© मृणाल शामराज
रविवारची सकाळ हॊती ती. एप्रिल संपत आलेला.. सकाळी सव्वा नऊ, साडेनऊ झालेले असतील.. सगळ्यांचा ब्रेकफास्ट नुकताच उरकलेला.. आभानी टेबल आवरायला घेतलेलं.
तिच्या सासूबाई म्हणाल्या, “राहू दे ग.. आधी खा बरं दोन घास.. पोहे निवून चाललेत.”
आभाच्या डोळ्यासमोर कामांची भली मोठी यादी दिसत हॊती..आज अलोकचा, तिच्या नवऱ्याचा बालमित्र परेश, आणि त्याची बायको रोमा दुपारी जेवायला येणार होते, मुलांना सुट्टी लागलेली त्यांच्या हॉबी क्लासेस ची चौकशी, सासूबाई वसुधाताईची संपलेली औषधं आणायची, किरण्याची यादी द्यायची.
अलोकनी कालच तिला सांगितलं होतं, उद्याची संध्यकाळ माझ्यासाठी ठेव… आता कुठे आणि कसं सुरु करावं ती प्रश्नात पडली. वसुधाताईंनी तिला समोर बसवून खायला लावलं, कपभर चहा गरम करून आणून दिला. खाता खाता तिच्या डोक्यात सगळी रूपरेषा तयार झाली..
आभा, सांगलीत वाढलेली, पदवीधर.. बाबा ती लहान असतानाच गेलेले.. पाठच्या दोन बहिणी.. मुळातच हुशार.. पण परिस्थितीमुळे पुढे शिकता आलं नाही.
वसुधाताई त्यांच्या शेजारीच राहायच्या. अलोक आणि आरती, दोन मुलं त्यांना. वसंतराव सरकारी नोकरीत आणि ह्या शिक्षिका.. नाही म्हटलं तरी दोघेही कामावर गेल्यावर मुलांकडे दुर्लक्ष व्हायचं.
दोन्हीही घराचा घरोबा चांगला. अलोक बारावीत असतांना वसंतरावांची मुंबईला बदली झाली. मग अलोकच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी बिऱ्हाड मुंबईला हलवलं. वसुधाताई आता तिथे नोकरी करू लागल्या.
आरतीच लग्न झालं. आणि थोड्याच दिवसात वसंतराव छोट्याश्या आजाराचं निमित्त होऊन गेले.
अलोक इंजिनीरिंगच उच्च शिक्षण घेवून एका बड्या कंपनीत नोकरीला लागला. आता वसुधाताईना सुन आणायचे वेध लागले. आढेवेढे घेतं आलोक तयार झाला. पण त्याची अट हॊती की मुलगी नोकरी करणारी नकॊ.
वसुधाताईच्या मनात आभा आधीपासून होतीच. चटपटीत, मनमिळाऊ, सालस, आणि हुशार… आलोक जवळ विषय काढताच तो खूष झाला.. लहानपणापासून एकत्र खेळेलेले, अभ्यास एकत्र.. आता कशी दिसत असेल आभा..
एक दिवस अचानक वसुधाताई आणि आलोक सांगलीला गेले.
सुमतीबाईंना, आभाच्या आईला खूप आनंद झाला. त्यांच्या गप्पा रंगल्या.. अलोक हळूच आभा कडे बघत होता. किती बदललीये ही.. टुकटुकीत गहुवर्ण, बोलके डोळे, किंचित अपर नाक, इवलीशी जिवणी, आणि या सर्वांची शोभा वाढवणारा तो लांबलचक केसांचा दाट शेपटा.
दोघींच्या गप्पा रंगल्या तोपर्यंत आभानी अलोकशी बोलत पटपट स्वयंपाक आटोपला.
तो तिच्या सगळ्या मोहक हालचाली,शालिनता, बोलण्यातलं आर्जव, नीटनेटकेपणा सगळं निरखत होता.. त्याला जाणवलं हीच ती.. नक्की हीच ती… जेवणं आटोपली.
वसुधाताई तिच्या स्वयंपाकावर खूष झाल्या, त्यांनी अलोक कडे पाहिलं.
त्यानी मानेनीच संमती दिली. वसुधाताईंनी विषय काढताच सुमतीबाई, आणि आभा चकितच झाल्या.
आभानी हळूच अलोककडे पाहिलं. तो तिच्याकडेच बघत होता.. तिनं हसून मान हलवली. आणि लवकरच आभा अलोकची पत्नी बनून मुबंईला आली.
आभा आली नी घराचं रुपचं पालटलं.. वसुधाताई संधिवाताने जास्त काम करू शकत नव्हत्या. पण तो घरातला अस्ताव्यस्त पडलेला पसारा तिनं नीट लावला.
अलोकनी पण मग सगळ्या वस्तू तिला लागतील तश्या, आवडतील तश्या घेतल्या. शेजारी, सगळ्या नातेवाईकांशी तिचे संबंध प्रेमाचे होते. आता सगळ्यांना ती लागू लागली.. बाहेरची, बँकाची सगळी काम तिच बघत हॊती.
अलोकनी स्वतःला कामात पूर्ण झोकून घेतलं होतं. आरती आणि ती तर जवळच्या मैत्रिणीचं होत्या. ती माहेरपणाला आली की आभा तिचं इतकं अगत्य करे की तिचं पाऊलच घराबाहेर पडत नसे.
वसुधाबाई आता निर्धास्त झाल्या. त्यांना कुठलीचकाळजी राहिली नाही. आणि अलोक.. तो तर सौख्यात तरंगत होता.. थोड्याच दिवसात चिनू आणि नभा दोन गोंडस बाळांचा बाबा झाला तो…
अलोकच्या डोळ्यासमोर पेपर होता पण लक्ष आभाकडे होतं.
स्वयंपाकघरात तिनं गॅसवर एकीकडे कुकर लावला होता दुसरीकडे भाजी शिजत हॊती.. तोपर्यंत तिने चिनुला सायकल खेळायला पाठवलं. नभा चित्र रंगवत हॊती. तिला मधेच येऊन सुचना देतं हॊती. वसुधाताईची औषधं काढून त्यांना ती नेवून दिली.
अलोकला लागणारा दुसरा चहा, तिनं गरम करून दिला, बाई काम करत हॊती तिला सुचना देणं चालू होतं..
एका वेळेस किती काम करते ही.. आता तिनं कणिक भिजवायला घेतली… किती सुरेख दिसतेय ही…
धुतलेले केस तिने पंच्यात घट्ट बांधले होते, तरी एकदोन बटा बाहेर आलेल्या चेहऱ्याला घामानी चिटकून बसल्या होत्या. पुजा करून झाल्यावर लावलेलं कुंकू घामानी विस्कटलेलं होतं. कणकेचा हात गालाला लागल्याने कणिक गालावर हलकेच पसरली हॊती. साडी तिनं कमरेला खोचली हॊती त्यामुळे तिची नितळ पाऊल तिच्या हालचालीबरोबर दौलदार हालचाल करत हॊती. हात एखाद्या नर्तकीसारखे वेगात चालले होते. पदार्थ करतांना तिच्या चेहऱ्यावर येणारे भाव, पदार्थ चाखायची तिची लकब तो मनमुग्ध होऊन बघत होता..
“अहो….”
तो भानावर आला.
“जरा मदत करताय का, आवरायला हवं…”
“सांग ना.”. तो लगबगीन उठला.
“बटाटेवडे करायचेत. येवढी तेलाची पिशवी फोडून दयाल का?”
“अगं कात्री कुठेय…”
“असं काय करताय, ओट्यावर समोरच आहे ना..”
“आणि तेलाची पिशवी?”
“ती टेबल वर आहे.. किटली.. अहो, बघाना.. समोरच आहे.. काय हा वेंधळेपणा.. मीच फोडली असती तर बरं झालं असतं..
सरला.. नीट पूस.. कोपरा पुसायचा राहिला आहे…
अरे, देवा, तेलं सांडलं ना खाली..” आभाची चिडचिड झाली.
अलोक कावरा बावरा होऊन बाजूला झाला..
नभा, चिनू पसारा आवरा..
अलोक उगीचच सोफ्यावरच्या मांडलेल्या उशा नीट लावू लागला..
आभाच्या ते लक्षात आलं. ती खुदकन हसली..
“असू दे माझं होतं आलाय. तुम्ही आता तुमचे आणि मुलांचे कपडे बदला..”
सगळं घर सजलं होतं. ठेवणीतल्या सगळ्या गोष्टी आभानी सुंदर रचून ठेवल्या होत्या.. Dinning table वर सगळा स्वयंपाक आकर्षक रीतीने मांडला होता. मुलं व्यवस्थित कपडे घालून शांतपणे गोष्टीची पुस्तकं वाचत बसली हॊती.
आभानी हलका गुलाबी रंगांचा सलवार कमीज घातला होता. त्यावर नाजूकसे मोत्याचं मंगळसूत्र, कानात छोटेसे मोत्याचे टॉप्स, हातात एक एक बांगडी.. मोजक्याच दागिन्यात तिचा समाधानी चेहरा उठून दिसत होता.. तिच्या हालचालीबरोबर हलणारा तिचा तो जाड शेपटा नजर खिलवून ठेवत होता.. बेल वाजली..
आभा नी अलोकनी त्या दोघांचे स्वागत केले. खरं तर हॆ तिघेही सांगलीचेच.. त्यामुळे लहानपणापासून ओळख.. परेशनी तर अलोकला मिठीच मारली.. तिघेही भरावले.. पाठोपाठ रोमा ही आली.. कसं काय हॆ ध्यान आवडलं परेशला.. आभा तिला बघत हॊती.
बड्या बापाची लाडवलेली लेक.. बुटकी, जाड.. काय ते कपडे.. काय तो मेकअप.. सगळ्यांच्या गप्पा सुरु झाल्या..
अलोक बघत होता.. हीच का आपली आभा.. ती परेशशी वेगवेगळ्या विषयावर ठाम पणे बोलत हॊती.. मुद्दे मांडत हॊती.. कुठून मिळवते ही माहिती?
अलोक विस्मित झाला.. तिघांच्या गप्पा रंगल्या. रोमाला काही ह्यात इंटरेस्ट नव्हता. ती घराच अवलोकन करत हॊती..
“Two B. H. K. का फ्लॅट.. तुम्हाला पुरतो का? Clubhouse आहे का?
तुझं शिक्षण काय झालं? Housewife आहेस ना..”
आभाचा मुड बदलतहोता.
परेश ओशाळवाणा झाला. अलोकच्या लक्षात आलं हॆ.
“चला.. जेवू यात.. भूक लागली ना परेश..”
“अरे जिन्यात खालपासून सुवास येतोय.. आभाच्या हातच जेवण म्हणजे पर्वणी..”
पान वाढली.. बटाटे वडे, पुरी, श्रीखंड, मसालेभात.. चटण्या, कोशिंबीरी..
परेश मनलावून जेवत होता, नावाजात होता.. रोमाची मात्र काही तरी कुरकुर चालू हॊती..
सगळे पोटभर जेवले. मुलं रोमा आंटीचा नूर पाहून आत निघून गेली..
परत गप्पा रंगल्या.. रोमाची टूरटूर सुरु झाली. आता मात्र परेश उठला. रोमाला म्हणाला, “तु गाडीत बस मी आलो.”
रोमा गेली.. परेश म्हणाला, “अलोक, लकी आहेस.. एवढी चांगली बायको मिळाली.. मला मागणी घालायची संधीच तु दिली नाहीस.. भेटू यात पुन्हा.. बाय..”
सगळे गेले.. आभा मटकन खाली बसली. तिचे डोळे पाणावले होते..
अलोक जवळ गेला.. मला बसू दे थोडा वेळ.. तो आत जावून पुस्तकं घेवून बसला. वसुधाताई पण लांबून बघत होत्या.. तिला वेळ देणं गरजेचे आहे हॆ त्यांनी जाणलं.
त्या शांत बसून राहिल्या. आभा जेवलीच नाही. तिनं सगळं नीट आवरून ठेवलं.
बेडरूम मधे जावून ती पलंगावर आडवी पडली. ती पाठमोरी झोपलेली हॊती तरी तिचे ते उष्ण श्वास, डोळ्यातून वाहणारे पाणी, तिची घालमेल बाजूलाच असणाऱ्या अलोकला जाणवत हॊती. ती जेवली नाही हॆ ही त्यानं पाहिलं होतं..
“चला, चहा तयार आहे.. पाच वाजले..” वसुधाताई टेबलाजवळ आल्या.
त्यांनी सहेतूक आत पाहिलं. त्यांनी थांब म्हणून खूणवलं. तो आत गेला..
“राणीसाहेब, येताय ना चहा गार होतोय.” त्यानी हॆ अशा अविर्भावात म्हटलं की तिला हसू आलं… ती खुदकन हसली.
तिघांनी मिळून चहा घेतला.
ती बेडरूम मधे गेली तर तिची बॉटल ग्रीन रंगाची साडी त्यानं काढून ठेवली हॊती.
तिला लक्षात आलं त्यांच्याबरोबर बाहेर जायचंय.. तिनं आवरलं स्वतःच आणि ती हॉल मधे आली. आलोक आणि वसुधाताई तिच्या कडे बघतच राहिले.
तो रंग तिला खूप खुलून दिसत होता. त्यावर केलेला हलकासा मेकअप, ती आरोग्यपूर्ण काया..
“Marvelous…” तो अनाहुतपणे उदगारला.
“तुझी आज दृष्ट काढते ग..” वसुधाताई मायेनी उद्गारल्या.
“आई, जावून येतो.. स्वयंपाक तयार आहे. मुलांना भूक लागली तर चिवडा दया.” ती म्हणाली.
दोघं बाहेर पडले. त्यानी रिक्षा थांबवली. तिनं प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिलं. तों फक्त हसला.
ती त्याच्याकडे बघत हॊती. किती देखणा दिसत होता तो..
हलक्या पिवळ्या रंगाच्या टि. शर्ट मधून त्यानं नियमित व्यायाम करून कमवलेलं पिळदार शरीर उठून दिसत होतं. त्याचा गॉगल, त्याचं घड्याळ, त्याची उच्च अभिरुची दाखवत होतं. त्याचं ते आत्मविश्वासपूर्ण चालणं, वागणं.. तिला जाणवलं अरे आपण किती दिवस झालें एकत्र बाहेरच नाही पडलो..
रिक्षा आता वळली.. मोकळं वारं जाणवू लागलं. तिनं बाहेर डोकवून पाहिलं.. जुहू चौपाटी..
“अरे मुलांना नसतं का आणलं..”
तों मिस्किल हसला फक्त..
खाली उतरले नी गजरेवाला समोर आला..
त्यानं पन्नासची नोट पुढे केली..
येतील तेवढे दे..
ते गजरे तिने शेपट्यावर माळले.
त्यानी मनभरून सुगंध घेतला..
तिला हॆ सगळं काय चाललंय कळतच नव्हतं.
“अहो.. सांगा ना…”
“वेडाबाई.. आज तारीख किती..”
“22 एप्रिल…”
आता तिला आठवलं, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस..
ती हळूच त्याला बिलगली..
आज कामाच्या नादात ती विसरलीच हॊती..
पण नेहमीच विसरणाऱ्या त्यानी आज हा दिवस लक्षात ठेवला होता..
आता तिला लक्षात आलं की हॆ सगळं काय आहे..
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हीच साडी नेसून, असंच रिक्षानी ते इथे आले होते.. असेच त्यानी तिच्या केसात गजरे माळले होते..
तब्बल बारा वर्ष.. एक तप..
वाळूत ते एकमेकांना बिलगून बसले.. बारावर्षापूर्वीचा संकोच आता त्यांच्यात नव्हता..
सूर्य मावळत होता.
सूर्याची ती सोनेरी किरण दोघांच्या चेहऱ्यावर पडली हॊती..
आज एका तपा नी आता त्यांच्यात परिपक्वता आली हॊती.. ही वेडी ओढं नव्हती..
त्यानं तिला जवळ घेतलं.. तिचे हात हातात घेतं ती म्हणाला.. “मी खूप भाग्यवान आहे. असं म्हणतात, की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तु माझी दिपशिखा आहेस. आज मी, माझं घरं जे उभं आहे ते तुझ्यामुळे.. पण”
तिनं त्याच्याकडे पाहिलं..
“आता मी तुला घरात नाही बसू देणारं.. तु हवं ते शिक, नोकरीं कर.. तुला हवं ते कर.. पैश्यासाठी नाही.. तर स्वतः साठी.. तुझ्या अस्मितेसाठी..”
तिला भरून आलं.. रस्त्यावर दिवे लागत होते.. तिला पुढचा उजळलेला रस्ता दिसत होता..
त्यानी मस्तपैकी पूर्वी खाल्ली हॊती तशी भेळ, पाणीपुरी खाल्ली.. बर्फचा गोळा बर्फ सांडत सांडत खाल्ला.. खूप हसत हॊती आज ती.. चालतच परत निघाले ते.. रस्त्यात लागलेल्या P. N. Gadgil च्या दुकानात तों शिरला.
अहो.. म्हणेपर्यंत तों काउन्टर वर पोचला देखील..
तिच्या आवडीनं त्यानं एक नाजुकस मंगळसूत्र खरेदी केलं..
Ice-cream घेवून घरी पोचले तर मुलं आणि आजी केक मांडून वाट बघत बसली हॊती.. नवीन सुखद धक्का.. मोठ्या आनंदात तिनं केक कापला..
वसुधाताई मीठ मोहऱ्या घेवून उभ्या होत्या.. आज त्यांना दृष्ट काढायची हॊती एका गृहलक्ष्मीची.. एका संपदेची.. जी कधी उतत नव्हती..मातत नव्हती.. घेतला वसा टाकत नव्हती.. सुखदलक्ष्मी हॊती ती…
© मृणाल शामराज
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
खूपच सुंदर कथा.
धन्यवाद मॅम