© मोनिका कटारनवरे
आज सरदारांच्या बंगल्यावर, डोहाळ्याच्या जेवण कार्यक्रमाची तयारी चालली होती. पाहुण्यांची वर्दळ होती. सर्व वातवरण कसे आनंदी होते. दामोदर सरदार आणि दमयंतीबाई यांचा एकुलता एक मुलगा निशांत.
त्याची बायको नताशा तिचा सातवा महिना सुरू झाला होता, म्हणून डोहाळ्याचा जेवणाचा कार्यक्रम होता. आनंदाला उधाण आले होते, सर्व पाहुण्यांनी बंगला पूर्ण गजबजला.
नताशाला आई -वडील नव्हते, म्हणून तिचे बाळंतपण पण सासरी होणार होते. नताशाला सोनोग्राफीमध्ये जुळे बाळं असल्याचे सांगितले होते.
नताशाची तब्येत अगदी नाजूक होती आणि त्यात पोटात दोन जुळे बाळं होती. त्यामुळे दामोदरराव आणि दमयंती बाई आपल्या सुनेची काळजी अगदी आई-वडिलांच्या मायेने घेत होते. मोठ्या हौशीने सर्व नातेवाईकांना, त्यांनी आज डोहाळ्याच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. दमयंतीबाई सर्व जबाबदारी जातीने पार पाडत होत्या. पाहुण्यांचा पाहुणचार, हॉल सजावट मध्ये काय हवं नको ते आणि जेवणाचं काय हवं, नाही ते दामोदरराव पाहत होते.
कुठे काही आणण्याचा प्रसंग आला तर ये- जा करायची असल्यास निशांत होता.
कार्यक्रमाची सर्व तयारी झाली होती.
नताशाची तयारी चालू होती. तिने लाल काठाची हिरवी साडी घातली. त्यावर सर्व दागिने घातले. पार्लरवालीने चांगला मेकअप करून दिला. आता ते सर्वजण हॉलकडे जाण्यासाठी निघाले. अंधार पडायला लागला होता. नताशा तयार होऊन खाली आली. तिच्या पाठोपाठ दरवाजा लॉक करून दमयंती बाई खाली आल्या. समोर त्यांची नजर नताशा वर पडली तर, नताशा त्या पडक्या वाड्याकडे पाहत होती.
ती एकटक वाड्याकडे पाहत होती.
तिला तिकडे कोणीतरी खुणावत आहे, त्या खुणावण्यामागे काहीतरी सांगण्याचा हेतू आहे असे वाटत होते.
ती आता तिकडे जाण्यासाठी पाऊल उचलणारच, तोच तिला दमयंतीबाईंनी चल नताशा खूप उशीर झाला आहे असं म्हणून तिच्या हाताला पकडले. त्या तिला गाडीत घेऊन गेल्या, ती गाडीत बसली. परंतु तिच्या डोक्यात, कुणीतरी वाड्यात खुणावत असलेले, मघाशीचे वाड्याचे विचार चक्र चालू होते.
दमयंती बाईंना कळून चुकले होते की आज अमावस्या आहे. पण त्यांनी तसं न दाखवता त्या आपलं हसतमुखाने तिच्यासोबत वावरत होत्या.
ते हॉलमध्ये पोहोचले, डोहाळ्याचा कार्यक्रम सुरू झाला.
नताशाचा चेहरा मधून आनंदी तर, अचानक खिन्न व्हायचा. दमंतीबाईंना हे पाहून खूप काळजी वाटू लागली. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर, जेवण करण्यासाठी पाहुणे मंडळी बसली. निशांत आणि नताशाने फोटो काढले. तिचे एकटीचे अनेक पोज मध्ये फोटो काढण्यात आले.
एकटीचे फोटो काढता वेळेस दमयंतीबाईंची नजर तिच्यावरच होती, अचानक हसरा चेहरा तर, अचानक तिचा चेहरा उदास झालेला दिसत होता. आता दमयंती बाईंना चिंता वाटू लागली.
सर्व कार्यक्रम, जेवण पार पडली.
काही पाहुणे मंडळी हॉल मधूनच आपापल्या घरी गेले, तर एक- दुसरे पाहुणे बंगल्यावर आले. लांबचा प्रवास असल्यामुळे त्यांनी सकाळी जाण्याचे ठरवले. गाडी बंगल्याजवळ आली, नताशा पुन्हा त्या पडक्या वाड्याकडे पाहू लागली.
तसा नताशाचा चेहरा एकदम खुन्नसी झाला. तिची ती नजर दमयंतीबाईंना दिसली.
आता दमयंतीबाईंना घाम फुटला होता पण असं घाबरून चालणार नव्हतं. त्यांनी आपल्या हातातील एक दोरा सोडला आणि तो नताशाच्या हातात बांधला. दोरा बांधल्यावर तिचा चेहरा नॉर्मल झाला.
सर्वजण बंगल्यावर गेले. आज दमयंतीबाई नताशाच्या रूममध्ये झोपल्या, नताशा आणि दमयंती बाई झोपल्या होत्या.
दोघीही गाढ झोपल्या होत्या.
अचानक नताशा घाबरून उठली, तिला पूर्णपणे घाम फुटला होता. नताशा उठून बसली तिने पटकन लाईट चालू केला, तोच दमयंतीबाईंना जाग आली.
लगेच त्या उठून बसल्या, काय झालं? नताशा त्या काळजीच्या सुरात विचारू लागल्या.
मला खूप वाईट स्वप्न पडलं. कोणीतरी बाई माझ्या स्वप्नात आली होती. आणि ती मला म्हणत होती एवढं बोलून नताशा शांत बसली, काय झालं? सांग ना नताशा.
ती आता पूर्णपणे शून्यात नजर घालून बसली होती, ती काहीही बोलत नव्हती, तिने मान वळवून खिडकीतून बाहेर पाहिले.
त्या पडक्या वाड्याच्या खिडकीतून एक बाई आणि एक बाळ तिला दिसत होते.
तिने अगदी त्या बाळाला घट्ट पकडून धरले होते नताशा ते पाहत होती. आज तिला ती बाई जणू तिच्याकडे बोलावत आहे असे वाटत होते.
तिने आपल्या सासूबाईंना त्या पडक्या वाड्याच्या खिडकीकडे बोट करत म्हटले, “आई, ती बाई पहा मला बोलावते. आणि हो, तीच बाई माझ्या स्वप्नात आली होती.”
दमयंतीबाई आतून खूप घाबरल्या पण त्यांनी नताशाला धीर देत म्हटले, “तिकडे कोणी नाही. झोप, तुला भास झाला असेल.”
त्यांनी खिडकीचा पडदा ओढून घेतला.
त्या खिडकीच्या साईडने झोपल्या आणि नताशाला इकडून झोपण्यास सांगितले.
झोप काही येत नव्हती, नताशा या अंगावरून त्या अंगावर होत होती.
आता चार वाजून गेले होते.
दमयंतीबाई आणि नताशाला चारच्या नंतर कधी डोळा लागला. जेव्हा जाग आली तेव्हा त्यांनी घड्याळ कडे पाहिले तर आठ वाजले होते. त्यांनी पटकन आंघोळ केली आणि स्वतःचं आवरलं. नताशा पहाटे पहाटे थोडी शांत झोपली होती, त्यांनी तिला तसेच शांत झोपू दिले. त्या किचनमध्ये गेल्या. पाहुण्यांनाही जायचे होते. पाहुण्यांना पटकन नाश्ता बनवला, पाहुण्यांची आवरावर चालली होती.
त्यांनी पटकन सर्वांना नाष्टा दिला.
नाश्ता करून पाहुणे मंडळी परतीच्या प्रवासाला निघाली.
नताशाला जाग आली तिने घड्याळात पाहिले तर, साडेनऊ वाजले होते.
“अरे बापरे, मी साडेनऊ वाजेपर्यंत झोपले,” असं म्हणून तिने डोक्याला हात लावला. इकडे दमयंती बाई तिला नाष्टा करण्यासाठी सोबतीला थांबल्या होत्या. सासरे पाहुण्यांना सोडवण्यासाठी गेले होते आणि निशांत ऑफिसला गेला होता.
नताशा फ्रेश होऊन आली.
दमयंती बाईंनी दोघींसाठी गरमागरम चहा बनवून आणला.
दोघींनी सोफ्यावर बसून गप्पा मारत, चहा घेतला. नंतर त्या म्हणाल्या “चल नताशा आपण नाष्टा करून घेऊ.”
“आई किती उशीर झाला आहे, तुम्ही अजून नाश्ता नाही केला?”
“उशीर वगैरे काही नाही.” दोघींनी मिळून नाष्टा केला.
नताशा मोबाईल घेऊन बसलेली होती. तिने रात्रीचे फोटो मोबाईल मध्ये पाहिले आणि नकळत तिला पुन्हा ते स्वप्न आठवले.
त्या स्वप्नाचा ती विचार करू लागली. का पडले असेल असे स्वप्न? रात्री वाड्यात ती बाई दिसत होती, ती खरंच कोणी होती की मला भास होता. ती या विचारात असताना दमयंती बाई तिथे आल्या.
“चल, नताशा आपण जरा देवीच्या मंदिरात जाऊन येऊ.”
त्या दोघी गेल्या दर्शन घेतले घरी आल्या.
नताशा आणि दमयंतीबाई यांचा वेळ गप्पा मारण्यात, स्वयंपाकात आणि फिरण्यात जात असे. पण आता गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमुळे, त्या दोघींनी नताशाचा प्रवास टाळावा म्हणून फिरणं जरा कमी केलं होतं.
त्या जवळपास कुठेतरी जात. परंतु लांबचा प्रवास टाळत असत. दोघी एकमेकींना सोबतच असत. एकमेकांशिवाय त्यांचं पान हलवत नव्हतं.
दिवस निघून चालले होते नताशाही त्या स्वप्नाला विसरत चालली होती.सर्व काही व्यवस्थित चालू होते.
दमयंती बाई नताशाला जास्तीत जास्त आराम देत. आता दिवस भरत आले होते.
नववा महिना संपत आला होता.
दमयंती बाईंनी कामवालीकडून, डिलिव्हरी नंतर नताशाला आणि बाळांना ठेवणार होते ती रूम आवरून घेतली होती, सर्व रूम साफ करून घेतली होती.
त्या डिलिव्हरीची पूर्व तयारी करू लागल्या होत्या. आजही अमावस्या होती.
नतशाला काही केल्या झोप येईना, तिची नजर खिडकीतून त्या वाड्याच्या खिडकीत पडली.
मध्यरात्रीचे दोन वाजत आले होते. तिला ती बाई आणि ते बाळ दिसले.
त्या बाईने त्या बाळाला घट्ट पकडले होते आणि ती मोठ मोठ्याने म्हणत होती, “फक्त एकच बाळ, फक्त एकच बाळ!”
आता नताशा पूर्णपणे घाबरली. तिने घाबरून निशांतला उठवले. ती घाबरून म्हणाली, “निशांत,,,, निशांत,,, बघ ना! ती बाई काय म्हणते फक्त एकच बाळ, फक्त एकच बाळ.” ती भीतीने थरथरायला लागली. तिला दरदरून घाम आला.
“अरे, नताशा काय नाही, तुझा भास असेल चल झोप.”
पण आता त्याला झोप काही येईना आणि नताशाही जागीच होती.
पहाटे कधी तिला झोप लागली आणि पोटात जोराची कळ निघाली.
नताशाला कळा सुरू झाल्या. तिला दवाखान्यात गाडी करून नेले. तिची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आणि ट्विन्स असल्यामुळे सिझेरियन साठी घेतले. सिझेरियन झाले, पहिले बाळ मुलगी झाली. नर्सने बाळ नातेवाईकांच्या हातात देत म्हटले, हे घ्या आणि पहा.
आजीने बाळाला पाहिले, घेतले मुलगी होती, तिला पोटाशी धरले. डॉक्टरांनी दुसरे बाळ आउट केले तो मुलगा होता. बाळ पूर्णपणे निळसर पडलेले.
डॉक्टरांनी नातेवाईकांना कल्पना दिली की बाळ मुलगा आहे. परंतु बाळाचे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की, त्याला ऑक्सिजनची कमतरता आहे. कृत्रिम ऑक्सिजन वर बाळाला ठेवावं लागेल. आम्ही प्रयत्न चालू ठेवू पण त्यासाठी तुम्हाला या कन्सल्ट फॉर्मवर सही करावी लागेल.
निशांतने त्या फॉर्मवर सही केली.
आता मात्र दामोदरराव आणि दमयंतीबाई यांना बाळाचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी योजना करावी लागणार होती.
नताशा आता शुद्धीवर आली होती. तिची भूल पूर्णपणे उतरली होती. तिने बाळाला पाहिले आणि म्हणाली, दुसरं बाळ कुठे आहे? सासुबाई म्हणाल्या, “आहे!”
“कुठे आहे मला दाखवा ना!”
“आहे ग, तू आराम कर, नंतर दाखवते.”असं म्हणून सासूबाईंनी तिला झोपायला सांगितले. टाके खूप दुखत होते म्हणून सिस्टरांनी तिला पेनकिलर इंजेक्शन दिले.
आता नाताशाला डोळा लागला आणि तिच्या स्वप्नात तीच बाई आली, तिला म्हणाली “एकच बाळ, एकच बाळ! तुझं दुसरं बाळ जगणं शक्य नाही, फक्त तुला एकच बाळ मिळणार.”
नताशा घाबरून उठली आणि ती सासूबाईंना खूप आग्रह करू लागली, रडू लागली, मला माझं दुसरे बाळ दाखवा.
सासुबाई म्हणाल्या “काय झालं? नताशा अशी का घाबरलीस. आहे ना दुसरं बाळ!”
आता तर नताशा उठून बसायचा प्रयत्न करू लागते. परंतु, तिला निशांत आणि सासूबाईंनी पकडून ठेवले.
“अगं, नताशा टाके ओले आहेत अजून तुटतील.”
“मला ते काही माहिती नाही. मला माझं बाळ पाहिजे, ती ओरडून बोलत होती.”
“नताशा तुला त्रास होईल हळू बोल,” सासूबाई तिला समजावत होत्या. “अगं नताशा आहे बाळ, त्याला थोडा त्रास होत आहे. डॉक्टरांनी एन आय सी यु मध्ये बाळाला ठेवलं आहे.”
“डॉक्टरांना विचारा ठीक आहे का बाळ?” नताशा निशांतला म्हणाली!
हे पाहून दमयंती बाई निशांतला डॉक्टरांकडे पाठवतात. डॉक्टर सांगतात बाळाची तब्येत खूप गंभीर आहे.
परंतु निशांत येऊन नताशाला बाळ ठीक असल्याचे सांगतो. तो आईला नजरेने बाळाची तब्येत गंभीर असल्याचे सांगतो.
आता मात्र दमयंतीबाईंची खूप तारांबळ उडाली होती. त्यांना बाळाचे जीव वाचवण्याची पर्वा करावी तर, नताशा जवळ कोण थांबेल.
हा प्रश्न सतावत होता आणि बाळ वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत. हेही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.
निशांतला नाताशाजवळ थांबवून, त्या बाहेर गेल्या बाहेर पॅसेज मध्ये दामोदरराव बसलेले होते.
त्या दामोदररावांजवळ जात म्हटल्या, “आता काहीतरी करावे लागेल. ती सारखी नाताशाला त्रास देत आहे. आता आपल्याला तिच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी, मंत्र, हवन करणं गरजेचं आहे.
तरच आपल्या बाळाचा प्राण वाचला तर, वाचू शकतो नाहीतर, आजपर्यंत तीन पिढ्यांमध्ये चालला आहे. तोच नियम पुढे राहील. ती काय बाळ जगू देणार नाही. तुम्ही काहीतरी करा आणि आता लगेच शेजारच्या गावात जाऊन तो जो चांगला मांत्रिक आहे त्याला आपल्या घरी घेऊन या. त्याच्याकडून, या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी, वाड्यात हवन मंत्र करून घ्या. वाटल्यास आपण दोघे तिची माफी मागू. तिला म्हणू की, एका कडून झालेली चूक त्याची शिक्षा तू सात पिढ्यांना नाही देऊ शकत.
आत्तापर्यंत दिली ती शिक्षा खूप झाली. एक व्यक्ती वाईट होती किंवा असेल, पण सर्वच वाईट नसतात असं बोलूया.”
लगेच त्यांनी दामोदररावांना शेजारच्या गावात पाठवलं. दामोदरराव मांत्रिकाच्या घरी गेले. मांत्रिकाने विचारलं काय अडचण आहे.
दामोदररावांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली.
दामोदररावांचे पणजोबा धनाजी आणि पणजी द्रौपदी. यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. केशव आणि केतकी,
मुलगा मोठा होता आणि मुलगी त्याच्याहून दहा वर्षांनी लहान होती.
केशवला चांगले शिक्षण दिले. शिकून तो मोठा झाला आणि त्याच्यासाठी मुलगी पाहून त्याचे लग्न केले. कस्तुरीच्या घरची परिस्थिती जेमतेम, थोडीफार शेती ती पण कोरडवाहू, तीन बहिणी आणि एक भाऊ त्यामुळे गरिबी सतत होती.
इकडे केशवचा मोठा टोलेजंग वाडा, वडिलोपर्जित जमीन जुमला. केशव आई वडिलांचा एकुलता एक मुलगा त्यामुळे, कसलीही विचारपूस न करता, कस्तुरीच्या वडिलांनी कस्तुरीचे लग्न केशव सोबत करून दिले.
कस्तुरी आणि केशवचे लग्न होऊन एक वर्ष निघून गेले.
सुनेला दिवस गेल्याचे कळाले, घरात पहिलं बाळ येणार असल्यामुळे सर्वांना आनंद झाला.
सासूने तिचे सर्व डोहाळे पूर्ण केले. दिवस भरल्यावर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
पहिलीच मुलगी झाली म्हटल्यावर घरात थोडे नाराजीचे वातावरण निर्माण झाले. दिवस निघून गेले आता मुलगी महिन्याची दोन महिन्याची झाली. आजी, आत्या तिच्या बाललीलांमध्ये रमत. पाहता पाहता ती चालायाला लागली खेळायला लागली. मुलगी आत्या समवेत खेळत होती, वाढत होती. असंच, एक दिवस आत्याला म्हणजे केतकीला स्थळ आलं. मुलाच्या घरी बागायती शेती होती. मुलगाही दिसायला छान होता, त्यामुळे जास्त विचारपूस न करता, धनाजीरावांनी मोठ्या थाटात लग्न लावून दिले.
लग्न झाले तिला सासरी पाठवलं. केतकी ही तिच्या घरी सुखी होती.
एक दिवस केतकी आई होणार असल्याचं समजलं.
धनाजीराव आणि द्रौपदीबाईंचा आनंद गगनात मावेना, सातव्या महिन्याचा डोहाळ्याचा कार्यक्रम सासरी झाला. आई-वडिलांनी तिला माहेरी बाळंतपणासाठी आणलं. दिवस पूर्ण भरले आणि तिने एका मुलीला जन्म दिला. द्रोपदीबाईने तिचं बाळंतपण केलं.
सव्वा महिन्यानंतर तिला आपल्या सासरी नेऊन सोडलं. पहिली मुलगी झाली, घरातील वातावरण नाराज झाले. पहिलीच मुलगी झाली. टेन्शन आलं म्हणून नवरा दारू पिऊ लागला. मुलगी एक वर्षाची झाली होती. पुन्हा दुसऱ्यांदा दिवस गेल्याचे कळले. आता घरातील वातावरण आनंदी झाले होते. नवऱ्याच्या वागणुकीत सुधारणा होत होती.
पाचवा महिना लागला, तोच आईने म्हणजे द्रौपदीने केतकीला माहेरी आणली.
तिला खूप मळमळ उलट्या होत होत्या. मुलाचा गर्भ असावा म्हणून त्रास होत असेल. त्यामुळे केतकीच्या सासूने द्रौपदी बाईला म्हटले केतकीला आरामासाठी माहेरी घेऊन जा. द्रौपदीबाईने तिला लवकरच माहेरी आणले. इकडे कस्तुरी ही गरोदर होती. तरी द्रौपदी बाई आपल्या मुलीची काळजी घेत होत्या. आईच्या मायेने त्या तिला हवं ते खाऊ घालत. दिवस सरले इकडे आल्यावर तिला आराम मिळत होता. दिवस नऊ महिने पूर्ण झाले होते. केतकीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.
कस्तुरीचेही दिवस भरत आले. पंधरा दिवस गेले नंतर कस्तुरी ही बाळंतीण झाली.
तिला दुसऱ्यांदा ही मुलगीच झाली. आता घरातील वातावरण एकदम सुतक पडल्यासारखे झाले होते. केतकीला लवकर बाळंतपणासाठी आणले होते आणि अजून केतकीच्या घरी केतकीला दोन जुळे बाळ झाले आहेत हे माहिती नव्हतं. सर्वांना वाटलं कस्तुरीला दोन मुली झाल्या आहेत आणि तिसऱ्यांदा ही मुलगी झाली तर काय करायचं. आपण एक काम करूया. द्रौपदी आणि केशव यांनी मिळून, केतकीला दोन जुळी मुले झाली होती त्यातील एका मुलाला दत्तक घेण्याचा विचार केला.
हे कस्तुरीला समजताच, तिची तळपायाची आग मस्तकात गेली.
जर यांनी माझ्या नणंदेच्या बाळाला दत्तक घेतलं तर, माझ्या दोन मुली त्याच्यापुढे हात पसरतील काय? तिला हे सहन होईना.
धनाजीराव, द्रौपदीबाई आणि केशव केतकीच्या खोलीत होते. केशव बहिणीला आपले मत सांगत म्हणाला की, तुझ्या घरी अजून कल्पना नाही की, तुला दोन बाळं झाले आहेत.
हे बघ तुला दोन्ही मुलं आहेत आणि मला दोन्ही मुली आहेत.
तसं ही या आधी तुला एक मुलगी आहे. त्यामुळे तुला आता मला एक मुलगा देण्यासाठी काही हरकत नाही.
तुलाही एक मुलगा राहील,आपल्या आई वडिलांची जी संपत्ती आहे. त्या संपत्तीत तुझा जो हक्काचा वाटा आहे. तोही मी तुला देणार.असं केशव केतकीला म्हणाला.
ती ही एक मुलगा द्यायला तयार झाली. आपल्याच भावाकडे जाणार आहे आपलं मूल, म्हणून तिनेही बाळ देण्याचा निर्णय घेतला.
हे सर्व बोलणे खोलीच्या बाहेर उभे राहून कस्तुरी ऐकत होती. आता तिला काय करू आणि काय नाही असे झाले.
हिला हिच्या हक्काचा वाटा द्यायचा आणि तिचे मूल दत्तक घ्यायचे. ते या संपत्तीला वारसदार लागणार म्हणजे सगळं काही हीच होणार.
नाही, नाही! मी ही होऊच देणार नाही असं कस्तुरी मनाशी म्हणाली.
बघ आता या बहीण -भावाची मी कशी ताटातून करते. मी हिला वाटा मिळू देणार नाही. या घराण्याला हीच मूल वारसदार लागू देणार नाही. फक्त या बहिण भावाची ताटातूट मी करणार. असं तिने मनातून ठरवलं. तिने डाव करण्याचा विचार केला. केतकीचा सव्वा महिना झाला होता. आज केतकी आणि आई बाहेर जाऊन, जवळच असलेल्या देवीला नवसाला पावली म्हणून नारळ फोडून येणार होत्या.
त्या मायलेकी देवीला गेल्या. केतकीची दोन वर्षांची मुलगी घरीच थांबली होती. ते दोन्ही बाळं झोपले होते. आपल्या वहिनीला लक्ष द्यायला सांगून ती गेली. आता कस्तुरी काय डाव करता येईल विचार करू लागली. तिने चुलीवर दूध तापवायला ठेवले होते. तोच एक पाल भिंतीवरून जाताना तिला दिसली. तिने त्या पालीला पटकन काठी फेकून मारली. ती पाल खाली पडली. तिने पातेल्यात दूध गरम करण्यासाठी ठेवले होते त्या दुधात ती पाल टाकली.
एक बाळ उठले आणि रडू लागले. बहीण आपल्या भावाला झोका देऊ लागली. तरी ते शांत होत नव्हते, ती दोन वर्षाची बहीण ,भाऊ रडतो, हे मामीला सांगायला गेली. मामी, बाल उथलं ते ललतयं, असं तिच्या बोबड्या बोलात बोलली.
आता ही सर्वात उत्तम संधी आहे असं म्हणून कस्तुरीने तिच्या हातात त्या पातेल्यातील दुधाचा ग्लास भरून दिला. त्या छोट्या मुलीने आपल्या भावाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला.
तिने आईचे पाहिले होते की, आई वाटीत दूध घेऊन चमच्याने दुध पाजते. तिने ते दूध वाटीत टाकले आणि चमच्याने दोन-तीन चमचे त्याला पाजले. बाकीचे दूध तिने ग्लास मध्ये ठेवले. परंतु आई अजून आली नव्हती, तिला भूक लागली होती.
तिने पटकन तो ग्लास घेतला आणि तोंडाला लावला. तिने घटघटा ते दूध पिऊन घेतले.
आता कस्तुरीने ते पातेल्यातले दूध फेकून द्यावे. या हेतूने, पटकन पातेले उचलले आणि ती दूध फेकून देणार, तोच सासू आणि नणंद आल्या.
त्यांनी तिला पहिले, आपल्या सुनेला म्हणाल्या.
काय झालं? कस्तुरी अशी का? दूध फेकून देत आहेस.
अहो सासूबाई, त्याच्यात पाल पडली होती. असे म्हणून तिने ते दूध फेकून दिले.
पण आता तिला घाम फुटला होता. कारण तिला सासूने आणि नणंदने पाहिले होते.
आई आणि केतकी आपल्या खोलीत गेल्या पाहतात तर काय, केतकीची मोठी मुलगी आणि एक बाळ तोंडाला फेस येऊन निपचित पडलेलं होतं. कस्तुरीने ते दूध आपल्या बाळाला दिलं. हे केतकीच्या लक्षात आलं.
द्रौपदाबाई ही आपले दोन्ही नातवंड जागीच मरण पावले, म्हणून रडू लागल्या.
केतकीचा तर जीव राहिला नव्हता. तिच्या शरीरात त्राण उरले नव्हते. ती दोन्ही लेकरावर पडून हंबरडा फोडत होती. डोक्याचे केस तोडत होती. दोन्ही मुलं एक मुलगा आणि मुलगी मरण पावणे म्हणजे तिच्यासाठी किती मोठा आघात होता, हे फक्त तिला माहीत होतं.
आता द्रोपदी बाईंनी कस्तुरीला जाब विचारला. वाड्यामागील परिसरात खड्डा करून, त्या दोन्ही भावंडांना पुरून टाकले.
केतकी खूप खचून गेली.
तिने स्वतः जगण्यात आता काय अर्थ, असा विचार केला. माझी सोन्यासारखी दोन लेकरं गेली. माझं जगून काय सोनं होणार आहे का? या विचाराने ती डिप्रेशन मध्ये गेली.
तिने आत्महत्या करण्याचा विचार केला.
द्रौपदीबाईंनी कस्तुरीला जाब विचारला की, ते दूध तू का फेकून दिल?
त्याच्यात पाल पडली होती म्हणून,
आधी ते लेकरांना पाजलं आणि मग फेकून दिलंस, हो ना!
मी नाही पाजले लेकरांना मग तू फेकून देण्याची घाई का? करत होतीस.
मी पाल पडली म्हणून फेकून देण्याची घाई केली.
हो का, मग लेकरांना ते दूध कोणी दिलं. त्यांचा आवाज रागाने वाढला होता
पण कस्तुरीने झालेला गुन्हा कबूल केला नाही.
घे, तुझ्या दोन्ही मुलींची शपथ. असं द्रौपदी बाईंनी करड्या आवाजात म्हटलं.
कस्तुरी घाबरली आणि तिने केलेला गुन्हा सांगितला.
ती चिडून म्हणाली, हो मीच मारलं त्या बाळांना दुधात पाल टाकून, कारण जर उद्या नणंदबाईची तिच्या हक्काची वाटणी करून दिली. त्यांचा मुलगा या घराचा वारसदार झाला असता तर, माझ्या मुली काय त्याच्या ओंजळीने पाणी प्यायल्या लागले असते. हे मला होऊ द्यायचं नव्हतं म्हणूनच, मी त्या बाळांना पाल टाकून ते दूध पिण्यास दिले..
द्रौपदीबाईंचे डोळे रागाने लाल झाले, जणू त्यांच्या डोळ्यातून ज्वाला ओकत होत्या. द्रोपदी बाईंनी, कस्तुरीच्या सणसणीत कानाखाली वाजवून,दोन्ही मुलींसहित कस्तुरीला घराबाहेर काढले.
कस्तुरीने दोन मुलांना जाणून – बुजून मारले. हे केतकीला द्रौपदीबाई कडून समजले. त्यावर किती तळतळून म्हणाली या वाड्यात यापुढे दोन बाळ जन्माला येऊच नाहीत. दोन बाळं आले तरी एक बाळ जगू नये.असा तिने तळतळाट दिला. म्हणजे बहीण भावात कधी अशी ताटातूट होण्याची वेळच येणार नाही. तिला वहिनीच्या या कृत्याचा खूप राग आला. दिवसेंदिवस केतकी खचत चालली होती. तिला आता जगण्यात काहीही रस राहिला नव्हता. ती सतत आत्महत्या करण्याचे विचार करत होती.
पण या बाळाचं काय होईल हा विचार तिला सतावत होता. अशातच एक दिवस द्रौपदी बाई घरात नसताना, केतकी आपल्या बाळाला घट्ट पकडते आणि खूप रडते.
बाळा काय करू ते समजत नाही, पण मी तुला अशी यांच्या भरोशावर निराधार सोडणार नाही. मी मरेन तर तुला घेऊनच मरेन असं म्हणून, तिने जड अंतकरणाने बाळाला गळा दाबून मारून टाकून, स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली.
या गोष्टीने धनाजीराव आणि द्रौपदी बाई खूप खचल्या.
दिवस निघून जात होते. ते थोडेफार स्वतःला सावरत होते. अशातच एक दिवस त्यांनी आपल्या केशवच लग्न कौशल्याशी लावून दिले. आता कौशल्याला दिवस गेले, दिवस पूर्ण भरले
तिला पहिला मुलगा झाला त्याचं नाव किसन ठेवलं. तो मोठा होत होता, दोन वर्षाचा झाला होता. दुसऱ्या वेळेस दिवस गेले.
तेव्हापासून ती वाड्यात रात्रीची फिरायची, कौशल्याबाईला खूप त्रास द्यायची. आता बघ तुझं बाळ कसं जन्माला येत ते, मी ते येऊनच देणार नाही. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी ती कौशल्या बाईंना रात्रभर छळायची. अशाच एका अमावस्येच्या दिवशी कौशल्या बाई झोपलेलली असताना त्यांना पोटावर कुणीतरी दाब देत आहे असे वाटले. डोळे उघडून पाहता तर, ती अक्राळ विक्राळ आकृती. सोड मला! सोड मला! म्हणून त्या ओरडू लागल्या.
तोवर केशव जागा झाला.
कोण होतं कौशल्या? तुला काही भास झाला असेल.झोप!
नाही, नाही भास नाही माझ्या पोटावर खूप दाब पडलाय. ती बाई या अगोदरही मला म्हणायची की, मी तुझं बाळ जन्माला येऊ देणार नाही.
आता खूप जोरात कौशल्याबाईच पोट दुखायला लागतं. नंतर त्या उठून बसतात. तोपर्यंत आवाजाने तिथे सासूबाई आलेल्या असतात.
खाली पाहतात तर सर्व रक्त खाली पडलेले, बाळाचा गर्भपात होऊन बाळ खाली पडलेल असतं. कौशल्याबाईंना पुन्हा बाळ झालं नाही. मुलगा आता मोठा झाला.
आता मुलगा लग्नाला आला होता. मच्छिंद्र याचं लग्न द्वारका सोबत करून दिले. मच्छिंद्र आणि द्वारका म्हणजे माझे आई-वडील.
नंतर आईला दिवस गेले. तर तिने पुन्हा तिचा छळ करायला सुरुवात केलं. एक दिवस रात्री आई लघु शंकेसाठी उठली असताना. तिने तिला ओढून ओढून घेतलं आणि आई पोटावर पडली. पोटातील ते बाळ गुदमरून मेलं.
पुन्हा आईला दिवस गेले त्यावेळी, माझा जन्म झाला. मग पुन्हा मला बहीण- भाऊ कोणीच झालं नाही. दिवस सरत होते मी लहानाचा मोठा झालो. माझे लग्न झालं. लग्नानंतर तीन वर्षांनी दमयंतीला जेव्हा दिवस गेले. त्यावेळी तिने धुमाकूळ घातला. परंतु एका मंत्रिकाला बोलवून, तिला त्या खोलीतून बाहेर न येण्याच्या साठी बंदिस्त करार केला. म्हणून ती खोलीतून बाहेर येत नव्हती. परंतु तिचा मोठमोठ्याने ओरडणं, स्वप्नात येऊन त्रास देणे.चालूच होते.
निशांतचा जन्म झाला. निशांत नंतरही पुन्हा दोन वर्षांनी दमयंतीला दिवस गेले. ती स्वप्नात येतच होती त्रास देतच होती. दमयंतीचे दिवस पूर्ण भरले. तिने एका गोंडस मुलीला जन्मही दिला.
परंतु दोन महिन्यानंतर ते बाळ मरण पावले. त्या दिवशी अमावस्या होती. ती मोठ्याने आवाज करू लागली, विचित्र हसू लागली. दमयंतीच्या स्वप्नात आली आणि म्हणाली मी म्हटलं होतं ना! फक्त एकच बाळ. मुलगी गेली ना मरून हा, हा, हा, हसून हसून ती म्हणाली. कित्येक दिवस दमयंतीने अन्न आणि पाणी सोडले होते. कसं बसं तिला त्यातून सावरलं. नंतर आम्ही बाळाचा विचार केला नाही. त्यामुळे आम्हाला एकुलता एक निशांतच झाला.
नंतर मग आम्ही इकडे बंगला बांधला. तिकडे तिला करारात बंदिस्त करून ठेवले
पण ती अधून मधून अमावस्येच्या दिवशी स्वप्नात येत असे. त्यामुळे आम्हाला दुसरे बाळ झालेच नाही. अशा प्रकारे तिने आमच्या तीन पिढ्यांपासून दुसरे बाळ जगू दिले नाही. तीन पिढ्यांपासून एकच बाळ लहानाचं मोठ होत आहे. आज आमची सून नताशा हिची डिलिव्हरी झाली. तिला दोन जुळे बाळं झाले आहेत. नताशाच्या गरोदरपणात ती स्वप्नात येऊन तिला म्हणायची, फक्त एकच बाळ जगेन. आज पुन्हा नतशाच झाल्यानंतर ती झोपली असता, ती स्वप्नात आली होती. डॉक्टरांनी एका बाळाची तब्येत नाजूक आहे. ती नताशाला सतावत आहे. आता यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे.
मांत्रिक म्हणाला अवघड आहे पण उपाय तर करावाच लागेल. मी तुम्हाला जसं सांगतो तसं सर्व साहित्य आणा. मांत्रिक आणि दामोदरराव सर्व चर्चा करून, मांत्रिकाला घेऊन ते घरी आले. आज संध्याकाळपर्यंत अमावस्या होती. मांत्रिक येताच ती ओरडू लागली. दामोदरराव आणि मांत्रिक आता वाड्याकडे गेले. दोघेही त्या खोलीत गेले वाड्यातल्या, तिने तर आता अक्राळ विक्राळ अवतार धारण केला. ती आवाज करू लागली, ओरडू लागली. काय करणार आता तुम्ही, असं म्हणून हसू लागली.
मांत्रिकाने एक माळ दामोदररावांच्या हातात दिली. त्याने आपल्या पिशवीतून एक पूड काढली. त्या पुडीतून चूर्ण घेऊन त्या खोलीत शिंपले.
आता तर ती खूप चवताळली. इकडे तिकडे सैर भैर पळू लागली. मांत्रिकाने आपले काम सुरू केलं. एक रिंगण केलं त्यात तिला अडकून ठेवलं. इकडे दमयंतीबाईंना घरी जाण्यासाठी काय कराव ते सुचेना. काहीतरी पर्याय त्या सुचवत होत्या. त्यांनी निशांतला नताशा जवळ थांबवले. दवाखान्यातील एका मावशीला काही लागल्यास मदत करण्याची विनंती केली.
एक तासात मागे येते. घरी खूप महत्त्वाचं काम आहे. असं नर्सला सांगून, त्या पटकन रिक्षा पकडून घरी गेल्या.
आता आत्मा पूर्णपणे रिंगणात अडकला होता. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करू शकत नव्हता.
मांत्रिकाने आपले मंत्र सुरू केले.
मांत्रिकाने दामोदर रावांना म्हटले, तुम्ही हा दोरा हातात घ्या. तिने तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला तर तो दोरा पुढे करा. आता त्याने धूप जाळली ती मोठ्याने ओरडू लागली. जर मी दोन बाळांना जगू दिलं तर, या वाड्यात पुन्हा माहेराला माहेरवाशीन अशीच दुरावली जाईन. ती माहेराला राहणार नाही. बहिण भावांची ताटातून होऊन तिला माहेराला मुकावं लागेल. एक बाळ वाचू देणार नाही. ती ओरडू लागली
दमयंती म्हणाल्या त्यांच्या वतीने आम्ही माफी मागतो परंतु असं नका करू. सर्वजण सारखे नसतात. आता त्यांनी तिच्या पुढे हात जोडले.
माझ्या वहिनीने आमच्या बहिण भावाची ताटातूट करण्यासाठी माझ्या दोन लेकरांना मारलं आणि माझं माहेर कायमचे हिरावून घेतलं. या गोष्टीचा मला अतोनात राग आहे. म्हणून मी या घराण्यात येणार एक बाळ मारते आणि माझ्या बाळाला मारल्याचा सूड घेतल्याचा मला समाधान मिळतं. असं म्हणून ती मोठ्याने हसू लागली.
त्यावर मांत्रिक म्हणाला आता तू हे किती पिढ्यापर्यंत करणार. त्यावर ती आकृती म्हणाली मी हे प्रत्येक पिढीत करणार.
दमयंतीबाईकडे पाहू लागली.
आता आम्ही तुझी माफी मागितली तरी तू हेका सोडत नाहीस. दामोदर म्हणाले.
का? सोडू माझा हेका! माझ्या लेकरांना मारताना तिने का मागचा पुढचा विचार नाही केला. मग मी का करू तुमच्या बाळांचा विचार.
त्यावर दमयंतीबाई म्हणाल्या, हे पहा तुम्हाला हे कितपत पटतय. तिने तुमचे दोन लेकरं मारले आणि तुम्ही प्रत्येक पिढीत बाळ मारणार. हे काही योग्य नाही. असं मला वाटतं.
ती हसत म्हणाली. छे छे मला बाळ मारणे यामागे एवढेच साध्य करायचे की, कोणत्याही बहिण भावाची ताटातूट होऊ नये.
संपत्तीसाठी आणि बहीण माहेरापासून वंचित राहू नये. म्हणून मी हा माझा बाळ मारण्याचा खेळ चालू ठेवणार आहे.
त्यावर दमयंतीबाई तिला म्हणाल्या हे पहा, सर्व भावजया सारख्याच असतात असेही नाही. काही वाईट तर काही चांगल्या पण असतात. प्रत्येक पिढीत अशी ताटातूट होईल असेही नाही. त्यामुळे तुम्ही अशा किती निष्पाप जीव घेणार आहात. आतापर्यंत तीन पिढ्यांपर्यंत झालं ते झालं पण मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. आता हे थांबवा. यापुढे बाळ मारायचं सोडून द्या.
आकृती म्हणाली, मी जर हे सोडलं तर, माहेरवाशिनीचे काय होईल.
त्यावर दमयंतीबाई आणि दामोदर म्हणाले आम्ही आमच्या लेकरांना एकीचे, निस्वार्थपणाचे संस्कार देऊ. त्यांच्यामध्ये प्रेमाचे धडे निर्माण करू.संपत्ती, पैसा हे क्षणात असतं,क्षणात नसतं आणि ते माणसापेक्षा महत्त्वाचं नसतं. हे त्यांच्या मनात रुजवू. म्हणजे त्यांच्यामध्ये माणसापेक्षा पैसा महत्वाचा होणारच नाही. एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होईल. असं करू!
आता मांत्रिकाने आपले हवन सुरू केले. ती आकृती आता मनातून खजील झाली होती. तिनेही कमीपणा घेतला होता ठीक आहे. असं म्हणत ती बोलू लागली, माहेरवाशिनीला फक्त माहेराला आणि माहेराच्या प्रेमाला मुकु देऊ नका. माझा एवढाच हेतू आहे असं बोलून ती आकृती विरळ होत चालली. दमयंती आणि दामोदर रावांनी तिच्या पुढे अजूनही हात जोडले होते.
तिनेही त्यांचा माफीला होकार दिला होता.
आता ती आकृती हसत विरळ झाली.
मंत्र संपत आले, तसे त्या आकृतीने एकदा आनंदाने आणि खजीलतेने दमयंती आणि दामोदरकडे पाहिले. दोघांनीही तिच्याकडे पाहिले तर,समाधानी चेहऱ्याने ती आकृती दिसेनाशी झाली. आता तिच्या आत्म्याला शांती मिळाली होती.
दमयंती आणि दामोदर तणाव मुक्त झाले होते. सर्व प्रकारचे टेन्शन आज दूर गेले होते. त्यांनी एक अगरबत्ती केतकीच्या नावाने लावून सर्व कार्यक्रम समाप्त केला. आज केतकीच्या आत्म्याला मुक्ती मिळाली होती. इकडे बाळाची तब्येत सुधारत होती.
त्या वाड्याने आज प्रसन्न रूप धारण केले होते. पडका वाडा आज जरा प्रसन्न वाटू लागला.
आता नताशाची भूल पूर्णपणे उतरली होती. पेनकिलर दिल्यामुळे तिचे टाके दुखणे कमी झाले होते.
तिला आराम वाटू लागला. बाळाची तब्येत एकदम सुधारली होती.
डॉक्टरांनी बाळ आईकडे दिले.
निशांतने मुलीला घेतले तर नताशाने मुलाला जवळ घेतले होते. दोघेही आनंदी होते. नताशाचा चेहराही आनंदाने खुलला होता.
तोपर्यंत दमयंतीबाई दवाखान्यात आल्या. नताशा एकदम प्रसन्न दिसू लागली हे पाहून त्यांना खूप बरे वाटले.
दोन्ही बाळे आईजवळ आहेत. हे कुटुंब तर स्वप्नापेक्षा रम्य वाटू लागले.आता त्या खूप समाधानी झाल्या.
नताशा रात्री झोपली. तीच बाई अगदी आनंदाने नताशाच्या स्वप्नात आली.
आनंदाने हसत म्हणाली, माझ्या आत्म्याला आज मुक्ती मिळाली. फक्त लेकरांची ताटातूट होऊ देऊ नको काळजी घे. लेकरांची चांगली काळजी घे.त्यांना चांगले संस्कार दे. असं म्हणून ती निघून गेली.
नताशाने सासूबाईला स्वप्न सांगितले. ती बाई अगदी आनंदी होती आज माझ्या स्वप्नात आली रात्री तेव्हा. ती लेकरांची काळजी घेण्याचे बोलली. त्यांना चांगले संस्कार देण्याचं बोलली. खूप प्रेमाने बोलली.
त्यावर दमयंती बाईंनी सगळी हकीगत सांगितली.
नताशा म्हणाली मी खूप काळजी घेईन आणि लेकरांना योग्य ते संस्कार देईल. अशी ताटातूट होऊ देणार नाही. आणि दोघींनी हसत हसत एकमेकींकडे पाहिले. दमयंतीबाईंनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. गुणाची माझी पोर, असं म्हणून तिच्या कपाळाच्या पापा घेतला.
दमयंतीबाई म्हणाल्या मला जशी सून मिळाली. अशीच तुला अगदी मुलीसारखी सून मिळावी.
हो आई नक्कीच मिळणार. तसंच मी मुलाला- मुलीलाही एकीचे संस्कार देईल. त्यांच्या नणंद भावजय या दोघीत मैत्रीचं नातं निर्माण होणार अन् ते कायमचं राहील. कधीच माहेर वाशिनीची ताटातूट होणार नाही.
तुझ्या लेकरांना घडविण्यासाठी देव तुला सदबुद्धी देवो. सर्व पिढ्या प्रेमाने आणि एकोप्याने नांदत राहो. हाच माझा आशीर्वाद दमयंतीबाई म्हणाल्या.
*******
वरील कथा काल्पनिक असून, फक्त मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. त्यातील सर्व प्रसंग, स्थळ,वेळ, पात्र काल्पनिक आहेत. कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा लेखिकेचा हेतू नाही. कथा फक्त मनोरंजन व्हावे म्हणून लिहिली आहे.
धन्यवाद!
© मोनिका कटारनवरे
सदर कथा लेखिका मोनिका कटारनवरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.