परतफेड

© मृणाल महेश शिंपी
मुकुंद आणि सीमा घरी पोहचायच्या आधी घरी जायला हवं नाहीतर ऊगच गोंधळ व्हायचा,  मनातल्या मनात पुटपुटत उमाताईंनी रिक्षाला हात दाखवला, पण एकही रिक्षावाला आज थांबेना, सगळ्या रिक्षा भरून येत होत्या, नको असताना दहा रिक्षेवाले किधर जाना है ? विचारत सामोरं उभे रहातात, आज हवी तर एकही रिक्षा मिळत नाही रिक्षावाल्यांवर वैतागत त्या झपाझप चालू लागल्या. पण तेवढ्यानेही त्यांना दम लागला भरभर चालवेना, आणि अखेर व्हायचा तो गोंधळ झालाच, त्याघरी पोहोचायच्या आत सीमा घरी आली होती, मागोमाग मुकुंदा सुद्धा आला.

‘आज फारच उशीर झाला, आता दोघंही मुलं आई कुठे गेली होतीस म्हणत प्रश्नांची सरबत्ती सुरू करणार, बंगल्यावर गेले होते हे कळल्यावर चिडणार, वाद होणार’ या विचारने उमाताईं कमालीच्या अस्वस्थ झाल्या.
पण असे काहीच झाले नाही, कोणी काहीच बोलले नाही, पण कधी तरी मुलांना कळणार, सांगावेच लागणार या विचारत कसंबसं दोन घास खावून त्या अंथरूणावर आडव्या झाल्या, पण झोप येईल तर शप्पथ…तिच्या ऐवजी नकोसा भूतकाळ डोळ्यासमोर येऊ लागला.

उमाच बालपण हलाखीत गेलं, ती सगळ्यात मोठी, तिच्या पाठीवर दोन बहिणी,भाऊ. आईवडील शेतमजूर होते, ते दोघं शेतात गेले की ती गपगुमान लहान भावंडांकडे लक्ष दयायची. कसली शाळा आणि कसल काय. दोन वेळेच्या खायची सुद्धा भ्रांत होती.
पुढे गाव साक्षर झालं पाहिजे, गावाच्या विकासाचे वारे वाहू लागले तेव्हा पकडून मुलं शाळेत नेऊन बसवली जाऊ लागली त्यामूळे थोडी अक्षरओळख झाली, चार – पाच इयत्ता उमा शिकली. त्यानंतर शेतात, घरात लग्न झाल्यावर परिस्थिती बदलेल या आशेवर राबत राहिली.

रघुनाथशी लग्न करून मुंबईला आली तेव्हा पत्र्याच्या चाळीतल्या खोलीचा अवतार बघून तिला घेरीच आली, एकादशीच्या घरी संक्रात आली, असे वाटून तीची उर्वरित आशा मावलून गेली. 
रघुनाथ आणि उमा एकच गावचे, रघुनाथ अनाथ होता, चुलत्याच्या जीवावर लहानाचा मोठा झाला होता, बऱ्याच वर्षांपूर्वी तो शेजारच्या गणूनानांबरोबर मुंबईला पळून आला होता, कधीतरी तो आपल्या काकाकाकीला कडक इस्त्रीच्या कपड्यात, सुटाबुटात भेटायला यायचा त्यामुळे तो मोठा साहेब झाला आहे असाच सगळ्याचा समज झाला होता.
पण वास्तवात रघुनाथ ड्रायव्हर होता, आणि दारूच्या चांगलाच आहारी गेला होता.

रघुनाथच्या चुलत्याने लग्नासाठी विचारलं तेव्हा रघुनाथच्या दिखव्याला भूलल्यामुळे कसलाही पुढचा मागचा विचार न करता उमाच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला होता.
आपल्याकडे ना रंगरूप ना शिक्षण, कुठल्या राजकुमाराशी लग्न होईल ही अपेक्षा करणंच चुकीचं…नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा पदरी आलं पवित्र झालं, जे आहे ते उमाने स्वीकारायचं ठरवलं.
खोली झाडूनपुसून स्वच्छ केली, होत ते तोडकंमोडकं समान लावून नीटनेटकी लावली, तिच्या ओढीने रघुनाथ सुद्धा वेळेत घरी येऊ लागला, दारुवरचा अमंल बऱ्यापैकी कमी झाला आणि हळूहळू त्यांचा संसार मार्गी लागला.
रघुनाथ स्वतः शिकला नसला तरी मुलांच्या शाळा, अभ्यास याकडे जातीने लक्ष दयायचा.

त्याचा मुकुंदावर फार जीव, त्याला खूप शिकवायचंं, मोठं करायचं, तो नुसता माझ्यासारखा साहेब असल्याचा आव आणणार नाही तर खरच शिकून मोठं होणार त्यासाठी मी झटणार असं तो नेहमी म्हणायचा.
आपण योजतो एक आणि होतं दुसरचं….रघुनाथ ज्यांच्याकडे कामाला होता त्या साहेबांची बदली झाली आणि त्याची नोकरी सुटली. बरेच प्रयत्न करून दुसरी नोकरी मिळेना. घरभाडं, मुलांच्या फिया सगळंकाही थकलं, दुकानदार पहिली उधारी चुकती केल्याशिवाय समान देईना, उपासमार होवू लागली, उमाने बांधकाम साईटवर मोलमजुरी सुरू केली, “ड्रायव्हरचे काम मिळेपर्यंत तू पण माझ्याबरोबर तिकडे कामाला चल” असे ती रघुनाथला म्हंटली, “चार पैसे कमवायला लागली तर मला शिकवते” म्हणत तो तिच्याशी भांडू लागला, संशय घेवू लागला, तिच्याकडचे पैसे हिसकावून घेवून दारूच्या नशेत तिला मारहाण करू लागला.

उमाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ह्यावेळेला उमाची ओढ, मुलाचं प्रेम कोणीच त्याला दारुपासून परावृत्त करू शकलं नाही, आपल्या कुटुंबापेक्षा जहरीला एकच प्याला त्याला जवळचा वाटला आणि त्यानेच त्याचा घात केला, दारूच्या नशेत रेल्वलाईन ओलांडताना अपघातात त्याचा मृत्यू झाला. कोणाला वाटलं हा अपघात होता तर कोणी म्हंटल रघुनाथने आयुष्याला कंटाळून जीव दिला. कोणी काहीही म्हणो उमाचा फटका संसार उघडा पडला एवढं मात्र नक्की.
रघुनाथ होता तेव्हाची गोष्ट वेगळी होती, कसा ही असला तरी कुंकवाला आधार होता, आईवडील म्हातारे झालेले, दोघी बहिणींचे संसार थोड्याफार फरकाने आपल्यासारखेच, भाऊ असून नसून सारखा…काय करावं, कुठे जावं उमा या विचारात उमा असताना, महादू बंगल्यावरून सांगावा घेवून आला.

“भाडं भरा नाही तर खोली खाली करा” हे ऐकून उमाच्या पायाखालची जमीनच सरकली…”दया करा, थोडी मुदत वाढवून दया” सांगायला ती बंगल्यावर पोहोचली. वत्सलाबाई आणि प्रधान साहेब मोठं प्रस्थ होते यांच्याबद्दल बरचंकाही ऐकून होती ती…ते आपल्याला निराश करणार नाहीत या आशेने ती बंगल्यात पोहोचली.
“आधीच खूप सवलत देवून ठेवली आहे तुम्हा लोकांनां यापुढे नाही, भाड भरा नाहीतर पंधरा दिवसात खोली खाली करा” वत्सलाबाई कडालल्या. काय बोलावं न सुचल्यामुळे उमा खालमानेने घरी निघाली, तेवढ्यात काय काय झाले काय माहित “बंगल्यावर काम करशील का ? काम केलेस तर भाडं माफ करीन बाई म्हंटल्या.

त्यावेळी बाईंना कामवालीची गरज होती, उमा खेडवळ असली तरी तिची भाषा शुद्ध होती, रहाणी स्वच्छ होती आणि मुळात म्हणजे पैशाची गरज असल्याने लगेच काम सोडून जाणार नाही याची बाईंना खात्री पटली होती.
उमाने आनंदाने मान डोलावली.
“रोज आंघोळ करून यायचं, स्वच्छ कपडे घालायचे, बंगल्यात यायच्या आधी बागेतल्या नळावर हातपाय धुवून आत यायचं, जास्त बोलायचं नाही, कानावर पडलेली गोष्ट बाहेर जाता कामा नये” अशा अनेक अटींच पालन करत दुसऱ्या दिवसापासून उमा बंगल्यावर कामाला रुजू झाली.

उमाच्या हाताला मुळातच चव होती, बाईंच्या हाताखाली शिकून ती स्वयंपाकात अजूनच तरबेज झाली.
प्रधांनांकडे काम करते म्हंटल्यावर तिला अजून एक दोन घरची स्वयंपाकाची कामे मिळाली.
बाईंनी घरभाडं माफ तर केलंच पण मुलाच्या शाळेची फी पण लागलीच भरून टाकली.
बाईंमुळे परिस्थितीत बरीच सुधारणा झाली, आणि उमा या उपकारांच्या ओझ्याने अगदी दबून गेली.

बाईंना उशीर बिलकुल चालत नसे, उशीर, कामात चालढकल केलीस तर पगार कापीन म्हणत बाई कधी उमाला फैलावर घेत तर कधी उशीर होवू नये म्हणून धावतपळत येणाऱ्या उमाच्या हातात थंडगार लिंबू सरबताचा ग्लास ठेवत.
उमाला बाईंच्या स्वभावाचा अंदाज यायचा नाही.
एवढ्या मोठ्या घरचा डोलारा सांभाळायचा म्हणजे कठोर व्हावं लागतं, तीला बाई फणसासारख्या वाटायच्या.
उमा जितका बाईंचं गुणगान गायची तितकाच मुकुंदा त्यांचा रागराग करायचा.

तो कुठे खेळताना, उनाडक्या करताना दिसला की बाई लागलीच हटकायाच्या, “शिकलास तर भलं होईल, नाहीतर बापासारखं आयुष्याचं मातेर होईल, किती दिवस आईने हाती पोळपाट लाटणं घेवून फिरायचं”
सगळ्यांसमोर बाई असं काहीबाही बोलायच्या, बरोबरची मुलं हसायची, चिडवायची आणि तो आणखीनच त्रागा करायचा.
“काही उपकार करत नाहीत माझी फी भरून, बंगल्यावर पार्टी असली, सुट्टीच्या दिवशी  कामाला बोलवतात त्याचे पैसे कुठे देतात आणि माझ्या अभ्यासाच्या गोष्टी करतात. तुला सुद्धा कमी पैशात राबवून घेतात आई, जशी आपल्याला गरज आहे तशी त्यांना पण आहे.” मुकुंदा रागाने लाल व्ह्यायचा.

उमाकडून सुद्धा बाई उपास असेल, एखादया दिवशी स्वयंपाक नसेल तर गहू निवडून घेत, तुझ्या घरजवळच तर आहे चक्की म्हणत दळण आणायला सांगत, इतकेच काय तर कपड्यांच्या घड्या कर, दाण्याचं कुट कर अशी अनेक कामं तीच्याकडून करू घेत, उमाला कळत नव्हत असं नाही पण ती आपले जुने दिवस आठवून गप्प बसायची.
वत्सलाबाईंनी काम दिलं नसत तर काय झालं असत, कुठे गेले असते दोन लहान लेकरांना घेवून,बाईंमुळे उपासमार टळली, त्यांनी बांधून दिलं म्हणून मुलांना गोडधोड खायला मिळालं, अंग झाकलं गेलं, वेळप्रसंगी उघारउसनवार दिली म्हणून सण साजरा झाला, बाईंची कृपा होती म्हणून कोणाची वाकड्या नजरेने बघायची हिंमत झाली नाही असे अनेक दाखले देत ती मुकुंदाला आणि लहान असली तरी त्याचं बघून बोलायला लागलेल्या सीमाला गप्प बसवायची.

काही वर्षाने मुकुंद पदवीधर झाला, नोकरीला लागल्यावर सगळी कामं सोड म्हणून आईच्या मागे लागला. बाईंच्या चाळीतली खोली खोली सोडून त्याने, दुसरीकडे जागा भाड्याने घेतली. “अजून थोडे दिवस जोवर होतंय तोवर करु दे दोनचार घरी कामं, तू आताच नोकरीला लागलास, तुझ्यावर भार नको, सीमाच लग्न होईपर्यंत तरी करू देत.”
“बाईंकडे बंगल्यावर जायचं नाही, बाकी जवळपासची एकदोन कामं कर, जास्त नाही” त्याने आईला ताकीद दिली. मुकुंदाने खोली सोडल्याचा राग तर होताच त्यात उमाने काम सोडल्याने बाई फार नाराज झाल्या. बाईंना भेटायला गेलेल्या उमाला “फार माजलाय मुकुंदा” म्हणत त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

मधल्या काळात बाईंच्या मुलाचं, मुलीचं लग्न झाल्याचं कळलं, बाईंच्या आजारपणाची बातमी कानावर आल्यावर उमा बंगल्याबाहेर बऱ्याचवेळ घोटाळली पण आत जायची हिंमत नाही झाली. त्यानंतर गेल्या आठवड्यात प्रधान साहेब पत्ता शोधत घरी आले, बाईंची प्रकृती फारच खलावल्याच सांगितले. “परत कमावर यायला जमेल का ? एकदा तरी येवून भेटून जा शेवटची स्टेज आहे कॅन्सरची”
मुलगी दील्याघरी आपल्या व्यापात सुखी आहे, तिला तिचा संसार, जुळी लहान लेकरं आहेत, ती येते अधूनमधून चारआठ दिवस येऊन रहाते, तिच्याकडून किती अपेक्षा करणार, आम्हाला तिच्याकडे जाऊन रहाणं रुचत नाही.
मोठा मुलगा अविवाहित त्यात बोटीवर नोकरीला, सुट्टीत येतो कधीकधी, त्याची नोकरी जगभ्रमंतीची त्यामुळे तो असून नसून सारखाच. धाकट्या सूनेच आणि वत्सलाच कधी जमलंच नाही, ना तिने कधी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला ना वत्सलाने.

लग्नानंतर थोड्याच दिवसात ती वेगळी झाली, इकडे यायला मागत नाही, मुलाला वाटत पैसा दिला की झालं सगळं, नोकरचाकर आहेत पूर्णवेळ दोन नर्स आहेत, ते काय आपली ड्यूटी करतात, वेळ झाली की निघून जातात, वत्सलेने सगळ्यांचं सगळ केलं, पण फटकळ स्वभाव, बोलून वाईट झाली त्यामुळे आता कोणी नातेवाईकही यायला मागत नाही. आपलं‌ कोणीतरी हवं तिच्याजवळ, मी आहेच, पण बाईमाणूस असलं तर अजून बरं पडेल असं वाटून तुम्हाला गळ घालायला आलो, थोड्या दिवसांनी सोबती आहे ती, नाही म्हणू नका, गाडी पाठवतो हवं तर उमाताई …..” साहेबांच्या बोलण्याने उमाचे डोळे पाणावले.

बाईंबद्दल कळलं आणि उमाताईंना रहावलं नाही, मुलांना न सांगताच त्या बंगल्यावर गेल्या. कशा होत्या बाई, काय तो रुबाब, तो ताठा… आणि आता कशा झाल्यात… वत्सलाबाईंचा कृश झालेला चेहरा, खोलवर गेलेले डोळे पाहून उमाला गलबलून आले. गेल्या आठ दिवसांपासून रोजच उमाताई बंगल्यावर जात होत्या, बाईंची वेणीफणी, त्यांना  भरवणं, स्पंजिग स्वतःच्या हाताने करत होत्या. उमा येऊ लागल्याने बाई खूश होत्या, औषधगोळ्या वेळेवर घेवू लागल्या होत्या, उठून बसायचा प्रयत्न करत होत्या. उमाताई मनापासून बाईंची सेवा करत होत्या, मुलं नोकरीला गेल्यावर दुपारी उमाताई बंगल्यावर यायच्या दोन, अडीच तास बसून बाईंना काय हवं नको ते बघून मुलं यायच्या आत घरी परतायच्या.

पण काल बाईंनी उमाच्या हातचं थालीपीठ खायची इच्छा बोलून दाखवली, ते बनवून त्यांना खाऊ घालेपर्यंत वेळ गेला घरी यायला उशीर झाला, आई घरी नाही मुलांना कळले. ‘किती दिवस लपवणार, कधी ना कधी सांगावच लागणार’ या विचारात उमाताईंना उशीरा झोप लागली. सकाळी उठायला देखील उशीर झाला. “सीमा, उठवायचं‌ न मला, तू आवर तुझं पटकन करते मी डबा.”
“आज रविवार आई, मला आणि दादाला सुट्टी, तूच आराम कर, मी आज चहा, नाश्ता बनवते.” आज बंगल्यावर जायला नाही मिळणार या विचाराने उमाताई अस्वस्थ झाल्या. चहा, पोहे खावून, सगळं आवरून सीमा मैत्रिणीबरोबर पिक्चरला गेली. मुकुंदापण थोड्यावेळ बाहेर गेला तर बरं होईल पटकन बाईंकडे जाता येईल, उमताईंच्या मनात आले. पण सुट्टीच्या दिवशी कधीच घरी न थांबणारा मुकुंदा आज घरात ठाण मांडून बसला होता.

आईच्या मनाची चलबिचल मुकुंदला कळत होती, पण तो आई बोलेल याची वाट पहात बसला होता. आई काहीच बोलत नाही   म्हंटल्यावर त्यानेच विषयाला हात घातला,  “प्रधान साहेब भेटले होते त्यांच्याकडून कळलं बाईंबद्दल…तू जा आई बंगल्यावर…हीच वेळ आहे, बाईंनी केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची” मुकुंदा काहीश्या उपहासाने म्हंटला.
त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उमाताई घराबाहेर पडल्या. परतफेड, पैश्याची आस असा कुठलाच विचार त्या माऊलीच्या मनाला शिवला देखील नव्हता. बाईंच्या कठोर वागण्यामुळे आपलं भलं झालं हे त्रिवार सत्य नाकारता येण्यासारखं नव्हतं, काही ऋणांतून मुक्त होणं कधीच शक्य नसतं हे उमाताईंना चांगलंच ठावूक होतं. म्हणूनच माणुसकीच्या नात्याने, ऋणानुबंधाच्या अनोख्या ओढीने शेवटच्या घटका मोजत असलेल्या वत्सलाबाईंना जमेल तशी मदत करायला उमाताई बंगल्याच्या दिशेने झपाझप चालत राहिल्या.
© मृणाल महेश शिंपी

सदर कथा लेखिका मृणाल महेश शिंपी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
स्वामिनी
जाळ्यातील कोळी

Leave a Comment

error: Content is protected !!