप्पा बरोबर पण थोडासा हट्टीपणाने वाद घातला होता.

एवढेच नाही तर दिदी कडे सुद्धा ,मला शाळेत जाताना एक दिवस तरी अंगठी घालायला दे म्हणून, हट्ट केला होता पण मम्मीने त्याला नकार दिला होता.
‌रुपा ही लहानपणापासूनच थोडीशी तापट, थोडी बिनधास्त आणि आपल्याला हवे ते मिळवणारी आणि सर्वांवर आपला अधिकार चालला पाहिजे, असा तिचा अट्टाहास असे.
एवढ्यातच  गेटमधून पप्पांची गाडी आत आली आणि सगळी मुले मुकाट्याने गुपचूप दादिजवळ उभी राहिली, कारण दादिने सगळ्यांना स्पष्ट बजावले होते की पप्पा आल्यावर त्यांना काय सांगायचे ते मी सांगेन, तुम्ही चूप बसायचे. कारण इतका शोध घेऊन सुद्धा अंगठी मात्र कोणालाच  सापडली नव्हती.

खरे तर अंगठी हरवलेले मम्मीला कळले तेव्हाच तिला पण काळजी वाटली होती की ही भोलू ची दोन मुले, आणि रूपाच्या मैत्रिणी, यापैकी कोणाला जरी ती सापडली तर ही मुले प्रामाणिकपणे ती अंगठी देतील का? कारण आज-काल गरिबांवर आणि अगदी श्रीमंतांवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही.
इतका वेळ सगळी अंगठी शोधत असूनही कुठेच दिसली नाही तेव्हा ती कोणाला तरी सापडली असणार असंही असू शकेल. पण कोणाची झडती घेणं अथवा त्यांची चौकशी करणे हे पण प्रचंड चुकीचं ठरेल. आणि तिला दुसरीकडे नवऱ्याच्या रागाची पण भीती वाटत होती तो तितका शांत होता तेवढा रागावला की दुर्वास ऋषींचा अवतार घेत असे.

एवढ्यात गाडीतून उतरून पप्पा आपल्याबरोबर आणलेले चॉकलेटचे पॅकेट सगळ्या मुलांसमोर धरत म्हणाले अरे वा वा आज मी तुम्ही शहाण्या सारखे वागलात तर चॉकलेट देणार होतो, हे तुम्हाला कळले की काय म्हणून मी आल्यावर लगेच सर्वजण शहाण्या मुलासारखे शांत बसला आहात?
तरीही दोन मिनिटे कोणीच काही बोलले नाही मग मात्र दादिने वेळ न घालवता अंगठी हरवल्याचे त्यांना सांगितले.
पप्पांनी ते शांतपणे ऐकून घेतले आणि सर्व मुलांच्या डोळ्यात खोलवर पहात एक नजर फिरवली.

खरे तर हा गलका एकूण भोलू पण आपले काम सोडून आला होता भोलू आणि पारुल ‌ मनातून खूप घाबरले होते चार चौघांच्या देखत त्यांना आपल्या दोन गोजिरवाण्या आणि गुणी लेकरांना विचारता सुद्धा येत नव्हते की तुम्ही अंगठी नाही ना घेतली म्हणून पण मुलांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता गरीब असले तरी आपली मुले चोर नाहीत आणि मिळाली अंगठी तर ती मालकाला दिल्याशिवाय राहणार नाहीत ही त्यांना खात्री होती म्हणून ती दोघे स्तब्ध उभी होती.
सर्वांना भीतीने घेतले होते. असे वाटत होते पप्पांचा रागाचा गडगडाटी वर्षाव. केव्हा होईल?

पण तसे काहीच झाले नाही. फक्त पप्पांनी आपल्या भेदक नजरेने सर्व मुलां कडे दोन-तीन वेळा दृष्टी फिरवली. जणू काही त्यांच्या डोळ्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला होता आणि त्यामुळे त्यांना काहीतरी कळले होते.
मग शांतपणे त्यांनी दादीला पारुल, सोना आणि मणी बेनना घरात आत जाऊन बसायला सांगितले. आणि म्हणाले  ,दोन मिनिटात अंगठी मिळेल तुम्ही कसलीही काळजी करू नका.
आणि अत्यंत खेळकरपणे त्यांनी सर्व मुलांना सांगितले, आत्ता आपण एक मस्त छोटासा गेम खेळू.

माझ्या पाठीशी तुम्ही सर्वजण उभे रहा. मी पुढे डोळे मिटून घेईन, माझे दोन्ही हात मागे आहेत, प्रत्येकाने माझ्या एका हातात बागेतले एक फुल पान किंवा छोटा दगड किंवा काहीतरी तुम्हाला जे सुचेल ते द्यायचे आणि दुसऱ्या हाताने टाळी द्यायची, आणि पलीकडे बाकावर जाऊन चुपचाप बसायचे.
कोणीही काही बोलायचे नाही कोणीही कुणाला काही विचारायचे नाही की तू काय देणार मी काय दिले एकदम चूप बसायचे सर्वांनी. आता अंधार पडला आहे पण मी लाईट लावणार नाही जा दोन मिनिटात तुम्हाला काय आठवेल ती गिफ्ट माझ्यासाठी घेऊन या  आता एक दोन तीन म्हणेन. तुम्ही एकेकांनी यायचे .

काहीतरी भयानक होईल असे वाटणाऱ्या सर्व मुलांना या छानशा  गेम ची खूप गंमत वाटली. खरे तर रूपा आणि तिच्या मैत्रिणी फारशा लहान नव्हत्या त्या चांगल्या कळत्या आणि हुशार होत्या पण हे असे का हा विचार रूपाच्या मैत्रिणींनी केला नाही आणि हिरा आणि भोलूची मुले तर खूपच लहान होती त्यामुळे त्यांना तर हा गेम खूप आवडला
फुल पांन दगड , घेता घेता पप्पांच्या हातात अलगद अंगठी पडली आणि ती त्यांनी खिशात घातली. त्या हाताने टाळी मात्र दिली नाही दुसऱ्या हातावर.
पाहता पाहता, तो छोटासा गेम पटकन संपला. मुलांनी दिलेल्या गिफ्ट लगेच शेठजी आपल्या खिशात ठेवत होते.

खूप छान आता तुम्ही सर्वजण आत जा. चॉकलेट खा. मी पण थोडा वेळ अंगठी शोधतो. मुलांनो तुम्हाला माहिती आहे का, देव मला नक्की अंगठी देईल मिळवुन ,चला पळा आत असे म्हणून शेठजी इकडे तिकडे खाली वाकले बाक वगैरे हलवला आणि दोन मिनिटात हॉलमध्ये येऊन खिशातली अंगठी काढून म्हणाले हे पहा अंगठी मला मिळाली मी म्हणालो होतो ना देव बाप्पा मला अंगठी मिळवायला मदत करेल देवाने मला अंगठी दिली.
इतका वेळ भयंकर टेन्शनमध्ये असलेली सर्वजण एकदम रिलॅक्स झाली.
भोलू आणि पारुल चे पण टेन्शन गेले. ती दोघे आणि रूपाच्या मैत्रिणी आपापल्या घरी गेली.

रात्री सर्वांनी डिनर घेतले काहीच न बोलता. आणि प्रत्येक जण आपापल्या बेडरूम मध्ये झोपायला गेली.
‌मम्मी आणि दादी किचन आवरे पर्यंत शेठजी त्यांच्या माडीवरच्या बेडरूम मध्ये जप करत बसले..
एवढ्यात दारावर टकटक  झाले, आणि वाऱ्याच्या वेगाने आत येऊन आपल्या पित्याचे पाय रूपा ‌ने घट्ट पकडले.
पप्पा मला माफ करा, ती अंगठी मला सापडली होती आणि ती मी माझ्या खिशात लपवून ठेवली होती, हे तुम्हाला कळून चुकले होते. पण तुम्ही दाखवून दिले नाही. डोळे मिटून तुम्ही असा गेम खेळला. तुम्हाला, मला चोर म्हणून, सांगण्यात, कमीपणा वाटला ना?

मला माणसं ओळखता येतात बेटा. मी सर्वांकडे परत परत पाहत होतो तेव्हा तू माझी नजर चुकवत होतीस . कावरीबावरी पण झालेली होतीस आणि तुझ्या पॅंन्टच्या खिशात हात घालून तू चाळा करत होतीस.
पण मग तुम्ही सर्वांच्या देखत मला काहीच कसे बोलला नाहीत ? रूपाने विचारले. मला तर वाटले तुम्ही सर्वांची झडती घेणार., आणि माझ्या खिशातली अंगठी तुम्हाला मिळाली की तुम्ही माझ्यावर रागावणार.
मला हेच तर करायचे नव्हते बेटा. कारण माझा अंदाज होता अंगठी तुला सापडली असेल असा, पण तुझ्याकडे नसली आणि दुसऱ्या कुणालाही मिळाली असली आणि त्याने ती त्याच्याजवळ ठेवली असली, तरीसुद्धा मी झडती घेतली नसती  बाळा.

तुम्ही सर्वच जण अजून लहान आहात. तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं आहे. अंगठी जरी दोन लाखाची किमती असली, तरी  तुमच्या दोघी बहिणी ऐवजी इतरांना मिळाली असती तर केव्हातरी त्यांची चोरी उघडकीस आली असती. आणि तेच मला नको होतं.
तू काय किंवा इतर कोणीही, त्याला जगाने चोर म्हणून हिणवले असते आणि बालवयातच त्याचे, सर्व आयुष्य करपून गेले असते तेही नकळत केलेल्या चुकीमुळे याचा अंगठी हरवण्यापेक्षा कितीतरी पटीने मला त्रास झाला असता.

दोन लाख रुपयाच्या अंगठी पेक्षा, लाख मोलाच्या संस्काराची, संपत्ती मोठी आहे. झालेली गोष्ट विसर आणि शांतपणे जाऊन झोप.
तुमच्या इतकं ग्रेट या जगात कोणी नाही.
आय लव यू पप्पा असे म्हणून, आनंदाने आणि समाधानाने रूपा खोली बाहेर पडली.
© वर्षा कुमठेकर.
सदर कथा लेखिका वर्षा कुमठेकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!