तु ही रे

© सौ . मिनाक्षी नागेश पाखरे
” चल , आवरलस का ? तुला कॉलेजमध्ये सोडून मी ऑफीसला जाईन.” खिशात मोबाइल ठेवता ठेवता सुरेश म्हणाला .
” हो , आलेच” म्हणत अलका पर्स घेऊन बाहेर आली .
” एवढा वेळ फोनवर कुणाशी बोलत होतीस ? “
” काही नाही , सहजच !” तिला नवल वाटले , एरवी कधीही असे काहीही न विचारणारा आज कशासाठी एवढी चौकशी
करतोय .
ती आपल्याकडे टक लावून पहातेय हे लक्षात येताच “चल , उशिर होतोय” म्हणत तो पटकन बाहेर पडला .

कारमध्ये बसल्या बसल्या ती त्याला न्याहाळू लागली . सामान्य रंगारूपाचा सुरेश तिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठा होता . आणि ती म्हणजे फक्त सावळा रंग सोडल्यास ,ऊंच , शेलाटी सुरेख होती . तिच्यात एक आकर्षक गोडवा होता . ती चटपटीत , खेळकर , बडबड्या स्वभावाची होती . तिला धीरगंभीर वातावरण मुळीच आवडत नसे . ती म्हणजे चैतन्याचा सळसळता झरा च जणू!
शिवाय वडीलांची आर्थिक सुबत्ताही होती . पण या सर्वांवर तिच्या सावळ्या रंगाने आणि पत्रिकेने मात केली होती.
वडीलांचा ज्योतिषशास्त्रावर पूर्ण विश्वास होता . त्यामुळे प्रत्येक स्थळाकडून या ना त्या कारणाने नकार यायचा पण
सुरेशची पत्रिका तिच्या पत्रिकेशी छान जुळत असल्यामुळे आधी बाबांनीच या स्थळाला होकार दिला आणि तिलाही
बळेच बोहल्यावर चढवले .

फक्त वयाचा व रंगरूपाचा विचार सोडल्यास सुरेशकडेही आर्थिक सुबत्ता भरपूर होती . पण तो धीरगंभीर स्वभावाचा व मितभाषी होता.
” अलका , अलका अग कुठे हरवलीस ? कॉलेज आलं तुझं ! “
सुरेशने अलकाच्या खांद्याला धरून हलवले तशी ती भूतकाळातून वास्तवात येत अं हो म्हणत गाडीतून उतरली .
आत येताच तिच्या मैत्रिणीने अडवत तिला म्हटले , ” काय ग ? तुझा चेहरा असा का ? पवनचा फ़ोन होता तुझ्यासाठी आणि खरं खरं सांग , तुमचा काय प्लॅन चाललाय ?

“कुठे काय ? मला काहीही झाले नाही . तुच सांग ‘ पवन फोनवर अजून काही बोलला का ? आज आम्ही इथुन जाणार
आहोत .” अलका असे म्हणताच सुश्री तिच्याकडे बघतच राहिली .
” ए , तुला काय वेड लागलयं क़ा ? तु त्या पवनसाठी सुरेशला सोडायचा निर्णय घेतलास ? तुझ डोकं फिरल आहे का ? “
” हो , सोडणार आहे मी सुरेशला आणि मला पक्क माहीत आहे , यामुळे त्याला काहीही फरक पडणार नाही . ”

सुश्रीने अलका ला हलकेच खुर्चीवर बसवले , ” खरचं तुला वेड लागलयं अलका , अगं , एवढा प्रेम करणारा नवरा खुप नशिबाने मिळतो , बाईसाहेब – तु त्याला ओळखू शकली नाहीस . तुला ना त्याची किंमतच समजलेली नाही . ते मितभाषी असतीलही . तुझ्यासारख त्यांना रोमँटीक बोलता वागता येत नसेलही पण त्यांच्या एकंदर वागणुकीवरून तु समजून घ्यायलां हवं होतस ! जा , तु खरंच जा, त्या पवनसोबत बाहेर गेल्यावरच तुला प्रेमाची खरी किंमत कळेल . जा आत्ताच्या आत्ता ! “
सुश्री ताडताड पावले टाकत निघून गेली.

पण अलका तशीच दगडासारखी निस्तब्ध बसुन राहिली . राहून राहून सुश्रीचे बोलणे तिला आठवू लागले . खरंच सुरेशचे प्रेम आहे आपल्यावर , आपण त्याला आवडतो ? की आपणच त्याला ओळखू शकलो नाही , लग्नाला तीन वर्ष पुर्ण होऊन गेल्यावरही ! आपण
तर आपल्या परीने खूप प्रयत्न केले , चांगली पत्नी होण्याचा , त्याला समजून घेण्याचा . दरवेळी तिला वाटे , आता आपण सुरेशला पुर्णपणे ओळखायला शिकलोय , पण सुरेशच्या वागण्याने ती आशा पार मावळून जायची , याला कारण त्याचा अबोल स्वभाव .
तो तिच्या कुठल्याही कृतीला भरभरून प्रतिसाद देतच नसे . त्याने तिच्या कुठल्याही गोष्टीत कधीच हस्तक्षेप केला नाही , उलट तिला जे काही हवं असेल , ती काही सांगायच्या आत तो स्वतःच समजून आणून देई .

पैशाचा हिशोबही तो कधीच विचारत नसे . कधीतरी ती चिडून त्याला लागेल असे बोलायची , वागायची पण स्वतःची चुक नसतानाही तो हसत हसत मान्य करी . त्याचा हा गुळमुळीतपणा तिला अजिबात आवडत नसे .
त्याने रागवावे , जोरजोरात भांडावे आणि नंतर तितक्याच आवेगाने जवळ घेऊन लाड़ करावे . एवढे पैसे कुठे खर्च केलेस , एवढा वेळ कुठे गेली होतीस , म्हणून अधिकाराने ज़ाब विचारावा . आणि तितक्याच उत्कटपणे प्रेमही करावे असे तिला वाटे . पण तो यातली कुठलीच गोष्ट करत नव्हता , फक्त चांगला आणि चांगलाच वागत असे आणि याचा, तिला तिटकारा आला होता .

त्याचे आपल्यावर खूप प्रेम आहे हे तिला माहीत होते ‘ पण ते व्यक्त करण्याची कला त्याला अवगत नव्हती आणि हेच तिच्या रागाचे मुख्य कारण होते .
डोकेदुखी चे कारण पुढे करून तिने आपला वर्गावर असलेला तास दुसऱ्या मॅडमना घेण्याची विनंती केली आणि स्टाफ रूममध्ये येऊन डोळे मिटून खुर्चीवर स्तब्ध बसून राहीली . हलकेच तिने मान मागे टेकवली .
तिला आठवलं ‘ सुरेशचा बिझनेस वाढत चालल्यामुळे तो कामात जास्तीत जास्त व्यस्त होत होता . अलकाला तो जरासुद्धा वेळ देऊ शकत नव्हता म्हणून मग त्याने स्वतःहून अलकाला म्हटले , अलका तु पण कुठेतरी जॉब बघ म्हणजे तुझ्या शिक्षणाचा सदुपयोग होईल शिवाय मन रमेल वेळही चांगला जाईल .

एवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली . या वेळेस सुरेशचा फोन ! तिने हॅलो म्हणताच , ” अलका , आज जीव खूप घाबरा होतोय , अस्वस्थ वाटतेय . का कुणास ठाऊक तुझी काळजी वाटतेय , प्लीज , संध्याकाळी घरी लवकर ये मीपण लवकर येण्याचा प्रयत्न करेन म्हणजे येईन . आज तु जवळ असावीस असं खूप तीव्रतेने वाटतय , येशील ना ! “
“ठीक आहे , बघते” असे त्रोटक उत्तर देऊन फोन ऑफ केला .
तिला सकाळपासून आश्चर्याचे धक्के बसत होते . आजपर्यंत त्याने असे कधीच म्हटले नव्हते . माझी काळजी कधीपासून . वाटायला लागली सुरेश ! आज मी तुमच्यापासून कायमची दुर जाणार आहे आणि आज तुम्हाला मी जवळ हवी आहे . तिने नाक मुरडले पण परत तिला सुश्री चे बोलणे आठवले .

खरचं , ही प्रेमाची अनुभूती तरं नव्हे ! खरचं आपण एकमेकात एवढे गुंतलोय ‘ विचारात असतानाच पुन्हा रिंग वाजली , ” हॅलो अलका , मी पवन बोलतोय . बरोबर पाच वाजता रेल्वेस्टेशन वर ये , मी तुला तेथेच भेटेन .”
” नको पवन , रेल्वे स्टेशनवर नको , माझी बॅग तुझ्या रूमवर आहे ना , मी तिथेच येते मग सोबतच निघू . ” त्याने काही बोलायच्या आतच अलकाने फोन कट केला .
वर्ष होत आलं होत , पवनची ओळख होऊन . आकर्षक व्यक्तीमत्वाचा आणि मिठ्ठास वाणीचा पवन . पहिल्या भेटीतच ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती .

स्वतःच्या पतीबद्दल जी स्वप्ने रंगवली होती अगदी तसाच होता तो . तिच्या स्वप्नातला राजकुमार . खूप उशिरा भेटला पण एखाद्या चुंबकीय आकर्षणा प्रमाणे ती त्याच्याकडे ओढली जाऊ लागली , हे चुकतयं कळतं असुनही .
एकदा अलकाला घरी जाण्यास खूप उशिर झाला म्हणून पवन तिला तिच्या घरी सोडावया स आला होता त्यावेळेस सुरेश घरीच होता. तिला वाटले ‘ त्याला आपला राग यावा ‘ पवनबाबत खोदून खोदून विचारावे ‘ त्याचा चांगला जळफळाट व्हावा पण सुरेशने यापैकी काहीही केले नाही उलट अलकाला व्यवस्थित घरी आणून सोडल्या बद्दल पवनचे आभार मानले .

हा माणूस आहे का देवमाणूस ? नेहमीच एवढा कसा तटस्थ असतो हा ना राग ना लोभ ! तिला सुरेशला ओरडून सांगावेसे वाटले ‘ मला नवरा म्हणून सामान्य माणूस हवाय . रागावणारा , चिडणारा ‘ अधिकार गाजवणारा आणि तसेच भरभरून प्रेम करणारा . तुझ हे देवत्व नकोय मला .
अरे, साधी चौकशी तरी कर ‘ कोण आहे तो ? तुझी त्याच्याशी ओळख कशी ? का तुला माझ्याशी काहीही देणेघेणे नाही ? किती परक्यासारखा वागतोय हा ? .  आणि या प्रसंगानंतर अलका पवनपाशी जास्तच ओढली गेली.

तो तिच्याच कॉलेजमध्ये इंग्रजी या विषयाचा लेक्चरर होता . त्यामुळे दिवसभरात ते खूपवेळा समोरासमोर येतं . त्याचं ते भरभरून बोलणं , दिलखुलास हसणं , खट्याळपणे तिची चेष्टा करणं ‘ रागावणं ‘ रुसणं तिच्यावर अधिकार गाजवणं सारचं तिला मोहून टाकत होतं . त्यालाही तिच्याबद्दल कुछ कुछ होत होते . तिचं ते टक लावून बघणे ‘ त्या ला भरभरून प्रतिसाद देणे तोही तिच्यात गुंतत चालला होता .
आणि मग जास्तीत जास्त वेळ एकमेकांच्या संगतीत घालवणं हे नेहमीचचं झालं . एक दिवस दोघेही एकाच बाईकवरून जात असताना रस्त्यात सुरेश ने दोघांना बघितले . पवन व सुरेशची नजरानजर झाली आणि अलका ती पवनला घट्ट चिकटून बसली होती सुरेशला बघून ती जराही सावरली नाही पण पवनची मात्र घाबरगुंडी उडाली .

अलका ‘ आता घरी गेल्यावर तुझं काही खरं नाही . त्यावर नाक मुरडत ती म्हणाली , हं , तो मला काहीच बोलणार नाही आणि काही विचारणार ही नाही . त्याला माझ्याशी काहीही देणंघेणं नाही ‘ ना प्रेम ना द्वेष . बायको तरी मानतो की नाही कुणास ठाऊक ? त्याला मी कसेही वागले तरी काहीच फरक पडत नाही ‘
” कमाल आहे याची हं, मी तरं असलं काही जरासुद्धा सहन केलं नसतं ‘ रस्त्यातच कॉलर पकडून चांगला जाब विचारला असता . “
पवनच्या या वाक्यावर अलका खळखळून हसली आणि त्याला मागून ढुसणी देत म्हणाली ‘ ” म्हणून तर मला तु आवडतोस . तुझ्यात ते सगळ आहे ‘ जे सुरेशमधे नाही ‘ तु चांगला ‘ वाईट ‘ डॅशिंग सगळं काही आहेस पण सुरेश फक्त चांगला आणि चांगलाच आहे आणि तेच माझ्या सहनशक्ती पलीकडचे आहे . “

” त्याला जर तुझ्याशी काही घेणंदेणं नाही ‘ तुझ्याबद्दल त्याला काहीही भावना नाहीत आणि तुलाही तो आवडत नाही तर मन मारून कशाला रहातेस त्याच्याबरोबर , सोडून दे त्याला . आपण आहोत ना दोघे एकमेकांना अनुरूप !” त्याने बाईक एका जागी थांबवत म्हटले .
बाईकवरून उतरत ती म्हणाली ‘ ” मग काय करू मी ?”
“आपण दोघे येथून खूप लांब निघून जाऊ” तो खूप वेळ तिला समजावत राहीला आणि ती त्याला नाही म्हणूच शकली नाही . आणि आज जेव्हा जाण्याची वेळ आली तर ती भूतकाळात च रमलेली होती .
तिने घड्याळात पाहिले पाच वाजत आले होते ती पवनच्या घरी निघाली .

पवनकडे ती शरीराने निघाली होती पण मनमात्र सुरेशकडेच ओढ़ घेत होते. त्याच्या खाण्यापिण्याची तिला काळजी लागलेली . जेव्हा त्याला हे समजेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय आणि कशी असेल ? तो एकटा कसा हा धक्का सहन करू शकेल ? स्वतःची चुक कळेल का त्याला की काहीच फरक पडणार नाही ?
कितीतरी विचार चालू होते त्याच्याबद्दल !
आपण आजपर्यंत मनानं कधीच सुरेशजवळ गेलो नाही , आज प्रत्यक्षात त्याच्यापासून दूर होताना , त्याच्याजवळ का ओढले जातोय आपण ? त्याची खूप आठवण येतेय त्याची काळजी वाटतेय , कसा राहणार तो एकटा ?

कुठल्या चुकीची शिक्षा देतोय आपण त्याला ? त्याला कितीही त्रास झाला तरी तो गप्प बसून सहन करत राहील एकटाच ! तो तर आपल्याशी कधीच वाईट वागला नाही उलट कधीच, काहीही न सांगता तो स्वतःच सारे काही समजून घेई . त्याला प्रेम व्यक्त करता येत नाही एवढीच काय त्यांची चूक ! आज त्याच्याबद्दल एवढं – का दाटून आले आहे .
इतके दिवस , दिवसरात्र एकत्र , एकाच घरात राहूनही त्याच्याबद्दल कधीच ओढ वाटली नाही मग आज असं का होतयं , आपण खरचं प्रेमात पडलोय सुरेशच्या अगदी मनापासून ! तिला काहीच समजेनासे झाले .

दारातच पवन तिची वाट बघत उभा होता . तिला आलेली बघताच तो घाईघाईने म्हणाला , ” किती उशिर केलास गं ! आता लवकर पोहोचायला हवं स्टेशनवर !”
ती दगडासारखी स्तब्ध उभी होती .
शेवटी तिच्या खांद्याला धरून हलवत तो म्हणाला , ” बाईसाहेब , आत्ताच स्वप्नात गुंग झालात का ? चला लवकर ‘ स्वप्न पूर्ण करण्यासाठी !
” नाही पवन ‘ स्वप्नात नाही , उलट आत्ता स्वप्नातून वास्तवात आले . मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत ‘ सुरेशला सोडून ?

” काय ? काय म्हणालीस ? त्या बावळट सुरेशसाठी माझ्यासोबत येत नाही म्हणे ! आपल प्रेम आहे ना एकमेकांवर ‘
” प्रेम तुझ्यावर ! माहीत नाही खरचं प्रेम होतं की सुरेशला डिवचण्यासाठी ‘ त्याला त्रास व्हावा म्हणून तुझ्याजवळ आले मी. ” .
” तु काय मला खेळण समजतेस का ? मनात येईल तेव्हा पाहिजे तसं वागायला ! तो चिडून म्हणाला .
“मला माफ कर पवन ! मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत !”
शांतपणे पवन म्हणाला ‘ ” सुरेशला काही समजले का ? आणि समजले तरी तो वेडपट तुला काय म्हणणार म्हणा ! आणि त्या वेड्या च्या नादी लागून ‘ तु हातात आलेल्या सुखावर पाणी सोडतेस . चल मी काही तुला सोडणार नाही.” त्याने तिच्या हाताला ओढत म्हटले

” खबरदार पवन ‘ सुरेशबद्दल काही बोललास तर ! उलट लग्न झालेल्या स्त्रीला जाळ्यात ओढण्यापूर्वी तु समजून सांगायला हवे होतेस, मला परावृत्त करायला हवे होतेस . जाऊ दे मला !
” आली मला अक्कल शिकवायला ! मी तुला अस सोडणार नाही .” पवन तावातावाने ओरडत होता. पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत तिने आपली बॅग उचलली व घराबाहेर पडली . मागून पवनचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता .
आता तिला काहीच ऐकू येत नव्हते ‘ दिसत नव्हते काही समजत नव्हते फक्त वाट बघणारा सुरेश दिसत होता डोळ्यासमोर !

स्वतःच्या घरात पाऊल टाकताच तिला एकदम हलके वाटले ‘ समोर बघितले तर सुरेश तिच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ घेउन उभा होता. सगळ्या घरात तिच्या आवडीच्या फुलांची सजावट केली होती . त्याचा मंद सुगंध घरात दरवळत होता . अलकाला बघताच ‘ सुरेश गुडघ्यावर बसत ‘ तिच्या हातात गुच्छ देत म्हणाला ‘ मला माहीत होते अलका ‘ तु मला सोडून कुठेच जाऊ शकत नाहीस आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतले.
” म्हणजे’ तुला माहीत होते सगळे ! ..

“हो , फोनवर मी तुझे आणि पवनचे बोलणे ऐकले होते . तुला पवन आवडतो आणि आज तु कायमची त्याच्यासोबत जाणार हे पण माहीत होते .”
तिने त्याला मिठीतून दूर ढकलत ‘ झिडकारले . ” अरे , असला कसला रे नवरा तु ? तुला काहीसुद्धा वाटले नाही . चुकलचं माझं ‘ मी घरी यायलाच नको होते .
“नाही अलका ! चुक माझीच आहे . खरं सांगु ‘ मला तु खूप आवडतेस ‘ माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर . पण मला हे सगळ कस सांगावे हेच समजत नव्हते . मी काही बोलायला गेलो आणि ते तुला आवडले नाही तर ! मला तुला कुठल्याही बाबतीत दुखवायचे नव्हते .”

“अरे पण ! “
” प्लीज ‘ आज मला बोलू दे . तु मला सोडून जाणार हे कळल्यावर माझा मलाच खूप राग आला खूप कासावीस झालो गं मी ! तुझ्याशिवाय एकटं रहायचं ही कल्पनाच सहन होत नव्हती मला . पण एकीकडे असेही वाटले की ‘ तु जर पवनसोबत सुखी होणार असशील तर तुझ्या सुखाआड कसा येऊ मी ! मला तुला फक्त सुखी ‘ आनंदी बघायचे आहे म्हणून मी गप्प बसलो . पण आतून मी कोलमडून गेलो होतो पण मन म्हणत होते की तु नक्की घरी परत येशील . तु मला सोडून जाउच शकत नाहीस आणि म्हणून तुझ्या स्वागतासाठी हे सगळं !”

तिने त्याला सोफ्यावर बसवले व त्याच्याजवळ बसत म्हणाली ‘ ” असा कसा गं नवरा माझा भोळा सांब ! तु जरी मला जाऊ दिलस तरी मी बरी जाईन ! तुझी बायको आहे म्ह्टल . तुझ्या डोक्यावर बसून सगळे हट्ट पुरवून घेईन”
यावर दोन्ही कान पकडत सुरेश म्हणाला ‘ ” हो गं बायको ‘ मी स्वतःला बदलण्याचा नक्की प्रयत्न करेन . जमेल ना मला?”
त्याचे हात हातात घेत म्हणाली ‘ ” नको रे सुरेश’ . तु आत्ता जसा आहेस तसाच हवा आहेस मला . ही माझी आज्ञा समज हवतर !”
आणि हसतहसत दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून गेले .
समाप्त
© सौ . मिनाक्षी नागेश पाखरे

सदर कथा लेखिका सौ . मिनाक्षी नागेश पाखरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
एका वेगळ्याच विषयावरची ही कथाही अवश्य वाचा
स्वप्न

Leave a Comment

error: Content is protected !!