जीवनसाथी..(रिश्ता वही सोच नयी)

©अर्चना अनंत धवड 
सकाळी प्रिया किचनमध्ये कामात व्यस्त होती. ती सुधीरचा, तीच्या नवऱ्याचा लंच बॉक्स , दुपारचा वेगळा स्नॅक्स बॉक्स, पाण्याची बाटली इत्यादी पॅक करत होती. 
सुधीर जुनियर कॉलेजला अधिव्याख्याता होता. सकाळी त्याचं कॉलेज असायचं आणि नंतर त्याचे स्वतःचे ट्युशन क्लासेस होते. ट्युशन क्लासेसचा व्याप बराच मोठा होता. त्यामुळे कॉलेज सुटलं की लगेच ट्युशन क्लासेसला जायचा .
सकाळी घरून गेला की रात्रीच घरी यायचा म्हणून  खाण्यापिण्याचं ती नेहमीच  व्यवस्थित द्यायची…

मुलगी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला. तिचंही कॉलेज, प्रॅक्टिकल त्यामुळे तीही उशिराच यायची म्हणून तिचाही टिफिन ,मधलं खाणं सगळं व्यवस्थित पॅक करून तिने डायनिंग टेबलवर ठेवलं..
दोघांसाठी नाश्त्याच्या प्लेट ठेवल्या आणि त्यांना नाश्ता करायला आवाज दिला, तेवढ्या तिचा फोन वाजला…
तिने पाहिलं तर तिच्या मैत्रिणीचा, श्वेताचा फोन होता…
“हॅलो श्वेता ,काय ग ?एवढ्या सकाळी कशी काय आठवण आली?”

“काही नाही तुला तर आठवण येत नाही म्हटलं आपणच फोन करावा”
“अग, तसं काही नाही ग..”
“अगं , आपल्या बीएससीच्या ग्रुपचं गेट-टुगेदर ठरलय …उद्या सायंकाळी भेटायच आहे हॉटेल हेरिटेजमध्ये.. सगळ्या येणार आहेत.. तू पण ये” एका दमात श्वेता बोलुन गेली.
“उद्या…” कॅलेंडर कडे पहात प्रिया म्हणाली.
“हो उद्याच…” उद्या शब्दावर जोर देत श्वेता म्हणाली.

तेवढ्यात सुधीरनी आवाज दिला ,”प्रिया अग ,माझा रुमाल कुठे आहे? काय सकाळी सकाळी फोनवर असते .दिवसभर घरीच असते ना .नंतर कर ना फोन”
“श्वेता, अग मी तुला नंतर फोन करते. सकाळी जरा गडबड असते कामाची. तुझा नंबर आहेच माझ्याकडे. चल बाय नंतर बोलु सावकाश “असं म्हणून तिने फोन ठेवला.
“कपाटात समोरच रुमाल असून दिसत नाही” असं मनात म्हणत तिने  रुमाल काढून सुधीरला दिला आणि टिफिनची बॅग त्याच्या हातात दिली.

“आई कुणाचा फोन होता ग ? नाश्ता करून उठत श्रेया म्हणाली.
“अगं माझ्या मैत्रिणीचा होता श्वेताचा… ती नाही का अमरावतीच्या सायन्स कॉलेजमध्ये आता केमेस्ट्रची एचओडी आहे…”
“तीच मावशी ना.. तू ऑफर नाकारली म्हणून तीला जॉब मिळाला “श्रेया बॅग खांद्यावर अडकवत म्हणाली.
“हो… तीच ती “प्रिया तीच्या हातात टिफीन बॉक्स देत म्हणाली.
“कशाला फोन केला होता  इतक्या सकाळी?” श्रेयाने जाताजाता थांबून विचारलं.

“अग, आमच्या बीएससीच्या बॅचचे गेटटुगेदर आहे उद्या तर सगळ्या मैत्रिणी भेटणार आहे त्यासाठी  फोन केला होता”
“उद्या  नको ना ..तुला माहिती आहे ना परवा माझा पेपर आहे आणि तू घरी नसली की माझा अभ्यास होत नाही… ,” हातातील बॅग सोफ्यावर ठेवून, तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकत लाडिकपणे श्रेया  म्हणाली.
“अगं मी कुठे हो म्हटलं ?ठीक आहे ना ..नाही जाणार.जा निघ लवकर.वेळ होतो कॉलेजला ” तिच्या गालावर प्रेमाने थोपटत प्रिया म्हणाली.
बापलेक बाहेर निघून गेली आणि प्रियाने घर आवरायला घेतलं तेवढ्यात तिचा फोन वाजला … आता कुणाचा फोन असं म्हणत ती फोन घ्यायला गेली पाहते तर तिच्या मुलाचा कॉल होता

“हॅलो आई…”
“बोल ना सोन्या.. काय झालं एवढ्या सकाळी कशाला फोन केला?”
“आई सुरभीला ऑफर लेटर आलं मोठ्या कंपनीकडून….”
“अरे वा अभिनंदन … पोस्टिंग कुठे आहे…”
“यु एस ला..”
“मग कधी जॉईन व्हायचे?”

“वेळ आहे अजून दोन महिने..”
“अरे ,पण ती एकटी जाणार,?”
“नाही ग ,आम्ही दोघेही जाणार”
“तुला पण जॉब मिळाला तिकडे?”
“नाही ग ,मी रीझाईन करणार इथल्या जॉबला”

“तू एवढी मोठया पोझिशनची नोकरी सोडणार ?आणि तिथे काय करणार?”काळजीने प्रिया म्हणाली.
“आई तिकडे शोधेल ना ..मिळेल मला तिकडे..पण सुरभीला जी संधी चालून आली  ती परत येणार नाही..”
“अरे पण तिला जाऊ दे ना ..नंतर तू जॉब सर्च कर आणि जा”
“नाही आई.. आमचं आधीच ठरलेलं ..दोघेही आम्ही इंटरव्यू देत होतो … कुणाही एकाचं जरी सिलेक्शन झालं तरी दोघांनीही जायचं एकांनी जॉब सोडून….आता तिचं सिलेक्शन झालं तर मी माझा जॉब सोडणार आणि तिथे नवीन शोधणार…”

“अच्छा ठीक आहे…”काळजीच्या स्वरात प्रिया म्हणाली.
“आई तू काळजी करू नकोस …अगं सुरभीला मोठा पगार आहे.. वरची पोझिशन  मिळेल आणि मलाही जॉब नक्कीच मिळेल.. हा, कदाचीत कमी पोझिशनची मिळेल इथल्यापेक्षा हा भाग वेगळा”
“ठीक आहे बेटा” असं म्हणून तिने फोन ठेवला.
तिला फारच अस्वस्थ वाटत होतं.
मुलांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य ? या द्विधा मनस्थितीत तिचं मन होतं…

‘योग्यच आहे’ तिच्या अंतर्मनाने तिला कौल दिला…कदाचित माझ्या बाबतीत जर असा निर्णय घेतला असता तर मी आज श्वेताच्या जागेवर असते.
तिचं मन भूतकाळात गेलं.
लग्न झालं तेव्हा ती एम.एस.सी.बी.एड.एम.फिल.झाली होती .
नवरा एम.एस.सी बी.एड . एका जूनियर कॉलेजला अधिव्याख्याता होता .
लग्नाला दोन महिने झाले असतील तेव्हा तिला एका सीनियर कॉलेजच्या व्याख्याता पदाची ऑफर आली .ती फार खुश होती .
जेव्हा घरी कळले तेव्हा मात्र सगळ्यांचा ना,-नाचा पाढा सुरू झाला कारण पोस्टिंग अमरावतीला होते आणि त्यांचं राहणं नागपूरला.

ती नवऱ्याला म्हणाली, “तुम्ही तुमचा जॉब सोडा. तुमचे ट्युशन क्लासेस तिथे पण सुरू करू शकता आणि मिळाला तर तिथे जॉब पण शोधू शकता .माझा पगार तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त असणार शिवाय प्रमोशन पण असेलच”
नवऱ्याला ते विशेष पटले नाही पण तीची समजूत घालावी म्हणून म्हणाला ,”बघतो आई-बाबांना विचारून…”
“आई-बाबांकडे विषय काढताच घरात वादळ निर्माण झालं.
” आता काय ही नोकरी करणार ,? आणि तू घरची भांडी धुनी करणार” आई बडबड करू लागली 

“लोक काय म्हणतील ?बायकोच्या जीवावर जगतो “सासऱ्याने सासूच्या रीत री ओढली. 
घरी भरपूर वादावादी झाली.
शेवटी सुधीर म्हणाला,” इथे नोकरी मिळाली तर करू शकतेस पण बाहेरगावी नाही आणि माझ्या नोकरी सोडण्याचा तर प्रश्नच येत नाही”.
त्यामुळे तो विषय तीथेच बंद झाला .
नंतर लगेच प्रेग्नेंसी राहिली . एकापाठोपाठ  मुलगा आणि मुलगी झाली .मुलांच्या शाळा, सासू-सासर्‍यांचे आजारपण, परी पाहुणे, त्यामुळे तिला नंतर नोकरीसाठी विचार करायला वेळच मिळाला नाही .मुलं आणि नवरा हेच तिचं विश्व झालं.

मुलगा आयआयटी झाला आणि मुलगी मेडिकलला.
लहानपणापासून त्यांचा अभ्यास घेणे हा तिच्या कामाचा एक अविभाज्य भाग झाला.
परवा परीक्षा म्हणून आजही एमबीबीएसला असलेल्या मुलीला आई घरीच पाहिजे असते .
मुलाला दिल्लीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली. त्याच्याच ऑफिसमधील मुलीशी त्याचं लग्न झालं .
दोघंही इथे भरपूर पैसा कमवत होते अणि आणखी मोठ्या कंपनीत नोकरीसाठी ते इंटरव्यू देत होते आणि त्यातच सुनेचे  विदेशातील एका मोठ्या कंपनीत सिलेक्शन झालं आणि मुलाने आपल्या नोकरीचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला…

आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन बायकोचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुलाचा तिला अभिमानच वाटला.
“कदाचित असा निर्णय माझ्या नवऱ्याने घेतला असता तर आज मी पण मोठ्या पदावर असती” प्रिया मनात म्हणाली.
“प्रिया कधीची आवाज देते ,लक्ष कुठे आहे तुझं ?सासुबाई काठी टेकवत टेकवत हॉलमध्ये आल्या.
“काय झालं आई?
“अगं ,माझ्या औषधाची वेळ झाली”
“जा तुम्ही तुमच्या रूम मध्ये मी घेऊन येते” असं म्हणत तिने फोन उचलला आणि स्नेहाला फोन लावला.

“सॉरी श्वेता मला नाही जमणार उद्या यायला. माझ्या सासूबाईंची तब्येत ठीक नाही .. उद्या  अपॉइंटमेंट आहे डॉक्टरकडे… भेटू पुन्हा कधीतरी असं म्हणून तिने फोन ठेवला… बंद फोन कडे पाहत म्हणाली”
सॉरी श्वेता, मी खोटं बोलले पण मी स्वीकारलेल्या माझ्या आयुष्यात  खुश आहे… माझं घर आणि मी एवढे एकरूप झालोत की मला माझं स्वतःचं अस्तित्वच शिल्लक उरलेलं नाही… आणि त्यात मी आनंदी आहे.
ती औषध द्यायला सासूच्या खोलीकडे वळली.
©अर्चना अनंत धवड 

सदर कथा लेखिका अर्चना अनंत धवड यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “जीवनसाथी..(रिश्ता वही सोच नयी)”

Leave a Comment

error: Content is protected !!