गृहलक्ष्मी

© सौ मंजुषा गारखेडकर 
धनुच्या घरात धावपळ सुरू होती. आत्या, काकी, मामी , मावशी सगळेच जमले होते. कारणच तसं होतं. आज धनूच्या दादाच्या लग्नाचा बस्ता बांधायचा होता. सगळे मिळून बस्ता बांधायला निघाले होते. सगळ्यांच्या आवडीचा बस्ता निवडायचा म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं होतं. 
दादाचं लग्न ठरलं तसं घरातलं वातावरण आनंदून गेलं. रोज बैठकी, पाहुणे रावळे, पोरं सोरं सगळी धमाल चालली होती. वरमायला काम मात्र खूपच करावं लागत होतं, पण तरी घरी सूनबाई येणार म्हणून सगळेच आनंदून गेले होते. 

सगळ्यांनी भारीतले आपआपल्या आवडीचे कपडे निवडले. पोरी सोरी मॅचींग बांगड्या टिकल्या सगळं गोळा करू लागल्या. पार्लरवाली बोलवली. सगळ्यांचं फेशियल, आय ब्रो सगळं झालं.
मनासारखी मुलगी मिळाली म्हणून दादाही खुश होता. हळदीच्या कार्यक्रमाला तर खूपच मजा आली. सगळे लहान मोठे भरपूर हळद खेळले. 
मेहंदी, संगीत सगळेच कार्यक्रम थाटात पार पडले. लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला. सगळेच वधू वरांच कौतुक करत होते. सगळ्यांना तो लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटत होता.

लग्न लागलं, जोडे लपविण्याचा घाट करवल्यांनी घातला होता आणि दादा कडून चांगलेच पैसे कमावले. आज दादाही खुश असल्याने त्यानेही सढळ हाताने दिले होते. सगळे कार्यक्रम उत्साहात पार पडले. 
रात्री वरात घरी जायला निघाली. वधुपित्याने भरपूर वस्तू लग्नात भेट म्हणून दिल्या. अगदी फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन सगळं सगळं. संसाराला काही कमी पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. 
वरात घरी आली. सगळ्यांनी स्वागत केलं, उखाणे झाले, लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला.
वरमायनी नव्या सुनेला लक्ष्मीपूजनाला घसघशीत दागिना आणि भारीतली साडी भेट दिली.  

सगळं कसं छान मनासारखं झालं होतं. बोलवलेली सगळी मंडळी आनंदात सहभागी झाली होती आणि प्रत्येकानेच नवीन जोडप्याच तोंड भरून कौतुक केलं होतं. 
दुसऱ्या दिवशी पूजा आणि गोंधळाचा कार्यक्रम होता. तो ही कार्यक्रम छान पार पडला.
आता नव दाम्पत्याला जेजुरीला दर्शनाला पाठवायचे होते पण त्या आधी वधूच्या माहेरी नवदाम्पत्याच्या हस्ते पूजा ठेवली.
मग सकाळी सकाळीच दोघं आवरून माहेरी गेली.
बाकी पाहुणे मंडळी निवांत होती. सगळ्यांनाच नवीन सूनबाईच्या माहेरी आमंत्रण होतं. तिथला कार्यक्रम पार पडला, सगळी मंडळी घरी आली.

सूनबाईने दादाला हळूच बाजूला नेले आणि म्हणाली,”मी चार पाच दिवस इथेच राहते.” दादा हिरमुसला. पण त्याने परवानगी दिली. काय करणार?? इलाजच नव्हता. बिचारा नाराजीनेच घरी परतला. 
दोन तीन दिवसा नंतर तो सूनबाईला आणायला गेला.
जरा वेळ गप्पा टप्पा मारून दोघं घरी यायला गाडी वरून निघाले. अर्ध्या रस्त्यात आले तर चार पाच तरुणांनी त्यांना घेरलं.
दादाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तीच त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि तिने सांगितलं की,”माझं या तरुणावर प्रेम आहे. मी ह्याच्या बरोबरच संसार करणार. मला नाही यायचं तुमच्या बरोबर.” दादा तर हे सगळं ऐकून हैरणाच झाला.

त्याला काय बोलावं तेही सुचेना. सगळं अकल्पितच होतं. तरी त्याने समजावण्याचा खूप प्रयत्न केला की घरच्यांना काय वाटेल, तुझ्या मम्मी पप्पांना काय वाटेल याचा विचार कर….आपण घरी जाऊन बोलू शांतपणे…मग ठरवू काय करायचं…. पण नाही……त्यांचा निर्णय झालेला होता. ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते नवीन सूनबाई ला घेऊन गेले. 
दादा शॉक मधेच घरी आला… सूनबाई नव्हती म्हणून सगळेच विचारायला लागले. पण तो काहीच बोलत नव्हता. कुठे तरी एकटक नजर लावून बसला होता.
घरच्यांना तर काहीच कळत नव्हते. “अरे दाद्या काय झालं?? असा का बसला? अन् वहिनी कुठंय??” धनु विचारात होती. पण दादा होता तसाच मख्ख बसून होता.

आबा अन् माई आले त्यांनी खोदून विचारलं पण दादा काहीच बोलेना. “अरे गेली कुठं सूनबाई ? पडली का सूनबाई गाडी वरून ? झालं तरी काय??” माईने व्याकुळ होऊन विचारलं.
लग्न होऊन चारदोन दिवस सुद्धा झाले नव्हते. नाना विचार माई आबांच्या मन:पटला वर उमटले. घायकुतीला आले बिचारे. दादा फक्त म्हंटला,”ती नाई आली.” 
आता नवनवीन तर्क वितर्क सुरू झाले. सगळेच दादाला का नाही आली, तिला कोणी काही बोललं का? काय झालं तरी काय?  नाराज झाली का ती ? असे असंख्य प्रश्न विचारू लागले.

शेवटी तो, “मला एकट्याला सोडून द्या” असं म्हणत आत जाऊन दार लाऊन बसला. 
दादाचा मुड जाणं स्वाभाविक होतं. तो उत्तर तरी काय देणार म्हणा. त्याच्या ध्यानी मनीही नव्हतं असं काही होईल.
बिच्चारा !  त्याची काहीही चूक नसताना त्यालाच त्याचा त्रास होत होता. 
इकडे माई, आबा, इतर पाहुणे रावळे पुढे काय करावं याची चर्चा करायला लागले.
शेवटी ठरलं की मुलीच्या वडिलांना फोन करायचा.
मग आबांनी त्यांना फोन लावला, “नमस्कार व्याही बुवा.”

“नमस्कार, पोचले का पोरं घरी ?” समोरून आवाज आला. आता आश्चर्य वाटण्याची पाळी आबांची होती.
दादा म्हणतो आली नाही, पोरीचा बाप म्हणतो पोचले का? म्हणजे नक्की झालं तरी काय? शेवटी आबांनी त्यांना इथे बोलावून घेतलं. 
सगळ्यांनी मिळून दाद्याला खोदून विचारलं तेव्हा कुठे खरी हकीकत समोर आली.
आता पोरीचा बाप हबकला. त्याला काहीच सुचेनास झालं. तो गेला पोरीला शोधायला. 
इथे मात्र दादा गप्प गप्प असायचा. आलेले पाहुणे आले तसे निघून गेले.

इतके दिवस घर भरल्या सारखं वाटायचं  त्या घराला अवकळा आली. ना खण्या पिण्यात लक्ष ना कशातच.
मग आबांनी दादाला खूप  समजावलं, ” दाद्या ह्यात तूझी काय चूक हाय मला सांग… त्या पोरीला जायचच व्हतं, ते गेली. तूले कटाळून तं नाही ना गेली ? ? मंग ? तू नको मनाले लाऊन घिऊ. पन तिनं लगन ठरवाच्या आधी बापले सांगितलं असतं तर बरं नसतं झालं काय? बापाची इज्जत रायली असती. पोरी बी अशा असते का नाई….माय बापाचा इचार बी नाई करत जरासाक” अनेक गोष्टी समजल्यावर कुठे तो हळू हळू नॉर्मल झाला. 

मग काही दिवसांनी ऑफिसला ही जायला लागला. पूर्वी सारखा लोकांमध्ये रमु लागला. माई आबा यांना खूप बरं वाटलं. तरी त्यांच्या मागे काळजी होतीच. दादा अजून स्थिरस्थावर झाला नव्हता.
आता दुसरं स्थळ बघून त्याचं आयुष्य मार्गी लावावं असं त्यांना वाटे. हो नाही करत एक दिवस त्यांनी हा विषय दादा समोर काढला. दादा त्यावर फारसा काही बोलला नाही पण त्याने विरोधही दाखवला नाही. मग माई आबांनी मुली शोधायला सुरुवात केली. जवळपासच्या लोकांना सांगून ठेवलं.
पण मुलगी काही मिळत नव्हती. वास्तविक त्यांनी कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. 

नाही म्हटलं तरी माई आबा हिरमुसलेच होते. काय करावं काहीच कळत नव्हतं. याच विषयावर त्यांची चर्चा सुरू होती तितक्यात बेल वाजली. धनु दार उघडायला गेली.
दार उघडते तो समोर काय…?   दादा आणि एक भरजरी साडी नेसलेली गोरी गोमटी मुलगी गळ्यात हार घालून उभे होते.
आश्चर्य मिश्रित आनंदाने तिने माई आबांना बोलावले. त्यांनाही अत्यानंद झाला होता.
त्यांचा प्रश्न चुटकी सरशी सुटला होता.
माईंनी माप ओलांडून सुनेला घरात घेतलं. सगळीकडे आनंदी आनंद झाला.

माई आबांशी लग्नाचा विषय बोलल्या नंतर दादाने ठरवलं की एखाद्या विधवेशी किंवा परित्यक्तेशीच विवाह करावा.
एकदा त्याच्या ऑफिस मधल्या अविनाशशी बोलता बोलता त्याला कळलं की त्याच्या बहिणीला दोन वर्षापूर्वी तिच्या लहान मुला सकट तिच्या नवऱ्याने निर्दयी पणाने हाकलून दिलं.
हे ऐकल्या पासून तिला भेटावं असं त्याला वाटायच. पण अविनशशी कसं बोलावं हे त्याला कळत नव्हतं. 
शेवटी मनाचा हिय्या करून एकदा अविनाशशी बोलला. मग त्याच्या बहिणीशी आणि तिच्या मुलाशीही भेटला.

तिचे आणि त्याचे विचार जुळतात हे बघून त्याने तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला.
एवढंच नाही तर तिच्या मुलाची जबाबदारीही स्वीकारली. अविनाशशी बोलून दोघांनी कोर्टात लग्न केलं.
माई आबांना आता कुठलाच त्रास होऊ नये म्हणून सगळं होईपर्यंत त्यांना काहीच सांगितलं नाही.
मुलीचा होकार, तिच्या मनाची तयारी हेही तितकाच महत्वाचं होतं.
एकदा होरपळल्यावर तिलाही जरा धाकधुकच होती.

तिच्या मनाची तयारी झाल्यावरच लग्नाचा निर्णय त्यांनी घेतला.
त्याने गाजावाजा न करता परित्यक्तेशी विवाह करून आपली गृहलक्ष्मीच आणली होती. तिच्या मुला सकट तिला स्वीकारलं होतं.
ती सोज्वळ मुलगी या घराला घरपण नक्की देणार याची सर्वांना खात्री होती. 
© सौ. मंजुषा गारखेडकर
सदर कथा लेखिका सौ. मंजुषा गारखेडकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
दृष्टी
जाणीव

Leave a Comment

error: Content is protected !!