प्रेम, इर्षा आणि हवस …..

©आशिष देवरुखकर
श्रेया बारमध्ये टेबल आणि चार खुर्च्यांवर बसलेले चार मित्र समीर, सुधीर, राजेश आणि दिलीप. टेबलावर २ सोड्याच्या रिकाम्या बाटल्या, ४ रिकामे ग्लास आणि चकना. आज त्यांची पार्टी होती.
सुधीर : (शेवटचा पेग रिचवत) आपल्या ग्रुपच नाव काय तर SSRD..
राजेश : हो…
सुधीर : (नशेत) SSRD म्हणजे काय रे भाऊ???
दिलीप : SSRD म्हणजे समीर, सुधीर, राजेश आणि दिलीप.
सुधीर : नाय…. SSRD म्हणजे Sweet, Sexy, Romantic Dreams. हो ना रे समीर…..(कुत्सितपणे हसतो.) सुजाताला हाच मेसेज करायचास ना?

समीर : तुला ना खूप चढले सुध्या.
सुधीर : (थोडं नशेत) वेटर…. अजून एक ९० चा पेग भर.
समीर : अरे बस कर सुध्या, किती पिशील?
सुधीर : (नशेतच) तू गप रे. तुझी बढती झालीये ना, पिऊ दे मला. पार्टी दिल्यावर पार्टी देणाऱ्याने असे बोलायचे नसते.
समीर : अरे हो पण काहीतरी लिमिट. फुकटची मिळते म्हणून असे?
सुधीरला राग येतो आणि सुधीर निघून जातो. 

समीर : सुध्या थांब, अरे रागावू नको रे. सुधीर.
राजेश : जाऊ दे रे, चढले त्याला.
समीर : अरे नाही. मी जातो बघायला कुठे गेलाय तो. आधीच नशेत आहे. रागाच्या भरात कुठे काय केले तर…
दिलीप : अरे काही नाही करणार तो, असाच करतो तो नशेत. आम्हाला माहितेय. वॉशरूमला गेला असेल.
समीर : नाही नको, मी त्याला बघतो जाऊन.
समीर सुदधा टेबल सोडून सुधीरला बघायला जातो.
दिलीप : नेहमीचे नखरे आहेत रे सुध्याचे.
राजेश : नाहीतर काय. पी पी दारू प्यायची आणि नंतर अशीच काहीतरी खुसपट काढून निघून जायचं, म्हणजे बिल भरायला नको. 
दिलीप : नाहीतर काय, आता वहिनीचे नाव घ्यायची गरज होती का?
राजेश : बघ ना.

इतक्यात वेटर ९० चा पेग भरून आणतो. 
वेटर : साहेब, सोडा?
दिलीप : थांब, आम्ही घेतो. तू जा.
वेटर निघून जातो. 
राजेश : कुठे गेले काय माहित. 
दिलीप : सुधीर वॉशरूमच्या दिशेने गेला. मलापण जोरात झाले. मीपण जाऊन येतो.
दिलीप उठून वॉशरूमला जातो. राजेश एकटाच टेबलावर बसलेला असतो आणि इतक्यात उंचावरून कोणीतरी कारच्या टपावर पडल्याचा आवाज येतो.
राजेश : कसला आवाज रे?
वेटर : काय माहित?

इतक्यात सुधीर घाम पुसत टेबलाजवळ येतो आणि खुर्चीवर न बसताच तो ९० चा पेग सोडा न घालता गटागट पिऊन टाकतो. आहहह बोलून तोंड हातानेच पुसतो.
राजेश : झालं का, मिटल का तुमचं भांडण???
सुधीर : कोणाचं भांडण?
राजेश : तुझं आणि सम्याच.
सुधीर : चल काहीतरीच काय. मी वॉशरूमला गेलेलो. (सारखा घाम पुसत असतो.)
दिलीप : बघ मी बोललो होतो ना वॉशरूमला गेला असेल.
दिलीप तिकडून येत बोलतो आणि खुर्चीवर बसतो.

इतक्यात वेटर धावत येतो टेबलाजवळ….
वेटर : साहेब, साहेब. तुमच्यासोबत जे आले होते ना ते टेरेसवरून पार्किंगमधल्या एका कारवर पडलेत. 
दिलीप : काय
सगळे धावत बार बाहेर जातात. तर खरोखर एका गाडीच्या टपावर समीरचा रक्तबंबाळ मृतदेह पडलेला असतो. उंचावरून पडल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झालेला असतो. 
दिलीप : ये सम्या, उठ ना रे.
राजेश : दिलीप, गेलाय तो. पोलीस येतील. त्यांना काम करू दे.
सुधीर : हा तर खुर्चीवर बसला होता ना मग वरती कधी गेला.

दिलीप : तूच केले आहेस हे.
सुधीर : मी काय केलं?
दिलीप : तुमच्या दोघांची भांडण झाली आणि तूच त्याला वरून ढकलून दिलेस.
सुधीर : काहीही बोलू नकोस, भांडण झाली तरी मी असे काही करणार नाही.
राजेश : will you please shut your mouth Sudhir.  दिलीप शांत हो. पोलीस येतील इतक्यात. ते शोध घेतील. तू उगाच सुधीरवर आरोप नको करुस. ह्या अशा वेळेला आपण एकत्र राहील पाहिजे. शांत व्हा दोघांनी.

दिलीप : सॉरी सुधीर.
सुधीर : इट्स ओके.
थोड्यावेळाने पोलीस येतात आणि पंचनामा सुरू होतो. प्रत्यक्षदर्शी, वेटर आणि हे तिघे ह्यांचा जबाब नोंदवला जातो आणि पोलीस समीरचा मृतदेह ऍम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन जातात.
********
एका टेबलावर समीरचा हार घातलेला फोटो असतो आणि समोर पांढऱ्या साडीत डोक्यावर पदर घेऊन पाठमोरी बसलेली सुजाता पाहून दिलीप, राजेश आणि सुधीरला अश्रू अनावर होतात. समीरच बाराव असत आज. 
दिलीप : वहिनी, सावरा आता स्वतःला.
राजेश : हो वहिनी. जे व्हायचं ते झालं आता. असे किती दिवस तुम्ही समीरच्या फोटोसमोर बसून राहणार.
सुजाता डोळे पुसत असते आणि तेवढ्यात पोलिस येतात.

इन्स्पेक्टर : (डोक्यावरची टोपी काढत) मी इन्स्पेक्टर शरद. समीरच्या खुनाची केस माझ्याकडे आहे. त्याच्या चौकशीसाठी मी इथे आलोय.
सुधीर : खून नाही आत्महत्या केले साहेब त्याने.
इन्स्पेक्टर : आपण कोण?
सुधीर : मी सुधीर, सम्याचा आय मिन समीरचा मित्र. (घाम पुसतो.)
इन्स्पेक्टर : मिसेस सुजाता, समीरची कोणाशी दुश्मनी?
सुधीर : नाही नाही, कोणाशीच दुश्मनी नाही. साधा…..
सुधीरकडे कटाक्ष टाकत…. इन्स्पेक्टर : तुम्ही मिसेस सुजाता आहात का?

सुधीर : न… नाही.
इन्स्पेक्टर : हा मिसेस सुजाता.
सुजाता : नाही साहेब. कोणाशीच दुश्मनी नाही.
सुधीर : हा, मी बोललो होतो ना साहेब.
इन्स्पेक्टर : थोबाड बंद ठेवलत तर बंद होईल मिस्टर सुधीर.
दिलीप : सुधीर, जरा गप्प बसतो का?

सुधीर : हो. (घाम पुसतच असतो.)
इन्स्पेक्टर : that’s better. हा मिसेस सुजाता. त्यांना काही टेंशन्स वगैरे?
सुजाता : नाही. सगळं सुरळीत सुरू होते.
इन्स्पेक्टर : घराचे, गाडीचे हप्ते वगैरे थांबले होते का? पगार वगैरे.
सुजाता : नाही साहेब. घर पीडिजात आहे आणि गाडी नाहीये. पगार वगैरे सगळं नीट सुरू होत.
इन्स्पेक्टर : कामावर काही टेंशन्स.
सुजाता : माहीत नाही.

इन्स्पेक्टर : माहीत नाही म्हणजे?
सुजाता : ते कधी काही ऑफिसमधले बोलायचे नाहीत घरी.
इन्स्पेक्टर : ठीक आहे. (तिघांकडे बघून) तुम्ही कोण?
सुधीर : (एकदम लागबगीत) मी सुधीर, समीरचा मित्र.
इन्स्पेक्टर : (दरडावरून) तुम्ही मध्येमध्ये बोलू नका. 
दिलीप : सुधीर जरा शांत राहशील. साहेब मी दिलीप, हा सुधीर आणि हा राजेश.
इन्स्पेक्टर : मृताशी ओळख कशी.

दिलीप : आम्ही चौघे वर्गमित्र. शाळेत असल्यापासून पदवीधर होईपर्यंत एकत्रच होतो. 
इन्स्पेक्टर : अच्छा, म्हणजे खून झाला त्यादिवशी त्याच्यासोबत जे तिघे होते ते तुम्हीच.
दिलीप : हो, आम्ही तसे ऑलरेडी सांगितलं आहे जबानीमध्ये.
इन्स्पेक्टर : हो, मी वाचलंय. समीरच्या खुनाची केस नव्याने माझ्या हाती आले म्हणून मी सगळी चौकशी पुन्हा करतोय.
दिलीप : पण साहेब समीरचा मृत्यू बारच्या टेरेसवरून पार्किंगमधल्या कारवर पडून झालाय मग त्याला तुम्ही खून कसे म्हणू शकता.

इन्स्पेक्टर : हम्मम. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर सगळं क्लिअर होईलच. बर समीरचे कोणाशी वैर वगैरे?
दिलीप : नाही नाही. साधा होता तो एकदम. 
इन्स्पेक्टर : मग कोणाशी भांडण वगैरे?
सुधीर : नाही नाही, कोणाशीच भांडण नाही. आमचं ते आपलं पिण्यावरून झालं होतं बाकी काही नाही. पण मी काही नाही केलंय.
इन्स्पेक्टर : अच्छा, म्हणजे तुमच्याशी भांडण होत तर.

दिलीप : सुधीर शांत बसतो का? 
इन्स्पेक्टर : त्या रात्री काय झालं होतं?
दिलीप : साहेब त्या रात्री आम्ही चौघे श्रेया बारमध्ये बसलो होतो. सुधीर, मी आणि समीर एकाच ऑफिसमध्ये आहेत. समीरची बढती झाली होती म्हणून त्याने आम्हा चौघांना पार्टी दिली होती. 
इन्स्पेक्टर : मग तिथे असे काय झालं की समीरने टेरेसवरून उडी मारली.
दिलीप : काहीच नव्हतं झालं साहेब.

इन्स्पेक्टर : ठीक आहे. तुम्ही आता या, मला मिसेस सुजाताची आणखी चौकशी करायची आहे.
दिलीप : हो साहेब.
तिघे तिथून निघून जातात
इन्स्पेक्टर : हा मिसेस सुजाता, तुम्ही मला समीरचे बँक डिटेल्स दाखवू शकता का? 
सुजाता : हो साहेब.
सुजाता डाव्या बाजूला खोलीत जाते आणि इन्स्पेक्टर घर न्याहाळू लागतात.

त्या रात्री पुन्हा एकदा तोच सेम बार, टेबल आणि खुर्च्यांवर सुधीर, राजेश आणि दिलीप. समोर भरलेलं ग्लास आणि चकना.
दिलीप : काय होऊन बसले रे हे.
राजेश : सगळं कसं छान चाललं होतं. समीरला बढती मिळाली होती. किती खुश होता तो. त्याच कारच स्वप्न पूर्ण होणार होते रे.
सुधीर नेहमीप्रमाणे अधाश्यासारखा दारू पित होता.
दिलीप : हो ना.
राजेश : मला म्हणाला होता बढती झाली की दोघांचे तीन होणार आम्ही. आधीच ठरवले आहे आम्ही.

दिलीप : कोणाची नजर लागली त्याला काय माहित!
सुधीर : ( वरती शून्यात नजर लावून) नजर वगैरे काही नाही लागली त्याला. श्राप लागलेत त्याला श्राप, आमच्यासारख्या लोकांचे बाकी काही नाही. 
दिलीप : म्हणजे?
सुधीर : बॉसचा लोम्बत्या होता साला. नुसता बॉसच्या मागेमागे करायचा. चाड्या करायचा आम्हा सगळ्यांच्या बॉसकडे. बॉसच आणि त्याच लफडं होत मला पक्का डाऊट आहे. उगीच नाही बॉस त्याला सारखी केबिनमध्ये बोलवायची. उगाच नाही त्याला बढती मिळाली लगेच.

दिलीप : काय बोलतोयस सुधीर…
सुधीर शून्यातच नजर लावून. राजेश त्याला हलवतो आणि विचारतो.
राजेश : अरे कसले शाप? काय बोलतो आहेस तू सुधीर?
सुधीर : (भानावर येत) कसला शाप? कुठे काय, काही नाही. 
सुधीर नजर वळवतो.
दिलीप : चढले भोस*च्याला. फुकटा साला.
सुधीर : फुकटा कोणाला बोलतो रे हा.
सुधीर दिलीपला मारायला जागेवरून उठतो इतक्यात इन्स्पेक्टर तिथे येतात.
इन्स्पेक्टर : काय चाललंय रे.
राजेश : काही नाही साहेब. ते जरा गम भुलाने के लिये…
इन्स्पेक्टर : म्हणून मारामारी?

दिलीप : साहेब मारामारी नाही ते आपलं असच.
इन्स्पेक्टर : बर बर, ठीक आहे. वेटर…..
वेटर पाणी घेऊन येतो.
वेटर : सलाम साहेब.
इन्स्पेक्टर : हम्म, बोल आता पोपटासारखा. काय झालं होतं त्या रात्री.
वेटर : साहेब मी जबानी दिले स्टेशनात.
इन्स्पेक्टर : परत सांगतो आहेस की घेऊ आत.
वेटर : नको. सांगतो मी.

इन्स्पेक्टर : लवकर.
वेटर : त्या रात्री हे तिघे आणि ते जे पडले ते मिळून दारू पीत होते आणि ह्या साहेबांनी ९० चा पेग मागवला. नंतर अचानक उठून ते वॉशरूमच्या दिशेने निघून गेले आणि नंतर जे वरून साहेब पडले ते सुद्धा गेले. काही वेळाने ते साहेब वरून पडले ते बघायला मी बाहेर गेलो. मी धावत यांना सांगायला आलो.
इन्स्पेक्टर : जेव्हा तू यांना सांगायला आलास तेव्हा इथे कितीजण होते?
वेटर : तिघे.
इन्स्पेक्टर : म्हणजे हे वॉशरूमला जाऊन परत आले होते तर.
वेटर : हो.
चौकशी बराचवेळ सुरू होती. खूप रात्र झाली आणि तिघे राजेशच्या घरी गेले. त्याच्या भिंतीवर समीरचा हार घातलेला फोटो असतो. तिघे आत येतात आणि राजेश लाईट लावतो.

दिलीप : ही पोलिसांची कटकट केव्हा संपणार कोण जाणे?
राजेश : हा ना, थोडं दुःख कमी करायला गेलो तर आले लगेच तिथे.
दिलीप : बघ ना यार.
सुधीर गप्पच राहतो.
राजेश : दिलीप तुला आठवत आपण प्लॅनचेट करायचो?
दिलीप : हो.

राजेश : खूप मज्जा यायची रे तेव्हा. नको नको ते प्रश्न विचारायचो आपण आत्म्यांना. 
दिलीप : हो ना. बिचारे कंटाळून जायचे रे आत्मे आणि exit घ्यायचे लगेच.
दोघे हसतात. सुधीर मन लावून ऐकत असतो.
राजेश : तुला आठवत आपण शेवटचं बसलेलो तेव्हा समीरने विचारले होते की त्याच लग्न कोणाशी होईल ते.
दिलीप : हो ना आणि त्या आत्म्याने बरोबर दाखवलं. ती वाटी त्या प्लॅनचेट बोर्डवर S U J A T A या अक्षरांवर फिरली होती.
राजेश : हो ना आणि त्यांचं लग्न सुद्धा झाल.
सुधीर : छे, अस काही नसतं. सगळं खोट आहे ते.
राजेश : अरे खरेच सांगतोय. आम्ही खूप वेळा केलंय ते.

सुधीर : ते सगळं खोट असत म्हणून तर मी कधी आलो नाही करायला ते. सगळे मनाचे खेळ.
दिलीप : नाही रे. आमचं लग्न केव्हा होणार हे सुद्धा विचारलं होत आम्ही. त्यावेळी आत्म्याने २०२४ साल सांगितलं. बघ अजून आमचं लग्न नाही झालंय.
सुधीर : उगाच थापा नका मारू. 
दिलीप : थापा नाहीत रे. काय केलं तर तुला पटेल?
सुधीर : माझं प्रमोशन केव्हा होणार आणि लग्न कोणाशी होणार ते विचार. बघूया काय उत्तर येत ते.
दिलीप : चला.
राजेश : चला.

राजेश त्या टेबलाखालून एक बोर्ड काढतो आणि मध्ये ठेवतो. त्याच्या बाजूला समीरचा हार घातलेला फोटो ठेवला. दिलीप खोलीतली लाईट घालवतो. बोर्डच्या चारी बाजूला मेणबत्या लावलेल्या असतात. बोर्डवर A पासून Z पर्यन्त लिहिलेलं असत, शून्य ते नऊ पर्यंतचे आकडे असतात. खालच्या बाजूला मध्यभागी घराचं चित्र असत आणि त्यावर HOME लिहिलेलं असत. घरच्या एका बाजूला YES आणि दुसऱ्या बाजूला NO लिहिलेलं असत. 
राजेश त्या बोर्डवर एक कोईन ठेवतो, त्यावर वाटीच्या आत मावेल एवढी मेणबत्ती लावतो आणि त्यावर वाटी उपडी ठेवायची असते.
राजेश : कोणाला बोलवायचं?
सुधीर : म्हणजे?
दिलीप : म्हणजे कोणाचा आत्मा बोलवायचा.

सुधीर : कोणाचाही येतो का?
दिलीप : हो.
सुधीर : मारा थापा.
राजेश : अरे खरेच सांगतोय.
सुधीर : मग बोलवा समीरचा आत्मा. (सुधीर हसतो.)
दिलीप : नको, समीर नको.
सुधीर : का?
दिलीप : समीरचा अकाली मृत्यू झालाय. त्याला बोलावले तर तो परत जाणार नाही.

सुधीर : (मोठ्याने हसतो) मी प्यायलोय म्हणून काहीपण बोलाल काय. मला अजिबात चढली नाहीये. बोलवा समीरचा आत्मा.
दिलीप : बघ हा. आत्मा जात नसेल तर त्याला रक्त द्यावं लागतं.
सुधीर : मी देईन रक्त बोट कापून. (जोरजोरात हसतो.)
दिलीप : ठीक आहे. समीरच्या आत्म्याला बोलवूया. सगळ्यांनी आपल्या उजव्या हाताचे पहिले बोट ह्या वाटीवर ठेवा आणि आत्मा परत जाईपर्यंत बोट वाटीवरून काढायचे नाही. नाहीतर आत्मा आपल्या तिघांना मारल्याशिवाय जाणार नाही.
सुधीर : सगळा चु*याप्पा.
दिलीप मेणबत्ती पेटवून वाटी उपडी ठेवतो आणि तिघेही वाटीवर बोट ठेवतात आणि डोळे मिटतात. दिलीप बोलू लागतो.

दिलीप : समीर प्लिज कम, समीर प्लिज कम.
राजेश सुद्धा बोलू लागतो. सुधीर मात्र हळूच डोळे उघडून बघत असतो.
सुधीर : आला काय रे समीर?
दिलीप : नाही अजून. कोणीतरी डोळे उघडे ठेवून आहे वाटत.
सुधीर पटकन डोळे मिटून घेतो आणि अचानक वाटी फिरते. तिघे डोळे उघडतात.
सुधीर : तू हाताने वाटी फिरवलीस.
दिलीप : अरे बाबा नाही.

सुधीर : मला नाही पटत.
दिलीप : ठीक आहे. समीर तू आला असशील तर वाटी YES वर ने.
वाटी खरोखर YES वर जाते.
सुधीर : (आश्चर्यचकित होऊन) पण कशावरून हा समीर आहे?
दिलीप : तू समीरच असल्याचा पुरावा दे.
त्याचवेळी समीरच्या फोटोला लावलेला हार खाली पाडतो.
राजेश : पटलं का आतातरी?

सुधीर : नाही. हातचलाखी आहे ही.
दिलीप : बर. समीर तुझ्या बायकोचे नाव सांग?
वाटी फिरू लागते.  ‘S U J A T A’
सुधीर : साफ खोट. 
दिलीप : मग तुला जे माहितेय पण आम्हाला माहीत नाही ते विचार.
सुधीर : समीर, आपल्या बॉसचे नाव काय?
वाटी हलते. ‘S H E E T A L’
सुधीर डोळे विस्फारतो.
दिलीप : काय झालं?

सुधीर : अगदी बरोबर सांगितलं.
दिलीप : चल आता तुझ्याबद्दल विचारुया.
सुधीर : नको.
दिलीप : गप्प बस आता. समीर तू आम्हाला सांग सुधीरचे लग्न होणार की नाही?
वाटी NO वर जाते. 
दिलीप : त्याचे कोणावर प्रेम?
वाटी YES वर जाते. 
दिलीप : कोणावर?
वाटी फिरते. ‘S H E E T A L ‘
सुधीर : हे खोट आहे.

दिलीप : are you sure Sameer?
वाटी YES वर जाते.
दिलीप : सुधीर, समीर सांगतोय ते खरे आहे का?
सुधीर : नाही अजिबात नाही. 
दिलीप : समीरचा आत्मा स्वतः सांगतोय म्हणजे ते खरे असणार.
सुधीर : नाही नाही नाही.
दिलीप : खरे बोल.
सुधीर : (तिथून उठून) नाही बोललो ना….
राजेश : सुधीर हे काय केलेस?

सुधीर : काय केले मी?
राजेश : वाटीवरून बोट काढलेस.
सुधीर : त्याने काय होणार आहे, सगळं फेक आहे खोट आहे.
राजेश : आता समीरचा आत्मा परत जाणार नाही, तो आपल्या तिघांना नाही सोडणार.
सुधीर : असे काही होत नाही कधी.
अचानक सगळी लाईट जाते. 
दिलीप : लाईटही गेली. आता आपण सगळे मरणार.
सुधीर : गप्पा बसा रे.

अंधारातच आवाज येतो. “सुधीर…..”
सुधीर : का समीरच्या आवाजात बोलताय. 
“मी समीरच बोलतोय.”
अंधाऱ्या खोलीत खिडकीच्या वरती एक अंधुक प्रकाश पडला होता जिकडून आवाज येत होता. हळूहळू समीरची प्रतिकृती दिसायला लागली. हवेत तरंगणारी समीरची प्रतिकृती.
सुधीर : राजेश का मस्करी लावले. तुम्ही काहीतरी तंत्रज्ञान वापरून मला अडकवत आहात.
सगळेच घाबरले होते कारण असे काही होईल याची कोणालाच माहिती नव्हती.
दिलीप : तुला कशाला अडकवू आम्ही.
समीरचा आत्मा मोठ्याने हसतो, “हा हा हा हा हा.”

सुधीर : समीर 
समीरचा आत्मा : समीर तर मेलाय. तू मारले त्याला.
सुधीर : नाही, मी नाही मारलं तुला. सगळे मिळून मला फसवत आहात. तू बहुरूपिया आहेस, समीर नाहीयेस.
समीरचा आत्मा : हा हा हा. बरोबर, मी समीर नाहीच. मी त्याचा आत्मा आहे.
सुधीर : आत्मा वगैरे काही नसतं.
समीरचा आत्मा : हा काय तुझ्या समोरच तर आहे आत्मा. बघ मी कसा हवेत उडतोय.
सुधीर : हे सगळं खोट आहे, खोट.
समीरचा आत्मा : मी तुझं काय बिघडवले होते सुधीर? आपण तर चौघे बेस्ट फ्रेंड्स होतो ना? मग का असे केलेस?

सुधीर : बेस्ट फ्रेंड्स???? माय फूट. तू माझा एक नंबरचा दुश्मन आहेस. 
समीरचा आत्मा : दुश्मन??
सुधीर : हो हो, दुश्मनच. अगदी शाळेत असल्यापासून. तुला आठवत तुझा नेहमी पहिला नंबर यायचा आणि माझा दुसरा. मला पप्पा नेहमी सांगायचे की समीरपेक्षा जास्त मार्क्स पडले पाहिजेत.
बोलता बोलता सुधीर भूतकाळात निघून जातो.
सुधीरचे पप्पा : तोंड काळ कर मेल्या, परत त्या समीरपेक्षा कमी मार्क्स पडलेत तुला. 
सुधीर : नका मारू बाबा मला, नका मारू
सुधीरचे पप्पा : आता त्याचा बाप मला हसेल. बोलेल तुझ्या पोराच्या पुढे आहे माझा मुलगा. भर रस्त्यात माझी अब्रू काढेल तो.
सुधीर : आई, वाचव मला

सुधीर पुढे बोलू लागतो.
सुधीर : शाळा तर शाळा कॉलेजमध्ये सुद्धा तेच. तू नेहमी पुढे असायचा आणि मागे मी. तिथेही तू बाजी मारलीस त्यामुळे माझ्या मनात अजून राग उत्पन्न झाला.
समीरचा आत्मा : तेवढ्यासाठी तू माझा खून केलास.
सुधीर : नाही.
समीरचा आत्मा : मग?
सुधीर : सुजाता आपल्याच वर्गात होती आणि तिला पाहिल्यापासून मी तिच्या प्रेमात पडलो होतो. तुझ्याआधी मी तिच्याशी ओळख काढली होती. जग जिंकल्यासारखे वाटत होते मला. पण….
समीरचा आत्मा : पण काय?

सुधीर : त्यादिवशी….गुलाब घेऊन मी सुजाताला माझ्या मनातले सगळे सांगणार होतो. मी तिला सांगणार माझे तिच्यावर किती प्रेम आहे आणि लग्नाची मागणी घालणार. ती मला नाही बोलणारच नाही. इतक्यात मला दिसलं की सुजाता तुझ्या खांद्यावर डोके ठेवून तुझ्यासोबत गप्पा मारत होती.
तिथेही तूच आधी पोहचला आणि माझ्या सुजाताला तू माझ्यापासून दूर केलेस. मी तिला नंतर खूप समजवायचा प्रयत्न केला पण तू अशी काही जादू केली होतीस तिच्यावर की ती तुला सोडायला तयार होईना. मग तेव्हाच मी ठरवलं की तुझा मुडदा पाडायचा आणि एकट्या पडलेल्या सुजाताला लग्नाची मागणी घालून लग्न करायचं म्हणजे जगासमोर मी चांगला ठरलो असतो. पण काही केल्या तसा मोका मला मिळत नव्हता. त्यात भरीस भर म्हणून आपल्या दोघांना एकाच कंपनीत नोकरी लागली आणि तिथेही तू माझ्यापुढे निघून गेलास. तिकडची बॉस माझा सगळ्यांसमोर पाणउतारा करायची. माझा अपमान व्हायचा नेहमी. त्यामुळे तुझा काटा काढणं जरुरीचं झालं होतं.

शेवटी तो दिवस उजाडला आणि तुझं प्रमोशन झालं. तू श्रेया बारमध्ये पार्टी देणार हे कळल्यावर तर मला आनंदच झाला. तुला कसेही करून मला टेरेसवर आणायचे होते म्हणून मुद्दाम दारू पीत असताना मी सुजाताच नाव काढलं.
मला माहित होतं तू मग माझ्यावर चिडणार. तसेच झाले. तू माझ्यावर चिडलास आणि मी तिकडून उठून वॉशरूमच्या दिशेने गेलो. त्यामुळे सगळ्यांना वाटलं की मी वॉशरूमला गेलोय. तू मला शोधायला मागून येणार हे मला माहित होतच आणि तू आलासच.
मग मी तिथे भांडण करून टेरेसवर निघून जायच आणि पाठोपाठ तू आलास की  टेरेसवरच्या अंधाराचा फायदा घेऊन मी तुझ्या डोक्यात दारूची बाटली घालेन आणि तू तिथेच खपलास की मग तुला उचलून खाली पार्किंगमध्ये ढकलून देईन.
पण वॉशरूममध्ये गेल्यावर मला धीर होईना. माझं मन मला खायला लागलं. मला माझी मैत्री आठवली, मला पडत्या काळात केलेली मदत आठवली. सुजाता मला आवडायची पण म्हणून तिला विधवा करून मी तिला मिळवायचं ह्याची मलाच लाज वाटायला लागली म्हणून मी वॉशरूममधून परत यायला निघालो. 

सुधीर मोठ्यामोठ्याने रडू लागला.
दिलीप : तूच खून केला आहेस समीरचा आणि मी प्रत्यक्षदर्शी आहे याचा.
सुधीर : म्हणजे?????
समीरचा आत्मा : मी सांगतो. सुधीर तू रागावून निघून गेल्यावर मी तुझ्या मागोमाग आलो तेव्हा माझ्या मागून दिलीप आला आणि मला समजावू लागला. मला त्याने खूप समजावलं आणि सांगितलं की तू टेरेसवर जाऊन बस मी सुधीरला समजावून वर पाठवतो. तुम्ही दोघांनी काय ते वर रुसवे फुगवे दूर करा. म्हणून मी वरती जाऊन बसलो होतो.
दिलीप : अगदी बरोबर आणि सुधीर तुला समजावून सांगितल्यावर तू वर गेलास आणि समीरला वरून ढकलून दिलेस.

सुधीर : नाही. मी नाही ढकलले समीरला. मी तुला नाही ढकलले समीर. मी नाही केला खून तुझा. उलट मी जेव्हा टेरेसवर येत होतो तेव्हा कसलातरी गलका सुरू होता म्हणून मी त्याच मजल्याच्या खिडकीतून पाहिले तर खाली पार्किंगमधल्या गाडीवर समीरचा मृतदेह पडला होता. मी घाबरून खाली धावत आलो आणि माझा नव्याने आलेला ९० चा पॅक कच्चाच पिऊन टाकला. मी समीरला नाही मारलं.
दिलीप : मग समीरला कोणी मारलं?
समीरचा आत्मा : तू…..
दिलीप : बस कर यार राजेश, आपलं काम झालं. आपल्याला सुधीरवर संशय होता आणि प्लॅनचेटच खोट नाटक करून सत्य बाहेर काढायचं होत. दुर्दैवाने सुधीरने कबूल नाही केले पण त्याच्या मनातले बाहेर आले. ही रेकॉर्डिंग आपण इन्स्पेक्टर शरदला दिली की हा अडकला. समीरच्या आत्म्याला शांती मिळेल.

राजेश : पण ह्यावेळी मी वाटी हाताने नाही फिरवली आणि …..
दिलीप : आणि काय राजेश. नेहमी तूच वाटी हाताने फिरवून समीर आणि सुधीरला चु*या बनवायचा. आपण ठरवल्याप्रमाणे सगळं घडलं. वाटी फिरली, समीरच्या फोटोचा हार पडला. तंत्रज्ञान वापरून समीरचा आत्मा असल्याचा भास तयार केला.
राजेश : पण दिलीप, वाटी मी नाही फिरवली. 
दिलीप : तू नाही फिरवली मग कोणी फिरवली?
समीरचा आत्मा : मी फिरवली. हा हा हा हा.
दिलीप : चल, आत्मा वगैरे काही नसतं. हे सगळं राजेश घडवून आणतोय.

समीरचा आत्मा : दिलीप….. आठवतंय का गुढीपाडव्याला तू सुजाताचा विनयभंग केला होतास….
दिलीप : राजेश, हे अति होतंय. तू तंत्रज्ञानात असशील मोठा खिलाडी पण तू हे असे खोटे नाटे आरोप नको करू माझ्यावर.
राजेश : अरे मी काहीच करत नाहीये.
समीरचा आत्मा : राजेशचा ह्यात काही संबंध नाहीये दिलीप. मला सुजाताने त्याचदिवशी सांगितलं होतं पण मला तुझ्यावर खूप भरोसा म्हणून मी तिला समजावलं आणि सगळं तिथेच थांबवलं पण तू तेवढ्यावर नाही थांबलास. तू सुजाताला घाणेरडे मेसेज पाठवत होतास. पण आपल्या मैत्रीमुळे तिने ते मला नाही सांगितले. तुझी हवसची भूक तुला माझ्या बायकोवर मिटवायची होती. मी तुला याचा जाब विचारणारच होतो पण इतक्यात माझे प्रमोशन झाले. पार्टीमध्ये मला अजिबात संशय नाही आला तुझा की तू असे काही करशील. तुझ्या मार्गातील काटा मी होतो. तुझ्या ह्या असल्या घाणेरड्या स्वभावामुळे तुला माझ्या ऑफिसमधून काढून टाकले होते आणि तुझ्या जागी मला संधी मिळाली.

दिलीपने बोलणे मध्येच तोडलं…
दिलीप : हो, तुझ्या त्या बॉसने मला कामावरून काढून टाकल होत आणि माझ्या जागी तुला घेतल. तेव्हापासून मला तुला खपवायचे होते. सुजाताला नादी लावायचं होत पण दुर्दैवाने मी त्यात सपशेल फेल गेलो. माझी हवस मला शांत बसू देत नव्हती, अगदी कॉलेजपासून. मला सुजाताला माझी शिकार बनवायचं होत पण ती नेमकी तुझ्या प्रेमात पडली आणि तुमचं लग्न झालं. माझे घाणेरडे मेसेज वाचून सुजाता जाळ्यात येईल असे वाटले होते पण तसे काही झाले नाही. मी हरलो होतो.
त्यात माझ्या जागी तुला नोकरी लागली ह्याचीही सल होतीच. एकदा दारूच्या नशेत असताना सुधीरने कबूल केले की तुझ्यामुळे सुधीरच्या आयुष्यात खूप निराशा आली, सुजाता त्याला नाही मिळाली. काहीही करून तुला उडवायच आणि सुधीरला ह्यात अडकवायच असा प्लॅन मी बनवला होता आणि त्या रात्री पार्टीत मला ती संधी मिळाली.

तुला समजवल्यावर तू वर निघून गेलास आणि मग मी सुधीरला सांगितलं की तू बाहेरून २ पान बनवून आण. तोपर्यंत मी समीरला टेरेसवर पाठवतो. तुम्ही तिकडे मांडवली करा. सुधीर पान आणायला निघून गेला आणि मी सरळ टेरेसवर गेलो. तू माझ्याकडे पाठ करून उभा होतास. मी आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तुझ्या जवळ आलो आणि बिअरची बाटली तुझ्या डोक्यात घातली. तुझा जागेवरच खेळ खल्लास झाला.मग मी तुला उचलून वरून खाली फेकून दिले आणि शांतपणे खाली वॉशरूममध्ये आलो. त्यामुळे माझ्यावर कोणाचा संशयच आला नाही. सगळं कसं शांतपणे घडून गेलं.
तुझ्या डोक्यात घातलेल्या बाटलीचा कोणालाच संशय नाही आला. सगळं कसं प्लॅन प्रमाणे झाले आणि सुधीर अडकला. पोस्टमार्टम झालं आणि बॉडी मिळाली. मला वाटलं मी सुखरूप सुटलो. सुधीरला राजेशची मदत घेऊन अडकवायचा होता. राजेशला प्लॅनच थांगपत्ता लागू न देता सुधीरने कसा खून केला असेल ते त्याच्या मनात भरवलं आणि तो तयार झाला.
इथेही मी जिंकलो. पण ह्या भें*द इन्स्पेक्टर शरदला कुठूनतरी संशय आला. पण मी इथुनही सही सलामत सुटेन आणि सुजताशी शिकार करेन. हा हा हा….. इथे मी जिंकलो समीर, मी जिंकलो.”

अंधारातून इन्स्पेक्टरचा आवाज येतो.
इन्स्पेक्टर : तू इथेही हरला आहेस दिलीप. You are under arrest.
लाईट येते आणि मागे राजेश आणि सुधीरसोबत इन्स्पेक्टर शरद, हवालदार आणि सुजाता उभे असतात.
दिलीप पळायचा प्रयत्न करतो पण इन्स्पेक्टर शरद त्याला पकडतात.
दिलीप : मी काही नाही केलंय.
इन्स्पेक्टर : तुझा कबुली जबाब आम्ही ऐकलाय आणि रेकॉर्ड सुद्धा केलाय. आता फासावर जाण्यापासून तुला कोणी वाचवू शकत नाही.

इन्स्पेक्टर दिलीपला घेऊन जाऊ लागतात. 
सुजाता : काय मिळालं तुला हे करून? 
दिलीप : मला तू हवी होतीस, मला माझी हवस मिटवायची होती.
सुजाता : म्हणून माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस तू. माझ्या पोटात वाढणाऱ्या त्या समीरच्या अंशाला जन्मायच्या आधीच पोरकं करून टाकलेस तू. त्याला नेहमी सांगायचे की बाळा तुला ३ ३ काका आहेत रे पण आता त्याला सांगावं लागेल की बाळा तुला दोनच काका आहेत रे. तिसरा काका हरामखोर होता. त्याने तुझ्या बाबांना मारून टाकले.
दिलीप : त्याच्याशी माझं काय लेण देणं. तुझं शरीर हवं बस….

सुजाता त्याच्या एक कानशिलात लगावते. इन्स्पेक्टर दिलीपला घेऊन जातात.
सुधीर : सुजाता, मला माफ कर. तुला मिळवण्यासाठी मी समीरचा काटा काढणार होतो पण माझं तुझ्यावरच प्रेम मला ते करू देत नव्हत.
सुजाता : झालं गेलं विसरून जा सुधीर. माझा तुझ्यावर राग नाही. प्रेम करणं गुन्हा नाही मी जबरदस्ती प्रेम मिळवणं गुन्हाच आहे. विसरून जा सगळं. आता मी आणि माझं होणार बाळ हेच माझं आयुष्य.
सुधीर : असे नको म्हणू, मी तुला समीरच्या बाळासोबत स्वीकारेन.
सुजाता : तू कशाला तुझं आयुष्य खराब करून घेतो आहेस सुधीर. हा समाज तुला नाव ठेवेल सुधीर.

राजेश : सुजाता वहिनी. सुधीरच्या मनाची घालमेल मला माहित होती, समीरच्या मृत्यूनंतर त्याला तुमचीच काळजी लागून राहिली होती. सुधीर निर्दोष होता याची कल्पना होती. वहिनी ह्यावेळेला हे बोलणं चुकीच आहे पण समीरच्या होणाऱ्या बाळाचा विचार करून तुम्ही काय तो निर्णय घ्या.
सुजाता काहीच न बोलता निघून गेली. सुधीर मात्र राजेशच्या गळ्यात पडून रडत होता.
“इर्षेवर हवस भारी पडली राजेश. त्या दिलीपचा हवस पायी समीरने जीव गमावला, आपण आपला मित्र गमावला आणि सुजाताने तर सगळंच गमावलं…….”
(समाप्त)
©आशिष देवरुखकर

सदर कथा लेखक आशिष देवरुखकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
साहेब, मग आम्ही जगायचं कसं??

Leave a Comment

error: Content is protected !!